ध्रांगध्रा - १७

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Jan 2022 - 12:39 pm

काय? काय सांगायचंय तुला?
आपण त्या ट्रीपवरून आल्यापासून मी झोपू शकलेलो नाही. डोळे मिटले की त्याचा चेहेरा डोळ्यासमोर येतो. रात्री सुद्धा मी त्यूबलाईट पूर्ण चालू करून ठेवतो रूम मधे
अंधार झाला की त्याचा चेहरा दिसतो" हे सांगताना महेशच्या चेहेर्‍यावरची भिती लपत नाही.

मागील दुवा ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814
" काय म्हणतोस ! कसला चेहेरा?" खरंतर महेशनं हे मला विचारलं असतं तर मी पण हेच सांगितलं असतं. त्यालाही माझ्यासारखेच भास होत असावेत.
" तो त्या देवळातला चेहरा....आठवतं आपण त्या देवळात गेलो होतो तिथे समोरच्या भिंतीवर एक मोठी मूर्ती होती" महेश बोलतोय."दक्षीण भारतीय शैलीतली. मी फोटोपण काढलेत त्याचे. असा रागीत भाव असलेली मूर्ती सहसा पहायला मिळत नाही." माझ्या डोळ्यासमोर पटकन ती मूर्ती उभी राहिली. विसरणं शक्यच नाही. त्या मूर्तीचा चेहेरा आणि मला दिसणारा चेहेरा एकच आहे.
" तू गाभार्‍यात थांबलास. मी त्या कोपर्‍यात असणार्‍या दारातून पायर्‍या उतरून खाली गेलो."
" हे मी फोटो काढत होतो. खाली उजेड नव्हता. फोटो काढता आले नसते. मग बराच वेळ झाला तू आला नाहीस म्हणून मी तुला हाक मारली. त्या नंतर तू धावत वर आलास. आणि मलाही पळ म्हणालास. आपण काहितरी मागे लागल्यासारखे धावत सुटलो.
" हो ....ते माझ्या मागे लागले होते." महेश हे देखील घाबरतच सांगतोय. जणू ते जे काही मागे लागलं होते ते इथेसुद्धा येईल असं वाटतय.
" तू खाली गेलास तिथे काय होते ? काय दिसले ...याबद्दल आपले काहीच बोलणे झाले नाही.
" मी खाली गेलो... जिना संपला तो एका विशाल दालनात. बहुतेक सभागृह असावं. मंदीराच्या खाली सभागृह असलेलं कधी पाहिलं नव्हतं. त्या सभागृहात समोर एक दगडी सिंहासन होतं. भिंतीवर अनेक मूर्त्या कोरल्या होत्या. वर होत्या तशाच.... पण एक फरक होता. प्रत्येक मूर्तीचा चेहेरा अगदी एकसारखा . मोबाईलच्या उजेडात पहातानाही हे लक्ष्यात आले. कारण त्या मूर्त्यांचे चेहरे आपल्याला गावात भेटलेल्या लोकांसारखे होते. अगदी हुबेहूब. ते चहावाले झेलेआण्णा, आपल्याला रस्त्यात भेटलेलं ते तिघांचं कुटुंब...... तो पानटपरीवाला कसे एकसारखे दिसत होते ना ! अगदी.. या मूर्ती सुद्धा तशाच.. मी तर अगोदर दचकलोच होतो.मला वाटले की गावातलेच कोणीतरी उभे आहे." महेश सांगतोय. मी कल्पना करतोय. त्या मूर्ती कशा असतील याची. नृत्य करणार्‍या स्त्रीया... वाद्ये वाजवणारे पुरुष , फेर धरून नाचणारे नर्तक, शिकार करणारे लोक ....सगळे एकाच चेहेर्‍याचे. अगदी छापातून काढल्यासारखे. युद्ध करणारे दोन वीर अगदी सारख्याच चेहेर्‍याचे, फक्त हावभाव वेगळे. जुळे भाऊ भांडताहेत असेच वाटत असेल पहाताना.
" मी फोटो काढायचा प्रयत्न केला. पण बॅटरी उतरत चालली होती. फ्लॅश चालेना. मग त्या सभागृहात प्रत्येक भिंत न भिंत, त्यावर कोरलेली चित्रे पहात बसलो. एका कोपर्‍यात एक दगडी कोनाडा होता . तिथे एक दगडी ताट होतं. त्या ताटात एक दगडात कोरलेलं कसलंसं फूल होतं. अगदी देठासह." महेश सांगायला लागला की सगळं डोळ्यासमोर उभं करतो.
" त्या दगडी ताटात आणखी एक वस्तू होती......... त्यावर कसलं तरी कोरीव कामही होतं. अंधारात दिसत नव्हतं नीट म्हणून त्यावर मोबाईलचा उजेड पाडला. त्या कोनाड्यात भिंतीवर एका मूर्तीचा चेहेरा मात्र दिसला. मोठे डोळे , जाड ओठ , मोठ्या मिशा..... गळ्यात दागीने , तो पुतळा माझ्याकडेच पहात होता. इतकं छान परस्पेक्टीव्ह आजतागायत पाहिले नाही कुठे. पण त्या पुतळ्याच्या चेहेर्‍यावर भाव इतके रागीट होते की भितीच वाटावी. " महेश हे सांगतानाही घाबरलेला आहे हे स्पष्ट जाणवतंय. त्याला इतकं घाबरलेलं कधीच पाहिलं नाही.पण तो सांगतोय त्या वरून तो चेहेरा माझ्याही डोळ्यासमोर येतोय. गोल मोठा चेहेरा , कुरळे केस, मोठे डोळे, फुगलेल्या नाकपुड्या..... जाड ओठ..... अगदी हुबेहूब तोच चेहेरा........ खिरलापखिरलाचा.
" मी त्या कोनाड्यातल्या वस्तू कडे पहात होतो. तो चेहेरा माझ्याकडे पहात होता. मी त्या वस्तूचे फोटो काढायचा प्रयत्न केला. पण फ्लॅश चालत नव्हता. अंधारात फोटो येत नव्हते.सहज म्हणून त्या वस्तुला हात लागला. आणि गम्मत म्हणजे ती वस्तू सरकले. ती एक चकती होती. मी पुन्हा त्याला हात लावला. नक्की समजत नव्हते ते एक नाणे असावे. नीट पहाता यावे म्हणून मी ती चकती उचलली. आणि अचानक माझ्या मागे मला काहीतरी हालचाल जाणवली. अगोदर समजलं च नाही. पण त्याअ सभा मंडपाच्या कोपर्‍यातून ते आलं असेल. पाठीमागे गुरगुरण्याचा आवाज आला म्हणून मागे पाहिलं. अंधारात डोले चमकत होते. मग उजवीकडूनही तसाच आवाज आला. माकडं किचकिचाट करतात ना तसा.
आवाज आला त्या दिशेला पाहिलं.. तिथे डोळे चमकताना दिसले. हिरवे, पिवळे.
ते माझ्याकडेच येत होते. कसलेसे प्राणी असावेत.
आता तर डावीकडूनही तसाच आवाज आला. तिथेही तिन्ही कडुन ते माझ्या जवळ येत होते. कसले प्राणी आहेत ते कळंत नव्हते.पण जाम टरकली होती. मी अक्षरशः जागेवर थिजलो होतो. पाय हलवायचंही धाडस नव्हतं. म्हंटलं आता संपलो इथे. तेवढ्यात तुझा आवाज आला. तू मला बोलवत होतास. तुझ्या आवाजानं त्या प्राण्यांचं लक्ष्य विचलीत झालं असावं. ते थांबले. ते संधी साधून मी त्या दगडी ताटातलं फूल उचललं आणि एका डोळ्यांच्या दिशेने फेकून मारले. आणि जिन्याच्या दिशेने धूम ठोकली. मी पळालो हे त्यांच्या ध्यान्यात येईपर्यंत मी अर्ध्या जिन्याच्या पायर्‍या चढून वर आलो होतो. पुढचं तुला माहीतच आहे."
" ते प्राणी नसतील रे. मांजरं वगैरे असतील.मांजरांचे डोळे अंधारात चमकतात."
" मांजरं इतकी उंच नसतात रे. कमरे इतके तरी असतील. आणि इतका दाट अंधारही नव्हता. मी ते प्राणी पाहिले. अर्धवट दिसले. पण दिसले. मोठं मांजर असावं तसं ...कुत्र्याएवढं मोठं.... आणि तोंड वानरासारखं.:
" मांजरासारखं शरीर आणि वानरासारखं तोंड! ......म्हणजे व्याळ म्हणायचंय तुला?
महेशचं ते वर्णन ऐकून मला सिंहाचे शरीर आणि हत्तीचे डोके असलेला गजव्याळ आठवला.व्याळ हा भारतीय मिथकांतला सिंहासदृश काल्पनिक प्राणी. हा मुख्यतः मिश्रित प्राणी आहे म्हणजे सिंहाचे मुख, हत्तीची सोंड आणि व्याळ हे नेहमी पुढचे दोन पाय उचलून मागच्या पायांवर उभे असतात.
काही वेळा व्यालांचे मुख इतर प्राण्यांचे देखील असते उदा. गजमुख असलेले गजव्याळ, गरुडमुख असलेले गरुडव्याळ, वृषभमुख असलेले वृषभव्याळ, अश्वमुख असलेले अश्वव्याळ, मकरमुख असलेले मकरव्याळ. हे नेहमीच मंदिरांतल्या खांबांवर रक्षण करणारा म्हणून कोरलेले आढळतात. अर्थातच हे काल्पनीक प्राणी आहेत.
" हो व्याळच म्हणावं लागेल. मला अगोदर वाटले की मला भास झाला असावा. पण मोबाईलमधे एक फोटो कॅप्चर झालाय. जरा अस्पष्ट आहे . हा बघ" महेश मोबाईलच्या स्क्रीनवर एक फोटो दाखवतो. मी तो फोटो निरखून पहातो. भिंतीत कोरलेली एक मूर्ती आणि पायाजवळ काहितरी काळा आकार दिसतोय.
फोटो मोठा करायला गेलो आधीच अस्पष्ट असलेला आकार अधीकच धूसर होतो.
" हो दिसतय काहितरी. पण मला नाही वाटत हा व्याळ असेल म्हणून. एखादी वेगळे मूर्ती असेल ती. व्याळ हा काल्पनीक प्राणी आहे..... गंमतच करतोस तू. मी गाभार्‍यात होतो ना तिथले फोटो आहेत कॅमेर्‍यात. चल आपण ते पाहूया." महेश आल्यामुळे मलाही थोडा उत्साह आलाय. मी कॅमेरा काढतो. कॅमेर्‍याच्या छोट्या छोट्या स्क्रीनवर चित्र नीट पहाता येत नाहीत. मी कॅमेरा लॅपटॉप ला जोडतो. एक एक चित्र समोर यायला लागते.
महेश बाईकवर बसलेला.... डोंगर चढायला सुरवात केली तिथल्या दगडावर मी बसलेलो आहे...... झाडाच्या फंदीवर चिंटूकला निळा पक्षी. ...त्या खंदकाच्या काठावर दोघांचा सेल्फी..... मग थेट त्या मंदीराच्या पायर्‍या उतरून जातानाचा..... मंदीराच्या सभागृहाचा..... तिथल्या खांबांचे फोटो.... मग खांबावरच्या शिल्पांचे फोटो....नाच करणारी माणसे.... नर्तिकांचे हावभाव....मुद्रा.... द्वारपाल...... सगळे कसे स्पष्ट आलेत फोटो.
" हे सगळे कोरीव काम शिल्पकाम वाटतंच नाही. शिल्पांवर दगडी रंग नसता तर ती सगळी शिल्पे जिवंत वाटली असती. हावभाव इतके हुबीहूब आहेत फोटो काढल्यासारखे."
"त्या वेळेस लक्ष्य गेलं नाही पण आत्ता जाणवतंय; ही सगळी शिल्पे सगळं कोरीवकाम म्हणजे परस्पेक्टीव्ह ड्रॉईंगचा वस्तुपाठ असावा इतकी परफेक्ट आहेत. सगळ्या शिल्पातली माणसे आपल्याकडेच पहाताहेत, कुठूनही पाहिले तरी." महेशची कॉमेंट्री चालू आहे. आम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवर फोटो पहातोय
" थांबव.... हा बघ व्याळ.... पण हा नेहमीसारखा गज व्याळ नाही." एका फोटोकडे पहात महेश जवळ जवळ ओरडतोच. फोटोत एक परिचीत पण तरीही विचित्र प्राणीशिल्प दिसतेय.
" अरे खरेच की. ...सिंहासारखी शेपटी आहे. पाय शरीर सिंहासारखे..... मन डोकं बघ माणसासारखं..... नाही नाही माकडासारखं आहे..... हा मर्कट व्याळ. किंवा कपीव्याळ. पण असा व्याळ असल्याचं कधीच ऐकीवात नाही." माझ्या बोलण्याकडे महेशचं लक्ष्य नाहीय्ये. तो फोटोत आणखी काहितरी दाखवतोय. सर्वसाधारणतः व्याळमूर्ती एकतर खांबाच्या वरच्या भागात छताला आधार देण्यासाठी वापरल्या जातात किंवा युद्धात कोनावर तरी विजय मिळवला आहे अशा पवित्र्यात उभ्या असतात
पण ही व्याळमूर्ती दुसर्‍या एका मूर्तीच्या पायाशी बसलेली दिसते आहे. फोटोत त्या मूर्तीच्या कमरेखालचा हिस्साच दिसतोय. महेश त्याकडेच पहातोय. एकटक. त्या मूर्तीने धोतर नेसलंय. पायात जाड कडी आहेत. पायात चपला असाव्यात . या खडावा नक्की नाहीत. महेश त्या कडे बोट दाखवतो" हे .... हे अर्धेच आलंय यात.."
स्क्रीनवर मी पुढचा फोटो आणतो. हा मात्र दुसरीकडचा आहे. बहुतेक सभागृहाच्या भिंतीवरचा असावा. या फोटोत बरेचजण हातात धनुष्यबाण गदा तलवारी घेऊन एकमेकांसमोर उभे आहेत. कोणी हत्तीवर , कोणी घोड्यावर कोणी हातात भाले घेऊन धावताहेत. एक जण रथावर उभा आहे . पाठमोरा. त्याच्या पाठीवर बाणांचा भाता दिसतोय. खांद्याला धनुष्य आहे.
आम्ही एक एक फोटो पहायला लागतो. प्रत्येक फोटोत काही ना काही वेगळे वैषिष्ठ्य आहे. ही शिल्पे जगाला माहीत नाहीत अजून. त्यांचा शोध लावणारे म्हणून आमच्या दोघांचे नाव या जगात होईल या विचाराने मनाला थोड्या गुदगुल्या होताहेत.
आता गाभार्‍यातले फोटो दिसतात. कमानीसारखे दार, दाराशेजारी दोन्ही बाजूना द्वारपाल. दाराच्या वरच्या बाजूला वाद्य वाजवणारे बटू. आणि दारातून आत दिसणारा अंधार....... कुठल्याही स्पर्धेत एक नम्बरला येईल हा फोटो. आता आतमधले फोटो. दारासमोरच्या भिंतीवर एक मूर्ती आहे. पूर्णाकृती. लॅपटॉपच्या संपूर्ण स्क्रीनवर तो फोटो दिसतोय.
फोटो पाहिल्यावर शिवाचा चेहेरा बदलतो. आत्तापर्यंत बोलत असलेला शिवा एकदम आक्रसतो. त्याच्या चेहेर्‍यावर अचानक खूप घाम येतो. कपाळ घामाच्या थेंबानी भरलय.
" हाच तो ....हाच तो......: फोटोतल्या मूर्तीकडे महेश बोट दाखवतो.
स्क्रीनवर मी फोटो झूम करून मोठा करतो. बलदंड शरीर , गोल चेहेरा , नाक फेंदारलेले, वटारलेले वाटावेत असे मोठे डोळे, जाड ओठ , कुरळे केस ,..... हा तर आपण स्वप्नात पाहिलेला खिरलापखिरला........
" शिवा बंद कर .... नको दाखवू हा फोटो." महेश जाम घाबरलाय. त्याला असं घाबरलेलं मी कधीच पाहिलं नाही.
मी स्क्रीन बंद करतो. " काय झाले .... हे घे पाणी पी. " मी पुढे केलेला पाण्याचा ग्लास महेश घेतो. पाणी पितो. पाणी प्यायल्याचा घट घट आवाज होतो. तो अजूनही घाबरलेलाच आहे. मी पंख्याचा स्पीड वाढवतो.
" काय रे काय झालं?"..
काही वेळ महेश काहीच बोलत नाही. नुसता पायाच्या अंगठ्याकडे पहात बसलाय. मान हलवत तो कसलातरी निर्णय घेतो. माझ्याकडे पहातो.
" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो.
" हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही.
" तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

23 Jan 2022 - 1:01 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान चालु आहे कथा.

खिर्लापखिर्ला, भारी नाव आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jan 2022 - 12:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला,
पुभाप्र
पैजारबुवा,

श्रीगणेशा's picture

24 Jan 2022 - 12:29 pm | श्रीगणेशा

वाचत आहे.
खूप सारे बारकावे टिपले आहेत.

विजुभाऊ's picture

24 Jan 2022 - 11:18 pm | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा - १८ http://misalpav.com/node/49824

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2022 - 5:45 pm | चौथा कोनाडा

बलदंड शरीर , गोल चेहेरा , नाक फेंदारलेले, वटारलेले वाटावेत असे मोठे डोळे, जाड ओठ , कुरळे केस ,..... हा तर आपण स्वप्नात पाहिलेला खिरलापखिरला........

तपशिल भारी रंगवलेत !