भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.
ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.
यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.
मालकंस वा जोग,
अमृत बरसे गात्री.
कान्ह्याच्या ओठी वेणू
तिच्याचसाठी रात्री.
कणकणात भिनली आहे
मल्हाराची आस,
मेघ पेटवून जातो
मयूरपंखी प्यास.
पण सूर भैरवीचा का
राधेला माहीत नाही?
युगे उलटली, अजुनी
राधा तर वाटच पाही..
प्रतिक्रिया
23 Aug 2019 - 12:35 pm | राघव
चांगली कल्पना.
अर्थात् "प्यास" हा शब्द खटकला. :-)
अवांतरः
जिला ध्यानी-मनी-जीवनी केवळ कृष्णच सगळं आहे, तिला अजून कशाची वाट बघावी लागणार? असा प्रश्न मनांत डोकावून गेला.
23 Aug 2019 - 4:29 pm | प्राची अश्विनी
मोकळं स्पष्ट मत आवडलं. :)
23 Aug 2019 - 9:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली. लिहिते राहा.
छान.
-दिलीप बिरुटे
23 Aug 2019 - 11:47 pm | जालिम लोशन
ज्या मुलीची कृष्णजन्मानंतर कंसाच्या तुरुंगात अदलाबदल केली तिला काय वाटले असेल या भावनेवर पण एक कविता करा.
24 Aug 2019 - 8:15 am | ज्ञानोबाचे पैजार
सुरेख जमली आहे. दिल बाग बाग हो गया...
अडकलेला बोळा निघून पाणी मोकळे झाले आणि पुन्हा खळखळा वाहू लागलेले दिसते आहे.
हा निर्झर असाच खळाळत राहो ही सदिच्छा...
पैजारबुवा,
24 Aug 2019 - 8:57 am | माहितगार
प्राची अश्विनींच्या गाण्यांमधल्या राधेच्या लोभाची उधळण पाहून कृष्णालाही कृष्णाचा हेवा वाटेल,
आम्हाला फक्त राग-लोभातले राग समजतात, प्राची अश्विनींच्या कवितेतले राग समजले नाही तरी त्या रागात फक्त कृष्णावरचा लोभ असतो हे माहित असल्याने फरक पडत नाही.
24 Aug 2019 - 9:48 pm | शिव कन्या
प्राची, 'मज कृष्ण भेटला नाही'..... त्या अप्रतिम कवितेची लय तुला परत गवसो ...
25 Aug 2019 - 1:18 pm | प्रमोद देर्देकर
मस्त आवडली.
सगळे राग घेवून नवीन कडवी अंतर्भूत करा आणि पुन्हा प्रसिद्ध करा.
15 Sep 2019 - 9:18 am | प्राची अश्विनी
पैजारबुवा, बिरुटे सर, जालीम लोशन, प्रमोद देर्देकर, शिवकन्या, माहितगार धन्यवाद!