✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा!
✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार
✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स!
✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ
✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं!
✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद
✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं
सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे. आजवर अदूसोबत अनेक वेळेस फिरलो होतो आणि अनेकदा डबल सीट राईडसही केल्या होत्या. तिला सायकल चालवता यावी व त्यातली मजा तिलाही अनुभवायला मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले होते. माझ्या मोठ्या सायकलीचं सीट खाली करून सगळे जुगाड करून बघितले. तिच्याच वयाच्या- आठ वर्षांच्या कश्मीर ते कन्याकुमारी सायकलीवर जात असलेल्या रावी कौरला मी भेटलो होतो तेही तिला सांगितलं होतं. पण तिची सायकल आधाराची चाकं काढल्यावर काही सुरू होत नव्हती! तिचे पाय काही पुरत नव्हते आणि तिला बॅलन्स करणं काही जमत नव्हतं! आणि सायकलिंग ही इतकी सोपी गोष्ट आहे की, ती काही मला शिकवता येत नव्हती!
मी जेव्हा माझ्या सायकलिस्ट मित्रांना त्याबद्दल सांगायचो तेव्हा ते म्हणायचे, अच्छा म्हणजे माशाच्या पिलाला पोहणं शिकवणं सुरू आहे तर! गेले दोन वर्षं अशी स्थिती होती. किती तरी वेळा कंटाळून अदू म्हणायची तुला आवडतं, तू सायकल चालवतोस म्हणून मी का सायकल चालवू? अशी गंमत सुरू होती. पण आत्ता चौथीची परीक्षा झाल्यानंतरच्या सुट्टीमध्ये परत एकदा प्रयत्न करून बघावा असं वाटलं. आणि ह्यावेळी तिच्या छोट्या सायकलीवर तिचे पायही टेकले! पण बॅलन्स कसं करायला पाहिजे ते मात्र कळत नव्हतं. मग तिला सायकलीवर बसून पायाने ढकलायला सांगितलं. मग एक पेडल वर घेऊन जोरात मार असं सांगितलं. थोडा वेळ मागून धक्का दिला! आणि मग सुरूवातीला एक सेकंद, नंतर तीन सेकंद, मग पाच सेकंद असा तिला बॅलन्स जमत गेला! जेव्हा तिला कळालं की, ती पेडल मारत पुढे गेलीय आणि मी हात कधीच सोडून दिलाय तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता!
.
.
(आम्ही सोबत केलेल्या सायकलिंग व ट्रेकिंगचे काही फोटो इथे ब्लॉगवर बघता येतील- http://niranjan-vichar.blogspot.com/2024/03/when-baby-fish-learns-swimmi... -निरंजन वेलणकर 09422108376.)
तिचं सायकलिंग बघताना मला माझं लहानपणीचं सायकलिंग आठवलं! मी पहिली- दुसरीतच सायकल शिकलो होतो. कारण अगदी स्पष्ट होतं. तेव्हा सगळेच गल्लीतले मुलं आपोआप सायकल शिकायचे. एकमेकांकडे बघून शिकावी लागायचीच नाही. डायरेक्ट धक्के खात आणि धडपडत सगळेच सायकल चालवायला लागायचे! भाड्याने तासभरासाठी मिळालेली छोटी सायकल जास्तीत जास्त पळवायचे! अदूच्या बाबतीत मात्र अशा समवयस्क सवंगड्यांची उणीव खूप जाणवली! जे सहज एकमेकांचं बघून आणि निव्वळ सोबतीने जमलं असतं, ते करायला बराच वेळ लागला. पण हरकत नाही! एकदा सायकल शिकल्यावर तिला आता खूप छान मजा घेता येईल.
बॅलन्स चांगला येताना आधी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दोन दिवस तिने सायकल चालवली. सुरूवातीला तक्रार करायची की, किती खड्डे आहेत फरशीवर, किती दगड आहेत! पण दोनच दिवसांमध्ये तक्रारीची जागा आनंद आणि उत्साहाने घेतली! बघता बघता चौथ्या दिवशी तिचा आत्मविश्वास व आनंद वाढला की, बाहेर मोठ्या रस्त्यांवर छोटी राईड करून बघितली! दोघं दोन सायकलींवर अशी राईड! आणि मग पाच किलोमीटर, सहा किलोमीटर असं करत ११ किलोमीटरची राईडही केली! तिचा आनंद खरंच बघण्यासारखा होता! "अरे निनू, मला विश्वास बसत नाहीय मी इतकी सायकल चालवतेय!” इतका तिला आनंद येत होता आणि मलाही होत होता!
.
आपल्याला मिळालेल्या गोष्टी अशा शेअर करण्यातला आनंदही खूप वेगळा! तिचं सायकलिंगचा आनंद घेणं, ट्रेकिंगमधली मजा अनुभवणं हा खूप वेगळा अनुभव! तिला ट्रेकिंग आवडतंच, तिने छोटे ट्रेक बरेच केले आहेत. अगदी सिंहगडही ती आरामात चढली आहे. आणि आता सायकलिंगचाही ती तसाच आनंद घेऊ शकते आहे! वेगवेगळ्या गोष्टी आणि खूप वेगवेगळे अनुभव- गमती- अगदी क्रिकेट किंवा चित्रपटातल्या मजा- किस्से तिला सांगण्याची मजा खूपदा अनुभवली आहे. छोट्या रोपाचं मोठं वृक्ष होणं! किती वेगळा अनुभव आहे! ह्या वाटचालीमध्ये ती माझ्यापेक्षा वेगळी आहे, खूप गोष्टी तिला लवकर समजतात आणि ती खूप वेगळ्या प्रकारे करते हेही जाणवतं. ती पुढे सायकलिंग किती करेल किंवा नाही करणार हा अर्थातच तिचा विषय आहे. पण त्यातली मजा व गंमत अनुभवण्यासाठी मी तिला सोबत करू शकलो हे समाधान मोठं आहे.
प्रतिक्रिया
28 Mar 2024 - 7:53 pm | गवि
छान लेख आहे.
एक उगीचच उत्सुकता. हल्ली सायकल चालवायला शिकणे (सुरुवात करणे) याचे सरासरी वय साधारण काय झाले आहे?
मी लहान असताना (कोंकणात ) इयत्ता पाचवीत गेल्यावर सायकल शिकलो. त्या वेळी ते तेथील आसपासच्या परिसरातील सरासरीनुसार खूप उशिरा होते. आसपासचे सर्व मित्र मैत्रिणी त्या आधीच सायकल चालवू लागले होते.
मोठी अटलास, हरकुलीस किंवा हिरो सायकल हेच ऑप्शन उपलब्ध होते. बी एस ए - एस एल आर असाही एक ब्रँड होता.
लहान मुलांसाठी टोबू सायकली किंवा साइडला ट्रेनिंग व्हील्स असलेल्या सायकली हे पर्याय ऐकिवात नव्हते.
तर त्या मोठ्या हर्कुलीसच्या त्रिकोणी फ्रेम मधून एक पाय पलीकडे टाकून हाप पेडल मारत लहान मुले सायकल चालवत.
29 Mar 2024 - 10:36 pm | हणमंतअण्णा शंकर...
वर्षानंतर बॅलन्स बाईक, आणि साडेतीन वर्षापासून रेग्युलर.
म्हणजे माझ्या आजुबाजुला तरी ४-५ वर्षाचे एकही मूल नाही ज्याला सायकल येत नाही अगदी क्वचित अपवाद वगळता.
खूप सायकलप्रेमी समाजात राहतो याचे कधी कधी समाधान वाटते.
28 Mar 2024 - 8:10 pm | कर्नलतपस्वी
आम्हीं तीन पिढ्यानां सायकल शिकवली.
मी स्वता इयत्ता चौथी,मुली तिसरी आणी नात एल के जी.
लेख आवडला.
28 Mar 2024 - 8:20 pm | मुक्त विहारि
पूर्वी सायकल चालवत होतो..
आता, धाडस होत नाही.
28 Mar 2024 - 9:05 pm | Bhakti
मस्त! अगदी मलाही असंच वाटतं:)
माझं पिल्लू तर ट्रेकिंग मध्ये माझ्या पुढेच असते.ती तीनच वर्षांची होती अजिंठाला इतकी पळत होती मलाच भीती वाटत होती.आताच्या एका ट्रेकला तिचे पाय दुखत होती पण म्हणती कशी"असू दे आई देवाने पाय दुखण्यासाठीच दिले असतात"
28 Mar 2024 - 11:50 pm | सौन्दर्य
केलेली प्रत्येक पहिली गोष्ट मुलांना खूपच आनंद देऊन जाते, तशी ती सर्वांनाच देते म्हणा. पण जेव्हा त्यांचे कौतुक आपण दुसर्यांना सांगत असतो तेव्हा त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. मी माझ्या मुलाला तो पाच वर्षांचा असताना पोहायला व सायकल चालवायला शिकवले होते. गम्मत म्हणजे तो ज्यावेळी पोहायला शिकला त्यावेळी मला स्वतःला पोहता येत नव्हते तरी वेळात वेळ काढून त्याला मी स्विमिंगपूलवर घेऊन जायचो व तिथल्या जाणकारांच्या स्वाधीन त्याला करायचो. तो फारच बोलका असल्यामुळे त्याची सगळ्यांशी गट्टी व्हायची मग ते पट्टीचे पोहोणारे त्याला पाठीवर घेऊन डीप एरियात घेऊन जायचे व तो ही न घाबरता त्यांच्या बरोबर जायचा. अशातनंच तो पोहायला शिकला.
मी देखील सहा-सात वर्षांचा असताना भाड्याच्या सायकलवर सायकल चालवायला शिकलो. गुरु अर्थातच एक-दोन वर्षांनी मोठी मुले व समवयस्क मित्र. मी सायकल चालवायला मालाडच्या संगीता टॉकीजच्या कंपाउंडमध्ये शिकलो. आधी ते जोहरा टॉकीज होते, नंतर त्याचे नाव संगीता झाले. बहुतेक मालक बदलले असावेत. त्यावेळी एक गंमत झाली. सायकल चालवायला नव्यानेच शिकलो होतो त्यामुळे गोल-गोल चकरा मारणे जमत होते, पण अचानक मार्गात काही बाधा आल्यास बावचळून जाऊन सायकलवरून पडत असे किंवा एखाद्या भिंतीला जाऊन आपटत असे. तर एकदा अशीच संगीत टॉकीजच्या कंपाउंडमध्ये सायकल चालवत होतो. अचानक दुसरी सायकल समोर आली म्हणून भीतीने तोल जाऊन जमिनीवर भिंतीला टेकून ठेवलेल्या 'दिवाना' सिनेमाच्या २०' X १०' च्या एका मोठ्या पोस्टरवर जाऊन आदळलो. सायकलचे पुढचे चाक त्या पोस्टरमधून आरपार बाहेर गेले व पोस्टर फाटले. तेथे उभ्या असलेल्या गुरख्याने ते पाहिले व रागाने ओरडत तो माझ्या मागे धावला. त्याही स्थितीत मी सायकल बाहेर काढली व सर्व शक्ती एकवटून पेडल मारत तेथून पळ काढला. त्यानंतर कितीतरी दिवस त्या संगीत टॉकीजच्या कंपाउंडमध्ये पाय नाही ठेवला.
29 Mar 2024 - 10:56 am | अहिरावण
नशीबवान आहात.
29 Mar 2024 - 5:55 pm | नगरी
खूपच छान.
31 Mar 2024 - 1:11 pm | सविता००१
खूप छान . अदूला खूप शुभेच्छा
1 Apr 2024 - 2:11 pm | मार्गी
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! :)
@ गवि जी, साधारण दुसरी- तिसरीत (७-८) मुलं- मुली सपोर्टच्या सायकली चालवतात. पण एकंदरित सर्रासपणे सायकल पूर्वीसारखी आताची मुलं चालवताना दिसत नाहीत.
@हणमंतअण्णा शंकर... जी, अरे वा. तुम्ही कोणत्या देशात/ प्रदेशात राहता?
@ कर्नलतपस्वी जी, छानच. छोट्यांना हॅपी राईड सांगाल.
@ भक्ती ताई, अरे वा! किती छान. तिला कौतुक कळवाल.
@ सौन्दर्य जी, ओह! गमतीदार अनुभव! अगदी एक वेगळा लेख वाटावा असे!