नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत. पण निसर्गामध्ये मुक्त फिरण्याचा, अनेक दिवस व रात्र जंगलात आणि डोंगरात राहण्याचा तो काळ कसा होता हे खूप छान त्यात वाचायला मिळतं.
हे पुस्तक म्हणजे लेखकाचे व त्याच्या लाडक्या कबूतराचे अनुभवच आहेत! साधारण १९१४- १९२० ह्या काळातले हे अनुभव लेखकाने नंतर पुस्तकातून मांडले. हे वाचताना माझं लहानपण आठवलं! 'कबूतर जा जा जा' च्या काळातला माझा बालहट्टही आठवला! त्या काळच्या कलकत्यामध्ये घरोघरी कबूतरं पाळलेली असायची, त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं, त्यांच्याही स्पर्धा व्हायच्या हे सगळं कळत जातं तेव्हा आश्चर्य वाटतं. अंड नेमकं कोणत्या क्षणी हलकीशी चोच मारून उघडायचं हे कबूतराच्या पिलाच्या आईला कसं कळतं, एक एक काडी आणून कबूतर कसे घरटे बांधतात, कसे शेकडो किलोमीटर दूर उडत जाऊ शकतात हे सर्वच खूप विलक्षण आहे. कबूतराचं दिशा- ज्ञान (नेव्हिगेशन) तपासण्यासाठी लेखक व त्याचे मित्र कबूतराला घेऊन दार्जीलिंग- सिक्कीम भागात जातात. तिथे कबूतरावर गरूडाने केलेला हल्ला, त्यापासून गे- नेक कबूतराने केलेलं स्वत:चं संरक्षण, जंगलात राहून लेखकाने त्याचा केलेला शोध असे सगळेच प्रसंग विलक्षण थरारक आहेत.
हल्ल्यानंतर अतिशय घाबरलेलं दुखापतग्रस्त कबूतर एका लामांच्या गोंपामध्ये आश्रय घेतं. तिथे कबूतरावरून हात फिरवणारे लामा लेखकाला सांगतात, “आता हे कबूतर परत कधीही घाबरणार नाही. वीस वर्षांहून अधिक काळ रोज चार तास ध्यान करणार्या व्यक्तीच्या स्पर्शातून त्याची सगळी भिती कायमची निघून गेली आहे.” सगळ्या पुस्तकामधलं वर्णन चित्रदर्शी आहे. जनावरांचा मोठा समूह येण्यापूर्वीच जमिनीला कान लावून सावध होणारा माणूस, पक्ष्यांच्या व पशुंच्या क्षमता, निसर्गातले अनेक रहस्य असे अनेक प्रसंग ह्यामध्ये सुंदर आलेले आहेत. लेखक अमेरिकेमध्ये शिकल्यामुळे आणि १०० वर्षं जुनं असल्यामुळे इंग्लिश काही वेळेस कठीण वाटतं. पण तरी खूप चित्रदर्शी वर्णन असल्यामुळे पुस्तकाचा आनंद घेता येतो. नावंही माहित नसलेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं व प्राण्यांचं सूक्ष्म वर्णन लेखकाने केलं आहे. पुढे लेखक कबूतराला अजून कसं एक एक शिकवतो त्याचं वर्णन आहे. कबूतर हरवलं असतानाचं वर्णन कबुतराच्या मनोगतामधून आलं आहे!
१९१४ मध्ये युरोपामध्ये युद्ध सुरू होतं. तेव्हा लेखकाचं वय लहान असल्यामुळे तो जाऊ शकत नाही. पण त्याच्या एका जंगलात वाढलेल्या अनुभवी मित्रासोबत त्याच्या कबूतराला ब्रिटीश 'पिजन फोर्स' मध्ये सहभागी केलं जातं. फ्रान्समध्ये युद्ध आघाडीजवळ कबूतर आणि लेखकाचा मित्र जातात. लेखकाचा मित्र मुख्य ठाण्यावर थांबतो आणि कबूतरं शत्रूच्या सैन्यालगतच्या आघाडीवर जातात. तिथे गेल्यावर सैनिक त्यांच्या पायाला नकाशा व शत्रू सैन्याची माहिती सांगणारी चिठ्ठी देऊन हवेत उडवतात. कबूतराच्या नजरेतून आग ओकणारे गरूड व भुंकणार्या तोफांसारख्या शत्रूंना चुकवत ते त्याच्या मालकाकडे पोहचतं. युद्धाच्या पुढच्या टप्प्यावर लेखकाचा मित्र स्वत: कबूतराला घेऊन शत्रूच्या आघाडीजवळ येतो. शत्रूच्या ताब्यात असलेल्या डोंगराळ भागात शिरतो. तेव्हाचा एक प्रसंगही सुंदर आहे. कबूतरासोबत तो जात असताना अचानक एक रानटी कुत्रा त्याच्या समोर येतो. आणि हा माणूस अजिबातच कसा घाबरला नाही म्हणून तो कुत्रा थबकतो. आणि मग त्या माणसाने हात पुढे केल्यावर त्याचा हात चाटायला लागतो.
लेखकाने इथे लिहीलंय, आपल्या मनात आलेली भिती दुसर्याला जाणवते, विशेषत: प्राण्यांना आपल्या भितीचा गंध व भाव जाणवतो आणि तेही घाबरतात आणि म्हणूनच आक्रमक होतात. पण एखादा कोणी अजिबातच न घाबरणारा असेल तर प्राणीही घाबरत नाहीत व मित्र होतात. हे वाचताना एका पुस्तकात वाचलेला एक प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला. वनामध्ये ध्यान करणारा भिक्षु नागार्जुन आणि त्याच्या सभोवती स्तब्ध उभे असलेले कित्येक लांडगे! त्याच्या मनामध्ये भितीचा लवलेशही नसल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्यास असमर्थ असलेले लांडगे!
युद्धामध्ये माहिती नेण्यासाठी कबूतर हे किती विलक्षण माध्यम होतं हे कळतं. (अगदी आजही ओदिशा पोलिस दलामध्ये दुर्गम भागामध्ये कबूतरच संदेश पोहचवतात!) लेखकाचा मित्र व ते कबूतर युद्धामुळे दु:खी व निराश होतात. तेव्हा पुन: पूर्ववत होण्यासाठी ते निसर्गाच्या सान्निध्याचा आसरा घेतात व बरे होतात. असं हे पुस्तक असं खूप थरारक आणि रंजक आहे. त्याबरोबर इतके पशु- पक्षी, निसर्गातील छोटे घटक ह्यांच्यामध्ये किती मोठी रहस्यं दडलेली आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये किती गहनता आहे हे समोर येत जातं. आपण तर वाचावंच, पण आजच्या इंग्रजीच जास्त वाचणार्या मुलांना आवर्जून भेट द्यावं असं हे पुस्तक आहे. आपल्याला दिसतो आणि कळतो त्याहून निसर्ग किती सखोल आणि अर्थपूर्ण आहे ह्याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. पुस्तक नॅशनल बूक ट्रस्टच्या वेबसाईटवर इंग्रजीत उपलब्ध आहे.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! लेख जवळच्यांसोबत शेअर करू शकता. -निरंजन वेलणकर 09422108376)
प्रतिक्रिया
16 May 2024 - 5:57 pm | चौथा कोनाडा
व्वा... खुप सुंदर पुस्तक परिचय.
लेख वाचून पुस्तक वाचावसं वाटू लागलंय ! वर्णन थरारक आहे.
कबुतरांचं जगच वेगळं आणि अ ति श य रोचक आहे. पण कबुतरे नामशेष झाली आहेत अशी परिस्थिती आहे.
आम्च्या बर्यापैकी झाडी सोसायटीच्या आसपास फक्त पारवेच दिसतात कबुतरे अजिबात नाहीत !
धनेश, खंड्या आणि इ त र पक्षी मात्र नियमित दिसतात !
धन्यवाद मार्गी एका हटके पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल !
19 May 2024 - 2:38 am | jinendra
अनेकदा हेच कळत नाही की कबूतर आणि पारव्यात नेमका फरक काय ?
19 May 2024 - 1:15 pm | चौथा कोनाडा
असा का प्रश्न पडावा ?
पारवा म्हणजे राखाडी रंगाचा. कबुतराचीच एक प्रजात. शहरात उंच इमारतीत राहून उपद्रव करणारा आळ्शी पक्षी.
इंग्रजीत pigeon आणि dove असे शब्द आहेत
बाकी पारव्यांचा (कबुतरांचा) उपद्रव हा मोठा विषय आहे आणि त्यावर वेळोवेळी चर्चा झालेली आहे.
19 May 2024 - 3:58 pm | अमरेंद्र बाहुबली
काही हराम*र लोक पुण्य कमवण्याच्या नावा खाली ह्याना दाणे टाकत असतात. त्यांच्या मुळे रहिवाश्याना त्रास होतो.
27 May 2024 - 12:20 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!