अमेरिका ४ - डस्टबिन
पूर्वी प्रत्येक घरी एक सायकल असणं हे सामान्य, दुचाकी असणं हे भारी आणि चारचाकी असणं हे श्रीमंतीच लक्षण होतं. आता घरटी एक चारचाकी, माणशी एक दुचाकी आणि घरातल्या लोकांच्या निम्म्यान सायकली असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे भारतात एक-दोन कचऱ्याचे डबे असतात, अर्थात डस्टबिन असतात ! इथे अमेरिकेत मात्र माणशी अंदाजे चार डस्टबीन असतात. किचनजवळ विघटक आणि अविघटक अर्थात डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल गोष्टींसाठी मोठी मोठी डस्टबिन असतात. आपला गुडघा ते कंबर या उंचीची डस्टबिन घरात पाहून वस्तू खातात की फेकतात अशी शंका येते. या व्यतिरिक्त कामाच्या टेबलाजवळ 1 आणि मुख्य म्हणजे टॉयलेट मध्ये 1 डस्टबिन असणे अनिवार्य आहे.
इथे उजव्या हाताचे पासून सुरु होणाऱ्या ते डाव्या हाताने करायच्या सर्व कामांपर्यंत सर्व कार्यक्रमांना कागद अनिवार्य आहे. तोंड पुसायला टिश्यू ( इथेही ड्राय अन् वेट, साधे आणि सुगंधी असे सापळे आहेतच ) हात पुसायला, कट्टा पुसायला पेपर रोल ते ढू पुसायला टॉयलेट पेपरमुळे इच्छा असो वा नसो तुम्ही कचरा जन्माला घालताच. पुर्नवापर करता येईल अशा वस्तू कमी आणि पिढ्यान पिढ्या वापरता यावं असं उत्पन्नच करत नाहीत. अनेक वस्तू घरपोच मागवल्या जातात. त्यामुळे अपेक्षित वस्तू, त्याला प्लास्टिकचे आवरण, त्याला जपणारा फोम सारखा कागद आणि सर्वांच्या सुरक्षेसाठी साजेसा बॉक्स आणि त्यावर चिकटवलेले टेप आणि स्टिकर्स! काही वेळा हे बॉक्स घरपोच करणे, ने आण करणे सोयीचे होण्यासाठी त्याला कागदी पिशव्या ! या सगळ्यां सरंजामात 4 आण्याची कोंबडी... 12 आण्याचा मसाला अशी गत असू शकते. म्हणजे मागवलेली वस्तू असते 10-20 डॉलर्सची पण ती सही सलामत आणि सही वेळेत येण्यासाठी खर्चले जाते ते त्याहीपेक्षा अधिक उत्पादन मूल्य असणार्या वस्तू, मानवी वेळ.. आणि निर्माण होतो तो अगणित, अफाट कचरा!
एक मात्र मान्य करावंच लागेल की कचरा तयार करण्यात यांचा नंबर एक असेल तर तो तितक्याच सफाईदारपणे उचलून वाहून नेण्यातही ते अग्रेसर आहेत. सार्वजनिक ठिकाणी, घरी दारी, रस्त्यावर ठिकठिकाणी आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी डस्टबिन आणि ह्या डस्टबिनमध्ये घालायला गार्बेज बॅग्ज आणि पोलीस नक्की हजर असतात. भरलेल्या गले लठ्ठ गार्बेज बॅग्ज टाकायला मोठे मोठे कंटेनर्स आणि ते वाहून नेणारे ट्रक्स दिसतात.
इथले सफाई कर्मचारी काम करताना दिसतात पण ते गरीब, बिचारे वगैरे नसतात. सफाईचं काम अत्यंत निष्ठेने आणि मनःपूर्वक करतात. 'लाव लगाव टिमकी बजावं' असं दिखाऊपणाचं नाही पण देखणेपणा देण्याचं काम करतात. रिकाम्या पिशव्या उडून झाडांवर, नाल्यांमध्ये तुंबलेल्या दिसत नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालणारे, पळणारे, गाडीतून जाणारे, कुणी कुणीही कचरा रस्त्यावर टाकून पुढे निघून जात नाहीत. हे खरंच वाखाणण्यासारखे आहे. आपल्या प्रचंड लोकसंख्येमुळे प्रशासनाला कमतरता, अडचणी नक्की आहेत. पण कचऱ्यासाठी कडक शासन नाही तोपर्यंत तरी प्रशासन अपूरेच वाटणार.
गरजेपेक्षा जास्त आणणे, मागवणे आणि वेळेत विनियोग न झाल्याने अन्नाची, खाद्यपदार्थांची प्रचंड नासाडी होते. गरजेपेक्षा मोठमोठ्या कपातून सर्व पेयं प्यायली, रिचवली आणि ओतली जातात. काही प्रमाणात काही वस्तूंचा पुर्नवापर होतो पण प्रमाण नगण्य असतं. कपडे, भांडी, फर्निचर, शोभेच्या वस्तू, खेळाचे- छंदाचे साहित्य सगळंच मुबलक असतं. चपला-बूट-प्रसाधन यांचा वापर तर बेसुमार! बेछुट कचरा निर्मितीत अव्वल अमेरिकेला प्रगत म्हणायचं? भारतात पुठ्ठे, खोकी जळण म्हणून वापरून पोटाची खळगी भरणाऱ्या लोकांकडून 'शून्य कचरा' संकल्पना राबवून पुनर्वापराचा वसा खरच यांनी घ्यायला हवा. स्वच्छता आणि कचऱ्याच्या बाबतीत आपण परस्परांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे मात्र नक्की ! समृद्धी-सुबत्ता असणाऱ्या देशाचा कित्ता आपण भारतीयांनी गिरवायचं नाही कारण या सगळ्याचा भार आणि भत्ता भरते ती आपलीच वसुंधरा!
वाचने
6341
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मी पयला!!
In reply to मी पयला!! by राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या
"गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड "
In reply to "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड " by चौकस२१२
https://youtu.be/nxPY37Z8dJE
In reply to "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड " by चौकस२१२
आपल्या सर्वांना गुन्ह्याची
In reply to "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड " by चौकस२१२
आपल्या सर्वांना गुन्ह्याची
In reply to "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड " by चौकस२१२
आपल्या सर्वांना गुन्ह्याची
In reply to "गुन्हेगाराला गुन्हा मंजूर आहे ... मिलॉर्ड " by चौकस२१२
चूक समजली की चूक सुधारणे शक्य
In reply to चूक समजली की चूक सुधारणे शक्य by निमी
चुका सुधारणे चालू आहे !
टाकाऊ पासून टिकाऊ
हा पण भाग आवडला
In reply to हा पण भाग आवडला by मुक्त विहारि
मनःपूर्वक धन्यवाद.. इथल्या
भारतात कचर्याविषयी असलेली भावना हास्यास्पद आहे.
माणसे थोडी ,कचरा थोडा.....