भारतीय संदर्भ चौकटीची आवश्यकता

हर्षल वैद्य's picture
हर्षल वैद्य in जनातलं, मनातलं
8 Dec 2021 - 4:26 pm

भारतीय समाजातील वाढते घटस्फोटांचे प्रमाण आणि भाकड जनावरांच्या पालनपोषणाच्या जबाबदारीचे प्रश्न यांत काही परस्परसंबंध आहे काय असे विचारले तर साहजिकच नकारात्मक उत्तर येईल. पहिला विषय हा मुख्यतः कौटुंबिक व सामाजिक व्यवहारांविषयीचा आहे. तर दुसरा जरी काही प्रमाणात भावनिक आणि सांस्कृतिक असला तरी त्यात प्रमुख अंग हे आर्थिक स्वरूपाचे आहे. या दोन विषयांत सकृतदर्शनी तरी काहीही सामायिक दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही विषय, त्यांचे आनुषंगिक प्रश्न, ते सोडवण्याच्या पद्धती आणि त्यातून मिळणारी उत्तरे हे परस्परांपासून अत्यंत भिन्न असतील असा कोणी निष्कर्ष काढल्यास ते चूक म्हणता येणार नाही. मात्र त्याहून खोलात गेल्यास आपण असे म्हणू शकू की या दोन्ही विषयांतील एक सामायिक बाब म्हणजे दोन्हीकडे परस्परांशी मेळ न खाणाऱ्या अशा विचारधारांच्या संघर्षातून हे प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्या दोन्ही विषयांना कित्येक पदर असून त्या सर्वांची व्यवस्थित सांगड घातल्याशिवाय त्यांतील समस्यांचे सुयोग्य उत्तर मिळू शकणार नाही.

स्वाभाविकपणे इथे हा प्रश्न उद्भवतो की हे प्रश्न किंवा तसेच इतर कोणतेही बहुआयामी प्रश्न सोडवण्यासाठीची आधारभूत तत्त्वप्रणाली कोणती? अशा कोणत्याही तत्त्वप्रणालीची चर्चा करण्यापूर्वी तिच्या निर्माणास आवश्यक अशा घटकांचा विचार करायला हवा. अशा सर्व विषयांतील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यास काही संदर्भ बिंदू आवश्यक आहेत. असे संदर्भ बिंदू आपल्या एकंदरीत जीवन व्यवहारातील मूल्ये, आपली सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण तसेच समाजव्यवहारांवर प्रभाव टाकणारे वैचारिक प्रवाह यांतून निश्चित होतात. हे संदर्भ बिंदू मिळून एक सामाईक संदर्भ चौकट निर्माण करतात, जिच्या संदर्भाच्या सापेक्ष आपले बहुतांश निर्णय आणि धारणा तोलल्या जातात. अशा संदर्भ चौकटीच्या पातळीवर आपल्याला उपरोल्लेखित परस्परभिन्न विषयांतील एकत्व जाणवून येते.

संदर्भ चौकटीचे नेमके कार्य काय हे समजून घेण्यासाठी आपण एकेक करून या दोन्ही विषयांच्या अधिक खोलात जाऊन पाहू. घटस्फोट हा तसा भारतात नकारात्मकतेने पाहिला जाणारा विषय. घटस्फोटाची पायरी शेवटची असे सामान्यतः मानले जाते आणि तो टाळण्याचे सर्व उपाय सर्वतोपरी केले जातात. जर घटस्फोटाची घटना नात्यात घडली तर त्याची चर्चा टाळण्यात येते. घटस्फोटीत व्यक्ती या आत्यंतिक तिरस्कार किंवा आत्यंतिक करुणा अशा भावनांनी पाहिल्या जातात. सामान्यतः समाजाच्या विषयी चर्चा करताना घटस्फोटांचे प्रमाण हे एक नकारात्मक परिमाण असते आणि हे प्रमाण कमी कसे करावे हाच चर्चेचा सूर असतो. याउलट व्यक्तिस्वातंत्र्याचे समर्थक विवाहाच्या बंधनात कुचंबत राहण्यापेक्षा घटस्फोटाचा मार्ग चोखाळलेला बरा असे प्रतिपादन करतात. दोन्ही बाजूंचे मत पूर्णतः चुकीचे आहे असे म्हणता येत नाही. मध्यममार्ग काढताना कौटुंबिक स्थैर्य आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या दोन्ही टोकांना पुरेसे महत्त्व द्यायला हवे. प्रश्न असा निर्माण होतो की असा मध्यममार्ग काढताना आधारभूत तत्त्वे काय धरावी. स्वाभाविकपणे आपल्या वैचारिक बैठकीनुसार निघणारे उत्तर भिन्न राहते. उदाहरणार्थ विवाह हा दोन व्यक्तींमधला संबंध आहे असे मानल्यास त्यातील एकास हे संबंध दुःखप्रद असल्यास हे संबंध संपवणेच योग्य ठरते.

भाकड जनावरांचे पालनपोषण हा अनेकांसाठी भावनिक विषय असतो. इंटरनेटवरील चर्चेत हिरीरीने गोवंश कसा हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा मानला गेला आहे आणि कसे त्याचे संवर्धन झालेच पाहिजे असे मांडणारे लोक असतात. मात्र जे प्रत्यक्ष गोपालन व्यवसायात असतात त्यांच्यासाठी हा विषय भावनेइतकाच अर्थकारणाशी जोडलेला असतो. स्वाभाविकच गाय भाकड झाल्यावर नेमके तिच्याविषयी काय करावे याविषयी मतामतांतरे दिसतात. जुन्या काळचे, पशुधनास कुटुंबाचा भागच मानणारे लोक भाकड जनावर विकायला राजी नसतात. मात्र पोषणाचा वाढता खर्च पाहता बरेचदा असा निर्णय घ्यावाच लागतो. उपयुक्ततावादी लोकांसाठी मात्र ही वायफळ चर्चा असून त्यांना भाकड जनावर कसायास विकणे हेच योग्य वाटते. थोडक्यात इथेही तुमच्या वैचारिक धारणा काय ह्याचा तुम्ही कोणता पर्याय निवडाल हे ठरवताना प्रभाव असतो.

अशा प्रकारे दोन अत्यंत भिन्न भासणाऱ्या प्रश्नांचा विचार करताना आपण एकाच मूळ प्रश्नापाशी येऊन पोचतो. तो म्हणजे समाजाच्या आचारविचारांचे नियमन करण्यासाठी आधारभूत तत्त्वे कोणती? ही आधारभूत तत्त्वे कशी निश्चित करावी? त्यांचा परस्परांशी संबंध कोणता? आज आपण खोलात जाऊन पाहिले तर आपल्या दैनंदिन वर्तनात आपण वेगवेगळ्या, कधीकधी परस्परविरोधी अशा तत्त्वांचे अनुसरण करत असतो. उदाहरणार्थ आजच्या जागतिक व्यवस्थेनुसार चालणाऱ्या कार्यालयांच्या अवकाशातील आपले वर्तन आणि घरी आल्यावर कौटुंबिक अवकाशातील आपले वर्तन हे दोन्ही बरेचदा भिन्न तत्त्वांनुसार चाललेले असते. यातील अंतर्विरोध कधी आपणांस जाणवतही नाही तर कधी तो अत्यंत तीव्र अशा मानसिक विकारांचे कारण ठरतो. थोडक्यात या प्रस्तावनेचा निष्कर्ष हा की आपल्या व्यावहारिक मूल्यांची संदर्भ चौकट नेमकी कोणती हा जरी पदोपदी पडणारा प्रश्न नसला तरी कसोटीच्या प्रसंगी जेव्हा मुळापासून पुन्हा सर्व तपासायची वेळ येते तेव्हा या प्रश्नाला सामोरे जावेच लागते.

भारतीय समाजाची प्रचलित संदर्भ चौकट

समाजाची सर्वमान्य संदर्भ चौकट ही समाजाच्या परंपरा, इतिहास, सांस्कृतिक मूल्ये, भल्याबुऱ्याच्या जाणिवा यातून ठरत असते. समाजाच्या अर्वाचीन (लोकस्मरणातील) इतिहासात होऊन गेलेल्या महापुरुषांच्या समाज व्यवहारांतील योग्यायोग्यतेच्या धारणा संदर्भ चौकटीच्या रचनेवर प्रभाव टाकतात. भारतीय समाजाचा विचार केल्यास ह्या भिन्नभिन्न घटकांमध्ये आजच्या घडीला अजिबात एकसूत्रता नाही. आपल्या सनातन संस्कृतीशी जोडली गेलेली एक विचारसरणी आणि पाश्चात्य समाजाच्या भौतिक प्रगतीमुळे भारावून गेल्याने त्यांच्या वैचारिक पृष्ठभूमीला श्रेष्ठ समजणारी आणि त्याबरहुकूम आपली समाजरचना बदलू इच्छिणारी दुसरी विचारसरणी या दोन्ही व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कित्येक उपप्रणाली भारताची संदर्भ चौकट आपल्या दिशेला वळवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. भारतीय समाजात उद्भवणारे वैचारिक कलह हे बहुतांश वेळा ह्या भिन्न विचारधारांचे संघर्ष आणि भारतीय जनमानसावर संपूर्ण आधिपत्य स्थापण्याचा त्यांचा प्रयत्न यातून घडतात असे सखोल विचार केल्यास आपणांस दिसून येते.

हे सर्व पाहता जो स्वाभाविक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे भारतासाठी योग्य संदर्भ चौकट कोणती? या प्रश्नाच्या उत्तराचा धांडोळा घेताना सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की कोणतीही संदर्भ चौकट ही समाजाच्या आचरणातून स्वाभाविकपणे निर्माण व्हावयास हवी. तशी ती नसेल तर समाजाचे आचरण त्या दिशेस वळवणे हे अत्यंत कष्टप्रद व कित्येकदा अमानुष कृत्यांस प्रवृत्त करणारे ठरू शकते. इतिहासकार विल दुरांट म्हणतो, “शेवटी माणसाच्या स्वभावात परिवर्तन न घडवताच संस्थात्मक बदल घडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर माणसांचे ते न बदललेले मानस पूर्वीच्या निरुपयोगी कालबाह्य संस्थांचे पुनरुज्जीवन करते”. त्यामुळे भारतीय समाजासाठी योग्य संदर्भ चौकट शोधणे ह्यासाठी भारतीय समाजाच्या मानसाचे नेमके आकलन होणे महत्त्वाचे ठरते.

ब्रिटिशकालीन भारतीय इतिहासाचे एक प्रमुख इतिहासकार आणि तत्त्वचिंतक धर्मपाल यांनी मांडलेले त्यांच्या ‘भारतीय चित्त मानस व काळ’ या प्रबंधातील विचार ह्या प्रश्नाचा सखोल ऊहापोह करतात. धर्मपाल सुरुवातीसच आपणांस सांगतात की भारतीय समाजमानस ही काही कोरी पाटी नव्हे. शतकानुशतकांचा इतिहास या भूमीवर निवास करणाऱ्या समाजाच्या एकात्मिक मानसावर खोल ठसे उमटवून गेलेला आहे. काळाच्या चाळणीतून बघताना त्यातील काही बिंदू ज्यांचे महत्त्व समाजास अधिक वाटले ते हजारो वर्षांनंतरही टिकून राहिले आहेत. भारतीय समाजासाठीच्या संदर्भ चौकटीचा विचार करताना ह्याचा विचार करणे अपरिहार्य ठरते.

धर्मपाल असे नमूद करतात की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे नेतृत्व भारतास लाभले ते ह्या विचाराशी अजिबातच सहमत नव्हते. विशेषतः इंग्रजी शिक्षणातून तयार झालेल्या पिढीस भारताच्या प्राचीन इतिहासाची विशेष माहितीही नव्हती आणि त्याविषयी फारशी आस्थाही नव्हती. त्यामुळे भारतीय समाजास त्याच्या आवश्यकतांनुसार विवक्षित संदर्भ चौकटीची आवश्यकता आहे हे त्यांच्या ध्यानात आले नाही. ह्याच काळात युरोपीय समाजाच्या भौतिक प्रगतीचे मूळ हे त्यांच्या वैचारिक संचितात आहे असा समज सर्वमान्य झाला होता. त्यामुळे भारतीय मूल्यांवर आधारित कोणत्याही संदर्भ चौकटीच्या पुनःप्रस्थापनेचा प्रयत्न स्वातंत्र्योत्तर काळात झाला नाही. महात्मा गांधी हिंद स्वराज या त्यांच्या पुस्तकात म्हणतात, “आम्हाला इंग्रजी राज्य तर हवे पण इंग्रज नकोत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपणांस हिंदुस्थानास इंग्रज बनवायचे आहे. आणि हिंदुस्थान इंग्रज झाल्यास तो हिंदुस्थान म्हणवला जाणार नाही.” मात्र प्रत्यक्षात ह्या दिशेने कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक राकेश सिन्हा ह्याच्या अधिक खोलात जाऊन भारतीय संदर्भ चौकटीच्या निर्माणाचे कोणतेही प्रयत्न का झाले नाहीत याची पुढील सात कारणे देतात. १. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी विभिन्न पक्षांपैकी कित्येकांची मूळ विचारसरणी ही पाश्चात्य उगमाची होती. २. वसाहतवादी प्रभावाखाली आपल्या मूळ सहिष्णुतेच्या तत्त्वाची जागा स्पर्धेच्या तत्त्वाने घेतली. याची पुरेशी दखल विचारवंतांनी घेतली नाही. ३. शिक्षण क्षेत्रात संस्कृतीस अनुकूल असे मूलगामी बदल झाले नाहीत. ४. हिंदू तत्त्वचिंतनास त्यातील कर्मकांडांशी समरूप मानून त्यास हीन लेखले गेले. यामुळे ‘आम्ही कोण?’ या प्रश्नावर संभ्रम निर्माण होऊन भारतीयत्वाची परिभाषा ही केवळ घटनात्मक, राजकीय आणि भौगोलिक होऊन राहिली. ५. भारतातील उच्चभ्रू वर्गाने इंग्रज श्रेष्ठत्वाची भावना कायम ठेवण्याचा प्रयास केला. ६. वसाहतवादी विचारांचा तथ्याधारित आणि तर्कशुद्ध प्रतिवाद झाला नाही. ७. देशाचा राजकीय, धोरणात्मक, प्रशासनिक सांगाडा वसाहतकालीनच राहिला.

आजच्या समाजपरिस्थितीशी या सर्व विवेचनाची जर आपण सांगड घातली तर आपणांस असे जाणवेल की आज आपली परिस्थिती ही दोन नावांवर पाय ठेवलेल्या प्रवाशासारखी झाली आहे. एक नाव आपणांस अधिकाधिक पाश्चात्य होण्याच्या दिशेने ओढून नेते आहे तर दुसरा पाय पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या संस्कारांशी घट्ट बांधला गेलेला असा वेगळ्याच प्रवाहाच्या ओढीने चालला आहे. ह्या परिस्थितीवर योग्य उत्तर वेळीच शोधले गेले नाही तर कदाचित संपूर्ण समाजपुरुष दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात जागतिक मानवी समाजात अस्तित्वात असलेल्या आणि नव्याने उगम पावणाऱ्या विविध वैचारिक प्रवाहांचा प्रभाव पडतो. यामुळे एकप्रकारे अधिकच गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आज जगापुढे उभ्या ठाकलेल्या करोनाच्या संकटाने हे संपूर्ण जग भासमान रित्या कितीही जवळ आलेले भासले तरी प्रत्यक्ष व्यवहारात अधिकच दूर गेले आहे याचा प्रत्यय येतो आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या संचितावर घट्टपणे उभी असलेली भारतीय समाजाच्या चित्त व मानसाशी नाते सांगणारी संदर्भ चौकट निर्माण करणे हे आवश्यक झाले आहे.

नवीन संदर्भ चौकटीच्या दिशेने

दीडशे वर्षांची गुलामी आणि स्वातंत्र्यानंतर चालू ठेवलेल्या बौद्धिक पारतंत्र्याच्या वसाहतवादी कारभारामुळे नवीन संदर्भ चौकटीची आवश्यकता जरी लक्षात आली तरी त्या प्रयत्नांची सुरुवात कोठून करायची हा मोठा प्रश्न उभा राहतो. संदर्भ चौकटीच्या निर्माणाचा मार्ग शोधण्यापूर्वी अशा चौकटीत कोणते गुणधर्म हवेत त्याचा विचार आवश्यक ठरतो. गंतव्याची निश्चिती केल्याशिवाय मार्गाचा विचार नेमकेपणाने करणे कठीण आहे. आपणांस एक अशी संदर्भ चौकट हवी आहे जिचा मूलाधार आमच्या सांस्कृतिक संचितात असेल. प्रचलित पाश्चात्य संदर्भ चौकटीचा इहवादी दृष्टिकोण सोडून देऊन भारताच्या आध्यात्मिक प्रवृत्तीशी साधर्म्य सांगणारी संदर्भ चौकटच इथल्या समाजासाठी योग्य ठरेल. विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, “लक्षात ठेवा, जर तुम्ही आध्यात्मिकतेचा त्याग करून पश्चिमी भौतिकवादी सभ्यतेमागे पळाल तर तीन पिढ्यांच्या आत तुम्ही एक मृत जाती व्हाल. यातून राष्ट्राच्या पाठीचा कणा तुटेल, त्याच्या पायाचा दगड खचेल आणि फलस्वरूप सर्वांगीण विनाश ओढवेल”.

दत्तोपंत ठेंगडी त्यांच्या ‘तिसऱ्या पर्यायाकडे’ या पुस्तकात भारतीय संदर्भ चौकट निश्चित करण्यास आधारभूत अशा नऊ प्रमुख धारणांचा उल्लेख करतात . १. आधुनिकीकरण म्हणजे पश्चिमीकरण नव्हे. २. प्रत्येक समाजाची ऐतिहासिक विकास प्रक्रिया ही भिन्न आहे, युरोपीय समाजाच्या विकास प्रक्रियेला इतर समाजांसाठी प्रारूप (model) म्हणून धरणे चुकीचे आहे. ३. तिसऱ्या जगातील देशांची सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत युरोपीय देशांशी किंचितही समानता नाही. ४. आपल्या सांस्कृतिक संकल्पना परकीय भाषांच्या पारिभाषिक शब्दावलीत नीट मांडता येत नाहीत. ५. युरोपीय राष्ट्रे जगाच्या इतिहासात तुलनेने नवीन असल्याने त्यांच्या अनुभवातून भारतासारख्या प्राचीन राष्ट्रांनी काही शिकावे हे फारसे ग्राह्य धरता येत नाही. ६. भारताच्या राष्ट्रीय आपदांचा परिहार हिंदू संस्कृतीच्या आधारे पूर्णपणे करणे शक्य आहे. ७. सनातन धर्माच्या आधुनिक स्वरूपात भारताच्या सर्व आर्थिक व सामाजिक व्यवस्था विकसित करण्याची आणि त्याद्वारे आवश्यकतांचा निर्वाह करण्याची क्षमता आहे. ८. मात्र केवळ एखादी संकल्पना पश्चिमेकडून आली आहे म्हणून ती त्याज्य मानणे योग्य नव्हे. पश्चिमेत विकसित झालेल्या विविध ज्ञानशाखांचा सुयोग्य वापर करून घ्यायला हवा. ९. भारतीय भाषा कोणत्याही विषयातील ज्ञान संवहनास सक्षम आहेत.

वरील उद्धरणे आणि विवेचन यातून असा विश्वास प्रकट होतो की भारताची सनातन संस्कृती ही सर्व प्रकारच्या समस्यांच्या आकलनासाठी परिपूर्ण संदर्भ चौकट देण्यास सक्षम आहे. मात्र ह्या सनातन मूल्यांची कालसुसंगत मांडणी कशी करायची आणि त्यातून अपेक्षित संदर्भ चौकट नेमकी कशी निर्माण करायची याचा नेमका अर्थबोध होत नाही. धर्मपाल आपल्याला या प्रश्नावर दोन मार्ग सुचवतात. पहिला म्हणजे एखादा विशिष्ट कालखंड निवडून त्या काळातील सर्व प्रकारच्या समाजव्यवहारांचा अभ्यास. ह्या मार्गाचा वापर त्यांनी पूर्वब्रिटिशकाल (एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध) निवडून केला होता. मात्र त्यांच्या मते हा मार्ग विशेष भरवशाचा नाही तसेच अतिशय दीर्घ असा आहे. त्यामुळे आपल्या समोरील तातडीच्या प्रश्नांसाठी तो फारसा योग्य नाही. मात्र हा मार्ग निवडायचाच, तर तो अर्वाचीन काळाच्या सापेक्ष धरावा असे ते सुचवतात. धर्मपालांच्या मते दुसरा मार्ग म्हणजे एखादा विषय धरून काळाच्या ओघात त्यावर निर्माण झालेल्या विविध भाषांतील भारतीय साहित्याचा अभ्यास. हा मार्ग अधिक खात्रीशीर आणि समाजाच्या काळानुरूप बदलत जाणाऱ्या धारणांना योग्य तो न्याय देणारा असेल असे प्रतिपादन धर्मपाल करतात.

धर्मपाल पुढे असे सांगतात की ह्या विषयात पुढे मार्गक्रमणा करण्यासाठी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भारतीय समाजाच्या ज्ञानपरंपरेनुसार एखाद्या विषयाच्या क्रमविकासाची पद्धती कशी होती. भारतीय पद्धतीनुसार एखाद्या विषयात काही नवीन चिंतन मांडायचे असल्यास ते चर्चा – संवाद – प्रश्नोत्तरे या स्वरूपात मांडले जात असे. वादचर्चा, पूर्वपक्ष – उत्तरपक्ष मांडणी, विद्वतसभा हे आपले नवीन विचार समाजात रुजवण्याचे मार्ग होते. या पद्धतीत आपल्या चित्त प्रकृतीशी न जुळणारे विचार स्वाभाविक रित्या नाकारले जात असत. आपण आपल्या प्रमुख ग्रंथांकडे पाहिल्यास असे दिसते की अनेक महत्त्वाचे तत्त्वविचार हे संवाद – चर्चा स्वरूपात मांडलेले आहेत. भगवद्गीता, युधिष्ठिर – यक्ष संवाद, यम – नचिकेता संवाद यासारखी अनेक उदाहरणे आपणांस आपल्या ग्रंथांत आढळतात. तोच वारसा पुढे चालवून आज भारतीय संदर्भ चौकटीच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणणे योग्य ठरेल. समाजापुढे ठाकलेल्या सर्व छोट्यामोठ्या प्रश्नांवर शक्य तितक्या सर्व अंगांनी चर्चा घडवून त्यातून मिळणारा प्रत्येक संदर्भबिंदू तावूनसुलाखून घेतला पाहिजे. जिथे जिथे मतभेद उत्पन्न होतील तिथे बेधडक प्रश्न उपस्थित करायला हवेत. विद्वानांनी आणि सामान्यांनी सुद्धा अशा चर्चा संवादांत भाग घेतला पाहिजे.

मात्र अशा सर्व कार्यक्रमांचा उद्देश जर एखादी तपशीलवार संदर्भ चौकट बनवणे हा असेल तर ते आजच्या घडीला शक्य नाही. प्राथमिक लक्ष्य एक ढोबळ ढाचा उभा करण्याचे असायला हवे. धर्मपालांच्या मते असा ढाचा उभारणे ही ह्या भगीरथ प्रयत्नातील पहिली पायरी आहे. असा ढोबळ ढाचा सर्वमान्य असेल असेही नाही. मात्र विविध समाजघटकांकडून त्यावर साधकबाधक चर्चा घडवून त्यात हळूहळू सुधारणा करता येतील. भारतीय समाजाच्या चित्त व मानसाचे आपले आकलन जसजसे वाढत जाईल तसतसा ह्या संदर्भ चौकटीस नेमका आकार येत जाईल. मात्र हे कार्य कठीण असल्याकारणाने आरंभातच सोडून न देता नेटाने पुढे न्यावे लागेल. एका परीने हे कार्य कधीच पूर्णत्वास जाणार नाही कारण संदर्भ चौकटीत सतत कालसुसंगत बदल करावे लागतील.

भारतीय चिंतनाचे वेगळेपण

भारताच्या समाजमानसाशी सुसंगत अशा संदर्भ चौकटीची उभारणी करण्याची आवश्यकता ही प्रामुख्याने भारतीय चिंतनाच्या गुणात्मक वेगळेपणामुळे निर्माण होते. त्यामुळे हे गुणात्मक वेगळेपण नेमके कोणते ह्याचा विचार येथे अपरिहार्य होतो. भारतीय चिंतनाची ठळक वैशिष्ट्ये पाश्चात्त्य जीवनविषयक संकल्पनांशी तुलना करता पुढीलप्रमाणे जाणवतात. १. व्यक्तीचे अंतिम गंतव्य. पाश्चात्य तत्त्वज्ञान हे मानवकेन्द्रित असून त्यात व्यक्तीच्या सुखाचा विचार हा सर्वोत्तम मानला जातो. सुखप्राप्तीच्या विविध मार्गांच्या विचारातून त्यांच्याकडे भांडवलवाद, समाजवाद, आदि प्रणाली निर्माण झाल्या. आपल्याकडे मात्र व्यक्तीस संपूर्ण सृष्टिचक्राचा एक भाग मानून परमेश्वराच्या प्राप्तीचे अथवा मोक्ष वा निर्वाणाचे अंतिम ध्येय ठेवले आहे. त्यामुळे ऐहिक सुखोपभोगापेक्षा शाश्वत आनंद अधिक महत्त्वाचा मानला गेला आहे. २. भौतिक व पारमार्थिक यांची सांगड. भारतीय संस्कृती केवळ पारलौकिकाचाच विचार करते हा एक सामान्य गैरसमज आहे. वस्तुतः भारतीय साहित्यात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्याकरण, वैद्यक, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र याविषयी विपुल लेखन उपलब्ध आहे. मात्र ह्या शास्त्रशाखांकडे पाहण्याचा भारतीय दृष्टिकोण भिन्न आहे. आपण चतुष्टय पुरुषार्थ संकल्पना मांडून त्यात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चौघांनाही स्थान दिले आहे. मात्र धर्म आणि मोक्ष यांनी अर्थ व कामाचे नियमन करावे असे आपली संस्कृती सांगते. त्यामुळे ऐहिक व्यवहार आणि पारलौकिक व्यवहार यांत दूर अंतर राखणारी सेक्युलरिझम सारखी संकल्पना आपल्या चित्तप्रवृत्तीशी विसंगत ठरते. आपला विचार हा एकात्मिक विकासाचा आहे. ३. चक्राकार कालसंकल्पना. चार युगे, महायुग इत्यादी कालगणनेच्या संकल्पनांमुळे भारतीय समाज काळाचा मोठा आवाका समजून घेतो. त्याची चक्राकार गती गृहीत धरली जाते. मानवी अस्तित्वाचे नगण्यत्व स्वाभाविकपणे स्पष्ट होऊन समाज परिस्थितीचीसुद्धा चक्राकार गती मानली जाते. काळ हा अनादि अनंत असणे हे आपल्यासाठी स्वाभाविक आहे. पाश्चात्य संकल्पनेत मात्र विश्वाला निश्चित आरंभ असून विश्वाचा क्रमविकास होत असतो. त्यामुळे मानवी समाजसुद्धा सतत चढत्या श्रेणीने अधिकाधिक भौतिक सुखांकडे जाणे हे त्यांना स्वाभाविक वाटू शकते. अशा चढत्या श्रेणीतील सुखाची संकल्पना चिरस्थायी (sustainable) असेल काय ह्या प्रश्नाचा विचार त्यांच्याकडे फारसा होत नाही. ४. वसुधैव कुटुंबकम्. भारतीय राष्ट्रसंकल्पना ही मूलतः संकुचित प्रवृत्तीची नाही. सर्व जीवांमध्ये एकाच परब्रह्माचा वास असल्याने सर्व दृश्यमान भिन्नता ह्या केवळ वरवरच्या आहेत असे आपण मानतो. परमत सहिष्णुता हे त्यामुळे भारतीय संस्कृतीतील स्वाभाविक मूल्य आहे. सर्वच जण एका विशाल कुटुंबाचा भाग असल्याने अधिकारांच्या चळवळीचे स्थान उरत नाही. धर्म हाच समाजव्यवहारातील सर्व बाबींचा मूलभूत संदर्भबिंदू बनतो. ह्या व तत्सम मानवी जीवनाविषयक संकल्पनांमध्ये भारतीय व पाश्चात्त्य विचारांत भिन्नत्व दिसून येते.

काळ अनुकूल होतोय

२०१९ च्या अंतापासून जगाला वेढलेल्या करोना समस्येमुळे समाजजीवनाच्या सर्वच आयामांच्या विषयी नव्याने मूलगामी स्वरूपाचा विचार करायची आवश्यकता जाणवते आहे. अमर्याद सुखोपभोग हेच अंतिम ध्येय मानून त्यासाठीचे साधन म्हणजे अमर्याद संपत्तीचे निर्माण हाच ध्यास झालेल्या समाजाला आपले खरे गंतव्य कोणते ह्याचा विचार करणे भाग पडले आहे. टोलस्टॉयच्या कथेतल्या उर फुटेस्तोवर धावणाऱ्या माणसासारखी आपली गत झाली आहे काय असे वाटू लागले आहे. याच वेळी निसर्गानुकूल जीवनपद्धती, शाश्वत विकास यासारख्या संकल्पना जोर धरत आहेत. मात्र या संकल्पनांचे पूर्ण आकलन, प्रकटीकरण आणि आचरण यासाठी नव्या संदर्भ चौकटीच्या निर्माणाची आवश्यकता भासते आहे.

युरोपीय समाज जगातील अन्य समाजांसाठी आदर्शवत आहे हे केवळ त्यांच्या गेल्या दोनतीन शतकांतील भौतिक प्रगतीच्या व त्यायोगे निर्माण झालेल्या सामरिक आणि राजकीय शक्तीच्या आधारे मान्य करता येत नाही. त्यांच्या वैचारिक संचितातील अंतर्विरोध वर उल्लेख केलेल्या शाश्वत विकासासारख्या संकल्पनांना सामावून घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्यात बदलाची आवश्यकता भासते आहे हे तर सर्वविदीत आहे. मात्र आहे त्याच युरोपीय संदर्भ चौकटीत आवश्यक ते बदल घडवून काम भागेल की पूर्णपणे नव्याने विचार करावा ह्यात बुद्धिमंतांत सुद्धा संभ्रम आहे. त्यातच जगभरात स्थानिक समाजाच्या आशाआकांक्षा, सांस्कृतिक संचित, सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन स्थानिक संदर्भ चौकटी बनवणे हे त्या त्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक मानले जात आहे. अशा परिस्थितीत ह्या सर्व भिन्न भिन्न समाजांना त्यांच्या वैशिष्ट्यांसकट सामावून घेणारे एकमेव तत्त्वचिंतन हे भारतीय तत्त्वचिंतन आहे. त्यामुळे त्यावर आधारित संदर्भ चौकट उभी करणे आणि तिचे यशस्वी उपयोजन भारतीय समाजासाठी करून दाखवणे हे केवळ भारतासाठी नसून सर्व जगासाठी महत्त्वाचे बनले आहे.

हे कार्य कितीही कष्टप्राय वाटले तरी आज जग अशा संदर्भ चौकटीच्या निर्माणासाठी तयार झाले आहे. ह्या कार्यात समाजातील प्रत्येक घटकास सहभागी व्हावे लागेल. सामान्य व्यक्ती त्यांच्या स्वाभाविक वर्तनातून ह्या कार्यास आवश्यक विदा पुरवतील. समाजातील बुद्धिमंत घटकांना ह्या माहितीतून तसेच प्राचीन साहित्याच्या अध्ययनातून सर्वसमावेशक तत्त्वांचा आविष्कार करावा लागेल जी भारतीय संदर्भ चौकटीस आधारभूत ठरतील. अशा तत्त्वांचे परस्परांना सुसंगत असे एकत्रीकरण करून एक ढोबळ संदर्भ चौकट बनवता येईल. अशी संदर्भ चौकट निर्माण झाल्यावर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती त्यानुसार वर्तनाचा आग्रह धरू शकतील आणि मूल्यमापनाची व्यवस्था उभी करता येईल. आधी म्हटल्याप्रमाणे अशा संदर्भ चौकटीचा ढोबळपणा आणि त्रुटींची शक्यता यामुळे तिच्या आधारे केल्या गेलेल्या मूल्यमापनात अनेक दोष सापडतील. अशा दोषांचे निराकरण करत आपण चक्राकार पद्धतीने अधिकाधिक अचूक संदर्भ चौकट बनवू शकू. अंतिमतः आपणांस एक अशी संदर्भ चौकट प्राप्त होईल जिच्या आधारे आपण भारतीय समाजाच्या सर्व प्रश्नांसाठी आधारभूत तत्त्वे तर प्राप्त करूच पण त्याचबरोबर जागतिक समाजात सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टीनेही काही मूलभूत मान्यता सिद्ध करू शकू. एक प्रकारे हेच भारतीय वैचारिक संचिताचे सुयोग्य उपयोजन ठरेल.

(अन्य माध्यमात पूर्वप्रकाशित)

धर्मसमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अंतिमतः आपणांस एक अशी संदर्भ चौकट प्राप्त होईल जिच्या आधारे आपण भारतीय समाजाच्या सर्व प्रश्नांसाठी आधारभूत तत्त्वे तर प्राप्त करूच पण त्याचबरोबर जागतिक समाजात सौहार्द निर्माण करण्याच्या दृष्टीनेही काही मूलभूत मान्यता सिद्ध करू शकू.

... लेखाचा आशय समजला, पण हे सगळे करायचे कोणी, आणि केले तरी त्याप्रमाणे वागणार कोण, असा पश्न पडला.
सुरुवात म्हणून धागालेखकानेच अशी संदर्भ चवकट बनवून मिपावर सादर करावी, बघूया पुढे काय काय घडते.
आपल्या संत-वांङ्मयात तसेच पतंजली-योगसूत्रात अशी आधारभूत तत्वे विपुल प्रमाणात आहेत.
सध्याच्या अहोरात्र चालणार्‍या करमणुकीच्या विळख्यातून मनुष्यजात सुटली, तरच काही होऊ शकते.

चौथा कोनाडा's picture

10 Dec 2021 - 4:42 pm | चौथा कोनाडा

... लेखाचा आशय समजला,

व्वा, सर, ग्रेट आहात.......... आशय समजावा म्हणून मी प्रयत्न सुरू केले, पण लेख एवढा पसरट की शेवटी "अपने बसकी बात नहीं" म्हणत नाद सोडुन दिला !

किती पसरट आहे हा लेख ! मुद्द्यांची भरताड वाटते !

चित्रगुप्त's picture

11 Dec 2021 - 2:14 am | चित्रगुप्त

@चौथा कोनाडा: आवं कसलं ग्रेट नं कसलं काय, कैतरी चवकट का काय बनवायचं हाय आन ते लई भानगडीचं काम हाय, ह्यो आशय आमच्या टकुर्‍यात शिरला हाय बगा.

चौथा कोनाडा's picture

14 Dec 2021 - 1:19 pm | चौथा कोनाडा

चित्रगुप्त साहेब,

कैतरी चवकट का काय बनवायचं हाय आन ते लई भानगडीचं काम हाय, ह्यो आशय ......

😂

कंजूस's picture

10 Dec 2021 - 2:56 pm | कंजूस

करायच्या गोष्टी.

कर्नलतपस्वी's picture

10 Dec 2021 - 5:28 pm | कर्नलतपस्वी

लेख विषयाला धरुन आहे पण मांडणी गुतांगुतीची, मतमतांतरे समाजाचा आत्मा म्हणावे लागेल त्याशिवाय समाज परिवर्तन होणे नाही. परिवर्तन हा समाजाचा स्थायीभाव जर समजले तर मतभेद हे राहणारच आणी यानेच समाजाला लवचिकता प्रदान होते अन्यथा समाज मोडून पडेल.
बदलणाऱ्या परिस्थितीला अनुसरून मनुष्य आपल्या सामाजिक संबंधांत जाणीवपूर्वक बदल करत असल्याने सामाजिक परिवर्तन घडते . घटस्फोट हा काल अस्विकार्य होता शिक्षण प्रसार झाल्याने मत परिवर्तन होताना दिसते.
एक ढोबळ चौकट निर्माण करता येईल का तर माझ्या मते नाही कारण याला मुख्यताः मानवी मानसिकता व मुख्यत्वेकरून स्वार्थ कारणीभूत असेल. मतमतांतरे ही अवीनाशी आसल्याने ढोबळ चौकट काही अंशी निर्माण होऊ शकते पण त्याला मर्यादा असतील.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2021 - 7:08 pm | मुक्त विहारि

चालत्या बोलत्या सजीवांना, मग थे एकपेशीय असोत किंवा बहुपेशीय असोत ... चौकट हानीकारक ठरते ... (राष्ट्र पातळीवर मात्र, चौकट हवीच)

एक कविता आठवली ...

अ नावाचा अमीबा, ब ला भेटला

आणि त्या दोघांनी दोन नविन अमिबा जन्माला घातले

आता अ एकाच वेळी, आई पण आहे आणि वडील पण आहे

शिवाय बुद्धाने सांगितले की संघाला शरण जा. तेच प्रश्न सोडवतील. कुणा वारसाची, गादीची गरज नाही. म्हणजे चौकटीचा प्रश्न तेव्हाच निकालात काढलेला. काळानुरूप नवे प्रश्न आणि नव्या चौकटी लागतील. त्यासाठी त्यावेळचा संघ.

युअरोप/ अमेरिकेकडे बघण्याची गरज नाही. तिकडे ३३टक्के लग्ने फेल जातात. मग लोकांनी अगोदर एकत्र राहून ( लिव इन) उपाय करून पाहिले. तरीही फेल.

जेम्स वांड's picture

11 Dec 2021 - 10:06 am | जेम्स वांड

तिकडे ३३टक्के लग्ने फेल जातात.

हे असं अन इतकं एबसोल्युशन आणण्याचा कॉन्फिडन्स हवा राव आयुष्यात &#129315 &#129315

गामा पैलवान's picture

10 Dec 2021 - 8:28 pm | गामा पैलवान

हर्शल वैद्य,

लेख जबऱ्या आहे. जाम आवडला. वर चौथा कोनाडा यांनी लिहिल्याप्रमाणे लेखात मुद्द्यांची भरताड असू शकते. त्यांना सुव्यवस्थित रीतीने रचणं हे आव्हान आहे.

त्यासाठी तुम्ही म्हणता तशी एखादी चौकट उत्पन्न करावी लागेल. माझ्या मते धर्म या संज्ञेतून तशा चौकटीकडे अंगुलीनिर्देश होतो. जी काही चर्चा अपेक्षित आहे तिच्यात धर्मावर प्रमुख रोख ( = फोकस ) हवा. इथे धर्म म्हणजे कर्तव्य व मर्यादा यांचा सुसंगत संगम होय. धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, इस्लाम, ईसाई, वगैरे अर्थ अभिप्रेत नाही.

आ.न.,
-गा.पै.

कर्तव्य आणि मर्यादा यांचा सुसंगत संगम यावर दासबोध आणि पातंजल योगसूत्रात बक्कळ सांगितलेले आहेच. मुख्य प्रश्न ते आचरणात आणण्याचा असतो, तिथेच सगळी गोची होत असते.
उद्या समजा मोदींनी अशी काही संदर्भ चवकट वगैरे बनवली आणि त्यानुसार काही करायचे ठरवले तर त्यावर तुटून पडायला तयारच बसलेत पुरोगामी, डावे, केजरू, पप्पु , शांतिदूत आणि मंडळी.

जेम्स वांड's picture

11 Dec 2021 - 10:08 am | जेम्स वांड

तुम्ही वर जी खानेसुमारी नमूद केली आहे त्यातील एकाने बनवली चौकट तर चालेल का ? कारण चौकट रूढार्थाने धर्मधारीत नसावी हे तर गापै वरतीच बोलले आहेत, उगाच कश्याला फिलॉसॉफी मध्ये पॉलिटिक्स घुसडताय ?

जेम्स वांड's picture

11 Dec 2021 - 10:09 am | जेम्स वांड

जोवर माझ्या धर्मात थेट ढवळाढवळ कोणी करत नाही तोवर मला चौकट वगैरेंचा काही खास फरक पडत नाही.

एवढा फिलॉसॉफित्वाचा धागा हालेना हे बघून पहिला प्रतिसाद देऊन चालता केला, त्यात आता पॉलिटिक्स घुसवून जरा आणखी धावता करण्याचा हा आमचा खट्याळपणा असे समजा.
कधीकाळी आम्हाला काय काय तात्विक लिहीणे-बोलणे याची लई खाज होती, कांट, हेगेल, रसेल अन काय काय वेड्यासारखे वाचले आणि मित्रांना मोठमोठी पत्रे, रोजनिश्या, लेखन असे बरेच उद्योग केले. पुढे त्यात निव्वळ शब्दबांबाळत्वापलिकडे फारसे काही हाती लागत नसते हे समजल्यावर ती खुमखुमी ओसरली.
अब अपुनको ये फिलॉसॉफी - पॉलिटिक्स वगैरा से कुच्च्बी लेनादेना नै भिडू.

जेम्स वांड's picture

11 Dec 2021 - 11:29 am | जेम्स वांड

काय हे, तुम्हा शिनेर माणसांचा आम्ही आदर्श ठेवायचा ते तुम्ही असे खट्याळ उद्योग करू लागला की हो

कंजूस's picture

11 Dec 2021 - 6:16 am | कंजूस

प्रबळ राज्यकर्ते शस्त्राच्या जोरावर बनवत होते. ती कायम राहायची मग पुढचा येणारा ( म्हणजे गादीवर बसणारा) ती मोडून नवीन करायचा. मोडलेल्या चौकटी कुठे मिळतात?

मुक्त विहारि's picture

12 Dec 2021 - 5:42 pm | मुक्त विहारि

सती प्रथा बंद झाली

काही चौकटी मोडून परत नव्या चौकटीत आल्या ...

उदाहरणार्थ,

मौर्य काळात जसे विधवा विवाह आणि घटस्फोटित स्त्रीचे विवाह होत होते, तसेच आज होत आहेत

लेख वाचताना सुरवातीस विनोदाने 'द्विधाला दोन, तिढ्याला तीन आणि चौकटीला चार बाजू असतात' वाक्य आले पुढे लेख बराच गंभीर होत गेला. वर चित्रगुप्तांनी लेखकानेच सुरवात करावी असे लिहिले पण लेखक महोदय हर्षल वैद्य स्वतःचा लेख कॉपीपेस्ट मारुन गेलेले असल्यामुळे आणि चर्चेत सहभागी होतील की नाही माहित नाही त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या चौकटीचा गुंता मिपाकरांनाच सोडवावा लागेल किंवा फाट्यावर मारावा लागेल. पण वैद्यांनी एवढ्या कळकळीने लिहिलेल्या लेखास पूर्ण फाट्यावर मारणे शक्य नाही शेवटी संस्कृती आणि देश हिताची चिंता वाहणारा धागालेख आहे, फाट्यावर मारले तर आपल्यास संस्कृती आणि देशहितास फाट्यावर मारण्यासारखे होईल म्हणून चौकटीत काय काय येतय आणि काय काय सुटतय याचा आपल्यापरीने विचार केलेला बरा म्हणून एखाद दोन प्रतिसाद लिहितोय

युरोपीय समाज जगातील अन्य समाजांसाठी आदर्शवत आहे हे केवळ त्यांच्या गेल्या दोनतीन शतकांतील भौतिक प्रगतीच्या व त्यायोगे निर्माण झालेल्या सामरिक आणि राजकीय शक्तीच्या आधारे मान्य करता येत नाही...त्यांच्या वैचारिक संचितातील अंतर्विरोध वर उल्लेख केलेल्या शाश्वत विकासासारख्या संकल्पनांना सामावून घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्यात बदलाची आवश्यकता भासते आहे हे तर सर्वविदीत आहे. मात्र आहे त्याच युरोपीय संदर्भ चौकटीत आवश्यक ते बदल घडवून काम भागेल की पूर्णपणे नव्याने विचार करावा ह्यात बुद्धिमंतांत सुद्धा संभ्रम आहे.

सामान्य व्यक्ती त्यांच्या स्वाभाविक वर्तनातून ह्या कार्यास आवश्यक विदा पुरवतील. समाजातील बुद्धिमंत घटकांना ह्या माहितीतून तसेच प्राचीन साहित्याच्या अध्ययनातून सर्वसमावेशक तत्त्वांचा आविष्कार करावा लागेल जी भारतीय संदर्भ चौकटीस आधारभूत ठरतील.

बुद्धीवंतांच्या रोल अमान्य करण्याचे कारण नाही पण प्रत्येक तथाकथीत सामान्य पाचेक वर्षांचा अनुभव आला की आपापल्या क्षेत्रातला बुद्धीवंत असतो. हे मान्य न करता बनवलेल्या चौकटी कुठेतरी तकलादू ठरल्याचा अनुभव भारतीय संस्कृतीने घेऊन झाला आहे. सामान्यांकडे केवळ विदेचे साधन म्हणून पहाणे आणि त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्याच्या अनुभवातून येणार्‍या बुद्धीकडे दुर्लक्ष करणे भौतिकते कडे दुर्लक्ष करण्यासारखे होते. भौतिकते कडे दुर्लक्ष केले की जे भौतिकतेकडे लक्ष देतात ते सामरिक आणि राजकीय दृष्ट्या आपोआप बलवान होऊन भौतिकतेकडे दुर्लक्ष करणार्‍या समाज आणि संस्कृतीचा धुव्वा उडतो हे अनभवून झाले आहे तो अनुभव उपरोक्त सबंध लेख विचार जमेस घेताना दिसत नाही.

अगदी ऋग्वेद काळापासून ज्ञान चहू बाजूने येऊ द्या म्हटले आहे पण उपलब्ध होणार्‍या ज्ञानाला आध्यात्मिकतेची गाळणी जरा जास्तच लावली तर आध्यात्मिकता उरते पण प्रतिस्पर्ध्यांशी सामरीक दृष्ट्या तोड देण्यासाठी लागणारी भौतिकता गायब होते आणि देश परचक्राला सामोरा जाऊ शकतो. त्यामुळे 'ज्ञान चहू बाजूने येऊ द्या', ला हवे तर आध्यात्मिकतेची जोड द्या, अध्यात्मिकतेची गाळणी लावू नका

निसर्गानुकूल जीवनपद्धती, शाश्वत विकास

हे ठिक आहे.

सर्वच जण एका विशाल कुटुंबाचा भाग असल्याने अधिकारांच्या चळवळीचे स्थान उरत नाही.

'परमत सहिष्णुता हे त्यामुळे भारतीय संस्कृतीतील स्वाभाविक मूल्य आहे' हे ठिक आहे पण साक्षात भगवद गीतेत अधिकारांसाठी आग्रह सांगितला आहे, अधिकारांच्या चळवळींचे स्थान काढून घेतले तर आधिकारांचे स्थान काढून घेतल्यासारखे होते आधिकार नाकारला गेलेला शत्रूपक्षास जाऊन सामील होऊ शकतो आणि परचक्रास आमंत्रण देऊ शकतो . त्यापेक्षा ज्याच्या त्याच्या अधिकाराचा सुयोग्य आदर ठेवावा की.

विश्वाचा क्रमविकास होत असतो. त्यामुळे मानवी समाजसुद्धा सतत चढत्या श्रेणीने अधिकाधिक भौतिक सुखांकडे जाणे हे त्यांना स्वाभाविक वाटू शकते. अशा चढत्या श्रेणीतील सुखाची संकल्पना चिरस्थायी (sustainable) असेल काय ह्या प्रश्नाचा विचार त्यांच्याकडे फारसा होत नाही.

निसर्गाची सुयोग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने शाश्वत (Eternal) हा शब्द ठिक आहे. sustainable शब्दासाठी 'टिकाऊ' हा अनुवाद पुरेसा असावा. एकीकडे युगांची संकल्पना स्विकारायची आणि विश्वाचा क्रमविकासाची कालानुरुप बदलांची संकल्पना नाकारायची हे गणित नीटसे जुळताना दिसत नाही. कोणताही क्रमविकास टिकाऊ असावा हि अपेक्षा ठिक आहे पण 'चिरस्थायी' शब्दाचा अर्थ कायम स्वरुपी होतो कोणताही क्रमविकास कायम स्वरुपी कसा असेल. कोणतीही गोष्ट कायम स्वरुपी झाली की क्रम आणि विकास या सृष्टीच्या निसर्ग नियमा विरोधात जाते किंवा कसे.

"धर्म हाच समाजव्यवहारातील सर्व बाबींचा मूलभूत संदर्भबिंदू बनतो."

यात नेमके धार्मिक कर्मकांड अपेक्षित आहेत की वर गापै म्हणतात तसे धर्म म्हणजे कर्तव्य व (निती) मर्यादा यांचा सुसंगत संगम अपेक्षित आहे?

ऐहिक व्यवहार आणि पारलौकिक व्यवहार यांत दूर अंतर राखणारी सेक्युलरिझम सारखी संकल्पना आपल्या चित्तप्रवृत्तीशी विसंगत ठरते

राज्य चालवण्याच्या प्रक्रियेत निती आणि कर्तव्याचे भान इथे पर्यंत ठिक आहे. राज्य चालवणे परलोकातल्या लोकांसाठी थोडेच चालवले जाते. राज्य आणि ते चालवण्यासाठी लागणार्‍या निती आणि कर्तव्य या पृथ्वीतलावरील सध्याच्या आणि आगामी पिढ्यांसाठी उत्तरदायी असतात. मोक्षप्राप्तीच्या साधनेत केवळ जबाबदार्‍या पारपाडण्यातून (स्वतःप्र्ती आणि इतरांप्रती) येणार्‍या मानसिक मुक्तीचा समावेश होतो त्यात पारलौकीकाबद्दल स्वार्थीअपेक्षा ठेवली तरी स्वार्थ ठरून मुक्ती म्हणजे मोक्ष मिळतच नाही. आणि जबाबदार्‍या पारपाडताना ऐहिक जगातल्याच जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. आणि सेक्युलॅरीझम कर्मकांडवाल्या धर्मापासून दुर राहून कर्तव्य व (निती) आणि जबाबदार्‍या पारपाडण्याशी जमवून घेत असेल तर सेक्युलॅरीझम वर मर्यादेपलिकडे आग पाखड कशासाठी. सेक्युलॅरीझमच्या नावाने होणारे काही धर्मांधतांचे लांगुलचालन समस्या आहेच पण ती सेक्युलॅरीझमची चुक नाही लांगुलचालन करणार्‍यांची चुक आहे.

हिंदुत्वाबाबतही बर्‍याच प्रमाणात गरजे पलिकडे चुकीची आगपाखड लादली जाते तशी सेक्युलॅरीझम बद्दल गरजे पलिकडे चुकीची आगपाखड होताना दिसते. हिंदू धर्म मूळातच सेक्युलर असताना त्याला सेक्युलॅरीझमपासून कसे वेगळे करता येईल हे समजणे अवघड होऊन जाते. कर्मकांड विरहीत हिंदूराष्ट्र आणि लांगूलचलान नसलेले सेक्युलर राष्ट्र यात मला तत्वतः फारसा फरक दिसत नाही.

धर्म आणि मोक्ष यांनी अर्थ व कामाचे नियमन करावे असे आपली संस्कृती सांगते.

निसर्ग, मानवी समानता यांच्यावर गदा येणार नाही एवढा उपभोगवाद असू नये यासाठी मुक्तीच्या नावाने सामाजिक जबाबदार्‍या पारपाडणे कर्तव्यांचे नितीपूर्ण पालन हे ठिकच आहे.

जो पर्यंत समष्टीचा समभावपूर्ण विचार होतो तो पर्यंत व्यक्तीच्या सुखाचा विचार हा सर्वोत्तम मानण्यात नेमके चुकीचे काय आहे? काम आणि अर्थाचे कर्तव्याच व्यक्ति सुखाची काळजी घेणे आहे. अधिकतम सकारात्मकतेवर भर देणारी भारतीय संस्कृतीतून समष्टीचा समभावपूर्ण विचारकरून मग अधिकतम व्यक्ति स्वातंत्र्याकडेही अधिकतम सकारात्मकतेने न बघता येण्यासारखे नेमके काय आहे?

महात्मा गांधी हिंद स्वराज या त्यांच्या पुस्तकात म्हणतात, “आम्हाला इंग्रजी राज्य तर हवे पण इंग्रज नकोत. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपणांस हिंदुस्थानास इंग्रज बनवायचे आहे. आणि हिंदुस्थान इंग्रज झाल्यास तो हिंदुस्थान म्हणवला जाणार नाही.”

सावरकरांना त्यांच्या माफीनाम्यावरून थोडे जास्तच ताणले जाते त्याचाच हा उपरोक्त गांधी विरोधी प्रकार आहे. गांधींच्या हातात गीता घेऊन फिरणे आणि ऐन स्वातंत्र्याच्या वेळी युद्ध कर्तव्यापासून पाठ फिरवणे मोपला ते लांगुलचालनाचे प्रयोग यांचे समर्थन होत नाही. परकीय संस्कृतीशी संवाद केवळ खिडकीतूनच होऊ शकतो पण मला माझे राष्ट्ररुपी घर आणि सांस्कृतिक भिंती भारतीय हव्या म्हणणारे मोहनदास गांधी, स्वतःच्या मुलाला धर्मांतर करु न देणारे मोहनदास गांधी, फिरोज गांधींना इंदिराशी विवाह करण्यापुर्वी हिंदू करुन घेणारे गांधी राज्य आणि धर्म यांची सेक्युलॅरीझम मध्ये फारकत होण्याची गरज नाही म्हणणारे गांधी यांच्यावर नेहरूंनी केलेल्या राजकीय फसवणूकीचे आणि लांगुलचालन आणि बोटचेपेपणाचे खापर फोडता येते पण नास्तिक नेहरूंच्या लांगुलचालीत भारतीय धर्म आणि संस्कृतीला कमी लेखण्याचे खापर गांधींवर पुर्णपणे फोडता येत नाही अर्थात नेहरूंना राजकीय संधी दिली जाऊन हातात येणारा रिझल्ट तोच आला हेही खरे.

दिल्ली विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक राकेश सिन्हा ह्याच्या अधिक खोलात जाऊन भारतीय संदर्भ चौकटीच्या निर्माणाचे कोणतेही प्रयत्न का झाले नाहीत याची पुढील सात कारणे देतात. १. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी विभिन्न पक्षांपैकी कित्येकांची मूळ विचारसरणी ही पाश्चात्य उगमाची होती. २. वसाहतवादी प्रभावाखाली आपल्या मूळ सहिष्णुतेच्या तत्त्वाची जागा स्पर्धेच्या तत्त्वाने घेतली. याची पुरेशी दखल विचारवंतांनी घेतली नाही. ३. शिक्षण क्षेत्रात संस्कृतीस अनुकूल असे मूलगामी बदल झाले नाहीत. ४. हिंदू तत्त्वचिंतनास त्यातील कर्मकांडांशी समरूप मानून त्यास हीन लेखले गेले. यामुळे ‘आम्ही कोण?’ या प्रश्नावर संभ्रम निर्माण होऊन भारतीयत्वाची परिभाषा ही केवळ घटनात्मक, राजकीय आणि भौगोलिक होऊन राहिली. ५. भारतातील उच्चभ्रू वर्गाने इंग्रज श्रेष्ठत्वाची भावना कायम ठेवण्याचा प्रयास केला. ६. वसाहतवादी विचारांचा तथ्याधारित आणि तर्कशुद्ध प्रतिवाद झाला नाही. ७. देशाचा राजकीय, धोरणात्मक, प्रशासनिक सांगाडा वसाहतकालीनच राहिला.

राकेश सिन्हांच्या उपरोक्त परिच्छेदाशी बरेच सहमत होता येऊ शकते.

परकीयातील चांगलेते आत्मसात करून उर्वरीत गोष्टीत भारतीय समाजासाठीच्या भारतीय संदर्भ चौकटीचा आग्रह चांगलीच गोष्ट आहे.

इतिहासकार विल दुरांट म्हणतो, “शेवटी माणसाच्या स्वभावात परिवर्तन न घडवताच संस्थात्मक बदल घडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर माणसांचे ते न बदललेले मानस पूर्वीच्या निरुपयोगी कालबाह्य संस्थांचे पुनरुज्जीवन करते”.

सावरकरांचा पुस्तकपुजा नाकारणारा विज्ञानवादी हिंदुत्ववाद, (सावरकरांचीही पुस्तकपुजा टाळल्यास) ठिक आहे. पण हिंदुत्ववादाच्या नावाखाली जन्माधारीत जातीसंस्थेचे पुनरुज्जीवन होणार नाही ना असा जो अपप्रचार संघ विरोधकांकडून होतो त्या अपप्रचारास जोरकस नकार देऊन सावरकरांनी सांगितलेल्या जन्माधारीत जातीच्या बेड्या नाकारण्याच्या कार्यक्रम संघाने जेवढ्या जोरकसपणे पुढे न्यावयास हवा होता तसा नेण्यास संघ सावकाश ठरत आला आहे. आणि समाजसुधारणेची गती कमी ठेवण्यासाठी विल दुरांटाच्या वक्तव्यासारखा आधार घेऊन कालानुरुप सुयोग्य संस्थात्मक बदल नाकारले जाण्यासाठी उपयोग केला जात नाहीना अशी विरोधकांकडून संशय पसरवला जाण्याची जागा हिंदूत्ववादी का सोडतात याचा नीटसा बोध होत नाही.

गामा पैलवान's picture

20 Dec 2021 - 7:07 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमची काही विधानं रोचक वाटली. त्यांवर भाष्य करीत आहे.

१.

उपलब्ध होणार्‍या ज्ञानाला आध्यात्मिकतेची गाळणी जरा जास्तच लावली तर आध्यात्मिकता उरते पण प्रतिस्पर्ध्यांशी सामरीक दृष्ट्या तोड देण्यासाठी लागणारी भौतिकता गायब होते

हे कुठे व कधी झालंय? भारतात झालंय का?

२.

हिंदू धर्म मूळातच सेक्युलर असताना त्याला सेक्युलॅरीझमपासून कसे वेगळे करता येईल हे समजणे अवघड होऊन जाते.

एक गोष्ट इथे स्पष्ट करून सांगावीशी वाटते. हिंदू धर्मीय आजीबात सेक्युलर नाहीत. सेक्युलर ही ख्रिस्ती युरोपीय संकल्पना आहे. तिचा भारताशी कणमात्र संबंध नाही. चर्चचे दोन अधिकारी आपसांत चर्चा करतांना चर्चच्या व्यतिरिक्त काही विषय चर्चेत आला तर त्यास सेक्युलर हे विशेषण लावलं जातं. या विशेषणाचा सर्वधर्मसमभावाशी कसलाही संबंध नाही. त्याचप्रमाणे सेक्युलर चा हिंदू धर्माशी कसलाही संबंध नाही.

हिंदू मुळातून सेक्युलर असतात हे दिशाभूलजनक विधान आहे. अशाच समस्या टाळण्यासाठी सनातन भारतीय चौकट हवीये.

३.

जन्माधारीत जातीच्या बेड्या नाकारण्याच्या कार्यक्रम संघाने जेवढ्या जोरकसपणे पुढे न्यावयास हवा होता तसा नेण्यास संघ सावकाश ठरत आला आहे.

हे काम संघाने कशासाठी करायला पाहिजे. हे नकारात्मक काम आहे. संघाला असल्या कामांत रस नाही. संघ सकारात्मक कामं करतो.

माझ्या मते हे जर काम असेल तर ते जनतेचं म्हणजे तुमचं आणि माझं काम आहे. त्याकरिता समाजात सेवाभाव रुजायला हवा. संघ फारतर स्वत:च्या कामातून सेवाभावाचं उदाहरण समाजासमोर ठेवू शकतो. घोड्यास पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी घोड्यानेच प्यायचं असतं.

आ.न.,
-गा.पै.