गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी ..... पण एक महत्वाची वाटणारी गोष्ट मागितली तीही दिली नाही तर आता कशाला काय मागू , आता काय राहिलं आहे .. असा विचार आल्याशिवाय राहत असेल का लोकांच्या मनात .... जर नशीबातल्या गोष्टी तशाच होणार असतील तर 'असं कर' म्हणून प्रार्थना का करायची , जे व्हायचं तेच होणार असेल तर .... की आपण चांगले भक्त वगैरे नव्हतो :
; आपणच कुठेतरी भक्तीत कमी पडलो , नशीबातच होतं त्याला देव तरी काय करणार म्हणून आपली मागणी ऐकली गेली नाही अशी समजूत करून घेतात लोक ? तेच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी ... आयुष्यात वाईट परिस्थिती असली तर ही आरती म्हणताना मनाला काही जाणवत नसेल का , की कुठे आहे विठोबा , काय करतोय ...
लोकांची भक्ती श्रद्धा ठेवण्याची कपॅसिटी जबरदस्त आहे आपल्याकडे ; की बोलून दाखवत नसतील श्रद्धेला ठेच लागली तरी ? उगाच का बोलून इतरांची मनं दुखवा किंवा कदाचित भीती सुद्धा देवाची .... किंवा आपणच देवाने आपलं गाऱ्हाणं ऐकावं एवढ्या लायक नव्हतो अशी स्वतःची समजूत करून देऊन .... किंवा जरी एक मागणं पूर्ण नाही झालं तरीसुद्धा मानसिक गरज असतेच पाठीराखा आहे , यावेळी नाही केली तरी पुढच्यावेळी गरज पडली तर करेल मदत असा सबकॉन्शस विचार असतो .... माझ्याबाबतीत तसं म्हणता येईल .. मी नास्तिक होऊ शकत नाही .... मला देव प्रिय आहेत , गणपती सुद्धा ... आजोळी घरच्या गणपतीला लहानपणापासून इतकी वर्षं जात असे आमच्याकडे नसतो त्यामुळे ... पण आता जात नाही .. त्या किंवा कुठल्याही घरातल्या गणपतीसमोर उभं राहिलं तर मागितलेली आणि न पूर्ण झालेली इच्छा आठवून लोकाच्या घरी डोळ्यात पाणी येऊन सिन होईल म्हणून गणपती उत्सव माझ्यापुरता तरी कायमचा संपलेला आहे .
प्रतिक्रिया
3 Sep 2019 - 5:02 am | जॉनविक्क
पण एक महत्वाची वाटणारी गोष्ट मागितली तीही दिली नाही तर आता कशाला काय मागू , आता काय राहिलं आहे .. असा विचार आल्याशिवाय राहत असेल का लोकांच्या मनात ....
हो. माझ्या मनात तसा विचार आला. पण गरजवंताला पर्याय नसतात. त्यामुळे हा विचार प्रत्येकजण अमलात आणेलच असे नाही. म्हणजे अमक्याने अमुक दिले नाही म्हणून आता तमक्याकडे तमुक मागून बघावे असे सुद्धा होतेच जर निष्पक्ष परिक्षणाची सवय नसेल तर.
उदा.
मिपावर प्रतिसाद आले नाही म्हणून कोणी इतर संस्थळावर लिहणे थांबवतात का ? नाही. उलट लोकात मिपाच्या नावानेही बोंब मारली जाऊ शकते.
अथवा तुम्ही नाही का हा धागा टाकलात ? मी नाही का न पटणाऱ्या गोष्टीवर टीका करत ?
मनुष्य हा आस्तिक असो वा नांस्तिक तो फक्त एक पॅटर्न फॉलो करत राहणारा प्राणी आहे. एखादा पॅटर्न समजून घ्यायचा प्रयत्न करताना त्यात अपयश आले म्हणून तो चटकन हार मानेल असेही घडूच शकत नाही(व्यक्तिपरत्वे याची तीव्रता कमीजास्त) आणि ज्याला जो पॅटर्न समजला अनुभवाला आला तो त्याला फॉलो करत राहातो. आणि त्यासाठी एकमेकांची डोकीही फोडत राहतो.
जर नशीबातल्या गोष्टी तशाच होणार असतील तर 'असं कर' म्हणून प्रार्थना का करायची , जे व्हायचं तेच होणार असेल तर .... की आपण चांगले भक्त वगैरे नव्हतो :
सर्वात पहिला विचार आपणच भक्तीमधे कुठेतरी कमी पडलो असा येउन मन अत्यन्त उदास होते. अन्नपाणीही गोड लागत नाही. अर्थात याचे गांभीर्य तुम्ही समर्पित किती व्हायला तयार होता यावर ठरते. पण ही खिन्नता आपल्यालाच दोषि करार देते. मग आठवते ते नशिब, प्रारब्ध, आणि जगप्रसिद्ध मागच्या जन्मातील कर्माचे तत्वज्ञान... :) म्हणजे आंनंदी आंनद. त्याच्या सत्यअसत्यतेचा पुरावा सोडा निदान तत्वज्ञान म्हणून तरी त्यात विरोधाभास कसा हा एक प्रश्नच आहे.
तेच विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
अध्यात्मात काव्यरस आल्याने त्याचा आध्यात्मिक विकास किती झाला की काव्यातील कलात्मकतेत रमलेला व्यक्ती भकास किती झाला हा स्वतंत्र धाग्याचा विषय असेल.
लोकांची भक्ती श्रद्धा ठेवण्याची कपॅसिटी जबरदस्त आहे आपल्याकडे ; की बोलून दाखवत नसतील श्रद्धेला ठेच लागली तरी ? उगाच का बोलून इतरांची मनं दुखवा किंवा कदाचित भीती सुद्धा देवाची ....
PEOPLE COMES WITH ALL SHAPES, SIZE, AGE, SEX AND SPIRITUAL OR RELIGIOUS ATTITUDE.
गणपती उत्सव माझ्यापुरता तरी कायमचा संपलेला आहे
नक्कीच. पण याचा अर्थ इतरांनाही तसेच असावे असे अजिबात होत नाही.
ज्या मुहूर्तावर धागा लिहलाय ते पाहता तुम्ही इतरांच्या समोर तुमच्या बाप्पा बाबतच्या व्यथीतपणामुळे नक्कीच सिन केला असेल/असता याची खात्री पटली.
3 Sep 2019 - 8:53 am | nishapari
धन्यवाद ... पहिल्यांदा तुम्ही विचार करून प्रतिसाद दिल्यासारखा वाटत आहे .. जरी थोडा टीकात्मक सूर असला तरी ... नाहीतर एरवी बऱ्याचदा काही मोजके अपवाद वगळता लोकांच्या बहुतेक धाग्यांवर खोचक प्रतिसाद देत असता .. काहीवेळा तर उगाच टीज करण्यासाठी :) असं मी नोटीस केलं आहे तुमचे सगळे प्रतिसाद पाहून ... राग नका मानू .. टीका नाही करत आहे , प्रत्येकाची वेगळी स्वभाव वैशिष्ट्यं असतात तसं हे एक म्हणता येईल - लोकांना उपरोधिक / डिवचणारे प्रतिसाद देऊन वादाची गंमत घ्यायची ... प्रत्यक्ष उत्तर नको असतं , वादातच आनंद मिळतो काहींना त्यातला स्वभाव आहे तुमचा ... त्यातही काही वाईट म्हणायचं नाही , फक्त एक नोंद केली स्वभावाची .. कितपत बरोबर आहे माहीत नाही ..
3 Sep 2019 - 9:59 am | जॉनविक्क
धन्यवाद ... पहिल्यांदा तुम्ही विचार करून प्रतिसाद दिल्यासारखा वाटत आहे ..
असं म्हणता ? हरकत नाही, जमेल हळू हळू, आणि लक्षात येईल की विचारपूर्वक लिहलेला हा माझा पहिला प्रतिसाद न्हवे.
लोकांच्या बहुतेक धाग्यांवर खोचक प्रतिसाद देत असता .. काहीवेळा तर उगाच टीज करण्यासाठी :) असं मी नोटीस केलं आहे तुमचे सगळे प्रतिसाद पाहून ...
निरीक्षण शक्ती उत्तम आहे. पण वापर पुरेसा वाटत नाही. तसेच आपण हा धागा काढणे, एखाद्याने मिपाबाबत भलतीकडेच काही लिहणे, आणि व्यक्तीच्या श्रध्दांना धक्का बसल्यास अध्यात्मिक निष्ठा बदलली जाणे या तीन बाबी मी एकाच माळेत का ओवल्या हे समजले नसल्यानेही आपण जरा नाराज वाटता. असो. कितपत बरोबर आहे माहीत नाही.
प्रत्यक्ष उत्तर नको असतं , वादातच आनंद मिळतो काहींना त्यातला स्वभाव आहे तुमचा
:) अपूर्ण उत्तर मी पूर्ण मानत नाही आणी नेमकं ह्याचाच राग मनात धरून लोक निष्कारण वाद घालतात आणि आम्ही बदनाम होतो. पण त्याचीही फिकीर करायचे कारण नाही...
....फक्त एकमेव दुर्दैव इतकेच आहे की ज्या विषयावर मी विचार करून प्रतिसाद दिलाय असे चक्क आपणास वाटते तिथे धाग्याबाबत चर्चा बाजूलाच ठेऊन इतर धाग्यावर मी काय गुण उधळले आहेत या अवांतरात आपणास जास्त स्वारस्य दिसत आहे :(
त्यातही काही वाईट म्हणायचं नाही , फक्त एक नोंद केली स्वभावाची ..
3 Sep 2019 - 9:17 am | nishapari
पण याचा अर्थ इतरांनाही तसेच असावे असे अजिबात होत नाही.
असं व्हावं अशी काही माझी इच्छा किंवा आग्रह नाही आहे . फक्त मी एकटीच असणं कसं शक्य आहे असं वाटून बाकीचे कुणी असल्यास ते या परिस्थितीत कसे रिऍक्ट होतात याबद्दल कुतूहल वाटलं ... म्हणजे गणपती उत्सव किंवा एकूण देवाची प्रार्थना वगैरे ... देवाने आपल्या विश्वासाला तडा जाऊ दिला , सुखकर्त्या दुखहर्त्या विघ्नहर्त्याने मला मात्र सुखी केलं नाही , माझं दुःख हरलं नाही , माझं विघ्न हरलं नाही ... आरती कितीही सुमधुर असली तरी हे विचार कोणाच्याच मनात येत नसतील का ... असा प्रश्न पडला .
आणि जर वाईट परिस्थितीतून जाऊनही त्यांच्या मनात देवाबद्दल असे विचार येत नसतील तर त्यामागे त्यांची काय विचारधारा असते हे समजलं तर मलाही ते विचार मनातून काढून टाकण्यात कदाचित यश येईल असाही विचार होता .. कारण अर्थातच हे विचार प्लेजंट नाहीत... रक्षणकर्ता आहे या विश्वासाला तडा गेल्याचा मनस्ताप फार झाला आहे .. यापुढे तसा आधार - विश्वास राहिला नाही ... अर्थात वाईट वेळ आलीच तर मीही देवापुढे हात पसरीनच परत ... पण त्याच्यावर भरोसा टाकून निर्धास्त राहता येईल असं वाटत नाही .. देवावरचा विश्वास अस्तिकांंना कठीण परिस्थितीतून जाण्याचं बळ देतो .. तो विश्वास मोडून पडल्यामुळे आतून पोकळ झाल्यासारखं वाटतं कधीकधी ... बाहेरून दिसायला काहीच प्रॉब्लेम नाही .. पण कसोटीची वेळ आली तर चटकन मोडून पडेन असं वाटतं .. आता तशी वेळ येऊच नये ही प्रार्थना आहेच परत देवाकडे ... नास्तिक होता आलं असतं तर बरं झालं असतं असंही वाटतं कधीतरी ....
3 Sep 2019 - 10:14 am | जॉनविक्क
येतात आणि, त्यापुढेही बऱ्याच गोष्टी घडतात श्रद्धा मोडीत निघाल्यावर. काही आपण अनुभवल्याही असतील. पण श्रद्धा मोडीत निघाल्याची कितीही मोठी, शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक अथवा आणखी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी आपण मोडीत निघण्याइतके कमकुवत नाही हे स्वतःलाच सिद्ध विसरू नका.
राखेतून उभारी घ्यायची सवयच इतकी झाली आहे की पुन्हा राखेत गेलो नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटायला सुरुवात होते बगा. :)
3 Sep 2019 - 10:57 am | nishapari
धन्यवाद _/\_ पाहू आता काय होतं ते .. शेवटी त्याच्या मनात असेल तेच होतं ना ... वाटल्यास शक्ती देईल , वाटल्यास मोडून पाडेल .. यावेळी मात्र काही झालं तर सहन करण्याची किंवा परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद शिल्लक नाही , सरळ पळून जायचं ठरवलं आहे .. मग उरलेले भोग पुढच्या जन्मात देऊ दे वाटल्यास ... या शरीरातल्या मनाची सहन करण्याची कपॅसिटी संपलेली आहे ... डिप्रेशन वर बराच ताबा आला आहे पूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करता पण आणखी जरासाही धक्का पेलवेल असं वाटत नाही ... ताकद पोखरली फार या आजाराने मनाची ... enlightment must be the purpose of life after life ह्या लाईनीतलं तत्वज्ञान थोडा आधार देतं .. कड्याच्या काठावरून परत आणलं आहे याचं तत्वज्ञानाने .. पण सोसाट्याचा वारा आला तर पाय रोवून ठेवण्याएव्हढे पाय मजबूत नाहीत ... कदाचित होतीलही अजून काही काळाने जर काही थोडीफार अध्यात्मिक / आत्मिक उन्नती झाली , बळ मिळालं तर .... निदान तोवर तरी सोसाट्याचा वारा येऊ नये म्हणजे झालं .
3 Sep 2019 - 1:47 pm | जॉनविक्क
तसेच ऐन गणपतीत त्याच्यावरच टीका करायला आपण धागा काढलात याचेही गांभीर्य मी समजून घेतले नाही.
कशाला हवी Enlightment ? अर्जुनाला संन्याशीच बनायचं असतं तर तो बालवयात अथवा युद्ध सुरू व्हायच्या खूप आधीच वनात निघून गेला नसता का ? दोन्ही बाजू समोरासमोर उभ्या ठाकल्यावरच त्याला धनुष्य का ठेवावेसे वाटले ? अर्थातच तो चालू प्रश्नामुळे अस्वस्थ, निराश व चिंतीत झाला होता.
तेंव्हा सर्व प्रथम ENLIGHTENMENT चा मोह अथवा तत्वज्ञानात फार गुरफटू नका. आता सांगा बरे काय परपज आहे ते ? काहीच नसेल मिळत तर एखादे ठरवा. उत्तुंग हवे असं काही नाही.
जी गोष्ट चालू त्रास संपवायला (हो संपवायलाच नुसते तगून रहायला न्हवे) उपयोगी पडली नाही असा अनुभव सांगतोय तर तीच गोष्ट भविष्यात अथवा पुढील जन्मात कामी येईल असे वाटणेच विरोधाभास नाही का ?
आपण मानसशास्त्र, तत्त्वज्ञान चांगलेच जाणता. हुशार आणि अतिशय धिराच्याही आहात. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे शत्रूसोबत कसे लढायचे ते, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती कमी पडतेय, अर्जुनाप्रमाणेच. पण महाभारत आयुष्यात कधी वाचलेच नसते तर तुम्ही कशा राहिला असता, तुम्हाला तुमची ओळख अस्तित्व, गुण दोष, (विशिष्ट व्यक्तिमत्व) आहेत की नाहीत ? त्याचाच योग्य दिशेने विकास ही विकासाची आणि enlightment चीही गुरूकिल्ली आहे.
3 Sep 2019 - 3:24 pm | nishapari
अहो मी नव्हतेच रागावले , नाराजीने नव्हता दिला तो प्रतिसाद .. खरंच तुमचे इतर प्रतिसाद वाचून जे मत झालेलंच होतं ते सांगितलं . वेळ आणि जागा चुकली असेल .. तेही टीकेचा सूर नव्हता .. तुम्हालाच राग आला असेल तर माफ करा ..
बाकी गणपतीत धागा काढणं काहींना आवडणार नाही अशी साधारण कल्पना होतीच .. पण धर्माचा अपमान करू पाहत आहे असा चुकीचा निष्कर्ष काढून भावना वगैरे दुखावून घेण्याएवढे इथले लोक इमॅच्युअर नाहीत उलट प्रत्यक्ष परिचयाच्या लोकांमध्ये ती परिपक्वता नाही , सणाच्या दिवशी वाईट आठवणी उगाळत बसते आपण आनंदात राहत नाही नि आमच्या आनंदावर विरजण टाकू पाहत आहे अशी भावना होण्याचा संभव अधिक ... बरं बोलूनही कधी दाखवलं नव्हतंच आजवर कुणाकडे .. काल गणपतीला येण्याच्या आमंत्रणाने जरा त्रास झाला .. की सगळं विसरून आनंद सोहळा साजरा करत आहेत हे लोक .. आणि मीही करावा अशी अपेक्षा कशी करवते यांच्याने .. माझ्या मनात जे विचार आहेत ते यांच्या मनाला स्पर्शही करत नाहीत का ... अर्थात कोणीही आयुष्यभर दुःख कवटाळून नाही राहू शकत आणि एखाद्या गोष्टीचं आपल्याएवढंच वाईट दुसऱ्यांनाही वाटत राहावं हीच अपेक्षा चूक आहे ... मुळात कोणत्याही कारणाने कोणाला दुःख असावं हीच अपेक्षा साफ चूक आहे ... लोक आनंदसोहळा साजरा करत आहेत याचा आनंदच वाटणं परिपक्व मनाचं लक्षण आहे .. आणि लॉजिकल मेंदूला ते समजतही .. पण भावनिक मेंदूला आनंदसोहळे जखमेवर मीठा सारखे भासतात ... सगळे जास्तीत जास्त आनंदात राहावेत आपापल्या आयुष्यात हीच प्रामाणिक इच्छा आहे पण सोहळे किंवा सण प्रार्थना पूजा यात प्रत्यक्ष सहभागी होणं ट्रिगरिंग वाटतं म्हणून लांब राहणं पसंत करते .
तुमचा प्रतिसाद खूप छान आहे .. विचार करीन मी .. नक्कीच मदत होईल काहीतरी ...
3 Sep 2019 - 9:41 pm | जॉनविक्क
अन्यथा तसाही तो न्हवताच.
3 Sep 2019 - 4:16 pm | nishapari
धीराची आहे की नाही माहीत नाही .. स्वतःचं मनच शत्रू होणं फार वाईट .. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना क्षणात आपलं आयुष्य निरर्थक आहे , असह्य आहे आणि भविष्य तर आणखीच अंधारमय असेल असे विचार गर्दी करून येतात आणि अख्ख्या 20 - 25 वर्षांच्या भूतकाळातल्या सगळ्यात वाईट आठवणींची वेदना एकत्र गुणिले 100 पटीने मनावर आदळते लाटांसारखी ... सगळा शहाणपणा तकलादू निरर्थक वाटतो ..
पण लाट ओसरली की शहाणपणा परत येतो ... आता सुदैवाने म्हणू की परमेश्वराच्या कृपेने ते प्रमाण कितीतरी कमी झालं आहे .. जवळपास निल ... रागाने असंही विचारावंस वाटतं ही मागणी काय पेंडिंग होती का इतकी वर्षं , इतका वेळ लागला ते ... असो वेडेपणा आहे ... खूप विश्वास टाकला , एक मानसिक काल्पनिक बंध जोडला की देव आहे रक्षणकर्ता , पाठीराखा ... त्या विश्वासाला तडा गेल्यानेच निम्म्याहून अधिक त्रास झाला की असं कसं होऊ देऊ शकतो तो माझ्यासोबत ..... आता तसल्या काही अपेक्षा ठेवणं बंद केलं आहे ... कर्म - कर्तव्य जसं जमेल झेपेल तसं करत राहायचं बास ...
मी लहान होते , खूप विश्वास टाकला देवावर .. कशामुळे माहीत नाही .. खरं तर घरचं वातावरण देव देव करणारं अजिबात नाही , साधं कुणी रोज देवाला हात जोडायलाही कधी सांगितलेलं नाही .... आईवडिलांचा संबंध देवाशी रोज एखादं फुल वाहून , हळदकुंकू लावून नमस्कार करण्यापूरताच होता ... मीही पूजा प्रार्थना वगैरे काही करत नाही ... माझी पाप पुण्य , कर्म आणि पुनर्जन्माची तर्कटं ऐकून खुद्द आईवडिलांनी मला खुळ्यात काढलं .. पण मिथॉलॉजिकल मालिका , धार्मिक पौराणिक पुस्तकं या सगळ्यामुळे असेल किंवा ते बीज मागच्या जन्मातूनच घेऊन आले असेन माहीत नाही , बालवाडीत असताना रडत आकाशाकडे बोट दाखवून त्याच्याकडे जायचं आहे असं मैत्रिणीला म्हणाल्याचं आठवतं लख्ख ... तेव्हा वाचायलाही येत नव्हतं ना कुठल्या मालिका पाहिल्या होत्या ... तेव्हा ह्या श्रद्धेच्या व्हायरसची लागण किंवा एकूणच मुक्तीच्या इच्छेची बीजं खूप आधीची आहेत ..
कधी असंही वाटतं की मुक्तीच्या प्रवासावर निघालेल्या आत्म्याला काहीतरी जुनी आठवण असेल , त्याच्याकडे जायचं आहे याची म्हणून तसं म्हणाले असेन ... अर्थात तो काही आकाशात राहत नाही ... पण एक डेस्टिनेशन आहे याची आठवण होती तेव्हा पण पुढे ती विसरली गेली ... सांसारिक माया मोह इच्छा राग लोभ षड्रिपूंमध्ये गुरफटून त्या मार्गावरून ढळले साफ ... पुन्हा त्या आत्म्याला मटेरियलिस्टिक जगाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करुन देऊन ढळलेल्या मार्गावर परत आणण्यासाठी थप्पड लावली जोरात त्यानेच ... की माझ्याकडे यायचं आहे ना तुला .... मग हे काय मूर्खासारखं वागणं चालवलं आहेस .....
किंवा हे सगळे शुद्ध मनाचे खेळही असतील .. :) सर्व्हायव्हल साठी ... मनाच्या स्टेबिलिटी रचलेली कल्पनेची तर्कटं ...
3 Sep 2019 - 7:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
देवावरचा विश्वास म्हणजे,
१. देवाची प्रार्थना केली की, आपण इतर काहीही न करता, आपल्याला हवे ते आपोआप मिळते, असे नव्हे
२. देवाला प्रसाद, भेट किवा नवसाची लालूच दाखवून, आपण इतर काहीही न करता, हवे ते मिळते, असे तर अजिबात नव्हे.
हे तुमचे मत असेल असा दावा नाही. पण, आवश्यक आहे म्हणून लिहिले इतकेच.
देवावरचा विश्वास म्हणजे, "देवावर विश्वास ठेवून योग्य कार्य केले, तर माझे मनोबल वाढून, यशाची जास्त खात्री आहे", हेच असते...
१. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील व्दिधावस्था दूर करण्यासाठी उपदेश केला... पण, अर्जुनाची लढाई अर्जुनालाच लढून जिंकावी लागली... तो विजय, केवळ श्रीकृष्णावर विश्वास ठेवला किंवा त्याचे पाय धरले, या कारणांनी मिळाला नाही.
२. लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रामाने समुद्रतटावर शिवपूजा केली... पण, विजयासाठी तितके पुरे नव्हते. सीतेला सोडविण्यासाठी रामाला स्वतः युद्ध करून ते जिंकावे लागले.
स्वतः स्वतःवरचा विश्वास व मनोबल वाढविले की,
"नराचा/नारीची नारायण/नारायणी बनतो/ते आणि यश मिळवतो/ते".
स्वतःवरचा विश्वास वाढवणे काहीजण स्वतः करू शकतात, काहींना मध्यस्थाची (उदा : देव, गुरू, मेंटॉर, इ) गरज पडते, इतकेच. दोन्हीमध्ये बरे-वाईट काहिच नाही... प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीप्रमाने योग्य वाटेल तो पर्याय स्विकारावा. मात्र, "आपली युद्धे आपणच लढायची असतात", हे कधीच विसरू नये.
3 Sep 2019 - 8:16 am | चामुंडराय
डोळ्यात पाणी येऊन सिन होईल
डोळ्यात पाणी येऊन पाप कसे होईल हे कळले नाही ??
3 Sep 2019 - 8:58 am | nishapari
सिन - sin नाही scene या अर्थाने म्हटलं आहे ... आरती चालू असताना मधेच एक जण अचानक रडू लागला किंवा निघून गेला भर आरतीतून किंवा देवापुढे हात जोडायला गेल्यावर रडू फुटून नंतर बाकीच्यांशी जे संवाद साधणं अपेक्षित असतं दुसऱ्याच्या घरी गेल्यावर ते जर शक्य झाले नाहीत बोलण्याची अवस्था नसल्याने तर तो scene च झाला ना .. त्यापेक्षा एकूणच तिथे जाणं टाळणं चांगलं असं म्हणायचं होतं .
3 Sep 2019 - 9:39 am | सुधीर कांदळकर
गणपतीभोवतीची आरास पाहून मन का प्रसन्न होत नाही?
इतरांचे हर्षोत्फुल्ल चेहरे पाहून आनंद का होत नाही?
न मिळालेल्याचा बाऊ एवढा? आयुष्यात प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही. वाई पांचगणी रस्त्यावर शेरबाग आहे. फारच सुंदर आहे. तिथली पाट्यांवर लावलेली वचने तर फरच सुंदर आहेत. एक इंग्रजी वचन जसेच्या तसे देतो. `डू नॉट बी अनहॅपी बिकॉज यू डू नॉट हॅव शूज. ठिन्क ऑफ दोज हू डू नॉट हॅव फीट टु वेअर देम.
आपल्या मनात न मिळालेल्याबद्दल सतत पुन्हापुन्हा तेच तेच विचार येताहेत असे दिसते. औदासिन्य गेले की अपुर्या इच्छेपलीकडचे सुंदर जग नक्की दिसेल. आरबीटी - रॅशनल बिहेवियरल थेरपी बद्दल वाचून स्वतःला प्रश्न विचारून पाहा आणि आपले दु:ख खरे आहे की बाऊ आहे पाहा. लौकरच आपल्याला सारे छान वाटू लागेल ही शुभेच्छा. अनाहूत सल्ल्याबद्दल क्षमस्व.
3 Sep 2019 - 10:23 am | कुमार जावडेकर
वा!
3 Sep 2019 - 10:22 am | कुमार जावडेकर
मला गणपती घरातल्या घरात, सुंदर मूर्ती म्हणून बघायला किंवा सजवायला आवडतो. अशा गोड मूर्तीचे लाडही करायला आवडतात, जणू एक सजीव मानून.
पण त्याला देवत्व द्यायचं आणि त्यापुढे जाऊन त्याकडून काही प्राप्त करून घ्यायचं ह्या वेगळ्या / कालबाह्य गोष्टी झाल्या असं मला वाटतं.
सार्वजनिक हवाच असेल तर लोकांना त्रास न देता (उदा. ध्वनिक्षेपणाचे नियम पाळून, शक्यतो एखाद्या मोठ्या हॉलमधे) केलेले विविध कार्यक्रमही करायला/ऐकायला हरकत नसावी.
3 Sep 2019 - 10:30 am | जॉनविक्क
पण गणपती म्हणजे (मोठ्या माणसांचा) भातुकलीचा खेळ अथवा फक्त शोभेचे प्रतीक यापेक्षा आजून बरेच काही (पवित्र आणि, मंगलमय, विघनहर्ता) आहे.
3 Sep 2019 - 11:28 am | नि३सोलपुरकर
राखेतून उभारी घ्यायची सवयच इतकी झाली आहे की पुन्हा राखेत गेलो नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटायला सुरुवात होते बगा. - ज्जे बात .
१ नंबर जॉन राव _/\_
4 Sep 2019 - 9:33 am | सुधीर कांदळकर
एक गोष्ट तीव्रतेने जाणवली होती. त्यबद्दल काय लिहावे सुचले नव्हते.
असे आपण लिहिलेले आहे. वाचून फारच वाईट वाटले.
आपण सध्या औदासिन्यापेक्षा जास्त वाईट अशा तात्विक चिंतनाच्या मुलाम्याखालच्या शब्दबंबाळ फसवेगिरीच्या भोवर्यात सापडलेल्या आहात. आपल्याला बालपणीच अध्यात्माचा ओव्हरडोस झालेला आहे. तुमच्या भोवती तुमचे सुहृद असतील. तुम्ही देखील त्यांच्या सुहृद असाल. आपण आपल्या सुहृदांसाठी कीती मौल्यवान - अमूल्य असतो याची जाणीव ठेवा. ही कल्पनाच किती सुंदर, थरारक आहे पाहा. आणि पळवाट शोधू नका. एक सुंदर, मोहक 'उद्या' उगवणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आयुष्याला एका नव्या उमेदीने सामोरे जा. तुम्हाला नक्की उद्या सुंदर कोवळे ऊन दिसेल ही सदिच्छा.
4 Sep 2019 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे
तुटक वाटले पण आवडले. स्फुट म्हणु या!