माझ्यासारखेच अनेकांना सूर्यास्ताचे आकर्षण असल्याचे वाचून बरे वाटले.
खरे तर ही नेमाने दिवसागणीक घडत राहणारी घटना. पण तरीही सूर्यास्त कधीही कुठेही दिसला तरी नजर खिळवून ठेवतो. एखाद्या ठिकाणाहून निघता निघता पाय सूर्यास्तासाठी रेंगाळतो. कुठल्याही थंड हवेच्या ठिकाणी गेले तर एक सनसेट पॉईंट तिथे हमखास असतोच. तिथे जमणारी गर्दी, कलकल आणि टाकणे टाकायला वा ’आम्ही पाहीला हो सनसेट’ या सदरात मोडायला आलेल्या बहुसंख्य प्रजेची सूर्य बुडतो कधी आणि आपण आपले वाहन गाठतो कधी अशी घिसाडघाई यामुळे मी सहसा असे ’टोकाचे सूर्यास्त’ हमखास टाळतो.
अनेकदा ठरवून, आखून वा बेतून एखादी गोष्ट करण्यापेक्षा ती अनपेक्षित पणे घडुन येते तेव्हा अधिक मजा येते. सूर्यास्ताचे तसेच आहे.
अशाच एका प्रसंगी टिपलेला हा सूर्यास्त. मी फोशान हून बाईयून विमानतळाकडे निघालो होतो, जरा उशीरच झाला होता. मात्र तो लालबूंद सूर्य मला सोडवत नव्हता. वातावरण धूसर होते, शेवटपर्यंतचा सूर्यास्त काही बघता येणार नव्हता. शिवाय लवकरच विमानतळाचा परिसरही सुरू होणार होता. एकदा इमारती आल्या की आहे तेही दिसणार नव्हते. मगा चक्रधराला महामार्गाची वाहतूक सांभाळून गाडी क्षणभारासाठी बाजूला घ्यायला सांगितली आणि हे दृश्य टिपून मी निघालो. त्या ढगाळ आकाशात व धूसर वातावरणात तो लोखंडाचा रस ओतल्यागत सोनेरी लालबुंद सूर्यनारायण मला विलक्षण तेजस्वी दिसला.
सूर्यास्त प्रत्येक क्षणी, प्रत्येक कोनातून, प्रत्येक टप्प्यावर नवे रूप धारण करत असतो. पैचिंगचा ग्रीष्म प्रासाद पाहून परत निघालो. दिवस मावळायची वेळ झाली होती. सूर्य बर्यापैकी वर होता, पण हवेतल्या धूसरतेमुळे सौम्य भासत होता. अगदी सुरेख गोल अशी ज्योतच जणु मंदपणे आकाशात तेवत होती. अर्थात सहल सखीला याचे फारसे सोयर-सुतक नव्हते; बरोबरच आहे, तो तिचा रोजचाच उद्योग होता. मी मात्र तिच्या घाईला न जुमानती तिथेच रेंगाळलो. बाहेर पडायच्या वाटेवर उंच झाडे होती, काही इमारती होत्या आणि त्या सर्वातुन दिसणारा, लपाछपी खेळणारा सूर्यनारायण मला टिपायचा होता. एका वास्तूशी मी थबकलो. त्या वास्तूसमोरचे दोन बाजूचे दोन अगदी पार निष्पर्ण झालेले वृक्ष, त्या इमारच्या गच्चीची तटबंदी आणि वर दिसणारा सूर्य अप्रतिम दिसत होता.
तिथेच थोडे पुढे गेल्यावर त्यातल्याच एका वृक्षाच्या खाली झुकलेल्या फांदीच्या काटक्यांमधून दिसणारा सूर्य मी मुद्दामच किरण काट्क्यांवर साधत थोडा अस्पष्ट करून टिपला आणि त्या काटक्या जणु आपले सुटलेले तेजस्वी फूल पकडायला सरसावलेल्या दिसल्या
तिथून निघालो आणि पुढे एक महाकाय, अजस्त्र असा सहस्त्रबाहू वृक्ष आणि त्याच्यामागून प्रकाशणारा सूर्य यातून निर्माण झालेले हे काष्ठशिल्प दिसले.
आता मात्र निघायला हवे होते. अंधारु लागले होते, अधिकच लालबुंद झालेला सूर्य खाली येत होता. लवकरच तो दाट झाडीत गायब होणार होता. त्याचा निरोप घेण्यापूर्वी मी त्याला हिरव्या जाळीत शिरता शिरता टिपला आणि बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
18 Feb 2008 - 8:51 pm | स्वाती दिनेश
खल्लास चित्रे आहेत,मस्तच ! आणि त्यावरची टिप्पणीही तितकीच सुंदर!
स्वाती
18 Feb 2008 - 8:52 pm | ऋषिकेश
आजि म्या ब्रह्म पाहिले अशी अवस्था करून टाकलीत हो!
एकापेक्षा एक अप्रतिम चित्रे!! खूपच सुंदर!!
(मंत्रमुग्ध) ऋषिकेश
18 Feb 2008 - 10:23 pm | धनंजय
क्षितिजावरील पूर्ण चंद्राची चित्रे लावा. तुमच्या हातून ती सुंदर येतील.
सर्वच चित्रे छान, पण क्रमांक ३, ४, ५ अधिक आवडली.
क्र ३ कमीतकमी गाजावाजा करता खूप सांगते (जपानी रेखाचित्रांसारखे).
(४, ५ गुंतागुंत चित्रित करतात. )
क्र ४ मधे मला सूर्य व्यूहात अडकलेल्या वीरासारखा वाटतो.
क्र ५ मध्ये लेसच्या ओढणीमागे सरणारी स्त्री आठवते.
तुमच्या मनात काही का असेना - माझ्या कल्पनाशक्तीला वाव देणारी चित्रे आहेत.
थोड्या जिज्ञासू चांभारचौकशा :
ही चित्रे काढताना तुम्ही कॅमेराच्या पडद्याचा वेग (शटर स्पीड) किती ठेवता, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या केंद्रीभवनाने आतील इलेक्ट्रॉनिक्स जळून न जावेत? (काळी काच [न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर] न लावता सूर्याचा फोटो श्क्यतोवर काढू नये, असे मी पूर्वी ऐकले होते.) किती मे.पि.चा कॅमेरा आहे, आणि साधारण किती क्रॉप केले?
19 Feb 2008 - 12:23 am | विसोबा खेचर
साक्षीदेवा,
तुझ्या सूर्यास्ताने वेड लावलं रे!
मला तिसरं आणि पाचवं चित्र भन्नाट आवडलं. फोटोग्राफी या कलेसंदर्भात मनात तुझ्याबद्दल कौतुक तर होतंच पण आता ती जागा आदराने घेतली आहे!
साक्षिदेवा, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला मारवा हा राग संध्याकाळी गातात. वरील प्रत्येक चित्रं हे त्या हुरहूर लावणार्या मारव्याची आठवण करून देतं! विशेष करून तिसरं चित्रं! हे चित्रं पाहताना तर आमिरखासाहेबांचा मारवा कुठूनतरी नकळत एकू येऊ लागतो...!
आपला,
(सूर्यास्त पाहून उगाचंच उदास होणारा!) तात्या.
एक फर्माईश - जमल्यास कधी समुद्रकिनारच्या सूर्यास्ताची चित्रेही इथे दे. अथांग सागरापलिकडे क्षितिजापार अस्ताला जाणारा तो सूर्य माणसाला खूप काही शिकवून जातो!
तात्या.
19 Feb 2008 - 12:36 am | प्राजु
इतकी सुंदर छायाचित्रे आपण टिपलित... आभारि आहे मी अपली.
खूपच सुंदर..
- प्राजु
19 Feb 2008 - 4:13 am | सुवर्णमयी
तीन आणि पाच खूप आवडली.
सोनाली
19 Feb 2008 - 5:18 am | धनंजय
असे लक्षात आले, की ज्यांनी-ज्यांनी विशेष करून फोटोंचा उल्लेख केला आहे, त्यांत क्र१ आणि क्र२ कुठेच दिसत नाहीत. क्र१ त्याच्या जनकाला संदर्भामुळे प्रिय आहे, पण त्याविषयी बहुतेक आस्वादविषयक चर्चा होऊ शकणार नाही. (कोणी मला त्यातलीही सौंदर्यस्थाने दाखवलीत, तर तेही छानच होईल.)
क्र२ बद्दल मात्र विचार करायला गेले तर रसग्रहणाच्या दृष्टीने त्यात खूप काही "जागा" आहेत. खालचा तृतीयांश घेणारी सुंदर महिरपी भिंत, डावा तृतीयांश विभागणारे गमतीदार झाड, गच्चीच्या आणि दोन फांद्यांच्या त्रिकोणी कोंदणात मण्यासारखा सूर्य...
मग (माझ्यासकट) कोणी त्याचा विशेष उल्लेख का केला नाही? याबद्दल कुतूहल वाटते. गच्चीच्या महिरपीलाही फोकसमध्ये घेतले असते, (छिद्र आणखी थोडे लहान करून) काही फरक पडला असता का? हे चित्र वेगळे कातरायला (क्रॉप करायला) हवे काय?
येथील चित्रसेनांनी म्हणा, नेत्रसेनांनी म्हणा जरा विचार मांडावेत.
19 Feb 2008 - 8:41 am | कोलबेर
नं. दोन चित्रामध्ये भिंगाचे छीद्र थोडे छोटे केले असते तर गच्चीची कड आणि सूर्य दोन्हीही फोकस मध्ये आले असते. तसेच त्याच चित्रातील गच्चीची बाजू कापून टाकली असती तरी चालली असती. अर्थातच हे माझे वैयक्तिक मत. शेवटी ज्याला जसे योग्य वाटते तसे त्याने चित्र काढावे.
साक्षीजींची माफी काढून मी ह्या चित्रात थोडेसे फेरबदल केले आहेत ते इथे चिकटवतो.

बदल पटलेच पाहिजेत असे नाही!
बाकीची चित्रे छानच!
19 Feb 2008 - 9:45 am | सर्वसाक्षी
मनःपूर्वक केलेले रसग्रहण, दिलेले अभिप्राय व सुचविलेल्या अनेक सुधारणांबद्दल रसिकांचे आभार.
थोडेसे दुसर्या चित्राविषयी. जर तटबंदी आणि सूर्य हे दोन्ही एकाच वेळी किरणात घेतेले असते व आकृति स्पष्ट ठेवल्या असत्या तर त्याबरोबर तो निष्पर्ण वृक्ष देखिल त्या तटबंदीत विलिन झाला असता व एकप्रतलीय व सपाट अशी प्रतिमा उमटली असती. त्रिमित परिणाम साधून वृक्ष, थोडी दूर असलेली भींत व खूप दूरवर क्षितिजावर असलेला सूर्य या तिन्ही प्रतिमा प्रकाश व सुस्पष्टता याद्वारे आपले स्वतंत्र अस्तित्व राखून असाव्यात व तरीही एकाच दृश्यात सामावल्या जाव्यात असा या रचनेचा उद्देश होता (कितपत जमला माहित नाही:))
सर्व जाणकारांच्या सूचनांबद्दल पुन्हा एकदा आभार. माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे.
आपला स्नेहांकित
साक्षी
19 Feb 2008 - 10:43 am | धमाल मुलगा
अप्रतीम...केवळ अप्रतीम !!!
हे जास्त छान अन् ते कमी अस॑ मला काही वाटल॑च नाही. साक्षीदेवा...खर॑च काय जबरा आहे तुमचा तिसरा डोळा...
माझा या कलेचा फारसा अभ्यास नाही, मी केवळ हौशी या सदरात मोडणारा प्रकाशचित्रकार आहे.
अस॑ का? बर॑ ! मिपाकर हो, जर हा मनुष्य स्वतःला "हौशी" सदरात मोडतोय, तर "एक्सपर्ट" काय असेल हो???
20 Feb 2008 - 1:48 am | कोलबेर
मिसिसिप्पी नदीवर एका निरभ्र संध्याकाळी टिपलेला सुर्यास्त..
20 Feb 2008 - 6:36 am | विसोबा खेचर
अप्रतिम..!
20 Feb 2008 - 9:06 pm | धनंजय
फारच सुंदर!
20 Feb 2008 - 9:15 pm | ऋषिकेश
वाह!.. मस्त!
20 Feb 2008 - 9:20 pm | चतुरंग
सूर्य एका कोपर्यात असल्यामुळे तिथे नजर खिळते आणि हलकेच पुलावरून सरकत येऊन काठावरच्या झाडावर स्थिरावते.
मिसिसिपीच्या पुलामुळे आणि कमानींमुळे त्रिमितीचा सुरेख भास होतोय.
आकाश-नदी जोडीत अडकलेल्या क्षितिजावरची रंगांची उधळण आणि अस्ताला जाणारा सूर्य जणू सर्व शक्तीनिशी किरण उधळीत निघाला आहे असे जाणवते!
चतुरंग
20 Feb 2008 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर.
श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!
21 Feb 2008 - 6:21 am | एकलव्य
श्री. सर्वसाक्षी ह्याचे सर्व सुर्यास्त भन्नाट आहेत. मान गये हुजूर.
श्री. कोलबेर मिसिसिपी सुर्यास्त सिंप्ली ग्रेट...!
21 Feb 2008 - 6:51 am | ऋषिकेश
उत्तमोत्तम छायाचित्रकारांनो,
आजच्या ग्रहणकाळातील चंद्राचे छायाचित्र कोणी काढल्ंय का?.. असल्यास इथे डकवावे ही विनंती :)
-ऋषिकेश
21 Feb 2008 - 7:00 am | वरदा
खूपच छान आहेत सगळेच फोटो...आणि वर्णनही झकास...
21 Feb 2008 - 8:58 am | भडकमकर मास्तर
अहाहा...
मजा आली....
सर्व छायाचित्रे आणि त्यावरील अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया वाचूनही...
21 Feb 2008 - 2:22 pm | झकासराव
फोटो आणि वर्णन देखिल छान :)
7 Mar 2008 - 11:55 am | कोलबेर
संध्याकाळची मिसिसिप्पी नदी
7 Mar 2008 - 4:56 pm | विसोबा खेचर
दोन्हीही चित्रे क्लासच! केवळ अप्रतिम...
वरूणदेवा, कमाल आहे तुझी!
तात्या.
7 Mar 2008 - 9:44 am | पिवळा डांबिस
ढळला रे ढळला दिन सखया,
संध्याछाया भिवविती हॄदया,
अता मधूचे नांव कासया,
लागले नेत्र हे पैलतीरी||
21 Mar 2008 - 3:49 pm | जितेंद्र शिंदे
एकदम क्लास
दिल खूश हुआ
21 Mar 2008 - 4:59 pm | आजानुकर्ण
सर्वसाक्षीशेठ आणि कोलबेरशेठ काय अप्रतिम चित्रे काढता हो.
जरा इथल्या लोकांना युक्तीच्या चार गोष्टी सांगा की.
(आनंदित) आजानुकर्ण
21 Mar 2008 - 8:04 pm | सुधीर कांदळकर
झकास.
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.