अमेरिका ४ - डस्टबिन

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
10 Aug 2023 - 4:00 pm

पूर्वी प्रत्येक घरी एक सायकल असणं हे सामान्य, दुचाकी असणं हे भारी आणि चारचाकी असणं हे श्रीमंतीच लक्षण होतं. आता घरटी एक चारचाकी, माणशी एक दुचाकी आणि घरातल्या लोकांच्या निम्म्यान सायकली असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे भारतात एक-दोन कचऱ्याचे डबे असतात, अर्थात डस्टबिन असतात ! इथे अमेरिकेत मात्र माणशी अंदाजे चार डस्टबीन असतात. किचनजवळ विघटक आणि अविघटक अर्थात डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल गोष्टींसाठी मोठी मोठी डस्टबिन असतात. आपला गुडघा ते कंबर या उंचीची डस्टबिन घरात पाहून वस्तू खातात की फेकतात अशी शंका येते. या व्यतिरिक्त कामाच्या टेबलाजवळ 1 आणि मुख्य म्हणजे टॉयलेट मध्ये 1 डस्टबिन असणे अनिवार्य आहे.

इथे उजव्या हाताचे पासून सुरु होणाऱ्या ते डाव्या हाताने करायच्या सर्व कामांपर्यंत सर्व कार्यक्रमांना कागद अनिवार्य आहे. तोंड पुसायला टिश्यू ( इथेही ड्राय अन् वेट, साधे आणि सुगंधी असे सापळे आहेतच ) हात पुसायला, कट्टा पुसायला पेपर रोल ते ढू पुसायला टॉयलेट पेपरमुळे इच्छा असो वा नसो तुम्ही कचरा जन्माला घालताच. पुर्नवापर करता येईल अशा वस्तू कमी आणि पिढ्यान पिढ्या वापरता यावं असं उत्पन्नच करत नाहीत. अनेक वस्तू घरपोच मागवल्या जातात. त्यामुळे अपेक्षित वस्तू, त्याला प्लास्टिकचे आवरण, त्याला जपणारा फोम सारखा कागद आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी साजेसा बॉक्स आणि त्यावर चिकटवलेले टेप आणि स्टिकर्स! काही वेळा हे बॉक्स घरपोच करणे, ने आण करणे सोयीचे होण्यासाठी त्याला कागदी पिशव्या ! या सगळ्यां सरंजामात 4 आण्याची कोंबडी... 12 आण्याचा मसाला अशी गत असू शकते. म्हणजे मागवलेली वस्तू असते 10-20 डॉलर्सची पण ती सही सलामत आणि सही वेळेत येण्यासाठी खर्चले जाते ते त्याहीपेक्षा अधिक उत्पादन मूल्य असणार्या वस्तू, मानवी वेळ.. आणि निर्माण होतो तो अगणित, अफाट कचरा!

एक मात्र मान्य करावंच लागेल की कचरा तयार करण्यात यांचा नंबर एक असेल तर तो तितक्याच सफाईदारपणे उचलून वाहून नेण्यातही ते अग्रेसर आहेत. सार्वजनिक ठिकाणी, घरी दारी, रस्त्यावर ठिकठिकाणी आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी डस्टबिन आणि ह्या डस्टबिनमध्ये घालायला गार्बेज बॅग्ज आणि पोलीस नक्की हजर असतात. भरलेल्या गले लठ्ठ गार्बेज बॅग्ज टाकायला मोठे मोठे कंटेनर्स आणि ते वाहून नेणारे ट्रक्स दिसतात.

इथले सफाई कर्मचारी काम करताना दिसतात पण ते गरीब, बिचारे वगैरे नसतात. सफाईचं काम अत्यंत निष्ठेने आणि मनःपूर्वक करतात. 'लाव लगाव टिमकी बजावं' असं दिखाऊपणाचं नाही पण देखणेपणा देण्याचं काम करतात. रिकाम्या पिशव्या उडून झाडांवर, नाल्यांमध्ये तुंबलेल्या दिसत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालणारे, पळणारे, गाडीतून जाणारे, कुणी कुणीही कचरा रस्त्यावर टाकून पुढे निघून जात नाहीत. हे खरंच वाखाणण्यासारखे आहे. आपल्या प्रचंड लोकसंख्येमुळे प्रशासनाला कमतरता, अडचणी नक्की आहेत. पण कचऱ्यासाठी कडक शासन नाही तोपर्यंत तरी प्रशासन अपूरेच वाटणार.

गरजेपेक्षा जास्त आणणे, मागवणे आणि वेळेत विनियोग न झाल्याने अन्नाची, खाद्यपदार्थांची प्रचंड नासाडी होते. गरजेपेक्षा मोठमोठ्या कपातून सर्व पेयं प्यायली, रिचवली आणि ओतली जातात. काही प्रमाणात काही वस्तूंचा पुर्नवापर होतो पण प्रमाण नगण्य असतं. कपडे, भांडी, फर्निचर, शोभेच्या वस्तू, खेळाचे- छंदाचे साहित्य सगळंच मुबलक असतं. चपला-बूट-प्रसाधन यांचा वापर तर बेसुमार! बेछुट कचरा निर्मितीत अव्वल अमेरिकेला प्रगत म्हणायचं? भारतात पुठ्ठे, खोकी जळण म्हणून वापरून पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांकडून 'शून्य कचरा' संकल्पना राबवून पुनर्वापराचा वसा खरच यांनी घ्यायला हवा. स्वच्छता आणि कचऱ्याच्या बाबतीत आपण परस्परांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे मात्र नक्की ! समृद्धी-सुबत्ता असणाऱ्या देशाचा कित्ता आपण भारतीयांनी गिरवायचं नाही कारण या सगळ्याचा भार आणि भत्ता भरते ती आपलीच वसुंधरा!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Aug 2023 - 6:00 am | राजेंद्र मेहेंदळे

हा ही विषय आवडला. लेख जरा मोठे लिहावेत अशी विनंती.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या लेखमालेतील लेख पाच-सहा मिनिटात वाचून होतील इतकेच लिहिलेले आहेत..आपली सूचना लक्षात ठेवून भविष्यात थोडे मोठे लेख नक्की लिहीन.

कचरा करणे आणि त्याचे निर्मूलन यावर आपण अगदी यौग्य शब्दात निरीक्षण लिहिले आहे

पाश्चिमात्य देश प्रति माणशी जास्त कचरा निर्माण करतात हे खरे "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड "

यावर एक अप्रतिम माहितीपट ज्यांना यात रस आहे त्यांनी येथे पाहावा

https://www.youtube.com/watch?v=kysFSWkZ4ww

अतिशय मनोरंजक पद्धतीने पण धाडसेन या माहितीपटाच्या निर्मिती केली आहे
जर २५ मिलियन च्या देशात हि परिस्थितीत तर ३०० मिलियन लोकसंख्या असलेलया देसाहत काय परिस्थिती असेल?

निमी's picture

11 Aug 2023 - 7:25 am | निमी

https://youtu.be/nxPY37Z8dJE शून्य कचरा राबवण्यासाठी चा हा व्हिडिओ पण अवश्य पहावा. आपण सुचवलेला माहितीपटही अवश्य पाहणार धन्यवाद..आमच्या घरातील ओला कचरा गांडूळ खत करून मी वापरते.

चूक समजली की चूक सुधारणे शक्य होते.. चुका टाळायला लागलो की आपण गुन्हेगारही नाही. गुन्हेगार आपण सर्वजण आहोत, निसर्गाचे! तोच खरा मिलॉर्ड आहे.

चौकस२१२'s picture

11 Aug 2023 - 10:33 am | चौकस२१२

एकीकडे इकडे २ -३ फळासाठी छोट्या प्लास्टिक वापरणे अश्या चुका चालू आहेत किंवा बेढब फळे निर्माण झाली कि त्याना नाकारणे ( वॉर ओन वेस्ट मध्ये यावर बरेच संशोधन केलं आहे )
पण त्याच बरोबर काचेच्या बाटल्यांचा पुनर्वापर आणि सौर ऊर्जा विजेसाठी वापरणे इत्यादी चांग्ले प्र्यत्न सरकार आणि लोक हि करीत आहेत.

चौकस२१२'s picture

11 Aug 2023 - 7:01 am | चौकस२१२

विणा सहज्वाला
https://www.youtube.com/watch?v=4fkbQynfSyY
या तंत्रन्य आहेत आणि स्टील बनवण्याच्या प्रक्रियेत संशोधनात काम करता , युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यपक आहेत , न्यू इनव्हेंटर या सिरीज मध्ये परोक्षक आणि खास करून कचहर पुनर्वापर यावर संशोधन करतात
जरुर बघा

याशिवाय डॉक्टर विजय जोशी रस्त्याचे डॉक्टर- टाकाऊ पासून टिकाऊ रास्ता
https://www.youtube.com/watch?v=nrM-KmUoIH0
https://www.youtube.com/watch?v=5-BP1mTefMw

मुक्त विहारि's picture

11 Aug 2023 - 10:02 am | मुक्त विहारि

छान लिहीत आहात

मनःपूर्वक धन्यवाद.. इथल्या अनेकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे वेगवेगळ्या विषयावर लिहिलेले लेख नक्की पाठवत राहीन.

भारतात कचर्‍याविषयी असलेली भावना हास्यास्पद आहे. बहुतेक ठिकाणी लाज वाटावी अशी अवस्था आहे. मी एकाबरोबर अशीच कचर्‍याविषयीच्या समस्येची चर्चा केली. त्याने परदेशातही कचरा असतो म्हणुन माझी बोळवण केली. त्यामुळे भारतातील मुर्खाबरोबर कचर्याची चर्चा करणे मी टाळतो. मनस्तापाव्यतिरीक्त काहीच हाती लागत नाही.

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2023 - 12:36 pm | कर्नलतपस्वी

अमरीकेत आठवड्यात एकदा कचरा उचलून नेतात. आठवडाभर कचरा घरातच पडलेला असतो.

शिस्त वाखाणण्या जोगी पण कचरा रस्त्यावर,तळ्याच्या काठी फेकलेला आढळतो.

कचरा यंत्राने हाताळला जातो, व्यवस्थापन कमी खर्चात शक्य आहे.

भारतात कचरा व्यवस्थापन एक आव्हान आणी बेशिस्त नागरीक आणखीन ते कसे अशक्य होईल त्यात भर घालतात.