विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
विंदा करंदीकरांनी आधुनिक मराठी कवितेवर छाप पाडली आहे. विसाव्या शतकातले बदल समाजाला भरडत होते, तसे समाजाला नवी संधी सुद्धा देत होते. यातील काही विषण्ण, काही स्फूर्तीदायक, काही वैचारिक अशी काव्ये आपण वाचलेलीच आहेत. आता आपण त्यांच्या बालकवितांबद्दल थोडी चर्चा करूया.
या काळातल्या कवींनी मराठीतील प्रौढासाठीच्या कवितांनाही एक वेगळा आकारही दिला. मराठीची नैसर्गिक आघातांची जी लय आहे, प्राचीन वृत्तांऐवजी त्या लयीत विंदा करंदीकरांनी रचना केली. त्यांची मुक्तसुनीते ही पूर्वीच्या शार्दूलविक्रीडिताच्या बंधनातून मुक्त आहेत, तरी तालशुद्ध आहे. कित्येकदा विंदा करंदीकरांनी यमकाचेही बंधन मानले नाही. पारंपरिक वृत्त-यमकबद्ध कवितांच्या मानाने या रचना मुक्त असल्या तरी मराठी भाषेच्या नैसर्गिक ठेक्याला काटेकोरपणे धरून आहेत.
विंदा करंदीकरांच्या प्रौढ कवितांमधली प्रयोगशीलता, आणि मराठी भाषेच्या लयीशी इमान लक्षात ठेवले, तर त्यांच्या साध्या सोप्या बालकवितांमधली कारागिरी जाणवल्यावाचून राहात नाही. बालकवितेसाठी करंदीकरांनी आघातानुसारी छंद आणि यमके वापरायचा निर्णय घेतला आहे. यात खरे आश्चर्यकारक काही नाही. मराठीतील बालगीते (विंदांची नव्हे ती बालगीतेसुद्धा) आघातानुसारी आणि यमकबद्धच असतात -
चांदोबा चांदोबा भागलास का? \ निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
या ओळी पुढील प्रकारेच वाचता येतात :
चांदोबा चांदोबा भाग्लास का? \ निंबोणीच्या झाडामागे लप्लास का?
ठळक आघाताक्षरांवर ठेका धरला तर काटेकोर आहे. शिवाय "भाग-लास", "लप-लास" असा उच्चार कुठलेही मराठी मूल करणार नाही, "भाग्लास", "लप्लास" असाच उच्चार मूल करेल. खरे तर बालकांना फार आधीपासून कळणारी मराठी लय विंदा करंदीकरांनी प्रौढ कवितेतही मोठ्यांना शिकवली, असे म्हणायचा मोह होतो.
पूर्वापारपासून बालगीतात यमके महत्त्वाची :
अड्गुलं मड्गुलं \ सोन्याचं कड्गुलं
- यमके हवीत म्हणजे हवीतच
करंदीकरांनी मुलांच्या भावविश्वात प्रवेश केला तेव्हा नेहमीच्या आवडीच्या बालगीतांचेच रूप घेतले. ते बदलले नाही. प्रायोगिकता आणली ती वेगळ्याच प्रकारे. पु. ल. देशपांडे म्हणतात की गाण्यामध्ये गेयता असते, तर कवितेत काव्यगुण असतो. करंदीकरांच्या बालकवितेत काव्यगुण आढळतो खास, पण बाल-गेयता कधीच सांडत नाही.
बालकासाठी ललित वाङ्मय लिहिणारा प्रौढ एका विचित्र कैचीत सापडलेला असतो. एखादा मोठा माणूस पाच फूट उंचावरून बोलतो आहे, असे वाटता कामा नये. लहानपणी मी मनाचे श्लोक पाठ केले, तेव्हा मनोरंजनापेक्षा मला शिकवण अधिक मिळाली. मनाच्या श्लोकांतले लालित्य प्रौढ होईपर्यंत खरे तर जाणवलेच नाही. दुसर्या टोकाला जाऊन, अतिसुलभ भाषा वापरली तरी चालत नाही. "तुला लहान वयात काय समजणार" असा जर कवी-लेखकाने चुकून विचारही केला, तर मुलांना तो अपमान लगेच समजतो.
विंदा करंदीकरांची बालकविता "अजबखाना" संग्रहात मी दहा-एक वर्षांचा असताना वाचली. ती कविता मला अतिसुलभही वाटली नाही आणि प्रौढांनी सांगितलेले पाठांतरही वाटले नाही. ती कविता माझ्याशी बाळपणीसुद्धा संवाद साधत होती. आज प्रौढपणी ती वाचतो, तेव्हाही ती माझ्याशी बोलते.
येथे मी तीन कविता देणार आहे. वाचकाने लहान मूल होऊन त्या वाचाव्यात, आणि प्रौढ होऊन पुन्हा वाचाव्यात. (गंमत म्हणून तीन्ही निवडलेल्या कविता पर्यांबद्दल आहेत.)
पहिली कविता आहे "शाप". गमतीदार शब्दयोजना, विक्षिप्त कल्पनाविलास - निखळ मौज होते आहे. या ठिकाणी प्रौढ किंवा बालवयातले अर्थ माझ्यासाठी तरी बदललेले नाही. प्रौढ वाचनात कुशल कारागिरी जाणवते, इतकाच काय फरक.
शाप
पर्या होतात
शेवटी लठ्ठ,
असे म्हणाला
एक मठ्ठ.
पऱ्यांनी दिला
त्याला शाप :
पुढच्या जन्मी
झाला साप.
ही पुढची "फूलवेडी" कविता मात्र तशी नाही. आता प्रौढ वयात मी ती वेगळ्या तर्हेने वाचतो.
फूलवेडी
एक परी
फूलवेडी
फुलासारखी
नेसते साडी.
फुलामधून
येते जाते;
फुलासारखीच
छत्री घेते.
बिचारीला
नाही मूल;
पाळण्यामध्ये
ठेवते फूल.
यात लहानपणी वेडगळ किंवा फुलांच्या सौंदर्याबद्दल वेडी झालेली परीच दिसली होती. आता ते शेवटचे कडवे अतिशय करुण वाटते. कवितेचा अर्थच बदलतो. पुन्हा कविता वाचावी लागते. आणि अगदी साध्यासुध्या "बिचार्या" शब्दाने काळजात धस्स होते. करंदीकरांना कुठल्या भरभरलेल्या शब्दागाराचे पाठबळ लागत नाही. अगदी रोजवापरातल्या शब्दाला ते विलक्षण धार देऊन चालवत आहे. माझ्या कल्पनेत असा घरगुती प्रसंग उभा राहातो आहे. एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे आपल्या ओळखीतल्या निरागस छोट्या मुलीकडून ही कविता ऐकत आहेत. त्यातून छोटीला जाणवणारी मजा, आणि त्याच वेळी मोठ्यांच्या काळजाला लागणारे चटके - कल्पनेतही काटा येतो.
पुढची "परी आणि घर" कविता मला आता वाचताना वैचारिक वाटते.
परी आणि घर
एका मुलाला
दिसली परी;
घातलीन् खिशांत,
आणलीन् घरी.
आणि मग
अगदी खुशींत
तिला घेतलीन्
आपल्या कुशींत.
पडले स्वप्न
भयंकर :
परी चालली
घेऊन घर.
खरेच - आपल्या आवडत्या व्यक्तीला कधी प्रेमाने कुशीत, कधी बेजबाबदारपणे खिशात घातले, तर ते नाते भयंकर आहे. पण असा बेजबाबदारपणा किती सरेआम आपण करतो. या तरुणाला ही सुंदरी कुठे बरे भेटली असेल? कसे असतील त्यांच्यातील संवाद? त्यांच्या नात्यामधील दु:स्वप्ने? या कवितेत मला एक मनोवैज्ञानिक कादंबरी दडलेली दिसत आहे.
अशी ही विंदा करंदीकरांची बालकविता. बालसुलभ आहे पण बाळबोध नाही. कधी खिदळून बहिर्मुख करते, तर कधी अलगद अंतर्मुख करते.
- - - -
संदर्भ :
संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता (४थी आवृत्ती - १९९७). यातील मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेली प्रस्तावना
अजबखाना - विंदा करंदीकर (सहावी आवृत्ती - २००६). यातील कविता आणि रामदास भटकळांनी लिहिलेली प्रस्तावना
- - -
टीप : वरील लेखात दिलेल्या कवितांचा कॉपीराइट हक्क पॉप्युलर प्रकाशनाकडे आहे. रसग्रहण किंवा भाष्य करताना काही अल्प प्रमाणात मूळ पाठ्याचे उद्धरण करणे हे कायदेशीर आहे. या रसग्रहणाची कुठल्याही रसिकाला मुळीच गरज नाही, याचे शल्य मला जाणवते. पण या तीन उद्धृत कविता वाचून, रसग्रहणातले माझे दारिद्र्य जाणवून, वाचकांनी ८४ कवितांचा "अजबखाना" वाचावा. मग वरील उद्धरण म्हणजे केवळ कॉपीराईटमधून कायदेशीर पळवाट होणार नाही. काव्याच्या एका अजब दालनाचा, मी उघडून दिलेला, दरवाजा होईल.
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 2:00 am | सुवर्णमयी
विंदांच्या कविता वाचकाला केवळ निखळ आनंद देणार्याच नसतात तर अनेकवेळा त्या विचारमग्न करायला लावतात असे मला वाटते. तुम्ही वर उल्लेख केलेल्या कविताही अशाच आहेत. त्या इथे
मांडल्याबद्दल धन्यवाद.
अभ्यासाच्या दृष्टीने केलेला कवितांचा वापर हा कॉपीराइटचा भंग ठरू नये. तसेही मूऴ कविता/ काव्यसंग्रह / प्रकाशक इत्यादी विस्तृत माहिती देऊन आपण त्यावर लेखन करता आहात. यातून व्यवसाय/ उत्पन्न काही नाही तेव्हा पॉपुलरला त्यावर काही आक्षेप नसावा:)
सोनाली
30 Apr 2009 - 2:08 am | बिपिन कार्यकर्ते
धनंजय, रसग्रहण आवडले. विंदांच्या बालकविता छानच आहेत. (मी सगळ्यास वाचल्या नाहीयेत.) तुम्ही रसग्रहण तर उत्तमच केले आहे. (दरिद्री अजिबात नाही.) आता या सगळ्या कविता वाचाव्याशा वाटत आहेत. परीच्या कविता चटका लावून गेल्या.
बिपिन कार्यकर्ते
30 Apr 2009 - 8:44 am | नंदन
आहे. दुसरी कविता आणि रसग्रहण अतिशय आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Apr 2009 - 2:26 am | घाटावरचे भट
रसग्रहण आवडले मालक.
30 Apr 2009 - 3:25 am | जृंभणश्वान
आवडले रसग्रहण, दुसरी कविता फारच भारी आहे.
30 Apr 2009 - 3:29 am | बेसनलाडू
सुंदर रसग्रहण/विवेचन. दुसरी नि तिसरी कविता आणि त्यावर तुम्ही आजच्या घडीला केलेला विचार यांवरून लेखनातून तुम्हांला मांडायचा असलेला मुद्दा कळला, पटला.
(आस्वादक)बेसनलाडू
30 Apr 2009 - 12:18 pm | टारझन
बेष्ट !! क्लास ... ए क नं ब र !!
(सहमत) टारझन
30 Apr 2009 - 7:42 pm | प्राजु
रसग्रहण आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 7:11 am | सहज
एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे आपल्या ओळखीतल्या निरागस छोट्या मुलीकडून ही कविता ऐकत आहेत. त्यातून छोटीला जाणवणारी मजा, आणि त्याच वेळी मोठ्यांच्या काळजाला लागणारे चटके - कल्पनेतही काटा येतो.
मग असे का बरे लिहले असावे :?
"परी आणि घर" शेवटच्या* कडव्यामुळे बालकविता वाटतच नाही. :-)
*अजुनही काही कडवी आहेत का त्या कवितेत?
30 Apr 2009 - 12:16 pm | ढ
अगदी असंच म्हणतो.
एखादे दु:खी निपुत्रिक जोडपे
असं जरी म्हटलं असलं तरी बिच्चारी या एकाच शब्दाने सारा दोष
त्या निपुत्रिक स्त्रीला दिला जातोय असं वाटतं.
30 Apr 2009 - 7:20 am | मनीषा
रसग्रहण आवडले ..
कविता कशी वाचली म्हणजे तिचे सौंदर्य अजून खुलते याचे खूप छान विवेचन केले आहे.
पण तुम्ही म्हणता त्या प्रमाणे एकदा लहान होउन आणि मग प्रौढ होउन वाचणे बहुदा मला जमले नसावे ( पुन्हा वाचून पाहीन) .
'फूलवेडी' ही कविता फार आवडली .
30 Apr 2009 - 7:49 am | विकास
रसग्रहण आणि कविता दोन्ही आवडले. विंदांच्या कविता, वर सुवर्णमयीने म्हणल्याप्रमाणे विचार करायला लावणार्या देखील असतात. राष्ट्रीय पारीतोषिक मिळालेले अष्टदर्शन हे विविध देशातील नास्तिक विचारवंतांची कवितांतून माहीती करून देणारे पुस्तक पण वाचनीय आहे.
आम्हाला शाळेत असताना त्यांच्या अशाच चारोळी होत्या, त्यातील एक कायमची लक्षात राहीलेली कविता:
रामायण वाचुनीया नंतर,
बोध कोणता घ्यावा आपण?
रामासारखा मिळता नायक
वानर सुद्धा मारीती रावण
अथवा
इतिहासाचे अवघड ओझे
घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक
चढून त्यावर भविष्य वाचा
बाकी फुलवेडी ही कविता लहान मुलांची वाटण्यापेक्षा करूणच आहे असे वाटले. त्याचा शेवट वाचला आणि कानेटकरांच्या "लेकुरे उदंड झाली" मधले गाणे आठवले:
या गोजीरवाण्या घरात,
माणसांना लागलयं खूळ
त्यातली गोम अशी आहे,
आम्हाला नाही मूल...
विंदांच्या कवितांबद्दल, "कधी खिदळून बहिर्मुख करते, तर कधी अलगद अंतर्मुख करते." हे वाक्य एकदम पटले.
30 Apr 2009 - 8:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विंदां म्हटले की, आम्हाला आठवतात धोंड्या न्हावी, कावेरी डोंगरे, दाताकडून दाताकडे,साठीची गझल, इत्यादी-इत्यादी. पण विंदाची बालकविता कधी आवडीने समजून घेतली नाही. विंदांनी बालगीतांना बहुपदरी नवे स्वरुप देतांना एक स्वतंत्र भाषा त्यांनी दिली असे म्हटल्या जाते, ते आपल्या कवितेच्या रसग्रहणामुळे कळले, त्याचा आस्वाद आपल्यामुळेच घेता आला. धन्यू....!
-दिलीप बिरुटे
30 Apr 2009 - 9:14 am | चन्द्रशेखर गोखले
खूप छान रसग्र्हण . एखद्या साहित्यकृतीचे रसग्रहण करण्यासाठी विस्लेषणात्मक अशी वेगळी दृष्टी लागते. त्या शिवाय अभ्यास..
या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत. वेळोवेळी येथे प्रसिद्ध साहित्यकृतीला आपण देत असलेल्या प्रतिसादांमधुन ते दिसून येतेच. त्यातून अम्हालाही खूप शिकायला मिळते..
30 Apr 2009 - 9:38 am | साक्षी
धनंजय, रसग्रहण आवडले.
अवांतर : विंदांचे 'पिशी मावशी आणि तिची भुतावळ' हया संग्रहातील कविता मी वाचल्या होत्या. खूप छान आहेत. मूळात पिशी मावशी हे नावच मला खूप आवडले.
~साक्षी.
30 Apr 2009 - 11:00 am | अमोल केळकर
रसग्रहण आणि बालकविता आवडल्या
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
30 Apr 2009 - 11:27 am | भोचक
धनंजय रसग्रहण अतिशय आवडलं. खरं तर विंदांचे दोन काव्यसंग्रह उत्सुकतेने मी मध्यंतरी आणले. पण निगुतीने वेळ काढून वाचले नाहीत. तुमच्या या रसग्रहणाने त्या कवितांविषयीची उत्सुकता आता जागृत झाली आहे. आता वेळ काढून नक्की त्या वाचेन. बाकी. आपण दिलेल्यातल्या शेवटच्या दोन कविता नक्कीच चटका लावणार्या आहेत.
ता.क. लहानपणी आम्हाला तिसरी की चौथीत भाऊबीज नावाची कविता होती. कोणाची होती ते आठवत नाही. पण त्यात भावाला ओवाळायला बहिण नसते असे काहीसे वर्णन होते. मलाही बहिण नसल्याने ती कविता वाचताना फार रडायला येत असे. पुढे पुढे तर मी ती कविता टाळून पुढे जात असे. लहानपणची संवेदनशीलता आता तितकी राहिली नसावी की काय पण आज ती कविता समोर आली तर 'तो'भाव आज जागेल असे वाटत नाही. 'मोठं' झाल्यानंतर विचारशक्ती वाढते? तार्किकता वाढते? की संवेदनशीलता कमी होते? माहित नाही.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
30 Apr 2009 - 11:49 am | स्वाती दिनेश
धनंजय,
रसग्रहण आवडले.
विंदांच्या कवितांबद्दल, "कधी खिदळून बहिर्मुख करते, तर कधी अलगद अंतर्मुख करते."
अगदी पटले.
स्वाती
30 Apr 2009 - 1:36 pm | सुमीत भातखंडे
छान सहज - सोप्या भाषेत केलेलं विश्लेषण आवडलं.
आता जेव्हा-केव्हा ह्या कविता परत वाचीन तेव्हा हे रसग्रहण नक्की आठवेल.
30 Apr 2009 - 2:34 pm | नितिन थत्ते
सुंदर रसग्रहण. धनंजयांचा छाप जागोजागी दिसतो.
भाग्लास का वाचून धुकट सकाळ आठवली
त्यातही 'असेल्का विचारुन्शहार्लो मनात्मी' असे होते. ;)
अवांतर: एका बालगीताच्या कॅसेट मध्ये भाग्गलास्स का असेही ऐकले होते.
अतिअवांतरः टीपेत लिहिलेला विचार धनंजयच करू शकतात.
खराटा
(रंग माझा वेगळा)
30 Apr 2009 - 2:39 pm | अवलिया
रसग्रहण आवडले !!
--अवलिया
30 Apr 2009 - 3:30 pm | ऋषिकेश
रसग्रहण आवडले. कविता २ याला खरेच बाल कविता म्हणावे काय? मात्र असा प्रश्न बहुदा मोठेपणीच पडत असावा.
बाकी हल्ली कोणी मुलांसाठी म्हणूक कविता लिहितं का? मी ह्ल्लीचा म्हणता येईल असा "अग्गोबाई-ढग्गोबाई" हा अल्बम ऐकला आहे- मी विकतहि घेतला आहे.. मात्र असा बालकवितासंग्रह वगैरे हल्ली निघाल्याचे - प्रकाशित झाल्याचे ऐकीवात नाहि
-(बाल)ऋषिकेश
30 Apr 2009 - 3:50 pm | मेघना भुस्कुटे
रसग्रहण खूप आवडले. 'पिशीमावशीची भुतावळ' आणि 'अजबखाना' मध्यंतरी बाजारात उपलब्ध नव्हती. आता मिळतात का ती सहज?
30 Apr 2009 - 3:53 pm | प्रमोद देव
रसग्रहण आवडले.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
30 Apr 2009 - 4:40 pm | श्रावण मोडक
वाचनीय होतो आहे. मुळात चांगले रसग्रहण, त्यावर तशाच मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करणारे प्रतिसाद. मधूनच एखादी माहिती, मध्येच गंभीर प्रश्न... छान.
30 Apr 2009 - 7:24 pm | चतुरंग
वाचनीय देत रहायचे हा तुझा ध्यास वाखाणण्याजोगा आहे! अतिशय मोजक्या शब्दातले रसग्रहण भावले. :)
बालांच्या कविता ह्या यमकात गुंफलेल्या असतातच/हव्यातच याचे कारण अक्षरांच्या पुनुरुक्तीने त्याला एक नाद आणि गेयता येते.
मुलांना भाषा शिकायला आणि मोठ्यांना शिकवायला सोपी जाते.
नेहेमीच्या वापरातल्या साध्या शब्दांबद्दल म्हणाल तर लहान मूल घरात वावरताना ऐकू येणारे शब्द हेच ते चटकन समजू शकणार असते त्यामुळे त्याला पर्याय नाही.
एकूण लहान मुलांसाठी मनोरंजक कविता लिहिणे हे अवघड आहेच शिवाय ती कविता मुलांना म्हणून दाखवणार्या व्यक्तीकडे अभिनयगुण असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
कवितेतले शब्द हे चेहेर्यावर भाव घेऊन आले तरच मुले गुंगून जाणार.
पहिल्या कवितेत लठ्ठ - मठ्ठ आणि शाप - साप ह्या जोडगोळीने मुले खिदळणार!
दुसरीत परीचे आणि फुलाचे एक नाते निर्माण करुन दिले आहे. लहान मुलांना पाळण्यात ठेवलेले फूल हे त्यांच्या खेळातले मूल वाटू शकते किंवा थोड्या मोठ्या बालकांना त्यांचे पाळण्यातले भावंड हे फूल वाटू शकते. कल्पनारम्यता हा मुलांचा गुण हळूहळू विरत जातो. अन मोठेपणी स्वत:चे मूल नसलेल्या व्यक्तींबद्दलचे वास्तव समजल्याने अचानक ही कविता कारुण्यपूर्ण होते, इतकी की मनाच्या एखाद्या विशिष्ठ अवस्थेत टचकन डोळ्यात पाणी उभे करु शकेल!
तिसरी कविताही अशीच आहे. कल्पनाशक्तीला इतक्या वाटा फोडणारी.
विंदांच्या विलक्षण प्रतिभेला आणि त्यांची अशी वेगळी ओळख देणार्या धन्याशेठलाही माझा सलाम!
चतुरंग
1 May 2009 - 12:45 pm | अभिज्ञ
चतुरंग ह्यांच्या प्रतिक्रियेशी पुर्णपणे सहमत.
रसग्रहण फारच आवडले.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
30 Apr 2009 - 7:46 pm | शाल्मली
रसग्रहण आवडले.
हे देखील पटले.
पहिली आणि दुसरी कविता छान.. तिसरी कविता मात्र आवडली नाही. कदाचित परी म्हणजे चांगली व्यक्ती जिला बालमन कळते, जिला जादू येते आणि जी आपल्या इच्छा पूर्ण करते अशी लहानपणी आपल्या मनात पक्की झालेली एक कल्पना असते.. त्यामुळेही असेल कदाचित..
'अजबखाना' वाचायला आवडेल.
चतुरंग यांचा प्रतिसादही आवडला.
--शाल्मली.
30 Apr 2009 - 7:54 pm | क्रान्ति
अतिशय चपखल रसग्रहण खूप आवडले. आणि प्रतिसादही.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 10:17 pm | लिखाळ
वा ! फार सुंदर लेख. सुंदर रसग्रहण. चतुरंग म्हणतात त्याच्याशी सहमत. नेहमी नवीन आणि सकस काहितरी वाचायला दिल्याबद्दल आभार.
खरोखरच. अजबखाना आणि प्रतिसादात लिहिलेला पिशी मावशी वाचावेसे वाटत आहे.
कवितेबाबत चतुरंग जे म्हणाले ते पटले.
-- लिखाळ.
1 May 2009 - 12:09 am | भडकमकर मास्तर
छान झालंय रसग्रहण...
एक वेगळा आस्वादनपर लेख वाचून मजा आली..
अवांतर : हल्ली जरा पहिल्या पानावर शांतताच असायला लागलेली आहे...
1 May 2009 - 12:44 am | चित्रा
रसग्रहण आवडले.
खूप लहानपणी मीही वाचला आहे अजबखाना. त्या पुस्तकावरची चंद्र आणि इतर विमजिकल चित्रे अंधुकशी आठवत होती. आणि शोधली तेव्हा निदान कव्हर तरी सापडले. http://www.rasik.com/database/marathi/books/b538/cover.jpg
एटू लोकांचा देश आठवला. लहान असताना काही कवितांचा अर्थ खोल आहे हे नक्की जाणवलेले आठवते. लहानपणी या कविता whimsical, वेगळ्या वाटल्या होत्या, आता वाचल्या तर कदाचित करूण रस अधिक जाणवेल असे वाटते.
विंदांच्या कवितांमध्ये जो हा भाग आहे तसाच (त्याच दर्जाचा नसेल पण) काही इंग्रजी बडबडगीतांमध्येही आहे असे मला मोठेपणी जाणवले.
(अजून एक धक्का म्हणजे मनसे.ऑर्गवर विंदांचा परिचय सापडला.
http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=795)
1 May 2009 - 8:56 am | विसोबा खेचर
धन्याशेठ, माझ्या विनंतीला मान देऊन तू हे लिहिलेस याबद्दल मनापासून आभार...
रसग्रहण उत्तमच. म्हातारीलाही दाखवणार आहे. तिची प्रतिक्रियाही कळवेन..
अवांतर - हीच विनंती मी मुक्तरावालाही केली आहे. त्याच्याकडूनही असा एखादा लेख अपेक्षित आहे. अर्थात, त्याच्या सवडीने. त्वरा नाही.
तात्या.
1 May 2009 - 2:00 pm | अरुण वडुलेकर
विंदाच्या कविता बालकविता सादर केल्या हाच एक फार मोठा आनंद आहे. आपण केलेले
रसग्रहणही अतिशय मार्मिक आहे. माझ्या मते अशी कविता प्रौढ म्हणून वाचण्यापेक्षा मूल
होऊन वाचण्यात आधिक मौज आहे. अशा वेळी आपण आपोआप पुन्हा त्या वयात आणि काळात
जातो.
धन्यवाद