असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे
माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग
काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग
किती द्वाड तो धावतो घरात
आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग
काय काय मागतो खायला प्यायला
लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया
रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर
केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया
माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे
- पाषाणभेद
२९/१२/२०२१
प्रतिक्रिया
29 Dec 2021 - 6:56 pm | प्राची अश्विनी
छान आहे. पाळणा म्हणूनही गाता येईल.
29 Dec 2021 - 8:12 pm | चित्रगुप्त
29 Dec 2021 - 9:31 pm | कर्नलतपस्वी
नात म्हणजे अप्रतिम भेट
आली देवा कडून थेट
नात म्हणजे दुधावरची साय
आजोबा ची दुसरी माय........
अनुभवल्या बिगर कळत नाय......
29 Dec 2021 - 9:58 pm | प्रसाद गोडबोले
वाह मस्त !
अशा कविता वाचायला मजा येते . आजकाल फार दुर्मिळ झाले आहे असले सुंदर लेखन!
बाकी ही कविता लिहिताना आपल्या डोक्यात काही विशिष्ठ चाल होती का ? त्याची एखादी लिन्क असेल तर पाठवा , चालीत वाचायला अजुन मजा येईल !!
29 Dec 2021 - 11:14 pm | पाषाणभेद
परवा सकाळी जाग येण्याच्या आधी पहिली ओळ सुचली, अन काल खर्डा लिहीला, आज पूर्ण केली. चाल वगैरेची लिंक नाही हो. आपसूक सुचत जाते. तरीही मिटरमधे गायला काही शब्द पुढे मागे करावे लागतात, मी ते लिहीले नाही.
29 Dec 2021 - 11:25 pm | अमरेंद्र बाहुबली
आवडली