पॅरिसमधील शिवचरित्र

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
12 Nov 2023 - 1:30 am

गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे.

या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात.

दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले. या सर्वांचा एक व्हिडीओ YouTube वर त्या वेळी टाकला होता (आज मला त्याची लिंक सापडत नाहीये - कुणाकडे असेल तर जरूर द्या). या प्रसंगी बाबासाहेबांनी एक छोटे भाषण केलेले आहे. त्यात त्यांनी त्यांच्या इतिहास-संशोधनासाठी परदेशवारी-संबंधित २-३ किस्से सांगताना एक उल्लेख केला होता, तो म्हणजे BnF, Paris येथे काही मोडी लिपीतील कागद असून बाबासाहेबांना BnF ने ते कागद वाचून देण्याची विनंती केली. परंतु, बाबासाहेबांनी ते कागद वाचून दिले का, इतर कुणी ते वाचले का, त्यात इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे काही आहे का या प्रश्नांची उत्तरे त्या किस्स्याशी संबंधित नसल्यामुळे बाबासाहेबांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाहीत. परदेशात असल्याने बाबासाहेबांना भेटून हे विचारण्याची संधी मला त्यानंतर झालेल्या बाबासाहेबांच्या दुर्दैवी निधनामुळे मिळू शकली नाही. ते प्रश्न अर्थातच आता अनुत्तरीत राहणार अशी खंत मला वाटत होती.

काही महिन्यांपूर्वी Bibliothèque nationale de France (BnF) येथील manuscripts deparment मधील जुनी कागदपत्रे चाळत असताना मोडी लिपीतील काही कागद मला आढळले - माझ्या अंदाजाप्रमाणे बाबासाहेबांनी उल्लेख केलेले कागद हेच असावेत. या कागदांमध्ये एक बखर मला सापडली, तिचे BnF मधील नाव होते - "शिवचरित्र". अर्थातच मी आधी ते संपूर्ण वाचले. ही बखर इंटरनेटवर टाकलेली असून ती कुणालाही इथे वाचता येईल (अर्थात मॊडी वाचता येत असेल तर)
https://archivesetmanuscrits.bnf.fr/ark:/12148/cc104202w

ही बखर आणि अन्य कागद पॅरिसमध्ये कसे पोचले याची हकिगतही रोचक आहे. मेस्तर फ्रांसिस डोचवा नावाचा विद्वान फ्रेंच मनुष्य १८४० च्या दशकात पुण्यात होता. या काळात त्याने जमवलेल्या जुन्या पोथ्या आणि हस्तलिखिते त्याने आपल्यासोबत पॅरिसला नेली, ती आज BnF च्या संग्रहात आहेत. डोचवा याच्याबद्दल मला वाटते अ. रा. कुलकर्णी यांनी थोडे लिहिले आहे. बहुदा बाबासाहेबांच्या नंतर शंकर गोपाळ तुळपुळे यांनी हे कागदपत्र अभ्यासून त्याचा इंग्रजी कॅटलॉग बनवला तो आज इथे मोफत वाचता येईल :
https://www.persee.fr/doc/befeo_0336-1519_1986_num_75_1_1702

आता शिवचरित्राविषयी थोडेसे : हे हस्तलिखित बाळाजी गणेश, कारकून, निसबत चिटणीस, सरकार यांनी राव पंतप्रधान याना अर्पण केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी. त्यांचे पुत्र खंडो बल्लाळ चिटणीस यांनी शाहू महाराजांची वंशपरंपरा चिटणिशी केली. त्यांचे धाकटे बंधू निळो बल्लाळ यांच्या वंशजांकडे मात्र पेशव्यांची चिटणिशी होती. त्यांच्याच वंशातील महिपतराव चिटणीस हे पानिपतच्या रणभूमीवर हजर होते. या पेशव्यांच्या चिटणीसांच्या कारकुनाने म्हणजे बाळाजी गणेश, कारकून, निसबत चिटणीस, सरकार याने ही बखर लिहिली आहे. शक आकड्यावर नेमकी शाई सांडली आहे, लिहिण्याचे साल शुभकृत संवत्सर म्हणजे बहुदा पेशवाईतील इसवी १७८२ साल असावे. शेवटी सवाई माधवरावाच्या लग्नाचे वर्णन आलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त ढोबळ माहिती यात आली आहे, परंतु मुख्यतः छत्रपती शाहू महाराज आणि नंतरच्या पेशव्यांची हकीगत यात आहे. शहाजी महाराजांचा जन्म श्री भवानी प्रसन्न झाल्याने झाला असे इथे लिहिलेले आहे (दर्ग्याचा उल्लेख नाही).

वि. स राजवाड्यांना ह्या बखरीच्याच प्रती महाराष्ट्रात सापडल्या आणि त्यांनी त्यातील शुद्ध प्रत आपल्या खंड ४ मध्ये प्रसिद्ध केली आहे. राजवाडे म्हणतात - "शके १७०४ पर्यंतची पेशव्यांची बखर हें या ग्रंथांतील दुसरें प्रकरण आहे. ही बखर सवाई माधवरावाकरितां नाना फडणिसांनीं चिटणिसांकडील बाळाजी गणेश ह्या कारकुनाकडून लिहविली. ही बखर, एक दोन क्षुल्लक अपवाद काढून टाकिले असतां, येथून तेथून पूर्णपणें विश्वसनीय आहे. सवाई माधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांच्याकरितां ही बखर लिहिली असल्यामुळें, अर्थातच् ही अत्यंत त्रोटक आहे. परंतु कालाचा किंवा स्थलाचा किंवा प्रसंगाचा विपर्यास झालेला या बखरींत क्वचित् सांपडेल, किंबहुना सांपडणारच नाहीं. ह्या बखरीच्या एकंदर पांच प्रती मिळाल्याः- पुणें येथील ताई साठी इच्या वंशजांकडून एक, काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दोन व वसई येथील दिवेकर यांजकडून दोन. पैकीं साठ्यांची बखर व दिवेकरांची एक बखर पूर्ण आहेत. बाकीच्या तिन्ही बखरी अपूर्णं आहेत. ही बखर शके १७०४ शुभकृत् संवत्सरीं लिहिली. हीत सवाई माधवरावाच्या लग्नाचा ताजा उल्लेख आहे. ह्या बखरींतील बरेच प्रसंग बखरनविसानें स्वतः पाहिले असल्यामुळें व ज्यांनीं ते प्रसंग स्वतः पाहिले त्यांच्याकरितां व त्यांच्या आज्ञेवरून ही सजविली असल्यामुळें, ही बखर विश्वासपात्र आहे. अधून मधून पेशव्यांची स्तुति केलेली आहे, ती देखील मर्यादित असून, तींत पक्षपातात्मक किंवा अप्रस्तुत असें एकहि वाक्य आढळावयाचें नाहीं. ही बखर त्रोटक नसून विस्तृत असती म्हणजे इतिहासाचें फारच हित झालें असते. महाराष्ट्रांत आजपर्यंत जेवढ्या म्हणून बखरी छापून प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या सर्वांत बिनचुकपणाबद्दल हिला अग्रमान देणें रास्त आहे. विश्वासरावाच्या स्वारीसंबंधीं थोडीशी गफलत झालेली दिसते, ती शके १६७२ पासून १६८३ पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासांतील शेंकडों प्रसंगांचें एक दोन पृष्ठांत वर्णन देण्याच्या घाईनें झालेली आहे हें वाचकांच्या लक्षांत येईल."

ही बखर मराठीतून येथे वाचता येईल :
https://samagrarajwade.com/marathyanchya-itihasachi-sadhane-khand-1/mara...

असो, सध्या वाघनखांचा प्रश्न तर मार्गी लागला, परंतु मराठ्यांच्या इतिहासाची ही महत्वाची साधने - हे अस्सल दस्तऐवज, ज्यातील अनेक फार्सी लिपीतील आहेत - त्यापैकी आपण काय काय माघारी आणणार आहोत? स्वतःच्या अभिलेखागारांमध्ये शासनाकडे आज कोट्यवधी ऐतिहासिक कागद पडलेले आहेत. मूळ कागद सोडून द्या, पण त्यांची छायाचित्रे इंटरनेटवर मिळतील (जे राजवाडे मंडळ आणि BnF या खाजगी संस्थांनी केले आहे) अशी सोय शासन करू शकेल का? आणि सर्वात महत्वाचे, हे कागद वाचणारे, त्याचा अभ्यास करणारे, त्यावर लिहिणारे अभ्यासक आज आपण निर्माण करू शकतो का?

(लेख Facebook वरही प्रसिद्ध केला आहे - तिकडचे वाचक वेगळे, त्यासाठी)

संस्कृतीइतिहासवाङ्मयभाषाप्रकटन

प्रतिक्रिया

मूळ बखरीतील हा परिच्छेद छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ते सांगतो : "त्यास, मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन- त्या कालीं साता वर्षांचे होते- वय लहान होत्साता तेव्हांपासून मोठमोठीं अमानुषीं कर्में करून राज्य मेळविलें. म्लेंच्छादि शत्रू पादाक्रांत करून धर्मक्षेत्रादि महास्थानें, तीर्थाचीं व देवाचीं, स्थापना, पूजा ब्राह्मणापासून ब्रह्मकर्मे यागादि करवून श्रीरामेश्वरापासून गोदातीरपर्यंत धर्मस्थापना केली. शयाद्रि पर्वताचे किल्ले व समुद्रांतील बेटें, जंजिरे बांधून, फौज व पागा व हशम चाकर ठेऊन राज्यवृध्दी केली. मोठमोठे बलाढय तांब्र विजापूराहून व दिल्लीहून चालून आले. त्यांचा पराभव करून महाराष्ट्र राज्याची अभिवृध्दी पाववून निर्वैर केलें. त्या कालीं चित्तांत आणिलें कीं सर्व शत्रू पराभव झाले. आपल्या जवळ द्रव्यसंग्रह व मुलुख, किल्ले, कोट, फौज, पागा व पदाती व सरकारकून व सरदार पराक्रमी राज्य संरक्षणास असे आहेत. याजउपरि आपण सिंहासनाधीश्वरत्व करावें. हा संकल्प करून चाळीस वर्षांचें वय झाल्यानंतरीं किल्ले रायगडावर शालिवाहन शके १५९५ आनंदनामसंवत्सरीं ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीस यथाशास्त्रोक्त सर्वांसमोर थोर थोर शिष्ट ब्राह्मण आणून राज्याभिषेक करून सिंहासनाधीश होते झाले. अष्टप्रधान ज्यास जें पद योग्य, स्वामीसेवेचे ठायीं तत्पर, कार्यकर्ते, पाहून योजिले. सिंहासनारूढ झाल्यावर सात वर्षेंपर्यंत धर्मरीतीनें राज्यपालन करिते झाले. "

"मोगलांनी हिंदुधर्माचा उच्छेद करून म्लेंछमय करावें या दुर्वृत्तीस प्रवर्तक झाला. तें देवास न साहे. यवनाचें पारपत्य करून हिंदुधर्म स्थापावा, याजकरितां शिवाजी महाराज यांजवर श्रीची कृपानुग्रह होऊन" ही वाक्ये फार महत्त्वाची आहेत. यातून महाराज कसे होते याबद्दल पेशवेकालीन लोकसमज कशी होती ते आपल्याला जाणवते.

कंजूस's picture

12 Nov 2023 - 5:17 am | कंजूस

संतोष.

तर यापुढे कुणी ना कुणी या कागदपत्रांचा मागोवा घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे.
मोडी लिपीसाठी मोडीदर्पण या नियतकालिकेचे दरवर्षी चार अंक निघतात. मागच्या दिवाळीचा अंक चांगला होता. पहिले सहा लेख मोडी लिपीमध्ये आणि त्यांचेच मराठीमध्ये लिप्यंतरही दिले होते. शिवाय मोडी बाराखडी व काही शब्दही होते. एकूण मोडी शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त अंक होता. अंकात इतर लेख कोकणातील पर्यटनाविषयी मराठी बाळबोधीत होते.
वाघनखे हे एक हत्यार म्हणून राजस्थानमधील महालांत क्वचित दिसते. Everyman's Searies या पर्यटनविषयक प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाने भारतात फक्त एकच पुस्तक काढले होते ते राजस्थानचे. ( ISBN 1-85715-887-3 )
भरपूर फोटो ,नकाशे आणि समग्र माहिती देणारे एवढे रंगीत पुस्तक अजून कुणाचे नसेल. तर यामध्ये वाघनखे आहेत.(Weaponry,page 200). पाच नखे एकाच बाजूला आहेत. पहिले बोट आणि करंगळीत सरकवण्यासाठी कड्या आहेत.

भागो's picture

12 Nov 2023 - 5:44 am | भागो

सुप्रभात!
नरकासूर वधाचे आख्यान लावले आहे.

श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र वापरून नरकासुराचा वध केला.
महाराजांनी वाघनखे वापरून अफझलखानाचा वध केला.
छान लेख आहे.

तुषार काळभोर's picture

12 Nov 2023 - 10:13 am | तुषार काळभोर

मराठी बखर वाचली. अतिशय छान लिहिलं आहे. वाचताना अतिशोयक्ती हा बखरींचा गुणधर्म टाळल्याचे जाणवते. आठ वर्षांच्या मुलास आपला इतिहास व्यवस्थित समजेल, याची काळजी घेतली आहे. म्हणजे मालोजी राजे - शहाजी राजे - शिवाजी महाराज - संभाजी महाराज - राजाराम महाराज - शाहू महाराज इथपर्यंत चढत्या क्रमाने विस्ताराने लिहिले आहे. (लेखन काळाच्या दृष्टीने) अलीकडील काळ (बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाई दिल्यापासून अधिक विस्ताराने लिहिले आहे.
संताजी घोरपडे यांचा अंत कसा झाला, हे पहिल्यांदा कळले.
बाळाजी नानांनी कान्होजी आंग्रे यांना कसे वळवून घेतले, किल्ले सोडवून घेतले, हे देखील रोचक.

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2023 - 11:56 am | कर्नलतपस्वी

देशात परत आल्यास वाचक,अभ्यासक जरूर वाढतील.संदर्भ शोधकार्यात मदतगार ठरतील यात शंकाच नाही. महाराष्ट्राचा इतीहास मराठी नेत्यांनी पुढाकार घेऊन आणला पाहीजे.

मनो's picture

13 Nov 2023 - 7:31 am | मनो

ता. क. : Rajendra Dhume यांचे खूप आभार, त्यांनी बाबासाहेबांचा मूळ व्हिडिओ उपलग्ध करुन दिला. बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये या कागदांचे महत्व इथे ऐका.

https://youtu.be/AcngiBh_vXo?feature=shared

प्रचेतस's picture

14 Nov 2023 - 10:00 am | प्रचेतस

उत्तम केलेत हा लेख लिहून. वेगळी माहिती मिळाली.

सर्व वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्यांचे धन्यवाद!