नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.
(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल. टेलिस्कोपिक फोटोज इथे बघता येतील.)
८ मार्चची दुपार! गिरीशचा महाकाय ८ इंची टेलिस्कोप, माझा ४.५ इंची टेलिस्कोप, बायनॅक्युलर व इतर साहित्य, आम्ही दोघं आणि उरलेल्या जागेत माझी लेक अद्विका अर्थात् अदू असे आम्ही पुण्यातून निघालो! ह्या सत्राचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माझी लेक आणि जवळचेही काही मुलं सोबत आहेत! पुणे मागे पडलं तसा हळु हळु सह्याद्री सुरू झाला! पर्वतांची दूरवर पसरलेली रांग! बघत राहावं असं नितळ निळं आकाश! रात्री किती सुंदर आकाश बघायला मिळेल ह्याची कल्पना देणारं निळं आकाश! तिकोना किल्ल्याच्या आसमंतात हडशी तलावावर काही क्षण थांबून जवनमार्गे अंजनवेलला पोहचलो. इथला सगळा आसमंत झपाटून टाकणारा आहे.
सगळे टेलिस्कोप सेट केले; सगळी व्यवस्था केली आणि अंधार होण्याच्या आधी अंजनवेल परिसराचा आनंद घेतला. अंजनवेल! इथे इतक्या काही गोष्टी आहेत की, तीन- चार वेळेस नीट फिरेपर्यंत त्या कळतच नाहीत! शिवाय इथे सतत नवीन गोष्टी सुरू आहेत. स्विमिंग पूल तयार होतोय. मुलांसाठी झिपलाईनचा थरार सुरू झालाय. कुंभारकामाचं प्रात्यक्षिकही इथे घेता येतं. नेमबाजीचा आनंद घेता येतो. हिरवळीवर खेळता येतं. पावसाळ्यात ओढा व रांजणखळगे आहेत. शिवाय इथला सगळा परिसर! असो! कार्यक्रमासाठी येणार्या लोकांच्या भेटी झाल्या. नवीन लोकांच्या ओळखी झाल्या. त्यापैकीच एक भारतमाता वस्तु संग्रहालय चालवणारे सांगलीच्या तासगांवचे ७५ वर्षांचे तरूण कुट्टे काका आहेत. त्यांचा उत्साह किती आहे हे हळु हळु कळत गेलं! त्यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव श्री. प्रमोदजींनी घेतलेली दुर्बीणही बघायला मिळाली!
अंधार पडण्याआधी सगळ्या मंडळींसोबत थोड्या गप्पा झाल्या. मुलांशी बोलणं झालं. आपण काय काय बघणार आहोत, कसं बघायचं आहे हे सांगितलं. आणि अंधार पडता पडता शुक्राच्या कोरीने जणू रोहीत शर्मासारखा स्टार्ट दिला! ह्या दिवशी शुक्र अतिशय मोठा म्हणजे सुमारे ५८ कोनीय सेकंदांचा दिसतोय! तो सूर्य व पृथ्वीच्या मधोमध आहे व लवकरच सूर्याच्या पूर्वेला जाणार आहे आणि म्हणून लवकरच संध्याकाळी पश्चिम क्षितिजावरून दिसेनासा होईल आणि एप्रिलच्या सुरूवातीपासून पहाटे दिसायला लागेल. त्यामुळे त्याचं बिंब मोठं असलं तरी त्याची बारीक कोर दिसते. अगदी १०% प्रकाशित असलेला शुक्र! त्याचं बिंब खूप मोठं असल्यामुळे चक्क माझ्या १५ X ७० बायनॅक्युलरनेही त्याची कोर स्पष्ट दिसतेय!
बायनॅक्युलर, माझा स्टारट्रॅकरचा ११४ मिमी टेबलटॉप रिफ्लेक्टर टेलिस्कोप आणि गिरीशचा महाकाय २०३ मिमी डॉब्सोनियन रिफ्लेक्टर टेलिस्कोप ह्यांच्यासोबत सत्र सुरू झालं! शुक्राची कोर अप्रतिम दिसली. सगळ्यांना वाटत होतं चंद्राची कोरच आहे. शुक्राच्या थोडासाच पश्चिम- दक्षिणेला बूध होता. तो बायनॅक्युलरमधून बघितला. नंतर अंधार पडल्यावरही बूध डोळ्यांनी दिसला नाही. पण बायनॅक्युलरमधून बघता आला व आर्कीमिडीज ह्या शास्त्रज्ञाला न जमलेली गोष्ट सगळ्यांनी केली. आर्कीमिडीजला बूध बघण्याची खूप इच्छा होती, पण ती पूर्ण झाली नाही. सूर्याच्या जवळच असल्यामुळे आकाशात बूध सूर्यापासून फार जास्त लांब जात नाही व वर्षातून काही आठवडेच तो कधी संध्याकाळी तर कधी पहाटे बघता येतो. अंतर्ग्रह असल्यामुळे बूध व शुक्र चंद्रासारख्या कला (phases) दाखवतात.
शुक्र व्यवस्थित बघून होईपर्यंत पूर्ण अंधार पडला आणि आकाशात टिपूस चांदणं पसरलं! पॉईंटरच्या मदतीने मुख्य तारे, नक्षत्र व इतर तारकासमूह बघितले. नक्षत्र म्हणजे सूर्य- चंद्र व ग्रह- तार्यांच्या आकाशातील भ्रमणमार्गाचे केलेले २७ भाग व त्याच मार्गाचे केलेले १२ भाग म्हणजे राशी. हे चंद्र- सूर्य व ग्रहांच्या भ्रमणमार्गावरचे तारकासमूह (Constellations) असतात. आणि सप्तर्षी, ध्रुवमत्स्य, शर्मिष्ठा हे भ्रमणमार्गापासून लांब असल्याने नक्षत्र म्हणून नाही तर फक्त तारकासमूह म्हणून ओळखले जातात. शुक्रानंतर टेलिस्कोपद्वारे गुरूचे उपग्रह बघितले. ह्यावेळी खरं तर युरोपा उपग्रहाची सावली गुरूवर पडली आहे. पण ती नीटशी दिसली नाही. आणि मोठा ग्रूप असल्यामुळे मोठ्या टेलिस्कोपची सर्वाधिक विवर्धन क्षमता (Magnification power) वापरून बघता आलं नाही. पण गुरूचं मोठं बिंब, गुरूच्या वायुमंडळातले पट्टे, त्याच्या समोर किंवा मागे असल्यामुळे न दिसणारे उपग्रह आणि नंतर त्यांची बदलेली स्थिती हे बघता आलं. गुरूनंतर १३०० प्रकाशवर्षं अंतरावरचा मृगातला तेजोमेघ- Orion Nebula बघितला. मग ४०० प्रकाशवर्षं अंतरावरचं कृत्तिका नक्षत्र- Pleiades cluster बघितलं. मोठ्या दुर्बिणीतून तांबूस मंगळ, त्याच्या पृष्ठभागावरच्या खुणा व ध्रुवीय बर्फ टोपीही दिसली. हे सगळं सुरू असताना मुलांचे सतत सुरू असणारे प्रश्न! एका मुलाचं नावच अंतरिक्ष आहे! त्यामुळे प्रश्नही तितक्याच उंचीचे!
पण हे होईपर्यंत वाजले ७.५८! सर्व जण काही क्षण थांबले आणि दक्षिण दिशेला नजर करून उभे राहिले! आणि शुक्रापेक्षाही ठळक असं ISS- अंतराळ स्थानक दक्षिणेकडून वर आलं! जसं जसं ते वर आलं तसं अजून चमकायला लागलं! सगळ्यांनी हा सोहळा अनुभवला! अनेकांनी टाळ्या वाजवून दाद दिली! व्याध तार्याला जवळ जवळ स्पर्श करून ते वर गेलं आणि पृथ्वीच्या सावलीत शिरल्यामुळे अंधुक होत दिसेनासं झालं! पण दिसेनासं होण्यापूर्वी किंचित लालसरही दिसलं! कारण पृथ्वीच्या सावलीत जाण्याआधी त्यावर वातावरणातून पसरल्यामुळे लाल झालेला सूर्याचा प्रकाशही पडला होता! मंगळाच्या बाजूला व आता जवळ जवळ डोक्यावर आलेल्या चंद्राचं अनेक प्रकारे निरीक्षण केलं. अतिशय विलोभनीय! त्यानंतर कृत्तिकेच्या मदतीने ठळक व अंधूक तार्यांच्या मदतीने रस्ता शोधून युरेनस ग्रहही बघितला! तोपर्यंत पहिल्या ब्रेकची- भोजनाची वेळ झाली!
भोजनानंतरच्या सत्रामध्ये व्याधाच्या (Sirius) जवळचा तारकागुच्छ- M41, मघा (Regulus) व त्याचा अंधुक जोडतारा, सप्तर्षीमधला जोडतारा वसिष्ठ (Zeta Ursa Majoris) आणि बाजूला असलेला अंधुक अरुंधतीचा तारा, पुनर्वसूजवळचा सुंदर तारकागुच्छ- पुष्य नक्षत्र अर्थात् Beehive cluster M44 असे ऑब्जेक्टस बघितले. गुरूच्या उपग्रहांची बदललेली स्थितीही बघितली. पूर्वेकडून वर आलेले नवीन तारकासमूह पॉईंटरने बघितले. अगस्त्य (Canopus) तार्याच्या जवळ असलेला गॅमा वेलोरम जोडताराही बघितला. मोठ्या दुर्बिणीतून तर त्याचे अजून दोन अंधुक बायनरी तारे दिसले. बायनॅक्युलरने कृत्तिका नक्षत्र व तांबूस- लाल राक्षसी तारा असलेल्या रोहिणीजवळचा परिसर बघितला! मोठे टेलिस्कोप असूनही बायनॅक्युलरची मजा वेगळीच! त्याशिवाय बायनॅक्युलरने आकाशात मनसोक्त संचार करून अनेक तारकागुच्छ- जोडतार्यांचा आस्वाद घेता आला. हाच आस्वाद आणखी छान घेता यावा म्हणून अंजनवेलच्या राहुलदादाने तीन खाटांची व्यवस्था करून दिली! शिवाय आकाश दर्शनाच्या वेळी जवळचे सर्व दिवे बंद असतील, ह्याचीही काळजी घेतली!
आकाश बघता बघता संध्याकाळी पूर्वेला निंबोणीच्या झाडामागे लपलेला चांदोबाही पश्चिमेकडे कलला! प्रकाशाची पखरण करून अखेर तेजस्वी गुरूनेही निरोप घेतला. हळु हळु थंडीचं राज्य सुरू झालं! पहाटे लवकर उठायचं ठरवून मंडळी पांगली. पहाटेही ISS परत दिसणार आहे! काही काळ मी व गिरीशने आकाश निरीक्षण केलं. सप्तर्षी तारकासमूहाजवळ असलेली M81 आकाशगंगा प्रयत्न करून दुर्बिणीत सापडली. मन भरलं नाही पण डोळे दमले. त्यामुळे काही तास आडवे होऊन पहाटे उठायचं ठरवून मचाणावर लावलेल्या टेंटमध्ये जाऊन आडवे झालो. मचाणावरचा टेंट! बाजूला ओढा! सगळीकडे झपाटलेला आसमंत! पण रात्रीची शांतता! अधून मधून कुत्र्यांचं भुंकणं! आणि अर्थातच वाढत जाणारी थंडी!
रात्री झोप काही लागली नाही! मध्यरात्री माझी लेक बाजूच्या टेंटमधून माझ्या टेंटमध्ये आली. कुत्र्यांचं भुंकणं सुरू राहिलं. अखेर पहाटे साडेतीनला उठून आवरलं! बाहेर आकाशात किती चांदणं पसरलंय, ह्याचा अंदाज आला. चार वाजता गिरीशलाही उठवलं आणि टेलिस्कोपकडे जायला निघालो! आमचं बोलणं ऐकून लेक अदूही उठली! मला ५ ला उठवा, ४.३० ला उठवा, नको मी आताच तुमच्यासोबत येते म्हणून तीही आली! आणि इतक्या थंडीत व इतक्या पहाटे तिनेही हा खजिना लुटला!
टेलिस्कोपजवळच्या जागेत येऊन बघितलं तर बघावं तिथे तारेच तारे! दक्षिणेला पूर्ण तळपणारी वृश्चिक रास- अनुराधा, ज्येष्ठा व मूळ नक्षत्र! दक्षिणेला नरतुरंग तारकासमूह (Centaurus)! तार्यांचा अक्षरश: टिपूस! टेलिस्कोपच्याही आधी मोबाईलने थोडे फोटो घेतले! नरतुरंगमधला भव्य तारकागुच्छ ओमेगा सेंटारी जवळ जवळ डोळ्यांनी दिसतोय! टेलिस्कोप व बायनॅक्युलरने त्याचं अवाक् करणारं दृश्य! 17000 प्रकाशवर्षं अंतरावरचा हा तारकागुच्छ! एका आकाशगंगेचा तुटलेला भाग असावा असं म्हणतात. पहाटेची मैफील सुरू झाली. त्यामध्ये मग शौरी तारकासमूहातलं Hercules Great cluster M13, M92 आणि नंतर मूळ नक्षत्र वर आलं तसं तारकागुच्छांची मांदियाळी प्रकटली! M7, M6, M24, NGC 6231, लगून नेब्युला आणि अनेक तारकागुच्छ बघितले! मोठ्या टेलिस्कोपच्या फाइंडरोस्कोपनेच असंख्य तारे प्रत्येक वेळी दिसत आहेत, इतकं आकाश सुंदर आहे! हळु हळु आपल्या मंदाकिनी आकाशगंगेचा दुधाळ पट्टाही दिसायला लागला! ५ वाजल्यानंतर हळु हळु मंडळी येत आहेत. मुद्दाम फोन करून पल्लवीताई व आलाप- स्वरदाला बोलावलं. खजिन्याची ही लूट मिस व्हायला नको ना! शहा सरांनी त्यांच्या कॅमेराने आकाशगंगेचे फोटो घेतले! ७५ वर्षांचे तरूण कुट्टे काकाही उत्साहाने बघत आहेत! पहाटेचे नक्षत्र व तारकासमूह पॉईंटरने दाखवले! अनेक जणांना तुटता तारा- अर्थात् उल्काही दिसल्या! मानव निर्मित उपग्रहही दिसले. आणि परत ५.५१ ला अंतराळ स्थानक दिसलं. ह्यावेळी ते सहा मिनिट दिसलं. उत्तर क्षितिजावरून प्रकाशित झालं आणि सप्तर्षीचे पहिले तारे, श्रवण नक्षत्र परिसर असं जात उत्तराषाढा नक्षत्रापर्यंत दिसलं. नंतर ते क्षितिजाच्या जवळ दिसेनासं झालं.
अनुराधा जोडतारा, निळे व पिवळे तारे असलेला अल्बिरो जोडतारा, 36 प्रकाशवर्षं अंतरावरचा चमकणारा स्वाती (Arcturus) तारा असे ऑब्जेक्टस नंतर दुर्बिणीतून बघितले. उन्हाळा जवळ येत असल्यामुळे पूर्वेला लवकरच लाली आली! एक एक अंधुक तार्यांनी निरोप घ्यायला सुरूवात केली! मग ज्येष्ठा, अनुराधा, श्रवण, डेनेब, चित्रा असे तारेही निघाले! तेजस्वी स्वाती आणि अभिजीत मात्र बराच वेळ तग धरून होते! आणि नंतर मात्र उजाडलं आणि एका विलक्षण खजिन्याच्या लुटीचा शेवट झाला!
काही वेळ आराम केला. अंजनवेलमधली प्रसन्न सकाळ अनुभवत चहापान झालं. अंजनवेलच्या अमोलदादांसोबत जवळच्या डोंगरावर एक सुंदर ट्रेक केला! तिथे सगळे जण थोडा वेळ ध्यानासाठी बसले. वस्तुत: इतक्या सुंदर परिसरात व आल्हाददायक निसर्गात आपोआप ध्यान होतंच! शिवाय आकाश दर्शन करतानाही एक प्रकारे ध्यान होतंच. आपण किती छोटे आहोत, ह्या मोठ्या विश्वात किती व कोण आहोत! आणि आपण जे स्वत:ला समजतो- आपण म्हणजे कोणी मोठे किंवा सगळ्यांत मोठं दु:ख माझंच- ह्याची वेगळी समज आकाश बघताना येते. त्यामुळे तसं ध्यान इथे आपोआप होतंच. त्याला फक्त रिलॅक्स करणार्या संगीताची व अगदी थोड्या सूचनांची जोड दिली. २५ मिनिटांचं ध्यानाचं सत्र झालं. त्याबरोबर अतिशय सुंदर परिसर व दूरवरचे डोंगर दाखवणारा ट्रेकही झाला! अद्विका, आलाप, स्वरदा, राज्ञी अशा मुलांनीही त्याचा आनंद घेतला.
आता वेळ झाली शेवटच्या सत्राची! अर्थात् सूर्य निरीक्षण! फिल्टर लावून दोन्ही टेलिस्कोपमधून सूर्याचं कोवळं रूप बघता आलं! इतका प्रचंड सूर्य, पण अजिबात प्रखर नाही! संत्र्यासारखा सौम्य सूर्य आणि त्याच्यावरचे अनेक काळे डाग! पण हे डाग आपल्या पृथ्वीहून मात्र मोठे! कारण आपली पृथ्वी खूप छोटी! सूर्याचं हे कोवळं रूप बघताना नेहमी ज्ञानेश्वरीतली ती ओळ आठवते-
चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहिन!
अशी ही तार्यांची मांदियाळी अखेरीस मार्तंड जे तापहिन पर्यंत आली! असा सोहळा रंगला आणि शेवटी सुखिया जाला!
अंजनवेल हे Weekend spent well तर आहेच, पण दर वेळी ते नवीनही आहे! येत्या २२ मार्चलाही तिथे आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. आपल्या माहितीत पुण्या- मुंबईचे कोणी उत्सुक असतील तर त्यांना कळवू शकता. धन्यवाद!
(निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. वृत्तांत लिहीण्याचा दिनांक: 12 मार्च2025)
प्रतिक्रिया
13 Mar 2025 - 10:53 am | प्रसाद गोडबोले
उत्तम लेखन !
आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे .
लिहित रहा .
पुलेशू