पुस्तकगप्पा

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in जनातलं, मनातलं
23 Aug 2021 - 10:08 am

नमस्कार.

'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.

लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

काही पुस्तकांची आणि तत्संबंधी विषयाची यादी जाहीर करायची आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाईन भेटून त्याबद्दल गप्पा मारायच्या, चर्चा करायच्या, मुलाखती ऐकायच्या... अशी ही संकल्पना. त्या-त्या पुस्तकाचे लेखक, अभ्यासक, समीक्षक, रसिक वाचक यांपैकी कुणी निमंत्रित असेल; कधी कुणी पुस्तकविक्रेता आपले सुरस अनुभव सांगेल; कधी कुणी वाचक एखाद्या अनवट पुस्तकाची ओळख करून देईल... असा बेत आहे. येत्या सहा महिन्यांची पुस्तकं आणि विषय इथे (https://docs.google.com/spreadsheets/d/1pKyMc8JHqMpLnjCCZZ6hAUkS7vQ9IfQ9...) बघता येतील. चर्चा 'झूम'वर होईल.
चर्चेतला सहभाग विनामूल्य आहे. 'यू ट्यूब'वरून चर्चेचं थेट प्रक्षेपणही केलं जाईल. त्याचा दुवा 'फेसबुक'वर प्रसिद्ध केला जाईल.

तुम्हांलाही सामील व्हायचं असेल, वा प्रश्न पाठवायचे असतील, तर आम्हांला marathi.upakram@gmail.com या पत्त्यावर एक इमेल पाठवा. सहभाग नोंदवल्यावर कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी कार्यक्रमाचा दुवा पाठवण्यात येईल. आमंत्रितांचं मानधन आणि तांत्रिक बाबींचा खर्च भागवण्यासाठी ऐच्छिक देणगी स्वीकारली जाईल.
अजून काही शंका वा प्रश्न वा सूचना असतील, तरीही कळवा. बोलूच...

मेघना, सई, किरण, नंदन

संस्कृतीवाङ्मयसाहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

23 Aug 2021 - 11:32 am | कंजूस

पण त्या mr dot upakram शी काही संबंध आहे का?
कुणाला समीक्षा/ परिक्षण लेखी द्यायचे असेल तर ते इथे देतीलच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Aug 2021 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपक्रम डॉट ओआरजीशी काही संबंध नसावा. यांचा यांचा उपक्रम आहे अशा अर्थाने.

बाकी मेघना आयडी बघितल्याबरोबर कोणत्या तरी गोष्टीची जाहिरात करायलाच आल्या असतील असा विचार चमकून गेला, आपलं काही ऑब्जेक्शन नै पण उगाच आठवण झाली. दिवाळीच्या वेळेसच त्यांचा धागा दिसायचा. रेषेवरील की रेषेखालील अक्षरं असा काही तरी उपक्रम आठवतो. चांगले उपक्रम असतात.

टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं.

बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच.

जॅक अर्थात दिलीप बिरुटे
( आंतरजाल जहाजावरील प्रवासी)

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2021 - 12:25 pm | चौथा कोनाडा

टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं.

😀

गॉडजिला's picture

23 Aug 2021 - 12:39 pm | गॉडजिला

सर दिलिप यांच्याशी पुर्ण सहमत

Bhakti's picture

23 Aug 2021 - 2:13 pm | Bhakti

बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच
शुभेच्छा!

Bhakti's picture

23 Aug 2021 - 2:13 pm | Bhakti

बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच
शुभेच्छा!

प्रचेतस's picture

23 Aug 2021 - 3:06 pm | प्रचेतस

सहमत आहे, काही सदस्य केवळ आपल्या संस्थळाची किंवा उपक्रमाची जाहिरात करण्यापुरतेच मिपावर येतात असे दिसते. इतर वेळी त्यांचे योगदान शून्य.

गुल्लू दादा's picture

23 Aug 2021 - 11:36 am | गुल्लू दादा

छान उपक्रम. मेल पाठवला आहे. धन्यवाद.

कंजूस's picture

23 Aug 2021 - 11:53 am | कंजूस

पुस्तकांचे प्रकाशन वर्ष टाकायला हवे.
आणि मग चर्चा ठेवा।
वर्गवारीत २०१०-२०२०
२००० -२०१०
१९९० - २०००
१९८० -१९९०
१९७०-१९८०
१९७० च्या अगोदरची पुस्तकं अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत योग्य वाटते.
कोसला आणि गारंबिचा बापू यात चर्चा करायचे शिल्लक नसेल.

कुमार१'s picture

23 Aug 2021 - 12:00 pm | कुमार१

छान उपक्रम.

उत्तम उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा मेभु.

शक्यतो मिपावरही ही चर्चा धागारुपात/ व्हिडिओ एम्बेड रुपात टाकून मिपाकरांना इथूनही सहभागी होता येईल असे करता आले तर बघावे. अशा चांगल्या उपक्रमांना मिपावर प्रसिद्धी मिळावी आणि उलट बाजूने अशा उपक्रमांनी आणि उपक्रमकर्त्याँनीही आपले मिपा संस्थळ या निमित्ताने अधिक प्रसिद्ध होईल असे पहावे ही सदिच्छा.

नवीन संस्थळ सुरू करता येईल. किंवा त्याचीच चाचपणी असवी. शुभेच्छा. एका चालू उच्च स्थथळापेक्षाही उच्च वगैरे अभिरुची असलेले तर मात्र कठीण आहे आमचे.
आम्ही ओनलाईन मिटिंगांना ब्वॉकतो. चेहरा फारच केविलवाणा दिसतो. बसमध्ये बसलेले लोक कधीकधी उठून जागाही देतात. शिवाय क्याम्रा खोलीतले मागचे दोरीवर टांगलेले कपडे दाखवतो.
बिरुटे सरांचं पटलं. उदाहरण पटलं.

स्मिताके's picture

24 Aug 2021 - 6:35 pm | स्मिताके

छान उपक्रम. ऐकायला आवडेल. पण या वेळेत जमलं नाही, तर नंतर यू ट्यूबवर रेकॉर्डिंग मिळेल का?

मेघना भुस्कुटे's picture

25 Aug 2021 - 10:04 am | मेघना भुस्कुटे

जाहिरात करण्याचा उद्देशच होता, आहे. या उपक्रमाबद्दल मिसळपाववरच्या वाचकांना माहीत व्हावं अशा हेतूनंच हे टिपण लिहिलं आहे.

सामील व्हायचं नसेल, तरी नंतर मुद्रण उपलब्ध असेलच. ब्लॉग असेल, फेसबुक पान असेल पुस्तकगप्पाचं. सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.

उपक्रमाला शुभेच्छा करण्याचा उद्देशच तुमची जाहिरात आहे हे समजले हे सामजावणे होता, अन्यथा मिपासाठी आपले योगदान शून्य ही बाब आनंदाने दुर्लक्षित केल्या गेली असती.

सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.

वावावा सगळीकडेसगळं आहे हे बाकि उत्तम पण आम्हीं तूर्त फक्त मिपावर आहोत त्यामूळे यातलं मिपावर काय उपलब्ध असेल ते जरा विस्तारुन सांगता काय ?

मेघना भुस्कुटे's picture

25 Aug 2021 - 10:06 am | मेघना भुस्कुटे

बाकी शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे अनेकानेक आभार!

बोलणारा कोण त्याचा चेहरा दिसलाच पाहिजे असे नसते.
पेंडसे,आणि नेमाडे कसे दिसतात हे सुद्धा पाहिलेले नाही.

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 1:34 pm | गॉडजिला

आहो त्यांचें नावच केव्हडे मोठें आहे... इतरांना मात्र चेहऱ्यांची गरज भासू शकतेे, थोडे समजुन घ्या ना गडे.

पाटिल's picture

28 Aug 2021 - 12:24 am | पाटिल

चांगला उपक्रम...! तुमच्या टीमला शुभेच्छा..!

गूगल शीटमधली कोसला, बाकी शून्य, गवत्या, नातिचरामि, हंस अकेला, ही नावं पाहून बरं वाटलं...
याशिवाय आणखीही काही हटके कादंबऱ्या आहेत.. नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस', अनिल दामलेंची 'गौतमची गोष्ट', अवधूत डोंगरेंची 'एका लेखकाचे तीन संदर्भ', मकरंद साठेंची 'गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी'

आणि अलीकडच्या लेखकांपैकी प्रशांत बागड, किरण गुरव, वर्जेश सोळंकी, प्रसाद कुमठेकर, दिनकर दाभाडे, जी के ऐनापुरे, सचिन कुंडलकर, जातेगावकर, जयंत पवार, रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांबद्दलही ऐकायला आवडेल, भविष्यात तुमच्या उपक्रमातून..
अर्थात तुमची स्वतःचीच वाचनाची/पुस्तकांची टेस्ट एवढी उत्तम आहे की माझ्यासारख्याने पुस्तकं/लेखक सुचवणं म्हणजे जरा जास्तच झालं असेल..! :-)

अवांतरः मी तुमचे लेख वाचत असतो, इथेही आणि इतरत्रही... तुम्ही चांगलं, फ्रेश लिहिता..!
... विशेषतः मार्गारेट ॲटवुड ही जबरदस्त लेखिका मला तुमच्याच एका लेखामधून माहिती झाली होती..
मग नंतर अॅटवूडबाईंचं बरंचसं शोधून शोधून वाचलं .. त्यासाठी विशेष धन्यवाद.. _/\_
आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..