खासियत खेळियाची - मार्क वॉ

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
25 May 2020 - 1:26 pm

Crush - हो हो ! तुम्हाला अभिप्रेत आहे तोच crush. ह्याला का कोणास ठाऊक मराठीत प्रतिशब्द सापडतच नाही. आणि नाही सापडत तेच बरंय. Crush मधला भाबडेपणा, त्यातली निरागसता आणि निर्भेळ असं प्रेम हे तसंही इतर कुठल्या शब्दात व्यक्त होणं अवघडंच.

क्रिकेट आपलं पहिलं प्रेम असेल तर क्रिकेटमधला आपला पहिला क्रश म्हणजे मार्क वॉ. "कितने भी तू करले सितम, हस हसके सहेंगे हम" हे गाणं मार्क वॉ इतकं कोणाला चपखल बसत नसेल. ह्या माणसात मुळातच एक आपलेपणा वाटायला लावणारं काहीतरी होतं. ठाव न लागणारं काहीतरी. "ना समझे वो अनाडी है" म्हणणारी नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची तसंच काहीसं. मार्क वॉ नी आपल्या विरुद्ध सेंच्युरी मारून मॅच काढली, मोक्याच्या वेळेला कोणाला रन आउट केलं, इतकंच काय १९९६ च्या वर्ल्डकप मध्ये सचिनला वाईड टाकून आउट केलं तरीही आम्हाला कधी मार्क वॉचा राग आला नाही. कदाचित त्याच्या बॅटिंगमध्ये असणार्‍या साध्या सरळ सौंदर्यानी आम्हाला भुरळ घातली होती.

MW1 MW2 MW3

आपल्या काही मिनिटांनी मोठ्या असलेल्या गंभीर, खवचट जुळ्या बंधूंच्या तुलनेत मार्क वॉ म्हणजे कार्ल्याच्या कापांच्या शेजारी रसाळ पायरी जणू! ह्या माणसाच्या हातात बॅट म्हणजे व्हायोलनिस्टच्या हातात बो! आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना "शॉट" म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! "अहिंसा परमो धर्मः" म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा - थोपटायचा - क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस, फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार - ह्याचा प्रत्येक फटका एक सुरेल composition असायचं. पण मला भावणारी धाकल्या वॉ साहेबांची खासियत म्हणजे त्यांचं कॅचिंग!

पहिल्या / दुसर्‍या स्लिपमध्ये गडी असा उभा राहायचा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय! निवांतपणा personified. बरं हा निवांतपणा म्हणजे इंझमामचा आळसावलेला निवांतपणा नव्हता बरं का! ह्या निवांतपणातही एक चलाखी होती. कसली घाई नाही, गडबड नाही, चिंता नाही. हा निवांतपणाच मार्क वॉला सर्वोत्तम स्लिप्स फील्डर बनवून गेला.

स्लिप्समधल्या फील्डरकडे बॅटीची कड घेतल्यावर बॉल अनपेक्षित वेगात आणि विचित्र कोनात येतो. त्याचा अंदाज घेणं म्हणजे कर्मकठीण काम. पण म्हणतात ना - A sure sign of greatness is making difficult things look easy. इथेच मार्क वॉ "उत्तमते"च्या सीमा ओलांडून महानतेकडे जायचा. त्याला येणार्‍या चेंडूचा अचूक अंदाज तर असायचाच पण शिवाय त्याच्या मनासारखंच त्याचं शरीरही relaxed असायचं. अत्यंत चपळाईने तो त्या चेंडूच्या रेषेत यायचा आणि प्रेयसीनं टाकलेलं गुलाबाचं फूल झेलावं तसा अलगदपणे तो कॅच घ्यायचा. मग तो अगदी जमिनीलगत असो किंवा डोक्याच्या वर. बरं हे सगळं दिसायला जितकं साधं सोपं दिसायचं तितकंच ते प्रत्यक्षात कठीण आणि कसबाचं काम होत. त्यामागे देखील तंत्रशुद्ध अभ्यास होता. मार्क वॉ त्याला "narrow stance technique" म्हणायचा. पायात अंतर कमी ठेवलं की "सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी" च्या बाहेर पटकन हालचाल करता येते. तुमचे हात जेवढे रिलॅक्स्ड असतील तितका तो चेंडू त्यांत पिशवीत कोबी टाकावा तसा सामावतो. फक्त त्यात जर तुम्हाला ती नजाकत हवी असेल तर मात्र तुम्हाला ते देणं जन्माला येतानाच घेऊन यावं लागतं.

आजकाल तर फील्डिंग कधी नव्हती इतकी सुधारली आहे. चपळता, अचूकता, वेग सर्वच बाबतीत आजकालचे फील्डर्स निर्विवादपणे सरस आहेत. पण फील्डिंगमधलं "ग्लॅमर" वाढलं असलं तरी "सौंदर्य" कुठेतरी हरवत चाललेलं दिसतं. मार्क म्हणायचा “Don’t try and catch the ball, let the ball catch you.” पण आजकालच्या swipe left swipe right करणार्‍या tinder पिढीला नुसत्या चोरट्या कटाक्षांतून व्यक्त होणारा रोमान्स कळावा तरी कसा? पोरांनो - मार्क वॉचं स्लिप्स मधलं कॅचिंग बघा - तुम्हाला थोडा अंदाज येईल.

जे.पी. मॉर्गन.

मौजमजाप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

25 May 2020 - 2:44 pm | सौंदाळा

झक्कास, स्लेजिंग हाच निकष लावला तर मार्क वॉ ऑस्ट्रेलियन वाटायचाच नाही.
एका (का दोन?) वर्ल्ड कप मधे पण तो आणि सचिन सर्वाधिक धावांच्या बाबतीत मागे पुढे होते.
वोर्न, मॅकग्रा, गिलक्रिस्ट यांच्या तुलनेने तेवढं वलय मार्कला मिळालं नाही असं वाटतं, कदाचित त्याच्या शांत स्वभावामुळेच असेल.

गणेशा's picture

25 May 2020 - 2:52 pm | गणेशा

वा, खुप मस्त लिहिले आहे..
मार्क वॉ आवडायचा... त्या कित्येक matches पाहिल्यात तेंव्हा..
पण नंतर मला स्टीव्ह जास्त आवडू लागला.. तो कॅप्टन झाल्यावर तर जास्तच... त्याच्या कप्तानी विरुद्ध द्रविड ने केलेल्या धावा पण जास्त ठळक आठवल्या... हरभजन च्या विकेट्स पण..

नूतन आज च आठवली होती... तिचा सुखद उल्लेख छान वाटला...

लिहित रहा.. वाचत आहे...

सिरुसेरि's picture

25 May 2020 - 3:00 pm | सिरुसेरि

छान ओळख . मार्क वॉ आणी मार्क टेलर हे त्या मानाने शांत ऑसी खेळाडु होते .

शेखरमोघे's picture

25 May 2020 - 7:56 pm | शेखरमोघे

छान, अगदी एखाद्या कवितेसारखे लिहिले आहे, गुलाबापासून कोबीपर्यन्तचे सगळ्या तर्‍हेचे Shots लीलया वापरून. या प्रतिसादात दाखवता येत नसली तरी शब्द रूपात "Hats off".

फारएन्ड's picture

25 May 2020 - 8:37 pm | फारएन्ड

मस्त लिहीले आहे. ऑसी खेळाडूंमधे खेळातील सौंदर्य वगैरे प्रकार अपवादानेच. मात्र मार्क वॉ खेळत असला की बघायला मजा यायची. त्याच्या शतकांचे वर्णन "रीगल", "रॉयल" अशा विशेषणांनी होत असे. बाकी ऑसीज इतर अ‍ॅक्शन हीरोज, तर मार्क वॉ म्हणजे जेम्स बॉण्ड. इस्त्रीची घडी न बिघडता शतक!

बाकी त्याच्या स्लिप कॅचिंगच्या क्लिप्स मी अजूनही अधूनमधून शोधून पाहतो. भन्नाट असतात. अगदी अशक्यप्राय कॅचेस अगदी सहज घेतलेले आहेत. त्याची माहिती आणि महती समजून घ्यायला रिची बेनॉ, इयान चॅपेल सारखे लोक समालोचन करत असले की मजा येते.

अर्धवटराव's picture

26 May 2020 - 4:51 am | अर्धवटराव

जीभेचं टोक नाकाकडे नेणारं मांजर :) बॉलींग पण छान करायचा. आमचा आवडता खेळाडु.

जे पी, तुझं ऑब्झर्वेशन कमाल आहे गड्या.

मूकवाचक's picture

26 May 2020 - 7:18 am | मूकवाचक

मेहदी हसन किंवा हरिहरन यांची मस्त जमलेली मैफिल ऐकावी तसा ओघवत्या शैलीतला सुंदर लेख ...

चांदणे संदीप's picture

26 May 2020 - 10:23 am | चांदणे संदीप

तुमच्या नजरेतून पाहणे म्हणजे आपण काय पाहत होतो नक्की? असा प्रश्न पडायला सुरू होतो.

तुमच्या लिखानाचा मी आधीपासूनच पंखा आहे. अशाच आणखी उत्तमोत्तम लेखांच्या प्रतिक्षेत.

सं - दी - प

बेकार तरुण's picture

26 May 2020 - 11:00 am | बेकार तरुण

मस्त लेख... मार्क वॉ काही वेगळाच खेळाडु होता. त्याच्या फलंदाजीचे वर्णन आवडले. एके काळी तो लारा न सचिन जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणुन गणले जायचे.

शेन वॉर्न ने त्याच्या पुस्तकात म्हणले आहे की तो एकुणच स्लिप फिल्डिंगच्या बाबतीत फार नशीबवान होता... आधी टेलर मग मार्क वॉ ...
पण त्याने म्हणले आहे की मार्क कुठेही फिल्डींग करु शकायचा, ते पण अगदी सहज. लांब सीमारेषेपाशीही अथवा कव्हर्स, मिड ऑन, मिड ऑफ.. कुठेही (मला नक्की आत्ता आठवत नाहीये पण १९९९ सेमी मधे साऊथ अफ्रिका विरुद्ध मिड ऑन ला बॉल अडवुन फ्लेमिंगकडे सरपटी फेकणारा मार्कच होता).
सिली पॉईंट अथवा फॉरवर्ड शॉर्ट लेग ला उभा असेल तर तो बॉल बॉलरच्या हातातुन सुटेस्तोवर बॉलरचा हात बघत असे आणि मग बॅट्समन च्या हालचालींकडे (फुटवर्क). त्यामुळे शेन वॉर्नच्या मते तो सर्वोत्तम क्लोन इन फिल्डर होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2020 - 11:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडले. दोन्ही वॉ बंधु आपले आवडते खेळाडू.

०दिलीप बिरुटे

Nitin Palkar's picture

26 May 2020 - 12:01 pm | Nitin Palkar

सुंदर लेख. मार्क वॉच्या खेळासारखाच. 'नूतन जशी कुठल्याही मेकअप, कॉस्चूम शिवाय देखील कमालीची सुंदर दिसायची'... इथे तुम्हाला कोणत्याही कॉस्चूममध्ये असं. म्हणायचं असावं.... ह. घ्या...

तुषार काळभोर's picture

26 May 2020 - 3:44 pm | तुषार काळभोर

मॉर्गन राव, तुमच्या एका खेळिया ने ही मालिका मराठी ऑनलाईन क्रीडा - लेखातील सर्वोत्तम लेखमाला असणार यात शंका नाही.

त्याचं हे एक्स्टेन्शन खासियत खेळियाची सुद्धा तितकीच सुंदर आहे.

मार्क वॉ ची तुलना नेहमीच स्टीव्ह वॉ अन् सचिनशी केली गेली. भारतात जसे द्रविड - लक्ष्मण सचिनच्या छायेत झाकोळले गेले, तसं काहीसं.

मार्क वॉ बाबत आठवतो त्याचा शांत समाधानी चेहरा, स्लीपमध्ये कॅच घेण्यासाठी घेतलेला स्टांस, अर्धशतक, शतक, विजयाचं संयत सेलिब्रेशन.

जन्टलमंस गेम नाव सार्थ करणाऱ्या खेळाडूंपैकी एक.

किसन शिंदे's picture

27 May 2020 - 11:40 pm | किसन शिंदे

जेपी माॅर्गन नाव वाचून लेख वाचायला आलो आणि निराशा झाली नाही. बाकी मार्क वाॅच्या बाबतीत केलेली सगळी निरिक्षणे खासच.

सुमो's picture

28 May 2020 - 10:09 am | सुमो

मार्क वॉ आणि डेमियन मार्टिन अत्यंत आवडते ऑसी बॅट्समन.

लेख अतिशय आवडला.

Prajakta२१'s picture

28 May 2020 - 11:16 pm | Prajakta२१

त्याचे करियर अजून चांगले व्हायला आणि लाम्बायला हवे होते
२००२ पासून त्याचे करियर फार वाईट पद्धतीने संपले अशा पद्धतीने संपायला नको होते
ऑसी बोर्डाने ऍशेस टेस्ट साठी वगळल्याने त्याने निवृत्ती जाहीर केली २८/१०/२००२
फार हळहळ आणि रुखरुख वाटते त्याच्याकडे बघून
lazy elegance हे विशेषण शेवटी महागातच पडले
सगळ्या वांड मुलांमध्ये एखादा शांत sincere scholar मुलगा कसा लगेच लक्ष वेधून घेतो तसे इतर ऑसीज मध्ये तो नेहमी लक्ष वेधून घेतो

एबीडी वर पण एक होऊन जाऊद्या की.

बरोबर.. सच्या नंतरचा आवडलेला हा खेळाडू.. तो रिटायर झाल्यावर तश्याच फिलिंग होत्या.. सच्या सारख्याच...

बेकार तरुण's picture

9 Jun 2020 - 1:04 pm | बेकार तरुण

काल तुनळीवर सचिनचे ऑस्ट्रेलियातील १४८ (तीच मॅच ज्यात शास्त्री ने द्विशतक केले होते) बघत होतो....
त्यात मार्क वॉ मिडियम पेस बॉलिंग करताना दिसला.... अजिबात आठवत नाही कधी त्याला मिडियम पेस टाकताना पाहिल्याचं.. नेहमी मार्क वॉ फक्त ऑफ स्पिनच टाकायचा असे वाटत होते .....