नारायणगावचा थरार!!!

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
2 Jun 2009 - 11:01 pm

डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे. घे. [खरा थरार दुसर्‍या भागात येईल.. पहिला भाग वातावरण निर्मितीसाठी.. ]
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हा प्रसंग साधारणपणे डिसेंबर २००३ मध्ये घडला.. नवीन महाविद्यालयात रुजू होउन वर्ष होत आलं होतं.. एक दिवस एक तिसर्‍या वर्षात शिकणारी एक मुलगी आली.. संगणक अभियांत्रीकी व माहिती तंत्रज्ञान विभागाची शैक्षणिक औद्योगिक सहल जाणार होती.. ३८ मुलं.. ७ मुली.. या मुलींना एक स्त्री शिक्षिका असल्याशिवाय जाता येणार नव्हते.. म्हणून ती माझ्याकडे आली होती.. हे प्रकरण जरा नवीन होतं.. वालचंद मध्ये असताना दरवर्षी सहली काढल्या होत्या पण कुठल्या मास्तर-मास्तरणीला कुणी कधी विचारल्याचं आठवत नव्हतं... [एक विभागप्रमुखांचा सन्माननीय अपवाद वगळता.. कुणी हजरच नसायचं तर तो प्रश्नच कुठे येतो!!] त्या मुलीला नंतर सांगते म्हणून वाटेला लावलं.. नि विभागप्रमुखांना या बाबतीत भेटले.. तर ते स्वत:च या सहलीला येणार होते.. कार्यक्रमाची रूपरेखा अशी होती.. पहिल्या दिवशी सकाळी ९ च्या सुमारास निघायचं, वाटेत माळशिरस घाटात तासभर टाईमपास करायचा.. नि नारायाणगावात दुपारपर्यंत पोचायचं.. थोडा आराम.. संध्याकाळी इकडेतिकडे फिरायचं.. दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता खोडदला पोचायचं.. तिथे TIFR चं एक केंद्र आहे.. त्यांच्या १३ शक्तिशाली दुर्बिणी आहेत.. त्या पाहायच्या.. केंद्राची माहिती घ्यायची.. दुपारचं जेवण.. लेण्याद्री.. जमलंच तर दोन दिवसांत कधीतरी शिवनेरी असं करून दुसर्‍या दिवशी रात्री ९ला मुंबईत परत.. असा झकास नि निरुपद्रवी प्लान होता.मी तर एका पायावर तयार हो..!! कुठं उंडारायचं म्हटलं की दुप्पट उत्साह संचारलाच पाहिजे... :)

होता होता जायचा दिवस उजाडला.. आम्ही एकूण ४७ जन.. त्यावेळी आजच्यासारखे भ्रमणध्वनी बोकाळले नव्हते.. तरी किमान २५-३० लोकांकडे असतीलच.. मुलींपैकी २ मराठी.. २ सिंधी.. एक कच्छी गुजराती नि एक पक्की गुजराती जैन.. नि शेवटची पंजाबी.. कुणाच्या जाती-धर्मावर जात नाहीये.. पण या मुलींनी नंतर फेस आणला त्याची ही पार्श्वभूमी आहे.. ९ पर्यंत सगळेजण जमले.. एक-दोघींच्या आया त्याना सोडायला आल्या होत्या..
एकीची आई म्हणाली.. "ही काय माझ्या मुलीला सांभाळून नेते? माझी मुलगीच तिला नीट सांभाळून आणेल.."
["अहो बाई प्रसंग काय.. बोलताय काय?" ]

नशीब माझं फक्त मुलीच होत्या तिथे. मी त्या बाईच्या मुलीला नीट पाहून घेतले.. मनात म्हट्लं, काळजी घेण्यासाठी मानसिकता लागते.. "आकार"मान नाही, हे नाही तिला दाखवून दयायचं!! जाऊ दे...

जो मुख्य आयोजक मुलगा होता तो आला नि त्याने सांगितलं की खोडदला जायला दोन मार्ग आहेत.. एक म्हणजे कल्याणवरून.. तिकडे आधी वाटमारीचे प्रकार चालायचे.. आता ते थंडावलेत.. नि तो सगळ्यात जवळचाही मार्ग आहे.. तेव्हा जाताना कल्याणवरून जाऊ.. नि येताना जो दुसरा मार्ग आहे..म्हणजे मुंबई पुणे महामार्गावरून तळेगाव जवळ एक फाटा फुटतो.. त्याने आत जायचे.. थोडा अधिक वेळ लागतो.. पण बर्‍यापैकी सुरक्षित मार्ग आहे...त्याने येऊ.. यात कुणाला अडचण असण्याचा प्रश्न नव्हता..
एकदाची टूर निघाली... नेहेमीप्रमाणे अंताक्षरी.. मूकाभिनयाचे खेळ.. धम्माल चालली होती.. त्यात थोडासा वेगळेपणा होता.. मूकाभिनय सिनेमाच्या नावांचा किंवा गाण्यांच्या ओळींचा नाही. तर संगणक अभियांत्रिकी मधल्या शब्दांचा चालला होता.. जरा कल्पना करा.. discreet, deterministic, sockets.. नि अशा इतर शब्दांचा अभिनय कसा असेल??? :D

११:३० च्या सुमारास न्याहारी साठी थांबलो.. दोघी गुजराथी मुलीनी काही खाले नाही.. सिंधी मुलींचे काही नखरे नव्हते.. मराठी कार्ट्यानी वड्यांच्या वरचे फक्त आवरण खाल्ले.. देवा रे.. थोडी बुद्धी दे रे त्यांना!!! बाकी माळशिरस घाटात मजा आली.... आमच्याशिवाय तिथे कुणीच नव्हते.. रहदारी जवळजवळ नव्हती असेच म्हणा ना!!! नि मस्त गार हिरव्या दर्‍या नि डोंगर.. एक उंच सुळका होता.. त्यावर चढून फोटो काढण्याची स्पर्धा चालली होती... असेच दंगामस्तीत आधी जुन्नर नि नंतर नारायणगाव कधी आले कळालेच नाही.. नारायणगाव जरा खोडदहून मोठे गाव असावे नि तिथे हॉटेल वगैरे सोयी होत्या.. नि दुसर्‍या दिवशी तिथे पोचायला पण अधिक वेळ नाही लागला..

एकदाचे हाटिलात पोचलो.. बाकी हॉटेल अगदीच चांगले नाही नि अगदीच वाईट नाही या धर्तीचे होते.. वि. प्र. + मुलांसाठी एक मोठा लांबच लांब हॉल नि दोन दोन बेड वाल्या रूम्स... ७ मुली नि मी आठवी यासाठी दोन रूम्स अशा बुक केल्या होत्या.. पाठीमागे मोठी हिरवळ होती.. पुढे घसरगुंडी, झोपाळा,, सी-सॉ असे खेळ होते.. शाकाहारी-मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न मिळत होते.. नि तिथंच आमची गोची झाली.. :( सांगते लवकरच कशी ते.. आधी जरा हात-पाय धुवून ताजे तवाने तर होऊ द्या..!!! दोन खोल्यात चार चार अशी आम्ही विभागणी केली होती.. मी बाथरूम मध्ये असताना बाहेरून हाई-हुई चे आवाज यायला लागले..

"काय झालं??"...

"मॅम उंदीर"..

"उंदीरच ना.. मग एवढं ओरडायला काय झालं?? थांबा आले बाहेर मग पाहूयात "

बाहेर आले.. पाहते तो.. उंदीर कसला.. छोटं मुंगूस वाटत होता तो.. नि मस्त हुंदडत होता खोलीभर.. मुलीना ही-हुई करताना रागावलेली मी.. जोरात किंकाळी फोडून बिछान्यावर!! नि तो प्रचंड मोठा उंदीर..काय केले त्याने माहित आहे?? बाथरूमच्या बाहेर बेसिन होते.. त्याचा पाईप जिथून जमिनीत जातो.. तिथे एक दीड इंच व्यासाचे भोक होते.. त्या एवढुशा भोकातून आत गेला.. आवाज ऐकून आजूबाजूचे सगळे आमच्या खोलीत दाखल झाले.. तो उंदीर कधीही परत येणं शक्य होतं.. आम्ही चौघीही निदान आम्ही पाहिलेला उंदीर तिथून जाईपर्यंत तिथे राहणार नव्हतो.. नि दुसर्‍या खोल्यांमधून उंदीर नसेल याची काही गॅरंटी नव्हती..
मग एकतर त्याचा रस्ता रोखायला हवा होता.. वा त्याला घालवायला हवा होता.. एकेकाच्या डोक्यातून सुपीक कल्पना येऊ लागल्या..

नं १: "आपण त्या भोकात कागदाचे बोळे घालून ते बंद करूया "
[मी मनात: अरे संगणक शास्त्राचा विद्यार्थी ना रे तू.. तर्कशास्त्र कुठे गेलं तुझं??? ]
प्रकट: "अरे तो कागद कुरतुडून नाही का यायचा?"

नं २: "मग कागदाचे बोळे आत टाकून वर केराची टोपली पालथी घालूयात "
[मी मनात: अरे त्या धूडाला ती टोपली म्हणजे किस झाड कि पत्ती]
प्रकट: "त्याचा काही उपयोग नाही व्हायचा" :((

तोवर कुणीतरी सूज्ञपणे हॉटेलाच्या कर्मचार्‍याला बोलावून आणले होते.. त्याला या प्रकाराचे सवय असावी.. हातात झाडू नि केराची सुपली घेऊनच आला होता तो.. मी आता तो काय करतोय म्हणून त्याच्या पाठोपाठ.... [नको तिथे पुढे पुढे करण्याची सवय]. त्याने बेसिनचा नळ चालू केला.. त्या भोकातून थोडं पाणी आत जायचा अवकाश.. तो एवढा मोठा उंदीर.. त्या एवढुश्या भोकातून.. सुळळकन उडी मारून वरती आला.. ती उडी पडली नेमकी माझ्या पायावर.. होता नव्हता तेवढा जीव खाऊन किंचाळले.. जेव्हा भानावर आले.. मी पुन्हा एकदा बिछान्यावर होते.. बिचारे वि.प्र. डोकं हातात गच्च धरून बसले होते..मनात म्हणाले असतील.. कुठून दुर्बुद्धी सुंचली नि हिला घेउन आलो.. काही असो.. सुटलो एकदाचे त्या उंदराच्या तावडीतून... हुश्श!!

सोबत आणलेला खाऊ प्रवासात सगळ्यानी संपवला होता त्यामुळे दुपारी जेवण असं घेतलं नव्हते.. रात्रीचं जेवण थोडं लवकर घ्यावं हा त्यावरचा तोडगा होता.. दुपारी न जेवल्याने भूक सपाटून लागली होती.. तेवढ्यात आमच्या गुजराती भगिनींनी या हॉटेलात खाणार नाही असे जाहीर केले.. कच्छी मुलीने भरपूर फळे आणली होती.. त्यामुळे तिचा प्रश्न नव्हता.. पण दुसरीचं काय? तिचे पाहता आणखी काही मुलंही तेच म्हणू लागली.. त्या सगळ्यांच्या घरून जिथे मांसाहार शिजवला जातो तिथे काहीही खाण्याची परवानगी नव्हती.. तसं ते adjust करायला तयार होते.. पण जर पर्याय असेल, तर त्यांचीही इच्छा शाकाहारी हॉटेलात जायची होती.. आता घ्या..!!! मीही शुद्ध शाकाहारी.. एकदा केकमध्ये घालण्यासाठी अंडे आणायचे म्हटले तरी आजीने चले जाव चे फर्मान सोडले होते.. पण मी ही आता मासांहार करणाऱ्याच्या शेजारी (समोर नाही) बसून जेवू शकेन या स्टेजला आलेय.. !! बरे या लोकांचे असे नखरे होतेच, तर घरून काही खाऊ घेऊन येतील की नाही?? खरंतर असा अनुभव फक्त याच सहलीत आला.. नाहीतर प्रत्येक सहलीत आम्ही सगळेजण स्थिरस्थावर झाले कि एक कार्यक्रम करतो.. गुज्जू लोकांनी आणलेले खाकरे नि ठेपले मोजण्याचा.. २००० च्या वरती आकडा गेला कि थांबतो..(वरचे सोडून देतो..) या सहलीत तशी विद्यार्थी संख्या ही कमी होती.. नि बहुतेक लोक मराठी किंवा सिंधी होते.. त्यामुळेही असा घरचा खाऊ नव्हता..

काही इलाज नव्हता.. या एका बाईसाहेबांनी सकाळपासून काही धड खाल्लं नव्हतं.. .. जर जातोच आहे शाकाहारी हॉटेलात तर चला म्हणून एरवी जे आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणी जेवले असते,तेही आमच्या सोबत निघाले.. १५-२० जण मात्र तिथेच थांबले.. एकावर जबाबदारी सोपवून निघालो पायपीट करत. २०-२५ मिनिटे चालल्यावर रस्त्याच्या कडेलाच एक शुद्ध शाकाहारी हॉटेल मदतीला धावून आलं.. मी, दोन गुजराती मुली नि विप्र एका टेबलावर होतो.. एकदाचं टेबलावर जेवण आले.. मी कोशिंबीर वाढायला घेतली.. हि बया...

"काय आहे? रायतं?? नको.. नाहीतर द्या एक चमचा.. नको नको... अर्धाच द्या"

[मी मनात: "काय चाललेय?? सकाळपासून हिने कुणी काही द्यायला गेले.. कि अर्धंच बिस्कीट घे.. अर्धंच वेफर घे असले प्रकार केले होते.. वरती भुकेल्या पोटी इतकं चालवून जर अर्धाच चमचा कोशिंबीर खायची होती.. तर यायचंच कशाला??" ]

थोडक्यात स्फोट व्हायला आला होता.. पण वेळीच विप्र नि मध्यस्थी केल्याने पुढचा प्रेमळ(!) प्रसंग टळला..

पोटोबा शांत झाल्याने परतीची शतपावली छान झाली.. आम्ही पोचेतोवर हॉटेलात थांबलेल्या लोकांनी संध्याकाळच्या खेळांची तयारी करून ठेवली होती.. तोवर कुणाच्या तरी घरून फोन आला.. नि कळलं कि आज कोजागिरी आहे... मग काय.. सगळे फुल्टू तयारीत.. मागच्या हिरवळीवर मोठ्ठा गोल करून बसलो..गाणी.. जोक्स.. खूप झालं.... नि गाडी आली भुताखेतांच्या गप्पावर.. मग काय विचारता.. पहाटे ४ वाजेपर्यंत कोकणातल्या गजाली... वसतीगृहातले किस्से.. स्मशानातल्या कथा.. काही ऐकलेल्या.. काही अनुभवलेल्या.. काही तार्किक-अतार्किक अनुभव... खंड नव्हता गप्पांना... दुसर्‍या दिवशी दिवसभर पुन्हा लवकर उठून निघायचं होतं.. त्यामुळे अक्षरश: मनात नसताना झोपायला गेलो... (उंदीर आला तर पळून जायच्या तयारीत थोडंसं सजगच झोपलो :) )

[अवांतर: सहल पूर्णत: मुलांनीच आयोजित केली होती.. आम्ही फक्त सोबत म्हणून जात होतो.. नेहेमी नि बर्‍याच ठिकाणी असं होतं.. की सोबत येणार्‍या शिक्षक-शिक्षिकेचा खर्च सहलीच्या खर्चातून काढला जातो.. आम्ही यावर्षीपासून तो अलिखित नियम मोडून काढला.. सगळेचजण enjoy करतात.. मग उगाच तो भार मुलांवर का??

बाकी माझी खूप इच्छा आहे कि त्या विशिष्ट मुलीने हा लेख वाचावा.. कळेलच तिला की हा तिच्यावरच आहे... आपल्या आडमुठेपणामुळे इतरांना कसा त्रास होतो हे तिला एकदा कळावयास हवे.. नि काही ठिकाणी स्थळकाळाप्रमाणे स्वतःच्या मनाला/मताला मुरड घालायची असते हेही कळेल.. आमचा विद्यार्थी वर्ग वयाने मोठा असल्याने आम्ही सल्ले वेळ्प्रसंग पाहून नि खूप क्वचित देतो. या मुलीच्या संदर्भात हा योग कधी नाही आला]

प्रवासप्रकटनअनुभवप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

2 Jun 2009 - 11:24 pm | छोटा डॉन

पहिला भाग मजेशीर आहे, आधीच डिक्लेर केल्याप्रमाणे ही वातावरणनिर्मीती असल्याने दुसर्‍या भागाची उत्कंठा वाढत आहे.
वाट पहातो आहे, लवकर येऊद्यात ...

लिखाणात मज्जा आहे बॉ तुमच्या, शैली मजेशीर आणि साधीसरळ आहे.
पुलेशु.

------
(उंदराच्या बापाला न घाबरणारा)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अनामिक's picture

3 Jun 2009 - 2:06 am | अनामिक

छान जमलाय भाग... पुढचा भाग लवकर येऊ द्या...

-अनामिक

स्वामि's picture

2 Jun 2009 - 11:25 pm | स्वामि

पुढच्या भागाची उत्सुकता लवकर संपवा.कायम छान लिहीता. :)

तुम्हा लोकांच्या एकमेकांना दिलेल्या प्रतिसादामुळेच लिहिण्याचा विचार केला.. नि मला दिलेल्या प्रतिसादामुळे आणखी लिहावंसं वाटलं.... :)
त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद...

नि लेखनशैली कसली घेऊन बसलात डोंबलाची..??? जशी रोजच्या आयुष्यात बोलते.. तसंच लिहिते.. त्यालाच लेखनशैली म्हणत असतील तर माहित नाही ब्वॉ!!! ;)

(साधी नि जिलेबीसारखी अगदी सरळ) :D मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2009 - 9:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> जशी रोजच्या आयुष्यात बोलते.. तसंच लिहिते.. त्यालाच लेखनशैली म्हणत असतील तर माहित नाही ब्वॉ!!! <<
म्हणूनच तर वाचायला मजा येत आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

>> ... तेव्हा भ्रमणध्वनी बोकाळले नव्हते ... <<
गेले ते दिन गेले! (हे माझ्या नव्या कथनाचं नाव असेल, 'एका रेडीओ ऍस्ट्रॉनॉमरची व्यथा: गेले ते दिन गेले')

बाय द वे, तपशीलात काही चुका आहेत. हे जे टी.आय.एफ.आर.चं केंद्र आहे ना, जी.एम.आर.टी. तिथे १३ नाही ३० दुर्बिणी आहेत. माळशिरसचा घाट नाही तो माळशेजचा घाट. पावसाळ्यात अतिशय सुंदर ट्रेक होतो तिकडे. पुढच्या वेळेस तिकडे जाणार असलात तर शेताँ इंदाजला जा जेवायला. अतिशय सुंदर वाईन्सही मिळतात तिथे!

मस्त कलंदर's picture

3 Jun 2009 - 9:47 am | मस्त कलंदर

माळशेजचा घाट.. बाकी दुर्बिणींच्या आकड्याबद्द्ल बोलयचं तर त्यावेळी नुकतीच वर्तमानपत्रात बातमी आली होती.. १३ शक्तिशाली दुर्बिणी म्हणून.. नि ते मराठी कात्रण तिथे लावलंही होतं.. किंवा माझ्या मनात १३ हा आकडा राहून गेला असेल.. माहित नाही.. :(

बाकी खव वर बोलू..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

Nile's picture

3 Jun 2009 - 10:01 am | Nile

अगदी खरंय!

काय मजा यायची पुर्वी वर्गात झुरळ वगैरे आल्यावर. गेले ते दिन गेले! :(

भुताची वाट पाहतोय, आपलं पुढच्या भागाची! ;)

चकली's picture

3 Jun 2009 - 1:12 am | चकली

पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
चकली
http://chakali.blogspot.com

टुकुल's picture

3 Jun 2009 - 1:15 am | टुकुल

मस्त लिहिल आहे... पुढचा भाग येवुद्या लवकर..

--टुकुल.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jun 2009 - 1:18 am | बिपिन कार्यकर्ते

उत्सुकता वाढलेली आहे. देव करो आणि तुम्हाला टंकनोत्साह लाभो. पुढचा भाग लवकर येवो. (नाहीतर असा अजून एखादा प्रसंग तुमच्यावर येवो असा शाप देऊ). लेखनाला छान वेग आहे.

अवांतर: तुमच्या बरोबर 'वि.प्र.' होते हे वाचले आणि सगळ्या मुलांची एकदम काळजी वाटली. पण नंतर कळले की विभागप्रमुखचा शॉर्टफॉर्म आहे तो. काळजी मिटली. ;)

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

3 Jun 2009 - 1:54 am | मस्त कलंदर

नाहीतर असा अजून एखादा प्रसंग तुमच्यावर येवो असा शाप देऊ

बिका... नका हो असे कठोर होऊ.. झाला प्रसंग मलाच काय.. मेले तर माझ्या भुताला पण लक्षात राहिल.. तेव्हा प्लीज.. दया करा.. काय काय म्हणून लक्षात ठेवेल हो बिच्चारं माझं भूत???
नि तुमचं पाहून इतरांनीही शापवाणी उच्चारायला सुरुवात केली तर ?????

बिका काका मला वाचवा...(नारायणगावच्या गारद्यांपासून)..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

नंदन's picture

3 Jun 2009 - 1:34 am | नंदन

ह्या भागात वातावरणनिर्मिती छान झाली आहे, पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

संदीप चित्रे's picture

3 Jun 2009 - 1:49 am | संदीप चित्रे

पुढचा भाग लवकर टाका

अनिल हटेला's picture

3 Jun 2009 - 8:30 pm | अनिल हटेला

वेटींग............................................:?

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

रेवती's picture

3 Jun 2009 - 7:13 am | रेवती

हा भाग ग्रेट जमलाय.
'उंदीर' असं वाचल्यावर मनातल्यामनात मी पळून गेले. ;)
भूत दिसलं (म्हणजे ते ही दिसू नयेच;)) तर एका जागेवर बसून रामनाम (सुचलं तर) घेत बसलं तरी चालत असावं;
पण उंदीर आला म्हणजे पळावं लागतं. तिथं राम राम म्हणत बसलं तरी काय होणार? तिथे तर उंदीरही राम राम म्हणत असायचा.;)

अहो मस्त कलंदर, लवकर टाका हो दुसरा भाग्.......प्लीज.
प्रसंग घडून गेलाय म्हणजे कच्चा माल तयार आहे.
तो माल निवडायचे कष्टं असतात ते अमान्य करत नाहीये....
पण आता उत्सुकता फारच ताणली गेलीये.

रेवती

प्राजु's picture

3 Jun 2009 - 8:18 am | प्राजु

मस्तच!
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निखिल देशपांडे's picture

3 Jun 2009 - 9:49 am | निखिल देशपांडे

वातावरण निर्मिती मस्त्च झाली आहे.... पुढचा भाग लवकर टाका हो

==निखिल

वर्षा's picture

3 Jun 2009 - 10:07 am | वर्षा

मस्त! लवकर पुढचा भाग टाका प्लीज

सुमीत's picture

3 Jun 2009 - 10:34 am | सुमीत

वातावरण निर्मिती उत्तम जमली आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jun 2009 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार

सुरुवार तर झकास झाली आहे , पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
खरेतर पुढचा भाग पटकन टाका म्हणणर होतो पण त्यातला धोका लक्षात आल्याने थांबलो ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

3 Jun 2009 - 11:09 am | स्वाती दिनेश

वावा, वातावरण निर्मिती खासच झालेली आहे, पुढचे भाग येऊ देत लवकर..
स्वाती

श्रावण मोडक's picture

3 Jun 2009 - 4:27 pm | श्रावण मोडक

की हा भाग वाचलाय, आवडलाय हे नक्की. पुढचा भाग विचारायचा कसा जिलबीसारख्या सरळ माणसाला? त्यापेक्षा बिका फॉर्म्यूलाच बरा असं वाटणार. :)