आठवणीतली कविता

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
17 Feb 2008 - 2:50 pm

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

- बालभारती इ. ३ री (१९८४)

कविताप्रकटनअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

17 Feb 2008 - 3:44 pm | सृष्टीलावण्या

ह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2008 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आठवणीतील कविता सुंदर आहे, त्यासोबत डकवलेले चित्रही तितकेच सुंदर आहे. चित्रातला  घाट पाहिला  आणि आम्हाला कसा-या घाटाची आठवण झाली.पावसळ्यात अशीच निसर्गाची मुक्त उधळण तिथे पाहवयास मिळते.
>> ह्या कवितेचे कवि कोणह्याचा जर कोणी शोध लावू शकले तर मेहेरबानी होईल. म्हणजे लेखन प्रकाशन हक्क त्यांच्याकडून मागता येतील. कृपया चिंतातुर जंतूंनी लक्ष घालावे.
कवीची माहिती नसली तरी ती आपल्या आठवणीतील कविता आहे,असा आपण उल्लेख केला आहे.  त्यामुळे ती कविता कोणाचीतरी आहे इतके आम्हाला कळले आहे. शोध घेणा-यांनी  त्याचा शोध  घेत राहावा. बाकी कोणाला आवडला असेल / नसेल पण आपण ज्यांच्यासाठी वापरला असेल/ नसेल तो चिंतातुरजंतु  हा शब्द आम्हाला फार आवडला !!!

आनंदीजंतु
प्रा.डॉ.... ..........

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 7:33 am | सृष्टीलावण्या

चित्र ताम्हणी घाटाचे आहे आणि चिंतातुर जंतु हा शब्द गोविंदाग्रजांचा आहे.

चित्र मला पण बेहद्द आवडते पण मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोभारीत (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

"चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन.

लिखाळ's picture

18 Feb 2008 - 10:01 pm | लिखाळ

"चिंतातुर जंतु" ही गोविंदाग्रजांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक. पुढेमागे ह्याच व्यासपीठावर देईन.

वा नक्कीच द्या...वाट पाहत आहे.
--लिखाळ.

मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

संजय अभ्यंकर's picture

18 Feb 2008 - 8:08 pm | संजय अभ्यंकर

फार सुंदर कविता!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Feb 2008 - 10:32 pm | llपुण्याचे पेशवेll

आठवणीतल्या कविता नावाचे ४ (किंवा कदाचित ५) भागात प्रसिध्द केलेले पुस्तक उपलब्ध आहे. त्यात कदाचित या कवितेबद्दल माहिती मिळू शकेल. त्यात माझ्या आवडीच्या अनेक कविता आहेत.
"गायी पाण्यावर काय म्हणून आल्या" अशी सुरुवात असलेली "माझी कन्या" नावाची कवि 'बी' उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांची कविता किंवा 'कठीण समय येता कोण कामास येतो' ही रघुनाथ पंडीत यांची कविता. या त्यामधे आहेत.
पं. दुर्गादास आसाराम तिवारी यांच्या 'गोकलखां लढनेवाला','मोहरा इरेला पडला','एक काळ ऐसा होता','फेकला तटाहून घोडा' अशा अनेक कविता पण त्यामधे आहेत.

ता.क. वर उल्लेखित कवि आणि कविता यांचे नाते माझ्या घोर अज्ञानानुसार वेगळे असू शकते. (चू.भू.द्या.घ्या.)

पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 7:48 am | सृष्टीलावण्या

त्यातील कविता साधारण १९७५ च्या बालभारती पर्यंतच्या आहेत. त्यात ही कविता नक्की नाही.

गाई पाण्यावरच्या आठवणीने मन भरून आले. ती कविता माझ्या मोठ्या बहिणीला होती, मला नव्हती. पण संध्याकाळी परवचा, पाढे, शुभंकरोति, रामरक्षा म्हणताना कविता पण म्हटल्या जायच्या. त्यामुळे पुढे अभ्यासक्रम बदलला तरी मला तिच्या बालभारतीच्या अनेक कविता मला पाठ होत्या.

लिखाळ's picture

17 Feb 2008 - 11:57 pm | लिखाळ

काय मस्त कविता ! मस्त शाळेतले दिवस आठवले.

अजून अश्या जून्या कविता वाचायला आवडातील. प्रकाशचित्रंसुद्धा फारच उत्तम.

अशीच एक माझी आवडाती कविता म्हणजे 'फूलपाखरु छान किती दिसते..' आणि एक चिमणीची कविता होती 'माझा घरटा कोणी नेला....'

---- लिखाळ.
तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 7:50 am | सृष्टीलावण्या

ह्या वेंलींवर फुलाफुलावर गोड किती हसते...

चतुरंग's picture

17 Feb 2008 - 11:59 pm | चतुरंग

साधी, सोपी, छान कविता आणि बरोबर तितकेच छान प्रकाशचित्र.
धन्यवाद.

चतुरंग

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 7:55 am | सृष्टीलावण्या

ह्या कवितेची एक आठवण म्हणजे साधारण १९८४ च्या काळात ठाण्याजवळील येऊर निर्जन अरण्य होते जिथे वाघ फिरायचे, तिथे माझे आजोळ होते. तिथल्या घाटातून जाताना आम्ही मोठमोठ्याने ही कविता म्हणत / कोकलत जायचो.

डॉ.प्रसाद दाढे's picture

18 Feb 2008 - 10:36 pm | डॉ.प्रसाद दाढे

'आवडतो मज अफाट सागर अथा॑ग पाणी निळे
निळ्या जा॑भळ्या जळात केशर साय॑काळी मिळे
फेस फुला॑चे सफेद शि॑पीत वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे
मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळीतो किती
द॑गल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या स॑गती
स॑थ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
तूफान जेव्हा भा॑डत येते सागरही गर्जतो
त्यावेळी मी चतूरपणाने दूर जरा राहतो
खडकावरूनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगा-ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
दूर डो॑गरावरी चमकती निळे जा॑भळे दिवे
सा॑गतात ते मजला आता घरी जायला हवे..घरी जायला हवे'
-कुसुमाग्रज

प्राजु's picture

19 Feb 2008 - 12:22 am | प्राजु

वावा..
डॉक्टरसाहेब..
अहो ही कविता माझा जीव की प्राण होती. आणि आवाज जरा बरा आणि थोडीफार संगिताची जाण असल्याने शाळेत सगळ्या कवितांना मला चाल लावून म्हणायला सांगत आमचे सर. ही कविता मी फारच छान म्हंटल्याचे त्यानी कौतुकाने आमच्या मुख्याध्यापकांना सांगितले होते. आणि मला त्यांच्याकडून शाबासकी मिळाली होती.

मला अजून एक आठवते ती कविता म्हणजे.."बाभळी"
बाभळी सारख्या काटेरी विषयावर इंदिरा संतांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे.
इथे देत आहे..

लवलव हिरवीगार पालवी काट्यांचीवर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसरकलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागर रिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे..

- कवयित्री इंदिरा संत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Feb 2008 - 10:00 am | डॉ.प्रसाद दाढे

धन्यवाद 'प्राजू'.
या अशा काही कविता होत्या की ज्या एकदा वाचल्या की आपोआप पाठ होत असत.

'माणूस माझे नाव
माणूस माझे नाव
बि॑दूमात्र मी क्षुद्र खरोखर
परि जि॑कले सातही सागर
उ॑च गाठला गौरीश॑कर
अग्नियान मम घेत चालले
आकाशाचा ठाव
माणूस माझे नाव'
-बाबा आमटे
तशीच हि॑दीमधील हरिव॑शराय बच्चन या॑ची..
'चल मर्दाने सीना ताने
हाथ हिलाते,पा॑व बढाते
मन मुस्काते गाते गीत
हम भारत कि अमर जवानी
सागर कि लहरे॑ लासानी
ग॑ग जमुन के निर्मल पानी
सब के प्रेरक रक्षक मीत
चल मर्दाने सीना ताने
हाथ हिलाते पा॑व बढाते
मन मुस्काते गाते गीत..'

पुढील स॑स्कृत ओळी अशाच..
'रात्रीर गमिष्यति भविष्यति सुप्रभातम
भास्वान उदेष्यति हसिष्यति प॑कजश्री
इत्थ॑ विच॑तयति कोषगत द्विरेफे
हा ह॑त ह॑त नलिनिम गज-उज्जहारः'
(खूप वर्षा॑नी स॑स्कृत लिहित असल्याने चुका असण्याची शक्यता आहे)

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 10:20 am | विसोबा खेचर

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

वा! सुंदर कविता...

आपला,
(तिसरीतला) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2008 - 12:48 am | भडकमकर मास्तर

हो...मी तिसरीत असताना (१९८३) घाटातली वाट ही कविता शिकलोय...
मस्त कविता..झक्कास फोटो...

मला माझ्या दहावीच्या काही आवडत्या पण अर्धवट आठवणाया कविता द्याव्याशा वाटत आहेत...

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2008 - 12:53 am | भडकमकर मास्तर

विसरसीमेहून आठवत येत आहे,
मास्तर तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठे आहे?
........
आमचं नालंदा तुमचं घर...

मुक्तसुनीत's picture

9 Mar 2008 - 2:37 am | मुक्तसुनीत

- खरे ना ?

अजून कविता द्या ना ....
मला ती शिरीष पैंची हवीहवीशी वाटते आहे . ....."आकाश कसे जवळ आले आहे ......"