डिस्क्लेमरः
ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही.
---
आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही.
एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला अगदीच नगण्य गुंतवणूक झाली.
आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो. असो.
स्वानुभवातून काही बाबी मला जाणवल्यात त्या अशा:
- आपल्याकडे आर्थिक नियोजनाबद्दल निरक्षरता खूप आहे. आणि या विशिष्ट निरक्षरतेचं सर्वात् मुख्य कारण म्हणजे जगतांना आवश्यक असणाऱ्या सर्वसाधारण शिस्तीचा अभाव हे आहे. हेच पैसा कमी पडण्याचं एक प्रमुख कारण देखील आहे.
- आपल्याकडे बहुतांशी, गणित हा विषय अत्यंत कठीण/जणू काही शत्रूच असे लहानपणापासून कळत/नकळत मनावर बिंबवल्या जातं. "ते अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत आणि जाणीवपूर्वक टाळायला हवेत.
- नियोजनातला प्रमुख भाग हा उत्पन्नाच्या किती प्रमाणात आपण गुंतवणूक केली पाहिजे हा आहेच (सर्वसाधरण आवश्यक खर्च, पुढची गरज यावरून प्रमाण ठरतं), पण त्याहीपेक्षा त्यामागची नियमितता जास्त महत्त्वाची आहे. शिस्त लागते ती इथेच. They say, "commitment will help you to initiate a thing, consistency will help you to accomplish it."
- गुंतवणूक करण्याआधी बेसिक लॉजिक, शक्य तेवढा जास्तीत जास्त सखोल अभ्यास आणि आपल्या अभ्यासावरचा आपला स्वतःचा विश्वास हे फार महत्त्वाचं आहे.
- जर कोणतीही गुंतवणूक केवळ कोणा दुसऱ्याच्या अभ्यासावर अवलंबून केलेली असेल, तर त्या गुंतवणुकीला जुगार म्हणण्यास वाव आहे (त्यात फायदा/तोटा किती हा भाग गौण आहे). जर आपण अभ्यास करण्याचेही कष्ट उपसणार नसू, तर तो पैसा मिळण्यास आपण अपात्र आहोत हे समजून घ्यायला हवे.
- बचत आणि उत्पन्न या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. दोन्हींमधे संतुलन हवं तसंच दोन्ही वृद्धिंगत व्हायला हव्यात. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणं हाही गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग आहे.
- टॅक्सेस हा विषय नीट समजून घेऊन त्यानुसार गुंतवणूक, निर्गुंतवणूक आणि पुनर्गुंतवणूक करायला हवी. यातून बरीच बचत होऊ शकते.
- नशीब हा एक अपरिहार्य, अनाकलनीय आणि अत्यंत महत्त्वाचा "घटक" न मानता "साथिदार" आहे असे मानत जावे. त्याचा वाटा वेगळा काढून ठेवायलाच हवा.
- पैसा कमवणं, गुंतवणं, साभाळणं, पुनर्गुंतणूक करणं या बरोबरच योग्य विनियोग करणं हाही गुंतवणूकीचाच भाग आहे. विनियोग आणि खर्च या दोन गोष्टींत मूलभूत फरक आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य विनियोग होत नसेल तर ती गुंतवणूक नासली असे समजण्यास हरकत नाही.
- पैसा हा जवळ-जवळ नेहमीच पैशाकडे जातो आणि पैशाचं सोंग कधीही आणता येत नाही. आपली मदत आपणच करायची आहे हे स्वतःच्या मनावर पक्के बिंबवावे. कोणीही (अक्षरशः कोणीही) आपल्या मदतीला येणार नाहीये ह्याची आपण नीट जाणीव ठेवायला हवी. जर कोणाची मदत झालीच तर तो बोनस समजावा. पण आपण स्वतः पुरेसं स्थिरस्थावर झाल्यावर निदान दोन योग्य व्यक्तींना "पायावर" उभं राहण्यास जरूर मदत करावी (don't serve them fish... equip them with knowledge to fish) आणि परताव्याऐवजी त्यांना असंच आणिक दोन योग्य व्यक्तींना मदत करावयास सांगावे.
बाकी गुंतवणूक वेगवेगळ्या बास्केट्स मधे करावी, विम्यातून अपेक्षा केवळ सुरक्षेची ठेवावी वगैरे बाबी सर्वच जण जाणतात.
गुंतवणूकीसाठी नेहमी काहीतरी भव्यदिव्यच स्ट्रॅटेजी असली पाहिजे असे काही नाही.
They say, "simplicity is the most complicated thing to achieve.." and it's true.
सध्या इतपतच. आणिक काही सुचले तर जरूर लिहेन. कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे.
इत्यलम्
प्रतिक्रिया
24 Sep 2023 - 5:49 pm | कॉमी
छान लेख.
24 Sep 2023 - 7:24 pm | चित्रगुप्त
या बाबतीतला माझा अनुभव म्हणजे जरा बरी नोकरी लागल्यावर पन्नाशीत सुमारे आठ-दहा वर्षे दर महिन्याला पोस्टाची NSC घेणे यापलिकडे काहीही केले नाही. एकदा कुणाच्या तरी सल्ल्याप्रमाणे काही म्युच्युअल फंड का काय घेतले त्यात नुकसानच झाले, ते अक्कलखाती जमा केले. बाकी प्रापंचिक खर्च आणि घर बांधणे यातून शिल्लक कधीच रहायची नाही. गेल्या वर्षी घर विकून आलेले पैसे आता 'वाढवायचे' नसून 'खर्च करायचे' असल्याने एफडीशिवाय अन्य काही केलेले नाही. या बाबतीत आवड, अभ्यास आणि ज्ञान शून्य असल्याने त्या वाटेलाच गेलो नाही. मात्र नशिबाने एकंदरित आयुष्य चांगले व्यतीत झाले आणि जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
-- जे आपल्याला कळत/आवडत नाही, त्या वाटेला लागण्याऐवजी आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहिलो तर आपले जीवन सफळ, परिपूर्ण, समाधानकारक, सार्थक होते असा माझा अनुभव आहे. आपण आपल्या आवडीचे कार्य निष्ठेने करत आहोत, हे समाधान फार मोठे असते. पैसा नशिबाने येत-जात असतो. ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही.
-- अर्थात हे माझे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात.
25 Sep 2023 - 12:29 am | राघव
कॉमी आणि चित्रगुप्त सर, आपल्या प्रतिसादा साठी धन्यवाद!
अगदीच अव्याहतपणे नाही, पण हे मी देखील करत आलोय आणि त्यातला आनंद नेहमीच उल्हसित करून जातो हे अगदीच खरे आहे! :-)
नंतर खेद करण्यात अर्थ नाही हे जरी खरे असले तरी, पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यावेळेस योग्य गुंतवणूक केलेली असती तर घरी देखील हातभार लावता आला असता, वडिलांवर असलेला भार जरा हलका करता आला असता, इतकेच म्हणायचे होते.
:-) माझे विधान सरसकट नाही, तसे सूचीत झाले असल्यास क्षमस्व.
विदारक आणि अहितकारक हे त्यांच्यासाठी आहे की जे योग्य प्रयत्न करण्याआधीच ठरवून बसतात की "आपल्याला काही समजत नाही." एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करून घेणे हे अहितकारकच आहे. हे मी स्वतः केलेले आहे. पण जेव्हा समजून घ्यायला घेऊन बसलो तर लक्षात आले की, हे फार काही रॉकेट सायन्स नाही. काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या, डोके लावायचे आणि प्रयत्न करून पहायचे इतकेच केले.. त्यातूनही बरेच काही करता आले. अजूनही स्टॅटिस्टिक्सच्या वाट्याला जाऊन सगळे समजून घेणे झालेले नाही.. पण मनावर घेतले तर तेही काही अशक्य वगैरे नाही.
एखाद्या गोष्टीची गरज नसणे वेगळे आणि एखाद्या बागुलबुव्यापोटी त्या गोष्टीच्या वाटेलाच न जाणे वेगळे, इतकेच.
पुनःश्च धन्यवाद!
25 Sep 2023 - 6:26 am | कर्नलतपस्वी
मी किंवा चित्रगुप्त मागील पिढीतले. अगदीच मोजका पगार, पाच सहा भावंड,म्हातारे आईवडील, बहिणी च्या लग्नात हातभार, भावांचे शिक्षण अशा वाडा संस्कृतीत वाढलेले. मार्केट या नावावर फक्त भाजी मार्केट माहीत असलेले. शरद तळवलकर, ए के हंगल कडून प्राॅव्हिडंट फडांचे महत्व कळालेले.
मोहम्मद रफी कडून "वो दुनिया बाबूल का घर ,ये दुनिया ससूराल", कळाले.
"कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा आपुल्या माहेरा",
तेव्हा बहुतेक जण कारल्याचा वेल लावून केव्हां कारली येतील वाट बघत बसलेले. बरेचसे कारली यायच्या आगोदरच माहेरी निघून गेलेले.
कसले नियोजन आणी काय....
पुढे काळ बदलला,परीवार नियोजन आल्यावर बर्या पैकी पैसा हातात खेळू लागला. एकत्र कुटुंब ते एकच कुटुंब अशी परिस्थिती, "आपळो छोकरो,आपळो धनी बरोबरच आपळो मनी" संस्कृती वाढीस लागली.
अर्थिक नियोजनाचे वारे वाहू लागले.
25 Sep 2023 - 7:05 am | चित्रगुप्त
@कर्नल तपस्वी: थोडक्यात अगदी नेमके सांगितलेत. आमच्या आणखी आधीच्या पिढीच्या (शहरात रहाणार्या) लोकांपैकी कित्येकांना तर आयुष्यात स्वतःचे घर घेता आले नव्हते. माझ्या लहानपणी ज्या घरात रहायचो त्याचे भाडे मुळात साडेसात रुपये होते ते नंतर वाढत पंचवीस पर्यंत झाले होते. मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला होता (दोन वर्षांनंतर ते सोडून दिले) त्याची सहा महिन्याची फी पावणे दोनशे रुपये होती, ती सुद्धा जमवणे वडिलांना कठीण जायचे. मला दीडशे रुपये महिन्याची पहिली नोकरी लागली, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत खाते उघडले ते पाच रुपये जमा करून. कसली बचत आणि कसले नियोजन. शेयर मार्केट वगैरे शब्द पण ऐकले नव्हते... पण त्याकाळी जो आनंद उपभोगला, त्याची सर कशालाच नाही.
25 Sep 2023 - 9:38 am | राघव
माझ्या वडिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे. अगदी कमी पगार, घरात माणसं ४-५ किंवा अधिक, त्यात आणिबाणीत फसलेलं घरचं बजेट.. त्यावेळी जे कर्जाचं शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागलं ते जवळ-जवळ ३० वर्ष चाललं. सगळं निभावून झालं, पण बहुतांश मध्यमवर्गीयांची अशीच परिस्थिती होती असं वाटतं.
25 Sep 2023 - 8:27 am | कंजूस
लहानपणी वर्तनाचे संस्कार होतात.
तसे आर्थिक संस्कारही होणे गरजेचे असते. त्यातूनच बचत, गुंतवणूक आणि मौजमजा किती करणे हे ठरवणे पुढे सोपे जाते. मोठेपणी मित्रांच्या जोडीने काही करताना वाहवत जाणे टाळता येते.
संस्कार झाले नसल्यास निरीक्षण करून शिकले पाहिजे.
25 Sep 2023 - 9:48 am | राघव
लाख बोललात कंकाका. हे असं कमीत कमी शब्दांत सांगता यायला पाहिजे राव. :-)
का कुणास ठाऊक पण घरी मी हे पाहिलंय की नियोजनाच्या विचारालाच फाट्यावर मारलेले असायचे. आई काटकसरीनं जपून पैसे खर्च करायची कारण मुळात पैसाच पुरेसा नसायचा. हिशेब लिहून ठेवायची. पण बाबांना ते पटायचं नाही. त्यांचं आपलं साधं धोरण म्हणजे "आले ते जमा, गेले तो खर्च, राहिले ती शिल्लक".. अर्थात् शिल्लक बहुदा उरायची नाहीच. म्हणायचे फार पैसा-पैसा करू नये! यामुळं आईनंही पुढे लक्ष काढून घेतलं.
गुंतवणुकीचं नियोजन म्हणजे पैशाचा हव्यास नाही, हे बाळकडू त्यामुळं आम्हाला मिळालंच नाही. :-)
25 Sep 2023 - 10:15 am | कर्नलतपस्वी
आडात असेल तर पोहर्यात येईल आशा परिस्थितीत कसले संस्कार आणी कसले नियोजन.
पण एक मात्र नक्कीच शिकवलंय आंथरूण पाहून पाया पसरावे
हे ज्यांनी गाठी बांधलं त्यांची तीसरी पिढी व्यवस्थित अर्थीक नियोजन करत आहे.
झाकली मूठ सव्वा लाखाची ,सर्व उलगडून सांगता येत नाही.
25 Sep 2023 - 12:01 pm | कंजूस
कर्नल, सहमत.
पण होतं काय की कुणीतरी सुरुवात करायला तर हवी. मग पुढचा शहाणा होतो. आपल्या समाजातले लोक आपल्यासारखेच वागत असतात आणि तिथून काही शिकता येत नाही. दुसरीकडे पाहून हळूहळू मतं बनवायची आणि मग वेळ येईल तेव्हा उडी घ्यायची.
हल्ली बऱ्याच स्कीम्स ( योजना) खुणावत असतात. त्यात काही मुलांसाठी पंधरा वर्षांच्या. ती मोठी झाली की शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्याचं काय झालं? मिळणारी रक्कम आताच्या शिक्षणाला पुरते का?
जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत काही वेगळे निर्णय घेता येत नाहीत.
बाकी सामान्य गुंतवणूकदार काय करतो तर जिथे बरीच चर्चा झाली तिथे घुसतो आणि हुशार लोक त्यात अगोदर घुसून त्यावेळी बाहेर पडत असतात.
पण हे सर्व निरीक्षण करूनच मिळवायचं असतं.
25 Sep 2023 - 9:53 am | अहिरावण
उत्पन्न - गुंतवणुक - आपत्कालसाठी बचत = खर्च
25 Sep 2023 - 10:11 am | अमर विश्वास
आर्थिक नियोजन .. म्हणजे आजच्या साठी उत्पन्न खर्चाचा ताळमेळ आणि भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ...
आर्थिक नियोजनाचे थोडेसे आरोग्यासारखे आहे .. आजारी पडलो कि आपल्याला डॉक्टर आठवतो ... बाकी वेळी आपण वाट्टेल ते खाऊन , व्यायामाचा कंटाळा करून आरोग्याचा घात करत असतो ..
आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने वाट्टेल ते खाणे म्हणजे अनावश्यक खर्च ... आणि व्यायाम म्हणजे गुतंवणूक ... आज नको वाटली तरी भविष्यसाठी आवश्यक ...
तसेच डॉक्टर म्हणजे आर्थिक सल्लागार ... जसे आपण डॉक्टर कडे जातो .. स्वतः औषध घेत नाही ... तसेच गरज असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घेण आवश्यक आहे
आर्थिक सल्लागार .. यातही दोन प्रकार आहेत ... Finanacial Planner वर Investment Consultant ...
शेवटी योग्य डॉक्टर गाठणेही महत्वाचे ...
25 Sep 2023 - 4:14 pm | राघव
अॅनालॉजी आवडली!
पण स्वतः थोडादेखील अभ्यास केल्याविना कोणत्याही प्लॅनर कडे संपूर्ण पोर्टफोलीओ देण्याच्या मी विरुद्ध आहे.
मागे एकदा एका प्लॅनरसोबत मीटींग झाली. तेव्हा त्याचा सल्ला होता की सध्याच्या गुंतवणुकीतून मी काही भाग विकावा आणि त्याच्याकडे द्यावा. त्यावर मी त्याला म्हटले "ही गुंतवणूक करतांना माझा काहीएक विचार होता. आज जर मी ती गुंतवणूक मोडायची असेल तर मला तसं सबळ कारण सांग. केवळ तुला गुंतवणुकीसाठी निधी द्यायचा एवढे एक कारण पुरेसे नाही." त्यानंतर चर्चा बंद झाली! :-)
25 Sep 2023 - 12:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
जाणकार मिपाकरांच्या मताच्या प्रतिक्षेत. वाखूसा.
माझे २ पैसे--लिक्विडीटी,सिक्युरिटी,ग्रोथ(तरलता,सुरक्षा,परतावा)--या त्रिसूत्रीवर बाजार चालतो असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याप्रमाणे खालील मुद्दे मांडतो
१.२००१ च्या आसपास नोकरी लागली तेव्हा आईच्या सल्ल्याने काही एन एस सी प्रमाणपत्रे घेउन ठेवली होती. तेव्हा ती ई ई ई (एग्झम्प्ट्*३) कॅटेगरीमधे होती. त्यांची मुदत संपल्यावर मात्र पुन्हा घेतली नाहीत कारण तोवर त्याना टॅक्स ऑन मॅचुरिटी लागला.
२. यथावकाश पी पी एफ खाते उघडले. त्यात जमेल तसे पैसे टाकायचो. ते अजुन चालु आहे.
३.मग एल आय सी मध्ये गुंतवणूक वाढवत नेली, पण कालांतराने समजले की विमा आणि गुंतवणूक हे वेगळे विषय आहेत.- विम्यामुळे संरक्षण मिळते पण तुमचा रायडर्स मुळे फायदा कमी होतो. तेव्हा चालु केलेल्या पॉलिसी आता फक्त उपचार म्हणून चालु ठेवल्यात.
४. मग हळूहळू शेअर मार्केट बद्दल समजले. ती चुकीची वेळ होती(२००९) त्यामुळे थोडे पैसे बुडले. मग काही वर्षे गप्प बसलो.घर घेतले, त्यामुळे होम लोनमधे सगळे पैसे घातले आणि ते फेडले. हाती पैसा शून्य, पण घर लोन फ्री झाले.
५ . वर्ष२०१५ मध्ये कंपनीतले काही आर्थिक बाबीत हुशार लोक भेटले आणि म्युच्युअल फंडांबद्दल समजत गेले. २-३ फंडात पैसे गुंतवत गेलो, बरा फायदा झाला. सध्या ८-१० फंडात गुंतवणूक चालु आहे.
६. शेअर मार्केट कडे पुन्हा लक्ष दिले. लाँग टर्म गुंतवणूकीचे फायदे समजत गेले.[आदर्श --वॉरेन बफे/कै.राकेश झुन्झुनवाला/नंदन निलेकणी(७७०० करोड)] मग हळूहळू चांगले शेअर्स लक्ष ठेवुन जमवत गेलो, एफ डी मधील थोडीफार रक्कम हळूहळू तिकडे वळवली. आता मुलालाही ट्रेडिंग खाते काढुन दिले आहे. दर महिन्याला काही रक्कम त्याला देतो अट एकच-नीट समजून गुंतव आणि २५ वर्षाचा होईतो विकु नकोस.
७. कूटचलनात पैसे गुंतवायचा प्रयत्न केला पण तिथे मार्केट रिस्क खूप आहे आणि त्यामानाने फायदा वाटला नाही, म्हणुन आता फक्त लक्ष ठेवुन असतो.
८. सेकंड होम्,जमीन्,फार्म हाऊस वगैरे आपल्यासाठी नाही.
असा सगळा प्रवास आहे.
बाकी रोज व्यायाम, रोज काम, रोज अभ्यास्,रोज काही छंद, रोज ध्यान धारणा असे सगळे थोड्या प्रमाणात नियमित करत राहीले तर माणुस सुखी होतो म्हणे. तेव्हा पैशाखेरीज ईतरही बाबी महत्वाच्या.
25 Sep 2023 - 4:19 pm | राघव
वाह! खूप सुंदर अन् चांगली माहिती. डायवर्स गुंतवणूक! :-)
हे खूप आवडले. आपल्याला काय करायचे किंवा काय झेपेल ते आपण ठरवायला पाहिजे. जिकडे स्वतः लक्ष घालता येईल तितपतच करावे, हे अगदी योग्य आहे!
25 Sep 2023 - 8:08 pm | कंजूस
आवडलं आहे.
अनुभव सांगते उपयोगाचे.
25 Sep 2023 - 5:02 pm | मुक्त विहारि
वाखूसा
26 Sep 2023 - 7:48 pm | सुबोध खरे
१) The sad truth is that we spend more time teaching children how to swim than to manage money.
२) Cash-rich but time-poor parents who say “yes” to every want, guiltily buying all manner of gifts and treats for their children, normalise unhealthy spending habits.
३)money means nothing much but before you utter the sentence make sure you have enough of it with you.
26 Sep 2023 - 7:55 pm | कंजूस
ही वृत्ती सर्व ठिकाणी (देशांत) आहे का?
विकसित/विकसनशील देश असा फरक आहे?
26 Sep 2023 - 8:07 pm | सुबोध खरे
एकंदर आपल्याकडे (मराठी घरांमध्ये) आर्थिक साक्षरता याकडे फारसे गंभीरतेने पाहिले जात नाही.
पैसे कसे मिळवायचे याचे शिक्षण घेण्यात जास्त वेळ दिला जातो परंतु मिळवलेले पैसे कसे वाढवायचे याचे शिक्षण अभावानेच मिळते.
यामुळे "अंथरूण पाहून पाय पसरवा" सारखा निम्न मध्यमवर्गीय सल्लाच जास्त दिला जातो.
आपले पाय आहेत त्यापेक्षा मोठे अंथरूण घेण्याचा विचारही करत नाही.
यामुळे कित्येक लोक आयुष्यभर काटकसर करून जगताना दिसतात आणि त्यालाच मी समाधानाने आणि सुखाने जगलो असे नाव देताना आढळतात.
मी अनारक्षित डब्यापासून ते व्हिस्टाडोम पर्यंत रेल्वेच्या सर्व वर्गात प्रवास केला.
तेंव्हा अनारक्षित डबाच कसा छान असतो असला दळभद्री विचार कधीही केला नाही.
हा विचार म्हणजे चाळीतच जास्त प्रेम असतं किंवा एकत्र कुटुंबच कसं चांगलं याइतकाच दळभद्री विचार आहे.
चांगला फ्लॅट विकून चाळीत जाणारा एकही मनुष्य मला आजतागायत दिसलेला नाही.
आपल्या मुलीचे आवर्जून एकत्र कुटुंबात लग्न करणारा बाप अभावानेच आढळेल.
मी सुरक्षित सरकारी नोकरी १८ वर्षांनी सोडून विना निवृत्तीवेतन बाहेर पडलो आणि आजतागायत कोणत्याही महिन्यात सरकारी नोकरीपेक्षा कमी पैसे मिळाले नाहीत.
आपल्या मुलांना केवळ आर्थिक साक्षरता नव्हे तर आर्थिक सुशिक्षण देणे आवश्यक आहे.
मुंबईत मोठी मोठी रुग्णालये उभे करणार्यात एकही मराठी माणूस नाही तर बाहेरून आलेले सिंधी गुजराती लोकच जास्त आहेत.
तेंव्हा समाजसेवाच करायची असेल तरी सुद्धा बक्कळ पैसे कमवा स्वतः सुद्धा उपभोग घ्या आणि समाजाचे सुद्धा भले करा.
उगाच श्रीमंती लुळी पांगळीच असते आणि गरिबी धट्टीकट्टी असते सारखे भिकारडे समाजवादी/ साम्यवादी विचार आपण जितक्या लवकर टाकून देऊ तितका आपला आर्थिक सामाजिक आणि मानसिक विकास लवकर होईल.
सुविनियोगात समृद्धी हाच मूलमंत्र खरा.
27 Sep 2023 - 10:25 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
26 Sep 2023 - 8:14 pm | सुबोध खरे
माझ्या माहितीतील एक रेल्वे मध्ये सामान्य कारकून असलेल्या माणसाने थोडेसे पैसे साचले कि एक एक समभाग घे असे करत करत संचय करत तीन कोटीची संपत्ती जमा केली.
त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं.
जर रेल्वेत सामान्य कारकून असे करू शकतो तर आपण का नाही?
आपण "काही तरी कारणे काढून चालढकल करत राहतो" आणि संधी येऊन सुद्धा त्याचा उपयोग (आणि नंतर उपभोग) करू शकत नाही.
27 Sep 2023 - 7:41 am | कर्नलतपस्वी
त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं.
बापाकडे तीन कोटी आणी मुलाला दिड लाखाचं कर्ज घ्यावे लागले.... नवलच ...
आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जण,अपवाद सोडा, अर्थिक नियोजन हे सर्वचजण करत असतात. प्रत्येकाची पद्धत निराळी.
कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन.
मराठवाड्यातील तरूण शेतकऱ्याने आजोबांच्या सल्ल्यानुसार कोरडवाहू आर्धाया एकरावर कर्टुले रानभाजीचे उत्पन्न घेऊन अर्ध्या एकरावर दोन एकर शेतजमीन खरेदी केली.
रिक्षाचालकाचा मुलगा, मुलगी आय आय टी मधे,कलेक्टर बनणे,उच्च शिक्षित होणे हे सुद्धा अर्थिक नियोजन.
अर्थिक नियोजन या गोष्टीकडे कुठल्याही चौकटीतून बघणे चुकीचे ठरेल.
अर्थात अर्थिक नियोजन करण्यासाठी प्राथमिक गरजा भागवण्या इतपत ही प्राप्ती नसेल तर अर्थिक नियोजन काय करणार.
खर्या अर्थाने अर्थिक नियोजन म्हणजे आहे त्या परिस्थितीतून एक पाऊल पुढे जाणे,आत्मनिर्भर बनणे म्हणेन.
27 Sep 2023 - 11:12 am | अमर विश्वास
कर्नल सर ...
थोडा वेगळा विचार मांडतो ...
कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन.... हे काही पटले नाही ...
ही बिझिनेस आयडिया असू शकते. Entrepreneurship म्हणा हवं तर ...
आपला उत्पन्न वाढवणे , त्यासाठी वेगवेगळे उपाय (sources) शोधणे हे business / Entrepreneurship म्हणता येईल ...
आलेला पैसा (उत्पन्न) त्याचे आपण पुढे काय करतो ते आर्थिक नियोजन
दोन्ही आवश्यक आहे ... पण त्यासाठी वेगवेगळे कौशल्य (Skillset) आणि दृष्टिकोन (mindset) आवश्यक आहे आणि एक जमले म्हणजे दुसरे जमतेच असे नाही
27 Sep 2023 - 11:32 am | कर्नलतपस्वी
मला समजलेले अर्थीक नियोजन....
पैसा गुंतवा पैसा वाढवा.
कुणी एफ डी,कुणी शेअर मार्केट ,कुणी शेतीत .
नो रिस्क लो रिस्क, हाय रिस्क
कोरडवाहू शेतीत कूपनलिका, मोटार, ठिबक सिंचन सारखे प्रकल्पातून उत्पादन वाढवणे म्हणजेच पैसा वृद्धिंगत करणे.
तुमच्याच भाषेत, इन्स्ट्रूमेन्ट कुठलेही असो पैसा वाढणे महत्वाचे.
ढुंगणावर ठिगळं लावलेली चड्डी घालून येणारा वर्गमित्र आता बुडाखाली एस यु व्ही घेऊन फिरतोय.
वर्गमित्राने स्नेहसंमेलनात मांडव गुलाबाने भरून टाकला होता.
मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे.
बाकी आजची पिढी मागच्या पिढी पेक्षा या बाबतीत जास्त जागरूक दिसते.
27 Sep 2023 - 1:03 pm | राघव
बरोबर. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणे हे देखील आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे.
कोणती कल्पना चालेल आणि कोणती नाही याचं स्वॉट अॅनालिसिस करून तशा पद्धतीनं व्यापाराचा स्त्रोत तयार करणं ही उद्योजगता/आंत्रप्रिनरशिप.
कर्नलसाहेब तुमचं म्हणणं काय ते समजतंय आणि बहुतांश मध्यमवर्गीयांची आपल्या पिढीत अगदी हातातोंडाशी गाठ हीच अवस्था होती हे देखील मान्य आहे. याचा अर्थ त्यांनी समाधान मिळवलं नाही असं मला म्हणायचं नाहीये. ढोबळ मानानं असं म्हणता येईल की, पैसा हे विनियोगासाठी गरजेचं साधन आहे आणि समाधान हे त्या विनियोगातून मिळालेलं फळ आहे. अर्थात् कमी पैसा म्हणजे समाधान कमी असं नाही हे मान्य आहे.
माझा मुद्दा फक्त "मला त्या अर्थकारणातलं काही कळत नाही ब्वॉ" अशी मानसिकता बदलण्याबद्दल होता कारण अशी मानसिकता आपल्या पुढच्या पिढीत आपसुक उतरते आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ लागतो.
27 Sep 2023 - 2:27 pm | चित्रगुप्त
आमुचेही हेचि म्हणणे.
माझ्या अमेरिकेतल्या मुलाने काही काळ एक उद्योग करून बघितला होता (सध्या त्याला 'पिकलबॉल' खेळण्याची गोडी लागल्याने तो बंद केला आहे): अॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो. मुख्य मेहनत म्हणजे भाड्याची ट्रक घेऊन सामान घरी आणून ते स्वतः उतरवणे आणि गराजमधे व्यवस्थित लावून ठेवणे. नंतर हळू हळू विकले जाते. त्यातल्या काही वस्तू घरी वापरण्यासारख्याही असतात. यातून एक वेगळ्याच प्रकारचे व्यवहारचातुर्यही विकसित होते. गंमत म्हणजे जे काही थोडेसे भारतीय वस्तू घ्यायला येतात त्यापैकी काहीजण आणखी घासाघीस करतात किंवा सामान घरी घेऊन गेल्यावर त्यात अमुक खोट आहे, सबब सामान परत घेऊन जा आणि पैसे परत करा, नाहीतर वाईट रिव्हू देऊ अशी धमकी देतात. अशा अनुभवांमुळे भारतीय व्यक्तीने फोनवर पृच्छा केली तर वस्तू विकली गेली असे सांगायला सुरुवात केली होती. त्यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते. वस्तूत काही कमतरता असेल तर स्वतः ठीक करून घेतात. मी घरी असल्याने बरेचदा मीच त्या वस्तू काढून द्यायचो, तेंव्हा इथेच आधी उघडून, तपासून खात्री करून घ्या असे संगायचो.
सामान गोदामातून आणताना त्यात काय काय आहे ते सगळे कळत नाही. मोठमोठे सोफे, पलंग, ट्रेड मिल, गाद्या अश्या सामानापासून किरकोळ वस्तूंपर्यंत काहीही असू शकते. परंतु नुकसान मात्र होत नाही.
(आपला पोरगा फावल्या वेळात टीव्ही बघत लोळण्यापेक्षा काहीतरी धडपड, उद्योग करतो किंवा खेळात प्राविण्य मिळवतो आहे, हे आमचे समाधान)
27 Sep 2023 - 2:43 pm | राघव
भारी कल्पना आहे! आवडली! :-)
होय, हे बऱ्याच लोकांकडून ऐकलंय. आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते! त्यातूनच ओरबाडून घेण्याची वृत्ती आलेली आहे. असो.
28 Sep 2023 - 5:17 pm | मुक्त विहारि
सहमत आहे ....
27 Sep 2023 - 4:33 pm | चित्रगुप्त
-- त्याबरोबरच अर्ध्या किंमतीत सामान मिळत असूनही एकादा स्क्रू निखळलेला असणे एवढ्या क्षुल्लक कारणावरून "आम्ही पैसे देतो आहे" अशी मुजोरी दाखवत 'ती परत घेऊन जा आणि पैसे परत करा नाहीतर खराब रिव्हू देऊ' हे आणखी वरून.
28 Sep 2023 - 6:55 am | निनाद
काहीही करा पण स्थावर मालमत्ता नक्की बनवा. माझ्या अनुभवात आजवर हेच सर्वात स्थिर राहिले आहे.
राहते घर झाल्या नंतर अधिक गुंतवणूक म्हणून शक्य तो जमिन घेतली असेल तर चांगले. त्यानंतर मोक्यावरचे दुकान, विमानतळालगत मोठ्या जमिनीवरील गोडाऊन, हे ही चांगले असेल.
बाकी इतर बाबतीत ज्ञान कमी आणि त्यातही हात पोळलेले असल्याने त्यावर बोलणे शक्य नाही.
28 Sep 2023 - 10:04 am | अमर विश्वास
स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ...
गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ? यात लिहिल्याप्रमाणे स्थावर मालमत्ता हा महत्वाचा asset class आहे ... त्याकडे दुर्लक्ष करू नका ...
मी स्वतः या asset class मधून भरपूर नफा कमावला आहे .. एकदा नाही अनेकदा ... त्यामुळे स्वानुभवाने सांगतो ... याचा जरूर वापर करा
28 Sep 2023 - 5:11 pm | कंजूस
सहमत.
शिल्लक पैसे ज्या वेगाने मुल्यवर्धित होतात त्याच्या अनेकपट स्थावरचे मूल्य वाढते.
29 Sep 2023 - 1:24 pm | अहिरावण
अनेकांनी आर्थिक नियोजनाचे महत्व फार छान सांगितले. नवी पिढी याबाबत सजग आहे आणि मागील पिढीत जे त्रास भोगावे लागले ते भोगावे लागणार नाहीत असे अनेकांना वाटते. त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही. मागील पिढी आजी अजोबा, आई बाप, काका काकू, आत्या मावश्या अशी नाती पदरमोड करुन सांभाळायची. पुर्वजांचे आशीर्वाद मिळाले पण वंशज त्यांच्यावर थुंकले. प्राक्तन प्रत्येकाचे.
आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते.
30 Sep 2023 - 12:14 am | राघव
नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त! मित्र, नाती तशी भरपूर आहेत, पण एखाद्या कारणासाठी म्हणून आजवर एक मित्रही केला नाही.. नाती तर जाऊच देत. देवकृपेनं असा मानसिक विकार झाला नाही मला अजून. असो.
मागे एका धाग्यावर एक प्रतिसाद दिला होता, तो इथं उद्धृत करावासा वाटतो -
जीभेवर गुळाची ढेप, मनांत आशावादी आनंद, सगळ्यांवर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती, स्वतःच्या शरीराच्या मर्यादांची जाणीव ठेवूनही शक्यतो स्वतःची कामं स्वतः करण्याची हातोटी, कुणी मागीतलाच तर आपुलकीनं पण निर्लिप्तपणे सल्ला देण्याचं कसब आणि या सर्व गुणांच्या जोडीला निग्रही व्यक्तिमत्व असूनही असलेला गोड विनय...!
अहो इतके गुण आहेत ना या वर उल्लेखलेल्या म्हातारीत की जगावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल. म्हटलं तर सगळ्यांत आहे म्हटलं तर पूर्ण अलिप्त! मी स्वतः या आजींना मागच्या १० वर्षांपासून बघतोय.. आजतागायत एकदासुद्धा कधी वैताग, नैराश्य, चिडचिड असं झालेलं बघीतलं नाही मी त्यांचं.. अगदी त्यांची स्वतःची तब्येत खराब असतांना देखील!
त्यांच्याकडे बघून असं वाटतं की वृद्धाश्रम माणसाच्या मनातच असतो कुठेतरी.
आपल्यावर कोण प्रेम करतं यापेक्षा, आपण सगळ्यांचं अजून किती प्रेमानं केलं पाहिजे या दृष्टीकोनातून आयुष्य घडवणं सोपं नाही.. तेही लाचारीतून नव्हे, तर मनापासून!
आपला स्वभाव बदलणं आपल्याच हातात असतं.. पण स्वतःकडे त्यासाठी डोळसपणे बघायला हवं.
30 Sep 2023 - 10:26 am | अहिरावण
>>>नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त!
हल्ली अशा वृत्तीला शिकले सवरलेले पैसेवाले लोक दळभद्री वृत्ती असे नाव देतात असे ऐकले आहे.
30 Sep 2023 - 3:21 pm | कंजूस
काही प्रसिद्ध लोकांची चरित्रे,आत्मकथनं वाचल्यावर (१९००-१९५०) समजलं की नात्यातल्या लोकांच्या मदतीनेच त्यांचं जीवन सोपे,यशस्वी झाले.
29 Sep 2023 - 4:44 pm | अमर विश्वास
आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते.
यात कीव वाटण्यासारखे काय आहे ? सगळ्यांनी मुलांसोबत राहिले पाहिजे असे थोडीच आहे ? त्यांनी आनंदी राहण्याचा मार्ग शोधला हे खरे तर कौतुकास्पद आहे
29 Sep 2023 - 7:24 pm | अहिरावण
सहमत आहे. परंतु अशांच्या शब्दांमधील अभिनिवेश आणि डोळ्यांतील भाव मेळ खात नाहीत ही कीव करण्याची बाब. प्रत्यक्षातील अशा लोकांशी थोडी चर्चा केली की मुखवटे खरडले जातात.
29 Sep 2023 - 7:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण तरीही बोलतो
उदा.१. बायको गेली. नवरा वय वर्षे ७५+ ,दोन मुली परदेशात स्थायिक--. एकटे राहण्यापेक्षा वृद्धाश्रम काय वाईट?
उदा.२. नवरा गेला,मुलासुनेशी पटत नाही म्हणुन २-४ दिवसापेक्षा जास्त राहणे नको. वय ८०+ मग वृद्धाश्रम काय वाईट?
उदा.३--नवरा-बायको दोघे ८०+. पैसा भरपूर. मोठे घर, पण मुलगा/मुलगी वेगळे राहतात. घराचा मेंटेनन्स जमत नाही. नोकर चाकर ठेवणे भरवशाचे वाटत नाही. मग वृद्धाश्रम काय वाईट?
उदा.४-- उदा.३ मध्ये एक जोडीदार अपंग किवा दिर्घकाळ आजारी. मग वृद्धाश्रम काय वाईट?
29 Sep 2023 - 8:03 pm | अहिरावण
सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच बाब आहे.
माझ्या मुळ प्रतिसादातील वाक्य पुन्हा देतो
फक्त कीव अशी वाटते की असे लोक (वर तुम्ही दिलेली चार उदाहरणे + विविध शेकडो उदाहरणे) यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात.
वादग्रस्त मुद्दा आहे हे मान्य. कदाचित मला नेमके काय खटकत आहे आणि सांगावेसे वाटत आहे त्यासाठी योग्य वाक्यरचना करता येत नाही असे दिसते. दोष माझ्या भाषाअज्ञानाचा असावा असे वाटते
29 Sep 2023 - 10:31 pm | चित्रगुप्त
गेल्या वर्षी पुण्यातील एका महागड्या वृद्धाश्रमात (दरमहा ४५,००० + औषधे वगैरे) माझा मोठा भाऊ (वय ९०) आणि दुसर्या तशाच एकात माझे गुरुतुल्य चित्रकार मित्र (वय ९०) यांना भेटायला जाऊन आलो. मुळात दोघेही अत्यंत आनंदी, उद्योगी पण आता 'थिजलेले डोळे आणि हाताश भाव'... त्यांच्याहूनही वाईट अवस्थेतले भकास, निराश, निव्वळ मरणाची वाट बघत असलेले अनेक लोक तिथे बघून प्रचंड धक्का बसला होता. काही जणांचे तिथे हॅप्पी बड्डे वगैरे मनवले जात होते, नातेवाईक आलेले होते पण खुद्द त्या वृद्धांच्या चेहर्यावरून त्यातले वैयर्थ स्पष्ट दिसून येत होते. माझे चित्रकार मित्र त्यापूर्वी एकटे इंदुरात रहात होते, शेजारी पाजारी मदत करायचे, डबा पोचवायचे. पण पुण्यात रहणार्या मुलाने बोलावून घेतले आणि काही महिन्यांनी वृद्धाश्रमात ठेवले. त्यांना कुठून मुलाकडे आलो असे वाटत होते. (आता दोघेही निवर्तले आणि सुटका झाली)
-- वादग्रस्त मुद्दा आहे खरा, आणि कुणाच्या नशीबात कसा शेवट लिहीलेला आहे, ते अगम्य असते. नको ते दीर्घायुष्य. सगळे काही ठीक असतानाच उचल रे देवा, असे वाटत असूनही नव्वद-शंभर वर्षे जगलेले आमच्या कुटुंबात आहेत.
30 Sep 2023 - 7:54 am | कर्नलतपस्वी
अर्थिक नियोजन सोप्पे आहे पण नात्यांचे नियोजन म्हणजे तारेवरील कसरत. आताची परिस्थिती पहाता मन उद्विग्न होते. कुणाची चुक कोण बरोबर, शेवटी प्रारब्ध म्हणून श्रीकृष्णार्प्णमस्तू म्हणायचें व पुढे चालायचे.
30 Sep 2023 - 10:36 am | अहिरावण
>>प्रारब्ध
अहो पण प्रारब्ध प्रारब्ध असे काही नसते. आपण जे काही ठरवू तेच होत असते आणि तेच, तसेच करायचे असते असे शिकले सवरलेले लोक सांगतात. प्
रारब्ध म्हटले की कर्म योग आला आणि मग तेच ते पुनर्जन्म आणि जनम जनम के फेरे आले... तसं नसत काही असे कळवळून किती तरी लोक सांगत आहेत आणि आपण ऐकतच नाही. काय म्हणावे या कर्माला... प्रारब्धच दुसरे काय !
एकत्र कुटुंब दळभद्री, विभक्त कुटुंबही दळभद्री, एकल कुटुंबही दळभद्री, एकटा जीव तो सुद्धा दळभद्री. जळ्ळं मेलं मानवाचं जिणं... दळभद्री !!
त्यातला त्यात एकत्र कुटूंब बरं... मेलो तर ज्यांना आपण आयुष्यभर आपलं मानलं (त्यांनी मानलं की नाही हा भाग वायला) ते आपलं प्रेत जनरीतीसाठी तरी उचलून स्मशानात नेऊन एकदाचं जाळून टाकू याला म्हणुन जाळतात. कुणा ति-हाईताने अग्निडाग देण्यापेक्षा आपल्याच रक्ताच्या माणसाने आपल्याला जाळलेले काय वाईट?
असो ज्याचा त्याचा विचार... किती का दळभद्री असेना..
30 Sep 2023 - 2:26 pm | वामन देशमुख
मी काय म्हणतो,
या धाग्याची गाडी आर्थिक नियोजनापासून ते पार "कुटुंबनियोजना"पर्यंत कशी काय गेली बुवा?
2 Oct 2023 - 1:42 pm | अहिरावण
गाडीला चाक असले की हवी तिथे आणि हवी तशी नेता येते. चाकामुळे मानवी जीवन खुप सुसह्य झाले. सगळी प्रगती चाकामुळे झाली. चाक थांबले की प्रगती थांबते.
30 Sep 2023 - 3:30 pm | कंजूस
आर्थिक नियोजनापासून ते पार "कुटुंबनियोजनाचार विचार
काय होतं की एखाद्या मनुष्यास इर्षा , महत्त्वाकांक्षा असते. त्याला आर्थिक घौडदौड करायची असते, नवीन आव्हानं पेलायची असतात. यश मिळत असतं. अशावेळी त्यांचे नातेवाईक म्हणतात तू हो पुढं, आम्ही तुझे घर,मुले संभाळू. आणि मग तो टिपुकल्या संसारात न अडकता मोठमोठी कामं पार पाडताना दिसतो.
कुटुंबातील हे नियोजन गुप्त रीतीने काम करत असते.
2 Oct 2023 - 10:07 pm | राघव
कशाला हा नकारात्मक सूर लागतोय अन् का ते उपरोधाचं बोलणं येतंय ते मला समजण्यापलिकडे आहे.
आर्थिक नियोजन करणे म्हणजे नातेवाईकांपासून दूर जाणे, आपण आणि आपलं छोटं कुटुंब हेच बरं, नकोत ती माणसं.. असं असलंच पाहिजे काय?
उलट आहे त्या लोकांसाठी, जे उत्पन्न आहे त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि सगळ्यांचं आयुष्य अधिक सुकर व्हावं यालाच आर्थिक नियोजन म्हणायला नको काय?
काही लोकं वाईट वागतात म्हणून सगळेच वाईट म्हणतांना, तोच न्याय काही माणसं चांगली म्हणून सगळीच चांगली असं का नसावं?
असो. ज्याचा त्याचा अनुभव आणि मत वेगवेगळं असणारंच. त्यामुळे सगळ्यांतून चांगलं काहितरी घ्यावं आणि पुढचा विचार घ्यावा, हे योग्य.
आर्थिक नियोजन करतांना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय कटाक्षानं टाळलं पाहिजे, त्या अनुषंगानं आणिक मुद्दे असू शकतील.
जसं,
- वय कमी असतांना थोडी का होईना गुंतवणूक सुरु केली तर धडपड करून शिकण्यात जवळपास ३-४ वर्षे लागतात. त्यामुळे त्यानंतर ज्यावेळी नियमित रक्कम हाती येऊ लागेल त्यावेळी तिचा वापर अधिक योग्यपणे करण्यास व्यक्ती तयार असेल आणि लवकर स्थिरता येईल.
- या कमी वयातील घेतलेल्या अनुभवाचा एक आणिक फायदा म्हणजे आपलं विचारांचं क्षितिज लवकर रुंदावतं, ज्याचा कोणतेही निर्णय घेण्यात उपयोग होतो.
5 Oct 2023 - 5:11 am | निनाद
माझ्या मित्राचे वडील व्यावसायिक होते. त्यांनी त्या काळात मला सल्ला दिला होता - 'तुला आयुष्यात पुढे जायचे असेल तर घेता येईल तेव्हढे कर्ज घे आणि जमिनीत गुंतव - तू त्या शिवाय आयुष्यात प्रगति करणार नाहीस'
अर्थात तरुण वय आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोनच नसल्याने हा सल्ला मी ऐकला नव्हता.
पण माझ्या एका मित्राने मात्र तो ऐकला होता.
आणि त्याने त्या काळात प्रचंड धडपड करून वडिलांशी डिल करत-करत त्यांना अगदी मोक्यावरचे एक दुकान घ्यायला लावले होते. वडिल नोकरी करणारे अणि मध्यमवर्गिय. त्याकाळात हे फार मोठे कर्ज होते! कर्ज असल्याने त्याने सुरुवाती पासून नोकरी आणि शर्ट्स विकण्याचा जोड व्यवसाय केला.
या मित्राने केलेली ही अगदी तरुण वयातली गुंतवणूक या सार्या कुटुंबाला पुढे खूप हात देऊन गेली. त्यांची आर्थिक ओढाताण होत होती पण त्या काळात अवाढव्य वाटणारे लाखांचे कर्ज पुढे जेमेतम सात ते नऊ वर्षात अगदीच आवाक्यातले दिसू लागले होते. दुकानाची किंमत दहा वर्षात दुपटीच्या पुढे गेली. त्यावर बँक मॅनेजर अजून कर्ज घ्या म्हणू लागला. मोक्यावर असल्याने दुकान सदैव भाड्याने जायचे. एका काळात अचानक नोकरी गेल्यावर सहा महिने या भाड्याची मदत झाली होती. या अनुभवाने पुढे जाऊन त्याने अजून दोन दुकाने घेतली. पुढे अनेक जमिनी घेतल्या आणि घेतच राहिला. कर्जे कशी घ्यायची यासाठी अनेक सीए त्याला मदत करतात. अनेक वकिलांची सल्ला-मसलत चाललेली असते. आणि आता त्याचा तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. कर्ज घेतांना उपयोगी येते म्हणून टाईमपास म्हणून नोकरी करतो. आजही जमिनी घेतोच आहे आणि किमान दहा कोटींचे कर्ज तो कायम 'राखून' असतो!
अर्थात उशिराने शहाणपण आल्यावर आम्हीही पुढे त्याच मार्गाने गेलो - पण शेवटी गेलेला काळ भरून काढणे शक्य नसते. त्यामुळे त्याच्या येव्हढे प्रचंड मोठे नेटवर्क सर्कल आणि त्या मार्फत मिळणारी मोक्यांच्या जमिनींची माहिती योग्य वेळी हातात येणे शक्य होत नाही.
आता हा मित्र अनेक जमिनींचा मालक झाला असल्याने राजकिय व्यक्तिमत्वे त्याच्याशी जवळीक साधत राहतात. त्याला आपल्या प्रकल्पात ओढायचा प्रयत्न करतात - आणि माझा मित्र अजून श्रीमंत होत राहतो!
सांगण्याचा उद्देश-
असे तुम्ही कदाचित केले ही असेल. आणि आज कर्जात बुडाल्याचा त्रास होत असेल. पण स्थावर नावावर असेल तर येत्या काळात त्यातून बाहेर पडाल याची खात्री बाळगा.
5 Oct 2023 - 12:52 pm | राघव
चांगला सल्ला. धन्यवाद निनाद!
या दृष्टीनं काम चालू आहेच. शक्यतो लवकरच मार्गी लागेल. :-)
9 Oct 2023 - 1:12 am | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद निनाद सर.
10 Oct 2023 - 8:40 am | निनाद
खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे.
यामुळे तुम्ही जमा केलेली संपत्ती ही विनासायास तुमच्या नॉमिनीकडे ( ट्रस्ट बेनेफिशयरी) जाऊ शकते. आणि यावर बहुतेकवेळा कॅपिटल गेन्स टॅक्स लागत नाही.
संपत्ती नेहमी ट्रस्टमध्ये घ्या. ह सल्ला मी जरूर देईन. यामध्ये तुमच्या संपत्तीची सुरक्षा फार जास्त असते. विश्वस्त या नात्याने तुम्ही कधीही ट्रस्टच्या अटी बदलू शकता.
तुम्ही लाभार्थी काढून टाकू शकता, नवीन नियुक्त करू शकता आणि ट्रस्टमधील मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी अटी सुधारू शकता. मी यातला तज्ञ नाही त्यामुळे
जाणत्या अकाउंटंट आणि हुषार वकिलाकडून हा ट्रस्ट चा सेट अप बनवून घ्या. त्याची मालकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला द्या. त्या कंपनीचे डायरेक्टर तुम्हीच रहा.
या शिवाय अविभक्त हिंदु कुटुंब या सेटअप चा वापर करता येऊ शकतो.
या अशा व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते.
थोडा पैसा जाईल पण व्यवस्था बनेल आणि संपत्तीची कार्यपद्धती बनेल.
श्रीमंत होणेच महत्त्वाची नाही तर श्रीमंत राहणे हे ही महत्त्वाचे असते.
10 Oct 2023 - 8:52 am | निनाद
तुमचा अकाउंटंट असे सल्ले तुम्हाला देत नसेल तर ही तुमचा अकाउंटंट/सी ए बदलण्याची वेळ आहे!
10 Oct 2023 - 12:06 pm | अमर विश्वास
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. किंवा उतारवयात स्वतःला बेनिफिट मिळावा आणि नंतर वारसांना म्ह्णून हा उत्तम पर्याय आहे ..
पण आर्थिंक नियोजन हे त्याहून खूप वेगळे आहे
10 Oct 2023 - 1:19 pm | निनाद
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो.
हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.
10 Oct 2023 - 1:58 pm | अमर विश्वास
तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र वाचा म्हणजे झाले
खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे.
हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.
11 Oct 2023 - 3:27 am | निनाद
गलतीसे मिष्टेक हो गया सर!(वरील प्रतिसाद बाद समजावा!)