शनिवारवाड्याचे रहस्य (कथा)

सागर's picture
सागर in जनातलं, मनातलं
19 Apr 2009 - 3:22 pm

नमस्कार मित्रांनो,

पुढील कथा मी कॉलेजमधे शिकत असताना लिहिली होती. त्या कथेत माफक बदल करुन मी ही कथा सर्व वाचकांच्या सेवेस सादर करत आहे, वाचकांना विनंती की आपले अभिप्राय जरुर द्यावेत.

- सागर
------------------------------------------------------------

शनिवारवाड्याचे रहस्य
-१-
रात्री मी "पोल्टरगिस्ट" चा शेवटचा शो पाहून निघालो होतो. एखादा हॉरर् चित्रपट पाहून रात्री बारा वाजता रस्त्यावरुन जाणे म्हणजे काय असते? हे सांगून कळणार नाही. मी चित्रपट पाहून जाम घाबरलो होतो...असली भुते-खेते बघायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत आणि मारुतीचे नाव घेत मी घरी निघालो होतो. "वेस्ट्-एन्ड" टॉकीजपासून मी निघालो. मी राहतो रास्ता पेठेत जाताना मला वाटले की थोडे वाकड्या वाटेने घरी जावे. म्हणून मी पॉवर हाऊसमार्गे के.ई.एम. हॉस्पिटलच्या समोरुन जायला निघालो. अचानक माझे लक्ष हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे गेले. एक व्यक्ती धडपडत माझ्या दिशेने येताना दिसली. मला काहीच कल्पना नव्हती, अचानक तो माणूस माझ्या अंगावर जवळ जवळ कोसळलाच. त्याने लगेच माझ्या हातात एक कागदाचा बोळा कोंबला. प्रकाशात मला दिसले की त्याच्या पाठीत सुरा खुपसलेला होता. मी धोका ओळखला व बाजूच्या भिंतीकडे जाऊन एका झाडामागे लपलो. भीतीने माझी गाळणच उडाली होती. तरी मी धाडस करुन एक दगड उचलला आणि रस्त्यावरचा सार्वजनिक दिवा फोडून टाकला. तेवढ्या भागापुरता तरी अंधार पसरलेला होता. माझ्या हातात कागदाचा बोळा कोंबून धडपडत पुढे पळालेला गृहस्थ आता अंगातील त्राण संपल्यामुळे जमिनीवर निपचित पडलेला होता. तेवढ्यात एक माणूस के.ई.एम्.च्या आतून पळत आला व रस्त्यावर पडलेल्या माणसाची तपासणी करु लागला. पुढे हा काय करतो? हे पाहण्यापूर्वीच मी तेथून पलायन केले. न जाणो आपण याच्या हाती सापडलो तर? मी जवळ जवळ घर येईपर्यंत पळतच होतो. घरापाशी आल्यावरच मी थांबलो. घरी येऊन कपडेही न बदलता मी झोपून गेलो एवढा मी घाबरलो होतो.....

-२-
दुसर्‍या दिवशी मी उशीरा उठलो. रविवार असल्याने आईनेही मला नेहमीप्रमाणे उठवले नाही. उठल्यावर मला जाणवले की काल रात्री कपडे न बदलताच झोपलो होतो. लगेच काल रात्रीचा सर्व प्रसंग मला आठवला. आपसूकच अंगावर शहारा आला. नकळतच माझा हात खिशात गेला. त्या माणसाने माझ्या हातात दिलेला कागदाचा बोळा तसाच अजून खिशात होता. तो मी उलगडला, एका बाजूवर शनिवारवाड्यासंदर्भात काहितरी लिहीले होते व दुसर्‍या बाजूला एका नकाशावर काही चिन्हे होती. नंतर नीट पाहू असे ठरवून मी उठलो. सर्व आवरुन मी शनिवारवाड्यावर जाऊन बसलो. म्हटले ज्या वास्तूचा उल्लेख कागदावर आहे त्याच ठिकाणी जाऊन पाहिलेले बरे असा विचार करुनच मी शनिवारवाडा गाठला होता.

शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच एक माडी आहे, ती माझी आवडती जागा आहे. तिथेच एका कोपर्‍यात बसून तो कागद मी वाचत होतो. त्या कागदाच्या पहिल्या पानावर (बहुतेक त्या माणसाने...) लिहिले होते की, "सन ११७६ मध्ये घडवलेली नटराजाची रत्नजडीत मूर्ती शनिवारवाड्यासमोरील बाजीरावाच्या पुतळ्याखाली आहे." मी बायनॉक्युलर (दूरदर्शी) आणला होता. त्यातून मी बाजीरावाच्या पुतळ्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. बाजीरावाची घॉड्यावरची मर्दानी मूर्ती पाहताच अस्सल मराठी माणसाच्या नसा फुगल्याशिवाय रहात नाही. बाजीराव खूप पराक्रमी होता यात काही संशय नाही. पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला. शत्रू हातातून सुटू नये म्हणून उभ्या घोड्यावरच हातावर हुरडा भरडून पोट भरुन परत लढाईला कूच करणार्‍या पहिल्या बाजीरावाच्या या कथा केवळ दंतकथा म्हणूनच आता ओळखल्या जातात. बाकी ही मस्तानी होती खूप सुंदर म्हणूनच बाजीरावासारखा रांगडा गडी तिच्यावर भाळला की काय न कळे. पण मस्तानीचेही बाजीरावावर तेवढेच प्रेम होते हेही तितकेच खरे. असो, तर मी माडीवरच्या कोपर्‍यातून बाजीरावाच्या पुतळ्याकडे पाहिले पण तेथे मूर्ती काही दिसली नाही. थोडे डॉके चालवल्यावर कळाले की एवढी मूल्यवान मूर्ती उघड्यावर कोणी ठेवणार नाही. ती बरोबर पुतळ्याच्याच जागी जमिनीखाली असणार. मी पुढे वाचू लागलो -
" ही मूर्ती देशाची मालमत्ता आहे. त्यामुळे मी ही अनमोल मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा विचार करतोय. मूर्तीकडे जाण्याचा नकाशा मागे दिला आहे. मी तर ही मूर्ती काढणे अशक्यच आहे, म्हणून कोणातरी विश्वासू व्यक्तीलाच ही माहिती देण्याचा मनसुबा आहे."
- वीरेन्द्र प्रताप सातव
१२ ऑगस्ट १९९२.

मी विचार करु लागलो, ज्याअर्थी हे पत्र अशा पद्धतीने लिहिले आहे त्याअर्थी खून झालेली व्यक्ती दुसरीच असावी. मी लगेच खाली गेलो व तेथे बसलेल्या विक्रेत्याकडून "सकाळ" व "केसरी" ही पुण्यातील दोन अग्रणी वर्तमानपत्रे विकत घेऊन आलो.मी एवढ्या घाईत घरुन निघालो होतो की न्यूजपेपर वरुन नजर फिरवायची देखील सवड मिळाली नव्हती. पेपर घेऊन मी शनिवारवाड्याच्या माडीवर परत आलो. अगदी पहिल्याच पानावर खुनाची सविस्तर बातमी आलेली होती. मी मन लावून ती सर्व बातमी वाचून काढली. ज्याचा खून झाला होता त्या व्यक्तीचे नाव होते रामदास जाधव. खून करणारा त्याचा भाऊच होता - सीताराम. एका गुप्त आणि प्राचीन मूर्तीची माहिती असलेला नकाशा रामदासकडे होता, म्हणून सीतारामने हा खून केला होता. आपला लहान भाऊ मेला आहे हे कळाल्यावर सीताराम स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला होता. त्यामुळे पोलिसांचे काम संपल्यात जमा होते. पण माझे काम संपले नव्हते, कारण त्या नकाशाचे उत्तरदायित्व आता माझ्याकडे होते. मला ती मूर्ती शोधून काढून सुखरुपपणे पुरातत्त्व खात्याकडे सुपुर्त करायची होती. खूनाचा साक्षिदार म्हणून मी जाणारच नव्हतो, आणि आता तशी गरजही नव्हती. मी घड्याळात पाहिले. नऊ वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मी खाली उतरलो व शनिवारवाड्याच्या शेवटच्या बाजूस असणार्‍या बंद असलेल्या भुयाराच्या दरवाजाच्या जवळ जाऊन बसलो.

-३-
बरोबर दहा वाजता एक माणूस आला व भुयारात जाणार्‍या लोखंडी दरवाज्याचे कुलुप काढून आत गेला. तसे होणार हे मला माहित होते. कारण कॉलेज मधे असताना कॉलेजचे रटाळ तास बुडवुन आम्ही सगळे मित्र इथे शनिवारवाड्यातच येऊन अभ्यास करायचो. तेव्हा दररोज सकाळी १० वाजता एक माणूस भुयारातील पाण्याची मशीन चालू करायला यायचा. या माहितीचा आज अशा वेळी उपयोग होईन अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तर नेहमीप्रमाणेच आजही तो माणूस आला व भुयाराच्या जाळीच्या दरवाजाचे कुलुप उघडून आत गेला. आजूबाजूला पहात मी भुयाराजवळ आलो. कोणी आपल्याकडे पहात नाही याची खात्री करुन मी भुयाराच्या दारातून प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला एक असे दोन फाटे फुटतात. मशीन सुरु करायला तो माणूस डावीकडे वळाला होता. मला बाजीरावाच्या पुतळ्याखाली जायचे असल्यामुळे मला उजवीकडेच जायचे होते त्याप्रमाणे मी उजवीकडे वळालो. शनिवारवाड्याच्या भुयारांबद्दल एक आख्यायिका आहे. शनिवार वाड्यातून एक भुयार थेट पर्वतीपर्यंत जाते आणि दुसरे भुयार रास्ता पेठेतील रास्तेवाड्यात उघडते. सध्या रास्तेवाड्यात शाळा चालू आहे, तरी शाळेच्या पायर्‍यांपाशीच एक खूप मोठे लोखंडी दार आहे जे कायम कुलुपबंद असते. पर्वतीवरही कायम कुलुपबंद असलेले एक दार आहे. आज या दंतकथेवरील पडदा उघडणार का? असे अनेक विचार मनात येत होते. पुढे खूप अंधार होता. खालच्या बाजूला उतरत जाताना पुढे काय घडणार? हा प्रश्न माझ्या मनात उत्कंठाही निर्माण करत होता आणि भीती देखील.

मी नेहमी एक छोटासा कि-चेन टॉर्च जवळ बाळगायचो, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. आज तो छोटासा टॉर्च उपयोगाला आला होता. सुरुवातीचे अंतर मी दबकत दबकत टॉर्च न पेटवता चालत होतो कारण मशीन चालू करायला आलेल्या त्या माणसाला टॉर्च चा प्रकाश दिसण्याचा संभव होता. काही अंतर गेल्यावर मला थोड्या ओबडधोबड पायर्‍या पायाला लागल्या. तोल जाईन म्हणून मी टॉर्च पेटवला. पायर्‍या एकूण पाच होत्या. खाली उतरल्यावर एकदम माझ्या पायांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. माझे दीड हजार रुपये किंमतीचे बूट पूर्णपणे बुडुन पाणी माझ्या घोट्याला लागले होते. मी टॉर्चचा प्रकाश इकडे तिकडे फेकत पुढे निघालो. अधून मधून नकाशाही पहात होतो. नकाशात असलेल्या खुणा टॉर्चच्या प्रकाशात शोधणं म्हणजे दिव्यच होतं. पहिली मुख्य खूण शनिवारवाड्याच्या दरवाज्यापाशी होती. त्यामुळे मला खूप पुढे जावे लागले. बर्‍याच वेळाने मला असे वाटले की मी आता शनिवारवाड्याच्या प्रासिद्ध पोलादी दरवाज्याखाली आहे. पहिली खूण सूर्याची होती.... " " अशी. टॉर्चच्या प्रकाशात मला ती खूण सापडायला थोडे कष्टच पडले. कारण ती खूण नेमकी माझ्या डोक्यावर होती व मी आजूबाजूला शोधत होतो. पुढे भुयाराने डावीकडे वळण घेतले होते.

पुढची खूण होती चंद्राची.. "". या दोन्ही खुणा शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजावर कोरलेल्या आहेत हे मला त्यावेळी आठवले.मी हळू हळू पुढे जात होतो. एकेक खुणा सापडत होत्या. हा नकाशा नसता तर शनिवारवाड्याच्या पोटात असलेल्या भुयारांच्या भुलभुलैय्यात मी कुठे हरवलो असतो कोण जाणे.

-४-
भुयारांतून वळणे घेत घेत मी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. नकाशात एक खूण होती "". ही खूण दगडात अवघड जागी कोरलेली मला सापडली. नकाशातला रस्ता डावीकडे वळायचा संकेत देत होता व प्रत्यक्षात भुयाराचा मार्ग उजवीकडे जात होता. माझे डोके खजिना शोधाच्या साहसकथा वाचून बरेच सुपीक झाले होते त्यामुळे मी लगेच ओळखले की येथे गुप्त द्वार आहे. मी खुणेचे टॉर्चच्या अंधुक प्रकाशात नीट निरीक्षण केले व खुणेतील गोलाकार फुगीर असल्याचे जाणवले. तो फुगीर गोल भाग दाबताच समोरची भिंत आवाज करत मधोमध दुभंगली व माझ्यासाठी डाव्या बाजूने जायचा मार्ग मोकळा झाला. मी आत पहात हळूच प्रवेश केला. एव्हाना पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले होते व माझी आवडती डेनिमची पॅन्टदेखील खराब झाली होती. मी आत प्रवेश केल्याकेल्या एक रिकामा चौथरा माझ्या दृष्टीस पडला. त्यावर मूर्ती नव्हती. आपल्याला यायला उशीर झाला की काय असे वाटून मी निराश झालो. कोणी घेतली असेन याचा विचार करत मी खिन्न होऊन बसलो होतो. मी एकदम माझ्या घड्याळाच्या आवडत्या ट्यूनने भानावर आलो. शेवटचा प्रयत्न म्हणून मी त्या चौथर्‍याची तपासणी करु लागलो. तपासणी करताना कोणती कळ दाबली गेली न कळे पण चौथर्‍याची फरशी आपोआप बाजूला झाली. त्या चौथर्‍याच्या आत टॉर्चचा प्रकाश न टाकताही ती रत्नजडीत मूर्ती मला लगेच दिसली कारण मूर्तीची सर्व रत्ने खूप चमकत होती. बहुतेक ते सर्व हिरे असावेत असे वाटले, कारण रत्न ओळखण्याइतपत ज्ञान मला नव्हते. फक्त हिरा अंधारात चमकतो एवढेच मला माहित होते. मी माझ्या पाठीवरची सॅक काढली. मी पोहायला चाललो आहे असे आईला सांगून बाहेर पडलो होतो. त्यामुळे सॅक मधे टॉवेलदेखील आणलेला होता मी. तर सोबतच्या टॉवेलात इतिहासातील तो अनमोल रत्नजडीत मूर्तीचा ठेवा काळजीपूर्वक गुंडाळला. मूर्ती सॅकमधे ठेवून मी घड्याळाकडे एक नजर टाकली. माझ्या घड्याळाचे रेडीयमचे काटे अंधारात ११.०५ ही वेळ दाखवत होते. मूर्ती जड होती व त्यात मला पाण्यातून चालायाचे असल्यामुळे थोडा त्रास झाला. पण मी सुखरुपपणे भुयाराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो .

-५-
दाराला परत कुलूप लागलेले होते. मला यायला थोडासा उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तो माणूस ११ वाजता कुलूप लावून निघून गेला होता. खिशातून काही मिळते का ते मी पाहू लागलो. हेरगिरीच्या व साहसे करण्याच्या स्वभावापायी मी अनेक वस्तू जमवून ठेवल्या होत्या त्यात अनेक चाव्यापण होत्या. खिशात काही नाही मिळाले पण माझ्या सॅकमधे हा चाव्यांचा जुडगा होता. दरवाजा जाळीचाच होता. त्यामुळे बाहेर हात घालून कुलुप उघडण्याचा प्रयत्न करणे सहज शक्य होते. मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते. माझ्याकडच्या चाव्यांपैकी एका चावीने ते छोटेसे कुलूप जास्त कष्ट न करता माझ्या सुदैवाने सहजपणे उघडले गेले. बाहेर जाताना मुख्य दरवाजावरील कर्मचारी विचित्र व हेटाळणीच्या नजरेने पहात होता. बरोबर होते त्याचे. गुढग्यापर्यंत पॅन्ट पूर्णपणे भिजलेली, अंगावर असलेली माती, असा माझा अवतार पाहून कोणीही असेच पाहिले असते. तर मी शनिवारवाड्याबाहेर जाताच पहिल्यांदा पब्लिक टेलिफोन बूथ गाठला. सुदैवाने सुटी नाणी होती माझ्याकडे. मी सर्वप्रथम पुण्याच्या महापौरांना फोन केला व थोडक्यात माझा हा उद्योग कळवला आणि पुरातत्त्व खात्याच्या इमारतीत यायची विनंती केली.

मी भांडारकर रस्त्यावरील पुरातत्व खात्याच्या इमारतीत पोहोचेपर्यंत महापौरदेखील आलेले होते. मी येताच महापौरांनी मला जवळ घेऊन माझे खूप कौतुक केले. मूर्तीची माहिती समजताच सर्व वर्तमानपत्रांचे वार्ताहरही आलेले होते. ती रत्नजडीत मूर्ती पुरातत्त्व खात्याकडे सोपवायचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. मी शांतपणे घरी परतलो. घरी येई पर्यंत संध्याकाळ झालेली होती. खूप थकलो असल्याने मी रात्री लवकर झोपलो...

दुसर्‍या दिवशी सकाळी पेपर मध्ये पहिल्या पानावर माझ्या पराक्रमाची सविस्तर हकिकत आलेली होती. अगदी ती रत्नजडीत मूर्ती व महापौर यांच्यासोबत काढलेल्या फोटोसकट. पेपर पाहूनच आईने मला साखरझोपेतून उठवले व म्हणाली- कार्ट्या असे उद्योग करायला उलथला होतास होय? पण गुणाचं ते माझं पोर"... म्हणून आईने मला जवळ घेतलं ...
एका रात्रीत मी सार्‍या पुण्यात फेमस झालो होतो. मला मात्र एका मोठ्या रहस्यावरचा पडदा उघडल्यावर सहजच एक डायलॉग आठवला. माय नेम इस बॉन्ड ... जेम्स बॉन्ड... हा हा...
-सागर

http://sagarkatha.blogspot.com/
(© १९९२ - २००९, सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.या कथेतील कोणताही भाग किंवा कोणतीही कल्पना कोणत्याही कारणासाठी वापरण्यासाठी लेखकाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे)

सर्व वाचक मित्रांना एक नम्र विनंती आहे की, माझ्या कथा तुम्ही तुमच्या सर्व मित्र-मैत्रीणींना पाठवू शकता वा तुमच्या संगणकावर साठवून ठेवू शकता. मात्र कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वा तत्सम व्यवहारासाठी माझी परवानगी आवश्यक आहे.
धन्यवाद ,
सागर

कथाबालकथाइतिहासलेख

प्रतिक्रिया

अनंता's picture

19 Apr 2009 - 3:41 pm | अनंता

सागर ! मस्त कथा. आवडली .
शेवटही खासच ;)

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

सागर's picture

19 Apr 2009 - 9:46 pm | सागर

धन्यवाद अनंता :)
तुमच्या तत्पर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
- सागर

अरुण वडुलेकर's picture

19 Apr 2009 - 3:52 pm | अरुण वडुलेकर

रहस्यकथा अप्रतिम आहे. हे कथा बीज इतके सशक्त असतांना कथा इतकी तोकडी कां हा प्रश्न आहे.
ही कथा आणखी विस्तारित होऊ शकली असती हे नक्की. तशी ती आणखी विस्तारित झाली तर तिच्यावर
एखादी दूरदर्शन मालिकाही होऊ शकेल. कृपया प्रयत्न करावा.

सागर's picture

19 Apr 2009 - 9:36 pm | सागर

धन्यवाद अरुणजी,

मी ही तुमच्या मताशी वैयक्तीकरित्या पूर्णपणे सहमत आहे.
आधीच उल्लेख केल्याप्रमाणे ही कथा मी कॉलेज मधे शिकत असताना लिहिलेली होती. जवळपास १२ वर्षांपूर्वी. हीच कथा नव्याने लिहून अधिक फुलवता आली असती यात शंका नाही... पण ही कथा नव्याने लिहायची तर तेवढा वेळही द्यावा लागतो आणि माझी ही कथा वाचकांना द्यायला अगोदरच उशीर झालेला होता. त्यामुळे अधिक फेरबदल न करता आहे तशी टंकीत केली एवढेच... पुढे कधीतरी नक्की विस्तारीत करेन
धन्यवाद
सागर
अवांतरः मालिकेची कल्पना आवडली. निर्माता मिळाला तर अवश्य प्रयत्न करेन :)

क्रान्ति's picture

19 Apr 2009 - 4:13 pm | क्रान्ति

रहस्य चांगलं मांडलं आहे, अजून विस्तार करता आला, तर जास्त रंगत येईल.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

सागर's picture

19 Apr 2009 - 9:38 pm | सागर

सहमत क्रान्ति,
ही कथा माझी स्वतःची देखील खास आवडीची आहे.
विस्तार करण्याचा जरुर प्रयत्न करेन.
जरा वेळ लागेल एवढेच :)
धन्यवाद
सागर

भडकमकर मास्तर's picture

19 Apr 2009 - 4:37 pm | भडकमकर मास्तर

कथा छोटी आहे तरी आवडली.
अमृत वगैरे मासिकांमध्ये अशा प्रकारच्या कथा येत असत त्याची आठवण झाली....

कथानायकावरती सुरुवातीचे संकट ( खून करणारा माणूस जवळ येणे) वगळता फारशी संकटे येत नाहीत .... त्यामुळे संघर्ष अधिक इन्ट्रेष्टिंग होत नाही..... ( कामगार दहा वाजता दरवाजा उघडतो,कळ आपोआप सापडते, डुप्लिकेट किल्ली असतेच आणि आपोआप लागते इ.इ.इ.)

कथानायकाला ती मूर्ती शोधणं का आवश्यक आहे? ( व्हॉट इज ऍट स्टेक?).....
१. कदाचित शाळा कॉलेजात घाबरट म्हणून त्याची थट्टा होते.... ( भीती एक उसके अंदरका काला बंदर हय)... स्वतःच्या आतल्या भीतीशी लढत ( उदा. याला क्लॉस्ट्रो फोबिया आहे... तरी अरुंद भुयारात जावे लागते... का? तर स्वतःला प्रूव्ह करायला...इ.इ. किंवा पाण्याची भीती असताना पोहावे लागते... पाण्यात बुडावे लागते वगैरे)

२. साहसानंतर मैत्रीण अधिक इम्प्रेस व्हायची शक्यता.... प्रेम मिळवायला हे सारे ....

आणखी आवश्यक मसाला चालून गेला असता.....
१. छान छोटीशी सुबक मैत्रीण... ( उगीचच बाँड कस्काय होणार तो?)
२. मूर्तीपाशी खून करणार्‍या व्हिलनची इतर माणसे येणे आणि त्यांना गुंगारा इ.इ. देणे ...
३. आवश्यक तितकी मारामारी आणि इतर साहस
४. मूर्ती मिळाल्यानंतरही ती ज्याला द्यायची म्हणून फोन केला जातो त्याने डब्बल क्रॉस करणे इ.इ...... विश्वासघात वगैरे वगैरे.
५. मावसबहिणीचे चुलताआजोबा निवृत्त पोलीस कमिशनर असणे
किंवा मावस आत्याचे चुलत मेव्हणे पुरातत्त्वखात्यात अधिकारी असणे , ..... ( "अरे हीच ती मूर्ती जी आम्ही गेली कित्येक वर्षे शोधत होतो ".. असे म्हणत त्यांनी शाबासकी देणे..)
६. आणि शेवटी मैत्रिणीने कौतुक भर्‍या नजरेने एक स्माईल देणे वगैरे

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर,

तुमच्या सर्व सूचनांबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
तुमच्या सर्व सूचनांची नोंद करुन ठेवली आहेच, कथा विस्तारित करेन तेव्हा तुमच्या सर्व सूचनांचा नक्की विचार करेन व त्याप्रमाणेच कथेचा विस्तार करेन. एवढ्या आपुलकीने तुम्ही या सर्व सूचना केल्यात याबद्दल खूप खूप धन्यवाद
एक छोटासा खुलासा करायची इच्छा आहे:
( कामगार दहा वाजता दरवाजा उघडतो,कळ आपोआप सापडते, डुप्लिकेट किल्ली असतेच आणि आपोआप लागते इ.इ.इ.)
मी जेव्हा नूमवित ११वी आणि १२वी शिकत होतो तेव्हा खरेच एक कामगार बरोबर सकाळी १० वाजता भुयाराचे कुलुप उघडायचा. :) शनिवारवाड्याच्या रचनेचा ही कथा लिहिताना बर्‍यापैकी अभ्यास केला होता. जसे सूर्य आणि चंद्र यांची चिन्हे खरोखर शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्यावर आहेत :)

ही कथा लिहिली तेव्हा मी स्वतः किशोरवयीन होतो, त्यामुळे या कथेचं नायकत्व एका किशोराकडे येणं अपरिहार्य होतं ;)
अशा प्रकारच्या कथानकावर एखादा सुंदर चित्रपट तयार होऊ शकेन असे मलाही वाटते. पण आपले मराठी चित्रपट चाकोरीबाहेर क्वचितच जाताना दिसतात. असो...
पुन्ह एकदा मनापासून धन्यवाद,
- सागर

आंबोळी's picture

20 Apr 2009 - 2:58 pm | आंबोळी

आणखी आवश्यक मसाला चालून गेला असता.....
खरे आहे. तुम्ही खाली दिलेला मसाला पाहुन मला तर चित्रपतच दिसायला लागला....

१. छान छोटीशी सुबक मैत्रीण... ( उगीचच बाँड कस्काय होणार तो?)
निवेदीता जोशी-सराफ.
१.१ एखादा बावळट मित्र / आत्ते / मामे भाउ : लक्ष्या + त्याची मैत्रीण : प्रिया अरूण

२. मूर्तीपाशी खून करणार्‍या व्हिलनची इतर माणसे येणे आणि त्यांना गुंगारा इ.इ. देणे ...
दीपक शिर्के / राहुल सोलापूरकर....

३. आवश्यक तितकी मारामारी आणि इतर साहस
यात दोघांच्या हिरवीणी पण भाग घेतात....

४. मूर्ती मिळाल्यानंतरही ती ज्याला द्यायची म्हणून फोन केला जातो त्याने डब्बल क्रॉस करणे इ.इ...... विश्वासघात वगैरे वगैरे.
निळू फुले / (चेहरा दोळ्यासमोर आहे पण नाव आठवेना...)

५. मावसबहिणीचे चुलताआजोबा निवृत्त पोलीस कमिशनर असणे किंवा मावस आत्याचे चुलत मेव्हणे पुरातत्त्वखात्यात अधिकारी असणे , ..... ( "अरे हीच ती मूर्ती जी आम्ही गेली कित्येक वर्षे शोधत होतो ".. असे म्हणत त्यांनी शाबासकी देणे..)
जयराम कुलकर्णी.... दुसरा ऑप्शनच नाही.

प्रो.आंबोळी

सागर's picture

20 Apr 2009 - 4:13 pm | सागर

लई भारी ... =))

पात्रांच्या नावांसकट कल्पना एकदम मस्त आहे.
मसाला पण छान भरला आहे. माझ्या कथेचा पुढचा भाग लिहायचा विचार करत आहे आत्ताच .... :)
वाचकांच्या सर्व प्रेमळ सूचना विचारात घेऊन लेखन केले तर नक्की नवीन भाग तयार होईल.....

सर्व सूचना शिरोधार्य प्रो. आंबोळी... :)
धन्यवाद
सागर

शितल's picture

19 Apr 2009 - 5:38 pm | शितल

कथा आवडली, मस्त लिहिले आहे. :)

सागर's picture

19 Apr 2009 - 9:52 pm | सागर

धन्यवाद शितल :)
सागर

बाकरवडी's picture

19 Apr 2009 - 6:12 pm | बाकरवडी

लय भारी कथा.

'बालमित्र' वाचतोय असं वाटल.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

सागर's picture

19 Apr 2009 - 9:53 pm | सागर

धन्यवाद बाकरवडी
कथा लिहिली तेव्हा मी देखील "बाल"च होतो ;)
सागर
अवांतर : बाकरवडी वाचून मला पुण्याची चितळेंची बाकरवडी आठवली... अर्थात इकडे बंगळुरात पण मिळते त्यामुळे चिंता नाही... :)

सुधीर कांदळकर's picture

19 Apr 2009 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

कथेची भाषा वेगवान. उत्कंठा निर्माण पण त्वरित होते, उत्तरोत्तर वाढत पण जाते. पण मास्तरांच्या सूचना लक्षांत घेऊन तंत्र आत्मसात करा. आणि अशाच कसदार रहस्यकथा पण जास्त, योग्य लांबीच्या रहस्यकथा येऊं द्यात. हा बाज आपल्याला चांगला जमला आहे.

पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला.

या आपल्या मताशीं सहमत नाहीं. मस्तानी हा बाजीरावाच्या आयुष्याचा खाजगी भाग होता. इतिहासाशीं त्याचें फारसें देणेघेणें नाही. तिचा पुत्र समशेर याचें भरपूर उदात्तीकरण साहित्यांत आढळतें. असो. कथेचाहि तो महत्त्वाचा भाग नाहीं.

सुधीर कांदळकर.

सागर's picture

19 Apr 2009 - 10:00 pm | सागर

धन्यवाद सुधीरकाका,

तुमचे निरीक्षण वाखाणण्याजोगे आहे. यापुढे नक्की विस्तारित कथा लिहीन. अर्थात वर एका प्रतिसादात ही कथा विस्तारीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले आहेच.
पण दुर्दैवाने पहिला बाजीराव हा त्याच्या पराक्रमापेक्षा मस्तानी नावाच्या यवनी नायकिणीच्या प्रेमासाठीच लोकांनी लक्षात ठेवला.
याबद्दल मला सांगायचे हे होते की पहिला बाजीराव कोण हा प्रश्न आला की तो कोण होता त्यापेक्षा त्याची मस्तानी नावाची प्रेयसी खूप सुंदर होती याच्याच पुण्यात चर्चा चालायच्या. लेखनातून प्रबोधन देखील करावे या हेतूने समाजाला थोरला बाजीराव किती पराक्रमी होता हेच सांगायचा माझा प्रयत्न होता. पण तो तितकासा जमलेला दिसत नाही असे वाटते आहे. वेगळ्या पद्धतीने हे लिहायचा प्रयत्न करेन. हे निदर्शनास आणुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुधीरकाका :)
सागर

दशानन's picture

20 Apr 2009 - 7:06 am | दशानन

सुंदर !

जसे मास्तर म्हणत आहेत त्या पध्दतीने कथा वाढवता आली असती पण तरी ही जी कथा लिहलेली आहे ती मस्त आहे ह्यात काही वाद नाही, वाचकाला सुरवात केल्या पासून शेवट पर्यत न थांबता वाचायला लावणे ही खरं तर खुप मोठी गोष्ट.. त्यात लेखक यशस्वी झाला आहे.

सँडी's picture

20 Apr 2009 - 7:09 am | सँडी

सागर, कथा आवडली!
पुढील लेखनास शुभेच्छा!

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

सागर's picture

20 Apr 2009 - 7:29 am | सागर

राजे , सॅंडी
मनापासून धन्यवाद.
यापुढील कथा विस्तारीत असतील आणि तुम्हा सर्व वाचक मित्रांच्या सूचनांची अंमलबजावणी झालेली त्यात दिसेन :)
धन्यवाद
- सागर

यशोधरा's picture

20 Apr 2009 - 7:31 am | यशोधरा

सागर, मस्त कथा! सगळे म्हणतात त्याप्रमाणे फुलवता आली असती अजून.

सालोमालो's picture

20 Apr 2009 - 10:41 am | सालोमालो

असेच म्हणतो. सुंदर कथा!

मी चाल्लो शनीवारवाड्यावर! मस्तानीची मूर्ती सुद्धा असेल नक्कीच.

कथा वाचता वाचता गुल झालो
मस्तानीची मूर्ती मिळावी म्हणे सालो! :)

सालो

सागर's picture

20 Apr 2009 - 11:45 am | सागर

मस्तानीचे एक पेंटींग आहे खरे. पण ते कुठे आहे ते माहीत नाही. कदाचित पुरातत्त्व खात्याच्या चोरीच्या मालात सापडेल.
मी जेव्हा शनिवार वाड्यात जायचो १२ -१४ वर्षांपूर्वी तेव्हा डाव्या कोपर्‍यात एका स्त्रीचे अस्पष्टसे पेंटींग होते. आता आहे की नाही माहीत नाही. अर्थात ते मस्तानीचे नसावे.
मस्तानीबद्दल अधीक माहिती सांगतो.
सासवडला जाताना एक घाट लागतो. त्या घाटातून खाली नजर टाकली तर एक मोठा तलाव दिसतो.
त्याला मस्तानी तलाव असे म्हणतात. तिथे मस्तानी महाल होता. आता तिथे काहीच शिल्लक नाहिये. पण मस्तानी तलाव पाहून थोडक्यात समाधान मिळवा :)
- सागर
अवांतर : ह्याच घाटाच्या पुढे का अलिकडे आठवत नाही, पण अनेक दुकाने आहेत जिथे भेळ-भत्ता, मिसळ , तर्री हे सगळं एकदम छान मिळते... जरुर एन्जॉय करा :)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Apr 2009 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

सुंदरच आहे कथा.
मात्र 'माझे दिड हजाराचे बुट, डेनीमची पँट' वगैरे उल्लेख कशासाठी करण्यात आले आहेत ते लक्षात आले नाही.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सागर's picture

20 Apr 2009 - 2:21 pm | सागर

राजकुमारा...

कथा ही नायकाच्या बाजूने फुलवली आहे.
'माझे दिड हजाराचे बुट, आवडती डेनीमची पँट'
हे उल्लेख नायकाचे स्वतःच्या वस्तूंबद्दलचे प्रेम दाखवते. तरी कर्तव्यापुढे व साहसापुढे या आवडीच्या वस्तूंची फिकीर आपला नायक करत नाही. पण त्याच्या मनातील खंत जाणवावी या हेतूने हे उल्लेख केलेले आहेत :)
धन्यवाद
सागर

उदय सप्रे's picture

20 Apr 2009 - 1:48 pm | उदय सप्रे

सागरा,

मित्रा, हा तुझा गुण आजच कळत आहे ! भन्नाट लिहिली आहेस , बाकी विस्तारा च्या बाबत वर चर्चा झालीच आहे. पण तू छान लिहितोस हेच या सर्वांप्रमाणे मला पण म्हणायचे आहे ! भविश्यात अजून काही वाचायला मिळो ही सदिच्छा !
तुझा दोस्त ,
उदय सप्रे

सागर's picture

20 Apr 2009 - 2:24 pm | सागर

उदय मित्रा,

तुझा प्रतिसाद पाहून आनंद झाला. अर्थात तुझ्याइतकी झेप घेण्याएवढी ताकद नाहीये .
सातत्याने लेखन करणे हे तुझ्याइतक्या कार्यशक्तीने मला नाही जमत याची खंत आहे पण मी हळू हळू प्रयत्न करत आहे ... :)
सागर

सूहास's picture

20 Apr 2009 - 2:32 pm | सूहास (not verified)

तू छान लिहितोस!!!!!!!! मस्त....

सुहास

सागर's picture

20 Apr 2009 - 9:42 pm | सागर

धन्यवाद सुहास
अर्थात तुझ्याएवढं सातत्यानं नाही लिहिता येत :)
ते जमलं की माझ्या अनेक कथा दिसतील हा हा
- सागर

अडाणि's picture

21 Apr 2009 - 12:55 am | अडाणि

कुलुपाचे कोडे नीट सुटलेले नाहीये...
मी कुलुपाचे निरिक्षण केले. ते छोटेसे व साधेच कुलूप होते.

इथे कुलुपाचे वर्णन असे केले आहे कि ते कडी-कोयंड्याला लावायचे कुलुप आहे.... असे कुलुप त्या माणसाने बाहेरून लावले तर मित्रा तु आतुन कसे काय उघडणार ते?

-
अफाट जगातील एक अडाणि.

सागर's picture

21 Apr 2009 - 7:25 am | सागर

अडाणि बुवा,

मान्य आहे. मी दरवाज्याचे वर्णन करायला हवे होते :)
तो दरवाजा जाळीचा आहे ज्यातून सहजपणे हात घालून बाहेरचे कुलुप उघडता येईन
हा बदल कथेत केलेला आहे. उत्तम निरिक्षण :)
धन्यवाद
सागर

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 7:30 am | भडकमकर मास्तर

आतुन कसे काय उघडणार ते?
तो लोखंडी ग्रिलचा दरवाजा असेल...

-

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सागर's picture

21 Apr 2009 - 7:36 am | सागर

मास्तर माझ्या मनातले ओळखल्याबद्दल धन्यवाद :)

भडकमकर मास्तर's picture

21 Apr 2009 - 7:52 am | भडकमकर मास्तर

माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...
भरून पावलो...
...
आणि सर्वांच्या प्रतिसादाला प्रतिसाद दिल्याबद्दलही धन्यवाद...

अवांतर : आता बास की...
..
अतिअवांतर : आता या आता बास की ला सुद्धा प्रतिसाद द्या की बरं , बास करतो म्हणजे मला त्याला प्रतिसाद द्यायला बरं , मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
म्हणजे धागा सतत वर राहील... कसे?

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन's picture

21 Apr 2009 - 7:55 am | दशानन

>>आता या आता बास की ला सुद्धा प्रतिसाद द्या की बरं , बास करतो म्हणजे मला त्याला प्रतिसाद द्यायला बरं , मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद
म्हणजे धागा सतत वर राहील... कसे?

मला तुमच्या डोक्याचा एक्स-रे काढून बघायची खुप इच्छा आहे , काय काय डोक्यातून बाहेर शब्द येतील काय सांगता येत नाही राव तुमचे =))

थोडेसं नवीन !

सागर's picture

28 Apr 2009 - 6:49 pm | सागर

मला तुमच्या डोक्याचा एक्स-रे काढून बघायची खुप इच्छा आहे , काय काय डोक्यातून बाहेर शब्द येतील काय सांगता येत नाही राव तुमचे

सहमत आहे राजे

आताच्या नवीन प्रतिसादामुळे मी धागा वर राहण्यासाठी प्रतिसाद देतो हा आरोप आपोआपच अवास्तव झालेला आहे ;)

१.५ शहाणा's picture

27 Apr 2009 - 10:00 pm | १.५ शहाणा

मस्त रे

मेंढका's picture

30 Dec 2014 - 9:52 pm | मेंढका

दादा हि कथा वाचली आणी मि तुमचा पंखा झालो,नविन कथेच्या प्रतिक्षेत,
पु.ले.शू

चेतन677's picture

31 Dec 2014 - 10:29 pm | चेतन677

पुढील कोणती कथा लिहिणार असाल तर कथा संपवण्याची घाई करु नका...आम्हालाही कथेचा पूर्ण आनंद घेउ द्या...!!!