पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला,
वाराच काळजाच्या, ओघात साठलेला.
पाळीव हस्तकांनी, मागून वार केले,
त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला.
माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले,
त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला.
प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी,
रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला.
आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली,
झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला.
-कौस्तुभ
वृत्त -आनंदकंद
प्रतिक्रिया
18 May 2020 - 8:20 am | निनाद
मुक्तछंद नावाच्या आळशी कचर्यात वृत्तबद्ध कवितेचे हे फुल उगवलेले पाहून अतिशय आनंद वाटला.
वृत्ताचे नाव आनंदकंद असले तरी कविता मात्र दु:खी आहे. असो, आता आनंदकंद वृत्ताची लघु-गुरु क्रम लगावली पण द्या.
या वृत्तातले एखादे गाणे कुणाला माहित आहे का?
18 May 2020 - 11:30 am | कौस्तुभ भोसले
गागालगा लगागा गागालगा लगागा -आनंदकंद वृत्त
उदाहरणेः
१. केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट
२. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार
३. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन
४. आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे
५. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । - ग.दि.माडगुळकर
६. गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे
७. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
22 May 2020 - 1:41 pm | संजय क्षीरसागर
अशी प्रत्येक वृत्ताची ओळख आणि त्यातली गाणी दिली तर मजा येईल
18 May 2020 - 8:51 am | सस्नेह
वृत्तबद्ध कवितेचा आनंद वेगळाच खरा.
पण थोडी थोडी समजली, थोडी थोडी नाही.
18 May 2020 - 2:20 pm | कौस्तुभ भोसले
धन्यवाद
21 May 2020 - 1:52 pm | सचिन
वृत्तबद्ध कविता दुर्मिळ झालेल्या असतांना हा अत्यंत सुखद धक्का ..
कविता जरा दु:खद वाटत असली तरी ...
वृत्तबद्ध कवितेला आपोआपच गेयता प्राप्त होते आणि त्या लयीत छान झोके घेता येतात.
21 May 2020 - 3:45 pm | आयर्नमॅन
पास....
22 May 2020 - 11:54 am | प्राची अश्विनी
सुरेख!
22 May 2020 - 4:09 pm | राघव
आवडले. लिहिते रहा. :-)