ध्रांगध्रा - १६

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
22 Jan 2022 - 6:44 am

मी तोंड उघडून जोराने " आ....." म्हणतो. अरेच्चा!!!!!!!! आला की माझा आवाज. मला माझंच हसू येतं म्हणजे मी मनातल्या मनात हाका मारतोय तर ! ते कसं ऐकू जाणार.
त्या हसण्यानं मला जरा बरं वाटतं.... माणूस कितीही रागात , तणावात असला तरी थोड्याशा हसण्याने किती फरक पडतो नाही!.....

मागील दुवा ध्रांगध्रा - १५ http://misalpav.com/node/49796
माझा आवाज ऐकून आई आत येते. पाठोपाठ बाबाही.
"काय रे काय झाले?". आई उशी शेजारच्या नॅपकीनने माझ्या कपाळावरचा घाम टिपते. तरी बरं त्या हसण्यामुळे मी थोडा तरी रिलॅक्स झालो होतो. " घे पाणी पी" आई माझ्या हातात पाण्याचा ग्लास देते. " काही होतंय का? केवढा घाम आलाय तुला! " बाबा रेग्यूलेटर फिरवून पंख्याचा स्पीड वाढवतात.
"डोकं दुखतय का?......" बाबा आणखीही काही विचारतात. त्यांचा प्रश्न मला समजत नाही. मी त्यांच्याकडे नुसतच पहात रहातो. एकटक....
" अहो त्याला झोपू दे हो." टेबलावच्या एका पुडीतून आई काहितरी बोटाने काढते. माझ्या कपाळाला लावते.अंगारा असावा बहुतेक." झोप बाळा झोप. आणि तुम्ही पण झोपा. मी थांबते इथे. तुम्हाला सकाळी जायचंय ऑफिसला"
बाबांना झोपायला पाठवून आई तिथेच थांबते. आई खुर्चीत बसली आहे. भिंतीकडे एकटक शून्यात नजर लावुब पहातेय.जिथे नजर लावली आहे तिथे कसलासा ठिपका दिसतोय. अगदी मोहोरी एवढा. कसलासा डाग असावा भिंतीवरचा. ....... नाही डाग नाही. हा हलतोय..... किडा असावा एखादा लहान. तो मोठा होतोय.वेगाने नाही. अगदी हळू हळू.... मघाशी मोहोरी एवढा असलेला ठिपका आता वाटाण्याएवढा मोठा झालाय. तो अजून मोठा होतोय. किती वेळ गेला ते समजत नाही. मी आजूबाजूला पहायचा प्रयत्न करतो. तो ठिपका आईला दिसतोय का ते माहीत नाही. मला खोलीत आई दिसत नाही. नजर त्या काळ्या ठिपक्यावरून कितीही बाजूला करायची म्हंटले तरी जमत नाही.दिव्याकडे पतंग झेपावा तशी माझी नजर तिथेच येतेय. नजरबंदी झालीये....... तो ठिपका आता अजून मोठा झालाय.रुपयाच्या नाण्या एवढा मोठा. .... तो गोलगोल फिरतोय.... मी एकटक पहातोय......
" ए ऊठ..... ऊठ . मी आलोय.त्या ठिपक्यामधून कोणीतरी जोरात हाका मारतय. आवाज येतोय असे म्हणू शकणार नाही.. शब्द थेट माझ्या मेंदूत उमटताहेत. टेक्स्ट मेसेज सारखा.
" कोण आहेस तू?" मी तशाच टेक्स्ट मेसेज मधे बोलतो.
" मी खिरलापखिरला" माझ्या मेंदूत शब्द उमटतात. मी विचार करतोय ते त्याला कळतंय.कसे ? ते माहीत नाही. होतंय इतकंच म्हणू शकेन." कोण खिरलापखिरला?:
" तुला माहीत आहे कोण खिरलापखिरला ते..... पंचअद्री नरेश.... खिरलापखिरला." तो ठिपका आता वाटी एवढा झालाय. कदाचित गोल गोल फिरतही असावा. " बोल माझ्या राज्यात का आला होतास्?तिथे आलात आणि वर अपराधही केलात" मेंदूत उमटणारे शब्द टोचायला लागलेत. त्या शब्दांतला राग जाणवतोय.
हेलीस्यूनेशन....आभास आहे हा. मी मला समजावतो. आपण एखादा विचार करायला लागतो की तसे आभास व्हायला लागतात. मी मनाची नैसर्गीक प्रतिक्रीया आहे. गाभुळलेल्या चिंचेची आठवण जरी आली तरी तोंडाला पाणी सुटते. तसेच काहिसे.
" म्हण तू तुझ्या समजूतीसाठी आभास आहे म्हणून......पण मी आहे." त्या खिरलापखिरला म्हणविणाराला माझ्या मेंदूचा अ‍ॅक्सेस आहे हे विसरलोय मी.
" बरं बाबा.... तु आहेस .... झालं समाधान?"
" किर्रर्रर्र किच्च्च्च्च्च" पत्र्यावर ब्लेडने घासल्यावर यावा तसा एक अती घाणेरडा आवाज येतो. माझ्या बोलण्यावर प्रतिक्रीया म्हणून तो हसला असावा. आवाज म्हणतोय मी पण उमटला म्हणायला हवे.
तो काळा गोल डाग आता बशी एवढा मोठा झालाय. गोल फिरतोय. प्रयत्न करूनही माझी नजर तिथून हलू शकत नाही. त्यात अडकलीये.डोळे मिटणेही शक्य होत नाही. मी खेचला जातोय. त्या काळ्या गोलात आता दोन डोळे दिसतात..... तेच ते सकाळी पाहिले होते ते. रागीट. आग ओकताहेत असे तांबडे..... मी बेडची कड घट्ट पकडतो. ओरडायचा प्रयत्न करतो. तोंडातून आवाज फुटत नाही. मी कुठेतरी तळाला जातोय. खाली ... खाली....डोळ्यापुढे अंधार होतोय .....
मला कोणीतरी उठवतय. " ऊठ ...... शिवा उठ...." मी डोळे उघडतो. अगोदर नीत कळत नाही. अस्पष्ट दिसतं. मी डोळे चोळतो. आता स्पष्ट दिसायला लागलं. माझ्या समोर महेश उभा आहे.मी त्याला पटकन ओळखत नाही.
" महेश" माझी हाक ऐकून महेश पुढे येतो.
कसा आहेस रे शिवा?" महेश माझा हात हातात घेतो. महेशचा चेहेरा खूप वेगळा दिसतोय. आम्हाला भेटून आठ एक दिवस झालेत . पण या आठ दिवसात महेश खूप बदललेला दिसतोय.डोळे खोल गेलेत, भोवती काळी वर्तुळे. गालाची हाडे दिसताहेत.वजनही बरंच कमी झालं असावं.
" कधी आलास?" माझ्या प्रश्नावर महेश कसनुसा हसतो.हसताना त्याचे ओठ अक्षरशः पांढरे पडलेत हे जाणवते.
" झाला अर्धा तास. तुला झोप लागली होती. म्हणून इथेच बसलो" महेशच्या आवाजातला खोलपणा लपत नाही.
हा येऊन अर्धा तास झाला? म्हणजे मग वाजलेत किती? भिंतीवरचं घड्याळ दुपारी साडेअकराची वेळ दाखवतय. म्हणजे सकाळी आई येवून गेली त्या नंतर मला झोप लागली होती.
" कसा आहेस तू? डोक्याची जखम भरली असेल ना? काकुंनी मला सांगीतलं होतं. तुला अ‍ॅडमिट केलं होतं ते.पण मी ही झोपून होतो. आपण तेथून आलो . तुला इथे सोडलं आणि मी घरी काकांकडे गेलो. त्या दिवशीच ताप भरला. पुढचे चार दिवस ग्लानीत होतो."
" आता ठीक आहेस हे पाहून बरे वाटले"
" शिवा........" महेशला काहितरी बोलायचंय. पण तो इतकेच बोलून थांबतो. पुढचे बोलावे की कसे? हा विचार करतोय . त्याच्या गळ्यातला उंचवटा मागेपुढे होतो. चेहेर्‍यावर क्षणभर भिती चमकून जाते.
" काय होतंय महेश......."?
" मला झोप नाही आपण आल्यापासून"
" म्हणजे?"
" काही नाही...."
महेश काहितरी सांगायचं टाळतोय.... त्याची नजरच सांगते ते.
काय? काय सांगायचंय तुला?
आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे
अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्‍यावरची भिती लपत नाही.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jan 2022 - 10:56 am | ज्ञानोबाचे पैजार

हा भाग ही आवडला
पुभाप्र
पैजारबुवा,

भीमराव's picture

22 Jan 2022 - 11:47 am | भीमराव

थॅनॉसच्या तोडीस तोड झाला पाहिजे खिर्लापखिर्ला. बा*टेंपोत, आपल्याकडे कोणतरी झकास अनिमेशन वाला सैनिक पाहिजे होता. जबराट स्टोरी, दोन हिंडफीरे कुठल्याशा आडरान देवळात जातात, तिकडे कोण व्यालराज राज्य करत असतो. तो खवळतो, हिंडफीऱ्यांच्या मानगुटीवर बसतो, हिंडफीरे खंगायला लागतात. मग होते हिरोची एंट्री, हिरो आता हिंडफिऱ्यांना व्यालराजाच्या तावडीतून सोडवु शकनार काय? नक्की व्यालराज कशामुळे पिसाळला आहे? कि त्याला जगावर राज्य करायचं आहे?
सवाल है तमाम, लेकीन जवाब है केवल एक.
जानने के लिये वाचत रहा ध्रांगध्रा.

बॅकस्टोरी पण येऊद्या त्या खिरला ची, वो भी एकदम विस्तार के साथ.

भीमराव's picture

22 Jan 2022 - 11:49 am | भीमराव

थॅनॉसच्या तोडीस तोड झाला पाहिजे खिर्लापखिर्ला. बा*टेंपोत, आपल्याकडे कोणतरी झकास अनिमेशन वाला सैनिक पाहिजे होता. जबराट स्टोरी, दोन हिंडफीरे कुठल्याशा आडरान देवळात जातात, तिकडे कोण व्यालराज राज्य करत असतो. तो खवळतो, हिंडफीऱ्यांच्या मानगुटीवर बसतो, हिंडफीरे खंगायला लागतात. मग होते हिरोची एंट्री, हिरो आता हिंडफिऱ्यांना व्यालराजाच्या तावडीतून सोडवु शकनार काय? नक्की व्यालराज कशामुळे पिसाळला आहे? कि त्याला जगावर राज्य करायचं आहे?
सवाल है तमाम, लेकीन जवाब है केवल एक.
जानने के लिये वाचत रहा ध्रांगध्रा.

बॅकस्टोरी पण येऊद्या त्या खिरला ची, वो भी एकदम विस्तार के साथ.

चौथा कोनाडा's picture

22 Jan 2022 - 12:53 pm | चौथा कोनाडा

भास, भास ..... आणि भास !

कुटं नेऊन ठिवलाय ह्या मित्रांना, खिरलापखिरला ?

उत्कंठा, उत्कंठा .... आणि उत्कंठा !
|| पु भा प्र ||

विजुभाऊ's picture

23 Jan 2022 - 12:39 pm | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा - १७ http://misalpav.com/node/49819