साडीखरेदीची गोष्ट
लेखनप्रकार
बर्याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला. मी "मित्राला भेटायचे आहे", "घरी काम आहे", "डॉक्टरकडे जायचे आहे", "एकाला महत्वाची कागद-पत्रे द्यायची आहेत" अशी सगळी कारणे एकाचवेळी सांगून पाहिली. एका कारणाने आपले जाणे टळत नाही म्हटल्यावर मी लगेच दुसरे कारण फेकत असे; आणि त्यानेच माझा घात केला. मग शेवटचा उपाय म्हणून मी बायकोला त्यांच्यासोबत जाण्यास उद्युक्त केले. तिचा साड्यांचा, रंगांचा चॉईस कसा चांगला आहे, तिला त्या भागातली आणखीन ही काही नावाजलेली दुकाने माहित आहेत वगैरे सांगून मी हे घोंगडं तिच्या गळ्यात टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पण पाहुणे मुंबईचे होते; आणि बाईसाहेबांना पुण्यातूनच साडी खरेदी करायची होती कारण त्यांच्या मते मुंबईमध्ये अस्सल साड्यांची इतकी व्हरायटी मिळत नाही असे त्यांचे म्हणणे होते; शिवाय पुण्यातल्या इतक्या आतल्या भागात जायचे असल्याने रस्ते, वाहतूक, पार्किंग इत्यादींसाठी कुणीतरी माहितगार सोबत असावा या उद्देशाने मला येण्याच्या आग्रह केला जात होता. शिवाय रावसाहेब बाईसाहेबांच्या साडी खरेदीला चांगलेच ओळखून होते. इतका वेळ "वा, छानच आहे साडी, शोभून दिसेल तुला" वगैरे बोलून बोलून एकटेच थकले आणि कंटाळले असते. त्यांचा हा चाणाक्षपणा माझ्या लक्षात आला. शेवटी मी हार पत्करली आणि आम्ही रावसाहेबांच्या गाडीतून कुमठेकर रस्त्याकडे कूच केले. सुदैवाने वाहतूक जास्त नव्हती. दुकानात शिरलो.
"इटालियन क्रेप कुठे मिळेल?" बाईसाहेबांनी एकाला विचारले. त्याने दुसर्या मजल्यावर सांगीतल्यावर आमची वरात तिकडे निघाली. साड्या त्यांच्या जवळच्या नात्यातल्या एका लग्नासाठी हव्या असल्याने जरा चांगल्याच घ्यायच्या होत्या. दुसर्या मजल्यावर मग साडी दाखवणारा, बाईसाहेब, त्यांच्या दोन मुली आणि अस्मादिकांची धर्मपत्नी या सगळ्यांमध्येच पराकोटीचा उत्साह संचारला.
बाईसाहेबः "इटालियन क्रेप दाखवा" (मी पहिल्यांदाच ऐकला होता हा प्रकार. कुठलीही साडी इटालियन क्रेप म्हणून दाखवली तर काय कळणार आहे यांना?)
सेल्समनः "पार्टी वेअर की ट्रॅडीशनल?"
बाईसाहेबः "पार्टीवेअर" (अरे बाप रे, यांना कुठे जायचयं पार्टीला? मला एकदम 'सरकार' सिनेमामधली पूलसाईड पार्टीत आलेली कट्रीना कैफ आठवली. छान मंद संगीत सुरू आहे, सुंदर-सुंदर बायका झुळझुळीत (आणि बर्यापैकी कमी) कपडे घालून हातात प्याला घेऊन अधांतरी तरंगल्याप्रमाणे फिरत आहेत, पुरुषांची चांगलीच दमछाक होते आहे, वेटर हातात ड्रींक्सचे ट्रे घेऊन अदबीने फिरत आहेत... छे छे...असं कसं होईल? मी विचारच झटकून टाकला.)
सेल्समनः "हे बघा, मॅडम."
बाईसाहेबः "हे असं नको, जरा जास्त वर्क असलेलं नाहीये का?"
सेल्समनः "आहे न, पण ते महाग पडेल खूप" (रावसाहेब निश्चल आहेत, घ्या हात धुऊन!)
बाईसाहेबः "असू द्या. दाखवा."
सेल्समनः "हे बघा, साडे आठ ते दहा हजारापर्यंतची रेंज आहे याची" (मी उडालोच. एवढी महाग साडी? एवढ्या पैशात माझे पुढच्या ५ वर्षांचे कपडे होतील. त्यात मोजे, हातरुमाल, बनियन हे देखील आरामात बसतील. मी हळूच रावसाहेबांकडे बघितलं. ते अजूनही निश्चल होते. त्यांचा आवडता नट नवीन निश्चल असावा असे मला उगीच वाटून गेले.)
बाईसाहेबः "अरे बाप रे...ही पांढरी छान आहे नाही?"
रावसाहेबः "हं छान आहे, घेऊन टाक" (यांच्या मनातले विचार मी तात्काळ ओळखले. लवकरात लवकर इथून कटण्याचा त्यांचा मनसुबा मी ओळखला.)
बाईसाहेबः "अजून आहे का काही?"
सेल्समनः "इटालियन क्रेप मध्ये हीच व्हरायटी मिळेल मॅडम" (सेल्समनला पुढच्या चिकित्सेची कल्पना आलीच होती बहुतेक; त्याने मोठ्ठा उसासा टाकला.)
बाईसाहेबः "सिल्क मध्ये?"
सेल्समनः "ही बघा."
बाईसाहेबः "यात मोरपंखी आहे का?" असं विचारत सहज म्हणून बाईसाहेबांनी रावसाहेबांकडे पाहिलं.
रावसाहेबः (गडबडून) "हं छान आहे, घेऊन टाक. मोरपंखी छानच दिसतो तुला, प्रश्नच नाही."
बाईसाहेबः "ही मोरपंखी नाहीये. बघत पण नाहीत आणि म्हणे घेऊन टाक. (मला उद्देशून) "कशी आहे?"
रावसाहेबः "अगं ही नाही म्हणत मी; ती तिकडे त्या ढीगाच्या खाली आहे नं ती! मला वाटलं तू तिच साडी बघतेयस." (सावरलं कसं-बसं.)
मी: "छान आहे, रंग उठावदार आहे." (तिथून पटकन उठण्याची वेळ यावी म्हणून मी मुद्दाम उठावदार हा शब्द वापरला होता. कुठल्याच साडीला वाईट म्हणायचे नाही हे मी ठरवूनच टाकले होते. बायकोला पण तशी तंबी भरली होती.)
बाईसाहेबः "पैठणी दाखवा जरा"
सेल्समनः (पैठणी दाखवत) "हे बघा मॅडम, ही धूप-छाँव आहे, मस्त दिसेल." (प्रकाश पडल्यावर चमचमणारा रंग म्हणजे धूप-छाँव हे मला तेव्हा कळलं.)
बाईसाहेबः (रावसाहेबांना उद्देशून) "ही कशी वाटेल हो?" (रावसाहेब नेमके इकडे-तिकडे नजर टाकत होते. ते "कोण? कोण?" असं म्हणतात की काय अशी भीती मला क्षणभर वाटून गेली.)
रावसाहेबः "छान आहे, घेऊन टाक. काय घ्यायचय ते लवकर घे, टाईम पास नको करूस उगीच" (रावसाहेबांचा निश्चलपणा आता ढळायला लागला होता. मनातून उफाळून येणारा संताप आणि विवेकबुद्धी यांचं तुंबळ युद्ध सुरू होतं.)
माझी पत्नी: "ही छान आहे ताई. पण यात सिंगल कलरवाली छान वाटेल." (तरी मी सांगीतलं होतं की जे समोर पडेल त्याला छान म्हणायचं पण बायकांना साड्या पाहिल्यावर बाकीचं काहीच लक्षात राहत नाही हेच खरे.)
बाईसाहेबः "सिंगल कलर दाखवा यात"
सेल्समनः "ही बघा सिंगल कलर. ही पण छान आहे. नवीनच शेड आहे आणि खूप चालतेय सध्या"
बाईसाहेबः (चेहर्यावर गोंधळल्यासारखे भाव) "असं करा, शालू दाखवा बरं" (आता मात्र माझा पण संयम सुटत चालला होता)
धाकटी मुलगी: "आई, तुला नक्की काय घ्यायचयं? तुला इटालियन क्रेप घ्यायची होती ना?" (ही जरा समजुतदार दिसत होती. मूळ मुद्यावर आईला आणायचा आटोकाट प्रयत्न करत होती.)
बाईसाहेबः "अगं पण इथं चांगली नाहीये ना इटालियन क्रेप! मुंबईला पार्टीमध्ये असं नाही घालत." (मुंबईची पार्टी असा काही सिनेमा पाहिलाय का यांनी?)
थोरली: "अगं तुला कुठे पेज थ्री पार्ट्यांना जायचयं? आणि पार्टीमधली साडी तुला शोभली तर पाहिजे" (मी मनातल्या मनात दुजोरा दिला थोरलीला. गुणाची पोर हो!)
बाईसाहेबः "हं म्हणून मी शालू बघतेय ना! पण शालू नेहमीचाच आहे गं. काहीतरी फॅशनेबल पाहिजे. मुंबईमध्ये सध्या वेगळीच फॅशन आहे. नेटच्या ट्रांस्परंट साड्या घालतात बायका." (अरे देवा, हे काय नवीनच खूळ आता. या रोज ताज आणि ओबेरॉयमध्ये पार्ट्यांना जातात की काय? आणि यांना हे घालायचयं? .....)
धाकटी: "शी, त्यातून सगळं पोट उघडं दिसतं. पोट सपाट असायला हवं त्यासाठी" (ही थोरलीपेक्षा जास्त समजूतदार वाटत होती)
थोरली: "आई, तू शालूच घे" (हिच्या निर्णयक्षमतेला मानलं.)
माझी पत्नी: "नाहीतर पैठणी घे, ती बघ निळ्या रंगाची किती छान आहे." (पुन्हा तेच! २-३ वेळा बजावून देखील काही उपयोग झाला नव्हता. मी डोळे शक्य तेवढे वटारून माझ्या अर्धांगिनीकडे बघत होतो; कुणाचं लक्ष गेल्यावर लगेच चेहरा हसरा करत होतो. खूप कसरत करावी लागते असं करतांना. आमचं बेटर हाफ मात्र माझ्याकडे फुल्ल दुर्लक्ष करत होतं.)
बाईसाहेबः "कांजीवरम मध्ये आहे का काही लेटेस्ट डीजाईन्स?" (आता मला सेल्समनची दया यायला लागली होती.)
सेल्समनः "यातल्या कुठल्या बाजूला काढू का?"
बाईसाहेबः "ती निळी पैठणी, ती पांढरी क्रेप आणि तो मोरपंखी शालू बाजूला ठेवा."
सेल्समनः "या बघा ताई, कांजीवरम!" (सेल्समन मॅडमवरून ताईवर आला होता. बाईसाहेबांनी खूप साड्या बघितल्या पण त्यांच्या पसंतीला कुठली उतरत नव्हती.)
धाकटी: "आई, बोअर होतयं, लवकर घे ना!" (नवरा सुखी राहिल हिचा आयुष्यभर!)
बाईसाहेबः "प्रिंटेड मध्ये काही व्हरायटी आहे का?" (रावसाहेब कुठल्याही क्षणी झोपतील याची मला खात्री वाटत होती.)
सेल्समनः "त्या तिकडे खूप आहेत बघा खाली, बघून घ्या." (नक्कीच पुणेरी सेल्समन होता तो. काही वेळाने "आमची आता चहाची वेळ झालेली आहे, तुम्ही आता उद्या या साड्या बघायला. दुपारी १ च्या आत या." असं म्हणून तो पळून जातो की काय असे मला वाटले.)
बाईसाहेबः "काय गं बाई, काहीच पसंत पडत नाहीये. मुंबईत पार्टीत घालायच्या आहेत साड्या...तिथे काय शालू आणि कांजीवरम घालू?"
थोरली: "मग बघितल्याच कशाला? टाईम पास झाला नुसता" (मॅनेजर होणार पोरगी मोठेपणी.)
रावसाहेबः "चला निघू या..." (हुश्श्...किती गोड वाटलं ऐकायला.)
बाईसाहेबः "चला दुसरीकडे बघुया."
आम्ही सगळे बाहेर आलो. रस्त्याने फिरत-फिरत रावसाहेबांचा पारा चढत होता. तेवढ्यात माझी बायको तळपली.
"आता रात्रीचे ८ वाजून गेलेत. अर्ध्या-पाऊण तासात दुकाने पण बंद होतील मग नीट बघून पण होणार नाहीत. घाई-घाईत उगीच काहीतरी घेतल्यासारखं वाटेल."
बाईसाहेबः "हो गं, पण उद्या सकाळी तर आम्हाला निघायचयं"
रावसाहेबः "आपण मुंबईतच घेऊन टाकू. तिथे या सगळ्या साड्या मिळतात." (येस्स्स्स्....रावसाहेबांचा विजय असो!)
बाईसाहेबः "हम्म्म्म्....अगं ते बघ, एक पुस्तकांच दुकान उघडं दिसतयं." (माझे कान टवकारले, आता काय नवीन? आम्ही सगळेच धास्तावलो.)
धाकटी: "पण तिथे तुला फॅशनेबल साड्या नाही मिळणार" (कार्टी हुशार आहे!)
बाईसाहेबः "अगं, ते मला माहितीये. वहिनींसाठी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घ्यायचं होतं ना? आणि एक आपल्या साठी पण घ्यायचं होतं. ते बघू नं मिळतयं का."
आम्ही सगळे दुकानात गेलो. सुदैवाने तिथे पुस्तकाच्या दोन प्रती मिळाल्या आणि हाश्शहुश्श करत आम्ही इटालियन क्रेपच्या ऐवजी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घेऊन घरी परतलो!
--समीर
वाचने
26419
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
मस्त
१००+ सहमत....
In reply to १००+ सहमत.... by सागर
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by घाशीराम कोतवाल १.२
अ-भि-नं-द-न !!!!
अप्रतीम
मस्त
In reply to मस्त by रेवती
एकतर सेल्समनला
In reply to एकतर सेल्समनला by संदीप चित्रे
काहीही
गुड वन..
In reply to गुड वन.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
कर बेट्या कर गमजा!
In reply to कर बेट्या कर गमजा! by धमाल मुलगा
सहमत ... तरी पण .....
बेष्टच
मस्त
मजा आली.
हेहे सहीच
ऑफिसात...
हम्म्म...सग
सॉल्लीड!!
दोन्ही
नेसून पण दखवतात
In reply to नेसून पण दखवतात by समीरसूर
ठ्ठ्यॉ....!!!!!!
In reply to ठ्ठ्यॉ....!!!!!! by प्राजु
माफ करा!
In reply to माफ करा! by समीरसूर
मी आनी नी
In reply to मी आनी नी by प्रकाश घाटपांडे
प्रतिसाद माहितीपूर्ण आहे :)
In reply to प्रतिसाद माहितीपूर्ण आहे :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>बोली
In reply to मी आनी नी by प्रकाश घाटपांडे
हाहाहा...
In reply to मी आनी नी by प्रकाश घाटपांडे
अग्गायायायायायायाया.........
In reply to मी आनी नी by प्रकाश घाटपांडे
हॅहॅहॅहॅ....
मस्त रे !
हाहाहा....
In reply to हाहाहा.... by समीरसूर
सहमत आहे !
In reply to सहमत आहे ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाग
In reply to महाग by समीरसूर
:)
In reply to हाहाहा.... by समीरसूर
साड्यांची लायब्ररी
In reply to साड्यांची लायब्ररी by प्रकाश घाटपांडे
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकान्ला काय कळनार?
In reply to साड्यांची लायब्ररी by प्रकाश घाटपांडे
साड्यांच्
सुर
धन्यवाद!
>>आम्ही
सह्ही लिहिलंय समीरसूर!
In reply to सह्ही लिहिलंय समीरसूर! by धमाल मुलगा
हा हा हा
कोकची बाटली
एकदम सहीच
उत्तम
In reply to उत्तम by समीरसूर
सहमत!
हाहाहाहा
माझा अनुभव
खी खी खी