झुक आयी बदरिया सावन की
संध्याकाळचे साधारण पाच साडेपाच वाजले असावेत. पण आभाळ भरुन आल्याने कसं सारं अंधारलं होतं. पाऊस येणार अशी चांगलीच लक्षणे दिसत होती वार्यात अजुनही गरमीच होती, शिवाय धूळही, पण का कोणास ठाऊक ही पावसाची चाहुल ही एक भन्नाट गोष्ट आहे, सगळ्यांना कसे नकळत खेचुन आणते ते कळत नाही. ऑफीसच्या टॉप टेरेस ओपन क्यँन्टीन मध्ये नेहमीपेक्षा बरीच जास्त गर्दी होती. टेबलांवर नेहमी लावलेल्या छत्र्या मात्र आज काढुन ठेवल्या होत्या त्यामुळे कसे चारही बाजुंना अगदी क्षितीजापर्यंत नजर जात होती. पश्चिमेचा क्षितिजावर सुर्याची ढगांशी चाललेली लपाछपी काही संपायचे नाव घेत नव्हती अन पब्लिक सारे आता पाऊस येईल मग पाऊस येईल अशी वाट बघत वैतागुन गेले होते, काहींजण तर आता संध्याकाळच्या पिकअपची गडबड सुरु झाल्याने निघायलाही लागले होते. मी कोपर्यातल्या स्मोकिंग झोन मध्ये निवांत खुर्ची टाकुन बसलो होतो, दुरवर पसरलेली हिंजवडीची ओसाड माळरानं, मधुनच डोकं वर काढलेले बालेवाडी स्टेडीयम अन पलीकडुन जाणारा हायवे ... माझ्या सातार्याला जाणारा. कदाचित ढगं दाटुन आल्यामुळे असेल, पण का कोणास ठाऊक पण आज सातार्याच्या आठवणीने जरा कसंसंच झालं. सैरभैर म्हणतात तसे काहीसे. उगाचच सगळ्या गावाच्या आठवणींनी मनात मळभ दाटुन आलं.... मी शांतपणे खिशातुन मार्लबोरो काढली अन शिलगावली...अन असंच हायवेकडे एकटक पहात राहिलो ...
"ए ऐक ना , राग मल्हार ऐकुयात का रे ?"
हे आठवणीचं साला एक बेकार असतं, एकदा का आठवायला लागलं की काहीही आठवतं, अगदी मनाच्या कोणत्या तरी कोपर्यात लपुन बसलेलं काहीही अगदी काहीही.
__________________________________
जवळपास वर्षभरापुर्वीची गोष्ट . चित्रांगदासोबत गाडीतुन सातार्याला निघालेलो होतो. जुन महिना जवळपास अर्धा उलटुन गेला होता तरी पावसाचे काही लक्षण नव्हते. पाऊस नुसताच नुसताच आकाशात गर्दीकरुन ढगांमागुन लपाछपी खेळत होता. एक दोनदा वळीवाचा पाऊस पडुन गेला होता, अगदीच नाही असे नाही, पण उलट त्याने त्याच्या विरहाचीच जाणीव जास्त तीव्र होत होती. गाडी चालवताना आसपासच्या रानावरच्या शुष्क कोरडेपणा अक्षरशः डोळ्यांना टोचत होता! उगाचच ईकडच्या तिकडच्या काहीतरी गप्पा मारत ८०-१०० ने गाडी पळवत होतो तरीही रस्ता काही संपायचे नाव घेत नव्हता. नेहमी खंबाटकी ओलांडला की सातार्यात पोहचलोच असे वाटते आज मात्र ह्या उनसावल्यांच्या खेळामुळे असेल किंवा टोचणार्या रखरखाटामुळे असेल पण असे काहीच वाटाले नव्हते. म्युझिक सिस्टीमवर काहीही रॅन्डम गाणी चालु होती. तीही आता रीपीट व्हायला लागलेली, तेव्हा चित्रांगदा म्हणाली -
"ए ऐक ना , राग मल्हार ऐकुयात का रे? तुझ्या कलेक्शन मध्ये आहेत ना शात्रीय संगीताचे काही कलेक्शन!"
"काय्य?" मी आश्चर्याने जवळपास ओरडलोच " तुला काय वेड बिड लागलंय का गं ? इथे पावसाचे आधी नामोनिशाण नाही, त्यातुन हा रस्ता आधीच संपेनासा झालाय आधीच कधी नव्हे ते वैताग आलाय घरी जाताना. अन त्यातुन आता तु मल्हार ऐकवणार म्हणजे बस्स हद्दच होईल राव! "
"इतका कशाला रे वैतागतो, ऐक ना त्यातील तो विलंबीत राग नटमल्हार आहे ना भीमसेनजींच्या आवाजातला तो लावुया, अन तेव्हढ्या ३०-४० मिनिटात पोहचुच की आपण !"
"ए ऐक ना. तुच तर म्हणालेलास की रे - पाऊस बाहेर कुठे असतो, पाऊस तर आपल्या मनात असतो ना! तुला आठवतो का रे तो दिवस ... मी करेक्ट एकावर्षाने तुझ्याशी बोलले होते ... "
मी शांतपणे तिच्याकडे पाहिलं.
"ओके , ओके , मला माहीती आहे तु विसरत नाहीस. त्या नंतर फेज ३ च्या सर्कल भोवती गाडी लाउन कित्ती तरी वेळ आपण गप्पा मारत बसलो होतो ना आपण. आपला तर अगदी नेहमीचा स्पॉट होता तो गप्पा मारत बसायचा! तिथं एकदा तु म्हणालेलास - पाऊस बाहेर कुठे असतो, पाऊस तर आपल्या मनात असतो ! कित्ती हसले होते मी. पण आता हळुहळु कळायला लागलं आहे. बघ ना, आता बाहेर इतका रखरखाट आहे , पाऊस पडेल पडेल म्हणे पर्यंत ढग निघुन जाताहेत, सारं कसं अगदी टिजिंग केल्या सारखे चालु आहे पण मला तरी आता तोच क्षण आठावतोय - साधारण रात्रीचे दहा वाजुन गेले होते. नुकतीच दिवाळी उलटुन गेली होती अन आता हवे मधे गारवा चांगलाच जाणवु लागला होता. दवाने भरुन गेलेली कुंद हवा अन वार्याच्या झुळुकेबरोबर उठणारी थंडीची लहर अन बस्स आपण दोघेच आहोत अन शांतता! कित्ती तरी वेळ गप्पा मारत बसलो होतो ना आपण, रादर तुच तर बोलत होतास एकटाच ! "
चित्रांगदा अगदी सगळं कसं आत्ता इथे डोळ्यासमोर घडत असल्यासारखे बोलत होती ... मी शांतपणे तल्लीन होवुन ते ऐकत होतो, तो क्षण पुन्हा एकदा जगत होतो. ब्यॅकग्राऊंडला चालु असलेला मल्हार आता किती सहजपणे त्या प्रसंगाला, त्या संवादाला आपलेसे करुन घेत होता.
" तू मीराबाई चे लेखन वाचले आहेस का गं ? किती खोल आहे, किती गहिरं आहे हे प्रेम ! म्हणजे बघ ना, राधा कृष्णाचे प्रेम गहिरे आहेच, नाही असं नाही, समाजाची बंधने आहेत, नीती अनीतीचे पाश आहेत, पण तिचा श्यामसखा तिच्या डोळ्यासमोर आहे, तिने पाहिला आहे, ती सार्या क्षुद्र भौतिक जगाच्या भौतिक जगाच्या नीतीमत्तेच्या व्याख्या मोडुन त्याच्यावर जीवापाड प्रेम करत आहे ... पण मीरेचे पहा ना, तीने तर तिच्या गिरिधरनागरप्रभुला पाहिलेही नाहीये, त्याची छबी तिच्या मनात आहे, सारेच काल्पनिक केवळ श्रधेच्या आधारावर उभारलेले विश्व. राधेला प्रेम व्यक्त करायला समोर कृष्ण आहे, नाही म्हणले तरी त्याला चोरुन यमुनेकाठी भेटता येते आहे, त्याच्या मुरलीचा नाद अगदी दुरवरुन ऐकुयेत असला तरी तो आहे ह्याची कुठे खोलवर खात्री आहे... पण मीरेचे काय ? तीचे तर सारेच भावविश्व मनात आहे - भले कृष्ण समोर नसेल पण तिच्या मनात आहे, त्याने तिच्या प्रत्येक रोमरोमाला स्पर्श केला आहे - बघ ना ती काय म्हणते
झुक आई बदरिया सावन की, सावन की मन भावन की ।।
सावन में उमंग्योआ मेरी मनवा, भनक सुनी हरि आवन की ।
उमड़ घुमड़ चहुं दिस से आयो,दामण दमक झर लावन की ।
नन्हीब नन्हीस बूंदन मेहा बरसै, सीतल पवन सोहावन की ।
मीरां के प्रभु गिरधर नागर, आनंद मंगल गावन की ।।144।।
नुसते आकाशात ढग दाटुन आलेतरी तिला तिच्या कृष्णसख्याच्या येण्याची चाहुल लागत आहे, मीरेला तुमच्या आमच्या अद्वैताशी घेणे देणे नाही, पण तिच्या द्वैतातला कृष्णसखाइतका इतका खरा आहे, भले तिने त्याला पाहिला नसेल पण तिच्या मनात त्याच्या खेरीज काहीच नाहीये, तिच्या आयुष्यातला क्षण अन क्षण, कण अन कण श्यामरंगाने रंगलेला आहे. बघ ना किती सोप्पे लिहिले आहे हे - नन्हीब नन्हीस बूंदन मेहा बरसै, सीतल पवन सोहावन की. तिला पावसाच्या प्रत्येक थेंबात कृष्ण जाणवतोय, वार्याची प्रयेक लहर जणुन त्या श्यामसख्याचे मोरपीस अंगावरुन फिरवत आहे. हे हे असं इतकं साधं सोप्पं अन भावोत्कट लिहायला जमलं पाहिजे यार!अद्वैतातले शे दीडशे दाखले कोणीही देवु शकेल पण तरीही पण ती परमोच्च अवस्था अनुर्वाच्य आहे ह्या पेक्षा जास्त काही बोलुच शकणार नाही, मीरा ह्या सार्या भानगडीत पडतच नाही, ती डायरेक्ट तिच्या मनातल्या कृष्णाला मिठीमारते अन तीही अशी की अगदी त्याच्यातच विरघळुन जाते, आता मीरा असे काहीच नाहीये आता बस्स कृष्णच कृष्ण आहे. हे ढग हा पाऊस हा श्रावण हे बाहेर असं काही नसतंच, अगदी मीरेच्या कृष्णासारखा हे तर आपल्या मनात आहे! ... तो बाहेर नसेलही कदाचित ...पण काय फरक पडतो? आपल्या मनात तर आहे ना! एकदा का हे लक्षात आले की जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे कृष्णच तर आहे!!
बघ ना, कल्पना कर, मीरा तिच्या राजमहालाच्या नक्षीदार खिडकीत उभीराहुन पाऊस झेलत आहे... तुमच्या आमच्यासाठी तो पाऊस आहे, पण तो पाऊस त्याचा प्रत्येक थेंब तिच्या साठी कृष्ण आहे, आणि तसा तर तो आधीपासुनच तिच्यात आहे, रादर तीच त्याच्यात आहे. पाऊस असो वा नसो, काय फरक पडतो? मीरा आधीच कृष्णाने पुर्ण चिंब भिजुन ओथंबुन गेलेली आहे.
खरंच पाऊस बाहेर कुठे असतो, पाऊस तर आपल्या मनात असतो यार! किती भिजायचं हा मात्र जाचात्याचा निर्णय !
चित्रांगदा अगदी शांतपणे बोलत होती सारे जसेच्या तसे आठवत होती ....
"बघ ना येवढ्या रखरखीत उन्हात मला अजुनही तोच क्षण आठवतोय, मी अजुनही त्याच क्षणात चिंब भुजुन गेलेली आहे... अन वार्याच्या झुळुकेबरोबर उठणारी थंडीची लहर मला तुझ्या घट्टमिठीत कशी कशी विरुन जात आहे हे लक्षातही येत नाहीये.... खरं आहे ....पाऊस बाहेर कुठे असतो, पाऊस तर आपल्या मनात असतो! "
आनेवाडीचा टोलनाका क्रॉस करुन सातार्याचा खिंडीजवळ आलो, इथे मात्र आभाळ दाट भरुन आलेलं! आता चित्रांगदा गालातल्या गालात हसत होती.
___________________________________________________________________________
" गिरिजा "
त्या हाकेने मला तंद्रीतुन बाहेर काढले. चित्रांगदा मला शोधत शोधत क्यँटीन मध्ये आलेली होती. आता कॅन्टीन मधील गर्दी बर्यापैकी कमी झालेली. मोजकीच दोन चार लोकं वगळता आता कोणीच नव्हते, बहुतांश पब्लिक पावसाच्या अंदाजाने आधीच निघुन गेले होते.
" गिरिजा , आय वॉन्टेड टू टॉक टू यु . मी म्हणले होते ना मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी" बोलत बोलत ती माझ्या टेबलजवळ येवुन बसली तिने अलगद दोन कॉफीमग टेबल वर ठेवले. आत्ता चित्रांगदाचा स्वर बराच गंभीर होता. पण ती पुढे काही बोलणार तितक्यात मी तिला थांबवले.
"वेट वेट वेट . काही बोलु नकोस चित्रांगदा . माझ्या डोक्यात काहीतरी विचार चालु आहेत... गिव्ह मी लाईक फाईव्ह मिनिट्स "
चित्रांगदा बोलता बोलता थांबली अन दीर्घ निश्वास टाकुन माझ्याकडॅ पहात राहिली. मी खिषातुन अजुन एक मार्लबोरो काढुन शिलगावली अन पश्चिमेच्या क्षितिजावर दाटुन आलेल्या ढगांकडे पहात राहिलो.
____________________________________________________________________________
आनेवाडीचा टोल नाका क्रॉस करुन सातार्याचा खिंडीजवळ आलो, इथे मात्र आभाळ दाट भरुन आलेलं ! आता चित्रांगदा गालातल्या गालात हसत होती.
आम्ही सातार्यात थांबलोच नाही, सरळ यवतेश्वरच्या पठारावर आलो. इथे जोरदार वारा सुटला होता, पश्चिमेच्या क्षितीजावर काळ्या ढगांची गर्दी झाली होती, अगदी आत्ता पाऊस पडेल कि क्षणभरात अशी हवा होती. गाडी अगदी दुरवर पठारावर लावली अन उरमोडीडेमच्या जलाशयाकडे पहात पावसाची वाट पहात बसलो. राग मल्हार कधी संपला अन पुढचा राग सुरु झाला ते ह्या सार्या निसर्गाच्या खेळात लक्षातही आले नव्हते. चित्रांगदाच्या उगाचच इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा चालु होत्या .
" ए आपण ना एक नियम करुयात का? दर वर्षी पावसाळा सुरु झाला की इथे यायचे भिजायला? चालेल? "
मी हसलो. "दर वर्षी ? आर यु शुअर ?"
"म्हणजे?"
"अगं इथे उद्याचे निश्चित नाही आपले. आयुष्यभराचे काय ठरवतेस? कदाचित पुढचा पाऊस मी पॅसेफिकच्या किनार्यावर उभा राहुन पहात असेन क्किंवा ..."
"किंव्वा काय?"
" किंव्वा तु दुसर्या कोणासोबत तरी ...कुठेतरी..."
" अॅअॅअॅ " तिने मला उगाचच चिडवत विषय बदलला.
पावसाची सर आली तसे मी पटकन गाडीत शिरलो. माझ्या मागे तीही गाडीत आली.
"तुलाच खरेच वेड बिड लागले आहे बहुतेक. आताच मी काय म्हणालेले की भिजायला दरवर्षी इथे यायचे म्हणुन! दरवर्षीचे राहुदे पण अत्ता तरी भिजुयात ना ."
मी दुर्लक्ष केल्यासारखे केले.
ती काहीच न बोलता गाडीबाहेर उतरली आणि दोन्ही हात पसरुन तिने पावसाला आलिंगन दिली. ती अक्षरशः लहान मुलीसारखी पळत होती गवतातुन. तिचे मोकळे केस वार्याने विस्कटत होते, ओढणीला गवताचे काट एलागत होते पण तिला त्याची पर्वाह नव्हती. आता फक्त ती आणि तिचा पाऊस होत्ता बस्स...मी गपगुमान गाडीतुन उरतुन तिच्या बाजुला जाऊन उभा राहिलो, अन पावसात हरखुन गेलेल्या तिच्याकडे पहात राहिलो .
" हम्म मान्य आहे, पाऊस आपल्या मनात असतो पण असा बाहेरही असला की की कसं एकदम आतुन बाहेरुन चिंब चिंब भिजायला होते ना !" ती माझ्या जवळ येवुन जवळपास धापाटाकतच म्हणाली. तिच्या चेहर्यावर अक्षरशः आनंद ओसंडुन वहात होता!
"तु म्हणालेलास , God is in rain ! तु काय बोलतोस ते कळयला फार वेळ लागतो रे! पण जेव्हा कळते तेव्हा एकदम तो "बिंगो" मोमेंट होतो!" तिने तिच्या रेशीमबाहुंच्या पाशात मला गुंतवुन टाकले.
दोघेही पावसात कितीतरी वेळ चिंब भिजलो. पावसाची सर गेली तेव्हा ढगांमागुन सुर्यकिरणे डोकावु लागली. आम्ही दोघेही कठड्याच्या अगदी टोकावर शांतपणे पहुडलो होतो. वर निळसर आकाशातुन काळसर ढग एकामेकांशी स्पर्धा करत पुर्वेकडे सरकत होते. कित्ती तरी वेळ मोकळ्या आकाशाकडे, त्या ढगांच्या स्पर्धेकडे पाहण्यात तल्लीन झालो होतो. उन्हाने वाळलेल्या रखरखीत रानावर नुकताच पाऊस पडल्याने मातीचा गंध सार्या आसमंतात एकदम भरुन राहिला होता.
" ऐक ना चित्रा...."
" शूऊऊऊऊऊऊऊ" तिने माझ्या ओठांवर बोट ठेवले मला वाक्य पुर्णच करु दिले नाही.
मीही गप्प झालो. कित्येक क्षण केवळ अनुभवता येतात, शब्दात नाही सांगता येत, रादर शब्द तेव्हा न्युसन्स ठरतात... तो असाच काहीसा क्षण होता ... शब्दातीत... अनुर्वाच्च्य !
सुर्य क्षितीजा आड गेला तेव्हा आकाशात परत ढगांची दाटी व्हायला लागली, आतामात्र काहीच न बोलता अगदी मंत्रमुग्ध असल्यासारखे आम्ही गाडीत जाऊन बसलो.
गाडीचे पार्किंग लाईट लाऊन आम्ही किती वेळ गाडीत बसलो हे आमचे आमच्याच लक्षात आले नाही. जणू काही काळ थांबुन गेला होता. जणु तो क्षण तिथल्या तिथे फ्रीझ झाला होता. गाडीच्या सर्व काचांवर दाट दव जमा झाले होते. आता बाहेरचे काहीच दिसत नव्हते. अन बाहेरच्या किर्र धुकट अंधारात फक्त वार्याचा गोंगाट अन रातकिड्यांच्या किरकिराट ऐकु येत होता. ती हेडरेस्ट वर डोके ठेवुन डोळे मिटुन शांत बसली होती, मी तिच्या चेहर्यावर विस्कटलेले केस हळुवार मागे सारले, ती अलगद मान माझ्याकडे वळवुन गाल्यातल्या गालात हसली अन परत एकदा तिने घट्ट मिठी मारली अन डोळे पुन्हा मिटुन घेतले. खरेतर थोडेसे अस्थानीच पण मला मित्राच्या एका कवितेतली एक कडवे मनात चमकुन गेले...
मना, राही जागा, ठेवी पंचप्राण-
जागे, भोगी क्षण, दुर्मिळ हे ।
पं.भीमसेनजींच्या आवाजातील राग मेघमल्हार संथपणे चालु होता. आता बाहेरही परत मुसळधार पाऊस चालु झाला होता...
____________________________________________________________________________
"गिरिजा , आय एम लीव्हींग."
चित्रांगदाच्या वाक्याने मी भानावर आलो. हातातले सिगारेट चे थोटुक पायाखाली विझवत जमेल तितक्या शांत स्वरात म्हणालो :
"हम्म"
"आय एम लीव्हींग गिरिजा."
" ह्म्म , आय नो ! मला माहीत आहे !"
" अॅन्ड यु आर स्टिल सो क्वाएट ? तुझी काही रिअॅक्शन नाही? ह्म्मम ... दॅट्स इट ? बस्स ? "
" सोड ना - चालायचेच... यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ | समेत्य च व्यपेयातां तद्वद् भूतसमागम: || "
"प्लीज आत्ता तरी समजेल असे बोल रे . चीड. रागाव. काहीतरी रीअॅक्शन दे. अगदीच हे असं रुक्ष रुस्क्ष बोलणं मला नाही सहन होत रे "
मी हसुन न हसल्या सारखे करत म्हणालो " मी जाऊ नको म्हणालो तर थांबशील....माझ्यासाठी?"
"प्लीज गिरिजा प्लीज . यु नो दॅट आय हॅव टू गो . मला गेलेच पाहिजे "
मी हसुन म्हणालो "मग सोड ना . कशाला उगाच ती चर्चा. चालायचेच." एकुण सार्याच विषयाचा ट्रॅक बदलत मी म्हणालो - " ऐक ना आता ह्या पावसामुळे असेल पण आपली सातारा ट्रिप आठवली... राग मल्हार आठवलला, तुला आठवतो का गं ? ऐकुयात ? " मी तिच्या उत्तराची वाट न पहाता मोबाईल्वर राग नटमल्हार सुरु केला .
चित्रांगदाचे डोळे पाण्याने भरुन आले होते अगदी वर निळ्याशार आकाशात भरुन आलेल्या काळ्याकुट्ट ढगांसारखे. आलाप सुरु झाला तेव्हा मी म्हणालो -
" पाऊस बाहेर कुठे असतो, पाऊस तर आपल्या मनात असतो ना !"
तिचे डोळे आता मात्र अश्रुंना बांध घालु शकले नाहीत, तिने गळ्याभोवती घट्ट मिठी मारली अन हमसुन हमसुन रडत राहिली - "आय एम सॉरी गिरिजा , बट आय हॅव टू गो , आय एम रीयली सॉरी" कित्ती तरी वेळ मी त्या पावसात भिजत होतो.
आकाशात कडाडलेल्या एका विजेच्या आवाजाने तिला माझ्यापासुन विलग केले.
"मला गेले पाहिजे, गिरिजा, आज रात्रीची फ्लाईट आहे "
"हम्म " आता मी काहीच बोललो नाही . ती रडत रडतच पण शांतपणे उठुन निघुन गेली. मी एकटक पहात राहिलो तिच्या पाठमोर्या आकृतीकडे...Sometimes, you should just let go the people. Just simply let go !
आता मोबाईल वरील राग नटमल्हार विलंबीत बंदिश पार करुन द्रुत लयीत आला होता...
"झुक आयी बदरिया सावन की, सावन की मन भावन की !
सावन मे उमगे मोरा मनवा, छाड गये परदेस पिहरवा, सुद ना रही घर आवन की !
सुद ना रही घर आवन की...झुक आयी बदरिया सावन की !!
ढगांच्या कडकडाटासोबत पावसाची एक जोरदार सर आली मी शांतपणे तिथेच भिजत उभा राहिलो ... तसा तर मी कधीचाच चिंब भिजुन गेलो होतो मनातल्या पावसात !
______________________________________________________________________________________
प्रतिक्रिया
1 Jun 2016 - 11:22 pm | लॉरी टांगटूंगकर
अतिकमाल. लिखते रहो!
1 Jun 2016 - 11:28 pm | किसन शिंदे
चांगलं लिहीलंय बे गिर्जा!
2 Jun 2016 - 1:22 am | रमेश भिडे
हॅट्स ऑफ बंधो!
खासम खास लिहिलंय. समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभवाचा संबंध 'त्या'च्याशी लावता येणं म्हणजे मीरा होणं... बाकी चित्रांगदा (सिंग?) पण मस्तच.
या लेखासाठी एक पार्टी लागू तुम्हाला.
2 Jun 2016 - 1:22 am | पद्मावति
फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंय. खूप आवडली कथा.
2 Jun 2016 - 2:01 am | ५० फक्त
मस्त लिहिलंस रे, अशी माणसं चांगली वाटतात, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा राम,सीता, राधा वगैरेशी संबंध जोडु शकणारी.. पण आपण असं होउ शकत नाही याची खंत देखील वाटते..
2 Jun 2016 - 6:50 am | प्रचेतस
राग मेघ मल्हार म्हणजे प्रश्नच नाही.
आहाहाहा... काय गायकी आहे राव.
बाकी तुम्ही सध्या चित्रांगदा सोडून गेल्यामुळे अंमळ हळवे झाला आहात ह्याची कल्पना आहे.
16 Oct 2021 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले
काल सहज बोलता बोलता हा विषय निघाला . पाच वर्षं होऊन गेली राव , वेळ कसा जातो कळत नाही ! असो.
युट्युब वर सापडला हे : भीमसेनजींच्या आवाजातील ही बंदीश -
2 Jun 2016 - 6:55 am | यशोधरा
चांगलं लिहिलंय, आवडलं.
2 Jun 2016 - 10:23 am | नाखु
खरा की तो प्रगो तेच कळेना, ज्याम केमीकल लोच्या करतो हा गिरिजा आणि मग....
जावूदे निष्कारण डोक्याला शॉट...
भिजपावसात कोरडाठाक नाखु
2 Jun 2016 - 9:24 pm | जेपी
+1
आयडेंटी क्रायसीस!.
2 Jun 2016 - 10:31 am | धनंजय माने
सुरेख लिहिलंय ओ!
2 Jun 2016 - 10:41 am | संजय पाटिल
काय बोलनार? नि:शब्द..
2 Jun 2016 - 2:53 pm | सतिश गावडे
गिरिजाप्रसाद, खयाली पुलावाची पाकृ छान जमली आहे. नजरेसमोर कुणी चित्रांगदा नसल्याने विकांताला करुन पाहता येणार नाही.
2 Jun 2016 - 6:55 pm | कपिलमुनी
मनात असते रे !
बाकी यांचा पाउस वेगळा आपला वेगळा!
2 Jun 2016 - 2:35 pm | स्पा
खल्लास लिहील आहेस रे
पहिलाच परिच्छेद बेहद्द आवडला
2 Jun 2016 - 3:25 pm | सुखी
लै भारी....
2 Jun 2016 - 3:27 pm | स्वामिनी
अगदी सुरेख लेख.
2 Jun 2016 - 5:38 pm | आनन्दा
o-/ \_. खरेच दंडवत. तुम्ही फारच भारी लिहिता.. कधी संधी मिळाली तर तुम्हाला भेटायला आवडेल.
2 Jun 2016 - 5:48 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
मलाही भेटायला आवडेल.
2 Jun 2016 - 7:42 pm | राजाभाउ
मी पण
3 Jun 2016 - 8:34 am | नाखु
रांग नक्की कुठपर्यंत आहे?
3 Jun 2016 - 4:39 pm | सूड
तळ्यातल्या गणपतीपरेंत पोचली आहे, लवकर या.
2 Jun 2016 - 8:13 pm | सूड
बरंय
3 Jun 2016 - 5:55 pm | मारवा
असोसिएशन्स फार सुंदर उतरलेल्या आहेत.
कोमल क्षणांची तरल अभिव्यक्ती सुखावुन गेली.
फार च सुंदर लिहीता तुम्ही.
3 Jun 2016 - 8:52 pm | आनन्दा
हेच ते वाक्य जे लिहयला मी शब्द शोधत होतो.
धन्यवाद.
4 Jun 2016 - 7:16 pm | विवेकपटाईत
गाण्याप्रमाणे लेख हि संदर. बदरा राणीच्या प्रतीक्षेत.
8 Jun 2016 - 10:33 am | अभिजीत अवलिया
काही लोकांच्या लेखणीत जादू असते. तुम्ही देखील तसेच एक लेखक आहात.
29 Jun 2016 - 5:12 pm | मराठी कथालेखक
छान कथा..
30 Jun 2016 - 2:27 am | विजुभाऊ
गिरीजा भाऊ..... लै नॉस्टाल्जीक केलस रे भावा...........
पावसाळ्यातलं सातारा.......... आपलाच काय? तर सगळ्या सातारकरांचा वीक पॉईंट आहे बघ
30 Jun 2016 - 11:37 am | जागु
छान लिहील आहे.
हे आठवणीचं साला एक बेकार असतं, एकदा का आठवायला लागलं की काहीही आठवतं, अगदी मनाच्या कोणत्या तरी कोपर्यात लपुन बसलेलं काहीही अगदी काहीही. ही वाक्ये छानच आहेत.
18 Mar 2019 - 8:50 pm | राघव
भिडणारं लेखन. २-३ तरी संध्याकाळ आठवल्यात. :-)
24 Mar 2019 - 5:52 pm | आरवी
24 Mar 2019 - 5:54 pm | आरवी
24 Mar 2019 - 5:59 pm | आरवी
24 Mar 2019 - 5:59 pm | आरवी