प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ,
First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही. तेव्हा आपण फक्त क्रिकेटबद्दल बोलूया.
ह्या पत्राला कुठलाही राजकीय संदर्भ नाही. किंबहुना क्रिकेटमधला सुद्धा फक्त भारत वि. पाकिस्तान हा परिपेक्ष नाही. सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुली देतो -
तुमच्याबद्दलचा राग / द्वेष सुद्धा केवळ तुम्ही पाकिस्तानी आहात म्हणूनच आहे. वैयक्तिक काही आकस असण्याचं कारणच नाही. इन फॅक्ट असला - तर परिस्थितीमुळे वाईट मार्गाला लागलेल्या गुणी मुलांबद्दल असावा तसा तुमच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नरच आहे. इतका की तुमच्याच तोडीच्या इतर देशांच्या खेळाडूंपेक्षाही आम्हाला तुमचं कौतुक काकणभर जास्त आहे. तुमच्याबद्दल कौतुकही वाटतं आणि वाईटही. तुमच्या देशातली धर्मांधता, पाचवीला पुजलेली राजकीय अस्थिरता, डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती बघता कदाचित भारतापेक्षाही पाकिस्तानात क्रिकेटला जास्त सीरियसली घेतलं जात असेल. तुमच्यावर तुमच्या देशवासियांच्या अपेक्षांचं ओझं किती असेल याची आम्हाला अर्थातच कल्पना आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या क्रिकेटमधल्या कामगिरीचं खरंच कौतुक वाटतं. आजही फक्त १३७ धावांचा बचाव करताना तुम्ही शेवटपर्यंत लढलात. निदान कप सहजासहजी इंग्लंडच्या खिशात जाऊ नये म्हणून प्रयत्न केलेत. शेवटच्या धावा होईपर्यंत खांदे पाडले नाहीत. तुमच्याकडून जे होईल ते केलंत. एका क्रिकेटप्रेमीला अजून काय हवं?
तुमच्या दोन गोष्टी आम्हाला जाम आवडतात - टॅलेंट आणि जिगर! आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळणारे सगळेच खेळाडू टॅलेंटेड असतातच. त्याशिवाय का ते इथवर पोहोचतात? पण तुमची कलंदरी वेगळी आहे गड्याहो. कदाचित आपल्या शत्रुत्वातच तुमच्याविषयीच्या खास आकर्षणाचं बीज असावं.
अब्दुल कादिर, मुश्ताक अहमद, "दूसरा"चा शोध लावणारा सकलेन मुश्ताक, सईद अजमल, दानिश कनेरिया - तुमचे स्पिनर्स नेहेमीच काहीतरी विचित्र आणि वेगळं करायचे. कधी कधी इतकं विचित्र की त्यांच्या अॅक्शनबद्दल शंका यावी. अर्थात तुमच्या स्पिनर्सचा आम्हाला म्हणावा तसा त्रास कधी झाला नाही. पण त्यांना इतर देशांच्या फलंदाजांची भंबेरी उडवताना बघून मजा यायची. तुमची फलंदाजीही भक्कम. तुम्ही झहीर अब्बास, सलीम मलिक, महंमद यूसुफ, यूनुस खान, मिसबाह उल हक सारखे दर्जेदार फलंदाज दिलेत - पण आमच्या मनात घर केलं ते "street fighters" चा मेरुमणि जावेद मियांदादने, इंझीच्या lazy elegance ने, सईद अन्वरच्या मनगटातल्या जादूने, हाततल्या बॅटनी जणू पिच खोदणार्या एजाज अहमदने आणि बूम-बूम आफ्रिदीने. कारण ही लोकं आम्हाला जास्त त्रास द्यायची. चांगली लढत सगळ्यांनाच आवडते. आणि हे सगळे निश्चितच लढवय्ये होते. सचिन ऑस्ट्रेलियन्सना सलायचा आणि म्हणूनच आवडायचा. ही लोकं आमची लाडकी ह्याच साठी.
एरवी एका भारतीयाला पाकिस्तानचा हेवा वाटणं म्हणजे शुक्रावर पाणी सापडण्याइतकं दुरापास्त. पण एका बाबतीत मात्र आम्हाला तुमचा हेवा वाटतो. तुमच्या फास्ट बोलर्सच्या फौजेचा! सर्फराझ नवाझ, इम्रान खान - काय तो स्विंग आणि काय तो कंट्रोल! वकारभाईचे टाचा तोडणारे यॉर्कर्स, आपल्या अॅक्रॉस जाणार्या आऊटस्विंगरने फलंदाजाला "खोलणारा" वसीमभाई - त्यांच्या यूट्यूबवरच्या चित्रफितींची पारायणं केली आहेत आम्ही. आवडत्या पाकिस्तानी क्रिकेटर्ससाठी भारतात निवडणूक घेतली तर वसीम आणि वकार पहिली दोन नावं असतील. भारतीयांचं खरं प्रेम आहे ह्या दोघांवर. शिवाय वेगाचा बादशाह शोएब अख्तर. काय तो नजारा - तब्बल तीस यार्डांवरून बोलिंग करण्यासाठी रावळपिंडी एक्सप्रेस धडधडत निघायची. दोन्ही हात शरीरापासून लांब... केस हवेत उडताहेत... मागे सारलेल्या बाह्यांमुळे दिसणारे त्याचे पिळदार फोर-आर्म्स... क्रीझ मागून घेतलेली ती झेप... आणि तोफगोळ्यासारखा तो चेंडू फलंदाजाकडे भिरकावणं.. सगळंच अविस्मरणीय. आसिफ - आमिर सारखे स्विंगचे धनी! अगदी शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ पर्यंत गुणवंत. "कौनसी चक्की का आटा खाते है रे ये पाकिस्तानवाले" असा प्रश्न पडावा इतकं कौशल्य, इतकी प्रतिभा! ही नावं एका पाठोपाठ एक वाचताना सुद्धा आमच्या चेहर्यावरून कौतुक ओसंडत असतं.
क्रिकेटचं सौंदर्य हे बॅट्समनमुळे नाही तर वेगवान गोलंदाजांमुळे आहे. आंणि तुम्ही त्या सौंदर्याला चार चांद लावलेत. १९९० पासून २००४ पर्यंत आम्हाला भारतापेक्षाही पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा आफ्रिकेच्या दौर्याची उत्सुकता असायची. तुमच्या फास्ट बोलर्सच्या कलेला त्या देशांमधल्या परिस्थितीचं कॅनव्हास मिळाल्याचा आनंद आम्हालाही व्हायचा. वसीम-वकार-शोएब विरुद्ध डोनल्ड - पोलॉक - एन्टिनी किंवा मॅक्ग्रा - गिलेस्पी - ब्रेट ली ह्या लढती म्हणजे तर क्रिकेटप्रेमींसाठी सवाई गंधर्व महोत्सवासारखा "क्लासिकल" सोहळा! किती आनंद दिला तुमच्या गोलंदाजांनी!
आणि तुमची ढिसाळ फील्डिंग म्हणजे तुमच्या गोंडस चेहर्याला लावलेली टीट जणू! एखादा सोपा झेल सोडला की कामरान अकमल किंवा सर्फराझ अहमदच्या चेहर्यावरचे भाव, तुमच्या दोन फील्डर्सच्या मध्ये बॉल पडल्यावर त्या दोघांची झालेली नजरानजर, थ्रो स्टंपला न बसल्यामुळे रनआऊट ची संधी हुकल्यानंतर झालेला तुमच्या कॅप्टनचा चेहरा - ह्या सगळ्यात एक वेगळाच निरागस, हताश असा भाव असतो. एरवीच्या पाकिस्तानी खेळाडूला अजिबात न शोभणारा एक गबाळेपणा तुमच्य फील्डिंगमध्ये असतो तो आम्हाला फार लोभसवाणा वाटतो.
हे बघा - आधीच आपलं क्रिकेटचं कुटुंब तसं छोटं. कसोटी खेळणारे ईन-मीन बारा देश. त्यातले क्रिकेटचं "सौंदर्य" जपणारे म्हणजे १९७०-१९९० मधले विंडीज आणि १९९०-२००४ मधले तुम्ही. बाकी क्रिकेट कितीही व्यावसायिक होवो, कितीही नियम बदलोत, डावपेच येवोत - शेवटी लोकांना मैदानावर खेचून आणतात ते कलंदर कलाकार. आणि तुम्ही लोकं कलंदर आहात हे आम्ही सुद्धा खुल्या दिलाने मान्य करतो. तुमच्यातही व्यावसायिकता येत आहे, तुमचा फिटनेस सुधारतोय, तुमचं क्षेत्ररक्षण सुधारतंय ही खरोखरंच चांगली गोष्ट आहे. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून विनंती करतो - त्या व्यावसायिकतेच्या नादात तुमच्या क्रिकेटमधली उत्कटता सोडू नका. तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. क्रिकेटशी बेईमानी करू नका. पुन्हा जुन्या जखमांवरच्या खपल्या काढू देऊ नका. बाबर आझम, रिझवान, शादाब खान यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, शाहनवाझ दहानीकडून खूप अपेक्षा आहेत. पाकिस्ताननी उत्तमोत्तम क्रिकेटर्स निर्माण करणं ही फक्त तुमची नाही तर क्रिकेटची गरज आहे. आता तुम्हाला तुमच्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळता येत आहे त्याचा फायदा घ्या. बाहेर जाऊन मैदानं मारा.
माझ्या प्रिय शत्रूंनो - आज इंग्लंडला चांगली लढत दिलीत. आमच्याविरुद्धही चांगलेच लढलात. पुन्हा भेट होईल तेव्हाही आम्ही तुम्हाला चोपूच. पण तुम्ही चांगलं क्रिकेट खेळत राहा. आपलं शत्रुत्व आपल्या जागी ठाम आहेच, पण क्रिकेटप्रेमी म्हणून आपली मैत्री तोडू नका. विश्वचषकाच्या उपविजेतेपदानिमित्त अभिनंदन आणि शुभेच्छा!
© - जे.पी.मॉर्गन
१४ नोव्हेंबर २०२२
प्रतिक्रिया
14 Nov 2022 - 1:16 pm | मुक्त विहारि
आणि
युसूफ योहानाने, जेंव्हा मुस्लिम धर्म स्वीकारला, तेंव्हाच त्याला कर्णधारपद मिळाले ....
ते सोडा, तो त्यांचा अंतर्गत मामला आहे
पण, श्रीलंकेच्या एका खेळाडूला देखील, तू मुस्लिम धर्म स्वीकार, असा संदेश, पाकिस्तानी खेळाडूने दिला होता ....
खेळांत धर्म आणू नये, ही इतर संघांची भावना, पण पाकिस्तानचे तसे नाही...
धर्मांध पाकिस्तान....
14 Nov 2022 - 3:07 pm | श्वेता व्यास
लेख आवडला.
15 Nov 2022 - 10:34 am | योगी९००
लेख आवडला पण पाकिस्तानी खेळाडू वाटतात तेवढे साधे नाहीत.
फक्त एका गोष्टीचे कौतूक वाटले. ज्या टेस्ट मध्ये इरफानने हॅट्रीक घेऊन त्यांची ३ बाद शुन्य अवस्था केली व जगभर वाहवा मिळवली, ती टेस्ट नंतर कामरान अकमल, अब्दूल रझाक आणि शोएब अख्तर यांनी वाचवली. ६ बाद ३९ वरून २४५ स्कोर केला व पुढच्या इनिंगला चांगली बॅटींग करून टेस्ट जिंकली पण... इरफानच्या हॅट्रीकचा काय उपयोग झाला?
15 Nov 2022 - 2:14 pm | मुक्त विहारि
मला भेटलेले पाकिस्तानी, अत्यंत नीच, हलकट आणि धर्मांधच होते....
काही लोकांना, दूरून डोंगर साजरेच वाटतात..
16 Nov 2022 - 6:58 pm | सामान्यनागरिक
पाकिस्तान लवकरच सोमालिया सारखे " फेल्ड स्टेट " म्हणजे वाया गेलेले राष्ट्र म्हणून घोषित होईल. सध्या भीकेवर जगताहेत. अगदी तसं नाही तरी बेगर (भिकारी) स्टेट म्हणून नक्कीच होईल.
अश्या स्थितीत पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीची दखल घ्यावी ईतका मान आपण त्यांना द्यावा का?
17 Nov 2022 - 6:30 pm | कानडाऊ योगेशु
तसे झाले तर पुढे नुकसान भारताचेच होईल.भुकेल्या पोटाला भडकावणे फार सोपे असते.कसाबला आठवा.
18 Nov 2022 - 8:38 am | मुक्त विहारि
अमेरिकेवर झालेला आतंकी हल्ला, हेच सांगतो की, धर्मांध व्यक्ती कुठल्याही स्तराला जाऊ शकतात ....
20 Nov 2022 - 1:15 pm | उपेक्षित
अत्यंत उत्कृष्ठ झालाय लेख, जियो
तुमच्या क्रिकेटवरील लेखांचा आधीपासूनच चाहता आहे पण हा लेख वाचून आदर दुणावला.