ऐक.. दरवाजा उघडू नकोस!
(गूढकथा)
सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता.
जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच. हा असा भला मोठा बंगला, त्याचा एवढा मोठा पसारा, त्याचा तो एवढा मोठा अवकाश, कमालीचा भीतीदायक वाटत होता.
जशी जशी रात्र पुढे सरकत होती, तशी तशी ही अवतीभोवतीची शांतता, घनघोर जाणवायला लागली होती. त्यात पुन्हा आमचा बंगला, गल्लीच्या एकदम टोकाला. सभोवताली कोणाचीच सोबत नाही. बंगल्याच्यामागे दूरपर्यंत पसरलेले जंगल, सभोवताली मोठ मोठे वृक्ष. सगळीकडूनच प्रतिकूल परिस्थिती होती.
मला आता, बंगल्यात एकटीला राहण्याचा पश्चात्ताप होत होता. घरचे चांगले म्हणत होते,
"तूही आमच्याबरोबर गावी चल.
कशाला एकटी थांबतेस?"
पण नाही.
"तुम्ही या जाऊन. एक दिवसाची तर गोष्ट आहे.
मी थांबते एकटी. मी आता लहान थोडीच आहे."
असे म्हणत मी घरच्यांची बोळवण केली व एकटीच घरी थांबले.
सायंकाळपर्यंत मला काहीच जाणवले नाही. दुपारपासून मस्त टीव्ही बघत वेळ घालवला. तसे एकटीला राहणे आवडते मला. कोणाचीच कटकट पाठीमागे नसल्यावर, एक वेगळीच उभारी येते मनाला. एकटेपणाची जाणीव कधी कधी मनाला एक स्थिरपण देऊन जाते. म्हणून तर एकटीने घरी थांबण्याचा, मी निर्णय घेतला होता.
पण सायंकाळ झाल्यानंतर,उगाच मनाला अस्वस्थ वाटू लागले. दिवसभराचा गोंगाट कमी झाल्याने, सभोवताली शांतता निर्माण झाल्याने, मन एकदम उदास होऊन गेले होते. त्यात पुन्हा आज आपण घरी एकटेच असणार आहोत, आपल्या एकटीलाच आजची रात्र काढावी लागणार आहे, या विचारानेच मनात कसेतरी झाले. मी प्रथमच, अशी रात्रीच्यावेळी एकटी बंगल्यात थांबणार होते. मनात उगीचच एक बेचैनी निर्माण झाली होती.
सायंकाळच्या मंद प्रकाशाच्या छटा,हळू हळू वातावरणात जशा गडद होऊ लागल्या, तशी माझ्या मनाची बेचैनी वाढू लागली. मी गडबडीने जाग्यावरून उठले. बंगल्याची सगळी दारे, खिडक्या उघड्या होत्या. सगळ्यात अगोदर ते सगळे बंद करणे गरजेचे होते. मी पटापट एक एक खिडकी बंद करू लागले. त्यात पुन्हा गार वारा वातावरणातून पसरत होता. दारे खिडक्या, त्यावरचे पडदे उगीच वेडेवाकडे, इकडून तिकडे हलत होते. आणि तितक्यात माझ्या लक्षात आले, की बंगल्याचे मुख्य गेट आपण बंद केलेच नाही. सरकन माझ्या अंगावर काटा उभा राहिला. गेटमधून कोणी आत शिरले तर? माझ्या मनात भीती निर्माण झाली. गेट बंद करणे गरजेचे होते. पण आता बंगल्याच्या बाहेर जाणे, मला योग्य वाटत नव्हते. ते जिकिरीचे ठरले असते, कारण आता बाहेर चांगलाच अंधार दाटून आला होता. पण मग दार असे खुलेआम उघडे ठेवणे,कितपत योग्य ठरणार होते. ते बंद तर करावेच लागणार ना? माझ्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली. काय करावे कळत नव्हते. मी जागेवरून उठले. आणि खाली जायला निघाले. बंगल्याच्या बाहेर आले. बाहेर चांगलाच काळोख दाटला होता. मी घाई केली. पटकन गेट बंद करून, लवकर वर निघून जायचे असे ठरवले. मी पटापट गेटपर्यंत आले. ते लोखंडी भलेमोठे गेट कधी एकदा लावून घेते, असे मला झाले होते. मी जोरात गेट ओढू लागले. ओढताना त्या लोखंडी गेटचा तो कर्णकश आवाज कमालीचा मर्मभेदी वाटू लागला. त्या आवाजाने आजूबाजूची गूढ शांतता भंग पावली जात होती. मी क्षणभर तसेच गेट हातात धरून सावधपणे उभी राहिले. ती आजूबाजूची शांतता अशी भंग करणे मला भीतीदायक वाटत होते.
या अशा आवाजाने कोणी आपल्याकडे आले तर? कोणाला आपली चाहूल लागली तर? पुन्हा एकदा भीती माझ्या अंगभर संचारून गेली. आता एक क्षणही मला तिथे थांबणे शक्य होत नव्हते. कोण कुठून माझ्यावर धावून येईल का? अशी भीती मला वाटायला लागली. मी सगळा जोर लावून गेट ओढून घेतले, त्याला कुलूप घातले, आणि वेगाने बंगल्यात जायला निघाले. जाताना सहज वर बंगल्याकडे नजर गेली. बंगल्याच्यावर अंधाराचे वेडेवाकडे आकार नजरेस पडत होते. अंधाराच्या काळ्या मुद्रा गडदपणे दिसत होत्या .मनातले वेडेवाकडे विचार त्या अंधारात प्रतिबिंबीत होऊ लागले. चित्र विचित्र आकार त्या अंधारात मला दिसू लागले. आता माझ्या सर्व मनाला भीतीने घेरले होते. अजून आपण जास्त वेळ त्या अंधाराकडे बघायला लागलो, तर काहीतरी अनर्थ घडेल. त्यापेक्षा बंगल्यात गेलेले बरे,असे मनाशी म्हणत मी पटकन बंगल्यात जाऊ लागले. बंगल्यात येऊन मी पुन्हा दरवाजा बंद केला आणि एकदाचा निश्वास सोडला.
माणसाच्या मनात एकदा भीती शिरली, की ती भीती माणसाला नको त्या विचारात घेऊन जाते. मनात नको नको ते विचार उत्पन्न होऊ लागतात. कदाचित माझ्या बाबतीत तसेच होत असावे. बंगल्याची सर्व दारे, खिडक्या, गेट बंद केले होते. पण मनातल्या विचारांची दारे मात्र खुलेआम उघडीच होती. त्यामुळे माझ्या मनातली भीती थोडीही कमी होत नव्हती. बेडरूमचा दरवाजा लावून मी पलंगावर बसलेले होते. पण तरीही मनाला स्थिरता लाभत नव्हती. मन पुन्हा पुन्हा फिरून त्या अंधाऱ्या गर्तेतच जात होते.
रात्र पुढे सरकत होती. त्यासोबत अवतीभवतीचा काळोख, शांतता, गूढता ही वाढत होती. वातावरण कमालीचे शांत जाणवत होते. अधून मधून रातकिड्यांचा आवाज तेवढा कानात शिरत होता. मी एकदम स्तब्धपणे ती शांतता अनुभवत होते. श्वासांची लय शांतपणे पडत होती. पापण्या मिटून, मी सगळे विचार एका जागेवर केंद्रित करत होते. मनाला आवरण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेवढ्यात तो आवाज माझ्या कानात शिरला. भीतीचे भाले सरसर करत माझ्या मेंदूत शिरले. सगळे अंग एकदम ताठ झाले. अंगातले रक्त वेगाने दौडू लागले. गेट खोलल्याचा आवाज माझ्या कानापर्यंत आला होता. मघाशी गेट बंद करताना जसा आवाज आला, अगदी त्याच पद्धतीचा हा आवाज होता. कोणीतरी गेट उघडत होते. पण कोण? कोण्या सामान्य माणसाचे ते काम असेल, असे वाटत नव्हते. कारण एवढे भलेमोठे गेट असे सहजासहजी खुलणारे नव्हते. माझे अंग शक्तिपात झाल्यासारखे हलके पडत होते. काय करावे काहीच सुचेना गेले. या अशा अभद्र रात्री आपण एकटीने थांबायला नको होते, ही जाणीव आता तिव्रतेने होऊ लागली.
गेट उघडले गेले होते म्हणजे, कोणीतरी बंगल्यात प्रवेश करत होते. पण खरच गेट उघडले गेले होते, की तो माझा भास होता? कारण भितीचा पगडा माझ्या मनावर एवढा तीव्र होता, की माझे मलाच काही कळत नव्हते. मघाचे त्या बंगल्या बाहेरचे वेडेवाकडे आकार, चित्रविचित्र आकृत्या, आता तो गेटचा आवाज हे सगळे सत्य होते की, भीतीपोटी माझ्या मनाच्या त्या अवस्था होत्या, काही म्हणजे काहीच कळत नव्हते.
आता शांत बसून चालणार नव्हते. काहीतरी हालचाल करावी लागणार होती. भले तो भास असो किंवा सत्य. कशाला त्याची परीक्षा घ्यावी. त्यापेक्षा आपणच काहीतरी हालचाल करावी. मी जागेवरून उठले. घरच्यांना फोन करून चालणार नव्हते. ते काळजीत पडले असते. अशा वेळी एकच व्यक्ती मला मदत करु शकते. अमर. हो तोच! मी झटकन अमरला फोन लावला. रात्र बरीच झाली होती. पण तरीही तो माझा फोन उचलणार हे मला माहित होते. अपेक्षेप्रमाणे त्याने दुसऱ्याच रिंगला फोन उचलला. माझा घाबरा आवाज त्याच्या कानावर पडताच, त्याला कळाले की माझ्याबाबत काहीतरी घडलय. माझ्या आवाजातील भिती त्याला स्पष्टपणे जाणवत होती. त्याने काकुळतीला येऊन मला काय झाले विचारले. आधी तर मला स्पष्टपणे काहीच सांगता येईना. शब्दांची जुळवाजुळव मला करता येईना. नेमके काय घडले, कसे सांगावे हेच कळेना. तो पुन्हा-पुन्हा तिकडून काय झाले? काय झाले? विचारत होता. मला शांत राहून, सगळे काही व्यवस्थित सांगण्यासाठी बोलत होता. मी काहीशी शांत होऊन, त्याला अगदी प्रथमपासून सगळे काही सांगू लागले. आणि शेवटी ते गेट उघडल्याचा आवाज आणि अंधारातले ते वेडेवाकडे- चित्रविचित्र आकारांचा तो भाग सांगून, मी शांत झाले. माझ्या डोळ्यातून पाणी गळू लागले. भीतीने माझा सगळा मनोव्यापार व्यापला गेला होता. मला आता कोणाच्या तरी आधाराची गरज होती. मी रडतच अमरशी बोलू लागले. तो मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण माझ्या एकटेपणाची जाणीव मला पुन्हा पुन्हा भीतीच्या खाईत लोटत होती.
अमरशी बोलण्यात बराच वेळ निघून गेला होता. हरेक प्रयत्न करून, तो मला शांत करत होता. मीही आता काहीशी स्थिर झाले होते. पण हा माझ्या मनाचा स्थिरपणा जास्त वेळ टिकला नाही. अचानक दरवाजावर टकटक असा बोटे आपटल्याचा आवाज आला. आणि अक्षरशः भीतीच्या हजारो संवेदना माझ्या मनात आरपार घुसत गेल्या. सगळे अंग थरथर कापत होते. पाणावलेल्या डोळ्यांनी मी दरवाज्याकडे बघत होते. गेट पार करून खरोखरच कोणीतरी आले होते. अगदी दरवाज्यापर्यंत आले होते. तो तेवढा दरवाजा आता त्याच्या आणि माझ्यात मध्यस्थी होता. एकदा तो पार केला, की ते अनोळखी जे काही असेल, ते माझ्याकडे येणार होते. माझा आवाज एकदम बंद झाला होता. भीतीने माझ्या सगळ्या संवेदना गोठल्या होत्या. अमरचा फोन मधून सारखा आवाज येत होता.
"राधा काय झाले?
बोल काहीतरी. कोण आलय?"
माझ्या हातातला फोन थरथर करत होता. माझे भीतीने विस्फारलेले डोळे, अजूनही दरवाज्यावर स्थिरावलेले होते. आणि तेवढ्यात दरवाजावर पुन्हा एकदा टकटक झाली.आणि घळाघळा माझ्या डोळ्यातून,पाणी बाहेर पडू लागले. सगळी भीती शरीरभर संचारु लागली.
"अमर दरवाज्याबाहेर कोणीतरी आलंय रे.
ते कोण आहे ,माहित नाही, पण कोणीतरी आलय हे नक्की. या अशा गडद रात्री कोण आल असेल रे?"
मी कसेबसे अमरला बोलून गेले. माझी नजर दरवाज्याकडेच होती. तेवढा तो दरवाजाच आता माझे संरक्षण कवच होते. एकदा का त्याने तो पार केला, की मग सगळेच संपणार होते.
"राधा, अस घाबरु नकोस.
धीर धर.
तू दरवाजा उघड, आणि बघ कोण आहे ते."
अमर मला दरवाजा खोलायला सांगत होता. मला त्याचा प्रचंड राग आला. मी दरवाजा खोलला तर,ते जे काही बाहेर आहे, ते घरात येणार नाही का?
"अमर, मी दरवाजा कसा उघडू?
ते जे काही असेल, ते आत येईल ना!"
मी अगदी क्रोधाने त्याला म्हणाले.
"हे बघ राधा, अशा भीतीच्या दडपणाखाली,तू नीट राहू शकणार नाहीस. एकदाचा काय तो दरवाजा उघड. बाहेर कोणीतरी माणूसच असेल. दुसरे काही अभद्र असणार नाही. नाहीतर या भितीपायी तुला काहीतरी होईल.
ऐक तू, दरवाजा खोल."
अमर सारखा मला दरवाजा खोलण्यासाठी सांगत होता. आणि दरवाजा खोलण्याची माझी हिम्मत होत नव्हती.
आता दरवाजा वरची टकटक वाढत चालली होती. आणि त्यासोबत माझ्या मनातली भीतीही. आणि त्यातच अमरची दरवाजा खोलून बघण्याची, माझ्या मागची कटकटही. माझ्या मनात भीती, क्रोध, असहायता वाढत जात होती. मी कमालीची हतबल होत होते. आणि शेवटी माझ्या भीतीच्या वरचढ माझा क्रोध जाऊ लागला. संतापाने माझे सर्व शरीर कंप पावू लागले. शेवटी जे होईल ते होईल. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू, असे मनाशी ठरवून मी वेगाने उठले,आणि दरवाजा जवळ गेले. क्षणभर दरवाजा जवळ थांबले आणि जोरात दरवाजा मागे ओढला, आणि मी डोळे बंद करून घेतले. पल दोन पल शांततेत गेले. मी डोळे उघडले. आणि समोर दरवाजात अमर उभा होता. माझ्याकडे हसत बघत होता. त्याला असा समोर पाहून, झरझर करत, माझी सगळी भीती शरीरातून खाली उतरत गेली. सगळे शरीर हलके झाले. हसावे की रडावे काहीच कळेना गेले. मी हसत हसत त्याला आत घेतले. त्याच्या त्या जीवघेण्या मस्करीने माझी चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. तो माझ्याकडे बघून, अजूनही हसत होता. आणि मी रागाने त्याच्याकडे बघत होते.
तो तसाच हसत किचनमध्ये निघून गेला. कदाचित त्याला तहान लागली असावी. मी आता एकदम शांत झाले होते. या धावपळीत शरीर चांगलेच दमले होते. मी तशीच बेडरूममध्ये शिरले आणि तिथे पलंगावर अंग झोकून दिले. कानाजवळ फोन तसाच पडलेला होता. तो उचलून बाजूला ठेवत होते, तेवढ्यात फोन मधून काही तरी आवाज आला. मी फोन कानाजवळ नेला आणि तो आवाज कानात शिरला.
"राधा, तू ठीक आहेस ना?
कोण आलय दरवाज्यात? तू घाबरू नकोस.
उघडलास का दरवाजा? कोण आहे?
बोल ना राधा. कोण आहे?
तू घाबरू नकोस अजिबात."
माझ्या हातातला फोन, एकदम खाली गळून पडला होता. शरीर पक्षपात झाल्यासारखे सुन्न होऊन पडले होते. आणि माझ्या डोळ्यांपुढे अंधाराची, गडद लहान मोठी वर्तुळे उमटली जात होती. दरवाजातून कोणीतरी अनोळखी आत शिरले आहे, हे मात्र नक्कीच!
समाप्त.
वैभव देशमुख.
प्रतिक्रिया
13 Sep 2022 - 9:33 am | भागो
वेल कम बॅॅक.
13 Sep 2022 - 10:44 am | विजुभाऊ
खत्तरनाक
13 Sep 2022 - 11:12 am | सौंदाळा
खूप दिवसांनी लिहिलेत पण भारीच.
छोटे छोटे घोट घेऊन भितीचे रसायन पितोय असं वाचताना वाटत होतं.
13 Sep 2022 - 11:17 am | vaibhav deshmukh
सर्वांचे मनापासून आभार.
13 Sep 2022 - 11:41 am | श्वेता२४
भारी लिहिलय
13 Sep 2022 - 12:32 pm | बोलघेवडा
फारच छान. एकदम अनपेक्षित शेवट.
"..फोन गळून पडला" या वाक्यानंतर गोष्ट संपवली असती कदाचित अजून भारी परिणाम झाला असता. पुढचं स्पष्टीकरण न देता वाचकांवर सोडली असती तरी चालेल असतं. असो. अजून येऊ देत साहेब अश्या कथा
13 Sep 2022 - 12:48 pm | vaibhav deshmukh
नक्कीच.
प्रयत्न करेल शेवट तसा करण्याचा.
13 Sep 2022 - 3:34 pm | सस्नेह
मस्त ! वातावरण निर्मिती भारी.
13 Sep 2022 - 10:46 pm | सौन्दर्य
गोष्ट छानच. अनेकदा अशा भयकथांमध्ये दरवाजे, भिंतीचे वगैरे अडथळे वर्णिले जातात. जर असे अतृप्त आत्मे घरात एखाद्या व्यक्तीपर्यंत येऊ इच्छित असतील तर त्यांना हे अडथळे पार करण्यासाठी ते उघडण्याची गरजच भासता कामा नये असं मला नेहेमीच वाटत आले आहे.
14 Sep 2022 - 10:02 am | पाषाणभेद
छान आहे कथा.
14 Sep 2022 - 11:29 am | मनिम्याऊ
बाब्बो
14 Sep 2022 - 11:47 am | ज्ञानोबाचे पैजार
बर्याच दिवसांच्या गॅप नंतर लिहिलेत?
पण मजा आली वाचताना,
तुमची गोष्ट म्हणुन मुद्दाम निवांत वेळीच वाचायची असे ठरवले होते.
छान आहे आवडली
पैजारबुवा,
14 Sep 2022 - 2:23 pm | vaibhav deshmukh
मध्यंतरी कामाचा व्याप जरा वाढला होता.त्यामुळे लिखाण कमी झालं होतं.पण आता लिहीत आहे. तुमचा लोभ असाच कायम ठेवा.हुरूप येतो लिहिण्याचा.
14 Sep 2022 - 2:24 pm | vaibhav deshmukh
सर्वांचा आभारी आहे.
असाच लोभ असू द्या.
14 Sep 2022 - 5:43 pm | टर्मीनेटर
गूढकथा आवडली 👍
14 Sep 2022 - 8:06 pm | ब़जरबट्टू
एका दमात वाचली ,,,
15 Sep 2022 - 7:28 pm | स्वधर्म
शेवट खासच!
22 Sep 2022 - 6:42 pm | diggi12
शाली पूर्ण करा की राव
23 Sep 2022 - 7:58 pm | vaibhav deshmukh
हो नक्कीच प्रयत्न करतो.
थोडा भाग बाकी आहे.
24 Sep 2022 - 9:37 pm | कर्नलतपस्वी
+१
23 Sep 2022 - 5:44 pm | कॅलक्यूलेटर
तुमच्या कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवतात
23 Sep 2022 - 7:57 pm | vaibhav deshmukh
धन्यवाद...!
23 Sep 2022 - 6:57 pm | प्राची अश्विनी
भारी.