ध्रांगध्रा - १५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
20 Jan 2022 - 8:10 am

डोक्यात जाळ पेटावा तशी आग आग होतेय. मी डोके उशीवर स्थिर टेकवायचा प्रयत्न करतो. ..... मेरी गो राउंडच्या पळण्यात खाली खाली जाताना जसं वाटते तसं काहीसं खाली खाली जातोय.
खाली ..... आणखी खाली...... आणखी खाली. पृथ्वीला तळ नसल्यासारखे वाटतय. खाली...... खाली....
डोळ्यापुढची उजेडाची जाणीव नाहिशी होतेय. डोळ्या समोर अंधार पसरतोय. सुखद गारवा देणारा अंधार....

मागील दुवा ध्रांगध्रा - १४ http://misalpav.com/node/49793
कसलेसे आवाज येतात. कोणीतरी बोलतय. मी हळू हळू डोळे उघडतो. पांढरं स्वच्छ छत. आपल्या घरात कुठे आहे असे छत?
" तो जागा होतोय" आईचा आवाज मी ओळखतो.
पांढरा अ‍ॅप्रन ! डॉक्टर ? ..... मी दवाखान्यात आहे? "आई .....आई आई गं...... " मी डोक्याला हात लावतो. काहीतरी जाळीदार ...... बॅंडेज कधी बांधले?
" शिवा.......... कसं वाटतय रे आता?" आइ माझ्या कपाळावरून हात फिरवत विचारतेय.मी सुखावतो डोक्यातली वेदना आता जाणवत नाहिय्ये, " काय झालं रे? किती लागलंय डोक्याला बेशुद्ध झाला होतास" किती हाका मारल्या तरी उठतच नव्हतास. तुझम पांघरून नीट करायला गेले तर उशीवर रक्त दिसलं तसंच इथे आणले. दवाखान्यात ....कालचा आख्खा दिवस..... कालपासून........" आई बोलतेय . मी इकडे तिकडे बघतो. हाताला लावलेली सलाईनची नळी दिसते. कशाला लावलय मला सलाईन? मला कळत नाही. आई माझ्याकडे मोठ्ठाले डोळे करून पहातेय. मी हसतो. माझ्या हसण्याने आईच्या चेहेर्‍यावरचे सगळे चिंतेचे भाव पुसले जातात.आईच्या चेहेर्‍यावर हसू पसरत जातं....

मी घरी आलोय. थकवा अजूनही जाणवतोय. साधा हात उचलायचा झालं तरी दमायला होतंय. त्या दिवशी घरी आल्या नंतर झोपेतच बेशुद्ध झालो. आई मी इतका वेळ का झोपलोय म्हणून पहायला आली. तीने उठवूनही उठलो नाही. त्यात ती डोक्याची जखम. आईने डॉक्टरांना बोलावलं. देसाई डॉक्टरांनी थेट अ‍ॅडमीट करायला लावलं. त्या नंतर दोन दिवस बेशुद्धीतच गेले. अधूनमधून शुद्ध यायची तेंव्हा किंचाळत होतो. उठायचा प्रयत्न करायचो आणि तसाच बेशुद्ध व्हायचो.
हे आईने सांगितले म्हणून समजले. बेशुद्ध असताना कसल्याशा अगम्य भाषेत बरळत होतो. एकसारखं खिर्लापखिर्ला असं काहितरी म्हणत होतो.हे पण आईनेच सांगितले.
हे " खिरलपखिरला" काय आहे? कुठल्या भाषेतलं आहे विचार करायला लागलो की डोक्यात कळ येते.मी हात वर करून बँडेज चाचपतो. रक्त खूप गेलंय म्हणतात. आता जखमेवर पट्टी बांधली आहे.पण दुखायचे थांबत नाहीय्ये. डोक्यातल्या वेदनांमुळे विचारसुद्धा करता येत नाही. मी डोळे मिटतो.झोप येतेय की ग्लानी ते सांगणं अवघड आहे. डोळ्यासमोत गडद्द अंधार....
" ए ऊठ.... जागा हो" माझ्या समोर तो उभा आहे. कुरळे दाट केस, कानात लखलखणारे कुंडल. गळ्यात सोन्याचे मोठे पदक असलेला हार, आणि तशाच एकदोन माळा. त्यावरूनही उठून ठसठशीत उठून दिसणारी रुद्राक्षाची माळ. रुद्राक्ष नसावेत...भद्राक्ष असावेत. मला फरक कळत नाही.केसाळ छाती. काळपट रंगाचे धोतर...
दोन्ही मनगटांवर जाड सोन्याचे बंद.माझी नजर त्याच्या चेहेर्‍याकडे जाते.... पूर्वी चांदोबा मासिकात असायचा तसा .... अगदी नीट सांगायचेच झाले तर ... पूर्वी हवाबाण हरडे च्या जहिरातीत एक अक्कडबाज मिशावाला माणूस दिसायचा ना! अगदी तसा चेहरा. क्षणभर हसूच आहे. पण डोळ्याकडे लक्ष्य जाताच माझे हसू मावळते. मोठाले गोल डोळे, खोबणेतीन कधिही बाहेर येतील असे वाटणारे. त्यामुळे की कसे पण स्पष्ट जाणवण्याइतका रागीट भाव.
"ए ऊठ जागा हो" त्याच्या आवाजाने एखादा तिथल्यातिथे घेरी येऊन पडेल इतकी जरब आहे आवाजात. माझाही थरकाप उडालाय.तोंडातून शब्द फुटत नाहिय्ये. ....कुठे बरं पाहिलंय याला?......मी आठवायचा प्रयत्न करतोय.डोळ्यासमोर चित्रे नाचू लागतात.गणीताची नारायण पिल्लई सर!......अनुरा रणनायके! सतार वाजवणारी सुंदरी... ढोल ताशा वाजवणारे आनंदी बटू! ..... पालखीच्या पुढे सजवलेले घोडे...... त्या पुढे असणारे व्याळ.....सभा मंडप....राजसभेतले प्रजाजन..... सभामंडपाचे महिरपी खांब..... त्या प्रत्येक खांबाशी उभे असणारे द्वारपाल व्याळ...पुढे चौथरा.. पायर्‍या चढून गेले की एक सिंहासन..... त्याच्या दोन्ही बाजूला चवर्‍या ढाळणारे व्याळ.... सिंहासनावर तो बसलाय.... आत्ता दिसतोय तश्याचच रागीट चेहे र्‍याने. शेजारी त्याला चषकातून पाणी देणारा व्याळ.......व्याळ......व्याळ.... हे सगळे व्याळ नेहमी दिसतात तसे नाहीत. गज व्याळ,अश्वव्याळ म्हणजे शरीर सिंहाचे आणि त्यावर तोंड हत्तीचे, घोड्याचे. हे असे नाहीत. हे वानर व्याळ आहेत....कुठे बरं पाहिलंय हे सगळं...... अरे हा... ही सगळी पांढरी च्या देवळात कोरलेली शिल्पे आहेत. आपण फोटो सुद्धा काढलेत याचे. पण त्या वेळे शिल्पात सिंहासन रिकामे होते.
" ए उठ जागा हो..." मला त्याचा आवाज सिंहगर्जनेसारखा वाटतूय.मी खडबडून जागा होतो. माझे सर्वांग घामाने थबथबलंय.
डोळे उघडतो तरी त्याचा चेहेरा नजरेसमोरून जात नाहीय्ये.... स्वप्नंच ते.... मी माझ्या घाबरण्याला हसतो. बेडशेजारच्या टेबलावरली पाण्याची बाटली घेऊन मी थेट तोंडाला लावतो. .... घट घट घट घट घशातुन पाणी उतरतानाचा आवाज केवढातरी मोठा वाटतो.
पहाटेचे चार वाजलेत. पहाटेची स्वप्ने खरी होतात म्हणे.हे स्वप्न खरं ठरलं तर?.....
अशी स्वप्ने खरी ठरली असती तर ...एव्हाना आतापर्यंत आपण माधुरी दिक्षीत पासून दिशा पटनी पर्यंत सगळ्यांबरोबर एकदातरी बागेत नाचलो असतो. बाकी सोडा पण कॉलेज कँटीनमधे कटिंग चहा तरी प्यालो असतो.लोक ना....... काय काय फंडे लावत असतात.
दिशा पटनी सोबत आपण कॉलेजच्या कँटीनमधे चहा घेतोय आणि ते पाहून बाकीच्यांचे डोळे विस्फारून अक्षरशः फाटतील इतके मोठे झाले आहेत.बारीक डोळ्यांच्या रमी चांदमलानीचे डोळे विस्फारल्यावर कसे दिसतील याची कल्पनाही करवत नाहिय्ये . या बारीक डोळ्यांच्या माणसांची एक गम्मत असते.हसताना त्यांना दिसत तरी असेल का अशी शंका यावी इतके बारीक होता डोळे त्यांचे. महेश तर पार येडा झाला असता...... अरे हो महेशचा त्या दिवसापासून काहीच सम्पर्क नाहिय्ये. आजारी तर नसेल ना पडला आपल्यासारखा. ...... महेशला फोन करावा म्हणून मी मोबाईल शोधतो. बेडवर दिसत नाहिय्ये. आईने उचलून ठेवला असेल.
आई......आई.......मी आईला हाक मारतोय. कसलाच आवाज येत नाही.माझा स्वतःचा सुद्धा....मी जोर लावून ओरडतो.....आई ......आई..... अरे च्चा हे काय? आवाज आ येत नाहिय्ये? मला बाहेरचे काही आवाज ऐकायला येताहेत. मग माझाच का नाही येत...
मी तोंड उघडून जोराने " आ....." म्हणतो. अरेच्चा!!!!!!!! आला की माझा आवाज. मला माझंच हसू येतं म्हणजे मी मनातल्य अमनात हाका मारतोय तर ! ते कसं ऐकू जाणार.
त्या हसण्यानं मला जरा बरं वाटतं.... माणूस कितीही रागात , तणावात असला तरी थोड्याशा हसण्याने किती फरक पडतो नाही!.....
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

20 Jan 2022 - 11:03 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान.
पुभाप्र

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jan 2022 - 2:15 pm | ज्ञानोबाचे पैजार

काहीच झाले नाही या भागात,
टिव्हीवरच्या मालिकांचे रविवार स्पेशल विशेष भाग असतात तसा वाटला हा भाग.
विजुभाउ, गोष्ट भराभर पुढे सरकवा राव, उत्सुकता फारच ताणली गेली आहे.
पैजारबुवा,

सौंदाळा's picture

20 Jan 2022 - 2:48 pm | सौंदाळा

हेच म्हणतो

विजुभाऊ's picture

20 Jan 2022 - 2:40 pm | विजुभाऊ


काहीच झाले नाही या भागात,


खरे आहे. पण काही घटना घडण्यासाठी पार्श्वभूमी तयार करावी लागते.
तुम्ही उत्सूकतेने लेखाची वाट पहाता. वाचता, प्रतिसाद देता ..... हे माझ्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन आहे.
हमी देतो. तुमची उत्सूकता कायम राहील असे लिखाण येईल.

नगरी's picture

20 Jan 2022 - 3:03 pm | नगरी

20 कधी येईल?

विजुभाऊ's picture

20 Jan 2022 - 5:16 pm | विजुभाऊ

१९ च्या नंतर
:)

विजुभाऊ's picture

26 Jan 2022 - 10:35 pm | विजुभाऊ

ध्रांगध्रा - २० http://misalpav.com/node/49829

शित्रेउमेश's picture

21 Jan 2022 - 10:46 am | शित्रेउमेश

बापरे... काय झालय नक्कि?? पुढचे भाग येवुदेत लवकर-लवकर.... उत्सुकता जाम ताणली गेलिये....

चौथा कोनाडा's picture

21 Jan 2022 - 5:48 pm | चौथा कोनाडा

बाप रे .... शिवा.......... डोक्याला मार लागून बेशुद्ध झाला ! बाबै, अजुन काय काय घडणार आहे ? न संपणारी रोलर कॉस्टरच जणू !


दोन्ही मनगटांवर जाड सोन्याचे बंद.माझी नजर त्याच्या चेहेर्‍याकडे जाते.... पूर्वी चांदोबा मासिकात असायचा तसा .... अगदी नीट सांगायचेच झाले तर ... पूर्वी हवाबाण हरडे च्या जहिरातीत एक अक्कडबाज मिशावाला माणूस दिसायचा ना! अगदी तसा चेहरा. क्षणभर हसूच आहे. पण डोळ्याकडे लक्ष्य जाताच माझे हसू मावळते. मोठाले गोल डोळे, खोबणेतीन कधिही बाहेर येतील असे वाटणारे. त्यामुळे की कसे पण स्पष्ट जाणवण्याइतका रागीट भाव.
"ए ऊठ जागा हो" त्याच्या आवाजाने एखादा तिथल्यातिथे घेरी येऊन पडेल इतकी जरब आहे आवाजात. माझाही थरकाप उडालाय.तोंडातून शब्द फुटत नाहिय्ये. ....कुठे बरं पाहिलंय याला?....


जबरदस्त वर्णन !

दिवसेंदिवस वाढतच चाललीय, उत्कंठा !
|| पु भा प्र ||

विजुभाऊ's picture

22 Jan 2022 - 6:45 am | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा - १६ http://misalpav.com/node/49814