आज बरोब्बर दोन महिने झाले पांढर्यावर काळं करून. किंबहुना व्यक्त होण्यासाठी विषयच सापडत नव्हता. आजकालची परिस्थिती बघता "किंबहुना" या एका शब्दावर एक लेखमाला लिहिली जाऊ शकेल हा भाग अलाहिदा!
बहुतेक वेळा मी क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल लिहितो कारण खेळांमधली सकारात्मक ऊर्जा मला भावते. पण सध्या चालू असलेल्या क्रिकेटचा देखील काही संदर्भ लागत नाही हो. आधी त्या अतिभव्य रिकाम्या स्टेडियम्समध्ये उगाच रतीब टाकल्यासारख्या टी-२० आणि वन डे खेळवल्या गेल्या. ते पण एकीकडे विजय हजारे ट्रॉफीसारखी महत्वाची डोमेस्टिक स्पर्धा चालू असताना आणि जुलै - ऑगस्टमध्ये पुन्हा इंग्लंडचा दौरा असताना. आणि आता ती आयपीएल नामक सर्कस! नाही. आयपीएल बद्दल कोणता आकस नाही. पण सध्याच्या परिस्थितीत, ४ महिन्यांपूर्वी हीच स्पर्धा झालेली असताना, बायो बबलमध्ये थकलेल्या, वैतागलेल्या खेळाडूंनिशी, रिकाम्या प्रेक्षागारासमोर पुन्हा हाच तमाशा करण्याची गरज काय? हा सगळा अट्टाहास कशासाठी? रविवारच्या "सकाळ" मध्ये दोन ज्येष्ठ क्रीडा समीक्षकांच्या दोन लेखांमध्ये त्याचं उत्तर मिळालं. "पैसा"!
किती पैसा??? आकडे काय घेऊन बसलात? आमच्या दादाला, आमच्या "थाला"ला, व्हेरी व्हेरी स्पेशल माणसाला "एक का एक करोड बनाओ" किंवा "दिमाग लगाओ" म्हणत सरळ सरळ जुगार खेळा असं लोकांना सांगायला लावण्याइतका पैसा. आमच्या तज्ञ, मर्मज्ञ, आपल्या वर्णनानी सामना जीवंत करणार्या कॉमेंटेटर्सना ऐन सामना रंगात आलेला असताना एका गाडीची तोंड फाटेस्तोवर स्तुती करायला लावण्याइतका किंवा क्रेडिटकार्डची बिलं भरायची आठवण करायला लावण्याइतका पैसा. आताशा कोणी वीवो चीनी कंपनी आहे किंवा ड्रीम ११ हा एक प्रकारचा जुगार आहे अशी तक्रार करताना ही दिसत नाही आणि खेळाडूंचे जीव धोक्यात घालून हा तमाशा चालवण्याची काही गरज आहे का असं विचारतानाही दिसत नाही.
अर्थात आम्ही तरी काय वेगळं करतोय म्हणा. एव्हाना परिस्थितीने आम्हाला आमची देशभक्ती, नीती, तत्वं, सदसद्विवेकबुद्धी, सारासार विचार वगैरे गोष्टी किती सोयिस्कर, बेगडी, फुटकळ आणि पोकळ आहेत हे दाखवून दिलं आहेच. तेव्हा आता ह्या विक्रेत्यांना तर सोडाच - पण सामना खिशात असताना बेजबाबदार फटका मारून बाद होणार्या किंवा ऑफस्टंपच्या मैलभर बाहेरचा चेंडू स्क्वेअरलेगला मारायचा प्रयत्न करत बॉल वाया घालवणार्या फलंदाजांना, आपल्या सर्वांत प्रभावी बोलरला पूर्ण षटकं न देणार्या कॅप्टनला काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. प्रत्येक सामना १९-२० व्या षटका पर्यंत चालणारच. चालायलाच हवा. त्याशिवाय आम्हाला आमची क्रेडिटकार्डची बिलं कशी भरावीत, कुठला पान मसाला खावा, आमच्या मुलांनी कसं शिक्षण घ्यावं, आमचा (नसलेला) पैसा कुठे आणि कसा गुंतवावा ह्याची माहिती कशी कळणार?? That's what we have signed up for.
तेव्हा हा तमाशा असाच चालणार. बघायचा असेल तर बघा - नाहीतर रिमोट तुमच्या हातात आहेच.
मी बघतो हा तमाशा - पण इंग्रजीत म्हणतात ना - with a pinch of salt. एकतर क्रिकेट बाकी कुठल्याही daily soap पेक्षा प्रेक्षणीयच असतं. हे खेळाडू खरोखरंच अफलातून आहेत. आपल्या तरुण खेळाडूंना जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळायची संधी मिळते आहे. कधी कधी जाम उत्कंठावर्धक होतात सामने. पण आयपीएल मध्ये भावनिक गुंतवणुक कधीच झाली नाही आणि आता तर ती होणं ही शक्य नाही. आम्ही ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम केलं ते हे नव्हे. आम्हाला आवडणारं क्रिकेट आम्हाला कदाचित वर्षात १-२ महिनेच बघायला मिळतं आणि आम्हाला ते बघायला मिळतं ह्याचंच समाधान आहे.
पण खरंतर सध्या आमची भावनिक गुंतवणूक असायला हवी ऑलिम्पिक विजेत्या आर्जेन्टिनाला त्यांच्या घरात घुसून २-१ असं हरवणार्या आमच्या हॉकी संघात. अंशू आणि सोनम मलिकच्या पहिल्या ऑलिम्पिक मध्ये. बजरंग पूनिया, सिंधू, मेरी कोम, विनेश फोगाट, विकास कॄष्णन, मनू भाकरच्या पदकांच्या आशेमध्ये. टोक्योमध्ये भारतीय जर्सी घालायला मिळावी म्हणून रक्ताचं पाणी करणार्या आमच्या बॉक्सर्स, शूटर्स आणि अॅथलीट्समध्ये. अपार कष्ट आणि त्याग करून देखील पैसा आणि प्रसिद्धीपासून मैलोनमैल दूर असलेल्या आमच्या कितीतरी गुणी, मेहनती खेळाडूंमध्ये. आमच्या क्रिकेटर्सची नवी पिढी गुणी आहेच पण पाठीवर हात ठेऊन लढ म्हणायची गरज आहे ती चार वर्षातून एकदा होणारा ऑलिम्पिक्सचा महाकुंभ अजून एका वर्ष लोटलं तरी अनिश्चित असताना सुद्धा जिद्दीने घाम गाळणार्या आमच्या ऑलिम्पिकवीरांना.
तेव्हा आम्ही मनोरंजनासाठी आयपीएल अगदी रात्री जागून बघू - पण रोज सकाळी त्याहीपेक्षा जास्त उत्सुकतेने वृत्तपत्राचं शेवटचं पान आधी उघडू - आमच्या ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल.
© - जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रिया
20 Apr 2021 - 11:45 am | गॉडजिला
जे ब्बात...
20 Apr 2021 - 11:59 am | मुक्त विहारि
मोदी झालासे कळस
लाॅकडाऊन शांततेत पार पाडायला, हे मनोरंजन हवेच होते..
20 Apr 2021 - 12:01 pm | खेडूत
मनोगत आवडलं! किंबहुना असंच काही (कुणीतरी) लिहावं असं वाटत होतं...!
अन्य खेळांवर होणारे दुर्लक्श्य वाईटच. पण हल्ली कब्बड्डी, होकी, फुटबॉल वगैरे लीग्स होत असतात ते एक बरे झाले. किमान त्या नवोदितांचा वरखर्च निघत असेल.
आय पी एल नामक प्रकार मनापासून आवडणं- ज्यांनी क्रिकेट खेळलंय, जगलंय त्यांना शक्य नाही. आता इथे टाईम्पास म्हणून कधी दोन ओव्हर्स पहिल्या तर ठीक.
अति एक्स्पोझर मिळून काही चांगले खेळाडू सामान्य वाटतात, आणि अतिसामान्य (संदर्भः यदुनाथजी जवळकर) खेळाडूंना वलय प्राप्त होते- होईना बिचारे..
पण यातही एक चांगली गोष्ट म्हणजे नव्या खेळाडूंना रिकी पाँटिंग, संगाकारा किंवा मुरली वगैरेकडून थेट धडे मिळतात. पर्यायी खेळाडू, कप्तान तयार होतात.
बाकी हल्ली देशाची मान वगैरे उंचावायला कुणी खेळणार नाहीत, पुढची बोली कशी लागेल याची चिंता सगळ्यांना राहील, म्हणून जास्त स्पर्धा, जास्त जाहिराती, ऑफर्स हे सगळं अपरिहार्य आहे!
20 Apr 2021 - 4:35 pm | जे.पी.मॉर्गन
अति एक्सपोझर चा मुद्दा हा एकदम फिट्ट काढलात. हे एक्सपोझर खेळाडूंसाठी तर वाईट आहेच आणि प्रेक्षकांसाठी पण. रोजच कोहली आणि रोहित शर्मा बघायला मिळताहेत तर अजीर्ण होणारच. पण "विका" हाच परवलीचा शब्द असताना अजून काय अपेक्षित आहे?
आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इंग्लंड सीरीजमुळे विजय हजारे सारखी स्पर्धा झाकोळली गेली. कल्पना करा - पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा मुंबईसाठी ओपनिंग करताहेत. समोर दिल्लीचा कर्णधार कोहली आणि शिखर धवन ईशांत शर्माबरोबर व्यूहरचना करतोय. काय धमाल आली असती.
पण पैशाच्या मोहात रणजी ट्रॉफीपेक्षा अर्थातच आयपीएल महत्वाची वाटली इथेच सगळं आलं.
20 Apr 2021 - 12:41 pm | Bhakti
ऑलिम्पिकवीरांच्या कामगिरीच्या बातम्यांसाठी. हळू हळू संदर्भ लागत जातील, ज्योती पेटत जातील आणि "पैसा फेक तमाशा देख" पलिकडचा खेळ आम्हाला पुन्हा बघायला मिळेल.
ते चैतन्य लवकर मिळो.
20 Apr 2021 - 4:46 pm | श्रीगुरुजी
आयपीएल साठी रणजी स्पर्धेचा बळी दिला. मी रणजी स्पर्धैचा नियमित मागोवा घेतो. अनेक जुने रोमहर्षक रणजी सामने अजूनही स्मरतात. रणजी स्पर्धा, दुलीप करंडक, नंतर परदेशी संघाबरोबरील सराव सामने व शेवटी भारतीय संघात प्रवेश असा प्रवास असायचा. या प्रवासात शेवटपर्यंत टिकायचे तेच भविष्यात भारतीय संघात टिकायचे. आता २-३ आयपीएल सामन्यात बरी कामगिरी केली की हा खेळाडूंना सिद्ध करणारा प्रवास टाळून थेट भारतीय संघात प्रवेश मिळतो. अर्थात आयपीएल स्पर्धेतून काही मोजके चांगले खेळाडू मिळालेत. परंतु बहुसंख्य खेळाडू, चकाकते ते सर्व सोने नव्हे, ही उक्ती सार्थ ठरवितात.
20 Apr 2021 - 4:48 pm | नावातकायआहे
जे.पी. सरांशी बाडिस.
टि-२० कधीच आवडले नाही त्यामुळे बघत नाही!
20 Apr 2021 - 5:38 pm | तुषार काळभोर
धोनी, रोहित, विराट, सौरव, युवराज झाला..
दुर्दैवचा कळस म्हणजे आता सचिन पण पे टी एम fantasy लीग ची जाहिरात करतोय. यातल्या कुणाला पैसा कमी आहे, की इतक्या खालच्या स्तरावरील जाहिराती कराव्यात?
Fantasy लीग, टीम मॅनेजमेंट स्किल अशी कितीही चकाकती नवे दिली तरी तो जुगारच आहे. नाहीतर आता त्या जाहिराती संपताना ' डिस्क्लेमर' द्यावा लागला नसता.
चेन्नई संघावर बंदी घातल्यानंतर त्या खेळाडूंची सोय करण्यासाठी पुणे नावाची टीम बनवायची. दोन वर्षे ' आमची पुणे टीम' ' आमचा धोनी' म्हणून नाचायचं. आणि बंदी संपली की त्यांनी परत व्हिसल पोडू करायचं. अन् आम्ही ' हमारी मुंबई इंडीयन फॅमिली' म्हणून वहिनींच्या आवाजात सुर मिसळायचे.
संघातील एखाद्या खेळाडूची कामगिरी ठीक नसेल किंवा स्थानिक स्पर्धात विशेष काही न केलेला खेळाडू असेल तर सुनील गावस्कर लाईव्ह टिव्ही कॉमेंटरी करताना निवड समितीचे वाभाडे काढायचा. आठवतं?
आता कुणाच्या बापाची हिंमत आहे, निवड समिती, BCCI किंवा आयसीसी वर टीका करायची? किंवा एखाद्या साध्या खेळाडू विषयी टीकात्मक वर्णन करायची?
पण कुठे तरी आपण सुद्धा जबाबदार आहोत का?
विदर्भ अन् ओरिसा जाऊ द्या. मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत?
२०१९ च्या रणजी, हजारे, दुलीप स्पर्धा कुणी जिंकल्या किती जणांना माहिती आहे?
सब बिके हुए है जी..!
20 Apr 2021 - 5:47 pm | चौकस२१२
मुंबई, दिल्ली, तामिळनाडू रणजी संघाचे कर्णधार किती जणांना माहिती आहेत? सब बिके हुए है जी..!
आई पी एल हि एक कृत्रिम स्पर्धा आहे , राज्य किंवा देश या संघामागे ज्या "आपले पणाची भावना" असते ती येथे असणे शक्य नाही असे मला पहिल्या पासून वाटते
त्यामुळे केवळ करमणूक म्हणून किंवा जास्तीत जास्त बेटफेयर एक्सचनगे वर ट्रेडिंग करण्यासाठी याचाच उपयोग
बाकी आपलेपणा असा काही वाटतच नाही .. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने हे मला तरी पूरतात
अर्थात असे काही लिहिणे म्हणजे क्रिकेट या धर्माचा अपमान करण्यासारखे आहे ! तरी "मनकी बात " हि अशीच आहे
20 Apr 2021 - 6:09 pm | चौकटराजा
आय पी एल ला काही निकष नसल्याने मी कुणाच्या बाजूचा असा प्रकार नसतो त्यामुळे पहाताना निव्वळ दृष्टीसुख या पलीकडे अस्मितेचे हे सुख असते ते मिळत नाही ! कुणीही बाद झाला तरी वाईट वाटत नाही वा आनंद होत नाही !
आय पी एल ने दोन फायदे असे झाले की देशीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेलाडूच्या विरुद्ध खेळायला मिळते त्यामुळे भारतीय संघाची बेंच स्ट्रेंग्थ वाढती आहे ! व गुणी आहे पण "अकरात " बसू शकत नाही अशा खेळाडूंना चांगली नोकरी इतकाच पर्याय असे तो आता बऱ्यापैकी पैसाही मिळवू लागला आहे ! गोविंदराज ,व्ही व्ही कुमार , पदमाकर शिवलकर हे चुकीच्या वेळी जन्माला आले असे वाटतें ते त्यामुळे !!
20 Apr 2021 - 7:30 pm | मोहन
अगदी माझ्या मनातल्या भावनाच लेखात आल्या आहेत.
लिहीते राहा .
20 Apr 2021 - 10:29 pm | जे.पी.मॉर्गन
ह्यांच्या प्रत्येक गोष्ट विकायच्या हव्यासापोटी स्थानिक स्पर्धांचा बळी गेला तो वेगळाच. डेक्कन वि PYC सामन्याला हजारभर प्रेक्षक मी बघितले आहेत. आता सगळं फक्त tv वर जाहिरातींसोबतच बघायचं.
पुण्याच्या कबड्डी लीग मध्ये गल्लीतली "सरस्वती क्रीडा संस्था" पलीकडल्या बदामी हौद संघापेक्षा जवळची वाटायची. खो-खो मध्ये आर्य क्रिडोद्धारकपेक्षा नवमहाराष्ट्र संघ आवडायचा. आता ही सगळी लोकल जवळीक संपली.
21 Apr 2021 - 10:09 am | कंजूस
त्याच्या क्रिकेट सिअरिजला packer circus म्हणायचे असं त्यावेळचे जाणकार सांगतात.
आणि विकीपेजमधून
"Packer was famously quoted from a 1976 meeting with the Australian Cricket Board, with whom he met to negotiate the rights to televise cricket. According to witnesses, he said: "There is a little bit of the whore in all of us, gentlemen. What is your price?"[9]"
तर खेळाडूंच्या जाहिराती आणि मार्केटिंगचं वावडं कशाला?
चलती आहे तोपर्यंतच कलाकाराला पैसे छापता येतात. नंतर रिटायरमेंट.