मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8
________________________________________________________________________
आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस ।
विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥
पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी।
चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी ।
आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*।
ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥
लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*।
मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या।
घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या।
निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती० ॥
रसातळाला जाई हळुहळु अर्थव्यवस्थाही ।
आयटीवाले आम्ही सारे शेयर मार्केट हो पाही ॥
घसरले शेयर पाहुनी संधीचा लाभही घेई।
आता पोर्टफोलिओ पाहुनी मनाला आनंद होई ॥ आरती० ॥
लॉकडाऊन सैलावला , लोकं बाहेरी पडती।
नियमांचा भंग म्हणुनी पोलीस पावत्या फाडती ।
आर.टी.ओ. चौकाचौकामध्ये चिरीमिरी छापती।
तू परवडला पण ह्या लोकांची आम्हां वाटे भीती ॥ आरती० ॥
दुसरा अवतार भयानक डेल्टा झालासी।
माणसे मरती टपटप जैसी किडा मुंगी माशी ।
तयामध्येही येई ऊत ह्या राजकारणासी।
थोडी सद्बुद्धी देऊनी, टुचुक* वाढवसी॥ आरती० ॥
वर्कफ्रॉमहोमीं घरी बसोनी चिंतन म्यां केले।
बुडले अवघे जग जरी अथवा रसातळा गेले ।
हर्षमहर्षभयोद्वेगैर्मुक्त* मन आपसुकची झाले।
अलिप्तपणाचे भोगु आता निजसुख हे अपुले ॥ आरती० ॥
ओमायक्रॉनरुपी तुझा नवीन अवतार आला।
लसवंत झाले लोकं, न घाबरती तुजला।
होईल ते होवो आता, कोव्हिड गर्दभगाडीत* गेला।
पशा म्हणे आम्हा मर्फी नियम* समजला ॥ आरती० ॥
__/\__
===================================================================
अवघड शब्दांचे अर्थ :
* थायलंडची वारी : ह्यावर मिपावर प्रवासवर्णन लिहिण्याचा विचार होता पण तो मोह "फॉरऑब्व्हियसरिझन्स" टाळाण्यात आलेला आहे.
* आम्ही वाजविल्या थाळ्या : जन्ता कर्फ्युच्या रम्य आठवणी https://youtu.be/pD-uJd8EN7w
* सागरगोट्या : हा खेळ काळाच्या ओघात लुप्तप्राय होत चालला होता, वर्कफ्रॉमहोम मुळे ह्या खेळाचे पुनरुज्जीवन करायची संधी मिळाली. तरी हौशी जिज्ञासु रसिकांनी येथील व्हिडीओ पहावा : https://youtu.be/Wbz-k-54RVY
#काढा_की
* टुचुक : म्हणजे वॅक्सीनेशन. हा शब्द वाचकांना बाळबुध्दी समजणार्या वृत्तपत्रांचा आविष्कार !
* हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो : संदर्भ भगवद्गीता अध्याय १२वा श्लोक १५वा.
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥
तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६
* गर्दभ गाडीत : म्हणजे गाढवाच्या गाडीत
* मर्फी नियम : Anything that can go wrong will go wrong.
===================================================================
प्रतिक्रिया
30 Dec 2021 - 10:47 am | गुल्लू दादा
आवडले. धन्यवाद.
30 Dec 2021 - 11:21 am | नि३सोलपुरकर
मस्त एकदम .
निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या .. हे भारी.
30 Dec 2021 - 11:55 am | पाषाणभेद
जय कोरोना देवा!
पुढल्या अभ्यासक्रमात या पाठासोबत ही आरती लावण्याचे पत्रक पुणे शिक्षण मंडळाकडून प्राप्त होणेचा अध्यादेश अवगत होत आहे.
30 Dec 2021 - 12:02 pm | Bhakti
जबरी!
हा हा.
30 Dec 2021 - 12:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
ह्या ह्या ह्या ह्या.....
या कोव्हिड देवाला एखादा बोकड अर्पण केला तर त्याच्या जाचातुन आपली सुटका होईल का?
पैजरबुवा,
30 Dec 2021 - 12:36 pm | कर्नलतपस्वी
तुमच्या कवीता लई भारी आसतात. मनाला कधी गुदगुल्या करतात तर कधी टोचतात पण काहीतरी संदेश जरूर देतात.
करोना करोना
लागला जगताचे पाठी
कोंदाटली सारी गावं
अवघे घरा भिंती पाठी
करोना करोना
नाही उतारे मंतर
रावा घरामंदी सारे
तवा भेटाले नंतर
करोना करोना
जीव आला मेटाकुटी
जन अंतरले एकमेका
दुरावल्या गाठीभेटी
कुणी झोपला खाटेवर
कुणी पोचला घाटावर
करोना करोना
घ्या रे हातामंदी हात
द्यारे बुडत्याला साथ
करोना करोना
लागल्या आवघ्याले भुका
द्यारे घासतला घास
करोना करोना
कुणाच्या तोंडाला पदर
कुणा नशिबी चादर
करोना करोना
साद घाली माणुसकीला
आली नाथांची आठवू
नका गंगा गोदामाई भेटवू
म्हणे आतला विश्वंभर .
करोना करोना
पहीली लाट जगावर स्वार होती तेव्हां बहिणाबाईंच्या कवीता वाचत होतो. त्यातूनच स्फुर्ती मीळाली.
30 Dec 2021 - 12:37 pm | मूकवाचक
:) :) :)
30 Dec 2021 - 4:36 pm | नि३सोलपुरकर
कर्नल साब, कडक स॓ल्युट .
करोना करोना
जीव आला मेटाकुटी
जन अंतरले एकमेका
दुरावल्या गाठीभेटी
कुणी झोपला खाटेवर
कुणी पोचला घाटावर
करोना करोना
घ्या रे हातामंदी हात
द्यारे बुडत्याला साथ .
___/\__.
30 Dec 2021 - 5:28 pm | श्रीगणेशा
छान जमली आहे आरती! :-)
आता हा तिसरा अवतार (ओमायक्रोन) तरी शेवटचा असावा ही अपेक्षा.
कर्नल साहेबांची कोवी (कोरोना ओवी) ही आवडली!!
30 Dec 2021 - 7:03 pm | Trump
अभंगामध्ये "तुका म्हणे" तसे ट्रंप म्हणे असे हवे होते.