सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
13 Jun 2024 - 10:40 am

भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती.

मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता.

पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती. वाराही हर्षवायू झाल्यागत भिरभिर करायला लागला. विजा चमकू लागल्या. ढग गडगडले. माझा मनमोर, माझ्यासमोर उत्साहानं नाचू लागला. किती मस्त. माझ्या मनात अनेक गाणी रुंजी घालू लागली. "ओ सजना,बरखा बहार आयी,"रिमझिम गिरे सावन",जारी,जारी ओ कारी बदरिया","गरजत बरसत सावन आयो रे","उमड घुमडकर आयी रे घटा", आणि मग आठवलं,"रिमझिम के तराने लेके आयी बरसात,याद आयी किसी से वो पहली मुलाकात."

लेट मी एक्सप्लेन! आयुष्यात अनेक टक्केटोणपे खाऊन आणि भलेबुरे अनुभव पचवून बळकट झालेल्या माझ्या मनात, आता या वयात,पावसाला बघून "पहली मुलाकात"च्या आठवणी येऊन मी हळवी बिळवी होत नाही.

मला पाऊस प्युअरली,शुद्धपणे, निरपेक्षपणे आवडतो.

पावसाळ्यात काही जण अपेय पितात. काहीजण भजी खातात. कुणी कडक काॅफी पितात. कुणी आवडती गाणी ऐकतात. कुणी रहस्यकथा वाचतात. तर काही जण गुरगुटून झोपतात. काही जण पृथ्वीदेवीनं खरंच हिरवा शालू नेसलाय का याची खात्री करून घ्यायला पिकनिकला जातात.

मला एरवी रविशंकरांची सतार किंवा "काॅल ऑफ द व्हॅली" ऐकायला आवडतं. पण पाऊस सुरु झाला की मी असलं काहीही ऐकत नाही. मी फक्त पावसाकडे अनिमिष डोळ्यांनी बघत राहते. पाऊसधारांचा नाद ऐकते. त्याच्या उडणाऱ्या तुषारांना जीभेवर झेलून पिते. श्वासात मातीचा सुगंध ओढून घेते. मी पाचही ज्ञानेन्द्रियांनी पावसाला अनुभवते. मी आणि पाऊस यांच्यामध्ये कुणीच, काहीच नसतं. पावसाशी माझं एकटीचंच अनोखं नातं जडतं. त्या नात्याला काही नाव नसतं. निनावी नातं!

मला सुखवून पाऊस ओसरला की मी भानावर येते. ताजीतवानी, प्रफुल्लित होते. मग मला ग्रेसची "पाऊस कधीचा पडतो." आणि "ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता." आठवते. बालकवींची,"श्रावण मासी हर्ष मानसी"आठवते. बा.भ.बोरकर माझे आवडते कवी. त्यांच्या,"श्रावणातल्या सरीपरि तू आलीस माझ्या घरी," आणि "सरीवर सरी आल्या ग ,सचैल गोपी न्हाल्या गं" या कविता मनात जाग्या होतात. पाडगावकरांचं "श्रावणात घन निळा बरसला"कितीही वेळा ऐकलं तरी समाधानच होत नाही.

काही मराठी गाणीही मनात रुंजी घालतात. मन्ना डे यांचं "घन घन माला नभी दाटल्या,"अरुण दाते यांनी गायलेलं,"भेट तुझी माझी स्मरते,"सुमन कल्याणपूर यांचं"रिमझिम झरती,"आशाचं ,"रिमझिम पाऊस पडे सारखा"हे मी माझ्या लहानपणी ऐकलेलं गाणं, आशाचंच,"आला आला वारा संगे पावसाच्या धारा"अशी असंख्य गाणी पावसावर आहेत.

पावसावर बालगीतंही आहेत. सर्वांना आवडणारं गाणं म्हणजे,"सांग, सांग भोलानाथ,"आशाचं,"नाच रे मोरा", तिचंच,"टप टप टप काय बाहेर वाजतंय".

माझ्या मनात रुजलेलं संदीप खरेंचं पावसाचं गाणं म्हणजे,

"तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही".

पण खरं सांगू? माझं, तुमचं, आपल्या सगळ्यांचं बालपणापासून अतूट नातं जडलंय ते या गाण्यांशी,

"ये रे, ये रे पावसा तुला देतो पैसा.
पैसा झाला खोटा पाऊस
आला मोठ्ठा."
आणि
"ये ग ये ग सरी,
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून."

किती सोपी,सरळ, सहज रचना! कुठल्याही लहान मुलानं टाळ्या वाजवत, नाचत गावी अशी रचना! त्याला गानकौशल्य नको, नृत्यकौशल्य नको,साथसंगतीला वाद्यं नकोत. एका लयीत, टाळ्या वाजवणं हीच याची साथसंगत. उगीच महान प्रतिभेचे झगमगते चमत्कार मिरवत केलेली ही रचना नाही. कुणी रचली ही बालगीतं! या गाण्यातलं प्रतिभेचं अस्तित्व खुपू नये इतकी सोपी आणि रसाळ रचना. ही पावसावरची बालगीतं लहान मुलाकडून किंवा त्याच्या आईकडून बोलता बोलता प्रकट झाली असावीत. ही मुद्दाम रचलेली नाहीत.

वसंत ऋतुला ऋतुराज म्हणतात. पण मला श्रावण हा वर्षाऋतूतला सम्राट वाटतो. आख्खा पावसाळाच पृथ्वीचा आनंदमहोत्सव आहे.

अकबर बादशहाने एकदा आपल्या दरबारात हजर असलेल्या नवरत्नांना प्रश्न विचारला,"सत्तावीस वजा नऊ किती?" सर्वांनी उत्तर दिलं,"सोपं आहे. सत्तावीस वजा नऊ उरले अठरा.

"बिरबल मात्र न बोलता शांत बसला होता. बादशहाने त्याला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला,"सत्तावीस वजा नऊ किती?"
बिरबल म्हणाला,"सत्तावीस वजा नऊ म्हणजे शून्य"
बादशहाने विचारले,"ते कसे काय?",
बिरबल म्हणाला,"एकूण सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर हे जग शिल्लकच राहणार नाही. फक्त शून्य उरेल".

मग बादशहाने सर्व कथांमध्ये वर्णिलेल्या प्रथेनुसार बिरबलाला गळ्यातला कंठा बक्षीस म्हणून दिला हे वेगळे सांगायला नकोच.

(पावसाळ्यात होणारा चिखल,घाण,तुंबलेली गटारं याबद्दल आपण तूर्त तरी बोलूया नको.)

मांडणीमुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2024 - 10:48 am | प्रसाद गोडबोले

वाह !

काय सुंदर लिहिलं आहे ! मजा आली वाचुन :)

पावसाळा जोरदार सुरू झाला आहेच. लेख समयोचित.

तूर्त मात्र जे टाळू या म्हटले आहे तेच समोर येत आहे.

मुंबईची तुंबई, नालेसफाईचे दावे निष्फळ, पावसाची दमदार बॅटिंग वगैरे घिसे पिटे शब्द सर्वत्र ..

खुपचं सुंदर लिहिलंय!!

पावसाळ्यात काही जण अपेय पितात. काहीजण भजी खातात. कुणी कडक काॅफी पितात. कुणी आवडती गाणी ऐकतात. कुणी रहस्यकथा वाचतात. तर काही जण गुरगुटून झोपतात. काही जण पृथ्वीदेवीनं खरंच हिरवा शालू नेसलाय का याची खात्री करून घ्यायला पिकनिकला जातात.

मस्त निरीक्षण..

कंजूस's picture

13 Jun 2024 - 3:45 pm | कंजूस

पाऊस आवडतो.
लेखन आवडले.

मुक्त विहारि's picture

13 Jun 2024 - 4:48 pm | मुक्त विहारि

मुक्तक आवडले...