लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

उपयोजक's picture
उपयोजक in जनातलं, मनातलं
6 Feb 2021 - 9:57 pm

http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत.
----------------------------------------------------
एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते.

वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात . आणि पुढं 1993 साली इस्लामपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात. या दोन्ही वेळेला आपल्या भाषणांचा विषय लोकसंख्या हा होता . या विषयाकडे आपण कसे वळलात ? आणि त्याविषयी आपली काय मतं आहेत?

1975 साली एम . एस . स्वामिनाथन हे इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते . तेव्हा त्यांनी एक नवा पायंडा पाडला . त्यापूर्वीचे जे अध्यक्ष होते . ते स्वत : च्या विषयावर बोलायचे . स्वामिनाथन यांचं म्हणणं असं होतं की , ही गोष्ट आता बदलली पाहिजे . कारण इंडियन सायन्स काँग्रेसला 4 - 5 हजार माणसं जमलेली असतात , आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात . या सगळ्या मंडळींना समजेल असा अध्यक्षांच्या भाषणाचा विषय असावा .आणि हे बऱ्याच अंशी त्यानंतर पाळलं गेलं .जो अध्यक्ष व्हायचा असतो , त्याला आधी सांगायला लागतं , तो कोणत्या विषयावर बोलणार आहे .मग तो विषय इंडियन सायन्स काँग्रेसच्या महासभेनं मान्य करायचा असतो.अशी तिथली पद्धत आहे. माझं नाव जेंव्हा 1991 वर्षासाठी एक वर्ष आधी जाहीर झालं होतं तेव्हा मी विचार करीत होतो की कोणत्या तर्‍हेचा विषय हा समजायला सोपा आणि काहीतरी नवीन सांगणारा असू शकेल, तेव्हा थोड्या दिवसांनीच खानेसुमारी होणार होती.यापूर्वीच्या विचाराला सर्वसाधारण कल असा होता की एवढी लोकसंख्या वाढली आहे .आता या देशाचं काय होणार? वगैरे. त्यावेळी , विज्ञान लोकसंख्या आणि विकास' हा विषय माझ्या डोक्यामध्ये आला.आणि त्यावर विचार करायला मला वर्षभर वेळ मिळाला होता.विज्ञानाची जोडणूक समाजाशी संबंधित असावी म्हणून मी तो विषय घेतला.आणि तात्कालिक कारण म्हणजे खानेसुमारी यायची होती. मला स्वत:ला माहितीपण पाहिजे होती, हे सर्व आहे तरी काय ?माझं त्याच्यामध्ये कुठलही मत तयार झालं नव्हतं; कारण मला त्यातली काही माहिती नव्हती. कुठलाही अभिनिवेश नव्हता .पण एक वर्षभर जेव्हा मी यावर जेव्हा वेगवेगळ्या लोकांशी बोलत होतो.तेव्हा अगदी निरपेक्षपणे एेकत होतो,त्याचं ध्वनिमुद्रण करत होतो, घरी येऊन त्याचा विचार करीत होतो. त्यावरून मला खरोखरीच वाटायला लागलं की हिंदुस्थानातील लोकसंख्या ही एक समस्या आहे असा जो विचार आहे. हा काही मला फारसा खरा दिसला नाही. त्या काळातले माझे जे निष्कर्ष होते , ते मी तुम्हाला सांगतो, मग तेच पुढं मी विकसित केलं. लोकसंख्या का वाढल्यासारखी वाटत आहे. तर त्याचा विज्ञानाशी काहीतरी संबंध होता.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर एका नवीन अँटीबायोटिक पद्धतीची सुरुवात झाली आणि त्यामुळं आयुष्यमान कमालीचं वाढलं . सध्या आपलं सरासरी आयुष्यमान - स्त्रियांचं व पुरुषांचं 65 च्या आसपास आहे . हे सारखं वाढतच राहिलेलं आहे . लोकसंख्यावाढ म्हणजे काय आहे ? तर जन्मदर आणि मृत्यूदर यांमधील जो फरक तो म्हणजे लोकसंख्यावाढ . तर मृत्युदर नवीन उपचारांनी कमी होतोय . जन्मदर कमी व्हायला मृत्यूदर बरीच दशके कमी व्हायला पाहिजे . त्यानंतर जन्मदर कमी व्हायला लागतो. आणि मग अशी वेळ येते की , जन्मदर आणि मृत्युदर सारखाच होतो . म्हणजे लोकसंख्येची वाढ शून्याकडे जायला लागते.

यालाच तुम्ही लोकसंख्येच स्थिरीकरण म्हणता का?

यालाच आम्ही लोकसंख्येचे स्थिरीकरण म्हणतो. लोकसंख्येत शून्य वाढ असं याला म्हणतात.स्थिरीकरण त्याच्या आसपास असतं .1941 - 1971 ही 30 वर्ष जर तुम्ही बघितली तर मृत्यूदर हा निम्म्यानं कमी झालेला आहे.पण जन्मदर हा फक्त 3 - 4 आकड्यांनीच कमी झालेला आहे. त्यामुळे इ .स .1941 ते 1971 यामध्ये लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे.याला कोणी काही करू शकत नाही .जन्मदर कमी व्हायला अनेक दशके अशी जायला लागतात , जेव्हा मृत्युदर कमी झालेला असतो. हा सगळ्या जगाचा अनुभव आहे .आपल्याकडे मृत्युदर कमी व्हायला लागण्याला कारण पेनिसिलीनचा प्रभाव व आपल्याकडे त्याचा सुरु झालेला उपयोग .इ .स .1971 - 81 ही दहा वर्ष पाहिलीत तर जेवढा मृत्युदर कमी झाला आहे .तेवढाच जन्मदर कमी झाला आहे .इ .स .1981 - 91 ही दहा वर्ष जर बघितलीत , तर जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त कमी झाला आहे .1991 सालाकडे बघितलंत तर आपला मृत्युदर हा दर हजारी 8.5 ते 9 पर्यंत आलेला आहे .जो युरोपमधील स्पेन , इटलीसारख्या अनेक देशांच्या बरोबरीत आलेला आहे .उदा .इटली , म्हणजे सरासरी आयुष्यमान 20 - 21 वर्षाचे कुठं आणि ( 1991 च्या सेन्ससप्रमाणे ) 54.5 चं कुठ? अडीचपट झालं,अशी एकदम चढ आली.आज मृत्युदराच्या दृष्टीनं आपण जवळजवळ आंतरराष्ट्रीय झालोत. आता आपण युरोपमधील पुष्कळ देशांशी बरोबरी करत आहोत. त्यामुळं याच्यापुढं मृत्युदर फारसा कमी व्हायचा नाही. थोडाफार होईल. पण आता जगामध्ये जन्मदर झपाट्यानं कमी व्हायला लागलेला आहे .त्यामुळं जन्मदर आणि मृत्युदर यांच्यातला फरक म्हणजे लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने कमी होत आहे , असं माझं सांगणं होतं .पण हे केव्हा थांबेल? तुम्ही म्हणता ते स्थिरीकरण केव्हा होईल? ते साधारण इ .स. 2040 - 2050 च्या आसपास कुठंतरी होईल .थोडक्यात मुख्य मुद्दा असा आहे की , ही प्रक्रिया जेवढा वेळ घेणार आहे .त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येक खानेसुमारीचा निष्कर्ष आला की या देशाचं काय चाललं आहे , कशी लोकसंख्या वाढतेय , कसं होणार पुढं , असं म्हणण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही .लोक काळजी करतात , तज्ज्ञही तेच करतात .काय होणार आहे? कसं होणार आहे? मी असं म्हणतो की 1951 साली जर मला या लोकसंख्या विश्लेषणाचं ज्ञान असतं तर 2001 साली किती लोकसंख्या होईल हे मी सांगू शकलो असतो .काही ठरावीक मयदिमध्ये .म्हणजे या मधल्या दहा वर्षामध्ये दोन खानेसुमारीच्या मधल्या काळामध्ये असं काही भयंकर घडत नसतं की ज्यामुळं आपण चिंतित व्हावं.

रघुनाथ कर्वेचं जन्मदरांच्या संदर्भामध्ये काय मत होतं?

त्यांचंं अतिशय व्यावहारिक मत होतं.त्यांचं मत असं की, हे जे तुम्ही लोकसंख्या कमी करा वगैरे सांगताय ते कोणी ऐकणार नाही .देशासाठी करा सांगितलंत तरी कोणी ऐकणार नाही .जेव्हा माणसाला समजेल की लोकसंख्या कमी करण माझ्या वैयक्तिक हिताचे आहे , तेव्हा तो कुटुंबनियोजन करील .र .धों .कर्वे यांनी 60 वर्षांपूर्वी हे सांगितलं.

तुम्ही आता हा सिद्धान्त मांडला, तो निरीक्षणांवर आधारित आहे?

होय , निरीक्षणांवर आधारित आहे.

पण तरीदेखील, तो परदेशात तज्ज्ञांना मान्य झाला का?

हो , परदेशात पुष्कळ तज्ज्ञांना तो मान्य झाला .जेव्हा सायन्स काँग्रेसमध्ये मी हे प्रथम मांडलं , तेव्हा तिथं युनायटेड नेशन्सच्या अनेक संस्था होत्या .यूएनडीपी , यूएनएसपीए .डब्ल्यूएचओचे लोक होतं .दर सायन्स काँग्रेसच्या वेळेला हे लोक साधारण तिथं असतात .त्यांना माझा हा दृष्टिकोन वेगळा वाटला आणि मग ती मंडळी माझ्याकडे आली .सायन्स काँग्रेस झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की , असं मत मांडणारे तुम्ही पहिले आहात , 400 - 500 पानांचा ग्रंथ विज्ञान लोकसंख्या आणि विकास , या मुख्य विषयावर प्रकाशित झाला .यात माझी स्वत:ची काहीतरी चार प्रकरणे होती .पण बाकी सर्व विभागांतील तज्ज्ञांचे त्यामध्ये लेख होते ." विज्ञान , लोकसंख्या आणि पाणी ' , " विज्ञान , लोकसंख्या आणि शिक्षण ' अशा प्रकारचे , तेव्हा एवढं मोठंच्यामोठं पुस्तक , सायन्स कांग्रेसच्या संमेलनापूर्वीच्या वाचनासाठीचं वाटलं होतं .त्यात माझं भाषणही होतं .त्या सगळ्या मंडळींनी त्याचा अभ्यास केला होता .त्यांना त्यात नावीन्य वाटलं .त्यांनी पूर्वी असं काही पाहिलेलं नव्हतं .म्हणून ती मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की , तुम्ही या मूळ 500 पानी पुस्तकांवरून आम्हाला एक छोटं पुस्तक , साधारण 300 पानांचं करून द्या .आम्ही त्याचा खर्च करतो .ते आम्ही केलं .ही पुस्तकं डब्ल्यूएचओ , यूएनडीपी .यूएनएसपीएच्या मंडळीनी परदेशात पाठवून दिली.

काय नाव बरं त्या पुस्तकाचं?

'द इनएव्हिटेबल बिलियन प्लस ' असं या पुस्तकाचं नाव होत.मुळात नाव होतं ' विज्ञान , लोकसंख्या आणि विकास .' हे जे 300 पानांचं पुस्तक होतं ' बिलियन प्लस ' त्यांच्या दोन आवृत्या निघाल्या.आणि आपल्या नॅशनल बुक ट्रस्ट ( एनबीटी ) तर्फेही त्याच्या 2 - 3 आवृत्त्या काढल्या गेल्या .न्यूयॉर्कचं जे प्रसिद्ध पॉप्युलेशन काउन्सिल आहे , तिथं या पुस्तकाच्या अनेक प्रती गेल्या .आणि माझा असा समज आहे की , त्यानंतर हिंदुस्थानाच्या लोकसंख्येबद्दल जो अगदी नकारात्मक दृष्टिकोन ही पाश्चिमात्य मंडळी मांडायची , तो दृष्टिकोन पुष्कळ कमी झाला .कारण मी तेव्हा म्हटलं होतं की 2020 - 2050 साली हे होईल तेव्हा बरोबर 100 वर्षांचे चक्र पुरं होतंय . एकदा ही जाणीव झाली , त्या दृष्टीनं हालचाल सुरू झाली , मी1941 सालापासूनचा हिशेब मांडतोय . . . .
आपल्याला असं नको आहे की , सरासरी आयुष्यमान फार कमी आहे . जन्मदरही प्रचंड आहे आणि मृत्युदरही प्रचंड आहे , आणि म्हणून लोकसंख्या स्थिर झाली आहे . ही परिस्थिती आपल्याला नको आहे . इ.स. 1920 आणि 1930 हे जे दशक होतं , त्यामध्ये ते आलेलं होतं . खरं म्हणजे काही दशकांमध्ये लोकसंख्या अक्षरश : कमी झालेली आहे . जन्मदर प्रचंड होता आणि मृत्युदरही त्याच्यापेक्षा प्रचंड होता त्यामुळे उणे वाढ झालेली आहे . आपल्याला तसं नकोय . आपलं , जे राहणीमान आहे . त्याची जी गुणवत्ता आहे , ती कुठतरी चांगल्या तर्‍हेने होऊन , त्यादृष्टीनं आपण जे म्हणतो की , 65 हे आपलं सरासरी आयुष्यमान आपले आहे . आणि मग जन्मदर मृत्युदर हे दोन्ही कमी व्हावेत , आयुष्यमान वाढावं , अशी आपली अपेक्षा आहे . मी नेहमी म्हणतो की हा फार वेगळा परिणाम आहे . तुम्हाला आठवत असेल की इ.स.1940 - 50 मध्ये सरासरी आयुष्यमान 30 च्या आसपास होतं , 30 च्या पुढं गेलात की तुम्ही उतारवयाला लागलात ! अशी परिस्थिती 1930 साली होती . आणि वयानं 40 च्या पुढं गेलात म्हणजे आपलं आता काय होईल , अशी भाषा लोक बोलायचे.

अहो , लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आहे.' फर्ग्युसन कॉलेजमधले चार म्हातारे ' आणि ही चार माणसं चाळिशीची होती, ती म्हातारी झाली असा अग्रलेख आहे.

होय , आणि माझं असं मत आहे की , हल्ली परिस्थिती अशी आहे . विशेषत : स्त्रियांच्या बाबतीत त्यांना 60 - 70 वयानंतर मध्यमवयाच्या म्हणायला हरकत नाही , कोणी म्हातारे होणारच नाहीत आता कारण आपण ज्याला म्हातारवय म्हणायचं , त्या वयाच्या पलीकडं मनुष्य गेलेला आहे. आणि त्याचा सामाजिक संदर्भ बदलला आहे , असं माझं म्हणणं आहे . म्हणून आपलं निवृत्तीचं वय आता 60 आहे . 64 - 65 वयापर्यंत मनुष्य काम करू शकतो. अमेरिकेत अनेक विद्यापीठं अशी आहेत की तिथं माणसं 65 व्या वर्षी निवृत्त होतात.

(आभार: मराठी विज्ञान परिषद)

समाजजीवनमानविचारमत

प्रतिक्रिया

साहना's picture

7 Feb 2021 - 1:14 pm | साहना

लेखाबद्दल धन्यवाद. गोवारीकरांसारख्या विद्वान माणसाने तोंड उघडले कि आमच्या सारख्यांच्या नक्कीच ध्यान देऊन ऐकायला पाहिजे. त्यांची मते प्रगल्भ आहेतच पण वरून साधी सोपी वाटणारी त्यांची मते समजून घेण्यासाठी थोडा खोलवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थांत तो प्रयत्न मी इथे करणार नाही पण माझी काही मते मांडते.

पाश्चात्य देशांत २-३ दशकांनी एक नवीन पोपट निर्माण होतो. मग हा विषय घेऊन तेथीतील हस्तदंती मनोऱ्यातील लोक येथेच्छ प्रोपागंडा करून लोकांची प्रचंड प्रमाणात दिशाभूल करतात. हिटलर ज्या काली ज्यू लोकांना ठार मारत होता त्याच वेळी इंग्लंड आणि अमेरिकेत सुद्धा प्रचंड ज्यू द्वेष होता. हिटलर ह्या लोकांना ठार मारत आहे त्याचा आनंदच ह्या मंडळींना होता. सर्व समस्यांचे खापर ज्यू मंडळींवर फोडणे चालू होते. मग त्याची परिणीती शेवटी द्वितीय महायुद्धांत झाली.

महायुद्धानंतर निर्माण झाला तो बागुलबुवा लोकसंख्या वाढीचा आणि हा बागुलबुवा बऱ्याच काळ चालला. भारतासारख्या गरीब देश ह्या विदेशी प्रोपागंडाला जास्त डोके न चालविता बळी पडतात. (सध्या बागुलबुवा वातावरण बदलाचा आहे आणि तो सुद्धा तितकाच दांभिक पणाचा आहे).

लोकसंख्या वाढीचे परिणाम समजण्यासाठी भौतिक शास्त्र किंवा जीवशास्त्र पूर्णपणे निरर्थक आहे. त्यासाठी अर्थशास्त्र समाजणे जरुरीचे आहे. ह्या संदर्भांत अमेरिकेतील १९८० मधील सायमन-एहरलीच हि पैज वाचणे मनोरंजक ठरेल. तर अर्थतज्द्न्य जुलिअन सायमन आणि जीवशास्त्री पॉल एहरलीच ह्यांच्यात एक मोठी जाहीर पैज लागली. १९६८ साली पॉल ह्यांनी पॉप्युलेशन एक्सप्लोजन नावाचे एक भयंकर प्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यांच्या मते लोकसंख्या वाढ तात्काळ थाम्बवली नाही तर जगांत प्रचंड अन्न कमतरता होऊन कोट्यवधी लोक मरणार होते. ह्या पुस्तकाने खळबळ माचवली आणि ह्यांच्या नादाला लागून गोऱ्या लोकांनी मुले निर्माण करणे कमी केले (ज्याची फळे ते आज भोगत आहेत). भारत, चीन आणि अनेक देशांनी जास्त विचार न करता विविध योजना राबवून लोकसंख्या वाढ म्हणजे जणू काही भस्मासुर आहे असा प्रोपागंडा निर्माण केला.

ज्युलियन सायमन ह्यांनी त्यांची हि भविष्यवाणी साफ खोटी ठरणार आहे असे जाहीर रित्या प्रकाशित केले आणि १० हजार डॉलर्स ची जाहीर पैज लावली. पैजेच्या नुसार ज्युलियन ह्यांचे म्हणणे होते कि बहुतेक संसाधनाचा तुटवडा तर असणार नाहीच पण वर तीच संसाधने स्वस्त सुद्धा असणार आहे. १९९० साली जुलिअन सायमन हे पैज सहज, म्हणजे अगदी मोठ्या फरकाने जिंकले. त्या दहा वर्षांत जगाची लोकसंख्या सुमारे ८०० दशलक्ष वाढली पण जे ५ धातू त्यांनी निवडले होते त्यांची किंमत बऱ्यापैकी कमी झाली होती.

लोकसंख्या वाढीचे काहीच वाईट परिणाम आहेत असे नाही. लोकसंख्या वाढीचे अनेक वाईट परिणाम आहेत. पण जगांत नक्की किती लोक असायला पाहिजेत हे सुद्धा कोणीही निर्धारित करू शकत नाही. बहुतेकांना लोकसंख्यावाढीचे वाईट परिणाम दिसतात पण त्याचे असंख्य चांगले फायदे दिसत नाहीत. लोकसंख्या कमी झाली तर हे अनेक फायदे गायब होतीलच पण त्या फायद्यांना आम्ही मुकलो आहोत हे सुद्धा समजणार नाही.

सोपे उदाहरण घेऊया. पोलिओ ची लस हि आमच्या साठी वरदान ठरली आहे ह्यांत काहीच दुमत नाही. अक्षरशः कोट्यवधी मुलांचा जीव ह्या लसीने वाचवला आहे. पण फक्त लसच नाही तर अनेक औषधे निर्माण झाली आहेत त्यामुळे आम्हा सर्वांचेच जीवन जास्त सुखकर झाले आहे. तर हि औषधे कशी निर्माण होता ? अक्षरशः हजारो लोकांचे परिश्रम ह्यांत गुंतले असतात. जगाच्या पाठीवर जितके जास्त डॉक्टर, संशोधक आहेत तितकी जास्त औषधांचा शोध लागतो. आज देशाची लोकसंख्या ७ अब्ज ऐवजी ४ अब्ज असती तर मार्केट मधील अनेक औषधें गायब झाली असती. पण मी फक्त औषधांचे उदाहरण दिले आहे. सॉफ्टवेर पासून, टीव्ही वरील विविध चॅनेल पर्यंत अनेक गोष्टी गायब झाल्या असत्या आणि आम्हा सर्वांचा जीवनमानाचा स्तर खूपच खाली गेला असता.

तुमहाला आवडत असलेली कुठलीही गोष्ट घ्या. समजा तुम्हाला तुमचा फोन आवडतो. ह्या फोनच्या निर्मितीसाठी हजारो पेटंटन्स लागली आहेत आणि अक्षरशः लक्षावधी विविध छोटे छोटे शोध अनेक लोकांनी निर्माण केले आहेत. आणि ह्यांत जो एकूण मानवी वेळ गेला आहे त्याची जर बेरीज केली तर कदाचित कोट्यवधी मनुष्य-तास त्या फोन चा शोध लावण्यासाठी खर्च झाले आहेत. समजा देशाची लोकसंख्या अर्धी असती तर तितके मनुष्यतास खर्च होण्यासाठी दुप्पट वेळ लागला असता आणि फोन आपल्या हाती येण्यासाठी २०२० ऐवजी कदाचित २०४० वर्ष लागले असते.

अर्थानं त्याच तर्काने आम्ही असे म्हणू शकतो कि जगाची लोकसंख्या फक्त ७ अब्ज असल्याने आज आमच्या हातात अश्या अनेक गोष्टी नाहीत ज्या कदाचित २०५० मध्ये आमच्या हाती असतील. आज जगाची लोकसंख्या १४ अब्ज असती तर कदाचित आणखीन अजब साधने आणि तंत्रज्ञान आमच्या हाती असते.

> अहो पण लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास पर्यावरणाचे काय ?

हा मुद्दा अनेक लोक वर काढतात आणि काही प्रमाणात तो रास्त सुद्धा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसे जीवनमान उंचावते आणि लोक जास्त काळ जगू लागतात त्याच वेळी लोकांना मुलें नकोशी होतात. आमच्या आजोबांच्या काळी खाण्यापिण्याचे वांधे होते त्यामुळे लोक दिवसभर काबाडकष्ट करायचे आणि रात्रभर प्रजनन करायचे. महिलांची अवस्था फक्त चूल आणि मूल अशी होती. पण त्यांची चूक नव्हती. रात्री आणखी करणार काय ? मग ४०-५० वर्षांत हृदयविकाराचा झटका वगैरे येऊन मृत्यू.

आता जीवनमानाचा स्तर उंचावलाय. गर्भनिरोधक आल्याने शरीरसुख घेता येते आणि प्रजनन रोखता येते. रोमान्स ची व्याख्या रुंदावलीय. आता जोडपी चित्रपट पाहतात, दिनार करतात, कुठे फिरायला वगैरे जातात. पुस्तके वाचतात आणि नेटफ्लिकस पाहतात. त्याशिवाय प्रत्येक वेळी फिरायला वगैरे जाताना लक्षांत येते कि जास्त मुले म्हणजे खूपच जास्त खर्च त्यामुले फार तर एक दोन मुले खूप होतात. ह्यामुळे आपसूकच जन्मदर खालावत जातो. ह्या दृष्टिकोनातून कर्वे हे खूपच दूरदर्शी आणि विद्वान होते.

मुले जास्त जन्माला घालण्याचे एक कारण म्हणजे मुले मारण्याचे प्रमाण सुद्धा खूप होते. आता ते कमी झाल्याने वंशाला एक दिवा असला तरी पुरतो मोठी माळ लावायची गरज नाही. परंपरागत घरे आता बंद पडत आहेत. बापाने बांधलेल्या घरांत मुलें राहू इच्छित नाहीत म्हणून "वंशाचा दिवा" हि सुद्धा जास्त डिमांड नसलेली गोष्ट झालीय.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च आणि लोकसंख्या वाढीचा दर हि दोन महत्वाची व्हेरिएबल्स अर्थतज्ञ पाहतात आणि दोन्ही मध्ये खूपच जास्त संबंध आहे. आणि ह्या संबंधाने मानवी लोकसंख्या चादर पाहून हात पसरेल ह्यांत मला तरी अजिबात शंका वाटत नाही.

मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च :

मार्जिनल खर्च ह्याचा अर्थ प्रत्येक ऍडिशनल मुलाच्या संगोपनासाठी खर्च किती येतो. एका मुलाचा खर्च प्रचंड असतो. कारण मूल नाही तर माता काम करू शकते. एक मूल झाले आणि तिने नोकरी सोडली तर ते पैसे येणे बंद होतात आणि त्यामुळे तो मुलाच्या संगोपनाचा खर्च ठरतो. पण एकदा नोकरी सोडल्यानंतर तिला २ मुले झाली तर त्या दुसऱ्या मुलाचा मार्जिनल खर्च खूपच कमी असतो. (एका मुलासाठी ३ लक्ष वर्षाला खर्च येतो तर दोन मुलांसाठी ३.५ लक्ष खर्च येतो इत्यादी).

जुन्या खाली हा मार्जिनल खर्च खूपच कमी असायचा कारण बहुतेक खर्च हा फक्त अन्नाचा असायचा. आता तुम्ही दुबईला किंवा किमान खंडाळ्याला जाता तर सुद्धा तिकिटाचा खर्च प्रत्येक मुलांमागे होतो तो फार असतो. ४ मुले झाली तर मग तुम्हाला ५ सीटर गाडी सुद्धा चालत नाही.

जसे जसे जीवन मान उंचावते तसे तसे मार्जिनल खर्च हा खूपच वेगाने वाढतो. मुलाला विदेशांत शिकायला पाठवायचे तर ५० लक्ष रुपये पाहिजेत. दोन मुले झाली तर मग १ कोटी. पण गरीबाच्या घरांत हे प्रश्न नसतात.

पण खर्च वाढतो म्हणजे नक्की काय होते ? माणसाला जगांत फक्त दोनच खर्च असतात. एक खर्च असतो ऊर्जेचा दुसरा खर्च असतो दुसऱ्या माणसाच्या वेळेचा. (आयफोन पासून कांदे बटाटे पर्यंत तुम्ही काहीही विकत घेतले तर तुम्ही फक्त ऊर्जा आणि दुसऱ्या लोकांचा वेळ ह्या दोनच गोष्टींचा मोबदला देत असता. समजा ह्या दोन गोष्टी अपरंपार आणि फुकट असत्या तर आयफोन आणि कांदे बटाटे ह्यांची किंमत सुद्धा शून्य असती.). खर्च वाढतो ह्याचा अर्थ तुम्ही जास्त ऊर्जा आणि मानवी वेळ खर्च करत आहात असा होतो. आपण पर्यावरणाच्या नावाने बोंब मारतो तेंव्हा पर्यावरणाला होणारी हानी हि १००% ऊर्जा ह्या एका संसाधना द्वारे तुंबलेली जाऊ शकते. पण ऊर्जा महाग असल्याने आम्ही ती हानी अन-डू करू शकत नाही. जर पर्यावरणाची हानी वाढत गेली तर ऊर्जेचा दर सुद्धा वाढत जातो आणि आणि त्यामुळे मुलांच्या संगोपनाचा मार्जिनल खर्च.

त्यामुळे हि दोन्ही व्हेरिएबल्स एकमेकांना बॅलेन्स करतात. पण ऊर्जा हि काळाचा ओघांत स्वस्त होत गेली तर लोकसंख्या सुद्धा वाढत जाते आणि पर्यावरणाला हानी सुद्धा होत नाही. ह्या दोन्ही व्हेरिएबल्स मधील गणिती संबंध तसा स्पष्ट पणे अभ्यासाने कठीण आहे कारण लोकसंख्या वाढली कि हे लोक नवीन शोध लावून ऊर्जेचा दर आणखीन कमी करतात.

टीप : युनायटेड नेशन्स किंवा विविध तद्न्य मंडळी जगाची लोकसंख्या सुमारे २०५० मध्ये स्टेबल होईल असे भाकीत करत आहेत. मला त्यांत शंका वाटते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मते ऊर्जेचा खर्च येत्या २० वर्षांत १०० पटीने कमी होणार आहे. बहुतेक ऊर्जा फ्युजन सेल द्वारे किंवा इतर कुठल्या नवीन शोधांतून निर्माण होईल आणि त्यानंतर सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा भाव कमालीचा पडणार आहे. ऊर्जा स्वस्त आणि मुबलक होताच, शेती, पिण्याचे पाणी वगैरे गोष्टींचा काहीही तुटवडा असणार नाही त्याशिवाय कार्बन एमिसशन वगैरे उलट करणे सहज शक्य होणार आहे. कदाचित IVF वगैरे प्रक्रिया खूपच सोप्या होऊन गरोदर न राहता सुद्धा मुले निर्माण करणे शक्य होईल आणि त्यामुळे कुठल्याही वयांत मुले निर्माण करणे शक्य होईल आणि कदाचित मंडळी जास्त मुले निर्माण करतील. अर्थांत मी हे भाकीत एखाद्या ज्योतिष्या प्रमाणे वर्तवत आहे.

टीप २ : जगांतील सर्व नैसर्गिक संसाधने हि अक्षय म्हणजे अनलिमिटेड आहेत. एकच असे संसाधन आहे जे अक्षय नाही आणि ते म्हणजे मानवी वेळ. हि संकल्पना बहुतेक इकॉनॉमिक्स च्या पुस्तकांत मंडळी गेलेली असते पण राजकीय कारणासाठी पाश्चात्य राष्ट्रांनी "लिमिटेड रिसोर्सिस" आणि "अनलिमिटेड रिसोर्सेस" किंवा "रिन्यूएबल ऊर्जा" आणि "नॉन रिन्यूएबल ऊर्जा" असल्या श्रेणी शाळांतून आम्हा मुलांच्या डोक्यांत घातल्या. हि विचारसरणी डाव्या लोकांची असून पाश्चात्य देशांतून आपल्या देशांत आली आहेत आणि त्यांत काहीही तथ्य नाही. हि गोष्ट बहुतेक लोकांना पचणार नाही किंवा पटणार नाही कारण ह्या प्रकारच्या प्रोपागंडावर आमच्या देशांत कुणीही प्रश्न विचारला नाही. कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन. प्रतिक्रिया किंवा खरडवहीवर लिहून कळवा.

Bhakti's picture

7 Feb 2021 - 2:18 pm | Bhakti

काळाच्या पुढचा विचार.

जरूर लिहा ....

विचारांची मुस्कटदाबी करू नये ...

शिवाय, तुम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही.... त्यामुळेच तुमच्या बरोबर, मतभेद व्यक्त करायला आवडायला लागले आहे ...

उपयोजक's picture

7 Feb 2021 - 3:07 pm | उपयोजक

विस्तृत आणि चिंतनीय प्रतिसाद.धन्स!

जगाची लोकसंख्या जितकी सांगितले जाते तेवढी नाही आहे.
म्हणजे आज जगाची लोकसंख्या 100 आहे असे दाखवत आहेत पण ती नक्की 100 आहे का तर नाही.
तो एक अंदाज आहे.
कसे.
तर जन्म आणि मृत्यू ह्याची नोंद सरकारी कार्यालय करत असतात.
आज जन्माला आलेल्या मुलांची नोंद आज च होत असली तरी ती ऑनलाईन सर्व जगातील देशांची होवून एकत्रित जन्म झालेल्या मुलांचा आकडा उपलब्ध नसतो.
तसेच मृत्यू झालेल्या लोकांचे नोंद जरी कागदावर झाली तरी ती सर्व देशातील मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा ताबडतोप जागतिक नोंदी मध्ये मोजला जात नाही.
जगाची लोकसंख्या म्हणून जे आकडे सांगितले जातात ते विविध घटकांचा विचार करून व्यक्त केलेले फक्त अंदाज असतात.

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 1:56 pm | मुक्त विहारि

न जाने कहां कहां से आ जाते हैं

लोकसंख्येचा नक्की आकडा समजावा, म्हणून तर, आधारकार्ड हवे आहे..

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 1:52 pm | मुक्त विहारि

माझ्या कडे 5 एकर जागा आहे आणि माझा एक शेजारी आहे, त्याच्याकडे 3 एकर जागा आहे... आमच्या दोघांचेही वय सारखेच...

मी मनुष्यजन्म ही देवाची देणगी समजतो ....वयाच्या एकवीसाव्या वर्षी माझे, 18 वर्षे वयाच्या स्त्री बरोबर लग्न करतो आणि पुढील 18 वर्षे आम्ही, संतती निर्माण करत राहतो.

मी जेंव्हा पन्नाशी ओलांडतो, तेंव्हा माझ्या कुटुंबात, 5 मुले, 4 मुली, 5 सुना आणि 10-12 नातवंडे होतात ....

मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने, आता कुटुंबातील 20-22 सदस्यांना दोन वेळची मीठ-भाकरी पण मिळणे कठीण होते ....सुदैवाने, मुलींचे लग्न होऊन, मुली सासरी गेल्याने, ते दडपण नाही...

माझा शेजारी मात्र, एकाच मुलाला जन्म देतो...त्याचा मुलगा पण, एकाच मुलाला जन्म देतो ...आता वयाच्या पन्नाशीत, त्याच्या कुटुंबातील सदस्य 5, आणि 3 एकर जागा, त्यांना पुरेशी पडत असते....

आता कोण बरोबर आणि कोण चुकीचे?

शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच....

ह्या तर्कांत एक खूप मोठी चूक आहे. ती म्हणजे तुम्ही एक व्हेरिएबल बदलत आहात पण त्यामुळे इतर गोष्टी ज्या बदलतील त्या लक्षांत घेत नाही आहात आणि ह्या गोष्टी प्रेदिक्त करणे सुद्धा असंभव आहे. (https://www.quora.com/In-economics-what-are-secondary-effects)

> शेजारी जर बरोबर असेल तर, लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच....

एखाद्या गोष्टीचा कुणाला तरी फायदा झाला म्हणून कायद्याचा दंडुका वापरून सर्वांवर त्याची सक्ती करावी ह्यासारखा चुकीचा निर्णय नाही. कायदा केला म्हणून पालन होत नाही. मग मध्यमवर्गीय आणि उचभ्रु पालन करणार गरीब अजिबात करणार नाहीत मग त्याचे परिणाम आणखीन गंभीर असतील. अंबानीने १० लग्ने करून २५ मुले निर्माण केली म्हणून काहीही फरक पडत नाही.

आपल्या उदाहरणात खालील चुका आहेत:

१. एक व्हेरिएबल बदलले म्हणून बाकीची कॉन्स्टन्ट राहत नाहीत घराची काळजी मोठा भाऊ घेत आहे म्हणून लहान भाऊ घर सोडून इतरत्र जाऊन व्यवसाय करून जास्त पैसे कमावू शकतो. जास्त नातलग असलेल्यांच्या ओळखी जास्त असून त्यातून त्यांना जास्त फायदा होतो. इत्यादी.

२. भावंडांची संख्या जास्त असली कि आपोआप कुटुंबाच्या एकूण रिसोर्स वर ताण पडतो हा आपला प्राथमिक तर्क बरोबर असला तरी अगदीच रिसोर्स अर्धे होतात असेही नाही. विविध देशांत ह्या विषयावर अभ्यास झाला आहे आणि बहुतेक अभ्यासांत असे दिसून आले आहे कि जास्त भावंडे असली तर मुलांचे शिक्षण आणि उत्पन्न एकेरी मुलापेक्षा सरासरीने कमी असते पण हा फरक जास्त असत नाही. त्याशिवाय श्रीमंत आणि शक्तिशाली मुलांना जास्त भावंडे असली तर मात्र त्यांचे सरासरी शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही वाढते.

> मी आणि माझी मुले, पुर्णतः शेतीवर अवलंबून असल्याने,

हि आपली धारणा चुकीची असू शकते. परवडत नसेल तर आपली मुले दुसरा व्यवसाय पत्करतील. आणि प्रत्यक्षांत देशांत सर्वत्र तेच होते आहे.

वडिलांना बायपास करावी लागली तर चार मुले थोडे थोडे पैसे गोळा करून सहज करू शकतात. एकाच मुलगा आहे तर त्याला ते आर्थिक दृष्ट्या जाड जाऊ शकते.

बहुतेक अभ्यासा प्रमाणे

१ मूल असेल आणि त्याचे उत्पत्न १ असेल तर ज्या कुटुंबांत ५ मुले आहेत त्यांचे एकूण उत्पन्न साधारण ४.७ इतके असते म्हणजे सरासरी उत्पन्न ०.९४ हा फरक असला तरी विशेष मोठा नाही. पण शेतकरी आणि इतर गरीब लोकांत जास्त असू शकतो.

तथाकथित लोकसंख्या वाढ ह्या कायद्याला माझा नेहमीच विरोध असणार आहे. प्रजनन हा मूलभूत अधिकार असून ह्यांत ढवळाढवळ करू नये असेच माझे मत आहे. (अर्थानं मुले वाढवायला सबसिडी सुद्धा कोणालाच देऊ नये. आरक्षण वगैरे गोष्टींना माझा आधिपासुन विरोध आहे. )

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 4:09 pm | मुक्त विहारि

जितकी लोकसंख्या जास्त, तितके उत्तम, असे तुमचे मत आहे का?

मुक्त विहारि's picture

7 Feb 2021 - 1:57 pm | मुक्त विहारि

लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ....

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी

+ १

Rajesh188's picture

8 Feb 2021 - 12:32 am | Rajesh188

ज्या देशांची लोकसंख्या जास्त आहे ते सर्व गरीब देश आहे.
देशाचा आकार आणि त्या नुसार त्या देशाची लोकसंख्या हा पॉइंट विचारात घेवून.
भारताची लोकसंख्या जास्त आहे भारत अत्यंत गरीब देश आहे,एक उदाहरण.
आणि ज्या देशांची लोकसंख्या कमी आहे ते श्रीमंत देश आहेत.
अजुन काय प्रॅक्टिकल पुरावा हवा.
उत्तर प्रदेश ची लोकसंख्या जास्त आहे खूप गरीब राज्य आहे ते.
90 हजार वर्ग किलोमीटर आकार आणि लोकसंसंख्य 11 कोटी लोकसंख्या प्रचंड असून बिहार अत्यंत गरीब राज्य आहे अगदी आफ्रिका मधील अत्यंत गरीब देश पेक्षा पण गरीब बिहार आहे.
लोकसंख्या जास्त असली की प्रगती होते ह्याचे फक्त एक उदाहरण कोणाला मिळाले तर ध्या.

आपण सहारा मध्ये राहायला जावे. लोकसंख्या जवळ जवळ शून्य असल्याने प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 7:47 am | मुक्त विहारि

राहणीमान कठीण आहे....

पण, जर सहारा हे रहायला योग्य असते तर, नक्कीच प्रगती झाली असती

सतिश म्हेत्रे's picture

8 Feb 2021 - 10:32 pm | सतिश म्हेत्रे

लोकसंख्या कमी असेल तर देशाची प्रगती होते हे वाक्य बरोबर तर आहे. भारता समोरील खूप साऱ्या प्रश्नांचे मूळ कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या लोकसंख्या तर आहे. त्यांनी उदाहरणे देताना थोडी गफलत केली हे मान्य पण वस्तु्थिती नाकारून चालणार नाही. आणि साहनाताई आपण थोड्या जास्त offensive होत आहात असे नाही का वाटत आहे आपल्याला?

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 7:48 am | मुक्त विहारि

लोकसंख्यावाढ, देशाला आर्थिक संकटात लोटते

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी

नक्कीच