मेघस्पर्षी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
12 Apr 2011 - 12:43 pm

सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती. पण काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे त्याला माहिती होती. म्हणजे किमान अशी त्याने स्वतःची समजुन करुन घेतली होती. डोके न वापरता ज्या काही गोष्टी आयुष्यात आपोआप घडत जातात त्या "सवयी" असतात आणि डोके वापरायची फारशी सवय अशीही नसल्यामुळे आपल्या हातुन अश्या बर्‍याच गोष्टी नकळत होत राहतात अशी त्याने स्वतःच्या मनाची घातलेली अजुन एक समजुत.

दात घासता घासता त्याला एकदम सौम्या आठवली. मागच्या रविवारी तिच्याकडे पहाट पहाटे (म्हणजे ८ वाजता) गेलेलो असताना सौम्याने असेच दात घासत घासत येउन दार उघडलेले त्याला आठवले. वास्तविक दात घासणारी मैत्रीण बघुन कोणीही वेंधळ्यासारखे बेभान होउन बघत बसणार नाही. पण तो बघत बसला. सौम्या दिसतच तेवढी गोड होती त्याला तो तरी काय करणार. ते आठवुन त्याच्या मुखावर वीतभर स्माइल पसरले आणि पेस्ट शर्टावर सांडली. त्याला परत स्वतःचा राग आल. काही लोकांना स्वतःला उपेक्षेने मारायची जन्मजात सवय असते. तु ही त्यातलाच असे सौम्या त्याला नेहेमीच म्हणायची आणि मग गोड हसायची. ती अशी हसत असताना तो असेच तोंड उघडे ठेवुन वेंधळ्यासारखे बघत असतो आणि मग असे काय बघतो आहेस डंबो म्हणुन सौम्या एक हलकीशी टप्पल मारते तेव्हा त्याला स्वतःच्या त्या वेंधळेपणाचा प्रचंड राग येतो. कधीतरी छानपैकी गॉगल चढवुन, अर्मानीचे ब्लॅक जॅकेट आणि ली कूपरचे ३ इंच उंचीचे सोल असलेले लेदर शूज घालुन करिझ्मावरुन झोकात एंट्री घ्यावी आणि सौम्याला कॉफी प्यायला येणार का असे थाटात विचारावे असे त्याला नेहेमी वाटते पण तसे न करण्याची ४ कारणे होती. पहिली म्हणजे आपल्या काळ्या रंगाला ब्लॅक जॅकेट चांगले दिसत नाही हे त्याला माहिती होते, दुसरे म्हणजे ५ फूट ५ इंच उंचीच्या माणसाला ली कूपरचे हाय सोल शूज सुट होत नाहीत असे त्याचे मत होते, तिसरे म्हणजे त्याच्याकडे करिझ्मा नव्हती आणि चौथे म्हणजे असे तिला डायरेक्ट विचारण्याचा त्याच्या अंगात दम नव्हता.

सौम्याची आणि त्याची भेट पुरुषोत्तमच्या तालमी असताना झाली. कॉमर्स कॉलेजमध्ये असेही कला अंगात असणारे लोक फार कमी. त्यात बुटक्या काळ्या माणसाला नाटकात कोण भाव देणार आणि त्यात वर आपल्याला अभिनयाचा गंध नाही त्यामुळे आपला तिथे उपयोग नाही हेही त्याला माहिती होते. पण सौम्या नाटकात आहे या एकाच इंसेटिव वर तो रोज तालमीला जायचा नुसता बसुन असायचा. त्याचे असणेदेखील कोणाच्या खिजगणतीत नसायचे. सौम्या समोर नसेल तेव्हा तो सुद्धा मग त्याची कवितांची चोपडे उघडुन शांतपणे खरडत बसायचा. असेच एक दिवस त्याच्याही नकळत सौम्या सहजपणे त्याच्याशेजारी येउन बसली आणि अभावितपणे त्याच्या कविता तिने वाचल्या. नाटकातल्या एका अंकात त्याची एक कविता चपखल बसेल म्हणुन तिनेच शिफारस केली. उन्हाच्या काहिलीत भाजुन निघालेल्या मातीवर वळवाचा पहिला पाऊस पडुन जो मृदगंध पसरतो तो छातीत साठवुन घ्यावा तसे काहीसे फीलिंग त्याला त्यावेळेस आले. नंतर तिच्याच आग्रहाखातर त्याने नाटकात एक बर्‍यापैकी मोठी भूमिकाही केली आणि पुरुषोत्तमात बक्षिसही मिळवले. सगळेच स्वप्नवत.

पण ती झाली मागच्या वर्षीची गोष्ट तेव्हापासुन आत्तापर्यंत आपली प्रगती काय? सौम्या स्वतःच येउन बसते म्हणुन आपल्याला बोलण्याचे धाडस होते एरवी तोंड कितीही चालत असले आणि पाव किलोच्या मेंदुत कितीही हजरजबाबीपणा भरलेला असला तरीही सौम्यासमोर काय बोलायचे यामुळे त्याला नेहेमीच गोंधळल्यासारखे व्हायचे. शिवाय मुलींशी स्वतःहुन बोलायचे नाही हादेखील त्याचा एक नियम. अपवाद अर्थात फक्त मयुराचा. तिच्याशी मात्र तो तासनतास बोलत असायचा. फोनवर. घरी जाउन. कॉलेजात बसुन ते दोघे कधीच बोलले नाहीत. तिथे बडबड करण्याची सगळी जबाबदारी सौम्यावर असायची आणि सौम्यावर शायनिंग मारण्यासाठी गृपमधल्या इतर मुलांवर. त्याचे तोंड कधीमधी सौम्याने कविता वाचुन दाखवण्याचा आग्रह केला तरच उघडायचे. तो कविता वाचत असताना सर्वात उत्स्फुर्त दाद मात्र मयुराकडुन यायची. पुरुषोत्त्तमच्या तालमी चालु असताना त्यानेच मयुराचे बरेच संवाद दुरुस्त करुन दिले होते. तो अर्थही एवढा प्रवाही समजवुन सांगायचा की त्या भूमिकेत शिरणे अगदीच सोपे होउन जायचे. नाटकात खरे म्हणजे चेहेर्‍याच्या हावभावांना विशेष महत्व नाही. पण त्यांचा भूमिकेत शिरण्यासाठी कसा उपयोग होतो ते त्यानेच दाखवुन दिले. खरे म्हणजे त्याचाही तो नाटकाचा पहिलाच प्रयत्न. तो सुद्धा सौम्याने घोड्यावर बसवल्यामुळे. पण कला त्याच्या अंगात उपजतच होती. फक्त त्याला स्वत:ला त्याची जाणीव नव्हती. मयुरा त्याच्यात कधी गुंतत गेली तिलाही कळले नाही आणि स्वतःहुन त्याला सांगायचे धाडस तिच्यात नव्हते. तिने हळुहळु त्याला ते कळावे म्हणुन प्रयत्न मात्र भरपुर केले.

एक मुलगी आपणहुन आपल्याशी बोलते आहे याचेच त्याला अपृप. पुरुषोत्तमने एकदम सगळेच बदलुन टाकले. मुली त्याच्याशी आपणहुन बोलायला लागल्या. सौम्याशी ओळख झाली. मयुराशी मैत्री झाली. अगदी फास्ट फ्रेंड्स. मयुराशी तो बिनधास्त बोलायचा. आज भोपळ्याची भाजी खाल्ली किंवा कॉफीत आईने साखर जास्त घातले होती यापासुन ते तु केलेली बटाट्याची भाजी खाउन २ दात हलायला लागले इथपासुन सगळे. मयुरा फक्त फास्ट फ्रेंड नाही किमान तिच्याबाजुने तरी आपल्या नात्याला फक्त तेवढाच अर्थ नाही हे कळायला मात्र त्याला वर्ष लागले. ते सुद्धा मयुराने खुप स्पष्ट संकेत दिले त्यामुळे. त्याला ते कळाले आहेत हे मयुराला माहिती होते त्याने मात्र ते कळालेच नाहीत हे दाखवणे योग्य समजले. रोजच्या तासभराच्या गप्पा मात्र चालुच राहिल्या. कॉलेज संपल्यावर त्याही कमीकमी होत गेल्या. आठवड्यातुन एक दोनदा तरीही मयुरा फोन करायचीच. लँडलाइन वरच करायची. तो घरी नसेल तर त्याच्या आईशी गप्पा मारायची. आईनेही मयुरा चांगली मुलगी आहे म्हणुन त्याला आडुन आडुन सुचवुन झाले होते.

त्याचा मात्र गोंधळ चालु होता. सौम्या अजुन मनातुन हलत नव्हती आणि मयुराची मैत्री सोडवत नव्हती. समुद्राकाठची रेती तो हातात घट्ट धरु पाहत होता आणि दिवस त्या रेतीसारखे हातातुन निसटुन चालले होते. बर्‍याच वेळा त्याला वाटायचे की मयुराला सगळे खरे सांगुन टाकावे पण भिती वाटायची. ती समजुन घेणार नाही याची नाही. पण तिला वाईट वाटेल याची. त्याला सगळे सहन झाले असते अगदी सौम्याचा नकार सुद्धा पण खरे सांगितल्यामुळे मयुराच्या चेहेर्‍यावरचे दु:ख त्याला पहावले नसते.

मयुरा जेव्हा कधी फोन करायची तेव्हा घरच्यांकडुन लग्नासाठी प्रेशर वाढते आहे म्हणुन बोलायची. पण कधी स्पष्टपणे त्याला लग्नाविषयी मात्र तिने विचारले नाही. तिने कधीतरी विचारावे म्हणजे मग का होइना आपण तिला नकार देउन हे त्रांगडे सोडवु शकु असे त्याला नेहेमी वाटायचे. पण तो आणि मयुरा दोन समांतर रस्त्यांसारखे चालले होते एकमेकांना छेदही देता येत नव्हता आणि समांतर जाणेही अशक्य होउन बसले होते. मयुराला योग्य वेळेस सगळे स्पष्ट न करुन त्याने यु टर्नचा ऑप्शनही स्वतःपाशी ठेवला नव्हता. मनाचा तो कोंडमारा असह्य होउन शेवटी त्याने सौम्याला एक दिवस कॉफीसाठी बोलावलेच. वर्षानुवर्षे उराशी लपवुन ठेवलेले गुपित उघडे करण्यासाठी संध्याकाळी ७ वाजता सुद्धा गॉगल घालुन आणि पांढर्‍या टीशर्ट वर अर्मानीचे काळे जॅकेट चढवुन तो सौम्याला भेटण्यासाठी पोचला. आणि त्या संध्याकाळी त्याला मिळालेले उत्तर अपेक्षितच होते. ज्या मुलांना नाकारायचे असते त्यांना मुली भाऊ म्हणुन राखी तरी बांधतात किंवा तु फक्त माझा खुप चांगला मित्र आहेस रे मी तुझ्याकडे कधी त्या दृष्टीने पाहिलेच नव्हते असे म्हणुन बोळवण तरी करतात. कितीही लोकोत्तर सुंदर असली तरी सौम्या एक मुलगीच होती. तिने दुसर्‍या मार्गाने त्याची बोळवण केली. त्याला रडुही आले नाही. सगळे कसे अपेक्षितच होते. मनात एक सल फक्त राहिला की मयुराला आधी सांगितले नाही सौम्याबद्दल. कुठेतरी आपण मयुराची फसवणुक केली असे त्याला सारखे वाटत राहिले.

योगायोग असा की दुसर्‍याच दिवशी मयुराचा फोन आला. भेटायचय म्हणाली. जास्त काही बोलली नाही पण घरचे लग्नासाठी खुप मागे लागले आहेत. आता या आठवड्यात मला निर्णय घ्यावाच लागेल त्या आधी तुझ्याशी बोलावे म्हणुन फोन केला म्हणाली. याहुन स्पष्टपणे अजुन कुठली मुलगी बोलणार? त्यालाही मनोमन निर्णय घ्यायचाच होता. असेही सौम्या नाही म्हणालीच होती. त्याने झटकन प्लॅन बनवला. आज त्याला कुठल्याही प्रकारे मयुराला नाराज करायचे नव्हते. तो घरुन निघाला तेव्हा आभाळ दाटुन आले होते. त्याचे मनाचे प्रतिक जणू. मयुरा भेटली. तिच्या स्वभावाच्या प्रतिकूल तिने थोडा भडक मेक अप केला होता. परफ्युमचा वासा तर फर्लांगावरुनही आला असता. तिला बघुन तोही २ सेकंद देहभान हरपला. मयुरा एवढी सुंदर दिसत असेल असे त्यालाही कधी वाटले नव्हते. ती सुंदर असूनसुद्धा. तिला मागे बसवुन त्याने भर्रकन बाईक सुरु केली. कुठे जायचे त्याला आधीपासुनच माहिती होते. ते दोघे अर्ध्या रस्त्यात पोचेतोवर पावसाने भलताच वेग धरला होता. मुळा की मुठा त्याच्या मनात नेहेमीच गोंधळ व्हायचा पण त्यापैकी कुठलीतरी एक नदी, डोक्यावर कोसळणारा पाऊस, पावसाला भिउन झाडामागे लपलेले पुणेकर, पुलावर निवांत थांबुन एका सुंदर मुलीबरोबर भिजत तो पाऊस अंगावर घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याने कचकन ब्रेक दाबला. आणि कित्येक वर्षांत पहिल्यांदाच आत्मविश्वासाने त्याने मयुराच्या नजरेला नजर भिडवली. कुछ फसाने नजरो से बया होते है की काहीसा तो सरफरोशमधला आमीरचा शेर त्याला उगाच आठवला. आत्ताही तसेच झाले आणि नजरेतुनच तिला सगळे कळाले तर किती बरे होइल असे त्याला वाटले आणि तो क्षीणसा हसला. मयुरा पण प्रत्त्युत्तरादाखल खरेच खुप गोड हसली आणि मग तिला काही बोलु न देता त्याने तिला सौम्याबद्दल् सगळे सांगुन टाकले. मयुरा खुप सुंदर दिसत होती, पण आता खुप उशीर झाला होता. सौम्या नाही म्हणुन मयुरा हा विचारही त्याला सहन होत नव्हता. सौम्याचे नाही म्हणने त्याला सहन होते, नकारामुळे मयुराला होणारे दु:ख सुद्धा आता त्याला मान्य होते पण मैत्रीची ही प्रतारणा त्याला मान्य नव्हती. त्याने मयुरासमोर सगळ्या भावना उघड केल्या आणि मग मात्र तिच्या नजरेला नजर भिडवण्याची त्याची हिंमत नाही झाली. मयुराची आसवं मुसळधार पावसात मिसळुन गेली. ती काहीच न बोलता रिक्षा करुन निघुन गेली. त्याच्या मनातले वादळ मात्र आता शमले होते. त्याच्या डोळ्यातला पाउस आसमंतात विरुन गेला. काळ्या नभांनी त्यांचा खजिना धरतीवर रिता केल्यावर जे सुनेपण चहुकडे भरुन जाते तशीच काहीतरी अवस्था छातीत भरुन घेउन तो परत फिरला.

कथासाहित्यिकलेखप्रतिसाद

प्रतिक्रिया

diggi12's picture

4 Sep 2024 - 12:31 am | diggi12

एक नंबर

विजुभाऊ's picture

5 Sep 2024 - 10:29 am | विजुभाऊ

मस्त.
पुढे काय झाले?
सांगितले का?
आपल्या या हीरोचे कामाधामाचे / पोटापाण्याचे उद्योग काय हे समजले नाही .

पण मयुराला नकार का दिला ?: उलट सौमया नकार देणार ह् माहित असल्यामुळे तो मयुराला नक्की होकार देणार असे- वाटत होते. पण तयाची सौमया बददलची नाराजी अचानक उफाळून आली.? बाकी लिहिलेय छान !

पण तयाची सैमयाबददलची नाराजी असे न वाचता मयूरा बददलची नाराजी असे कूरूपया (please) वाचावे.

पण मयुराला नकार का दिला ?: उलट सौमया नकार देणार ह् माहित असल्यामुळे तो मयुराला नक्की होकार देणार असे- वाटत होते. पण तयाची सौमया बददलची नाराजी अचानक उफाळून आली.? बाकी लिहिलेय छान !