वावटळ

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
12 Dec 2024 - 7:03 pm

पुस्तक_परिचय: वावटळ
लेखक: व्यंकटेश माडगूळकर

जानेवारी २०२४ मध्ये मिपावर व्यंकटेश माडगूळकर यांच्या करुणाष्टक कादंबरीबद्दल लिहले त्यावेळी @मिसळपाव यांनी मला माडगूळकरांची वावटळ कादंबरी वाचण्यासाठी सुचवले होते. त्यानंतर ३-४ महिन्यांनी मी वावटळ वाचून काढली. कादंबरी वाचली त्याच रात्री या लेखातील काही भाग टंकून ठेवला होता आज जवळजवळ सहा महिन्यानंतर तो संपादित करण्याचा योग जुळून आला.
______________________________________________

३१ जानेवारी १९४८ चा दिवस. नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने पिस्तुलाने गोळ्या झाडून महात्मा गांधीजींची हत्या केली. ही बातमी वाऱ्यासारखी भारतभर पसरली व संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. नथुराम गोडसे हा जातीने ब्राम्हण. त्यामुळे ब्राह्मण समाजाविरोधात वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्राच्या विविध भागांत या घटनेचे पडसाद उमटले.

याच दरम्यान पुण्यात राहणारे शंकर, यशवंत व गोपू हे तीन ब्राह्मण तरुण आपल्या गावाकडे जायला निघतात. गावाकडे जाताना ते आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. कारण, ठिकठिकाणी दंगली सुरू झाल्या होत्या, ब्राह्मणांची घरे जाळली जात होती.. आगीचे डोंब उसळत होते. आपण ब्राह्मण आहोत हे कळलं तर आपल्या जिवाचं बर वाईट होऊ शकतं ही भीती त्यांना वाटत असते. त्याचबरोबर आपल्या गावी काय परिस्थिती असेल? लोकांनी आपल्याही घरांची जाळपोळ केली असेल काय? आपल्या आई वडिलांच्या व कुटुंबाच्या काळजीने ते अजूनच भयभीत होतात. आपल्या गावातील लोक समजुतदार आहेत, आपल्याइथे अश्या घटना घडणार नाहीत असंही एक मन विचार करत असतं.

वाटेत येणाऱ्या अनेक अडथळ्यांतून मार्ग काढत ते आपल्या गावी पोहचतात. गावी जाऊन पाहतात तर त्यांची सगळी भीती समोर उभी असते. कादंबरीचा नायक असलेल्या शंकरचं गावाकडचं राहतं घर पूर्णपणे जळून खाक झालेलं असतं, त्याच्या मित्राचे व आजूबाजूची घरं सुद्धा जळालेली असतात. लोकांची घरे जाळण्याएवढी हिम्मत झालीच कशी असा प्रश्न इथे वाचणाऱ्याला पडतो. आयुष्यभर कोणाचंच काही वाईट केलं नव्हतं तरीसुद्धा सर्वकाही गमवावं लागलं. ओळखीचे लोकसुद्धा घरात घुसून लुटमार करीत होते.

या परिस्थितीचे वर्णन करताना व्यंकटेश माडगूळकर लिहितात,

"आपल्या घरांना लागून असलेली घरे, अडीनडीला आपली मदत घेणारी, आपल्याला मदत करणारी, आपल्याच गावातील माणसे शत्रू होतील असे त्यांना कधीच वाटले नव्हते. त्यांच्यापासून आपल्याला धोका आहे ही जाणीव त्यांना आज पहिल्याप्रथम होत होती. हा धक्का अगदी अनपेक्षित होता. त्याने ही मंडळी मुळापासून कलली होती. कधी नव्हे ते त्यांना वाटत होते की, आपण अनाथ आहोत. आपले असे म्हणायला कोणी नाही. आता कशाची शाश्वती नाही. केव्हा काय होईल त्याचा नेम नाही!"

PO
जाळपोळ करण्यासाठी शेजारच्या गावातील लोक येत आहेत याची कुणकुण जेव्हा लागते तेव्हा काही लोक आपल्या घरातील दागिने व इतर मौल्यवान वस्तू आडात फेकून देतात. या दरम्यान काही सकारात्मक गोष्टी सुद्धा घडतात, जेव्हा घराला आग लागेलेली असते तेव्हा गावातील श्रीपती रामोशी लेखकाच्या घरातील देव आगीत शिरून बाहेर काढतो व आपल्या खोपटात नेउन ठेवतो.. घर जळल्यानंतर गावातील एक पाटील कुटुंब शंकरच्या कुटुंबाला आपल्या वाड्यात आसरा देते.

कादंबरीमध्ये भरपूर प्रसंग आहेत. त्यामाध्यमातून लेखकाने संपूर्ण घटनेचे व परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर एकंदरीत परिस्थिती काय होती हे तुम्हाला कळेल. कादंबरी वाचल्यानंतर काहीकाळ मन सुन्न होत, त्यातील काही प्रसंग तर हृदय पिळवटून टाकतात.
______________________________________________

हिंसा मग ती कोणत्याही प्रकारची असो, कोणत्याही कारणासाठी केलेली असो तिचं समर्थन कधीच करता येणार नाही..

एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाज दोषी ठरवला जातो ही भारतासारख्या देशातील खरी शोकांतिका आहे.!

आयुष्यभर अहिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्या गांधीजींच्या तत्त्वांचा हा पराभव होता का? हा प्रश्न कादंबरी वाचत असताना पडतो.

या घटनेबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा त्यावेळच्या परिस्थितीची माहिती करून घ्यायची असेल तर हे पुस्तक जरूर वाचा आणि माझे हे माहितीपर उत्तर तुम्हाला कसे वाटले याबदल प्रतिसाद स्वरूपात नक्की कळवा. आणखी पुस्तकांबद्दल माहिती हवी असल्यास माझ्या प्रोफाइलला भेट द्या.
धन्यवाद..!! 🙏🙏

कथाविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2024 - 9:37 pm | श्रीगुरुजी

वाचलंय हे पुस्तक. नथुराम गोडसे निमित्त करून काही जणांनी ब्राह्मणांवर आपला राग काढला. घरे जाळली, काही काळाने कूळकायदा आणून शेतजमिनी बळकावल्या, राखीव जागांमुळै संधी कमी झाली . . .

पण हे सर्व इष्टापत्ती ठरले. ब्राह्मण शहरात आली, शेती गेल्याने शिक्षण, पौरोहित्य व नोकरी यावर भर दिला. राजकारणातून काढता पाय घेतला. कुटुंबाची शैक्षणिक व आर्थिक प्रगतीवर भर दिला. कालांतराने पौरोहित्य बरेचसे थांबले. परदेशी स्थायिक होणे सुरू झाले. माझ्या सोसायटीतील २५% हून अधिक ब्राह्मण नागरिक परदेशी स्थायिक झाले आहेत. अजून १० वर्षांनी ६०% हून अधिक ब्राह्मण परदेशात असतील व येथे फक्त वृद्ध माता पिता असतील.

आता तर परिस्थिती अजून वाईट झाली आहे. राखीव जागांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ब्राह्मणद्वेष जोमाने वाढतो आहे. ब्राह्मण संत, महात्मे, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्वे यांची यथेच्छ निंदा होत आहे. त्यासाठी खोटा इतिहास लिहिला जात आहे. ब्राह्मणांना सर्व क्षेत्रातून हद्दपार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

ब्राह्मण नवीन पिढीला आता महाराष्ट्रात फारसे भवितव्य नाही. त्यामुळे जवळपास सर्व नवीन पिढी परदेशात किंवा किमान महाराष्ट्राबाहेर जाणार.

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2024 - 9:39 pm | श्रीगुरुजी

श्री. ज. जोशी यांच्या एका पुस्तकात ३० जानेवारी १९४८ व त्यानंतरच्या काही दिवसातील पुण्यातील वातावरण वर्णिले आहे.

रात्रीचे चांदणे's picture

12 Dec 2024 - 10:05 pm | रात्रीचे चांदणे

दुर्दैवाने आजही आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी ब्राम्हण समाजाला शिव्या दिल्या जातात तर धर्मनिरपेक्षपणा दाखवण्यासाठी हिंदूंना.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Dec 2024 - 9:53 am | अमरेंद्र बाहुबली

तसेच “आपला” माणूस सत्तेत आला म्हणून जरंगेंबाबत सोमीवर वाईट लिहिणाऱ्यांबद्दल काय?

श्रीगुरुजी's picture

12 Dec 2024 - 10:40 pm | श्रीगुरुजी

काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला. काय दोष होता त्यांचा? आंबेडकर पुतळा विटंबना केली कोणीतरी दुसऱ्याने. त्याला पकडून बदडला व तो ब्राह्मण नाही. मग डॉ. देशपांड्या़च्या गाडीचा चक्काचूर का केला?

ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं? ब्राह्मण आता राजकारणात नाहीत, सरकारी नोकरीत अत्यल्प आहेत, शाळेतील शिक्षकही फारसे ब्राह्मण नाहीत, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ब्राह्मण नाव अत्यंत दुर्मिळ आहे. ब्राह्मण कोठेही इतरांच्या स्पर्धेत नाहीत. शिक्षण घेतात, नोकरी मिळवितात किंवा परदेशी निघून जातात. मग जे मागे राहिले त्यांचा एवढा दुस्वास का?

मध्यमवर्गीय माणूस प्रयत्नाने पैसे जमवून गाडी घेतो आणि त्याचा कोणताही संबंध नसताना संविधान रक्षण वगैरे भंपकगिरी करणारे समुहाने येऊन त्याच्या गाडीचा चुरा करून पळून जातात आणि त्यांना दुखवायला नको म्हणून सरकार डोळ्यांवर कातडे ओढून बसते. कधीतरी परिस्थिती सुधारेल का?

विवेकपटाईत's picture

13 Dec 2024 - 12:06 pm | विवेकपटाईत

ब्राह्मण विरोधी राजनीति हा महाराष्ट्राला लागलेला श्राप आहे. बाकी अत्याचार करणार्‍या जाती दबंग असतात अर्थात ज्या जातींची संख्या जास्त आणि शेती सर्वात जास्त राहायची. त्यामुळे ब्राह्मण कडक शुचिता पाळायचे पण अत्याचार करण्याची क्षमता ब्राह्मणांकडे नव्हती.
बाकी यामुळे ब्राह्मण शहरी झाला. माझी वडिलांना 1950 मध्ये मुंबईत नौकरी लागली होती. पण तेथील वातावरण बघता शेठने त्यांची बदली आधी उत्तर भारतात आणि नंतर दिल्ली कार्यालयात केली. वडिलांचा पगार जास्त नसल्याने बालपण गरिबीतच गेले म्हणावे लागेल. माझ्या पिढीत पाच पैकी चार सरकारी नौकरीत. त्यात तीन परीक्षा पास करून (मुंबईत असते तर बिना कोचिंग नौकरीची तैयारी कशी करायची कळलेच नसते.) सर्वांची स्वतचे घर झाले. माझाहून दोन वर्ष लहान भाऊ पहिले यूनिवर्सिटी आणि नंतर दिल्लीच्या टेबल टेनिस टीम मध्ये सिलेक्ट झाला आणि सरकारी नौकरी लागली. त्यावेळी दिल्लीची टीम राष्ट्रीय स्तरावर वरचढ होती. महाराष्ट्रात असता तर कदाचित निवड झालीच नसती. आमच्या मुलांच्या पिढीत सध्या दोन सदस्य (20 टक्के विदेशांत) बाकींच्या बाबतीत अजून सांगता येत नाही. पण सर्वांकडे कार फ्लॅट इत्यादि आहेत.

वामन देशमुख's picture

13 Dec 2024 - 5:56 pm | वामन देशमुख

१९४८ चे पश्चिम महाराष्ट्रातील मराठी ब्राह्मण हत्याकांड आणि इतरही काही इतिहासाची पाने अशीच अलिखित राहून विस्मरणात जाणार आहेत. कालाय तस्मै नमः.

कर्नलतपस्वी's picture

14 Dec 2024 - 6:48 pm | कर्नलतपस्वी

१९८४

शीर्षक - लेखक कोण आहेत? १९८४ नुसते शोधले तर मिळत नाहीये.

१९८४ म्हटले की दोनच पुस्तके डोळ्यांसमोर येतात, एक ते सुप्रसिद्ध जॉर्ज ऑरवेलचे '१९८४' आणि दुसरे म्हणजे संजय सुरींचे '१९८४- अँटी सिख व्हायलन्स अँड आफ्टर'.
मला वाटतं कर्नल साहेबांना सुरींच्या पुस्तकाबद्दल म्हणायचे आहे.

अबा नीं द मॅन हु किल्ड द गांधी, कर्नल मनोहर मालगांवकर यांच्या पुस्तकाची लिंक आणी प्रतिसाद दिला होता. तो दिसत नाही. त्या बद्दल लिहीले होते.

हे पुस्तक १९८४ मधे कॅनाॅट प्लेस मधे फुटपाथ वर मिळाले होते. ते बरेच वर्ष बॅन होते.
लेखक जेव्हां प्रसंग घडला तेव्हां समोरच रहात होते असे काही नमूद केल्याचे आठवते. पुढे ते पुस्तक कुणीतरी ढापले.

प्रतिसाद उडवला का काय माहित नाही.

कर्नलतपस्वी's picture

14 Dec 2024 - 6:49 pm | कर्नलतपस्वी

-

चौथा कोनाडा's picture

16 Dec 2024 - 2:58 pm | चौथा कोनाडा

काल परभणीत डॉ. देशपांडे नावाच्या एका नागरिकाची कार आत ७-८ जणांनी आत घुसून काठ्यांनी अक्षरशः चक्काचूर केला.

अ ति श य दुर्दैवी ... कोणत्या का समाजाचा असेना प्रचंड नुकसान... पगारावर ठेवलेले पाळीव गुंड / समाज कंटक लाठ्या काठ्या कोयते उगारून तयारच असतात....
यात दलित, मागासवर्गीय सुद्धा सापडतात... यांची पिढी उध्वस्त होते


ब्राह्मणविरोधी विष किती खोलवर भिनलंय. कोणी भिनवलं हे आणि का भिनवलं?


काय बोलणार यावर ?