"एक्स्पोर्ट सरप्लस"
दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता. कदाचित अशा नावाने आजही माल विकला जात असेल, पण परदेशी रहात असल्यामुळे मला बरोबर कल्पना नाहीं.
मला समजलेली एक्स्पोर्ट सरप्लसची व्याख्या म्हणजे एक्स्पोर्टची ऑर्डर १०० ची असतांना २०० नग बनविणे व एक्स्पोर्ट केल्यानंतर जे शंभर उरतील ते एक्स्पोर्ट सरप्लस म्हणून स्वदेशातील बाजारात उपलब्ध करून देणे!
पण पाकिस्तानने या शब्दांची व्याख्याच बदलली आहे असे वाटते.
पाकिस्तानने "केवळ निर्याती"साठी दहशतवादी बनविण्याचे कारखाने उभारले व तेही खास एक्स्पोर्ट झोन्समध्ये! (आपल्याकडे मुंबईला जशी सीप्झ विभाग आहे अगदी तशातलाच प्रकार!) त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरचा डोंगराळ विभाग त्यांनी निवडला. या कारखान्यात अतिरेक्यांसाठी शस्त्रास्त्रेही बानायची व ते वापरणारे अतिरेकीही. दोन्ही गोष्टींचे उत्पादन एकाद्या कारखान्यात mass production च्या तत्वावर जसे उत्पादन केले जाते त्या तत्वावर केले गेले. पाक-व्याप्त काश्मीरच्या डोंगराळ भागात असे अनेक कारखाने उभारले गेले. समोरासमोर केलेल्या युद्धात आपली ताकत कमी पडून युद्ध जिंकता येत नाहीं असे ल़क्षात आल्यावर असे छुपे युद्ध करण्याचे तंत्र प्रथम जनरल झियाच्या कारकीर्दीत सुरू झाले. या "mass scale" वर फक्त निर्यातीसाठी केलेल्या संपूर्ण उत्पादनाची निर्यात मुख्यत: भारतात व्हायची. "नेमेचि येतो मग पावसाळा"सारख्या एकाद्या चक्रीय घटनेप्रमाणे ठराविक काळानंतर भारतात स्फोट व्हायचे, निष्पाप लोक मरायचे, आपले सरकार निषेध-खलिते पाठवायचे व गप्प बसायचे. पण झियाच्या काळात ही निर्यात आपल्या काश्मीर राज्यापुरतीच मर्यादित होती. पण.....?
झियाला त्याच्या अशा कारखान्यात निर्मिलेल्या अतिरेक्यांनीच यमसदनाला पाठविले असावे. अलीकडे बेनझीरबाईंनाही अशाच अतिरेक्यांनी मारले. झियाला उडवल्यानंतर राज्यावर आलेल्या बेनझीरबाई त्यांच्या पहिल्या ’खेळी’त (term) लिंब-लोणचंच होत्या! राष्ट्राध्यक्ष गुलाम इशाक खान, लष्करप्रमुख ज. बेग व गुप्तहेर संघटनेचे (ISI चे) प्रमुख ज. हमीद गुल या तिघांनी बेनझीरला कांहींही अधिकारच दिले नाहीत व कांहींही करूही दिले नाहीं. त्यामुळे बेनझीरबाईंना या अतिरेक्यांच्याबाबतीत काहीच करता आले नाही. त्यांचे मंत्रीमंडळ बरखास्त केल्यावर नवाज शरीफ गादीवर आले. हे तर आधीपासूनच लष्कराच्या आशिर्वादाने व लष्करशहांनी बेनझीरला शह देण्यासाठी उभारलेल्या "IJI" या पक्षातर्फे निवडून आले होते. अर्थातच लष्कराच्या ताटाखालचे मांजरच. त्यांनीही दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळातही हे "केवळ निर्यातीसाठी" असलेले हे कारखाने जोरात चालूच ठेवले गेले व तिथल्या प्रशिक्षित अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये येऊन खूप धुमाकूळ घातला.
त्यानंतर बेनझीरबाई पुन्हा निवडून आल्या, पण या वेळी तिला सर्व अधिकार मिळाले. ’शहाण्या’ झालेल्या बेनझीरबाईंनी लष्कराशी कांहींशी हातमिळवणी केली व मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून हे अतिरेकी बनविण्याचे कारखाने चालूच ठेवले. फक्त पाकव्याप्त काश्मीरातच नव्हे तर अनेक नवे कारखाने खुद्द पाकभूमीवर इस्लामाबादच्या आसपासही उभारण्यात आले. दोन-तीन वर्षें राज्य करून त्या पुन्हा पदच्युत झाल्या व नवाज़ शरीफ पुन्हा आले. पण तेही फार दिवस टिकले नाहींत. त्यांची ही छोटी कारकीर्द कारगिल युद्धामुळे व पाकिस्तानी अण्वस्त्रांचा स्फोट घडवून आणल्यामुळे संस्मरणीय झाली. पण मुशर्रफने नवाज़ शरीफांची 'निर्यात' सौदी अरेबियाला करून स्वत: आधी CEO व नंतर राष्ट्राध्यक्ष झाले.
मुशर्रफ़-मियॉंने तर उच्छादच मांडला! त्याच्या काळात ही अतिरेक्यांची निर्यात फक्त काश्मीरपुरती मर्यादित न रहाता हे अतिरेकी सार्या भारतात निर्यात होऊ लागले. त्यात पार्लमेंटहाऊसवरील हल्ला, अनेक मंदिरांवरचे हल्ले, बंगळूरमधले हल्ले, वाराणसीवरील हल्ला, जयपूरवरील हल्ला वगैरे हल्ले मोडतात!
या मुशर्रफ़च्या काळात एक मोठे (व भारताच्या दृष्टीने सकारत्मक) परिवर्तन घडून आले. प्रथमच "केवळ निर्याती"साठी बनविलेल्या या मालाला पाकिस्तानच्या स्वदेशी बाजारपेठेतही चांगली मागणी येऊ लागली. खुद्द मुशर्रफ़ यांच्या गाडीखाली बाँब उडवून त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करणार्यांना "स्वातंत्र्य-सैनिक" म्हणायचे पण त्याच्या स्वतःच्या गाडीखाली बाँब लावणार्यांना मात्र खुनी, गुन्हेगार म्हणायचे अशा निरनिराळ्या व सोयीस्कर व्याख्या मुशर्रफने बनविल्या. आधी केवळ निर्यातीसाठी असलेले हे उत्पादन ५० टक्के निर्यातीसाठी तर उरलेले ५० टक्के "स्वगृही" वापरण्यात येऊ लागले. या दहशतवाद्यांनीच लाल मस्जिद येथे दारूगोळ्याचा मोठा साठा केला, वापरला, दोनेक दिवस सैन्यालाही थोपवून धरले व शेवटी प्रचंड प्रमाणावर रक्तपात होऊन तो वेढा उठविण्यात आला. त्यात "गड आला पण सिंह (उंदीर) गेला"ची पुनरावृत्ती झाली! लाल मस्जिद मुक्त झाली, पण मुशर्रफ़ या "चुह्या"चा पत्ता कटला! त्याच्या शेवटच्या दिवसांत बेनझीरबाईही अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडल्या. अगदी स्वनिर्मित (home-made) अतिरेक्यांकडून.
आता तिचे पती राज्य करताहेत. पाकिस्तान राष्ट्र पाकिस्तानी सरकार चालवितंय् कीं हे अतिरेकी व इतर कर्मठ व धर्मांध मुल्ला-मौलवी चालवत आहेत की ISI चे बेलगाम अधिकारी चालवताहेत असा प्रश्न साहजिकच मनात येतो!
आज तरी या अतिरेक्यासमोर पाकिस्तानी सरकार शरण आलेलं दिसतंय्. मधेच कधी तरी झटका आल्यासारखे तालीबानवर हल्ले होतात, मग जरा रग उतरली कीं 'स्वात'सारख्या कुठल्याशा भागात शारिया कायदाही लागू होतो, जरा अमेरिकेने डोळे वटारले कीं पुन्हा वजीरिस्तानवर कांहीं दिवस संक्रांत येते. मग पुन्हा तह होतो. असेच चालू रहाते.
गेल्या वर्षी २६ नव्हेंबरला पाकिस्तानने मुंबईला एक मोठी "निर्यात" केली. तीन-चार ठिकाणे हेरून अतिरेक्यांनी हैदोस घातला, २०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले व एक अतिरेकी जिवंत सापडला.
पण या मोठ्या निर्यातीनंतर पुन्हा पाकिस्तानची स्वदेशी बाजारपेठ तेजीत आहे. गेल्या दहा दिवसात दहापेक्षा जास्त ठिकाणी स्फोट झाले आहेत, तेही बर्याचदा पोलिसांवर किंवा लष्करी ठाण्यांवर! वजीरिस्तान, पेशावर, लाहोर अशा वेगवेगळ्या शहरांत!!
सध्या जोम धरून चालू असलेली तालीबानविरुद्धची वजीरिस्तानमधील मोहीम किती दिवस चालेल कुणास ठाऊक? कारण हे असे जोरदार बाँब हल्ले वेगवेगळ्या शहरात घडवून आणून तालीबान जणू पाकिस्तानला जणू एक तर्हेचे आव्हानच देतंय! त्याचा उपयोगही होतोय असं वाटतंय. एकदम "तूभी ठंडा हो जा, हमभी ठंडे होते हैं" असे म्हणून पुन्हा कुठेतरी शारिया लागू होईल. पुन्हा अमेरिकेची मदत आटतेय असं वाटल्यावर लुटपुटीची ही लढाई पुन्हा सुरू होईल.
कधीही या मोहिमेचे रंग बदलून व कसली तरी तत्वशून्य तडजोड करून पाकिस्तानी लष्कर पुन्हा अतिरेक्यांचेच हात बळकट करते हे बर्याचदा आपण पाहिले आहेच.
अवैध मार्गाने पैसे कमावण्यात मग्न झालेल्या व आराम व चैन करायला सोकावलेल्या लष्करी अधिकार्यांना कष्ट करायचे नाहींतच! शिपुरडे लढताहेत, मरताहेत व हे लष्करी अधिकारी पैसे खा-खाऊन मजा करताहेत व लठ्ठ होताहेत असे विचित्र आणि अन्याय्य चित्रच सध्या दिसतंय्. पण असे किती दिवस चालणार?
एवढे मात्र खरे की या ना त्या कारणाने पाकिस्तानच्या स्वदेशी मार्केटमध्ये एक्स्पोर्ट सरप्लसला खूप मागणी आहे व तिथे हा माल हातोहात खपतोय्! गेल्या दहा दिवसात १०-१५ स्फोट झाले व कालच्या पेशावरच्या स्फोटात तर १०० हून अधीक नागरीक बळी पडले!
अशी आहे एक्स्पोर्ट सरप्लसची सुरस व चमत्कारिक कहाणी.
प्रतिक्रिया
29 Oct 2009 - 4:02 pm | मदनबाण
असा एक्स्पोर्ट सरप्लस करण्यासाठी या लोकांना १२ महिने लागणारे जिहादाचे खत (की विष) पुरवले जाते आणि ते संपुर्ण अंगात भिनवले देखील जाते.
सध्याचा नवा टोळी प्रमुख हकीमुल्ल्ह मसूद हा आता अनेक कारवाय पार पाडेल असेच दिसते.
http://topics.nytimes.com/topics/reference/timestopics/people/m/hakimull...
हे राक्षस मेले असे पाकिस्तानी सरकार जाहीर करते व काही दिवसात हे आपले नवे व्हिडीयो प्रसारित करुन मोकळे होतात...
http://www.youtube.com/watch?v=pJ24kzws5A4
(१२ ही महिने यांचा धर्म खतर्यामधे कसा असतो ? जिहाद चा खरा अर्थ या लोकांना तरी माहित आहे का ? ) :?
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
29 Oct 2009 - 4:02 pm | प्रमोद देव
की ’विस्तववादी?’ ;)
मस्त लिहिलंय.
========
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
29 Oct 2009 - 4:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भारतातून ब्रेन ड्रेन होण्याचं हेच कारण का?
अदिती
29 Oct 2009 - 4:51 pm | सुधीर काळे
व्यनि पहा
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 8:47 pm | निमीत्त मात्र
आम्हालाही दाखवा की.
29 Oct 2009 - 10:16 pm | सुधीर काळे
आपले खरे नाव कळल्यावर ठरवेन दाखवायचा कीं नाहीं. नुसत्या "निमित्त मात्र"ला दाखविण्यासारखा नाहीं! नाहीं तर 'open forum' वर नसता का लिहिला?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 10:21 pm | टारझन
दुसर्यांचं बघायची एवढी हौस पहिल्यांदाच पाहिली !! अभिंदन !
काका दाखवा हो ह्याला बी :)
काय एकेकाची आवड ... असो
29 Oct 2009 - 10:27 pm | सुधीर काळे
हाहाहा! हा मुद्दा लक्षात नव्हता आला!
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 7:27 pm | Dhananjay Borgaonkar
दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत. (हा कोणाला टोला असेल तर माहित नाही)
काळे साहेब लेख अतिशय सुंदर लिहिला आहे.
भारताने कारगीलच्या लढाईच्या वेळी पी.ओ.के घ्यायचा चान्स सोडला.
त्यामागे काय राजकीय हेतु होता ते त्यांनाच ठाऊक.
29 Oct 2009 - 10:18 pm | सुधीर काळे
धनंजय-जी,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. (लेख अतिशय सुंदर लिहिला आहे.)
सहमत (दहशदवाद हे ब्रेन ड्रेन मागच प्रमुख कारण असु शकेल अस मला तरी नाही वाटत.)
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 9:17 pm | सायबा
काळेसाहेब,
लेख लै आवडला बघा! लिहा अजून आसंच!!
सायबा
29 Oct 2009 - 10:25 pm | सुधीर काळे
सायबा-जी,
धन्यवाद!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 9:58 pm | अनामिका
सुधीरजी !
इतक वास्तववादी लिखाण की भारत- पाकिस्तान मैत्रिचे गोडवे गाणार्यांना वाचुन झिट यायची.......बिचारे आखाती देशातुन काम करणारे पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात याला कारण जिहादी .बाहेरुन आलेल्या व्यक्तीकडे मजबुत पैसा आहे असे एखाद्या अतिरेकीसंघटनेच्या निदर्शनास आले कि आलीच कंबख्ती........(कारण सर्वसामान्य माणुस कोण आणि अतिरेकी कोण हेच कळायला मार्ग नाही)
स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्हास करतोय पण झाली चुक सुधारे पर्यंत पाकिस्तान जगाच्या नकाशावरुन गायब झालेल नसल म्हणजे मिळवल......?
खुद्द मुशर्रफ़ यांच्या गाडीखाली बाँब उडवून त्यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला.
हे असेच काश्मिरी नेत्यांच्याबाबतीत झालेले प्रयत्न नेहमीच कसे फसतात? हे निदान मला न उलगडलेल कोड आहे.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
29 Oct 2009 - 10:24 pm | सुधीर काळे
<<स्वतःच जोपासलेला भस्मासुर त्यांचाच र्हास करतोय>> मी अगदी हाच शब्द या संदर्भात इतरत्र वापरला आहे!
आता या 'भस्मासुरा'ला नष्ट करायला नवी 'मोहिनी' कुठून आणायची हाच एक मोठा प्रश्न आहे.
<<पाकिस्तानी नागरिक सुट्टिवर देशात जायला देखिल घाबरतात>> माझ्या ओळखीचे इथले पाकिस्तानीही कांहींसे असेच सांगातात, पण थेट outright बोलायला हिम्मत त्याना इथेही होत नाहीं.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
29 Oct 2009 - 10:47 pm | अनामिका
कलियुगात भस्मासुराचा नाश करायला मोहिनीची गरज नाही .मोहिनी हे फक्त माध्यमच होत, पण पाकिस्तानने नकळतच स्वहस्ते इतक्या मोहिन्यांची निर्मिती स्वदेशातच केली आहे की आपल्याला नविन मोहिनी कुठुन आणायची याची चिंताच करायचे कारण नाही...
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
30 Oct 2009 - 11:28 am | सुधीर काळे
पहिलं यश त्यांना झियाच्या बाबतीत मिळाले होते! त्या पाठोपाठ बेनझीरबाईंच्या बाबतीत!
आजच तुझ्या सिग्नेचरकडे लक्ष गेलं! Wow! मस्त आहे अर्थ!
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
30 Oct 2009 - 6:46 am | सहज
एक्स्पोर्ट सरप्लस मुद्दा रोचक आहे.
पाकीस्तान लष्कर त्यांनीच निर्माण केलेल्या तालीबानला काबूत ठेवू शकत नाही (की मुद्दाम तसा समज करुन द्यायचा आहे) काही कळत नाही.
30 Oct 2009 - 8:57 am | आनंद घारे
एक्स्पोर्ट सरप्लस माल बहुतेक वेळी चांगला असायचा. ज्या काळात आयात कठीण होती त्या काळात तो दुधाची तहान ताकावर भागवत असे. बहुतेक जागी स्फोट घडवणारे अतिरेकी हाती लागत नाहीत यावरून त्यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता दिसून येते. मला त्यांचे कौतुक करायचे नाही, पण ही वस्तुस्थिती दाखवायची आहे.
ही निर्यात फक्त पाकिस्तानातूनच आणि फक्त भारतातच होते असे दिसत नाही. त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत असल्यामुळे ती आपल्याला ठळकपणे जाणवते. कमीअधिक प्रमाणात ही जगभरातली समस्या आहे. अतिरेकी वापरत असलेली संहारक शस्त्रे कुठे कुठे तयार होतात आणि ती कशा प्रकाराने इकडे तिकडे पाठवली जातात हे दाखवणारे अनेक इंग्रजी चित्रपट अमेरिकेत निघाले आहेत. त्यातला १ टक्का भाग जरी खरा असला तरी ते भयानक आहे.
पुराणकाळापासून भस्मासुर, महिषासुर, हिरण्यकश्यप वगैरे असामान्य शक्तीशाली खलनायकांचा अखेर नाशच झाला (त्यांच्याकडे असलेली अस्त्रे आधिक गुणवत्तेची असूनसुद्धा) आणि वाईटपणाचे इतके फायदे असतांनासुद्धा माणसातला चांगुलपणा टिकून राहिला यावरूनच मला भविष्यकाळातही असेच होईल अशी आशा वाटते
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
30 Oct 2009 - 9:12 am | सुधीर काळे
आनंद,
तुझा मुद्दा १०० टक्के बरोबर आहे. मी जेंव्हा 'एक्झोडस (exodus)' हे पुस्तक दुसर्यांदा वाचले तेंव्हां मला धक्काच बसला कारण त्यात ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनमधून ब्रिटिशांना लवकर हकलून द्यायला अस्सेच स्फोट कसे घडवून आणले होते याचे वर्णन अतीशय अभिमानाने 'लियॉन यूरिस (Leon Uris)' या लेखकाने दिले आहे. (पहिल्या वेळी एक्झोडस वाचले तेंव्हा हा मुद्दा इतका जोरदारपणे register झाला नव्हता!
या अतिरेकी प्रकारांचा असा दुरुपयोग करण्याचे pioneers ज्यू तर नाहींत? आणि आज तोच भस्मासुर त्यांना छळतो आहे.
पेरावे तसे उगवते हे तर खरेच. पण न पेरता आपल्यावर ही 'फसल' का लादली जात आहे हे मात्र 'न कळे'!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
16 Nov 2009 - 8:08 am | आनंद घारे
'पेरावे तसे उगवते' या म्हणीचा अर्थ 'त्याहून चांगले किंवा वेगळे फळ मि़ळत नाही' एवढ्यापुरता मर्यादित आहे. पेरलेल्या पिकामध्ये न पेरलेले तण माजतच असतात. अगदी त्यांची पाळेमुळे खणून काढून ती जाळून टाकली तरीसुद्धा ते 'एक्स्पोर्टसरप्लस' होऊन कुठून तरी येतात आणि पिकाला दिलेले खतपाणी फस्त करून फोफावतात हा शेतकर्यांचा अनुभव असतो. त्यामुळे वेळोवेळी ते उपटून टाकणे, वीडीसाइडची फवारणी करणे हे काम करत रहावे लागतेच. त्याला इलाज नाही. 'फ्रीडम मीन्स इटर्नल व्हिजिलन्स' असे कोणीतरी सांगितले आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
16 Nov 2009 - 8:19 am | सुधीर काळे
प्रिय आनंद,
सुरेख प्रतिक्रिया. एकदम बरोबर व पूर्णपणे सहमत!
मी तुझ्या ब्लॉगवर जाऊन त्यातला स्वातंत्र्यदेवता व वॉशिंग्टन डीसी हे लेख वाचले आहेत. माझा मुलगा वॉशिंग्टन डीसीच्या थोडासा बाहेर (व्हर्जिनिया) येथे रहातो त्यामुळे हे शहर बर्यापैकी 'पाठ' झाले आहे.
सवडीने त्याबद्दल लिहीन.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
30 Oct 2009 - 9:13 am | प्रकाश घाटपांडे
स्वातंत्र्यपुर्व काळातील इंग्रज सरकारच्या लेखी असलेले अतिरेकी यांना आपण देशभक्त वा स्वातंत्र्यसैनिक म्हणतो. जिंदा सुखाला देखील हुतात्मा म्हणणारे पंजाब मधे आहेत
लेख उत्तम. क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
30 Oct 2009 - 10:28 am | सुधीर काळे
किती बरोब्बर! पूर्णपणे सहमत.
<<क्रौर्य, हिंसा याला ही धर्म नसतो आणि माणुसकीला ही धर्म नसतो>>
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
30 Oct 2009 - 10:38 am | Nile
आढावा आवडला! काहे गोष्टी खर्या तर काही घडवलेल्या असाव्यात असे वाटते. पाकीस्तान संपणे म्हणजे नक्की काय ह्याचा विचार व्हायला हवा. पाक किंवा अफगाण पुन्हा सामान्य जिवन जगु शकले नाहीत तर ते भाडोत्री अतिरेकी कारखानेच बनतील अशी शक्यता आहे. भारताची ही समस्या लवकर सुटेल असे दुर्दैवाने वाटत तरी नाही.
30 Oct 2009 - 11:21 am | विसोबा खेचर
छान, इंटरेस्टींग लेख..
तात्या.
15 Nov 2009 - 11:02 am | सुधीर काळे
तात्यासाहेब,
तीन-चार दिवसापूर्वी दै. सकाळच्या वेब एडीशनवरील "पैलतीर" या सदरात हा लेख प्रकाशित झाला आहे व अजूनही आहे.
http://tinyurl.com/ylyc6v4
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
16 Nov 2009 - 8:14 am | आनंद घारे
दैनिक सकाळमध्ये तुझा लेख प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन. लेखाची गुणवता उत्तम आहेच,त्यात तिळमात्र शंका नाही, पण परदेशात राहून हे भारतातल्या दैनिकात प्रकाशन वगैरे करायला तुला कसे जमते?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
15 Nov 2009 - 1:24 pm | पारंबीचा भापू
पहिल्यावेळी हा लेख मिपावर आला त्यावेळी वाचायचा राहिला असावा. आजच वाचला. खूप आवडला.
आता इंटरनेटवर जाऊन सकाळवरचाही बघेन.
लिहा असेच माहितीपूर्ण पुढेही.
भापू
15 Nov 2009 - 5:12 pm | ऋषिकेश
मीही आजच लेख वाचला.. आवडला.
आता हे भस्मासूर आहेत का स्वतःच्याच रक्ताच्या एका थेंबातून १०० पटीत जन्म घेणारे राक्षस आहेत हे काळच ठरवेल.
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
15 Nov 2009 - 9:17 pm | सुधीर काळे
ऋषिकेश-जी,
तुमचा हा नवा दृष्टिकोन (एका थेंबातून १०० पटीने जन्म घेणारे राक्षस) भावला. छान!
कुटुंबनियोजनाबद्दल पाकिस्तानातले कायदे किंवा तिथले रिवाज काय आहेत ते मला माहीत नाहीं, पण कुटुंबनियोजन फारसे लोकप्रिय नसावे.
तरीही ज्या वेगाने तिथे माणसं मरत आहेत ते पहाता १०० कांहीं निर्माण होत असतील असे वाटत नाहीं.
हे लिहिताना मला पेशावरला जन्मलेल्या, थायलंडला काम करणार्या व क्वाला लुंपूर (मलेशिया) येथे भेटलेल्या एका पाकिस्तानी तरुणाचा मनोरंजक किस्सा आठवला. तो खूप सांगण्यासारखा आहे. म्हणजे हा माणूस किती जुन्या काळात वावरत होता ते ऐकून मी धन्य झालो. Hopefully, he does not represent the majority of Pakistanis. सांगेन एक दोन दिवसात.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
15 Nov 2009 - 10:48 pm | ऋषिकेश
जरा विस्कटून सांगतो
१तून १०० जन्माला येण्यामागे वाढती लोकसंख्या हा विचार नव्हता. तर अतिरेकी व त्यांचे निर्माते एकमेकांना मारताना निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे अनेकांचे जीवन विस्कळीत होते. त्यापैकी अनेक रिकामी डोकी/रिकामे हात नाईलाजाने/उद्वेगाने शस्त्र उचलून नवे अतिरेकी बनतात. तेव्हा त्याच्या भांडणात ते एकमेकांना मारून त्यांचा भस्मासूर होईल का त्यामुळे अधिक अतिरेकी तयार होतील(१ तून १००) हे काळ ठरवेल असे म्हणायचे होते
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
16 Nov 2009 - 8:33 am | सुधीर काळे
ऋषिकेश-जी,
मी तो शेरा lighter vein मध्ये केला होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक अतिरेकी मारला कीं त्याची जागा कुणी ना कुणी घेतोच आहे. जे लोक या अतिरेक्यांना उद्युक्त करतात त्यांच्या असे टोकाचे व एकांगी विचार अतिरेक्यांच्या मेंदूत भिनविण्याच्या हातोटीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
अर्थातच एकादी गोष्ट बिघडवणे सोपे असते, पण बिघडलेल्या माणसाला सुधारवणे खूप अवघड असते.
पाकिस्तानात नुकतीच स्थापित झालेली लोकशाही जर यशस्वी झाली तर अशा सरकारांना किती अवघड काम करावे लागणार आहे याचा विचार केल्यास छाती दडपून जाते.
प्रतिसादाबद्दल पुनश्च धन्यवाद.
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!