"सर... ओळखलंत का मला?"
आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो.
पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा. त्याच्या टीमची बाकीची पोरं सिगरेट फुकायची पण ह्याला कधी सिगरेट ओढताना, मावा खाताना बघितला नव्हता. आम्हा दोघांचीही गावं सातार्याजवळची असल्यामुळे असेल कदाचित - माझ्याशी जरा जास्त आपुलकीनं बोलायचा. गावाकडच्या गोष्टी सांगायचा. करीअरबद्दल सल्ला मागायचा. कंपनी सोडल्यानंतरही त्याने लग्नाला आवर्जून बोलावलं होतं. पण तेव्हा जमलं नव्हतं.
"अर्रे पर्या... किती वर्षांनी भेटतो आहेस. जाड झालास की रे! लग्न मानवलंय. दाढीचा कट वगैरे जोरदार आहे. कसा आहेस?"
"मी मजेत आहे सर. इथे एका कार्यक्रमासाठी आलो होतो."
"अरे व्वा! इथेच आहेस ना? आलोच गाडी पार्क करून."
त्या गर्दीत पार्किंग सापडायला थोडा वेळ लागला. दहा एक मिनिटांनी पुन्हा तिथे गेलो तर आता पर्याशेठचा झब्बा बदलून वर जरीचा अंगरखा आला होता. मला बघितल्यावर पर्या किंचितसा ओशाळित होऊन हसला. बायकोकडे बघून नमस्कार करून म्हणाला "नमस्कार वहिनी."
"क्या बात है! नाटकात काम करतो आहेस?"
"शिवजयंतीसाठी जाणता राजा चा एक प्रवेश करतोय आम्ही. माझी फक्त शेवटी एंट्री आहे."
"अरे ग्रेट! आता तुझा प्रवेश बघूनच जातो."
आम्ही सुद्धा तिथल्या त्या गर्दीत सामील झालो. मागे चालू असलेल्या जाणता राजाच्या ऑडिओ वर शाहीर महाराजांची थोरवी गायचा अभिनय करत होता.
"ऐका ऐका पाटील, पाटलिणींनो - ऐका ऐका मराठमुलुखीच्या गावकर्यांनो, आया-बहिणींनो! ऐका हा काशीचा ब्राह्मण काय सांगतोय! पुरणाच्या पोळीहून गोड गोड सांगतोय तो! म्हणतोय शिवाजीराजाला राज्याभिषेक झालाच पाहिजे!"
"गड बहु चखोट. दीड गाव उंच. तासिल्याप्रमाणे असलेल्या कड्यांवर पर्जन्यका़ळी गवताचे पातेही उगवत नाही. अठरा कारखाने, बारा महाल - हिराजी इंदुलकराने रायगडास सजवायास सुरुवात केली."
"प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानन्दोSनुज्ञया,
श्रीमच्छत्रपते: शिवस्य नृपते: सिंहासने तिष्ठत:||"
"शाहिरांची प्रतिभा, पंडितांचे शास्त्र, महाराजांचे ध्येय, आईसाहेबांच्या अपेक्षा, संतांचे आशीर्वाद, मृत वीरांच्या अतृप्त इच्छा आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे आनंदाश्रू त्या दिवशी साकार व्हावयाचे होते."
"श्रीमन्मंगलमूर्ती मोरेश्वरा ऋद्धिसिद्धीच्या नायका, विघ्नहरा सर्वप्रथम आपण या." पाठोपाठ जेजुरीच्या खंडेरायाला, वेरुळीच्या घृष्णेश्वराला, पंढरीच्या विठुरायाला, आई भवानीला, जगन्माता अंबाबाईला, माहुरीच्या रेणुकामातेला आणि वणीच्या सप्तशृंगी मातेला आवतान दिलं गेलं.
प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेलेली. नगार्याचा गजर झाला. तुतारीच्या नादात आता महाराजांच्या वेशात आमचा पर्या एंट्री घेणार होता. ढोल ताश्यांच्या गजरात शब्द कानी येत होते -
"दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर
भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है|
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर
त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है|"
तितक्यात मागे गलका झाला "एक मिनिट - सरका सरका"! अच्छा, म्हणजे पर्याची एंट्री प्रेक्षकांतूनच आहे होय! मी पर्याला वाट द्यायला बाजूला सरकलो आणि सरकताना मागे वळून पाहिलं मात्र - तो पर्या नव्हताच! डोक्याच्या जिरेटोपाला मोत्याचा तुरा, दोन्ही हातात कडी. बोटांत अंगठ्या. छातीवर मोत्यांच्या माळा, कानांत भिकबाळी पायांत मोजड्या, खांद्यावर धनुष्य, कमरेला भवानी - साक्षात छत्रपती माझ्या समोरून जात होते. सोबत महाराणी सोयराबाई होत्या, युवराज संभाजीराजे होते, अनाजीपंत, दत्तोपंत होते, सरसेनापती हंबीरराव मोहिते होते, नोतोजी पालकर होते, जेधे होते, बांदल होते! अहो तिथे नसूनही तिथे असलेले सुभेदार मालुसरे, बाजी पासलकर, मुरार बाजी देशपांडे, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजरही होते.
आमच्या समोरून रुबाबदार पदन्यास करत "महाराज" जनतेचे मुजरे स्वीकारत सिंहासनाधिष्ठित होण्यासाठी जात होते. वेदमंत्रांच्या घोषात आणि जयजयकारात महाराजांचा राज्याभिषेक झाला. नाटकं संपलं. म्हटलं जायच्या आधी पर्याला भेटून जायलाच हवं. म्हणून त्या गर्दीतून वाट काढत बॅकस्टेजला गेलो. पण तिथे अजूनही पर्या नव्हताच. एका खुर्चीवर एक पाय लांब सोडून आणि एक हात गुडघ्यावर ठेऊन अजूनही "महाराजच" बसले होते. लोकं येऊन जात होती, काही नमस्कार करत होती, काही फोटे काढत होती. मी समोरच उभा होतो. त्यांच्या डोळ्यांत आपुलकी होती पण ओळख नव्हती. आणि "महाराजांना" "फार छान काम झालं" म्हणण्याची किंवा त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्याची माझी हिंमत नव्हती.
"सर सॉरी हा - मघाशी कार्यक्रमानंतर भेटायला जमलं नाही." तासाभराने पर्याचा फोन आला.
"अरे मी भेटून गेलो की तुला."
"अॅक्चुली ना सर, तो जिरेटोप डोक्यावर असला ना की दुसरं काही सुचतंच नाही बघा. फार मोठी जबाबदारी वाटते. जिरेटोप डोक्यावर असताना, हातात भवानी असताना, कपाळाला टिळा असताना - खोटं बोलता येत नाही, टवाळ्या करत टाळ्या देऊन हसता येत नाही, आया बहिणींशी बोलताना त्यांच्या पावलांच्या वर नजर जात नाही, कोणी वेडं-वाकडं वागलेलं - रस्त्यावर थुंकलेलं चालत नाही - अहो सर - त्या वेषात बाटलीनं बिसलेरीचं पाणी पीता येत नाही."
प्रवेश संपल्यावर पर्यानी ओळख न दिल्याचं कारण कळालं.
सरकारनं हेल्मेट ऐवजी प्रत्येकाला जिरेटोप घालणं कम्पल्सरी करावं काय?
© - जे.पी.मॉर्गन
फाल्गुन कृष्ण तृतीया शके १९४४
शिवजयंती
प्रतिक्रिया
11 Mar 2023 - 9:27 am | कर्नलतपस्वी
कुठल्याहि जयंत्या,डिजे,डोल्बी,आयटम साँग शिवाय साजऱ्या होतच नाहीत. रयत ध्वनी प्रदूषणाने बेजार आहे. विद्यार्थी अभ्यासवर एकाग्रचित्त होऊ शकत नाही. आगोदरच झोप कमी असलेले वयोवृद्ध रात्रभर जागे आहेत. कोर्टाच्या नियमांना वेशीवर टांगलय,अक्षरशः पायमल्ली व पोलीस यंत्रणा तर XXX पेक्षाही जास्त हतबल झालीय. कितीही वेळा काॅल करा उचलत नाही. तक्रार नोंदवून घेतली तरी काहीच कारवाई करत नाही.राजकारणी वन अपमॅनशिप दाखवण्या करता तरूणाई ला पैसा पुरवतात. संतरजी उचल्यांना एक चपटी,चकणा व पेट्रोल दिले की कुत्र्याच्या XXला पेट्रोल लागल्या सारखे मोटर सायकलीचा सायलेन्सर काढून रात्र रात्र वस्तीत घिरट्या घालतात. आवाज एवढा मोठा आवाज की दारे,खिडक्या आपटतात.
तो जाणता राजा रयतेवर जुलूम झाला म्हणून पाटलाचा *चौरंग्या* करणारा आज स्वर्गात दुःखी असेल.
प्रत्येक शिवजयंतीला "मी शिवाजीराजे बोलतोय "या सिनेमा सारखे जर महाराज खरेच आले तर काय करतील याची कल्पना करत बसतो.
अशाच एका लग्न समारंभात लावलेला डिजे मुळे त्रासलेल्या वरिष्ठ नागरिकाने दहा लाखाची डि जे सिस्टीम तोडली. त्यावर भा पि को अनुसार खटला भरला आहे.
शिवजयंती झाली की अंबेडकर मग गणेशोत्सव मग लग्नसमारंभ. आमच्या गावात तर बैलपोळ्याला सुद्धा डि जे लावतात व तीन तास वाहतूक कोंडी नक्कीच होते.
बाकी तुम्ही चांगले लिहीले आहे.
12 Mar 2023 - 8:37 pm | सौंदाळा
मस्त लिहीलं आहे
वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे.
जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे.
रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.
12 Mar 2023 - 8:37 pm | सौंदाळा
मस्त लिहीलं आहे
वपुंची एक कथा आहे. नाटकात बेभान अभिनय करणाऱ्या कलाकाराची. ट्राजीडी भूमिका करताना खरोखरच हा नट ओक्साबोक्शी रडत असे (त्याचे लहानपणीचे उपासमारीचे दिवस आठवून) भावाने त्यामुळे त्याचे नाटक बंद केले आणि नंतर त्या नटाचा मृत्यू झाला, अशी काहीशी कथा आहे.
जे सच्चे कलावंत असतात ते झोकून देऊन काम करतात. तुम्ही मस्तच लिहिले आहे.
रच्याकने शुभमन गिल तुमच्या लेखणीतून बघायचा आहे. येणाऱ्या नवीन फळीतील आश्वासक फलंदाज वाटतोय.
12 Mar 2023 - 9:12 pm | तुषार काळभोर
पर्या, 'महाराज' आणि पूर्ण प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला.
13 Mar 2023 - 1:19 am | राघव
व्वा! जाणीव असावी तर अशी! अस्सल बावनकशी!!
मुजरा! _/\_
15 Mar 2023 - 10:04 am | राजेंद्र मेहेंदळे
लेख आवडलाच. पण शिवाजी महाराज आता फक्त मनात राहिलेत. प्रत्येकाने आपापल्या राजकिय फायद्यासाठी त्यांना वेठीला धरलेय. वर्षातुन ३ वेळा शिवजयंती साजरी होतेय. एकदा "ह्यांची" एकदा "त्यांची". जनता मोठ्मोठे डि जे/ रस्ते अडवणारी स्टेज, ट्रॅफिक जॅम, वर्गणीच्या नावाखाली खंडणी, हप्तेबाजी याने त्रासली आहे. "या या अनन्य शरणा आर्या ताराया" म्हणायची वेळ आली आहे.