मांडुक्य उपनिषद
हे उपनिषद, मनुष्य रोजचे आयुष्य जगत असताना मनुष्याचे स्वरूप सच्चिदानंद आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ते मनुष्याने स्वत: कसे जाणावे हे समजावून सांगते. उपनिषदांनी ब्रह्म जाणण्यासाठी विविध प्रक्रिया शिकवल्या आहेत. मांदुक्य उपनिषद जी प्रक्रिया शिकवते तिला ‘अवस्थात्रय’ म्हणता येईल. मानवी आयुष्याचे सर्व अनुभव, जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये असतात हे सर्वांनाच माहीत असते. आपण याचा रोजच अनुभव घेतो. आपण जागेपणी या व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेत आपले मन विविध कल्पना निर्माण करते आणि आपल्याला जगाचा अनुभव येतो. गाढ झोपेत मात्र मन शांत होते पण अशा झोपेतून जागे झाल्यावर आपल्याला ताजेतवाने वाटते. हाच गाढ झोपेचा अनुभव. या तिन्ही अवस्था समजून मनुष्याने स्वरूप कसे ओळखावे हे या उपनिषदात शिकवले आहे.
प्रार्थना-
हे देवांनो, आम्ही आमच्या कानांनी शुभ शब्द ऐकावेत. पूजेस पात्र असणार्या हे देवांनो, आम्ही आमच्या डोळ्यांनी जे शुभ आहे तेच पहावे. सतत शुभ शब्द ऐकून आणि शुभ दृश्य पाहून स्थिर बनलेल्या आमच्या शरीराने व इंद्रियांनी आम्ही तुमची पूजा करीत, तुम्ही आम्हास दिलेले आयुष्य आम्ही कंठावे. ज्याची किर्ती फार पूर्वीपासून नेहमी ऐकू येते, असा इंद्रदेव आमचे कल्याण करो. जो सर्वज्ञानी आहे, तो पुषणदेव आमचे कल्याण करो. जो सर्व शत्रूंचा नाश करतो, तो तार्क्षदेव (गरुड) आमचे कल्याण करो. सर्व देव-देवतांचे गुरु असलेले बृहस्पतीही आमचे कल्याण करोत. ॐ शांति: शांति: शांति:!
या तीन शांती म्हणजे ‘तीन प्रकारच्या तापांची शांती असो’ या प्रार्थनेचे छोटे स्वरूप आहे. मानवी आयुष्यात तीन प्रकारचे ताप (suffering) असतात – १. आधिभौतिक – स्थावर आणि जंगम गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या विघ्नांमुळे उद्भवणारे दु:ख (एकमेकांची होणारी भांडणे वगैरे) २. आधिदैविक – नैसर्गिक शक्तींमुळे निर्माण होणाऱ्या विघ्नांमुळे उद्भवणारे दु:ख (पूर, भूकंप वगैरे), ३. आध्यात्मिक – वैयक्तिक कर्मामुळे निर्माण होणारे दु:ख. ॐ शांति: शांति: शांति: या प्रार्थनेचा अर्थ असा की हे तिन्ही ताप निवारले जावो.
ॐकार हेच सर्व काही आहे. तिन्ही काळात असते ती सृष्टी अथवा जगत आणि तिन्ही काळाच्या पलीकडे असते ते ब्रह्म! जगत आणि ब्रह्म हे मुळात ॐकारच होय. या जगातील सर्व वस्तुंना विविध नावे आणि रूपे असली तरी त्या सर्व वस्तू ॐकाराहून वेगळ्या नाहीत. या ॐकाराचा विस्तृत अर्थ असा – भूतकाळातील होऊन गेलेल्या, वर्तमानात असलेल्या आणि भविष्यकाळात येणार्या सर्व वस्तू मुळात ॐकारच आहेत. आणि या तिन्ही काळाच्या पलीकडे जे आहे तेही ॐकारच आहे. ||१||
संस्कृत भाषेचा एक मूळ गुणधर्म असा की, वस्तूचे नाम आणि वस्तू हे दोन्ही संस्कृतात एकच असतात. आधुनिक भाषांमधे हा गुण सहसा आढळत नाही. वस्तूच्या मूळ गुणांचे वर्णन करण्याचे कार्य संस्कृतात नाम करते. हे संपूर्ण विश्व आणि ते विश्व ज्यातून बनते ते ब्रह्म याला ॐ असे नामाभिधान आहे.
हे सर्व जगच - जे ॐकार म्हणून वर सांगितले आहे ते - ब्रह्म आहे. मी स्वत: स्वत:च्या हृदयावर हात ठेवून म्हणतो/म्हणते की ‘माझा आत्मा म्हणजे मी स्वत:, ब्रह्म आहे’. तो माझा स्वत:चा आत्मा जो ब्रह्म आहे त्याच्या चार अवस्था आहेत. ||२||
या चार अवस्था म्हणजे प्रत्येक क्षणीचे अनुभव मनुष्य ज्यात घेतो त्या तीन अनुभवात्मक अवस्था - जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप – आणि या तिन्हीच्या मुळाशी असलेली चौथी! अर्थात ही स्वतंत्र अवस्था नाही कारण मनुष्याच्या तिन्ही अवस्थांचा उगम-वृद्धी व लय यातून होतो. उदाहरणार्थ, शंभर पैसे मोजले की एक रुपया होतो. शंभर पैसे आणि एक रुपया हे मोजताना वेगळे असतात पण दोहोंत फरक नाही.
ॐकाराची पहिली अवस्था म्हणजे ‘वैष्वानर’. जागृतवस्था हे या वैष्वानराचे कार्यस्थान, याची बुद्धी बाह्य जगताबद्दल असते. याला सात अंग आणि एकोणीस मुखे असून हा सर्व स्थूल वस्तूंचा भोग घेतो.||३||
सात अंग आणि एकोणीस मुखे एक प्रारूप (मॉडेल) आहे. वैष्वानराचे शरीर हे सात अंगांचे बनलेले आहे. पंचमहाभूते, स्वर्ग आणि सूर्य यापासून या शरीराचे डोकं, डोळे, प्राण, हृदयावकाश, विसर्जनस्थाने, हातपाय व जिव्हा बनतात. याला एकोणीस मुखे आहेत – पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार (identity याअर्थी). थोडक्यात मनुष्याच्या जागृतावस्थेला हे उपनिषद वैष्वानर असे नाव देते. मनुष्य जागृत अवस्थेत जे अनुभव घेतो ते या सात अंग आणि एकोणीस मुखे याद्वारे घेतो यासाठी शरीराचे हे प्रारूप समाजणे आवश्यक आहे. आजच्या शास्त्रीय आणि आधुनिक भाषेत आपण विचार करतो तेंव्हा हे प्रारूप अतिशय असंबद्ध वाटू शकेल पण या पद्धतीने विचार केला तर मानवी अनुभव आणि मानवी शरीर यांचा संबंध समजण्यासाठी हे प्रारूप उपयोगी पडते.
ॐकाराची दुसरी अवस्था म्हणजे तैजस. स्वप्नावस्थेत कार्य करणारा, ज्याची बुद्धी मनात विविध वासना निर्माण करते, जो सात अंगे आणि एकोणीस मुखांनी कल्पनेच्या मदतीने उपभोग घेतो असा भाग म्हणजे तैजस होय. थोडक्यात मनुष्याच्या स्वप्नावस्थेला हे उपनिषद तैजस असे नाव देते. ||४||
जागृतावस्था आणि स्वप्नावस्था यांत सात अंग आणि एकोणीस मुखे यांचा उल्लेख येतो. म्हणजे उपनिषद इथं सांगत आहे की जागृतावस्था आणि स्वप्नावस्था या दोन्ही अवस्थांमध्ये अनुभवाच्या पातळीवर फरक नाही. अर्थात हे प्रथमदर्शनी समजणे अवघड आहे. जागृत अवस्थेत असताना आणि स्वप्नावस्थेत येणारे अनुभव हे त्या अवस्थांमध्ये तितकेच खरे वाटतात. जागेपाणी वाटलेली भीती आणि स्वप्नात वाटलेली भीती त्या-त्यावेळी तितकीच खरी असते. स्वप्नात लागलेली तहान आणि जागेपणीची तहान त्या-त्यावेळी तितकीच खरी असते. म्हणजेच केवळ अनुभवाच्या पातळीवर जागेपणा आणि स्वप्नावस्था यात तुलनात्मक फरक नाही. फरक आहे तो कृतीतून निर्माण होणाऱ्या परिणामांचा. अर्थात तो विषय इथे गैरलागू आहे.
ॐकाराच्या ज्या अवस्थेत मनुष्य कोणत्याही कामाची इच्छा करीत नाही अथवा स्वप्नही पहात नाही, ती अवस्था म्हणजे सुषुप्त (गाढ झोप). गाढ झोप हे ज्याचे स्थान, गाढ झोपेत जागृती आणि स्वप्न अवस्था लय पावतात. मनुष्य केवळ चैतन्यमय असतो आणि संपूर्ण आनंदमय होवून आनंदाचा भोग घेतो. चैतन्यच हे ज्याचे मुख आहे ती प्राज्ञ नावाची तिसरी अवस्था होय.||५||
गाढ झोपेतून उठल्यावर मनुष्याला अतिशय ताजेतवाने वाटते हीच त्या संपूर्ण आनंदमय असण्याची खूण! गाढ झोपेत असताना मनुष्य स्वत:चे भान विसरतो. म्हणजे मनुष्याची पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सर्वच गाढ निद्रेत जातात. या अवस्थेत मनुष्य केवळ चैतन्यमय अवस्थेत असतो पण कोणताही व्यवहार मनुष्य करीत नाही.
असा हा प्राज्ञ अवस्थेत असलेला आत्मा सर्व अवस्थांचा (जागृत आणि स्वप्नावस्था) स्वामी आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वांच्या अंतर्यामी आहे, आणि सर्वांच्या उत्पत्तीचे व लयाचे मूळ आहे. ||६||
मनुष्य गाढ झोपला असताना त्याला सर्व नाम-रुपांचा, विचारांचा व विषयांचा विसर पडतो. हीच आनंदमयी प्राज्ञ अवस्था. असे असताना याला सर्वज्ञ म्हटले आहे कारण जागृत व स्वप्नावस्था इथे अव्यक्त स्वरूपात असतात. उदाहरणार्थ, पिंपळाच्या झाडाच्या बी मध्ये पिंपळाचे झाड अव्यक्त स्वरूपात असते. बी रुजून योग्य वाढ झाल्यावर पिंपळाचा डेरेदार वृक्ष दिसतो. तो बी मध्येही असतो पण सुक्ष्म रूपात किंवा अव्यक्त स्वरूपात! तसेच आपली जागृतावस्था आणि स्वप्नावस्था या गाढ झोपेच्या अवस्थेत अव्यक्त स्वरूपात असतात. सर्व अनुभव निर्माण करण्याची क्षमता या प्राज्ञ अवस्थेत असते, त्यामुळे याला उत्पत्ति आणि लय यांचे मूळ म्हटले आहे. सर्वज्ञ, अंतर्यामी, सर्वांच्या उत्पत्तीचे व लयाचे मूळ ही लक्षणे ईश्वराला लागू पडतात. प्राज्ञ ही ईश्वराचे स्थान! ‘ब्रह्मानंदी टाळी’ असे आपण जे म्हणतो ती हीच अवस्था.
ज्ञानी लोक ॐकारची चौथी अवस्था मानतात. यात तो आत्मा जागृतावस्थेतला बहिष्प्रज्ञ नाही, स्वप्नावस्थेतला अंत:प्रज्ञ नाही, दोन्ही – अंत: व बहिर्प्रज्ञ - नाही, गाढ झोपेच्या अवस्थेतला प्राज्ञ नाही, अप्राज्ञ नाही. तो अदृष्ट, अव्यवहार्य, अग्राह्य, अलक्षण, अचिंत्य, ज्याच्याकडे निर्देश करता येत नाही असा, ज्यात सर्वकाही एकरूप आहे असा असणारा, असार, सर्व प्रपंचाची शांती करणारा, शांत, शिव (मंगलमय), अद्वैत (अद्वितीय) अशा चौथ्या अवस्थेत असतो. तोच आत्मा असून, त्याचे ज्ञान करून घ्यावे. ||७||
इथे चौथी ‘अवस्था’ असा शब्दप्रयोग केला असला तरी अशी काही वेगळी अवस्था नसते ही आपण सर्व जण जाणतोच. ‘चौथी’ याचा अर्थ असा – या तीन अवस्था जशा स्वतंत्रपणे अनुभवास येतात तशी चौथी अनुभवास येत नाही पण या तिन्ही अवस्था जिच्यातून निर्माण होतात ती चौथी! साध्या भाषेत सांगायचे तर केवळ चैतन्यमय शरीरातच या तीन अवस्था निर्माण होऊ शकतात. ते मूळ चैतन्य हेच मनुष्याचे स्वरूप आणि तिचे वर्णन या श्लोकात केले आहे. मांडुक्य उपनिषदाच्या बारा श्लोकांत हा सातवा श्लोक म्हणजे एखाद्या मंदिराच्या कळसाप्रमाणेच आहे. ज्या साधकाचे चित्त शुद्ध झालेले आहे त्या साधकाला या श्लोकाचा अर्थ समजतो आणि मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे – आत्यंतिक दु:ख निवृत्ती आणि शाश्वत सुख प्राप्ती! मनुष्याचे ‘सच्चिदानंद’ हे मूळ रूप या तीन अवस्थांच्या मुळाशी आहे म्हणजेच या स्वरूपातूनच या तिन्ही अवस्था निर्माण होतात व लय पावतात. मी म्हणजे काय? याचे उत्तर शोधताना ‘नेति नेति’ ही अवस्थात्रय प्रक्रिया या श्लोकात शिकवली आहे. ‘नेति नेति’ म्हणजे ‘हे नाही’, ‘हे नाही’ असे करत करत मूळ रुपापर्यंत पोचणे. मी म्हणजे मला जागेपणे जे स्वत:बद्दल वाटते ते नव्हे, स्वप्नात जे वाटते ते नव्हे तर या तिन्ही अवस्थांच्या मुळाशी असलेले चैतन्य म्हणजे मी हा समज या प्रक्रियेने दृढ होते. एकदा हा समज दृढ झाला की तेच शांतीरूप ज्ञान मनुष्याला मोक्ष प्रदान करते. अर्थात हा समज हळूहळू दृढ होत जातो. ज्ञानप्राप्तीचा एकमेव क्षण असे जे चित्रण केले जाते ते बहुतेकांच्या बाबतीत लागू पडत नाही.
पहिल्या व दुसऱ्या श्लोकात ॐकाराचा, जीव-जगत-ब्रह्म यांचा संबंध सांगितला. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या श्लोकात जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्त (स्वप्न रहित गाढ झोप) या तीन अवस्था सांगितल्या आणि त्यांचा उगम-लय कसा होतो हे सांगितले. सातव्या श्लोकात ब्रह्म कसे प्रत्येक मनुष्यात आहे आणि ते ज्ञान होण्यासाठी ‘नेति नेति’ प्रक्रिया काशी वापरावी हे शिकवले. या प्रक्रियेद्वारे ज्ञान मिळवायचे असेल तर साधकाचे मन ॐकाराच्या साधनेत कसे लावावे हे पुढील श्लोकात शिकवले आहे. आठ ते बारा या श्लोकांमध्ये ॐकारोपासना शिकवली आहे.
ॐ म्हणजे सृष्टीच्या मुळाशी असलेले मूलतत्व जे मनुष्याचेही मूळ रूप आहे. ॐ या शब्दात तीन मात्रा आहेत – अ, उ, म. या तीन मात्रा त्या मूलतत्वाच्या तीन अवस्था दर्शवितात. ||८||
ॐ व्याकरणाच्या दृष्टीने विचार करता, ॐ चा संधी विग्रह - अ उ म – असा होतो. आपण याचा उच्चार ओम असा करतो. अ + उ = ओ. ॐ चा उच्चार ओsssम असा करतो. ॐ चा उच्चार करताना सुरुवात अ ने होते. पुढे उ या अक्षराने ॐ चे पोषण होते. इथे ओsss या उच्चाराची कल्पना करावी. अन्यथा उ पोषण करतो म्हणजे काय ही समजणार नाही. आणि म ने शेवट होतो. ॐ चा उच्चार करताना अ ने सुरुवात म्हणजे अ प्रथम, उ हे अक्षर ॐ च्या उत्कर्षाचे किंवा वृद्धीचे आणि म ने ॐ च्या उच्चाराचा शेवट होतो. पुढच्या तीन श्लोकांमध्ये प्रथम, उत्कर्ष/वृद्धी व शेवट यांचा संबंध मनुष्याच्या अनुभवाच्या तीन अवस्थांशी – जागृत, स्वप्न, गाढ झोप - कसा आहे हे शिकवले आहे. इथे हे ही लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक श्लोकात फलश्रुति दिलेली आहे. फलश्रुतिचा शब्दश: अर्थ इथे घ्यायचा नाही.
अ हे पहिले अक्षर - वैष्वानर - म्हणजे त्याची (ब्रह्म) जागृत अवस्था दर्शवते. अ हे अक्षर व वैश्वानर यात ‘सर्वत्र असणे’ आणि ‘आद्य/प्रथम असणे’ या बाबतीत समानता आहे. फलश्रुति - अशा अ या अक्षराला ज्याने ओळखले, त्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याला प्रथम स्थान प्राप्त होते. ||९||
आता ‘अ आद्य आणि सर्वत्र असणे’ म्हणजे काय? ऐतरिय उपनिषद म्हणते की ‘अ या अक्षरातच सर्व वाचा समावली आहे’. वर्णमालेतील कोणतेही अक्षर अ शिवाय पूर्ण होत नाही. अ हे अक्षर वर्णमालेतील आद्य म्हणजे प्रथम याअर्थी व सर्वत्र सामावलेले आहे. आता ‘वैष्वानर (जागृतावस्था) आद्य आणि सर्वत्र असणे’ म्हणजे काय तर जागृतावस्था ही मनुष्याची प्रथम अवस्था आहे. यात बाह्य जगताचे सर्व अनुभव व्याप्त असतात. म्हणून अ हे अक्षर व वैश्वानर यात ‘सर्वत्र असणे’ आणि ‘आद्य/प्रथम असणे’ या बाबतीत समानता आहे, असे म्हटले आहे.
उ हे दुसरे अक्षर – तैजस - म्हणजे त्याची (ब्रह्म) स्वप्नावस्था दर्शवते. उ अक्षर व तैजस यात ‘उत्कर्ष’ आणि ‘मध्यभागी असणे’ या बाबतीत समानता आहे. फलश्रुति - अशा उ या अक्षराला ज्याने ओळखले, त्या मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, त्याला कोणी शत्रू उरत नाही व त्याच्या कुळात सर्वांना मोक्ष मिळतो. ||१०||
आता ‘उ म्हणजे ‘उत्कर्ष’ आणि ‘मध्यभागी असणे’ यांचा अर्थ काय? ॐ शब्दाचा उच्चार करताना अ ने सुरुवात म्हणजे अ प्रथम, उ हे अक्षर ॐ च्या उत्कर्षाचे किंवा वृद्धीचे आणि म ने ॐ च्या उच्चाराचा शेवट होतो. तसेच ॐ मध्ये उ हे अक्षर अ आणि म च्या मध्यभागी असते. आता ‘तैजस’ आणि ‘मध्यभागी असणे’ यांचा अर्थ काय? तैजस (स्वप्नावस्था) ही जागृतावस्थेच्या आणि गाढ झोपेच्या मध्ये असते हा आपला सहज अनुभव आहे. मनुष्य प्रथम झोपी जातो तेंव्हा प्रथम स्वप्नावस्था येते आणि मग गाढ झोप. गाढ झोपेतून परत स्वप्नावस्थेत आणि मग जागृती. याअर्थी तैजस मध्यभागी असते असे म्हटले आहे.
म हे तिसरे अक्षर – प्राज्ञ - म्हणजे त्याची (ब्रह्म) गाढ झोपेची अवस्था दर्शवते. म अक्षर व प्राज्ञ यात ‘लयत्व’ आणि ‘शेवट असणे’ या बाबतीत समानता आहे. फलश्रुति - अशा म या अक्षराला ज्याने ओळखले, त्या मनुष्याला या विश्वाचे पूर्ण ज्ञान होते. ||११||
ॐ शब्दाचा शेवट म ने होतो. गाढ झोपेच्या अवस्थेत जागृतावस्था व स्वप्नावस्था लय पावतात. ॐ चा जप करताना अ आणि उ यांचा म मध्ये लय होतो व पुढच्या ॐ उच्चारात अ आणि उ हे पुन्हा म पासून निर्माण होतात असे वाटते.
सर्व मात्रा ॐ मध्ये लय पावतात आणि ॐ म्हणजे तुरिया. तुरिया या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘चार’ किंवा ‘चवथा’. तीन अवस्थांचा लय चवथ्यात होतो आसा ॐ मंगल व अद्वैत आहे. ॐ म्हणजेच स्वत:चे मूळ स्वरूप (ब्रह्म रूप) आहे. हे ज्या मनुष्याला समजले त्याला स्वत:च्या मूळ रुपाची प्राप्ती स्वत:च होते. मांडुक्य उपनिषद समाप्त ||१२||
अशा प्रकारे ॐ ची साधना करून मनुष्याच्या लक्षात येते की त्याच्या तीनही अवस्था – जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि गाढ झोपेची अवस्था यांच्या मुळाशी सत्य आणि शिव असे त्याचे मूळ स्वरूप आहे. साध्या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल की - जागृतावस्था आणि स्वप्नावस्था यात अनुभवांची जाण मनाला असते. परंतू, मनुष्याला जेंव्हा गाढ झोप लागते तेंव्हा पंचेंद्रिये, मन, अहंकार, बुद्धी, चित्त यांचा लय झालेला असतो. मनुष्याला स्वत:चे भान नसते व अनुभवशून्यता येते. या अवस्थेत मनुष्यात केवळ शुद्ध चेतना असते. यालाच तुरिया म्हटले आहे. या तुरियेचा अनुभव मनुष्य करू शकत नाही. ॐकाराच्या साधनेने हे ज्ञान पक्के होते व मनुष्याला मोक्ष मिळतो.
मनुष्याच्या तीनही अवस्थांचा लय ओंकारात होतो म्हणून ही सर्व जगच ॐ आहे.
मांडुक्य उपनिषदाची हीच शिकवण आहे.
संदर्भ:
- आचार्यभक्त विष्णु वामन बापटशास्त्री कृत ‘सुबोध उपनिषत्संग्रह’, चतुर्थ आवृत्ती २०१८ (शेक १९३९), संपादक आचार्यभक्त पं. द. वा. जोग
- Swami Gambhirananda, Eight Upanisads with Commentary of Sankaracharya, 21st Reprint May 2019, Advaita Ashrama, Kolkata
- Swami Tadatmananda, satsang on teachings of ‘ॐ Mandukya Upanishad’ and ‘Mandukya Upanishad with Gaudapada Karika’ at https://arshabodha.org/teachings/
प्रतिक्रिया
27 Mar 2023 - 8:40 am | प्रचेतस
मांदुक्य हा शब्द खड्यासारखा बोचला.
बाकी लेख छान मात्र मूळ संस्कृत श्लोक दिले असतेत तर अधिक आवडले असते.
31 Mar 2023 - 1:54 am | अभिजीत
धन्यवाद. संपादकमंडळापैकी कोणीतरी बदल केलाय त्याबद्दल संमंचेही धन्यवाद. मूळ संस्कृत श्लोक देण्याचा विचार पुढच्या वेळी नक्की करेन.
27 Mar 2023 - 12:07 pm | प्रसाद गोडबोले
बामणाचे कसब
उपनिषदांच्या अभ्यासाचा श्रवणाचा अधिकार केवळ द्विजांना अर्थात ज्यांची मुंज झाली आहे त्यांना च आहे असे सनातन वैदिक हिंदु परंपरेत मानण्यात येते. सांप्रतकाळी मुंज हा संकार फक्त बामणांच्यात होत असुन अन्य वर्णाच्या लोकांमध्ये ह्या आणि अन्य बहुतांश संस्कारांचा लोप झालेला आहे. थोडक्यात काय तर उपनिषदे फक्त बामणांसाठीच आहेत . हे सारं बामणांचे कसब आहे. बहुजनांना गुलामगिरीच्या बेड्यांत गुंतवुन फुकटात बसुन वरणभात अन तुप पोळी खायची भटुर्ड्यांनी करुन ठेवलेली सोय आहे . त्याला काहीही अर्थ नाही. वरील संपुर्णलेखातील एकही वाक्य आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर पडताळुन पाडता येणे शक्य नाही. हा लेख, ही उपनिषदे आणि समस्त सनातन वैदिक हिंदुधर्मच बामणाचे कसब आहे. बहुजनांनी ह्या बामणी काव्याला बळी पडु नये. समस्त ब्राह्मणेतरांनी हा बामणी धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान हे सारेच बामणांच्या करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत , समता आणि बंधुतेची शिकवण देणार्या बौध्द धर्माचा स्विकार करावा हेच उत्तम !!
#लाल्_सलाम
______________________
उत्तम लेख अभिजित !
पहिल्याच शब्दात चुक हे म्हणजे अगदीच प्रथमग्रासे मक्षिकापातः झाले ! ड लिहिण्यासाठी कॅपिटल डी वापरावे जेणे करुन शब्द योग रीतीने लिहिता येईल !
बाकी मंडुकोपनिषद सत्संगधारा वेबसाईट्वर प्रत्येक श्लोकाचा सुबोध मराठी अनुवादासह उपलब्ध आहे . ही घ्या लिन्क >> https://satsangdhara.net/upa/mundakopanishad.htm
पण खरेच उपनिषदांवर लेखन करावे का हा गहन प्रश्न आहे कारण ज्याची अध्यात्मिक पुर्वपिठीका नाही त्याला हे सारे समजणे अशक्यप्रायच आहे . समर्थांनी अतिषय स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे की -
ज्याचे मौजीबंधनच झालेले नाही, ज्याला आचमन , अर्घ्य , प्राणायाम , चित्राहुती वगैरे मुलभुत सामान्य गोष्टीच माहीत नाहीत त्याला उपनिषदे काय समजणार ? त्यांमुळे खरेच उपनिषदांवर लेखन करणे उचित आहे का ह्यावर एकदा आत्मचिंतन करावे असे नितांत विनम्रपणे सुचवु इच्चितो. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींना उपनिषदांवर भाष्य करता येणे शक्य होते मात्र त्यांनीही भग्वद्गीतेची निवड केलेली आहे , उपनिषदांची नाही , एकनाथांनीही रामायण भागवत ह्यांवर भाष्य केलेले आहे , उपनिषदांवर नाही, ही मोजकी उदाहरणे स्पष्ट आहेत. बाकी आपण चिंतन करुन योग्य अर्थ लावण्यास अन निर्णय घेण्यास समर्थ आहात हे आपल्या लेखनावरुन जाणवले.
बाकी अर्धवट ज्ञानाने कसा अर्थाचा अनर्थ पक्षी बट्ट्याबोळ होतो ह्याचे एक उदाहरण इथे मांडूक्य उपनिषदातच आहे !
सत्याचाच जय होतो, असत्याचा नाही. तृष्णारहित (आप्तकामाः) ऋषि जो मार्ग आक्रमण करतात व ज्या मार्गावर सत्याचे परम स्थान म्ह० ब्रह्म आहे असा देवयान मार्ग सत्याने भरलेला आहे. ६
ह्या श्लोकातीतील पुर्वार्ध सत्यमेव जयते उचलुन नको तिथे चिकटावला गेला आहे , पण श्लोकाचा उत्तरार्ध पाहिल्यास तो सरळ सरळ वैदिक साधनेला निर्देशित करणारा आहे , आणि उर्वरीत उपनिषदही आत्मतत्वाविषयीच आहे . हे म्हणजे सरळ सरळ सेक्युलॅरिझमच्या विरुध्द आहे ! हिंदु व्यतिरिक्त अन्य धर्मीयांसाठी "तुम्हीच आत्मतत्व , ब्रह्म अर्थात परमेश्वर आहात" असे म्हणणे म्हणजे सरळ सरळ बॅस्फॅमी आहे , हेरेसी आहे , अबॉमिनेशन आहे .
=))))
हा असा अर्थाचा अनर्थ ! आता बघा, तुमचं तुम्हीच ठरवा !
असो.
इत्यलम !
31 Mar 2023 - 2:42 am | अभिजीत
#लाल्_सलाम वाला भाग आणि 'अर्थाचा अनर्थ' वाला भाग यात बराचसा भाग उपरोधिक वाटला. अशी मांडणी सतत होत असते आणि त्याला उत्तर दिले पाहिजेच पण त्याच बरोबर हिंदू धर्माचा व्यावहारिक भाग जो सनातन (नित्यनुतन याअर्थी) आहे त्याचा प्रसार केला पाहिजे.
खरेच उपनिषदांवर लेखन करावे का?
याचे माझे उत्तर 'हो' असेच आहे, म्हणुनच हा लेख लिहीला. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, असे बरेच लोक असतात ज्यांना उपनिषदांवर वाचायला आणि समजून घ्यायचे असते पण सहजासहजी हे शक्य होत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला मराठी आणि इंग्रजी व्यवस्थित लिहिता-वाचता येतात, वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करता येतो. जे मला समजले ते इतरांना समजावे म्हणुन मी लिहितो. अर्थात यात मलाच फार फायदा होतो कारण लिहिल्यामुळे विषयावर खूप विचार होतो आणि अभ्यास पक्का व्ह्ययला फार मदत होते. आपल्या मताचा आदर आहेच.
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद
सत्यमेव जयते - हे मुंडक उपनिषदात येते, ही छोटीशी चुक सोडली तर तुमचा उरलेला प्रतिसाद पुन्हा उपरोधिक आहे असे वाटते आहे. भारतीय सेक्युलॅरिझम म्हणजे मूळचा हिंदू विचार, ज्यात सर्व दर्शनांना स्थान आहे. 'सत्य एकच आहे आणि वेगवेगळ्या मार्गांने ते मिळवता येते' यावर हिंदू विचार नुसता विश्वास ठेवतो असे नव्हे तर अशा प्रत्येक मार्गाचे पालन-पोषण करतो. हे ज्यांना समजत नाही त्यांच्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो असे आमचे मत आहे.
स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याब्रह्मवित्कुले भवति । तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ मुंडक ३.२.९ ॥
मुंडक उपनिषदाच्या शेवटी-शेवटी येणारा हा मंत्र म्हणजे मुंडकाची फलश्रुतीच म्हणावी असा आहे.
'... (अशाप्रकारे) जो 'मी स्वतःच ब्रह्म आहे' हे जाणतो, तो ब्रह्मज्ञ ब्रह्मच होतो. त्याला अन्य गती नाही. देवताही अशा व्यक्तिच्या मार्गात येत नाहीत. अशा व्यक्तिच्या कुलात अब्रह्मवेत्ता होत नाही. अशा मनुष्यास शोक होत नाही, धर्म-अधर्म यातून निर्माण होणारे पाप यांस शिवत नाही आणि त्याला जिवंतपणीच मोक्ष मिळतो.' ॥ मुंडक ३.२.९ ॥
लौकिक आयुष्यात अनेक वस्तुंचा वियोग झाल्यामुळे शोकाची निर्मिती होते. यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष! 'आत्यंतिक दु:ख निवृत्ती आणि शाश्वत सुख प्राप्ती' म्हणजे मोक्ष. उपनिषदे हा मोक्ष कसा मिळवावा हेच शिकवतात. ही श्रुती या तत्वाचे उदाहरणच आहे.
3 Apr 2023 - 11:37 am | प्रसाद गोडबोले
हा हा हा .
आम्ही मुद्दमच अशा चुका करत असतो जाणेवपुर्वक , जेणेकरुन लेखकाने खरेच किती अभ्यास केला आहे आणि त्याचे किती लक्ष आहे , त्याला किती खरेच उमगले आहे की केवळ शब्दपोपट्य आहे , हे आमाच्या लक्षात येते =))))
बाकी लढत रहा , संघर्ष करत रहा , बामणं जे उपनिषदांच्या शेवटी म्हणतात ते ॐ शांति: शांति: शांति: वगैरे वगैरे असे जे म्हणातात ती शांति: अजिबात इकडे फिरकता सुध्दा कामा नये , आलीच तर तिला आम्ही "बघुन" घेऊ ;)
लाल_सलाम
=))))
27 Mar 2023 - 1:15 pm | कर्नलतपस्वी
केव्हढी जळजळ........
समर्थ रामदास स्वामी सांगून गेले आहेत,
हेत समजोन उत्तर देणें । दुसऱ्याचे जीवीचें समजणें ।
मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥
बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥
बाष्कळामधें बैसो नये । उद्धटासिं तंडों नये ।
आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥
नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगो नये ।
नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥
प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु नका ।
खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥
म्हणून माझा पास.
31 Mar 2023 - 2:44 am | अभिजीत
समर्थ रामदास स्वामींच्या ओव्या लिहिल्याबद्दल धन्यवाद.
28 Mar 2023 - 4:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि प्रतिक्रिया वाचुन त्याहुन धन्य झालो.
बाकी सध्या ऑस्ट्रेलियन क्लायंट पहाटे लवकर पिडायला लागतो त्यामुळे हापिसात बसुन रोज दुपारी आम्ही तुर्यावस्थेची साधना करत असतो. बाकी उपनिषदे वगैरेवर बोलुन आपले अज्ञान कशाला दाखवा? त्यामुळे माझा पास.
28 Mar 2023 - 8:43 pm | चामुंडराय
मांदुक्यचे मांडुक्य केले ते बघून बरे वाटले.
एकेश्वरवादी धर्मांचे (abrahamic religions) प्राबल्य असलेल्या पाश्चात्य जगातील क्वांटम सिद्धांत आणि कॉन्शस्नेस स्टडीज् वर संशोधन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांना उपनिषदातील तत्वज्ञानामध्ये तथ्य असावे असे वाटते आहे ही भारतासाठी गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. अर्थात ही गोष्ट उर्वरित जग सहजासहजी मान्य करेल अशी शक्यता नाहीच परंतु आशेचा किरण दिसतो आहे.
रामकृष्ण मिशनच्या न्यूयॉर्क येथील वेदांत सोसायटीच्या स्वामी सर्वप्रियानंद (Swami Sarvapriyanand) ह्यांची वेदांतातील *Consciousness* ह्या संकल्पनेबद्दलची, अद्वैत तत्वज्ञानासंबंधीत सोप्या व ओघवत्या इंग्रजी भाषेतील व्याख्याने यू-ट्यूबवर अधिक माहितीसाठी उपलब्ध आहेत.
28 Mar 2023 - 9:40 pm | कंजूस
कुणी काहीही करू शकतो ना?
बाकी चालू द्या.
28 Mar 2023 - 10:22 pm | Bhakti
वाह!जरा समजून घेतलं.खुपच सुंदर आहे हे!
ॐ चा नव्याने अर्थ समजला. consciousness, unconsciousness खोल आहे.
मार्कस लिंक साठी धन्यवाद!
हा व्हिडिओ छान आहे.५ मिनिटापर्यंत पाहण्यासारखा आहे..
https://youtu.be/jDapD1JjEp4
31 Mar 2023 - 2:58 am | अभिजीत
धन्यवाद!
युट्यूब व्हिडिओ छानच आहे.
हरी ॐ तत्सत
29 Mar 2023 - 7:40 am | विवेकपटाईत
सौप्या शब्दांत गूढ उलगडणे यालाच म्हणतात.
29 Mar 2023 - 7:41 am | विवेकपटाईत
सौप्या शब्दांत गूढ उलगडणे यालाच म्हणतात.