ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!
ह्या अवस्थेत तिची कंबर दुखते. अंग दुखतं. सतत रक्तस्राव होत असतो. बाहेर हिंडताना तिला अतिशय अवघडल्यासारखं होतं. तिला सतत स्पाॅटिंगची धास्ती वाटते. ती कशातच मन एकाग्र करु शकत नाही. काम करु शकत नाही. आता सॅनिटरी पॅडस् निघाली आहेत. पूर्वी तर जुन्या साडीच्या कापडाची घडी वापरावी लागायची. ती वरचेवर धुवावी लागे. वाळत घालायची चोरी! घरातल्या कुणी पुरुषानं पाहिलं तर?
आज हा विषय निघायचं कारण नाशिक जिल्ह्यातील देवळे या गावाच्या आदिवासी आश्रमशाळेत नुकतीच घडलेली एक घटना. आश्रमशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम होता. एक विद्यार्थीनी ऋतुमती होती. शिक्षकांनी घोषणा केली की, जी कुणी मुलगी मासिक पाळीत असेल तिनं वृक्षारोपण करायला येऊ नये. तिला परवानगी नाही. ऋतुमती असलेल्या मुलीनं त्याचं कारण विचारलं. यावर संबंधित शिक्षकानं उत्तर दिलं,"मासिक पाळीत असलेल्या मुलीनं जर रोप लावलं तर ते जगणार नाही. जळून जाईल."
ते शिक्षक एवढंच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी त्या मुलीची उलट प्रश्न केल्याबद्दल खरडपट्टी काढली.
"तू उर्मट आहेस.आगाऊ आहेस. मला उलटी उत्तरं देतेस?शिक्षकांचा अपमान करतेस. त्यांचं ऐकत नाहीस. मी तुला शिक्षा करेन."असा दम त्या विद्यार्थिनीला दिला.
त्या मुलीच्या पाठीशी आदिवासी संघटना आणि महिला आयोग उभे आहेत. मिडियातही ही बातमी गाजली.
आता ऋतुमती स्त्रीनं झाड लावलं तर ते मरेल कसं? जळेल कसं? यामागे काही लाॅजिक आहे का?
पण अंधश्रद्धेपुढं तर्कशास्त्र काय करणार? ऋतुमती स्त्रीबद्दल अशा कल्पना फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. अगदी रजस्वला (पुष्पवती हा आणखी एक पर्यायी शब्द.) द्रौपदी च्या वस्त्रहरणाच्या काळापासून. ऋतुमतीला अपवित्र,अशुभ मानलं जातं. कामसूत्र सांगतं की रजस्वला, पुष्पवती स्त्रीचं तोंडही पाहू नये.
त्या तीन दिवसांत तिनं बाजूला बसायचं. कुणाला शिवायचं नाही. ही प्रथा पूर्वी घरोघरी होती. आजही ती खेड्यापाड्यात आढळते. आमच्या लहानपणी काही मैत्रिणींकडे "त्या बाईला कावळा शिवलाय" असं सांगायचे. चुकून एखादं लहान मूल शिवलंच तर ताबडतोब त्याच्या अंगावरचे कपडे काढून टाकले जायचे. तिनं तीन दिवस आंघोळ करायची नाही. तीनही दिवसांचे कपडे साठवून ठेवायचे. चौथ्या दिवशी ते वेगळे धुवायचे. आपलं जेवणाचं ताट आपणच घासायचं. पिण्याचं पाणी तिच्या भांड्यात वरुन ओतायचं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तिने नाहायचे. मग ती शुद्ध होऊन तिला घरात प्रवेश!
माझे वडील डॉक्टर होते. आई सामाजिक कार्य करायची. दोघं पुरोगामी विचारांचे. आमच्याकडं बाजूला बसत नसत. माझं तर म्हणणं, जशी आपण शी शू करतो. नाक शिंकरतो. लाळ थुंकतो. तसंच तीन दिवस वाहणारं रक्त हे एक उत्सर्जित आहे. ते नैसर्गिक आहे. त्यात अपवित्र काय? त्या तीन दिवसांत देवळात का नाही जायचं? त्या तथाकथित देवानंच तर दिलंय ना हे पाळीप्रकरण! स्त्रीनं ते मागून घेतलंय थोडंच! डोकं ठिकाणावर असलेली कोणतीही स्त्री ते देवाकडे मागणार नाही.
माझ्या रेडिओवरच्या करियरमधे मी ऋतुमती असताना अनेकदा रेकॉर्डिंगसाठी ऑफिसची गाडी घेऊन बाहेरगावी जावे लागत असे. नवरात्रीसाठी एक रुपक प्रोड्यूस करण्याची एकदा मला ऑफिस ऑर्डर आली. तेव्हा मी ऋतुमती होते. नाही म्हणणं शक्य नव्हतं. कारण सांगण्याची परिस्थिती नव्हती. मजबुरी होती. मी मुकाट्याने मशीन घेऊन देवळात गेले. अगदी गाभाऱ्यात जावं लागलं. देवीची पूजा,आरती सगळं ध्वनिमुद्रण केलं. पुजारी, भक्तमंडळींच्या मुलाखती घेतल्या. रुपक तयार केलं.
प्रत्यक्षात नवरात्र उत्सव सुरू झाला. मी तेव्हाही ऋतुमती होते. माझी शेजारीण माझ्याकडे आली आणि म्हणाली,"उद्या तुम्ही माझ्या कडे सवाष्ण म्हणून जेवायला या."
हे सवाष्ण प्रकरण मला कधीच पटले नाही. कुमारिका आणि विधवा यांना तुच्छ लेखून सवाष्णीलाच इतकं महत्त्व का? तिला एक पती आहे म्हणून? यात तिची कर्तबगारी काय?
शिवाय इथे मात्र समोर एक स्त्रीच असल्यान मी म्हटलं की माझे पिरीएडस् सुरू आहेत. मी चालणार नाही तुम्हाला सवाष्ण म्हणून. ती म्हणाली,"बरं झालं बाई सांगितलंत ते. मी दुसरी कुणीतरी बघते." ती पुढे म्हणाली,"तुमचं रुपक ऐकलं. छान होतं. देवीचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखं वाटलं."
मी तिला हे सांगितलं नाही की माझी "अडचण"असताना देखील मी देवीच्या गाभाऱ्यात गेले. जावं लागलं. तिला शाॅकच बसला असता आणि मी एक मैत्रीण गमावली असती.
एक प्रश्न थोडा धाडसानेच विचारते,देवी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. मग एका स्त्रीची निसर्गदत्त व्यथा ती जाणू शकत नसेल का?
असो!
इत्यलम्!!
प्रतिक्रिया
28 Jul 2022 - 12:59 pm | नचिकेत जवखेडकर
लेखातील विचारांशी अगदी सहमत. एका बाजूनी म्हणायचं की, मातृत्व हे देवांनी दिलेलं वरदान आहे आणि दुसरीकडे ऋतुमती स्त्रीला वाळीत टाकल्यासारखी वागणूक द्यायची हा शुद्ध दांभिकपणा आहे. माझ्या मते काही काम नं करू देण्यामागचं कारण किमान त्या ३-४ दिवसांमध्ये आराम मिळावा हे असावं.हात पाय कंबर दुखतात म्हणून. पण तू कोणाला हात लावायचा नाही आणि देवळात जायचं नाही हे आणि असले बरेच प्रकार केवळ पूर्वापार चालत आलेत म्हणून कसलाही विचार नं करता पाळायचे हा बिनडोकपणा आहे. याच्यामागे खरंच काही वैचारिक कारण असेल तर वाचायला नक्की आवडेल.
28 Jul 2022 - 1:35 pm | चावटमेला
लेख आवडला
हे सवाष्ण प्रकरण मला कधीच पटले नाही. कुमारिका आणि विधवा यांना तुच्छ लेखून सवाष्णीलाच इतकं महत्त्व का? तिला एक पती आहे म्हणून? यात तिची कर्तबगारी काय?
+७८६
केवळ नवरा वारला म्हणून आईला आणि नात्यांतील काही स्त्रियांना विशेष करून सणा समारंभांत एखाद्या गुन्हेगारासारखी मिळणारी वागणूक पाहून डोक्यात तिडीक जायची. म्हणून च असेल कदाचित, मी हळूहळू घरगुती समारंभ, लग्नं, मुंजी, बारसे इ. ना जाणे पूर्णपणे बंद करून टाकलं. खेदाची गोष्ट म्हणाजे स्वतःला पुरोगामी, उच्च्भ्रू म्हणवून घेणार्या कुटुंबांमध्येच असे प्रकार प्रकर्षाने होताना दिसतात
28 Jul 2022 - 1:47 pm | Bhakti
पुष्पवती,ऋतूमती असे सुंदर शब्द असताना कोणी हा' विटाळ' शब्द शोधला काय माहित.गावाकडे कर्मठ लोकांकडे फारच अति करतात याबाबत.
बरोबर लिहिले आहे.आता आपणच आपल्या मैत्रिणींना जागृत करायला पाहिजे.शिवाशिव हा प्रकार संपुष्टात आणायलाच पाहिजे.
तेवढ government या दिवसात स्त्री कर्मचारी यांना सुट्टी देणार होता ,हा जीआर अजून तरी लागू नाही.तो लवकर व्हावा.
10 Aug 2022 - 11:09 am | सुबोध खरे
तेवढ government या दिवसात स्त्री कर्मचारी यांना सुट्टी देणार होता ,हा जीआर अजून तरी लागू नाही.तो लवकर व्हावा.
हि मागणी अव्यवहार्य आहे.
कारण जर एखादी स्त्री दर महिन्याला ४ दिवस हक्काची सुटी घेणार असेल तर वर्षाचे ४८ दिवस तिला सुटी द्यायला लागली तर खाजगी आस्थापनात स्त्रियांना नोकरीवर घेण्याचे प्रमाण अजूनच कमी होईल.
अनेक लहान खाजगी उद्योजक नुकतेच लग्न झालेल्या मुलीला नोकरीवर ठेवण्यास तयार नसतात. कारण असंख्य मुली वर्ष दोन वर्षात गरोदर होतात आणि मग त्यांना सहा महिने भरपगारी रजा दयायला लागते. वाईट गोष्ट म्हणजे अनेक मुली अशी भरपगारी रजा पूर्ण घेतल्यावर शहरात मुलाला सांभाळण्यासाठी नोकरीच सोडून देतात. अशी रजा घेतल्यावर निदान एक वर्ष तरी त्यांनी नोकरी सोडणार नाही बॉण्ड लिहून द्यायला हवा परंतु भारतीय कायदा त्यास परवानगी देत नाही.
यामुळे लहान उद्योजकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. यामुळेच अनेक लहान खाजगी उद्योजक लग्नाचे वय झालेल्या किंवा नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला नोकरीवर ठेवण्यास तयार नसतात. त्यात जर तिला वर्षात ४८ दिवस भरपगारी रजा द्यायची तर १५ ते ४५ वयाच्या कोणत्याही स्त्रीला नोकरीदेण्यास ते तयार होणारच नाहीत.
सरकारी नोकरीत आपण स्त्रियांना अशा सुट्या दार महिन्याला देण्यास सांगत आहात असे झाले तर त्याचा आस्थापनात काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांवर अधिकच अन्याय होईल.
महिला डॉक्टर, नर्स, पायलट इ कर्मचारी दर महिन्याला चार दिवस सुटी घ्यायला लागल्या तर बघायलाच नको. त्यातून त्यांच्या रात्रपाळ्या कुणी करायच्या?
लष्करात असताना स्त्री असल्याचा गैरफायदा घेणाऱ्या अनेक स्त्रिया मी पाहिल्या आहेत. त्यातून नियमानुसार मिळणाऱ्या रजा जर गृहीत धरल्या तर हे प्रमाण व्यस्त होत जाते.
एक उदाहरण देत आहे. आमच्या बरोबर डॉक्टर झालेल्या एका मुलीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन घेतलेले होते. तेंव्हा ते ५ वर्षाचे होते.
आपली एक वर्षाची इंटर्नशिप झाल्यावर पुढे चार वर्षे तिची नोकरी होती.
यात तिची दोन बाळंतपणे झाली. त्यासाठी तिने सहा सहा महिने दोन वेळेस बाळंतपणाची रजा घेतली ( एक वर्ष) या शिवाय दोन दोन महिने दोन्ही वेळेस अर्ध पगारी रजा सुद्धा घेतली (FURLOUGH) (चार महिने).
या शिवाय दर वर्षी मिळणारी दोन महिने वार्षिक सुटी असे आठ महिने सुटी झाली
याशिवाय १४ दिवस मिळणारी नैमित्तिक रजा (CASUAL LEAVE) म्हणजे ५६ दिवस असे मिळून चार वर्षांपैकी २ वर्षे ५६ दिवस तिने रजा घेतली आणि ३ वर्षे १० महिन्यांचं पगार त्याशिवाय मिळणारा संतोष फंड (GRATUITY पाच महिन्याचा पगार) घेऊन तिने लष्कराची नोकरी सोडली.
हे मी पाहिलेले चक्षुर्वैसत्यं उदाहरण आहे.
यात अजून दर वर्षी ४८ दिवस मिळवायचे म्हणजे काम किती? आणि पगार आणि सुट्या किती? असाच प्रश्न निर्मण होईल.
मग स्त्रीपुरुष समानता कुठे गेली?
10 Aug 2022 - 1:18 pm | Bhakti
म्हणजे काम किती? आणि पगार आणि सुट्या किती? असाच प्रश्न निर्मण होईल.
कोणत्याही क्षेत्रातील स्त्री असो ,जिला खरोखरच त्रास होतो तिला सुट्टी द्यावीच.
खोटं नाटक करणार्या अजून तरी पाहिल्या (असतीलही माहिती नाही. )
स्त्रीपुरुष समानता कुठे गेली?
निसर्गानेच इथे असमानता केलीये.इतर बाबतीत समानता आहेच ना.बरोबरी आहेच.
28 Jul 2022 - 2:16 pm | Nitin Palkar
एकविसाव्या शतकातही केवळ कुजबुजला जाणाऱ्या या विषयाबद्दल या इथे विचार मांडल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
खरंतर अतिशय नैसर्गिक असणाऱ्या या क्रियेबद्दल एवढा बवाल का होतो हेच कळत नाही.
28 Jul 2022 - 3:17 pm | अनिंद्य
लेख उत्तम, शेवटी नेमके आणि मार्मिक भाष्य केले आहे आजी.
'त्या' दिवसातले शिवाशिव पाळण्याचे निर्बुद्ध प्रकार आतातरी बंद व्हावेत. शिकलेल्या लोकांपेक्षा देशातील निरक्षर/ अल्पशिक्षित आदिवासी समाज सुधारलेला म्हणायचा. त्यांच्याकडे विटाळ नाही आणि 'सवाष्ण' वगैरेही नाही.
तिकडे आसामला विटाळ तर सोडाच खुद्द देवीचे ऋतुमती होणे प्रचंड उत्साहात साजरे केले जाते कामाख्या मंदिरात, सृजनोत्सुक मातृत्वाचा सन्मान.
आंध्र-तेलंगणा भागात प्रथमच ऋतुमती होणाऱ्या कन्येचे जाहीर कोडकौतुक करण्याचा धार्मिक सोहळा असतो, सर्वथा योग्य. पाळी म्हणजे काहीतरी अपवित्र हा समज दूर होण्यास जे जे करावे लागेल ते योग्य.
पुन्हा एकदा उत्तम लेखाबद्दल अभिनंदन आणि आभार.
29 Jul 2022 - 1:01 pm | सौंदाळा
समोरच तेलगु कुटूंब राहायचे. त्यांच्याकडे हा सोहळा पाहिला आहे.
पण हा महाराष्ट्रात देशस्थ ब्राह्मण लोकांमधे पण पाहिला आहे (काही वर्षांपूर्वीच)
तसेच पेशव्यांमधे पण सुनेचा फलशोभनाचा विधी नातेवाईक स्त्रियांना बोलावून करण्याचे उल्लेख वाचले आहेत.
29 Jul 2022 - 1:05 pm | धर्मराजमुटके
तुमच्या प्रतिसादावर टिका नाही. परंतू या शरीरधर्माचा द्वेष करु नये हे जितके बरोबर तितकेच त्याचा सोहळा करु नये असे देखील मला मनापासून वाटते.
29 Jul 2022 - 3:27 pm | सौंदाळा
टीकेचा प्रश्नच नाही. मी फक्त याच्याशी संबंधीत प्रथा, माझी माहिती सांगितली.
तुम्ही म्हणता ते पूर्ण मान्य आहेच. उलट त्या मुलीच्या मनस्थितीचा विचार केला तर हे सोहळे अजिबात पटत नाही. आमची मुलगी रुतुमती झाली हो यासाठी काही सोहळे करायची गरजच नाही. माझ्या मते पुर्वीच्या काळी मुलगी उपवर झाली, आई होण्यास, लग्न करण्यास आवश्यक शारीरीक पात्रता आली हे जाहीर करण्यासाठी असे करत असावेत.
29 Jul 2022 - 4:06 pm | मुक्त विहारि
माझ्या मते पुर्वीच्या काळी मुलगी उपवर झाली, आई होण्यास, लग्न करण्यास आवश्यक शारीरीक पात्रता आली हे जाहीर करण्यासाठी असे करत असावेत.
-------
सहमत आहे....
28 Jul 2022 - 4:03 pm | बेन१०
बाजूला बसणे हा प्रकार कदाचित बाईला शारीरिक कष्टापासून आराम मिळवा (पाणी शेंदणे, जात्यावर दळणे वगैरे) या चांगल्या उद्देशातून सुरू झाला असावा.
मात्र काही काळाने त्यात विकृती घुसवून याचा चुकीचा अर्थ काढून body shaming चे प्रकार सुरू झाले असावेत.
सध्याच्या काळात जेंव्हा sanitization ची परिस्थिती चांगली आहे आणि अति "शारीरिक" कष्टाची कामे कमी झाली आहेत त्यामुळे शिवाशिव बंद झालीच पाहिजे
28 Jul 2022 - 7:08 pm | सरिता बांदेकर
याबद्दल जास्त काही लिहीणार नाही कारण तुम्ही ज्या पद्धतीने मांडले आहे, त्यापेक्शा चांगलं लिहू शकणार नाही मी.
फक्त एव्हढेच सांगेन, माझी मुलीला जेव्हा प्रथम पाळी आली तेव्हा मी ते पाच दिवस उत्सवासारखे साजरे केले होते. पाच दिवस पाच गोडाचे आणि तिच्या आवडीचे पदार्थ आणि पाचही दिवस नवीन कपडे.
तिला सांगितलं होतं, ही आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे.
यासाठी वेगळं काही करायचं नाही.
पण लोकांना त्रास नको म्हणून पाळी असताना कुणाकडे जाऊ नकोस असं तिला सांगितलं होतं.
आणि रहाता राहिला सवाष्णीचा विषय.
तर लोक सवाष्ण म्हणून बोलावताना , त्यांना विधवा किंवा कुमारिका चालत नाहीत पण घटस्फोटीता चालतात.
हे मला कधीच कळलं नाही.त्यामुळे ओटी भरायची तर ती गरजू महिलेची भरावी असं माझं मत आहे.
त्यामुळे गरजू महिलेला मी बोलवते.
28 Jul 2022 - 9:58 pm | Bhakti
दोन्ही बाबतीत कृती चांगल्याच आहेत_/\_
28 Jul 2022 - 10:14 pm | Bhakti
माझ्या आजीनेसुद्धा मला मायेने जवळ घेत हातात पैसे दिले हो पहिल्यांदा,मग मी तसेच पुतणी सोबत केलं होतं .
जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा :)
28 Jul 2022 - 7:36 pm | कर्नलतपस्वी
पन्न्नाशीच्या दशकातील, बाळबोध संस्कार, सण सहपरीवार जमेल तसे साजरे करायचे. सैन्यात आसल्यामुळे प्रत्येक वेळेस सवाष्ण मिळणे आणी बोलवणे जमत नसे.
गौरी व नवरात्रात आवर्जून बोलवायचो,एक वेळेस सवाष्ण बाई दवाखाना संपवून आल्या, टेबलवर येवून बसल्या. सर्व सोपस्कार झाल्यावर लक्षात आले,
"अय्या ,मी सवाष्ण आणी चप्पल काढलीच नाही"
आयुष्याच्या सिल्व्हर लाईनींग बघितल्या मुळे विचार खुप बदलले. कदाचित कुणाला पटणार नाही पण या आशा गोष्टी कडे सकारात्मक, मोकळ्या नजरेने बघायची सवय लागली.
आरे रडता रडता या कवितेत बहिणाबाई यांनी स्पष्ट शब्दात समाजाला खडे बोल ऐकवले आहेत तर विधवा स्त्री ला सुद्धा आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आहे.
कुकू पुसलं पुसलं
आता उरलं गोंधन
तेच देइल देइल
नशिबले आवतन
जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतूत
तुटे मंगयसुतर
उरे गयाची शपत
नका नका आया बाया
नका करू माझी कीव
झालं माझं समाधान
आता माझा मले जिव
-बहिणाबाई चौधरी
28 Jul 2022 - 7:52 pm | गवि
कविता वाचून या बाईंच्या प्रतिभेपुढे हात जुळले. आणि ही पहिलीच वेळ नव्हे. __/\__
28 Jul 2022 - 9:56 pm | Bhakti
_/\_
28 Jul 2022 - 7:43 pm | कंजूस
मिपावर दहा महिला सभासद जेमतेम आहेत.
28 Jul 2022 - 9:31 pm | गामा पैलवान
आजी,
तुम्ही हात घातलेल्या विषयाचा आवाका बराच आहे. पाळी चालू असतांना सार्वजनिक देवळांत का जाऊ नये याविषयी माझं मत सांगतो. इतर कुठल्याही मुद्द्याशी ( सवाष्ण, समारंभातला सहभाग, इत्यादि ) माझ्या या मताचा संबंध जोडला जाऊ नये, ही विनंती.
त्याचं काये की पाळी हे ( वर कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे ) एक उत्सर्जन आहे. यावर आपलं नियंत्रण नाही. सुसु व शीशीचे वेग जरातरी आवरून धरता येतात. पण याचा प्रसंगी तेव्हढीही मुभा नसते ( ऐकीव माहिती ). तर प्रश्न इतकाच आहे की, माखलेल्या अंगाने देवळात जावं का? की काय ते दोनचार दिवस सरले की स्नान करून शुचिर्भूत होऊन जावं?
पुरुषमंडळींनीही अंघोळ करूनंच देवळात जावं असा दंडक आहे. बायकांच्या बाबतीत देह्धार्मामुळे जरा अधिक कडक आहे. यापेक्षा अधिक काही नाही.
आ.न.,
-गा.पै.
28 Jul 2022 - 9:52 pm | धर्मराजमुटके
तुमचं मत लाख बरोबर असेल हो पण त्या दिवसांत बाईने काय करावे, करु नये हा विषयच मुळी नाही. घरातल्या गुराढोरांना विचारुन निर्णय घेतले जात नाहित तेवढीच किंमत बाईची असते (असायची, काही ठिकाणी आताही असेल ), बार्ईच्या वतीने सगळे निर्णय बाप्ये घेऊन टाकतात ह्या विचारसरणीत मुख्य लोचा आहे.
आपण वेगळं काय करतोय म्हणा. बायकांच्या विषयावर पुरुषांचेच जास्त प्रतिसाद आलेत. अर्थात मिपावर बायका औषधापुरत्याच उरल्या तर त्याला कोण काय करणार म्हणा !
अवांतर : आयुष्यात पहिल्यांदाच सॅनिटरी पॅड आणण्याची वेळ आलयावर पुरुष बायकांपेक्षा जास्त कानकोंडे होतात. असे कानकोंडे अधून मधून औषधे विक्रीच्या दुकानात दिसल्यावर बघून मौज वाटते. तो दुकानदार देखील मारे वर्तमानपत्रात गुंडाळून देतो. जणू काय गपचूप अवैध वस्तू विकतोय :)
अतिअवांतर असे अजून एक दोन प्रश्न विचारायचे होते पण थांबतो. उगाच नको ते गैरसमज नकोत.
28 Jul 2022 - 10:03 pm | Bhakti
हाच खरा प्रश्न आहे.
28 Jul 2022 - 10:09 pm | सर टोबी
होय आज्जीच! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात गोड व्यक्तीला कल्पनेत कवटाळण्यासाठी आज्जी हाच शब्द योग्य वाटतो. तर, तुमच्या स्वभावातील निरागसतेमुळे जीवनातील अनेक अवघड अनुभवांना तुम्ही थेट भिडू शकता आणि नर्म शैलीतून सामाजिक व्यंगावर नेमके बोट ठेऊ शकता. तुमची हि क्षमता अशीच कायम राहो.
तुमच्या लिखाणातील आज आणखी एक पैलू समोर आला. तो म्हणजे शिष्टसंमत नसणाऱ्या विषयांना अतिशय अदबशीर पध्धतीने व्यक्त करणे. हा फार दुर्मिळ गुण आहे. तुमच्याकडून असेच समृदध अनुभव वाचायला मिळोत.
29 Jul 2022 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी ग्रेटच..आजी नवनवीन विषयावर उत्तम लेखन करते. आमच्या लहानपणी 'कावळा शिवल्यामुळे' दुर बसलेली स्त्रीया बघीतल्या आहेत, लहान मुले त्यांच्याजवळ गेली की लहान मुलांचे कपडे काढून त्याला पाठवल्या जायचे. पुढे 'तिला यायचं नव्हतं' 'तिला अडचणी आहेत' 'तिला करायचं नव्हतं म्हणून, नुसती खिचडी टाकली' 'मंदिरात यायचं नव्हतं' 'अडचण होती' 'तब्येत बरी नै' 'प्रॉब्लेम आहेत' या शब्दांचा अर्थ समजायला जरा वेळच लागला. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याबद्दल इतकं आकांड-तांडव करायची गरज नाही, नसते. पण, काही... असो.
आजी लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2022 - 4:05 am | पर्णिका
सिरियसली???
मातृत्वाचे सुंदर दालन उघडणाऱ्या या सृजनशील विषयावर आजच्या काळांतही अशा बातम्या येतात, याबद्दल आश्चर्य आणि वाईटही वाटतं.
उलट याकाळांत होणारे शारीरिक बदल, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटरी पॅड्सची उपयुक्तता, ते सहज उपलब्ध कसे होतील अशी माहिती मुलींना योग्य वयांत दिली तर जास्त फायदेशीर होईल.
29 Jul 2022 - 9:49 am | मालविका
आज माझ्याकडे माझी बहीण ४ दिवस येऊन राहिली आहे. कारण हेच. श्रावण सुरू झालाय, तिच्याकडे सोवळ ओवळ खूप पाळतात, बाजूला बसतात. मग तिकडे बसण्यापेक्षा इकडे येऊन राहिली. आमच्याकडे कधीच हा प्रकार नव्हता. अगदी गौरी गणपती, नवरात्र कधीही पाळी हा इश्यु केला गेला नाही. मुळात नैसर्गिक प्रकार आहे त्यामुळे त्यात तोंड वाकडं करावं असे काही नाही. साहजिकच सणावाराला सुध्दा बाजूला न बसल्याने या प्रकाराची चर्चा होत नाही. याच माझ्या बहिणीकडे आम्ही गेट टुगेदर करायचं म्हटलं तरी शक्य होत नाही कारण आम्हा सगळ्या भावंडांमध्ये कोणी बहीण अथवा वहिनी असतेच जिला त्यांच्याकडे बाजूला बसावे लागेल. त्यामुळे बहिणीला इच्छा असून सुध्धा हे जमत नाही. घरातील ज्येष्ठ आता वृध्द होतील, काम करायला कोणी नसते तरीही हा हट्ट सोडत नाहीत. मग त्या ३ दिवसात कसतरी निभवायच. कदाचित त्यामुळे आमच्याकडे आली की ताई माहेरपण एन्जॉय करते.
29 Jul 2022 - 12:44 pm | सौंदाळा
घरी या गोष्टी पाळायचे केव्हाच बंद झाले.
मी तर ऐकले होते की बंगालमधे तर पहिल्यापासूनच हा विटाळ वगैरे पाळले जात नाही (कोणाला माहिती असेल तर जरुर सांगावी)
थोडे वेगळे : भैरप्पा यांच्या पुस्तकात वाचले होते की महाभारतकाळी स्त्रीला पाळी आली म्हणजे एक बीज नष्ट झाले आणि हे वाईट लक्षण समजत म्हणून भरपूर मुले होत.
29 Jul 2022 - 1:11 pm | यश राज
तुमचे लेख नेहमीच आवडतात , तसाच हा लेख.
ऋतुमती हा सुंदर शब्द असताना बाकीचे विटाळशी इत्यादी शब्द कालबाह्य झाले पाहिजेत त्याबरोबर संकल्पनाही.
29 Jul 2022 - 2:06 pm | मुक्त विहारि
आमच्या कडे पाळत नाहीत .....
29 Jul 2022 - 2:36 pm | श्वेता व्यास
छान लेख आहे. माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडे पाळीचा बाऊ केला जात नाही, किंवा कोणत्याही गोष्टीला हे करू नको ते करू नको असं नाहीये. आई तिच्या दिवसांमध्ये बाजूला बसायची. मला वैयक्तिक पाळीच्या दिवसात मंदिरात जाणे पटत नाही. एकीकडे आपण म्हणतो त्या दिवसात खूप त्रास असतो, आराम हवा, सुट्टी हवी मग मंदिरातच का जायचंय? त्या उत्सर्जनाचा हेतू शारीरिक कितीही चांगला असला तरी ते उत्सर्जन आहे, काही स्त्रियांच्या आजूबाजूलाही दुर्गंध जाणवेल अशी परिस्थिती असते. पण एखाद्या सहलीसाठी गेलो असता अचानक पाळी आली, म्हणून लांबवर जाऊन एखादं मंदिर पाहायचं नाही असं मी करणार नाही, आणि उगीच तुम्ही म्हणता ना पाळीत मंदिरात नाही जायचं मग मी मुद्दाम जाणारच असंही करणार नाही.
मध्यंतरी पुढील विचार वाचनात आले होते, लेख काही अंशी पटला, खरं खोटं तपासून पाहिलेलं नाही.
पाळी की पर्वणी ?
29 Jul 2022 - 7:05 pm | गामा पैलवान
धर्मराजमुटके,
तुमचा इथला संदेश वाचला. थोडं हसायला आलं. का ते सांगतो.
१.
आहेच मुळी माझं मत लाख बरोबर. मी स्वार्थी आहे. मी सार्वजनिक देवळात देवदर्शनास गेलेलो असतांना मला शेजारी पाळीतली बाई नकोय. मलाच काय माझ्यासारख्य असंख्य भक्तांना नकोय. मी एका अर्थी त्यांचं प्रतिनिधित्व करतोय.
२.
त्या दिवसांत बाईने काय करावे हाच तर विषय आहे. कसा ते सांगतो. कृपया पुढे वाचा.
३.
आता बघा, वर क्रमांक १ मध्ये मी कसा ठार स्वार्थीपणा दाखवलाय. जे मला पाहिजे ते किती स्पष्ट शब्दांत मी मांडलंय. तसा स्वार्थीपणा बाईला दाखवता येत नाही. अगदी तिची व्यथा समस्त स्त्रीजातीची व्यथा जरी असली तरीही तिला स्वार्थीपणा जमंत नाही. तिच्या मनांत अगोदर इतरांचे ( मूल, नवरा, इत्यादि) विचार येतात. म्हणून निर्णय घेण्यासाठी तिला कोणी मार्गदर्शक लागतो. हा तिचा बाप्या असावा असा दंडक आहे.
असो.
आता जराशी हसलो का ते सांगतो. त्याचं काय आहे की या लेखातंच मुळी एक प्रकारचा बायकी विस्कळीतपणा आहे. पाळीवर लेख आहे तर मध्येच वैधव्य सवाष्ण वगैरे कुठनं उपटलं? अर्थात, लेख विस्कळीत जरी असला तरी समर्पक आहे. मग विस्कळीत मुद्दे एकत्र सांधून त्यावर विचारविमर्श कोणी करायचे? ते पुरुषांचं काम आहे. ते तुम्ही केलंय. 'बार्ईच्या वतीने सगळे निर्णय बाप्ये घेऊन टाकतात' हा दावा तुम्ही एक बाप्या म्हणून बायकांच्या वतीने केलाय.
आ.न.,
-गा.पै.
29 Jul 2022 - 7:34 pm | धर्मराजमुटके
का नको आहे ? नेमका मुद्दा समजला नाही.
हे त्याचे कारण आहे काय ?
29 Jul 2022 - 9:14 pm | गामा पैलवान
धर्मराजमुटके,
बरोबर ओळखलंत ! :-)
आ.न.,
-गा.पै.
1 Aug 2022 - 5:14 pm | प्रसाद गोडबोले
अवांतर : ह्या लेखावरुन मिपावरील - अनाहिता (उर्फ अबोली की काय ) ह्या कंपुची आठवण झाली . बायकांसाठी स्वतंत्र काढलेला विभाग का काय होता तो. आम्हाला वाटायचं त्याच्यावर असल्याच काहीतरी चर्चा होत असणार .
त्या कंपुचं पुढं काय झालं माहीत नाही . अहो काय दिवस होते ते - अनाहिता ही कोळुआंची , स्पायडर्स ची एक प्रजाती आहे असे सांगितल्याबद्दल प्रतिसाद उडवले जात होते =))))
पण त्या कंपुकडुन होणार्या संघटित हल्ल्यांमुळे आणि सिलेक्टिव्ह संपादनामुळे अनेक चांगले अभ्यासु लेखक मिपा सोडुन गेले किंव्वा वाचनमात्र झाले हे मात्र खरं.
असो. बाकी अनाहिता टाईप विषय असल्याने आम्ही अजुन काही लिहित नाही. उगाच हाही प्रतिसाद उडवला जायला नको =))))
10 Aug 2022 - 7:43 am | आजी
नचिकेत जवखेडकर-माझ्या विचारांशी तुम्ही सहमत आहात.धन्यवाद.
चावटमेला-तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझ्या अपत्यांच्या लग्नात मी गतधवा असूनही सर्व विधी केले होते.
Bhakti -ते तीन दिवस स्त्रियांना ऑफिसात सुट्टी द्यावी असा जीआर काढावा हे तुमचं म्हणणं मात्र मला पटलं नाही. लाखो स्त्रिया आज नोकरी करतात त्या सर्वांना तीन दिवस सुट्टी देणे हे राष्ट्रीय नुकसान आहे.
Nitin palkar-तुमचं म्हणणं बरोबर आहे.
अनिंद्य -तुम्ही माझं केलेलं अभिनंदन पोहोचलं. धन्यवाद.
सौंदाळा-काही प्रांतात मुलगी पहिल्यांदाच ऋतुमती झाली की सोहळा साजरा करतात. दर खेपेला नाही.
धर्मराजमुटके-अहो, आपल्या देशात अनेक सोहळे साजरे होतात त्यांत हा एक!
सौंदाळा आणि मुक्तविहारी यांनी हेच विचार मांडले आहेत.
वेब१०-तुम्हीही माझ्याशी सहमत! धन्यवाद.
सरिता बांदेकर-तुम्ही गरजू महिलेची ओटी भरता हे योग्य. असेच सर्वांनी करावे.
कर्नलतपस्वी -तुम्ही दिलेली बहिणाबाई चौधरींची कविता अर्थपूर्ण आणि चपखलपणे लागू पडणारी.
गवि-तुम्हांलाही ही कविता आवडली.
Bhakti लाही कविता आवडली.
कंजूस -तुम्ही म्हणता स्त्री सभासद मिपावर कमी पण या माझ्या पोस्टवर अनेक स्त्रियांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
गामा पैलवान -तुम्ही या प्रश्नाची दुसरी बाजू दाखवली आहे.
धर्मराजमुटके-पुरुषप्रधान संस्कृतीमुळे असं घडतं हे तुमचं म्हणणं पटलं.
Bhakti -धर्मराज यांच्या विचारांशी तुम्ही सहमत आहात.
सरटोबी-"आजी अवघड अनुभवाला थेट भिडलीस आणि शिष्टसंमत नसणाऱ्या विषयाला अतिशय आदबशीरपणे व्यक्त केलंस!"हा तुमचा अभिप्राय वाचून माझ्या लिहिण्याचं सार्थक झालं असं वाटलं.
प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे -'ती' एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याबद्दल इतकं आकांडतांडव नको."हे तुमचं मत पटलं.
पर्णिका -शारीरिक पाळी बद्दल मुलींना योग्य वयात योग्य ती माहिती दिली पाहिजे."हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.
मालविका -तुमच्या बहिणीप्रमाणेच काही मुली त्या काळात माहेरी येतात.
सौंदाळा-बंगालमधे पाळतात की नाही हे निदान मला तरी ठाऊक नाही.
यशराज -माझे लेख तुम्हांला नेहमीच आवडतात हे वाचून आनंद झाला.
मुक्तविहारी-बरं वाटलं वाचून.
श्वेता व्यास-तुमच्याशी सहमत.
गामा पैलवान -माझ्या लेखात तुम्हाला "बायकी विस्कळीतपणा "वाटला? सर्वच बायकांच्या बाबतीत असं सरसकट विधान टाळायला हवं होतं असं नम्रपणे नमूद करावेसे वाटते.माझ्याबाबतीत म्हणाल तर मी यावर विचार करेन. काळजी घेईन.
मार्क्स ऑंरेलियस-स्त्रियांचा तो कंपू मिपावर पुन्हा एकदा स्थापन व्हावा. याबाबत वाटलं तर मतदान घ्यावे.
10 Aug 2022 - 8:04 pm | प्रसाद गोडबोले
=))))
10 Aug 2022 - 6:01 pm | गामा पैलवान
आजी,
थोडाफार विस्कळीतपणा सर्वत्र असतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर, वयस्कर पुरुष तरुणांपेक्षा अधिक विस्कळीत असतात.
तुमचा विस्कळीतपणा नैसर्गिक आहे. नैसर्गिक अशासाठी म्हंटलंय की बायकांना जे स्वगत एकसंध वाटतं ते तसं पुरुषांना वाटंत नाही. पुरुषांनी त्यात सुधारणा करून घ्यायला शिकलं पाहिजे. फार काही नाही. :-)
आ.न.,
-गा.पै.
10 Aug 2022 - 6:10 pm | गामा पैलवान
पर्णिका,
हा समज युरोपात सुमारे १०० वर्षांपूर्वी प्रचलित होता. संदर्भ ( इंग्रजी लेख ) : https://www.thecovaproject.com/cova-conversations/2020/9/11/does-menstru...
आज भारतात हा कुठनं आला ते नक्की माहित नाही. पण युरोपातनं आलेला असू शकतो.
आ.न.,
-गा.पै.
10 Aug 2022 - 8:27 pm | वामन देशमुख
आजींच्या भावनांशी आणि लेखाच्या आशयाशी सहमत.
10 Aug 2022 - 8:56 pm | चौथा कोनाडा
लेख आवडला. शहरी धबडग्य्यात अश्या प्रथा हळूहळू कालबाह्य होत आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण शहरी भागात जरा आधुनिक प्रथा सुरु होत आहेत त्यामुळे मुलींचे, स्त्रीयांचे नुकसान होत आहे .... ते भोग स्त्रीयांच्या नशीबी आहेतच !