साडीखरेदीची गोष्ट

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
9 Apr 2009 - 4:12 pm

बर्‍याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला. मी "मित्राला भेटायचे आहे", "घरी काम आहे", "डॉक्टरकडे जायचे आहे", "एकाला महत्वाची कागद-पत्रे द्यायची आहेत" अशी सगळी कारणे एकाचवेळी सांगून पाहिली. एका कारणाने आपले जाणे टळत नाही म्हटल्यावर मी लगेच दुसरे कारण फेकत असे; आणि त्यानेच माझा घात केला. मग शेवटचा उपाय म्हणून मी बायकोला त्यांच्यासोबत जाण्यास उद्युक्त केले. तिचा साड्यांचा, रंगांचा चॉईस कसा चांगला आहे, तिला त्या भागातली आणखीन ही काही नावाजलेली दुकाने माहित आहेत वगैरे सांगून मी हे घोंगडं तिच्या गळ्यात टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण पाहुणे मुंबईचे होते; आणि बाईसाहेबांना पुण्यातूनच साडी खरेदी करायची होती कारण त्यांच्या मते मुंबईमध्ये अस्सल साड्यांची इतकी व्हरायटी मिळत नाही असे त्यांचे म्हणणे होते; शिवाय पुण्यातल्या इतक्या आतल्या भागात जायचे असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग इत्यादींसाठी कुणीतरी माहितगार सोबत असावा या उद्देशाने मला येण्याच्या आग्रह केला जात होता. शिवाय रावसाहेब बाईसाहेबांच्या साडी खरेदीला चांगलेच ओळखून होते. इतका वेळ "वा, छानच आहे साडी, शोभून दिसेल तुला" वगैरे बोलून बोलून एकटेच थकले आणि कंटाळले असते. त्यांचा हा चाणाक्षपणा माझ्या लक्षात आला. शेवटी मी हार पत्करली आणि आम्ही रावसाहेबांच्या गाडीतून कुमठेकर रस्त्याकडे कूच केले. सुदैवाने वाहतूक जास्त नव्हती. दुकानात शिरलो.

"इटालियन क्रेप कुठे मिळेल?" बाईसाहेबांनी एकाला विचारले. त्याने दुसर्‍या मजल्यावर सांगीतल्यावर आमची वरात तिकडे निघाली. साड्या त्यांच्या जवळच्या नात्यातल्या एका लग्नासाठी हव्या असल्याने जरा चांगल्याच घ्यायच्या होत्या. दुसर्‍या मजल्यावर मग साडी दाखवणारा, बाईसाहेब, त्यांच्या दोन मुली आणि अस्मादिकांची धर्मपत्नी या सगळ्यांमध्येच पराकोटीचा उत्साह संचारला.

बाईसाहेबः "इटालियन क्रेप दाखवा" (मी पहिल्यांदाच ऐकला होता हा प्रकार. कुठलीही साडी इटालियन क्रेप म्हणून दाखवली तर काय कळणार आहे यांना?)
सेल्समनः "पार्टी वेअर की ट्रॅडीशनल?"
बाईसाहेबः "पार्टीवेअर" (अरे बाप रे, यांना कुठे जायचयं पार्टीला? मला एकदम 'सरकार' सिनेमामधली पूलसाईड पार्टीत आलेली कट्रीना कैफ आठवली. छान मंद संगीत सुरू आहे, सुंदर-सुंदर बायका झुळझुळीत (आणि बर्‍यापैकी कमी) कपडे घालून हातात प्याला घेऊन अधांतरी तरंगल्याप्रमाणे फिरत आहेत, पुरुषांची चांगलीच दमछाक होते आहे, वेटर हातात ड्रींक्सचे ट्रे घेऊन अदबीने फिरत आहेत... छे छे...असं कसं होईल? मी विचारच झटकून टाकला.)
सेल्समनः "हे बघा, मॅडम."
बाईसाहेबः "हे असं नको, जरा जास्त वर्क असलेलं नाहीये का?"
सेल्समनः "आहे न, पण ते महाग पडेल खूप" (रावसाहेब निश्चल आहेत, घ्या हात धुऊन!)
बाईसाहेबः "असू द्या. दाखवा."
सेल्समनः "हे बघा, साडे आठ ते दहा हजारापर्यंतची रेंज आहे याची" (मी उडालोच. एवढी महाग साडी? एवढ्या पैशात माझे पुढच्या ५ वर्षांचे कपडे होतील. त्यात मोजे, हातरुमाल, बनियन हे देखील आरामात बसतील. मी हळूच रावसाहेबांकडे बघितलं. ते अजूनही निश्चल होते. त्यांचा आवडता नट नवीन निश्चल असावा असे मला उगीच वाटून गेले.)
बाईसाहेबः "अरे बाप रे...ही पांढरी छान आहे नाही?"
रावसाहेबः "हं छान आहे, घेऊन टाक" (यांच्या मनातले विचार मी तात्काळ ओळखले. लवकरात लवकर इथून कटण्याचा त्यांचा मनसुबा मी ओळखला.)
बाईसाहेबः "अजून आहे का काही?"
सेल्समनः "इटालियन क्रेप मध्ये हीच व्हरायटी मिळेल मॅडम" (सेल्समनला पुढच्या चिकित्सेची कल्पना आलीच होती बहुतेक; त्याने मोठ्ठा उसासा टाकला.)
बाईसाहेबः "सिल्क मध्ये?"
सेल्समनः "ही बघा."
बाईसाहेबः "यात मोरपंखी आहे का?" असं विचारत सहज म्हणून बाईसाहेबांनी रावसाहेबांकडे पाहिलं.
रावसाहेबः (गडबडून) "हं छान आहे, घेऊन टाक. मोरपंखी छानच दिसतो तुला, प्रश्नच नाही."
बाईसाहेबः "ही मोरपंखी नाहीये. बघत पण नाहीत आणि म्हणे घेऊन टाक. (मला उद्देशून) "कशी आहे?"
रावसाहेबः "अगं ही नाही म्हणत मी; ती तिकडे त्या ढीगाच्या खाली आहे नं ती! मला वाटलं तू तिच साडी बघतेयस." (सावरलं कसं-बसं.)
मी: "छान आहे, रंग उठावदार आहे." (तिथून पटकन उठण्याची वेळ यावी म्हणून मी मुद्दाम उठावदार हा शब्द वापरला होता. कुठल्याच साडीला वाईट म्हणायचे नाही हे मी ठरवूनच टाकले होते. बायकोला पण तशी तंबी भरली होती.)
बाईसाहेबः "पैठणी दाखवा जरा"
सेल्समनः (पैठणी दाखवत) "हे बघा मॅडम, ही धूप-छाँव आहे, मस्त दिसेल." (प्रकाश पडल्यावर चमचमणारा रंग म्हणजे धूप-छाँव हे मला तेव्हा कळलं.)
बाईसाहेबः (रावसाहेबांना उद्देशून) "ही कशी वाटेल हो?" (रावसाहेब नेमके इकडे-तिकडे नजर टाकत होते. ते "कोण? कोण?" असं म्हणतात की काय अशी भीती मला क्षणभर वाटून गेली.)
रावसाहेबः "छान आहे, घेऊन टाक. काय घ्यायचय ते लवकर घे, टाईम पास नको करूस उगीच" (रावसाहेबांचा निश्चलपणा आता ढळायला लागला होता. मनातून उफाळून येणारा संताप आणि विवेकबुद्धी यांचं तुंबळ युद्ध सुरू होतं.)
माझी पत्नी: "ही छान आहे ताई. पण यात सिंगल कलरवाली छान वाटेल." (तरी मी सांगीतलं होतं की जे समोर पडेल त्याला छान म्हणायचं पण बायकांना साड्या पाहिल्यावर बाकीचं काहीच लक्षात राहत नाही हेच खरे.)
बाईसाहेबः "सिंगल कलर दाखवा यात"
सेल्समनः "ही बघा सिंगल कलर. ही पण छान आहे. नवीनच शेड आहे आणि खूप चालतेय सध्या"
बाईसाहेबः (चेहर्‍यावर गोंधळल्यासारखे भाव) "असं करा, शालू दाखवा बरं" (आता मात्र माझा पण संयम सुटत चालला होता)
धाकटी मुलगी: "आई, तुला नक्की काय घ्यायचयं? तुला इटालियन क्रेप घ्यायची होती ना?" (ही जरा समजुतदार दिसत होती. मूळ मुद्यावर आईला आणायचा आटोकाट प्रयत्न करत होती.)
बाईसाहेबः "अगं पण इथं चांगली नाहीये ना इटालियन क्रेप! मुंबईला पार्टीमध्ये असं नाही घालत." (मुंबईची पार्टी असा काही सिनेमा पाहिलाय का यांनी?)
थोरली: "अगं तुला कुठे पेज थ्री पार्ट्यांना जायचयं? आणि पार्टीमधली साडी तुला शोभली तर पाहिजे" (मी मनातल्या मनात दुजोरा दिला थोरलीला. गुणाची पोर हो!)
बाईसाहेबः "हं म्हणून मी शालू बघतेय ना! पण शालू नेहमीचाच आहे गं. काहीतरी फॅशनेबल पाहिजे. मुंबईमध्ये सध्या वेगळीच फॅशन आहे. नेटच्या ट्रांस्परंट साड्या घालतात बायका." (अरे देवा, हे काय नवीनच खूळ आता. या रोज ताज आणि ओबेरॉयमध्ये पार्ट्यांना जातात की काय? आणि यांना हे घालायचयं? .....)
धाकटी: "शी, त्यातून सगळं पोट उघडं दिसतं. पोट सपाट असायला हवं त्यासाठी" (ही थोरलीपेक्षा जास्त समजूतदार वाटत होती)
थोरली: "आई, तू शालूच घे" (हिच्या निर्णयक्षमतेला मानलं.)
माझी पत्नी: "नाहीतर पैठणी घे, ती बघ निळ्या रंगाची किती छान आहे." (पुन्हा तेच! २-३ वेळा बजावून देखील काही उपयोग झाला नव्हता. मी डोळे शक्य तेवढे वटारून माझ्या अर्धांगिनीकडे बघत होतो; कुणाचं लक्ष गेल्यावर लगेच चेहरा हसरा करत होतो. खूप कसरत करावी लागते असं करतांना. आमचं बेटर हाफ मात्र माझ्याकडे फुल्ल दुर्लक्ष करत होतं.)
बाईसाहेबः "कांजीवरम मध्ये आहे का काही लेटेस्ट डीजाईन्स?" (आता मला सेल्समनची दया यायला लागली होती.)
सेल्समनः "यातल्या कुठल्या बाजूला काढू का?"
बाईसाहेबः "ती निळी पैठणी, ती पांढरी क्रेप आणि तो मोरपंखी शालू बाजूला ठेवा."
सेल्समनः "या बघा ताई, कांजीवरम!" (सेल्समन मॅडमवरून ताईवर आला होता. बाईसाहेबांनी खूप साड्या बघितल्या पण त्यांच्या पसंतीला कुठली उतरत नव्हती.)
धाकटी: "आई, बोअर होतयं, लवकर घे ना!" (नवरा सुखी राहिल हिचा आयुष्यभर!)
बाईसाहेबः "प्रिंटेड मध्ये काही व्हरायटी आहे का?" (रावसाहेब कुठल्याही क्षणी झोपतील याची मला खात्री वाटत होती.)
सेल्समनः "त्या तिकडे खूप आहेत बघा खाली, बघून घ्या." (नक्कीच पुणेरी सेल्समन होता तो. काही वेळाने "आमची आता चहाची वेळ झालेली आहे, तुम्ही आता उद्या या साड्या बघायला. दुपारी १ च्या आत या." असं म्हणून तो पळून जातो की काय असे मला वाटले.)
बाईसाहेबः "काय गं बाई, काहीच पसंत पडत नाहीये. मुंबईत पार्टीत घालायच्या आहेत साड्या...तिथे काय शालू आणि कांजीवरम घालू?"
थोरली: "मग बघितल्याच कशाला? टाईम पास झाला नुसता" (मॅनेजर होणार पोरगी मोठेपणी.)
रावसाहेबः "चला निघू या..." (हुश्श्...किती गोड वाटलं ऐकायला.)
बाईसाहेबः "चला दुसरीकडे बघुया."

आम्ही सगळे बाहेर आलो. रस्त्याने फिरत-फिरत रावसाहेबांचा पारा चढत होता. तेवढ्यात माझी बायको तळपली.
"आता रात्रीचे ८ वाजून गेलेत. अर्ध्या-पाऊण तासात दुकाने पण बंद होतील मग नीट बघून पण होणार नाहीत. घाई-घाईत उगीच काहीतरी घेतल्यासारखं वाटेल."
बाईसाहेबः "हो गं, पण उद्या सकाळी तर आम्हाला निघायचयं"
रावसाहेबः "आपण मुंबईतच घेऊन टाकू. तिथे या सगळ्या साड्या मिळतात." (येस्स्स्स्....रावसाहेबांचा विजय असो!)
बाईसाहेबः "हम्म्म्म्....अगं ते बघ, एक पुस्तकांच दुकान उघडं दिसतयं." (माझे कान टवकारले, आता काय नवीन? आम्ही सगळेच धास्तावलो.)
धाकटी: "पण तिथे तुला फॅशनेबल साड्या नाही मिळणार" (कार्टी हुशार आहे!)
बाईसाहेबः "अगं, ते मला माहितीये. वहिनींसाठी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घ्यायचं होतं ना? आणि एक आपल्या साठी पण घ्यायचं होतं. ते बघू नं मिळतयं का."

आम्ही सगळे दुकानात गेलो. सुदैवाने तिथे पुस्तकाच्या दोन प्रती मिळाल्या आणि हाश्शहुश्श करत आम्ही इटालियन क्रेपच्या ऐवजी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घेऊन घरी परतलो!

--समीर

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

सुप्रिया's picture

9 Apr 2009 - 4:44 pm | सुप्रिया

मस्त खुसखुशीत वर्णन! मजा आली वाचायला.

-सुप्रिया
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

सागर's picture

9 Apr 2009 - 5:01 pm | सागर

=)) =)) =))

माझा अनुभव पण काही वेगळा नाही..... समीर ...मजेशीर लेख आहे
अजून येऊ द्यात ...

फक्त फरक हाच आहे की अशा अनेक खरेद्यांना मी गेलेलो आहे... :)
का कुणास ठाऊक पण अनेकदा टाळायचा प्रयत्न करुनही मला असे प्रसंग टाळता आलेले नाहीत.
लक्ष्मी रोडला आणि कुमठेकर रोडला गेले तर कधी कधी ४-५ तासांची निश्चिंती....
अर्थात पोटात कावळे ओरडू लागण्याच्या वेळेला मी खूप वेळा गेलो असल्यामुळे २-३ तासांपेक्षा जास्त या साडीखरेदीच्या भानगडीत वेळ नाही द्यावा लागला..
एक मुद्दा सांगावासा वाटतो...

बर्‍याच वेळा असेही होते की दुसर्‍या - तिसर्‍या दुकानात गेल्यावर बायकांना आठवते की याच्यापेक्षा पहिल्या दुकानातली साडी चांगली होती... :)

सागर

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Apr 2009 - 12:00 pm | घाशीराम कोतवाल १.२

माझा अनुभव पण काही वेगळा नाही.....
४ साड्या घ्यायला साडे चार तास लावले होते काल आमच्य होणार्‍या सौं पण वैतागु शकलो नाही ना
कारण आता कुठे आमची सुरुवात होणार आहे मग

धमाल मुलगा's picture

13 Apr 2009 - 12:59 pm | धमाल मुलगा

घाश्या, भावा,
नशीबवान आहेस. साडेचार तासात चार साड्या म्हणजे ढोबळमानानं ताशी एक साडी हा वेग दिसतोय.
हार्दिक अभिनंदन. सर्वसाधारणतः एका साडीला तीन तास लागतात असा आमचा वैयक्तिक अनुभव :(

कोणतं रे व्रत केलं होतंय? की गेल्या जन्मीची पुण्याई म्हणायचं ह्याला?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अबोल's picture

9 Apr 2009 - 7:31 pm | अबोल

मी हळूच रावसाहेबांकडे बघितलं. ते अजूनही निश्चल होते. त्यांचा आवडता नट नवीन निश्चल असावा असे मला उगीच वाटून गेले.

रेवती's picture

9 Apr 2009 - 7:32 pm | रेवती

मस्त लेखन!
बायकांच्या जिव्हाळ्याच्या खरेदीच्या विषयाला हात घातला आहे.
समस्त नवर्‍यांच्या मनाची दुखरी बाजू म्हणजे साडी/ड्रेस खरेदी...
साड्याच्या दुकानातले सेल्समन फार म्हणजे फारच संयम असलेले असतात.
त्यांना त्याचे वेगळे ट्रेनिंग मिळत असावे बहुधा. नवर्‍यांनाही अश्याच प्रकारचे ट्रेनिंग जर मिळाले
तर बायको जमात खूष होउन जाईल.

रेवती

संदीप चित्रे's picture

9 Apr 2009 - 8:56 pm | संदीप चित्रे

त्या संयमाचे पैसे मिळतात .....
दुसरं म्हणजे एकदा साडी विकून झाली की -- प्रत्येक वेळी त्या बाईने ती साडी नेसल्यावर -- प्रत्येक वेळी त्याच बाईच्या "ही साडी कशी दिसतीय" (म्हणजे "आज या साडीत मी कशी दिसतीय?") या प्रश्नाला -- प्रत्येक वेळी त्याच बाईला 'छान दिसतीय' (म्हणजे "तू छानदिसतीय") हे उत्तर -- सेल्समन देत नाही !
तिथे नवरा कामी येतो (पक्षी: धारातीर्थी पडतो -- जर उत्तर चुकलं तर)

त्यामुळे ट्रेनिंग बिनिंगचा नवर्‍यांना काही उपयोग नाही -- त्यांचं आपलं इन्स्टिंक्टवर वेळ निभावणं चालतं :)

प्राजु's picture

10 Apr 2009 - 1:07 am | प्राजु

गरज नाहीये.. नवर्‍यांची बाजू घ्यायची.
साडी घ्यायची तीही कधी तरी नेसायला.. आणि तीही इतके भरमसाठ पैसे घालून.. मग जरा बघून घेतली तर बिघडलं कुठे?
आणि बरोबर कोणी असलं तर चॉईसला त्रास होत नाही. दुसरं मत घेता येतं. कोणी नसेल तर नवर्‍याने यायला काय हरकत आहे?
नाहीतरी घरी बसून टीव्ही बघणार नाहीतर.. चकाट्या पिटणार.. मग हेच बायको सोबत गेलं तर काय बिघडलं.

(माझ्या नवर्‍याने हे वाचलं तर.. ५ वर्षापूर्वीचा प्रसंग नक्की आठवेल त्याला.. "वामा" मध्ये तो आणि माझा भाऊ.. एका सोफ्यावर तीन तास नुसते बसून होते.. मारायला तिथे माशाही नव्हत्या..) ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सूहास's picture

9 Apr 2009 - 7:39 pm | सूहास (not verified)

मस्त लेखन!!!
झकास!!!!

अवा॑तर : लग्नाआधी " मी तुझ्याबरोबर साड्या घ्यायला येणार नाही" ही अट घालणार आहे.

सुहास

धमाल मुलगा's picture

10 Apr 2009 - 3:34 pm | धमाल मुलगा

असल्या अटी घालणारे लईईईईई बघितलेत (स्वतःसकट!) एक डाव लग्न होऊ दे मग बघु काय म्हणतोयस ते ;)
आरं बाबा, अणुभवाचे बोल आहेत हे आमचे! :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

सुधीर कांदळकर's picture

12 Apr 2009 - 7:42 pm | सुधीर कांदळकर

खरेदी करणार्‍यांचे नमुने पाहायला मजा येते. सौ. नें आवडलेल्या साड्या जमा व्हायची वाट पाहात आपण विरक्त मनानें सौंदर्यावलोकन करावें व तिची आवड पूर्ण झाल्यावर निवडीचें काम करावें. तुझी आवड किती चांगली आहे अशी तारीफ जरूर करावी. व आपण निवडलेल्या साड्या तुला कशा व कां छान दिसतील हे सांगायला विसरूं नये. सेल्समेन पण आपल्याला पाठिंबा देतात. वेळ कसा जातो कळत नाहीं. फक्त आपण रसिक आणि धोरणी असायला पाहिजे.

सुधीर कांदळकर.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2009 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे

यकदम झकास.

मी उडालोच. एवढी महाग साडी? एवढ्या पैशात माझे पुढच्या ५ वर्षांचे कपडे होतील. त्यात मोजे, हातरुमाल, बनियन हे देखील आरामात बसतील.

काय बोल्लात राव ! अहो आमचे तर धा वर्षाचे व्हतील. आपन कापड घाल्तो कशासाठी?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

समिधा's picture

9 Apr 2009 - 10:30 pm | समिधा

बाकी रेवतीशी सहमत...

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पक्या's picture

9 Apr 2009 - 10:36 pm | पक्या

:D मजा आली. मस्त लेखन.
येऊ द्यात असे लेखन अजून.

भाग्यश्री's picture

9 Apr 2009 - 10:49 pm | भाग्यश्री

हेहे सहीच लिहीलंय!! अशा अनेक खरेद्यांना लक्ष्मी रोडवर आईबरोबर गेलीय मी..
पण अर्थात मला ते काम आवडायचं.. भरपूर हुंदडायला मिळायचे.. अधून मधून पॉपकॉर्न्स, भाजलेले कणीस, स्वीट होमची खिचडी-चहा, जनसेवा मधे पण खादाडी इत्यादी इत्यादी असे साग्रसंगीत लाड व्हायचे ! :)

बबलु's picture

10 Apr 2009 - 5:29 am | बबलु

ऑफिसात मी चुकून मोठमोठ्यानं हसेन की काय अशी भिती वाटत होती.
इतकं सह्ही लिहिलयं. लगे रहो समीरसूर.

मस्त लेखन.

....बबलु

मदनबाण's picture

10 Apr 2009 - 5:52 am | मदनबाण

हम्म्म...सगळी गम्मतच आहे. मस्त लिहल आहे. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अनिल हटेला's picture

10 Apr 2009 - 6:19 am | अनिल हटेला

समीर भाउ मनसोक्त हसलो आज !!
माझी चीनी कलीग अगदी विचीत्र नजरेने बघत होती ( आता तर चांगला होता ह्या अर्थी)
एकदाच ताईबरोबर साडी खरेदीला गेलेलो ! आणी परत कधीच तशी चुक करणार नाही अशी भीष्मप्रतीज्ञा केलेली !! ;-)

एकदम खुसखुशीत लेख !!

आंदो और भी !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भडकमकर मास्तर's picture

10 Apr 2009 - 6:39 am | भडकमकर मास्तर

दोन्ही बाजूंचा जिव्हाळ्याचा विषय ...
छान मांडला आहे...
:)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 9:40 am | समीरसूर

आजकाल (की आधीपासूनच माहित नाही; मी पहिल्यांदाच पाहिले) सेल्समन स्वतः साडी नेसल्यासारखी स्वतःभोवती मिर्‍या पाडून गुंडाळून दाखवतात. मिशा असलेले, धष्टपुष्ट, हातावर केसांचं जंगल असलेले, चेहर्‍यावर राकटपणा असलेले सेल्समन जेंव्हा एखादी पैठणी किंवा शालू नेसून दाखवतात तेव्हा मात्र जे काही दिसतं ते खूप विचित्र असतं. म्हणजे जी साडी एखाद्या सुंदर, कमनीय बांध्याच्या स्त्रीने (बायको सोडून ;-)) नेसून हल्ले करायचे असतात; ती साडी एका पुरुषाने नेसून दाखवल्यावर अगदी विरस होतो. :)

आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

--समीर

प्राजु's picture

10 Apr 2009 - 9:43 am | प्राजु

तुम्हाला साडी खरेदीला जायला आवडत नाही हे ठीक. पण म्हणून साडी नेसण्याचं वर्णन तरी नीट शब्द वापरून करा.. :)

सेल्समन स्वतः साडी नेसल्यासारखी स्वतःभोवती मिर्‍या पाडून गुंडाळून दाखवतात
इथे मिर्‍या नव्हे हो... 'त्यां'ना निर्‍या म्हणतात.. शुद्ध मराठीत प्लिट्स.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 9:50 am | समीरसूर

मी बराच वेळ नीर्‍या की मिर्‍या या गोंधळात होतो पण शेवटी मनाने आणि बुद्धीने चुकीचा कौल दिला. :-) मला नीर्‍याच म्हणायचे होते. :) चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

--समीर

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2009 - 10:44 am | प्रकाश घाटपांडे

मी बराच वेळ नीर्‍या की मिर्‍या या गोंधळात होतो पण शेवटी मनाने आणि बुद्धीने चुकीचा कौल दिला

मला नीर्‍याच म्हणायचे होते.

मी ही तेच सांगणार होतो 'मी' पेक्षा 'नी' महत्वाचा आहे पण तो प्रमाण भाषेत. बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात. 'मी 'ही कोणाची मक्तेदारी नाही अथवा 'नी' ही कोणाची मक्तेदारी नाही. 'नी' ऐवजी 'मी' वापरल्याने फार हानी झाली असे नाही. कदाचित मी वापरल्याने मी मी पणाचा भास येउ शकतो असे काहीनी म्हटले जाउ शकते. पण तो नी मुळे पण होउ शकतो. खर तर तो भास (किंवा वास्तव) हा मी किंवा नी मुळे नसुन लिखाणा मुळे असतो.
चांगल्या नीर्‍या करणारी व्यक्ती ही डोक्यावर मीर्‍या वाटू शकते. साडीच्या नीर्‍या कडे लक्ष देण्यापेक्षा मी टर कडे जास्त लक्ष देतो. तो किती डाउन होतो हे महत्वाचे. नीर्‍या कडे ठळक लक्ष जाताना मी टर कडे पुसट लक्ष देता कामा नये. एखादी गोष्ट किती ठळक करायची किंवा (पुसट) हे नीट लक्षात घेतले म्हणजे झाले. सबब आपल्या बुद्धीनी चुकीचा कौल दिला असे मी मानीत नाही.
ध्यानी मनी नसतानी साडी खरेदीचा प्रसंग आला कि कशे वांदे व्हत्यात हे लई भारी सांगातल ब्वॉ.शेवटी साडी खरेदीत 'मनी' महत्वाचा.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 10:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात.

मिर्‍याच ! 'नी' चा काही संबध नाही !

-दिलीप बिरुटे

दशानन's picture

10 Apr 2009 - 1:06 pm | दशानन

>>>>>बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात.

=))

उच्च !

;)

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 10:54 am | समीरसूर

मस्तच!
पण टर ही काय भानगड आहे?
मनी तर महत्वाचाच आहे. शेवटी त्याच्यावरच जग चालते. रावसाहेबांच्या मनी 'मनी' ची चिंता नव्हती म्हणून तर बाईसाहेब एवढ्या महाग साड्या घेण्याची हिम्मत करू शकत होत्या ना! शेवटी काय, नवर्‍याने आपल्या 'मनी'च्या जोरावर बायकोच्या हट्टापुढे मान तुकवली तर वैवाहिक आयुष्यात 'हार्मनी' राहते.

--समीर

धमाल मुलगा's picture

10 Apr 2009 - 3:31 pm | धमाल मुलगा

प्रतिसादभर निस्तं 'ढिश्क्यँव ढिश्क्यँव' =)) =))
पकाकाका मला दोन मिनिटं 'काऊबॉय कॉस्च्युम'मध्ये दोन्ही हातात पिस्तुलं घेऊन भर लक्ष्मीरस्त्यावर उभं राहुन धडाधड गोळीबार करतानाच दिसले! ;)

बाकी, मीटरबद्दलचं पटलं हो काका!

अवांतरः हॅ हॅ हॅ हॅ हॅ!

आपलाच,
-(आचरट पुतण्या) ध (मा ल)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

भडकमकर मास्तर's picture

10 Apr 2009 - 4:09 pm | भडकमकर मास्तर

हॅहॅहॅहॅ....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 10:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समीरसूर ,

साडीखरेदीची गोष्ट मस्तच ! साडी खरेदीला जातांना आम्हीही खूप नर्व्हस असतो.
दुकानदार ढीगभर साड्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवतो, डिझाइन्स दाखवतो, अगदी थकून जातो बिचारा, तरी निर्विकार चेहरा करुन दुस-या दुकानात पाहू म्हटलं की , आम्हाला त्या दुकानदाराची खूप दया येते .
(कोणतीही खरेदी न करता त्याला पैसे द्यावे वाटतात)

साडी खरेदी करुन घरी आणल्यानंतरही तीचे निरिक्षण चालूच असते, आणि थोड्या वेळाने...तो दुकानदार साडी बदलून देईल का ! या प्रश्नाने आमची तब्येत खराब होते.

-दिलीप बिरुटे
(साडी खरेदी प्रकरणाचा धसका घेतलेला )

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 10:48 am | समीरसूर

तब्येत खराब होते.....मस्तच!
बायकांना स्वतःला साडी आवडली आहे की नाही हे महत्वाचे वाटत नाही; ती इतरांना (नवरा, जावा, नणंदा इत्यादी) चांगली वाटते आहे की नाही हे जास्त महत्वाचे वाटते. दोन-तीन बायकांनी "छानच आहे गं साडी तुझी!" असं म्हटलं की साडीसाठी खर्च केलेले पैसे वसूल झाल्याचं समाधान यांच्या चेहर्‍यावर दिसतं. पुरुषांना असे वाटत नाही बहुधा. नवीन कपडे घालून जरी ऑफीसात आले तरी त्यांना अजिबात अपेक्षा नसते की कुणीतरी त्यांचं कौतुक करेल. केलं तरी त्यांच्या चेहर्‍यावर जग जिंकल्याचे भाव झळकत नाहीत. :) हे असे का असेल बरे? कोडेच आहे एक. :)

--समीर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बायकांना स्वतःला साडी आवडली आहे की नाही हे महत्वाचे वाटत नाही; ती इतरांना (नवरा, जावा, नणंदा इत्यादी) चांगली वाटते आहे की नाही हे जास्त महत्वाचे वाटते.

आपल्याला काय आवडते या पेक्षा...साडी दुसर्‍यांना कशी वाटेल ? आवडेल का ? दुसरे कौतुक करतील का ? याच साठीचा तो प्रपंच असतो , याच्याशी १०० टक्के सहमत (टक्क्याचे चिन्ह सापडेना )

-दिलीप बिरुटे

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 11:02 am | समीरसूर

कुणी छान आहे म्हटलं की मग लवकरात लवकर त्याची किंमत सांगायची घाई होते. खूप महाग असेल तर फुशारकीने सांगीतली जाते आणि स्वस्त असेल तरी फुशारकीनेच सांगीतली जाते ("बघा, इतकी चांगली साडी आम्ही किती वाजवी किंमतीत विकत आणली, नाहीतर तुम्ही, ते पोतेरं परवा हजार रुपयात आणलं. व्यवहारज्ञान नाहीच आजिबात! तरी सांगत होते की माझ्यासोबत चला साडी घ्यायला...जाऊ द्या...पैसे वर आलेत नं तुमचे!")

--समीर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला समीरसूर...तुमचे निरिक्षण अगदी मना-मनातले आहे. :)

बरं आपण काही बोलायला जावे, तर ऐकावं लागते की, तुम्हाला कपड्याचा चॉइस नाही. (आपला चॉइस नेहमीच चुकतो हे बोलायचे असते पण तेही बोलता येत नाही. ) सतत ते रेघा-रेघांचे (चेक्स ) शर्ट घेऊन येतात. :)

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2009 - 1:56 pm | प्रकाश घाटपांडे

आम्ही एक आयडिया बायकोच्या मैत्रिणींना सुचवली होती. एक तर यवढाले पैशे देउन साड्या विकत घ्यायच्या. त्या एखाद्या समारंभात घालायच्या. बाकीच्या वेळेला वाया जाणार. परत काही बायांकडे म्हणे शंभर शंभर साड्या असतात. किंमती पण म्हणे पाच पाच हजार असतात. अरे बापरे काय ही उधळ पट्टी! कपाटात किती जागा लागत असणार? आता आमची आयडिया - एखादा समारंभ असल्यावर त्यावेळेस पुरती साडीची पुर्ण किंमत देउन ती भाडे तत्वावर आणायची . साडी परत केल्यानंतर तो दुकानदार २० टक्के वा २५ टक्के घेउन उरलेली रक्कम परत देणार. पुढच्या वेळी दुकानदार ती साडी ड्रायक्लिन करुन दुसरीला देणार. अगदी नव्या साडीवानी. तिला नवी आहे कि जुनी हे कस काय कळणार ड्रायक्लिन केल्यावर? ब्लाउजचे माप प्रत्येकीचे वेगवेगळे असणार त्यामुळे ब्लाउज ची लायब्ररी कदाचित करता येणार नाही. पण आमची विलॅष्टीकची आयडिया वापरली तर ब्लाउज बी ऍडजस्ट होनार लायब्ररीत . म्हणजे बायकांना कमी पैशात वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या वापरायला मिळतील. हीच आयडिया दागिन्यांच्या बाबत पण वापरता येईल.
मला त्यांनी मुर्खात काढल! पण मित्रांनो आयडिया भारी हाय कि नाई आपली?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2009 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्लाउजचे माप प्रत्येकीचे वेगवेगळे असणार त्यामुळे ब्लाउज ची लायब्ररी कदाचित करता येणार नाही. पण आमची विलॅष्टीकची आयडिया वापरली तर ब्लाउज बी ऍडजस्ट होनार लायब्ररीत .

=)) आयडीया भारी आहे. पण साड्या भाडेपट्टीवर वापरायचा फार्म्यूला टीकणार नाही. वस्तूंवर 'मालकी हक्क' मिळाला पाहिजे, हा स्त्रियांच्या स्वभावाचा (चांगला ) गुण आहे. त्यामुळे दुसरी काहीतरी आयड्या सांगा ! :)

-दिलीप बिरुटे
(चावट )

प्रकाश घाटपांडे's picture

10 Apr 2009 - 6:11 pm | प्रकाश घाटपांडे

लोकान्ला काय कळनार की भाड्याची हाय कि मालकीची? बर फुल डिपॉजिट भरलय. म्हंजे ती आपली बी हायेच. यखांदी फटाकडी लईच आघावपना करायला लाग्ली तर सौंशय याय्ला नको म्हनुन साडी परत करायची नाई.
दुसरी आयडिया म्हंजे एक्सेचेंज ऑफर मदी एक साडी देउन दुसरी साडी घ्यायची. किंमतीतला मधला फरक चुकभुल देनेघेने सारखा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

रेवती's picture

13 Apr 2009 - 4:59 am | रेवती

साड्यांच्या लायब्ररीची आयडीया भारी आहे पण दागिन्याची आयडीया नविन नाही.
पंजाबी लोक (म्हणजे बाईलोक)स्वत:च्या लग्नातही भाड्याने आणलेले दागिने घालतात हे ऐकल्यावर तर मी चाट पडले होते.
बरं, हे त्यांच्याकडे सर्रास चालतं त्यामुले लग्नात कुणी किती तोळे सोनं दिलयं हे कळून त्यावर नको त्या चर्चा होत नसाव्यात किंवा कमी होत असाव्यात.
बाकी आपली साड्यांची सुचना चांगलीच आहे.

रेवती

विनायक प्रभू's picture

10 Apr 2009 - 10:58 am | विनायक प्रभू

चांगला आहे रे समीर तुझा सुर

समीरसूर's picture

10 Apr 2009 - 10:58 am | समीरसूर

सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!
सगळ्यांच्या साडी खरेदीच्या (स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबातल्या स्त्रियांसाठी) इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा! :)
फक्त खरेदी लवकर पूर्ण व्हावी ही आचारसंहिता पाळली गेली तर पुरुषांचाही साडी खरेदीतला आनंद (?) द्विगुणित होईल असे वाटते. :)

धन्यवाद,
समीर

शिप्रा's picture

10 Apr 2009 - 11:18 am | शिप्रा

>>आम्ही सगळे दुकानात गेलो. सुदैवाने तिथे पुस्तकाच्या दोन प्रती मिळाल्या आणि हाश्शहुश्श करत आम्ही इटालियन क्रेपच्या ऐवजी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घेऊन घरी परतलो!
लेख सहि लिहिला आहे पण हे सगळ्यात खतरनाक =))

धमाल मुलगा's picture

10 Apr 2009 - 3:51 pm | धमाल मुलगा

मजा आली वाचायला.
बाकी, ह्या साड्यांच्या दुकानातले सेल्समन्सना बहुतेक आर्मीच्या ट्रेनिंगसारखं कडक ट्रेनिंग तरी देत असावेत किंवा हे सेल्समन पोहोचलेले सन्याशी असावेत..एकदम स्थितप्रज्ञ. अशी माझी एक समजुत आहे.

तासन् तास त्या माणसाला साड्यांचे ढिगारे काढायला लावायचे, सत्राशेसाठ प्याटर्न मागायचे (जळ्ळी नावं ती कसली असतात त्यांची! ) बरं, मलातर सगळे प्याटर्न एकसारखेच वाटतात..किंमतीची लेबलं सोडुन. ;) तर एव्हढा पसारा मांडायला लावायचा, आणि (समजा चुकुन पहिल्याच दुकानात साडी घेतलीच तर) त्यानं सगळ्यात पहिल्यांदा नमुन्यासाठी दाखवलेली साडीच उचलायची! वर आणि "अय्या! मगाशी किती कैतरीच्च दिसत होती नै? आत्ता अशी पाहिली ना, ह्या साडीच्या पदरावर तिचा पोत पट्टकन जाणवून आला! " असं म्हणल्यावर आपण मनातल्या मनात हुश्श्य करायला जावं तर लगेच, "काय हो, ह्यात आणखी काही रंग आहेत का? पदराचं डिझाईन वेगळं असलेली रेंज आहे?"
आयला, त्या साडीच्या दुकानाला, त्यातल्या स्टॉकसकट आग लाऊन द्यायची इच्छा अनावर होते राव!

बरं साडी घ्यायची नक्की केली आणि काऊंटरवर पाठवली की ह्यांचा ठरलेला डायलॉग असतो, "ताई, पुढच्या वेळी निवांत वेळ काढून या. खुप व्हरायटी आहेत आपल्याकडं!" अरे फोकलीच्या, इथं नुसतं शेजारी बसुनच माझं कडबोळं झालं, तुला गेल्या चार तासाच्या ह्या उस्तवारीचा काहीच शीण नाही???????

बरं इतका वेळ दुकानात घालवायचा तर ह्या साड्यांच्या दुकानदारांनी आम्हा गोरगरीब नवरे लोकांच्या सोयीसाठी काहीतरी तजवीज करायला हवी असं माझं प्रांजळ मत आहे. मॉल्समध्ये नाही का, पोरांना गेम्स लाँजमध्ये सोडुन देतात तसं काहीसं. दुकानाच्या एखाद्या कोपर्‍यात चार दोन टेबलं टाकावीत, जरा बीयर वगैरे द्यावी आम्हाला, सोबत टी.व्ही.वर एखादी रेकॉर्डेड का होईना म्याच लाऊन ठेवावी.....मग बायकांनी चार काय आठ तास खरेदी करत बसलं तरी आमची ना नाही!

अवांतरः माझे दोन सदरे आणि दोन विजारी घ्यायला एकदा(च) चुकुन बायकोला सोबत घेऊन गेलो! तब्बल दोन तास मोडले. कानाला खडा लावला!!!! एकट्याने जाणे. आता माझी स्वतःच्या कपड्यांची खरेदी पुर्वीसारखीच पंधरा मिनीटात पुर्ण होते. म्हणजे घरातून निघाल्यापासून खरेदी करुन, बाहेर येऊन चहा-बिडी उरकुन घरी पोचतोही मी पाऊण-एक तासात :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

सूहास's picture

10 Apr 2009 - 4:08 pm | सूहास (not verified)

मलातर सगळे प्याटर्न एकसारखेच वाटतात..किंमतीची लेबलं सोडुन

हा हा हा

सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..

मिसळभोक्ता's picture

12 Apr 2009 - 2:47 pm | मिसळभोक्ता

कोकच्या कॅन मध्ये दोन पेग टाकून, शांतपणे घुटके घेत, साडी खरेदी चांगली होते.

-- मिसळभोक्ता

ऋचा's picture

13 Apr 2009 - 11:49 am | ऋचा

एकदम सहीच लिहिलय!!!
पण माझा अनुभव वेगळा आहे....
मी नवर्‍याच बरोबर साडी खरेदीला जाते आणि १५-२० मिनिटात साडी घेऊन बाहेर येते..मलाच आवडत नाही साडीसाठी इतका उहापोह करायला...
त्यामुळे नवरा पण खुष आणि तो माझ्या बरोबर आला म्हणुन मी पण खुष!!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

समीरसूर's picture

13 Apr 2009 - 1:13 pm | समीरसूर

मी पण माझे कपडे १० ते १५ मिनिटात घेऊन बाहेर पडतो. कपड्यांमध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे मला ठरवताच येत नाही. जे दिसतं ते सगळच चांगलं वाटतं. मग जास्त कीस न पाडता जे त्यातल्या त्यात बरं वाटेल ते घेऊन टाकतो. मी एकाच दुकानातून सगळं घेऊन टाकतो. कपड्यांसाठी सत्राशेसाठ दुकाने हिंडत बसणं म्हणजे मला निव्वळ टाईम पास वाटतो. :)

--समीर

धमाल मुलगा's picture

13 Apr 2009 - 2:35 pm | धमाल मुलगा

नायतर काय राव?
मुळात आपल्याकडं पेशन्स नावाची चीजच नसते. त्यात इतकी दुकानं फिरायची म्हणलं तर साला, कपडे घ्यायचा विचारच रद्द होऊन जातो :)
आणी मुळात बघायचं असतंय काय? एक रंग, दुसरं टाईप, तिसरं ब्रँड (हवा असल्यास!), आणि बजेट! फिनीश!!!

दुकानात शिरल्याबरोबर सेल्समनला पकडून वरच्या यादीच्या उलट्या क्रमानं गेलं की १५ मिनिटात खरेदी होते.
उदा: १. अमुक किंमतीपर्यंतचा शर्ट, पँट हवी.
२.फक्त ह्या ब्रँडचे कपडे दाखव
३.प्लेन्/चेक्स/स्ट्राईप्स/कॅज्युअल्स ह्यातलंच फक्त बाहेर काढ.
४. अमुक एका रंगाच्या शेड्स दाखव....

सं-प-लं !!!! डोक्याला शॉट्ट नाय! बाहेर उभ्या असलेल्या दोस्ताची बिडी संपायच्या आत आपण बील देऊन दुकानाबाहेर! हाय काय आन नाय काय :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

दिव्यश्री's picture

3 Sep 2015 - 2:37 am | दिव्यश्री

(नवरा सुखी राहिल हिचा आयुष्यभर!) , तेवढ्यात माझी बायको तळपली.
"आता रात्रीचे ८ वाजून गेलेत. >>> इइ. आणी कंसातील सगळीच वाक्ये भारी.

मस्त मस्त...अगदी रिफ्रेशिंग लेख आहे.
मला साडी खरेदीला १० मिणिटांपेक्षा जास्त वेळ लागत णै म्ह्णूण मी प्यांटवाल्यांचे बोलणे खाते, दरवेळी... :( काय सांगु आता. मला कुठल्याही खरेदीला जास्त वेळ लागत णै. पण मग प्यांटवाल मला लगेच म्हणतात काय घाइ असते णेहमी, दहाव्या मिणिटाला दुकाणाच्या बाहेर आलेच पाहिजे असा णियम आहे का? ई.ई.ई. ह्म्म .असो.

pradnya deshpande's picture

3 Sep 2015 - 3:12 pm | pradnya deshpande

लग्न होऊन १८ वर्षे झाली. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी फक्त १ तास घेतला. त्यानंतरच्या १८ वर्षात १८ वेळाही साडी घेण्यासाठी दुकानात गेले नाही. ज्या ज्या वेळी साडी घेतली त्या त्या वेळी फक्त अर्धा तास लागला. साडी ध्यायला एवढा वेळ कं लागतो याचे कोडे मलाही समजत नाही.

बाबा योगिराज's picture

3 Sep 2015 - 5:58 pm | बाबा योगिराज

या बाबतीत (नवरे मंडळीतुन) मी पन भाग्यवानच. ७-८ वेळा दुकानाच्या खरेदी साठी सुरतला घेउन गेलो होतो. तेंव्हा पासुन आमच्या मंडळी चा खरेदीचा नुरच पालट्ला. अर्ध्या तासात ४-५ साड्या सहजच खरेदी होतात. जर का दुकानदाराने उगच पसारा घातला की त्याने बोलनी खाल्लिच म्हनुन समजा.
आणि मी सोबत असेल तर १५-२० मिनिटे सुद्धा पुरेशी आहेत.

आज काल आमच्या शहरात, काही दुकानात जर का गिर्‍हाईकाने पसारा काढला, आणि काही खरेदी केली नाही की गिर्‍हाईकच बोलन खात.