प्रिय सचिन,
पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच. पण तू मात्र आमच्या मनातल्या क्रिकेटचा मोठा भाग अजूनही व्यापून ठेवला आहेस.
माझे आजोबा आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या आणि तरुणपणीच्या गोष्टी सांगायचे. त्यांचा गाण्याचा 'कान' बालगंधर्वांच्या गाण्यांवर तयार झालेला. तेव्हा त्यांच्या दृष्टीने कुठल्याही गायक अथवा गायिकेचा कस हा बालगंधर्वांच्या कसोटीच्या दगडाला घासूनच बघितला जायचा. त्या अर्थानी बालगंधर्वांनी त्यांना "बिघडवलं" होतं.
तुझी क्रिकेट खेळण्याची आणि आमची क्रिकेट बघण्याची कारकीर्द सारखीच. आमची क्रिकेटची पहिली आठवण म्हणजे पेशावरमध्ये तू कादिरला मारलेले चार षटकार हीच. म्हणजे आमचा क्रिकेटचा पहिला घासच चांदीच्या चमच्यानी काजू - बदाम घातलेल्या साजुक तुपातल्या पेजेचा. त्यानंतर तब्बल २४ वर्षं तुझ्या बॅटिंगच्या पौष्टिक खुराकावर आमचं क्रिकेटप्रेम पोसलं गेलं.
तुझ्या मैदानावरच्या पराक्रमांबद्दल लिहिण्यात काही अर्थ नाही. आमच्यासाठी हेच महत्वाचं होतं की तू केलेला प्रत्येक नवीन पराक्रम आमच्यासाठी "पहिल्यांदा" घडत होता. फास्ट बोलरला dancing down the wicket डोक्यावरून सिक्सर मारणं, लेगस्पिनरला उजवा पाय वर उचलून फ्लिक करून मिडविकेटवरून भिरकावणं, सुसाट यॉर्करला निव्वळ टायमिंगच्या बळावर दुप्पट वेगात परत पाठवणं. इतकंच काय, फॉर्म सापडत नसताना ऑफ साईडचं दुकान बंद करून फक्त लेगला खेळत कसोटीत द्विशतक रचणं, वडिलांचं क्रियाकर्म करून लगेच मैदानात उतरून शतक ठोकणं असलं काही आधी कधी झालं नव्हतं. तुझ्या बॅटिंगनी आम्हाला आनंद, उत्कंठा, उन्माद, उत्कटता, नाट्य, रोमांच, स्फुरण, प्रेरणा, समाधान, कृतकृत्यता - सगळं सगळं दिलं. तुझी बॅटिंग ahead of times होती. कधी कधी वाटतं की वीरू, युवराज, झहीर, रैना, कैफसारखा "मिजाज" असलेली लोकं तुला थोडी आधी मिळाली असती तर काय बहार आली असती.
एखाद्या "क्लासिक" पुस्तकाची किंवा एखाद्या "टाइमलेस" चित्रपटाची पारायणं करताना दर वेळी काहीतरी नवं गवसत जातं. एखादा नवा संदर्भ लागतो, एखादी सुटून गेलेली गोष्ट सापडते, एखादं "बिटवीन द लाइन्स" विधान उमजतं. तसं मागे वळून तुझी कारकीर्द पाहताना वाटतं. क्रिकेटपलिकडे किती काय देऊन गेलास तू! पुढच्या पिढ्यांसाठी सर्वात भाग्याची गोष्ट म्हणजे तुझी संपूर्ण कारकीर्द well documented आहे. त्यामुळे ह्या नव्या मुलांना "डेझर्ट स्टॉर्म" पण महिती आहे आणि सेंच्युरियनवरच्या ७५ चेंडूंमधल्या ९८ धावा सुद्धा. अंगावर काटा आणणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची हैदराबादमधली १४३ ची खेळी पण माहिती आहे आणि आफ्रिकेविरुद्धचं पहिलं एकदिवसीय द्विशतक देखील. तुझ्या कित्येक इनिंग्स सिंगल मॉल्ट किंवा जुन्या वाईन सारख्या आहेत. कधीतरी एखाद्या दिवशी एखादी बाटली उघडावी आणि तिच्या कालातीत दर्जाचा घोटा - घोटानी लुत्फ घ्यावा.
सच्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आमचं इकडे बरं चाललंय. आयुष्य सेटल झालंय. तुझ्याशिवायचं क्रिकेटही अंगवळणी पडलंय. पण कुठेतरी जीव १९८९ - २०१३ मध्येच अडकून पडलाय बघ. त्या २४ वर्षांसाठी आणि असंख्य अविस्मरणीय आठवणींसाठी धन्यवाद. आणि हो - आम्हाला "बिघडवल्यासाठी" सुद्धा!
© - जे.पी.मॉर्गन
२४ एप्रिल २०२२
प्रतिक्रिया
24 Apr 2022 - 9:12 am | सुखी
मस्त लिहिलंय
24 Apr 2022 - 9:30 am | श्रीगुरुजी
सुंदर लिहिलंय. पूर्वी माझ्या देव्हाऱ्यात सुनील व कपिल विराजमान होता. नंतर त्यांच्या जागी सचिन विराजमान झाला. आता देव्हारा रिकामा आहे.
28 Apr 2022 - 2:25 pm | तुषार काळभोर
अगदी योग्य शब्दांत मांडलंय, गुरुजी!
25 Apr 2022 - 5:07 pm | श्वेता व्यास
छान लिहिलं आहे.
खरंय अगदी. क्रिकेट समजायला लागलं तेव्हापासून फक्त सचिनच पाहिला होता, किंवा असं म्हणू की तो होता म्हणून क्रिकेटची आवड निर्माण झाली, तो निवृत्त झाला आणि खेळातली मजाच गेली. आताचं क्रिकेट बघताना अगदीच पोरखेळ पाहिल्यासारखं वाटतं.
26 Apr 2022 - 1:38 pm | एकनाथ जाधव
खुप छान लेख
धन्यवद
26 Apr 2022 - 8:56 pm | फारएन्ड
मस्त लिहीले आहे. सचिनच्या जुन्या क्लिप्स बघणे हा माझाही आवडता छंद आहे. मधे त्यावर लेख लिहीत होतो त्यामुळे "अभ्यास" करायला बघत होतोच :) पण एरव्हीही बघतो.
इथे आकडेवारी महत्त्वाची नाही, तरीही हैदराबाद मधले १४३ कोण्ते? मला १७५ लक्षात आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तेथे.
बाकी श्रीगुरूजी यांनी लिहील्याप्रमाणे सुनील, कपिल आणि मग सचिन. नंतर ती लेव्हल आणि पॅशन इतरांबाबत वाटली नाही. धोनी, कोहली आवडतात. ते काही बाबतीत सरसही आहेत. आणि वेळोवेळी त्यांची कामगिरी पाहून थक्कही झालो आहे. पण त्यांच्याबद्दल ती पॅशन वाटत नाही.
27 Apr 2022 - 3:10 pm | मुक्त विहारि
सचिन निवृत्त झाला आणि माझा तरी, क्रिकेट मधला रस संपला...
28 Apr 2022 - 9:06 am | कानडाऊ योगेशु
माझेही जवळपास तसेच झाले. शालेय वयात असताना शाळेच्या दिवशी मॅच सुरु असेल तर शाळा संपल्यावर घरी आल्यावर दफ्तर बाजुला ठेवताना स्कोर किती आणि सच्या खेळतोय का अजुन? आऊट झाला असेल तर कितीवर आऊट झाला हेच पहिले प्रश्न असत. पण सचित निवृत्त होण्याआधी उतरणीला लागल्यावर क्रिकेटमधला इंटरेस्ट अचानकच संपला.
28 Apr 2022 - 9:48 am | अमरेंद्र बाहुबली
सचिन तेंडूलकर निवृत्त झाला नव्हता, परफोर्मन्स नव्हता तरी निवृत्त व्हायची ईच्छआ नव्हती. शेवटी बीसीसीआय ने परस्पर घोषणा केला का सचिन निवृत्त होणार मग नाईलाजाने निवृत्त व्हावे लागले.
28 Apr 2022 - 3:28 pm | तुषार काळभोर
माझा पण!
डेजर्ट स्टॉर्म, हैदराबादचे १७५, सेंच्युरियनचे ९८, चेन्नैचे १३६, सिडनीचे २४१, नागपूरला द. अफ्रिकेविरुद्ध १११, १९९४ च्या हिरो कप मधली बॉलिंग आणि प्रत्येक वेळी चेहर्यावर असलेलं ते मिलियन डॉलर स्मित!!
सिद्धूच्या शब्दात - "मै खेलेगा अली, मै खेलेगा" हे ऐकताना पण रोमांच उभे राहतात!
28 Apr 2022 - 4:22 pm | बेकार तरुण
जे पी एम, मस्त लिहिता तुम्ही खूप...
नेहमीप्रमाणेच हेही लेखन खूप आवडलं अन खूप आठवणी जाग्या झाल्या..... आमच्या वयाच्या लोकांना सचिन देवासमान ....