लढा

प्रसन्न केसकर's picture
प्रसन्न केसकर in जनातलं, मनातलं
31 Aug 2009 - 7:53 pm

सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय?

या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले. त्यातले कुणीच प्रसिद्ध वगैरे नाही, पण प्रत्येकाचीच एक सक्सेस स्टोरी आहे. अन ती फारशी चमकदार नसली, त्यांना मिळालेले यश दैदिप्यमान वगैरे नसले तरी त्या प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, कौटुम्बिक मर्यादा लक्षात घेता ते मोठेच आहे असेही लक्षात आले.

भटके/ विमुक्त म्हणले की माझ्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ते रखमाबाईचे कुटुंब. रखमाबाई स्वतः फासेपारधी समाजाची. तिचे कुटुंब म्हणजे तिचा नवरा (त्याचे नाव काहि केल्या आठवत नाही.), मुलगी पारुबाई, पारुबाईची मुलगी मंजुळा अन तिचे भाऊ आकाराम (सगळे त्याला आक्या म्हणायचे) अन राकेश (सर्वमान्य नाव राक्या).

ऐंशीच्या दशकात माझ्या वडिलांनी पुण्याच्या उपनगरात जागा विकत घेऊन बंगला बांधला अन आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा आमच्या घराजवळच रखमाबाईचं पाल होतं. टारपोलिनचा एक तंबु अन त्यात कुत्री, मांजरी, एक गाय, तिचे पाडस अन सगळी माणसे रहात. कुण्या जुन्या जमीनदाराने त्यांना ती जागा देवु केली होती.

रखमाबाई अन तिचा नवरा दोघेही म्हातारे, अगदी सुरकुतलेले. पण दोघेही रात्री परिसरात गस्त घालायचे अन मिळतील तेव्हढे पैसे लोकांकडुन घ्यायचे. सगळे मिळुन महिन्याला दोन्-पाचशे रुपये कमवायचे ते दोघे. पारुबाईनं नवर्‍याला टाकलेलं. ती दारु विकायची. तिच्या पालावर रोज दारुड्यांची वर्दळ अन पोलिसांची ये-जा. त्यामुळं त्या मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या भागातले कुणी फारसे त्या घराशी संबंध ठेवायचे नाहीत. मंजुळेनं पंच्याण्णवच्या सुमाराला लग्न केलं पण नवर्‍याला थोड्या दिवसातच टाकलं अन आईकडे परत आलि. आक्क्या अन राक्या शाळेत होते.

असं हे कुटुंब कायम समाजात असुनपण समाजाबाहेरच. कुठं चोरी झाली की लोक कुजबुजत त्यांच्याकडे बोट दाखवायचे. पण सरळ बोलुन भांडणे अंगावर घ्यायची कुणाचीच हिंमत नव्हती. सातवी पास झाल्यावर आक्क्या अन राक्या दोघांनीही शाळा सोडली. रोज पारुच्या धंद्यावर राबता असलेल्या एका जमिनदारानं आक्क्याला त्याच्याकडे मजुर म्हणुन ठेवलं अन स्वतःचे शौकापाई खर्च होणारे पैसे वाचवले. एक दोन वर्षातच त्याच लग्न पण झालं. त्याआधी काही महिने आक्क्या गायब होता. घरचे म्हणत मामाकडे गेलाय पण चर्चा होती चोर्‍या करतोय म्हणुन.

पण राक्या मात्र महत्वाकांक्षी. "भाऊ आपण तुम्हा लोकांसारखी कामं करणार. आपण इज्जतीनं जगणार," तो म्हणे. अन नेमके त्याच वेळी त्या भागात पेपर टाकुन शिकणार्‍या एका मुलाला नोकरी लागली. राक्यानं त्याच्या लाईनवर पेपर टाकणं सुरु केलं. `हा पारधी काय सकाळी उठुन पेपर टाकणार. जाईल पळुन दोन चार दिवसात," ही इतर पेपरविक्यांची प्रतिक्रिया. पण राक्या टिकला. एव्हढेच नव्हे वाढला. लवकरच त्याच्याकडे दीड दोनशे गिर्‍हाईके झाली. शिवाय त्यानं चौकात पेपर स्टॉल पण टाकला.

सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पेपर टाकुन व्हायचे. राकेशन त्यानंतरच्या मोकळ्या वेळात वेगळा धंदा करण्याचं मनावर घेतलं. त्यानं धंदा निवडला फुल-हार विक्रीचा. संध्याकाळी जाऊन तो घाऊक बाजारातुन फुलं आणायचा. दिवसभर त्याच्या बहिणी हार, गजरे करायच्या अन ते सगळं पेपर बरोबरच विकले जायचे. तसेही आमच्या भागात फुलवाले नव्हते. सगळ्यांचीच सोय झाली. माणसांना पारध्यांचे वावडे असले तरी त्यांच्या घरच्या देवांना पारध्यांनी विकलेली फुलं चालायची अन बायकांना गजरे पण! मग हळुहळु पसारा वाढत गेला अन राक्या अन त्याचे कुटुंबिय फळं, भाज्या पण विकायला लागले. आक्क्या, त्याची बायको, मंजुळा पण राक्याला सामील झाले. पारुनं पण दारुचा धंदा बंद केला. काही वर्षांपुर्वी राक्यानं त्याच जागेवर पक्कं घर पण बांधलेय. आता आक्क्या, राक्याची मुलंपण शाळेत जातात अन त्यांचे आडनाव पवार असल्याने ते पारधी असल्याच कुणाच्या लक्षात येत नाही बहुधा. पण हल्ली त्या कुटुंबाबाबत कुणी कुजबुजत नाही.

***

राक्याचाच लांबचा मामा सणस. तो बहुधा राक्याची प्रेरणा असावा. सणस तसा जमातीत बर्‍यापैकी वजन राखुन अन अनेक पोलिस अधिकार्‍यांच्या जवळचा माणुस. माझ्या आणि त्याचा संबंध आला १९९३-९४ च्या सुमारास, पत्रकार झाल्यावर. अशीच कुणीतरी ओळख करुन दिली अन आम्ही मित्र झालो.

सणसचा पुर्वेतिहास मला माहिती नाही. पण मी बघतो तसा तो गुन्हेगारीत नव्हताच. किंबहुना तो जमातीच्या मागासलेपणाबद्दल तावातावाने बोलायचा. जमातीला दफनभुमी मिळावी मागणीचा पाठपुरावा पोटतिडिकीने करायचा. सणस पीएमटी डेपोत वॉचमन होता. कायम नाईट शिफ्ट असे अन दिवसभर इकडे तिकडे फिरे. पोरं फारशी शिकलेली नव्हती पण मजुरी करायची.

सणसची शोकांतिका झाली. त्याच्या मतिमंद नातीला जातीतल्याच कुणीतरी पळवलं. सणस म्हणे एव्हढे पोलिस संबंध ठेवुन होते पण कुणी मदतीला आलं नाही. फिर्याद पण घेतली नाही म्हणे. नात नंतर सापड्ली पण सणस हिरमुसलेलाच राहिला. त्यात नंतर त्याच्या मुलाचा जातीतल्याच कुणीतरी खून केला. सगळंच उफराट होत गेलं पण सणसनं गुन्हेगारीत पाऊल नाही ठेवलं.

***

भुतानसिंग (नाव बदललेले) शिकलगार समाजाचा. सणससारखाच पोलिस मित्र. त्याच्या आजुबाजुचे बरेच लोक, नातेवाईक गुन्हेगार पण भुतानसिंग मात्र सरळमार्गी राहिलेला. किरकोळ धंदे करता करता त्यानं टेंपो घेतला अन तो ट्रान्सपोर्ट व्यवसायात शिरला. मुलांना पण शिकवलं अन सगळ्यांना सरळमार्गे चालायला लावलं.

भुतानसिंगची एकदा म्हणे गुन्हेगार नातेवाईकाशी भांडणे झाली अन त्या तिरिमिरीत त्यानं त्याच्या माहितीतल्या गुन्हेगारांच्या खबरा पोलिसांना द्यायला सुरुवात केली. अनेकदा भुतानसिंग वर हल्ले झाले. त्याच्या कुटुंबियांवर पण हल्ले झाले पण त्यानं पोलिसांना मदत करणं सोडलं नाही. त्याच्या मदतीनं पोलिसांनी अनेक अट्टल गुन्हेगारांना पकडलं. काही जण अजुनही तुरुंगात शिक्षा भोगताहेत अन त्यांची मुलं भुतानसिंगकडे ड्रायव्हर आहेत. भुतानसिंग अजुनही पोलिसांना मदत करतो अन बरेच पोलिस अधिकारी सांगतात की त्याच्यामुळेच त्यांचा शिकलगार सगळे गुन्हेगार हा समज दुर झाला.

***

बच्चुसिंग पण शिकलगारच. तरुण मुलगा. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रॉव्हर्बियल टीनएजर होता. मुठा कॅनॉललगतच्या झोपडपट्टीत रहायचा. आजुबाजुला बरेच गुन्हेगार त्यातले काही नातेवाईकपण. पण बच्चुसिंग वेगळाच. कॅनॉलमधे आठवड्याला कुणीना कुणी बुडायचे. बच्चुसिंग पट्टीचा पोहोणारा. त्याच्या त्या कसबाचा वापर त्यान बुडणार्‍याना वाचवायला सुरु केला. हळुहळु पोलिसपण त्याला मदतीला बोलवायला लागले. गेल्या बारा एक वर्षात त्यानं अडीचशे तीनशे प्राण वाचवलेत. तश्या स्थानिक वृत्तपत्रात दोन तीन बातम्यापण आल्यात त्याच्यावर पण बाकी कुणाला फारसे माहिती नाही.

***

पालसिंग हा अजुन एक शिकलगार तरुण. बच्चुसिंग रहातो त्याच झोपडपट्टीत रहातो. घरचे लोक पारंपारिक तवे कढया बनवुन विकण्याच्या व्यवसायात आहेत. पण पालसिंग परत वेगळा. त्याच्या हातात जादु आहे. हुबेहुब, जिवंत वाटणारी चित्रे काढतो तो. रोज तासनतास चित्रकलेत रमतो. शेकडो चित्रे काढली आहेत त्याने. सुरुवातीला काही पेपरच्या ऑफिसात गेला चित्रे घेऊन. एका पत्रकारानं दोन्-चार ओळी लिहिल्या पण इतरानी हेटाळलेच. पण त्यानं चित्रकला नाही सोडली. त्याला बालगंधर्व मधे चित्रप्रदर्शन भरवायचेय. पैसे जमवतोय बरेच दिवस. "सब लोग समझते है सारे शिकलगार गुनाहगार होते है. लेकीन वह सच नही है. मै मेरे मिसाल से एक दिन यह साबित कर दुंगा," तो म्हणतो.

***

जे सगळे मी पाहिलेले लोक. हे लोक विमुक्त झालेले मी पाहिलेत. आज जेव्हा सगळा विचार केला तेव्हा हे सगळे माझ्या डोळ्यासमोर आले अन वाटले खरंच काळ्या ढगाची ही रुपेरी कड आहे. ही खरच जपायला पाहिजे. यातला प्रत्येकजण लढा देत आहे. असे इतरही अनेकजण असतील, मी न पाहिलेले अनाम वीर. त्यांच्यासाठी मी नाही लढा देवु शकत. तो त्यांनाच द्यायचा आहे अन ते तो देतीलही. जोवर ते आहेत, तोवर आशा जिवंत राहिल.

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 8:06 pm | श्रावण मोडक

चित्र दाखवलं.

विशाल कुलकर्णी's picture

1 Sep 2009 - 10:33 am | विशाल कुलकर्णी

सहमत !

मला आठवते मी लहान असताना आम्ही दौंडच्या पोलीस (SRPF)लायनीत राहात होतो. दौंडला तेव्हा SRPF चे दोन गृप होते, पाचवा आणि सातवा.
तेव्हा पाचव्या गृपचे कमांडंट होते श्री. सुजाणसिंग पारधी, हा माणुस पारधी जातीमधुनच आलेला होता. अतिशय गरीबीतुन वर आलेले पण अतिशय बुद्धिमान आणि सुस्वभावी. इंजिनिअरिंग केलेले होते त्यांनी. त्यांनी त्याआधी काही काळ मिलिटरी इंटेलिजन्ससाठी देखील काम केले होते म्हणे. त्यांच्या दौंडच्या तीन चार वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी गृप हेडक्वार्टरचे स्वरुपच बदलुन टाकले होते. अगदी सामान्य रनरला देखील त्यांच्या कार्यालयात कधीही मुक्त प्रवेश असायचा.
दहावीला ८८% घेतल्यावर पाचव्या गृपकडुन त्यांच्याहस्ते माझा सत्कार झाला होता. पुढे इंजीनिअरिंग करणार आहे असे कळल्यावर त्यांनी त्यांच्याकडची जवळपास तीन चार हजार रुपये किंमतीची पुस्तके मला भेट म्हणुन दिली होती.

माझे आण्णा साधे हेड काँन्स्टेबल होते तेव्हा. पण त्यानंतरही मला त्यांच्या घरी मुक्त प्रवेश होता. बारावीच्या परिक्षेचा अभ्यास तर मी त्यांच्या कमांडंट बंगल्यातल्या अभ्यासिकेत बसुनच केला होता. तुमचा हा लेख वाचला आणि पारधी साहेबांची खुप आठवण झाली. माझ्या जडणघडणीत त्यांचा खुप मोठा वाटा आहे. धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुनील's picture

31 Aug 2009 - 8:16 pm | सुनील

हळूहळू का होईना पण सुधारणा होतेय, हेच आशादायक आहे.

एक शंका आहे. सगळ्याच पूर्वाश्रमीच्या क्रिमिनल ट्राईब्ज ह्यांना भटक्या आणि विमुक्त असे नाव दिले गेले आहे काय? बहुधा नसावे. ठाणे आणि रायगड जिल्यात प्रामुख्याने वारली, ठाकर, कातकरी ह्या भटक्या-विमुक्त जमाती राहतात. परंतु त्यापैकी कोणत्याही जमातीवर "गुन्हेगारी जमात" असा शिक्का पूर्वीही नसावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

31 Aug 2009 - 8:21 pm | श्रावण मोडक

एक शंका आहे.
वारली, ठाकर, कातकरी ह्या भटक्या-विमुक्त जमाती राहतात.
नक्की? माझ्या मते त्या एसटी, शेड्यूल्ड ट्राईब्ज, अनुसूचीत जमाती आहेत. चुभूदेघे.

सुनील's picture

31 Aug 2009 - 8:26 pm | सुनील

बरोबर. माझीच थोडी गल्लत झाली होती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भोचक's picture

3 Sep 2009 - 5:16 pm | भोचक

बरोबर आहे. हे सगळे शासकीय भाषेत आदिवासी आहेत. त्यातले वारली, ठाकरं (क. ठाकूर, म. ठाकूर) , कोकणा यांच्यावर गुन्हेगार असा शिक्का नव्हता. पण त्यातले कातोडी किंवा कातकरी यांच्यावर मात्र पोलिसांचा डोळा असायचा. आजही कातकर्‍यांवर फारसा विश्वास ठेवला जात नाही.

आदिवासी मित्रांमध्येच बालपण घालवेलला (भोचक)

तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

यशोधरा's picture

31 Aug 2009 - 8:22 pm | यशोधरा

अतिशय आवडला लेख.

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2009 - 4:09 pm | स्वाती दिनेश

अतिशय आवडला लेख.
हेच म्हणते,
स्वाती

कमी लोकांना माहीत असलेली माहिती दिलीत पुनेरीभाऊ ... :)
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी.

नाहीतर आजकाल स्वतःच्या वाढदिवसा अन् अ‍ॅनिव्हर्सर्‍यांबरोबर १५ आगष्ट , २६ जानेवारी हे सुट्टीचे दिवस म्हणून लक्षात राहिले जातात. त्यात ३१ ऑगस्ट ची महती कळाल्यामुळे दिवसेंदिवस माहितीच्या साठ्यात भर पडते आहे...

या निमित्ताने घेतलेला हा आढावा मनाला हेलावून गेला
ज्या दिवशी जन्मापेक्षा माणसाची लायकी हीच त्याची जात ठरेन तो सुदिन समजेन मी....

धन्यवाद
सागर

प्रकाश घाटपांडे's picture

31 Aug 2009 - 10:08 pm | प्रकाश घाटपांडे

असे इतरही अनेकजण असतील, मी न पाहिलेले अनाम वीर. त्यांच्यासाठी मी नाही लढा देवु शकत. तो त्यांनाच द्यायचा आहे अन ते तो देतीलही. जोवर ते आहेत, तोवर आशा जिवंत राहिल.

खरयं! बस पण थकल्यावर कुणी पाठीवर थाप टाकली तर हुरुप येतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2009 - 10:23 pm | बिपिन कार्यकर्ते

... लेका छानच अनुभव रे... खूप छान वाटलं. या समाजांबद्दल सहसा जे ऐकतो त्यापेक्षा अगदी वेगळं. पारधी वगैरे म्हणलं की काही तरी दुर्दैवी ऐकायला मिळणार असं वाटतं. पण हे वेगळंच. छान.

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2009 - 11:49 pm | भडकमकर मास्तर

छान लेख...

प्रभुणेंचं पारधी पुस्तक वाचलेलं होतं...
त्यात या लोकांचे प्रश्न मांडलेले आहेत... पुस्तकाची आठवण झाली...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

महेश हतोळकर's picture

1 Sep 2009 - 9:18 am | महेश हतोळकर

खूप छान माहिती दिलीत.

सहज's picture

1 Sep 2009 - 9:48 am | सहज

समयोचित सुंदर लेख.

धन्यु पुनेरीसाहेब. आता वेळोवेळी लिहत रहा वरच्या लोकांबद्दल, आम्ही काय करु शकतो हे देखील.

मदनबाण's picture

1 Sep 2009 - 1:19 pm | मदनबाण

हेच म्हणतो...

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

ऋषिकेश's picture

1 Sep 2009 - 10:55 am | ऋषिकेश

छान समयोचित लेख. शिवाय सकारात्मक!

आजपर्यंत ह्या जमातींचा संबंध आरक्षणामुळे (बहुतांश वेळा)हेटाळणीयुकक्त कारणाने/उल्लेखांनी येत होता. सगळं काहि मिळत असताना अभ्यास करूनहि कॉलेजातील जागा जातात म्हणून एकेकाळी ओरडणार्‍या आम्हाला ही दुसरी बाजु वाचली की आपण एकाच्या आयुष्याला अजाणतेपणी सकारात्मक वळण दिलं असं वाटु लागतं.

तुमची शैली भन्नाट आहेच, त्याला वास्तविकतेची जोड मिळाल्याने लिखाण प्रचंड प्रभावी ठरले आहे.

अजून वाचायला आणि यानिमित्ताने स्वतःच्याच अनेक भुमिकांवर/मतांवर पुनर्विचार करायला आवडेल

ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ३५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक भजन "वैष्णव जन तो तेणे कहिए जे...."

विमुक्त's picture

1 Sep 2009 - 4:15 pm | विमुक्त

छान लेख...

विजुभाऊ's picture

1 Sep 2009 - 5:05 pm | विजुभाऊ

फासेपारधी वगैरे जमातीना अजूनही गुन्हेगार जमाती मानले जाते. ते ब्रिटीशांचे लॉर्ड बेम्टिंगच्या आशिर्वादाने नन्तर तयार झालेले गॅझेट अजूनही रेफर केले जाते. ते रद्द व्हावे यासाठी डॉ लक्ष्मण गायकवाड / डॉ गणेश देवी आणि बंगाली ज्ञानपीठविजेत्या महाश्वेतादेवी हे तिघे या बाबत सरकार बरीच खटपट करीत आहेत

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

नितिन थत्ते's picture

1 Sep 2009 - 9:59 pm | नितिन थत्ते

उत्तम लेख.
सकारात्मक चित्र

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

क्रान्ति's picture

2 Sep 2009 - 8:18 am | क्रान्ति

सगळ्याच उदाहरणांतील व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर आणि प्रयत्नपूर्वक मिळवलेलं यश दैदिप्यमान नसलं तरी आशादायी नक्कीच आहे.

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

लिखाळ's picture

2 Sep 2009 - 6:38 pm | लिखाळ

वा ! फार चांगला लेख.

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

दादा कोंडके's picture

2 Sep 2009 - 9:41 pm | दादा कोंडके

सोलापुरात पण, एक सेटलमेंट म्हणून एक भाग आहे. इंग्रजांच्या काळात पारधी, भामटी वगैरे जमातींच्या लोकांना राहण्यासाठी एक वस्ती करून त्याला तारेचं कुंपण लावले होते. रोज रात्री घरातल्या प्रत्येक पुरुषाची हजेरी घेतली जायची.

आता सुद्धा तो भाग आहे. आणि शहरात कुठेही दरोडा पडला की पोलिस प्रथम तिथे जातात!

प्रभो's picture

3 Sep 2009 - 12:10 am | प्रभो

दादा म्हणतात ते खरंय..
सोलापूरचा असल्याने सेटलमेंट म्हणजे काय ते पाहिलय

स्वाती२'s picture

3 Sep 2009 - 6:43 pm | स्वाती२

सक्सेस स्टोरी आवडली.