मी सखाराम गटणे

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
12 Jun 2009 - 7:26 am

[हा लेख साधारण दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. काही मित्रांच्या सूचनेवरून आजच्या दिवशी येथे पुन्हा देतो आहे. मिपाच्या धोरणात हा लेख, आता किंवा यापुढे बसत नसल्यास अप्रकाशित केला तरी काही हरकत नाही.]

"मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्‍या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्‍या गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला.

अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही. त्या एवढाल्या वाड्यात, आजारी आजी आणि घनघोर बाप सोडला तर फक्त मी आणि आईची मागे राहिलेली पुस्तकं. आसपास कोणी माझ्या वयाची मुलंही नव्हती. त्यामुळे पुस्तकं वाचणं आणि न आठवणार्‍या आईच्या आठवणींत बुडून जाणं एवढाच दिनक्रम उरला.

आप्पा दिवसभर त्यांच्या दुकानांवर. घरी यायचे ते पण रात्र उलटून गेल्यावर. मला कधी मारलं नाही हे खरं, पण त्यांचा दराराच एवढा होता, की माझ्या हातून कुठलीच चूक होणं शक्य नव्हतं. आईवेगळ्या मुलाला वाढवताना फक्त शिस्तच पुरेशी नाही हे त्यांना बहुधा कळत असावं, पण मायेनं बोलणं त्यांना जमायचं नाही. दिवसभराच्या दगदगीतून घरी आल्यावर मी काही खोड्या करत नाही, एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. तेव्हा मी असून नसल्यासारखाच. कधीतरी मध्येच कितवीत आहेस, प्रगतिपुस्तक बघू वगैरे रुंद गडगडाटी आवाजात चौकशा होत. मनातल्या मनात मी त्यांना 'आप्पा बळवंत' नाव ठेवून दिलं होतं. खरं तर त्या चौकात आप्पांचं दुकान आहे, म्हणूनच त्याला तसं नाव पडलं अशी माझी बरेच दिवस पक्की समजूत होती.

अशा वेळी कधी सठीसामाशी येणारे पाहुणे, आप्पांचे मित्र वगैरे घरी आले; की जरी मला बुजायला झालं तरी फार बरं वाटायचं. माझ्या सद्गुणी स्वभावाचं, वाचनाच्या वेडाचं खूप कौतुक व्हायचं. मग एरव्ही एका गोड शब्दाला पारखा असलेला जीव फुलून यायचा. लोक आपल्याला चांगला म्हणताहेत, तेव्हा आपण जसे वागतोय तसंच वागत राहिलं पाहिजे असं काहीसं तेव्हा माझ्या मनानं घेतलं असावं. शाळेतल्या इतर मुलांपासून मग अधिकच वेगळा पडू लागलो. कुणी शिव्या दिल्या, मस्ती केली तर त्यांना मनातल्या मनात नाक मुरडू लागलो. माझ्या तेव्हाच्या पुस्तकी भाषेत बोलायचं झालं तर, साने गुरुजींची माझ्या मनाच्या देव्हार्‍यात अशी प्राणप्रतिष्ठा झाली.

मला वाटतं, त्या वयात कोणी तरी एक हिरो लागतोच. आजच्यासारखा त्या काळात सिनेमा, क्रिकेट, नाटकं यांच्यात हिरो शोधायचा पर्याय तेव्हा नव्हता. आपसूकच साहित्यिकांना 'फॉलो' करू लागलो. व्याख्यानांना जाऊ लागलो. उगाच प्रगल्भता, अल्पाक्षररमणीयता, विचक्षण, नेणीव, आल्हाददायक, विश्रब्ध, हृदयंगम असले शब्द कानावर पडले की पोपटासारखा त्यांचा अर्थ न समजता त्यांचा वापर करू लागलो. 'पण'च्या ऐवजी परंतु, खरं तर'च्या ऐवजी 'वस्तुतः' असं कृत्रिम लिहून, निरर्थक मोठमोठे शब्द वापरून 'गटणेचं मराठी चांगलं आहे' असं कौतुक शाळेत पदरात पाडून घ्यायची सवय लागली.

तेव्हाचे बहुतेक लेखक म्हणजे आदर्शवादाने भारलेले. त्यांना शिष्य मिळाला तोदेखील माझ्यासारखा. मग काय? जिथे तिथे जीवनविषयक सूत्रे शोधायची खोड लागली. 'योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत नाहीत' ऐकल्यापासून फक्त बोधप्रद पुस्तकेच वाचायची ठरवलं. बोजड पुस्तकं, काही कळत नसताना 'प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे' असं मनाशी घोकत घोकत वाचली. सेल्फ-पिटी म्हणतात तसं, स्वत:लाच 'परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे' असं समजावू लागलो.

असंच एक दिवस एका नवीन लेखकाचं व्याख्यान होतं. त्यांची तोवर छापून आलेली प्रत्येक ओळ जरी मी वाचली असली तरी 'या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही' ही ओळ माझ्या विशेष आवडीची होती. आप्पांच्या अंगवस्त्रांची गावभर होणारी चर्चा माझ्या तेव्हा कानी असेल म्हणून किंवा त्या अडनिड्या वयातील एक मूड स्विंग म्हणून असेल, पण ते वाक्य वाचल्यानंतर त्यांना भेटायचंच हे ठरवलं होतं. त्यांच्या व्याख्यानाला गेलो, त्यांची स्वाक्षरी घेतली आणि मार्गदर्शन घ्यावं म्हणून त्यांच्या घरीही गेलो. असो, पुढची गोष्ट मी पुन्हा सांगण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हां सगळ्यांना ती चांगलीच ठाऊक आहे.

अगदी रातोरात नसलं, तरी माझं नाव, माझी बोलायची पद्धत, डबक्यावर शेवाळ साठावं तशा शब्दांत पुस्तकांचा केलेला पंचनामा इथपासून ते साने गुरुजींचा फोटो, माझं लग्न, मुलाचा जन्म इथपर्यंत सारं काही जगजाहीर झालंय. माझं नाव घेऊन मग अलंकारिक शैलीचा सोस असणार्‍या, पुस्तकांच्या जगात नुकतंच पाऊल पडलेलं असलं तरी सारं काही वाचून झालेलं आहे अशा भ्रमात वावरणार्‍या तरुण कुमार मंडळींना मग 'गटणे' म्हणून चिडवण्याची फॅशनच पडून गेली आहे. अजूनसुद्धा पाचवीतला नातू शाळेत मला 'गटणे' म्हणून चिडवतात अशी तक्रार घेऊन कधीकधी घरी येतो.

माझं खासगी आयुष्य असं जाहीर झाल्याबाबत, किंवा माझं नाव ही एक चिडवण्याची गोष्ट बनल्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आयुष्य ('जीवन' म्हणायचे तेव्हाच सोडले) ही काही फार सीरियसली घ्यायची गोष्ट नाही, हे जरा उशीरानेच का होईना पण समजलं खरं. तेव्हापासून उगाच कुढत राहून शिष्ट मोठेपणा मिरवण्यापेक्षा वागण्यात बराच मोकळेपणा आला. जमेल तितकं जग पाहिलं, कधी आदिवासी वस्त्यांत राहिलो तर कधी परदेशात. शक्य तेवढे वेगवेगळे अनुभव घ्यायचा यत्न केला. पूर्वीच्या भिडस्त मध्यमवर्गीय चाकोरीबाहेर पडायची धडपड केली. उगाचच 'जीवन त्यांना कळले हो' वगैरेचा आव आणत नाही, पण पूर्वी आपण अगदीच 'हे' होतो, हे मात्र जाणवलं आणि मग जरा सुधारायचा प्रयत्न केला.

सध्या मुलगा पेढीवर बसतो. हो, सोनगावकर सराफांच्याच. देशाबाहेरही धंदा वाढवण्याचे प्लॅन्स आहेत. मी आणि ही, आमच्या माथेरानच्या बंगल्यात निवांत राहतो. साने गुरुजी, पु. लं. यांची पारायणं केव्हाच झालीत. पण बाबा कदम, भाऊ पाध्ये, नेमाडे करत करत सध्या कमलेश वालावलकर, मकरंद साठे वाचतोय. (अगदीच जर दम्यासारखी जुनी सवय उबाळून आली तर वपु वाचतो.) वेगळं लिहितात फार. बाकी, नातवंडं मजेत आहेत. मुलगा-सून कर्तबगार आहेत. सारं काही 'एथास्थित' सुरू असल्याचा टिपीकल मध्यमवर्गीय स्मगनेस अलीकडे फारच जाणवतो.

असो, काही वर्षांपूर्वी भाई गेले. ते असेपर्यंत दर दसर्‍याला त्यांच्या घरी जाऊन सोने द्यायचो. 'कधीच सीमोल्लंघन केले नसले तरी न चुकता सोने देणारा माणूस' या जुन्या विशेषणाने सुरुवात व्हायची आणि मग 'केतकी पिवळी पडली' पासून 'जीवनोन्नतीचे सहा सोपान' पर्यंतच्या त्या आठवणींना उजाळा मिळायचा. आता अगदीच आठवण आली तर त्यांची 'सखाराम गटणे'ची कॅसेट लावून बसतो. आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिर्‍हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. "

संस्कृतीवाङ्मयसाहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Jun 2009 - 7:41 am | विसोबा खेचर

आता वय झालं. डोळे, कान काही नीट साथ देत नाहीत. पण तिकडे संपलेली कॅसेट माझ्या मनात सुरूच राहते. मी पन्नासेक वर्षांपूर्वी असा होतो, हे माझं मलाच खरं वाटत नाही. एखाद्या तिर्‍हाईतावर हसावं तसं माझे किस्से आठवून मला हसू येत राहतं. बोळा कधीच निघालेला असतो, पाणी अखंड खळखळत वाहत राहतं. "

सु रे ख...!

अन्य शब्द नाहीत...

नंदनसायबा, जियो..!

आपला,
(गजा खोत प्रेमी) तात्या.

संदीप चित्रे's picture

14 Jun 2009 - 9:10 am | संदीप चित्रे

असेच म्हणतो...
असं वाटलं की गटणे प्रत्यक्षात बोलतोय.

सहज's picture

12 Jun 2009 - 7:51 am | सहज

नंदन लेख फार छान आहे.

चित्रा's picture

12 Jun 2009 - 8:59 am | चित्रा

सखाराम गटणेंच्या प्रवासाचे वर्णन आवडले.

मेघना भुस्कुटे's picture

12 Jun 2009 - 7:53 am | मेघना भुस्कुटे

नवं लिवा की राव. मी किती आशेनं बघायला आले... :(

घाटावरचे भट's picture

12 Jun 2009 - 8:04 am | घाटावरचे भट

ओ तै, आमी वाचलं नव्हतं. लै भारी हाय बगा.

मेघना भुस्कुटे's picture

12 Jun 2009 - 8:08 am | मेघना भुस्कुटे

हे घ्या - http://marathisahitya.blogspot.com/
ज्यांनी वाचलं नव्हतं, त्यांना सहीच आहे हे.
पण मला मारे वाटलं, इतक्या नवसासायासानं, इतक्या महिन्यांनी वगैरे लिहिलंय, तर कायतरी सॉल्लिड असणार.
कसलं काय - म्हणून आवर्जून निराशा नोंदवली.

श्रावण मोडक's picture

12 Jun 2009 - 8:59 am | श्रावण मोडक

लिहिलं आहे चांगलंच, पण मेघनाशी सहमत. हे लिहिलं होतंस तेव्हाच मी म्हटलं होतं आता एकेक कॅरेक्टर घेऊन करा सुरवात. कसलं काय?
हा नंदन खूप आळशी आहे असं दिसतंय मंडळी :)

नंदन's picture

12 Jun 2009 - 9:05 am | नंदन

नानाला लिहिल्याप्रमाणे सवय मोडली होती, तेव्हा एकदम धावण्यापेक्षा रांगत रांगत पुन्हा सुरूवात करतो आहे :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

यशोधरा's picture

12 Jun 2009 - 9:35 am | यशोधरा

>>रांगत रांगत पुन्हा सुरूवात करतो आहे

हे म्हणून कोणाला तक्रार करु द्यायला वाव ठेवलेला नाहीस, त्याचा निषेध! :)
आणि कारण दिले आहेस तरीही - नवीन काही न लिहिल्याचाही निषेध!

अवांतरः हे लिहिलेले उत्तमच आहे! परत वाचायलाही खूप मजा आली. :) जरा नियमित लिही रे माणसा!

भाग्यश्री's picture

12 Jun 2009 - 11:42 am | भाग्यश्री

सहमत!!
नियमित लिही माणसा!! :)

http://www.bhagyashree.co.cc/

प्राजु's picture

12 Jun 2009 - 10:25 pm | प्राजु

लिहिलेले आधी वाचले होते तरीही नव्याने आनंद घेता आला.
पण आता नवे काहीतरी जोरदार येऊदे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

12 Jun 2009 - 8:17 pm | श्रावण मोडक

पाठीवर एक मूल घेऊन बाबागाडी करण्याची वेळ आली तरी हा म्हणतोय रांगत. धन्य आहे तुझी. __/\__ ;)

सुबक ठेंगणी's picture

12 Jun 2009 - 8:15 am | सुबक ठेंगणी

आता इतर व्यक्ती आणि वल्ली पण येऊदेत... :)

Nile's picture

12 Jun 2009 - 9:49 am | Nile

सहमत आहे!

सुरेखच! बाकी वल्लींची वाट पहातो! :)

अवलिया's picture

12 Jun 2009 - 8:50 am | अवलिया

वा! मस्त सुरेख लेख !!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

एकलव्य's picture

12 Jun 2009 - 9:20 am | एकलव्य

आयुष्य ('जीवन' म्हणायचे तेव्हाच सोडले) ही काही फार सीरियसली घ्यायची गोष्ट नाही, हे जरा उशीरानेच का होईना पण समजलं खरं.

वा!

- एकलव्य गटणे

छोटा डॉन's picture

12 Jun 2009 - 9:52 am | छोटा डॉन

नंदन मालकांचा हा लेख आम्ही बर्‍याच आधी वाचला होता, तेव्हा फार आवडला होता.
आता अजुन पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला ...

एक विनंती, असेच बाकीच्या व्यक्तीरेखांवर लिहावे.
मस्त जमतो आहे हा प्लॉट तुम्हाला, आम्ही वाट पहात आहोत ...

------
डॉन्या बर्वे.
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

दिपक's picture

12 Jun 2009 - 9:52 am | दिपक

आधी नंदनच्या ब्लॉगवर वाचला होता. परत वाचताना मजा आली. भारीच लिहिले आहे. अजुन असे वाचायला आवडेल. विनंती आहे नंदन आमची. :)

(पु.ल.प्रेमी) दिपक

निखिल देशपांडे's picture

12 Jun 2009 - 9:54 am | निखिल देशपांडे

हा लेख आधी वाचल्याचे आठवते...
परत पण वाचायला तेव्हढीच मजा आली.
आता इतर व्यक्ती आणि वल्ली पण येऊदेत असेच म्हणतो

==निखिल

ऋषिकेश's picture

12 Jun 2009 - 10:09 am | ऋषिकेश

अरे हे काय! परत तेच? पुन्हा वाचायला आवडलं.. पण.....!!!
असो.
रांगु नकोस रे फार काळ.. पळ पाहु पटापट..

(पळपुटा)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

आनंदयात्री's picture

12 Jun 2009 - 10:23 am | आनंदयात्री

पुर्नवाचनाच्या आनंदाचा पुर्नप्रत्यय.
:)

अरुण वडुलेकर's picture

12 Jun 2009 - 10:49 am | अरुण वडुलेकर

या पेक्षा अन्य चांगला शब्द सुचत नाही.
पहिल्यांदाच वाचला. फार छान वाटला.
भाईंच्या पुण्य तिथीला सादर झाला हे विशेष.
धन्यवाद.

मनिष's picture

12 Jun 2009 - 11:16 am | मनिष

मी पहिल्यांदाच वाचला आणि हा गटणे आवडला! :)
- मनिष
(अवांतर - हल्लीचे आधुनिक गटणे मिपा वर निबंध लिहितात म्हणे! ;))

वरिल लेखातील गटणे आम्हाला ही भयंकर आवडला .. पुर्व इतिहास माहित नसल्याने .. आमचे मेंदूत पुलंच्या गटण्याची प्रतिकृती "ओव्हर राईट" झाली होती .. पण आता वेगळाच गटणे असल्याने सुखावलो .. णंदण भौ .. लिवा की राव आजून .. इथे "उरलेल्या पाकाचं काय करावं ? " आणि "फाटलेल्या चड्ड्यांचं काय करावं ? " असले लेख उचकून लै बोर झालंय राव ...

@ मनिष : कसा आहेस रे दोस्ता , बरेच दिवस झाले तुझी खरड नाही , काळजी वाटली.

- तुकाराम मटणे

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jun 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार

मी सुद्धा पहिल्यांदाच वाचला, मस्त वाटले वाचायला.
एकदम आवडला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

12 Jun 2009 - 12:25 pm | नितिन थत्ते

लेख आवडला. लोकांच्या मनात घट्ट प्रतिमा असलेल्या व्यक्तिचित्राबाबत लिहिणे अवघड असते. चांगले जमले आहे.
(आम्हाला आधी कौलाराम परत आले असे वाटले होते)

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2009 - 12:27 pm | स्वाती दिनेश

नंदन, पुन्हा वाचायला मजा आली पण इतरही व्यक्तिचित्रे रांगेत उभी राहून वाट पाहत आहेत,:)
स्वाती

प्रमोद देव's picture

12 Jun 2009 - 12:30 pm | प्रमोद देव

लेख ह्या आधी वाचला होता तेव्हाही आवडलेला आणि आताही तितकाच आवडला.
काही काही गोष्टी करण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असतो. त्यातील एक म्हणजे हा लेख.

नंदन असाच लिहीता राहा!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

डॉ.प्रसाद दाढे's picture

12 Jun 2009 - 1:10 pm | डॉ.प्रसाद दाढे

मीही पहिल्यांदाच वाचला.. मस्तच आहे..खूप आवडला लेख. पुलंना एका प्रकारे आदरांजलीच आहे!
थोडीशी मुकुंद टांकसाळ्यांच्या बटाटा अपार्टमेंट्समध्ये पुलं' ची आठवण झाली.. अर्थातच तुम्हां-आम्हां सर्व पुलंप्रेमींच्या भावना अश्याच आहेत.
मी एकवेळ माझे नाव, आयडेंटिटी विसरू शकेन्..पण पुलंच्या व्यक्तिरेखा नाही विसरू शकणार

चतुरंग's picture

12 Jun 2009 - 5:00 pm | चतुरंग

मी पहिल्यांदाच वाचला लेख. फारच छान लिहलं आहेस.
(जरा नियमित येऊ दे असं म्हणायचं होतं पण त्याआधी माझीच अर्धी राहिलेली कामं पूर्ण करायला हवीत हे लक्षात आल्यानं तसं म्हणत नाहीये! ;) )

चतुरंग

भोचक's picture

12 Jun 2009 - 5:17 pm | भोचक

नंदन, मस्तच.!!! लेख सॉल्लिडच आवडला.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/

मुक्तसुनीत's picture

12 Jun 2009 - 5:53 pm | मुक्तसुनीत

मी पहिल्यांदाच वाचले हे. अर्थातच आवडले. "त्याचे पुढे काय झाले ?" अशा प्रकारची क्लोजर्स आपल्याला हवी असतात. "व्यक्ती आणि वल्ली" च्या संदर्भात विशेषच. हा अशा क्लोजरचा एक प्रयत्न वाटला.

काही जाणवलेले विशेष :
लहानपणीचा भोळसट वाटणारा सख्या स्वत:ला (आणि जगाला )समजून घेण्याच्या बाबतीत मचुअर , अनाग्रही वाटतो. एकेकाळी ज्याच्या वागण्याबोलण्यातून व्यंगात्म बाबी डोकावायच्या , त्याच्या विचारसरणीचे वर्णन "विवेकी" असे करता येईल. थोडक्यात "तो" सख्या पुलंचा , आणि आताचे श्री. गटणे नंदनचे आहेत. हे एकूण तर्काला धरूनच झाले. दुसर्‍या कुणाचे गटणे स्वतःला समजून घेण्याऐवजी काहीसे तिरसट म्हणा किंवा काहीसे आत्मप्रौढी मिरविणारे बनले असते. तसे इथे होत नाही. एकूण जगाशी नाळ त्याने जोडून घेतलीसे दिसते. तो एक टिप्पिकल "गीक" राहिला नाही.

बाय द वे , काळाचा हिशेब करता, गटणेचे कान डोळे काम न करणे तर्कसुसंगत वाटत नाही. (का माझा हिशेब चुकतोय ??)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Jun 2009 - 6:55 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह! सुंदरच..
छान लिहीले आहे. आवडले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मी पहिल्यांदाच वाचला.

सखाराम गटणेचा आत्मवृत्तांत आवडला.

क्रान्ति's picture

12 Jun 2009 - 8:56 pm | क्रान्ति

हा वेगळा पैलू खूप आवडला. बाकीच्या वल्ली पण वाट पहात असतील नाण्याची दुसरी बाजू घेऊन प्रकाशात यायची! त्यांनाही येऊ द्या लवकर!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jun 2009 - 9:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन, गटणेचं आत्मकथन आवडलं. तू तुझी लेखणी का रे म्यान करून ठेवतोस?

या लेखामुळे अशाच प्रकारातला आणखी एक लेख आठवला.
(फाफॉ वापरणार्‍यांना कॅरॅक्टर एन्कोडींग वेस्टर्न करावं लागेल.)

राघव's picture

13 Jun 2009 - 10:49 am | राघव

छान लिहिलेत. खूप आवडले. :)
बाय द वे, मी शब्दबंधच्या चौथ्या सत्रात होतो, त्यामुळे तुमचे लेखन ऐकता आले नाही. असो. पुन्हा कधीतरी.

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

फारएन्ड's picture

13 Jun 2009 - 12:59 pm | फारएन्ड

अतिशय सुंदर लेख, एकदम आवडला! असे इतर व्यक्तिरेखांबद्दल ही वाचायला आवडेल.