मथुरानगरपती काहे तुम...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Jun 2009 - 6:16 pm

टीप - ह्या विरहिणीच्या शब्दांबद्दल, अर्थाबद्दल, मी मिपाकर धनंजयला काही भाष्य करण्यास सांगितले आहे. तीच विनंती मी मुक्तसुनीत, प्राजू, जयू, क्रान्ती इत्यादी सर्वच काव्यतज्ञ/प्रेमीना करत आहे..

मथुरानगरपती काहे तुम...
(येथे ऐका किंवा येथे ऐका)
(शब्द - रितुपर्णो घोष, संगीत - देबोज्योती मिश्रा)

रेनकोट चित्रपटातलं शुभा मुद्गलचं एक अप्रतीम गाणं. एक अतिशय सुरेख विरहिणी! वर वर पाहता एखाद्याला हे गाणं लोकगीतासारखंही भासू शकेल, परंतु या गाण्याला शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची भारीभक्कम बैठक लाभली आहे.

सुबह सुबह का ख्याल आज
वापस गोकूल चल मथुरा राज..!

पिलू रागाच्या चौकटीतलं हे गाणं. यातला कोमल गंधार थेट हृदयालाच जाऊन भिडतो इतका हळवा आहे. 'वापस गोकूल चल मथुरा राज' या ओळीतल्या 'चल' या शब्दावरील शुद्ध रिषभ आणि पंचमाची संगती जीव लावून जाते!

धीरे धीरे पहुचत जमुना के तीर
सुनसान पनघट मृदुल समीर

क्या बात है! अगदी डोळ्यासमोर दृष्य उभं रहातं! गाण्याचे शब्द तर सुरेखच आहेत. 'धीरे धीरे पहुचत जमुना के तीर' ही ओळ त्यातील शुद्ध गंधारामुळे अगदी उल्हासदायक, ताजी टवटवीत वाटते, परंतु पुढल्याच 'सुनसान पनघट मृदुल समीर' या ओळीतला सुनेपणा कोमल गंधार तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवून देतो. ही ताकद केवळ स्वरांचीच! कोमल आणि शुद्ध या दोन्ही गंधारांमुळे हे गाणं विशेष श्रवणीय झालं आहे.

मनोहर वेष, पी कुकुल, अकूल, पूर नारी, व्याकुल नयन, कुसुम सज्जा, कंटक शयन, मृदुल समीर, हे शब्द कानाला खूप छान लागतात, गोड लागतात!

शुभा मुद्गलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, इतक्या सुरेख रितीने तिनं हे गाणं गायलं आहे. अभिजात संगीताची उत्तम बैठक लाभलेल्या शुभाला स्वच्छ, मोकळा परंतु तितकाच सुरेल आवाजही लाभला आहे.

हल्ली आपल्याकडच्या गाण्यांना ऑस्कर पुरस्कार मिळण्याचा जमाना आहे, आयटम साँगचा जमाना आहे! या पुरस्कारांच्या आणि आयटम साँगस् च्या भाऊगर्दीत असं एखादं सुरेख, जीवाला लागणारं गाणं ऐकलं की खूप बरं वाटतं!

जय हो...!

-- तात्या अभ्यंकर.

संगीतविचारआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

9 Jun 2009 - 6:27 pm | मस्त कलंदर

रेनकोट मधली गाणी बहुतेक सलग अशी नाहीत.."मथुरानगरपती काहे तुम..." सारखेच "पिया तोरा कैसा अभिमान.." या ओळीही मधून मधून येतात..

खूपच सुंदर गाण्याचे पुन्हा एकदा आठवण झाली...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मेघना भुस्कुटे's picture

9 Jun 2009 - 6:58 pm | मेघना भुस्कुटे

होय होय, या सिनेमातली गाणी विलक्षण सुंदर आहेत. शब्द तर बेफाम सुंदर आहेत.
शिवाय ती गाणी सिनेमा बघताना मधे मधे येत नाहीत. :)

हर्षद आनंदी's picture

9 Jun 2009 - 6:58 pm | हर्षद आनंदी

एक चांगले गाणे ऐकायची संधी दिल्याबद्द्ल...

तसे गाण्यातले फार काही कळत नाही, पण

"काहे तुम गोकुल जाव" यातील आर्तता आणि टिपेचा आवाज अंगावर रोमांच उभे करतात...

पुन्हा एकवार आभार

धनंजय's picture

9 Jun 2009 - 7:06 pm | धनंजय

यात कवितेतील कथाही एक वेगळीच कल्पना आहे.

कृष्ण मथुरा जिंकल्यानंतर पुन्हा कधी गोकुळात जायला निघाला आहे. (असा कुठला प्रसंग भागवतकथेत प्रसिद्ध नाही - कंसाला मारल्यावर उग्रसेनाला मथुरेच्या गादीवर बसवून कृष्ण आधी मथुरेतच राहिला. पुढे कधी तो द्वरकेला गेला. पण मथुरेत राहात असताना, यमुनेपलिकडच्या गोकुळात मित्रा-मैत्रिणींना भेटायला, नंदकुटुंबाला भेटायला अधूनमधून तो जातच असणार. अशाच कुठल्या प्रसंगाचे वर्णन असावे.) मग राधा म्हणते - "इथे परत येऊन मला का छळतो आहेस? तिथला तू तिथेच थांब ना!" अर्थातच तिचा विरही भाव या "नको येऊस"पेक्षा खूपच वेगळा, गहिरा, गुंतागुंतीचा आहे.

या अतिशय वेगळ्या आशयाच्या कवितेला सुरांनी समृद्ध केले आहे, आणि शुभा मुद्गल यांनी गायलेले आहे - त्याची ओळख करून दिल्याबद्दल तात्यांना धन्यवाद.

(रेनकोट चित्रपट मी बघितला नाही. त्यात या गाण्यासाठी कुठला हळवा प्रसंग योजलेला आहे?)

चित्रा's picture

9 Jun 2009 - 9:35 pm | चित्रा

सुंदर गाणे. रेनकोटची बरी आठवण करून दिली.

मी घेतलेला अर्थ असा - की गोकुळाला चाललेल्या कृष्णाला मथुरेतील त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री थांबवते आहे. या स्त्रीला कृष्णाचे राधेवरील प्रेमही माहिती आहे, आणि तो गेल्यावर तिची पुष्पशय्या तिला काट्यासमान भासणार आहे. आणि असे सगळे सांगूनही शेवटी काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर ती सांगते की तुझी प्रिया - राधा- आता पूर्ण संसारी झाली आहे, तिने तुझ्या विरहाचे अश्रू आता कधीच पुसले आहेत, आता जाऊन तिला परत दु:ख का देतोस?

धनंजय's picture

9 Jun 2009 - 10:36 pm | धनंजय

हे गाणे मथुरावासी प्रेयसीच्या दृष्टिकोनातून आहे, हा विचार पटण्यासारखा आहे.

मला तो काट्याच्या शय्येचा उल्लेख सर्व मथुरावासीयांच्याबद्दल वाटला. रात्री-अपरात्री रथ घेऊन जाणे यातून प्रेयसीला न सांगता दुसरीकडे जाण्याची कल्पनादेखील पटण्यासारखी आहे.

यमुनातीरावरती कृष्णाला राधेबद्दल विरह वाटतो, राधेच्या आता सुरळीत संसारात तो विघ्न होतो आहे, हे सर्व मथुरावासी प्रेयसीचे विषादयुक्त मत आहे, वल्गना आहेत...

परंतु यूट्यूबवरती या गाण्याच्या "रेनकोट"मधील चित्रफिती बघितल्या - ही पुढील

तर असे दिसते, की चित्रपटकथेत परत जाणारा पुरुष, आणि त्याची जुनी प्रेयसी यांच्याबद्दलच हळव्या वेदना अधिक प्रकर्षाने चित्रित आहेत. सोडलेल्या श्रीमंत गावातल्या कोणाच्या वेदना तशा पुढे ठेवलेल्या नाहीत. (म्हणजे भावना राधा-कृष्ण यांच्या मनातल्या आहेत, असा अर्थ घ्यायलासुद्धा जागा आहे.)

असे विविध अर्थ मनात येऊ देणार्‍या कवीचे अधिकच कौतूक वाटते.

चित्रा's picture

9 Jun 2009 - 11:18 pm | चित्रा

असाही अर्थ लागू शकतो. ऋतुपर्ण घोष यांची ही कविता आहे असे वाचले.

दिपाली पाटिल's picture

9 Jun 2009 - 9:48 pm | दिपाली पाटिल

हे गाणं छान आहे पण मला एव्हढे डिटेल्स माहित नव्हते. धन्यवाद छान माहीती दिल्याबद्द्ल.

दिपाली :)

क्रान्ति's picture

9 Jun 2009 - 10:27 pm | क्रान्ति

{केवळ एक काव्यप्रेमी म्हणून या गीताबद्दल विचार करायचं आणि लिहायचं धाडस केलं आहे. बाकी अजून माझी कवितेच्या 'क' चीही ओळख झाली नाहीय, हे नम्रपणे सांगू इच्छिते!}
रेनकोट चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर शीर्षकं दिसत असतानाच हे गीत सुरू होतं, ते चित्रपटाच्या कथेला अगदी समर्पक आहे! अपरिहार्य परिस्थितीत दुरावलेले प्रेमिक, प्रिया पतिगृही, आणि अचानक एक दिवस प्रियतमाला तिला भेटण्याची इच्छा होते, तो भर पावसात तिच्याकडे जायला निघतो, त्या पार्श्वभूमीवर हे गाणं वाजत रहातं.
आज सकाळी सकाळी हा काय विचार आलाय? मथुरेचा राणा पुन्हा का गोकुळी निघालाय? मथुरानगरपति हे कृष्णाचं बीरुद त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारं असावं का? मथुरेचं राज्य तर त्यानं कधीच स्वीकारलं नाही, मग मथुरानगरपति किंवा मथुराराज? कदाचित तू आता पूर्विचा अल्लड, अवखळ, खोडकर कान्हा राहिला नाहीस, एक जबाबदार राजा झाला आहेस, हे त्याला समजावण्यासाठी? मथुरेचं राज्य त्यानंच करावं म्हणून? पुढील ओळी पण तेच समर्थन देतात! राजाचा वेष त्यागून, मुकुट, राजदंड त्यागून पुन्हा बासरी वाजवण्याचं काय कारण?
असं कोणतं अनोख गीत गातोय कोकिळ, की ज्यानं तुला राजपाट धुळीसारखा त्याज्य वाटतोय? पुन्हा विरहिणी राधेच्या आठवणींनी मन व्याकुळ होतंय, राज्यकारभारात लक्ष लागत नाहीय, का पुन्हा गोकुळी जातोस तू?
मथुरानगरी व्याकुळ आहे तुझी असोशी पाहून! फुलांची शेज तुला काटेरी भासतेय, बोचतेय, रात्रभर जागा आहेस, अर्ध्या रात्रीच सारथी बोलावून निघाला आहेस गोकुळी जायला!
हळू हळू तुझा रथ यमुनेच्या तिरी गेला, तिथे काय दिसणार तुला? रिकामे पाणवठे, कंकणांची किणकिण नाही, पैंजणांची रुणझुण नाही, फक्त मंद वारा वाहतोय, का तू तो जुना काळ विसरू शकत नाहीस?
तुझी प्रिया, तुझी ती बावरी, लाजरी सखी राधा आता पूर्ण गृहिणी झाली आहे, दिवसभर दूध, दही, लोणी, तूप [दूध, नवन, घिउ] यातच तिचा दिवस जातोय, तिनं तुझ्या विरहाचे अश्रू कधीचेच पुसून टाकले आहेत. आता पुन्हा तू जाऊन ते दु:ख का जागवणार आहेस?
माझ्या अल्पमतिप्रमाणे हा झाला शब्दशः अर्थ! आणि चित्रपट पहाताना या गीताचा गूढार्थ नव्याने उकलत जातो. ती त्याला मी माझ्या संसारात किती सुखी आहे, हे अतिशयोक्तीने रंगवून सांगत रहाते, आणि मीही तुझ्यावाचून दु:खात नाही, हे तो तिला पटवून देत रहातो, पण मनातून दोघेही एकमेकांचाच विचार करत रहातात, आणि एका क्षणी दोघांचेही सुखी असण्याचे दावे किती फोल आहेत, हे दोघांनाही कळून चुकतं, चित्रपट तर संपून जातो, पण प्रेक्षकाला अस्वस्थ करून! तसं पाहिलं तर चित्रपट संपताना या गाण्याचा प्रभाव जास्त पडतो!कदाचित माझ्या विचार मांडणीत काही उणीवा असण्याचीही शक्यता आहे, पण मला कळलेलं हे गाणं, आणि चित्रपट असे आहेत.
बाकी या गीताच्या संगीताबद्दल तात्यांनी जी अनमोल माहिती दिलीय, तिला तोड नाही!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्राजु's picture

10 Jun 2009 - 12:13 am | प्राजु

तात्या, सुंदर लिहिलं आहे तुम्ही.
क्रांती तुझं विवेचन खूप खूप भावलं मला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 12:42 am | विसोबा खेचर

मधुशालेचा सहजसुंदर अनुवाद करणार्‍या चतुरंगाने या कवितेचाही अनुवाद केल्यास मला अतिशय आनंद होईल! :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 7:54 am | विसोबा खेचर

प्रतिसाद दिलेल्या सर्व रसिकांचा मी ऋणी आहे..

चित्रातै,

ती सांगते की तुझी प्रिया - राधा- आता पूर्ण संसारी झाली आहे, तिने तुझ्या विरहाचे अश्रू आता कधीच पुसले आहेत, आता जाऊन तिला परत दु:ख का देतोस?

चांगला अर्थ लावला आहे..

धनंजय,

मग राधा म्हणते - "इथे परत येऊन मला का छळतो आहेस? तिथला तू तिथेच थांब ना!" अर्थातच तिचा विरही भाव या "नको येऊस"पेक्षा खूपच वेगळा, गहिरा, गुंतागुंतीचा आहे.

क्या बात है..!

क्रान्ती,

बाकी अजून माझी कवितेच्या 'क' चीही ओळख झाली नाहीय, हे नम्रपणे सांगू इच्छिते!}

वास्तविक आपण इतक्या सुंदर कविता करता की हा आपला विनय म्हटला पायजेल! :)

आणि चित्रपट पहाताना या गीताचा गूढार्थ नव्याने उकलत जातो. ती त्याला मी माझ्या संसारात किती सुखी आहे, हे अतिशयोक्तीने रंगवून सांगत रहाते, आणि मीही तुझ्यावाचून दु:खात नाही, हे तो तिला पटवून देत रहातो, पण मनातून दोघेही एकमेकांचाच विचार करत रहातात, आणि एका क्षणी दोघांचेही सुखी असण्याचे दावे किती फोल आहेत, हे दोघांनाही कळून चुकतं, चित्रपट तर संपून जातो,

सुरेख लिहिलं आहे! एकंदरीत एक विलक्षण गूढ या गाण्यासोबत जाणवतं!

हा चित्रपटदेखील सुंदर होता, पाहण्यासारखा होता. अ‍ॅश व अजय या दोघांचीही कामे उत्तम झाली आहेत..

असो, प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांचे पुन्हा एकदा आभार..

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

क्रान्ति's picture

10 Jun 2009 - 7:55 pm | क्रान्ति

मथुरानगरपतीनं लावलेलं वेड इतकं जबरदस्त आहे, की कधी नव्हे तो काव्याचा काव्यात स्वैर भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय. जमलाय की नाही, ते त्या मथुरानगरपतीलाच माहीत!

सकाळी सकाळी तुला काय सुचले रे हरी?
मथुरा सोडून पुन्हा निघालास नंदाघरी
मथुरेच्या राजा आता गोकुळी कशाला जासी?

नंदलाल त्यागी वस्त्रे अलंकार मनोहर
उतरला शिरीचा का राजमुकुट सुंदर?
धरणीवरी ठेविला राजदंडाचाही भार
बन्सीधर होऊन पुन्हा का सूर जागविसी?

असे कोणते आगळे गीत छेडतो कोकीळ?
राज्यही का तुझ्यासाठी झाले चरणांची धूळ?
विरहिणीपरी तुझे मन का होई व्याकुळ?
राज्यकाजात कृष्णा का मन तू न गुंतविसी?

अंतःपुरातल्या नारी व्याकुळ नेत्री जागती
पुष्पशय्येवर आज कसे कंटक सलती?
प्राणनाथ माधव का असे बेचैन राह्ती?
अर्ध्या रात्री का कन्हैया सारथ्याला बोलाविसी?

हळूहळू येई रथ यमुनेच्या तीरावर
सुने, रिते पाणवठे, मंद वा-याची लहर
क्षणोक्षणी माधवाला चढे विरहाचा ज्वर
आता तरी कान्हा तिला विसरून का न जासी?

तुझी प्रियतमा आता संसारी रमणी होई
दूध, नवनीत, तूप यात तिचा दिन जाई
विरहाच्या आसवांना पुसून ती शांत होई
पुन्हा नव्याने तिचे का दु:ख आता जागविसी?

हे कृष्णार्पण!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विकास's picture

11 Jun 2009 - 12:20 am | विकास

सुंदर! तात्यांनी म्हणल्याप्रमाणे स्वतंत्र कविता म्हणून टाकावीत असे वाटते.

विसोबा खेचर's picture

10 Jun 2009 - 11:50 pm | विसोबा खेचर

सुरेख भावानुवाद!

जियो क्रान्ती..!

हा भावानुवाद इथे प्रतिसादरुपात न लिहिता स्वतंत्रपणे लिहायला हवा होता...

तात्या.

क्रान्ति's picture

11 Jun 2009 - 8:31 am | क्रान्ति

मूळ लेखाच्या दुव्यासह काव्यविभागात दिला.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा