बेसामे मुचो - एक शृंगारिक गाण्याची विविध रूपे

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
11 May 2009 - 7:32 am

गेले काही महिने मला या "बेसामे मुचो" ("खूप चुंबने दे") गाण्याने पछाडले आहे. हे प्रथम ऐकले, ते आवडावे असे नाही. "अमेरिकन आयडल" या संगीतस्पर्धेत सँजाया मॅलकार (?संजय मालाकार?) याने मी ते गायलेले ऐकले, आणि अशा परिस्थितीत कुठलेही गाणे न आवडले, तर आश्चर्य ते काय?

पुढे यूट्यूबवर शोधता दिसले, की हे गाणे अनेक कलाकारांना आपली छाप लावून गावेसे वाटले आहे. तसे हे गाणे फार जुने लोकसंगीत वगैरे नाही. हे गाणे त्या मानाने अगदी हल्लीहल्लीच १९४०मध्ये कोन्सुएलो वेलास्केस या मेक्सिकन पियाने-वादिकेने रचले (शब्द आणि संगीत दोन्हीही). ते रचले तेव्हा ती सोळा वर्षांची होती - प्रेम-प्रेमभंग काय प्रियकराकडून चुंबनही तिने अनुभवले नसावे, असे म्हणतात. गाणे शब्दांच्यादृष्टीने तसे फार सोपे आहे. त्यात अर्थाचे पदर आणि गुंतागुंत गाणार्‍यांनी शोधली तर भरपूर आहे. पण फक्त शब्द वाचले तर सोपे, कच्च्या वयाची अतिशयोक्ती भरलेले आहे.

Bésame, bésame mucho,
como si fuera esta noche la última vez...
Bésame, bésame mucho,
que tengo miedo tenerte, perderte después

मुके दे, मुके तू खूप दे
रात आजची समजूया आहे शेवटली जसे
मुके दे, मुके तू खूप दे
भी लागे आज आहेस, उद्या तू नसशील इथे

हे गाणे १९४२ मध्ये मेक्सिकोमधील लोकप्रिय गायक एमिलियो तुएरो गायले, ते नाट्यमय अतिशयोक्त "रोमँटिक" भावनेने थबथबलेले आहे. गंमत म्हणजे यातले मधले-मधले म्युझिकपीस आहेत ते ऐकून मला १९७० काळातल्या हिंदी सिनेमातल्या गाण्यांची खूप आठवण येते.

कोन्सुएलो वेलास्केस हिने स्वतः हे गाणे गायलेले असेल तर ते मला सापडत नाही. पुढे १९६७ मधे तिने ते मेक्सिकन दूरदर्शनवरती पियानोवरती वाजवले. त्यात उत्तम पियानेवादन दिसते, ते दिसते. पण माझे लक्ष दुसरीकडे आहे. पियानोवरती ती शब्दांची लय जी दाखवते, शब्दांची ठेवण जी करते, ती निश्चितच वर तुएरो यांच्या गाण्यापेक्षा वेगळी आहे. आता हे लक्षात ठेवले पाहिजे, की १९४० मध्ये रचलेल्या गाण्याबद्दल खुद्द कोन्सुएलो यांचे विचार १९६७ पर्यंत बदललेले असणार. पण तरी...

हेच गाणे सुसाना साबालेता ही मेक्सिकन संगीत-नाटक गाणारी नटी गायली त्यात नाट्यमयता पूर्णपणे वेगळी आहे. (धोक्याचा इशारा : या गाण्यातल्या आर्जवामध्ये, गाण्याच्या पद्धतीमध्ये एका प्रकारची रतिलोलुपता जाणवते. कोणाला वखवखलेपणा वाटेल. असे ऐकायची इच्छा नसेल तर ऐकू नये.) पण हे गाणे दुसर्‍यांदा ऐकताना, ते रति-आमंत्रण दुहेरी अर्थाने भरलेले मला जाणवले. या स्त्रीचा प्रियकर तिला सोडून जाणार आहे, त्याची पूर्वकल्पना तिला पक्की झालेली आहे. २:२२च्या सुमारास जवळजवळ आवाज खरवडून "मुके घे" म्हणणार्‍या निर्लज्जतेच्या पुढे लगेच २:२७ला "भीती वाटते तुला नंतर हरवायची" मधली हादरावणारी जिवाची भीती तितकीच खरी वाटते. मग तो "निर्लज्जपणा" वेगळ्याच प्रकारे मी बघायला लागतो. लिंगपिसाट रतीत धुंद झाल्यापासून, प्रियकर हरवणार या प्राणांतिक भयापर्यंत चुटकीसरशी नेणारे हे गाणे आहे. एखादे गाणे पट्टीच्या गायकाकडून ऐकावे, तसे मला वाटते पट्टीच्या नटा-नटीकडूनही ऐकावे - वेगळेच पैलू दिसू शकतील असे हे उदाहरण आहे. एकही शब्द न बदलता ही कथा सांगितलेली आहे - एका पुरुषाने या स्त्रीला नादाला लावली, आणि तिचे शरीर उपभोगून तो तिला सोडणार आहे. त्या शरिराची पूर्णाहुती देऊन ती त्याला वश ठेवण्याचा शेवटचा निराश प्रयत्न करत आहे. (त्या १६ वर्षांच्या कोन्सुएलोला हा अर्थ मुळीच मनात नसणार, असे वाटते. पण गाणायात गीतकाराच्या मर्यादेपेक्षा खूपखूप वेगळा अर्थ गायक/नट भरू शकतो.)

आता हेच गाणे देशांतर करून कसे गायले जाईल बघा. ही माझी आवडती आजीबाई गायिका सेसारिया एवोरा. (नातवंडांबरोबर बागडताना वगैरे तिचे फोटो प्रसिद्ध आहेत, त्यामुळे "आजीबाई" म्हणणे म्हणजे उगीच ठराविक साच्यात टाकणे नव्हे.) सेसारियाबाईंचे सांगीतिक मूळ आहे काबोवेर्दे नावाची बेटे. आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या या बेटांवर पोर्तुगिज-आफ्रिकन मिश्रणाने जी काय भाषा, जी काय संस्कृती तयार झाली तिची ही परिणती. सुरुवातीला चाल बहुधा कोन्सुएलो यांनी दिल्यासारखीच असली तरी त्यात सेसारिया यांचे काबोवेर्दे-शैलीचे हेलकावे वगैरे येतातच. (१:४०, १:४७ वरती एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर त्या विशेष प्रकारे "घसरण्या"ची लकब ही खास तिथली.) वाद्यांची संगतही वेगळी आहे. पण या गाण्यात मला एक संयत "व्हायचे ते व्हायचे, तू जाणार ते कळतंय मला" अशी भावना दिसते. वेदना जाणवते, पण रडणार नाही असा खंबीर शृंगार उभा होतो आहे.

आता आपण पुन्हा काही पुरुष गायकांची उदाहरणे घेऊया. जगातल्या बहुतेक समाजांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्यात आणि वर्तणुकीमध्ये फरक असतो. मिलनाच्या रात्री जर उद्याचा विरह स्पष्ट दिसत असेल, तर ते पुरुष दूर जात असल्यामुळे, असा विचार आपल्या मनात येतो. अर्थातच पुरुष गायकाकडून आपल्याला याच गाण्यात वेगळा भाव जाणवतो.

ही एक आश्चर्यकारक दुहेरी फीत मला यूट्यूबवरती सापडली - (आणि अशीच अनेक गायकांची तुलना करणारा लेख लिहावा, तो विचार यातूनच सुचला.) हे आहेत ब्राझिलचे दोन अग्रणी गायक कायतानो वेलोसो आणि जोआंव जिलबेर्तो. (कायतानो वेलोसो हा चेहरा मोठ्या विचित्र प्रकारे वेडावाकडा करत गातो, शक्यतोवर त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुरांकडे लक्ष द्यावे.) दोघांच्या गाण्यात ब्राझिलियन बोस्सानोव्हा शैलीचा छाप जाणवतो.

१:१०च्या सुमारास कायतानो वेलोसो गातात. या ठिकाणी संयत "स्वच्छ" गाण्यात उलट एक प्रकारचा कलंदर (की बिलंदर) वृत्ती मला ऐकू येते. "आता प्रेम करूया, मी इथे टिकणार नाही हे मलाही माहिती आहे, तूही समजून घे" - असा काही भाव मला ऐकू येतो. ४:१५च्या सुमाराला जोआंव जिलबेर्तो तेच गाणे म्हणतात, तेव्हा वेगळा भाव मला जाणवतो. "तुला" सोडून जाणार याबद्दल गायकाला करुणा वाटते आहे, असे वाटते. एखासा सुर ताणून पुढच्या मात्रेतला भाग "चोरून" पुढचा स्वर तोकडा म्हणायची लकब, यात अधूनमधून दिसते, तेव्हा तो स्वर कुरवाळल्याचा, त्याच्याबरोबर ज्या प्रेयसीला सोडणार तिला कुरवाळण्याचा भास होतो.

आता ही शेवटची चित्रफीत वेगळ्या देशातली आणि वेगळ्या भाषेतली - याला "बेसामे"चा इंग्रजी अनुवाद म्हणावा की वेगळेच गाणे म्हणावे, इतका फरक आहे. गाण्याचे "भाषांतर" केले आहे सनी स्कायलार यांनी :
Besame besame mucho,
Each time I bring you a kiss
I hear music divine
So besame, besame mucho
Yeah I love you for ever
Say that you'll always be mine

या भाषांतरात उद्या विरह अटळ आहे, हा भावच नाहिसा झालेला आहे. (न दिलेल्या पहिल्या अंतर्‍यातही "जर तू मला सोडलेस तर माझा जीव जाईल - माझ्यावर सदासर्वकाळासाठी प्रेम कर" इतपतच आहे, विरह अटळ नाही.) मग गाण्यात फरक पडणारच. हे आपल्या सर्वांच्या ओळखीचे बीटल्स :

(सँजायाने प्रयत्न केला ते बीटल्सचे गाणे. त्याचा दुवा देत नाही. यूट्यूबवर सहज सापडेल.)

एखादेच गाणे वेगवेगळ्या, खूप, गायकांकडून ऐकण्याचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. सांगीतिक तपशील, नेमके कायकाय बदलले आहे, हे न कळतासुद्धा भाव कमालीचे वेगवेगळे उत्पन्न होतात, हे मला कळते. मला वाटली तशी गंमत, किंवा त्याहूनही अधिक जाणकार मनोरंजन वाचकांचे झाले असावे हीच इच्छा.

कलासंगीतदेशांतरआस्वाद

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

11 May 2009 - 12:46 pm | घाटावरचे भट

सुंदर गाणे. या गाण्याची स्केल (सुरावट) आणि त्यात सर्व कलाकारांनी घेतलेल्या इंप्रोव्हायजेशन्स आपल्या भैरवीशी मिळत्याजुळत्या आहेत. मी भैरवीच्या स्केलमधे म्हणून पाहिलं, भरपूर साम्य आहे. फक्त ऋषभ तेवढा शुद्ध आहे. भैरवीची हुरहुरसुद्धा तशीच आहे. बाकी स्पॅनिश भैरवी म्हणून म्हणायला हरकत नाही.

बाकी हे गाणं ऐकून 'ये समां, समां है ये प्यार का' या गाण्याची आठवण झाली.

धनंजय's picture

11 May 2009 - 7:30 pm | धनंजय

हे "समा" गाणे मुद्दामून पाश्चिमात्य सुरावटीला अनुसरून जुळवले आहे का?
(नृत्यदिग्दर्शकानेही नृत्य एखाद्या बॉलरूम-डान्ससारखे बसवलेले आहे.)

या गाण्यातली पहिली थोडीशी सुरावट "बेसामे"शी अगदी मिळतीजुळती आहे. "बेसामे" आणि "समा" दोन्ही गाणी हार्मोनिक मायनर मधली सुरावट वापरतात -
सा रे ग म प ध नी सां (अवरोह तसाच.)

आता पाश्चिमात्य संगीतात रागदारी नसते, आणि स्वरानुक्रम बदलणार्‍या आधारस्वराशी जुळवणारा असतो. परंतु दोन्ही प्रकारच्या स्वरानुक्रमामध्ये खोलवर काही सामान्यनियम असावा असे पटते.

काही पाश्चिमात्य अभासक अभ्यास करतात, की रागदारीतील स्वरानुक्रम स्वरमेळही जुळवतो. (तानपुर्‍याशी स्वरमेळ जुळतो, हे सर्वांनाच माहीत आहे, त्यापेक्षा थोडा वेगळा असा हा अभ्यास आहे.) त्याच प्रकारे भारतीय अभ्यासकांनी दुसर्‍या दिशेने हात मिळवत अभ्यास केला, की जे "स्वरमेळाचे नियम" म्हणतात, त्यांच्यातही रागदारीची झलक दिसते, तर फार उत्तम होईल. कारण अशा प्रकारचे निरीक्षण भारतीय संगीत मनापासून समजलेल्या, पाश्चिमात्य संगीत कुतूहलाने ऐकणार्‍या रसिकाकडूनच होऊ शकेल.

घाटावरचे भट यांना पुनश्च धन्यवाद.

डॉ.प्रसाद दाढे's picture

11 May 2009 - 10:52 pm | डॉ.प्रसाद दाढे

ट्यून घायाळ करणारीच आहे, पियानो पण एकदम क्लास वाजवलाय! थोडीशी 'मंजिल वोहि हैं प्यार कि.. (कठपुतली - शंकर जयकिशन - सुबीर सेन- बलराज साहनी) गाण्याची आठवण झाली..

घाटावरचे भट's picture

11 May 2009 - 11:19 pm | घाटावरचे भट

'बेसामे'ची साधारण स्केल 'सा रे ग् म प ध् नी सां' आहे. कोमल निषाद इंप्रोव्हायजेशन्स मधे दिसतो, पण फार कमी. साबालेता बाईंच्या गाण्यात कोमल ऋषभही दिसतो. म्हणून भैरवीशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न केला. बाकी गायक/गायिकेच्या शैलीनुसार इतर स्वर दर्शन देऊन जातात.

>>हे "समा" गाणे मुद्दामून पाश्चिमात्य सुरावटीला अनुसरून जुळवले आहे का?
ठाऊक नाही, पण बेसामे ऐकल्यावर लग्गेच त्याची आणि 'ये समां'ची सुरावट डोक्यात घोळायला लागली.

चित्रा's picture

12 May 2009 - 7:10 am | चित्रा

नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन वाचण्या/ऐकण्याची अपेक्षा पूर्ण झाली. सगळीच, विशेषतः सेसारिया एवोरा यांचे गाणे आवडले. मूळ गाणे लिहीले तिचे (कोन्सुएलो) पियानोवादन ऐकले तर सुरूवात कारूण्यपूर्ण होते, पण नंतर इतर गायकांनी भावनांचे प्रदर्शन जसे विचारपूर्वक केले आहे तसे मला वाटले नाही. तिचा आविष्कार बेदरकार आहे असे वाटले.

अवांतर -घाटावरचे भट यांनी म्हटल्यासारखी ये समा सारखी चाल वाटते आहे, खरे. आणि मला गाण्यातले काही कळत नाही हे आधी स्पष्ट करते. तरी एक दिन" ची सुरूवात (:१० च्या सुमारास) सेसारियाबाईंच्या सुरूवातीप्रमाणे वाटली. (:३७, :४० च्या सुमारास). बाकी साम्य (असल्यास) तेथेच संपत असावे.

धनंजय's picture

11 May 2009 - 7:04 pm | धनंजय

"भी लागे" म्हणजे "भीती वाटते"

गाणे चालीत बसवायचा प्रयत्न - आणि इथे ते चालीवर गाऊन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न!
Get this widget | Track details | eSnips Social DNA
गायनासाठी नव्हे, तर चालीत बसते इतपतच दाखवण्यासाठी ही ध्वनिफीत. मागच्या तंतुस्वराच्या चालीच्या भोवती रुंजी घालणारे गळ्यातले अपस्वर म्हणजे शकुंतलेच्या भोवती फिरून त्रास देणारे भुंगे... आहाहा काय सुंदर कल्पना आहे ;-)

मेघना भुस्कुटे's picture

11 May 2009 - 7:24 pm | मेघना भुस्कुटे

असाच उद्योग मी 'रंजिशी सही'च्या वेगवेगळ्या आवृत्त्या ऐकून केला होता. आशा भोसले, मेहंदी हसन, रूना लैला आणि आणिक कुणीतरी ते गायलेलं ऐकलं होतं.
पण तेव्हाही मला असाच प्रश्न पडला होता, आणि आताही पडतो - दरेक गायकानुसार गाण्यामधल्या भावात फरक पडतो हे तर मान्यच. पण त्याचे अन्वयार्थ लावताना, आपण आपल्या मूडनुसार, आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो की काय? हे एखाद्या कवितेच्या समीक्षेसारखं तर नाही? प्रत्येकाला दिसतं (इथे ऐकू येतं!) तेच आणि तितकंच खरं?

नंदन's picture

11 May 2009 - 7:27 pm | नंदन

दरेक गायकानुसार गाण्यामधल्या भावात फरक पडतो हे तर मान्यच. पण त्याचे अन्वयार्थ लावताना, आपण आपल्या मूडनुसार, आपल्या पूर्वग्रहांनुसार लावतो की काय? हे एखाद्या कवितेच्या समीक्षेसारखं तर नाही? प्रत्येकाला दिसतं (इथे ऐकू येतं!) तेच आणि तितकंच खरं?

- हेच लिहायचं होतं :). रोजामधल्या गाजलेल्या 'दिल है छोटासा' या गाण्याची चाल रेहमानने एक दु:खी गाणं कल्पून लावली होती, असं त्याच्या एका मुलाखतीत त्याने सांगितल्याचं आठवतं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्राजु's picture

11 May 2009 - 7:59 pm | प्राजु

१९४२ अ लव्ह स्टोरी.. मधलं कुछ ना कहो हे गाणं कुमार सानू आणि लता मंगेशकर या दोघांनीही दोन वेगवेगळ्य मूड मध्ये गायलं आहे.
कुमार सानू यांनी गायलेलं गाणं एकताना, एक रोमँटीक फील येतो आणि ..

लतादीदींच्या आवाजात ऐकताना त्यात आर्तता जाणवते.. विरह जाणवतो.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

11 May 2009 - 8:25 pm | श्रावण मोडक

दोन मूडचं एक उदाहरण, माझ्या आवडीचं - दिल ढुंढता है फिर वही फुरसतके रात दिन... मौसम!
आवडतं, कारण एक आठवण. काही वर्षांपूर्वी एकदा भर दुपारी प्रचंड कडाक्याच्या उन्हाळ्यात रस्त्यापलीकडच्या कॉलनीतून या गाण्याच्या हसऱ्या आविष्काराची सुरावट ऐकू आली आणि त्या भर उन्हातदेखील आल्हाददायक वाटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी रात्री वळवाचा पाऊस आल्यानंतर भूपिंदरचं गंभीर गाणं ऐकलं. वळवाचा पहिला पाऊस सहसा साधारण संध्याकाळी येतो. त्या दिवशी तो रात्री साडेअकराला आला. त्यामुळं तो लक्षात राहिला आणि त्यासोबत ते गाणंही.

चतुरंग's picture

11 May 2009 - 8:38 pm | चतुरंग

हेच आठवायचा प्रयत्न करत होतो गेला काही वेळ! हेच गाणं मलाही आवडतं, असंच दोन मूड्स मधलं त्या त्या वेळी ते ते भावतं तेवढंच उत्कटतेने.
धन्यवाद श्रावणदा!

चतुरंग

श्रावण मोडक's picture

11 May 2009 - 8:47 pm | श्रावण मोडक

संगीतातलं काहीही कळत नसल्यानं यात मी एक वेगळी मौज घेतो ती पहिल्या अक्षरावरची.
हसऱ्या मूडमध्ये दिल ढुंढता है यातल्या दिल शब्दाचा उच्चार किंचित 'दिल्' असा आहे. गंमत वाटते आणि तिथंच त्या गाण्याचा भावही व्यक्त होऊन जातो. गंभीर गाण्यात तो 'दि...ल' असा आहे. त्या 'दि...ल' या शब्दातच या गाण्याची भावावस्था व्यक्त होऊन जाते.

यशोधरा's picture

11 May 2009 - 10:06 pm | यशोधरा

सुरेख धागा! धनंजय व इतरांचेही दिलेल्या दुव्यांसाठी धन्यवाद.

संदीप चित्रे's picture

30 Jun 2009 - 6:49 pm | संदीप चित्रे

सगळी चर्चा वाचायलाही मजा येतेय.

नितिन थत्ते's picture

11 May 2009 - 10:48 pm | नितिन थत्ते

खिलते हैं गुल यहां हे शर्मिली चित्रपटातील गाणं. दोन्हीची चाल आणि शब्द जवळजवळ समान आहे. फक्त लताबाईंनी गाताना सूर लांबवत म्हटले आहे. त्यामुळे दोन्हीचा मूड वेगवेगळा भासतो.
(अशी हिंदी सिनेमांमध्ये खूप गाणी आहेत जी चित्रपटात दोन वेगळ्या वेळी वेगळ्या मूड्मध्ये गायलेली आहेत. अशी गाणी एकापाठोपाठ ऐकली की एक वेगळीच मजा येते.)

खराटा
(रंग माझा वेगळा)

असे कुठेसे वाचल्याचे आठवते.
माझे आवडते म्हणजे - मेरे नैना सावन भादो - ह्यात अर्थात किशोर ने गायलेले मला जास्त आवडते लता पेक्षा.

अनामिक's picture

30 Jun 2009 - 6:09 am | अनामिक

हा धागा कसाकाय वाचायचा राहून गेला काय माहीत!
एका सुरेख गाण्याच्या दुव्याबद्दल धनंजय यांचे आभार!

-अनामिक

वाटाड्या...'s picture

30 Jun 2009 - 8:03 am | वाटाड्या...

धनंजयराव आणी भटोबा...

सुरेख धागा आणि गाण्यांची उधळण....

विसोबा खेचर's picture

30 Jun 2009 - 8:54 am | विसोबा खेचर

गाणं तसं ठीकच वाटलं...विशेष श्रवणीय असं काहीच जाणवलं नाही..

दुसर्‍या चित्रफितीतील पियानोवादन मात्र झकास! तेच शेवटच्या चित्रफितीबाबत! पियानोवादनात या गाण्याचा जो आत्मा आहे तोच शेवटच्या चित्रफितीत दिसतो..

ये समा, समा है.. चा मुखडा पुष्कळसा असाच आहे..

बाकी, भटसाहेब म्हणतात त्याप्रमाणे या गाण्याचा आणि भैरवीचा मला तरी दुरान्वयेही संबंध दिसत नाही..भैरवीचा फीलच वेगळा,भैरवीचा गोडवाच वेगळा, भैरवीचा आत्माच वेगळा!

बाकी एकच गाणे अनेक गायकांनी गाण्याबाबत म्हणाल तर तो अनुभव मी आमच्या हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या अनेकानेक मैफलींमधून घेतला आहे, घेतो आहे. एखादा राग, किंवा एखादी बंदिश अनेक गायका़कडून ऐकण्यात आनंद तर वेगवेगळा असतोच परंतु तो माझा केवळ आनंदाचा विषय नसून अभ्यासाचाही विषय आहे. यामुळे गाण्यात बहुशृतता येते. एखादा गायक एखाद्या बंदिशीकडे कसं बघतो, ती कुठल्या अंगाने/बाजाने गातो किंवा एखाद्या घराण्यात एखाद्या रागाकडे कसे बघितले जाते, सुराच्या अंगाने, बोलाच्या अंगाने, लय-तालाच्या अंगाने इत्यादी..

एकाच बंदिशीबाबतची किंवा रागाबद्दलची ही विविधता आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतात अगदी ओतप्रोत आहे. खूप श्रीमंत आहे आपलं संगीत..!

असो..

धन्याशेठ, चांगला लेख. येऊ द्या अजूनही...

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

मारवा's picture

27 Oct 2015 - 7:26 pm | मारवा

मिपा क्लासिक-१

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2015 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय.

(२ ते १० किंवा १०० ही येऊ द्या. :) )

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Oct 2015 - 5:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

उत्खनन करून अजून काही हिरे वर काढा... ते वाचून-ऐकून मजा तर येईलच, पण त्यानिमित्ताने काहींच्या प्रतिभा नव्याने बहरून काही मस्त नवीन वाचायला-ऐकायलाही मिळेल !

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2015 - 5:32 pm | बिपिन कार्यकर्ते

होऊन जाऊ द्या. मी पण शोधतो.

एस कॉम्ट मिअऽ श्पानिश फोर!! =))