स्मृतीगंध-११ "गोकुळ"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
22 Mar 2009 - 12:18 pm

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
स्मृतीगंध-७
स्मृतीगंध-८
स्मृतीगंध-९
स्मृतीगंध-१०

घराच्या कर्जाचे हप्ते वेळेवर जात नव्हते म्हणून मार्च ६९ मध्ये मी बँकेचा राजीनामा दिला आणि फंड व ग्रॅच्युइटीच्या पैशातून कर्ज फेडले. मुलांच्या शाळा सुरु झाल्या होत्या. खर्च वाढला होता. संसाराचा गाडा चालवायचा तर आता माझ्याकडे नोकरी नव्हती पण हिची नोकरी असल्यामुळे ते दिवस तगले. फंडाच्या उरलेल्या पैशातून एक गाळा भाड्याने घेऊन किराणा-स्टेशनरीचे दुकान सुरु केले. साधारण ७०-८० रु विक्री रोज होत असे. पुढे दुकान चांगले चालू लागले पण खरेदीकरता पैशाची चणचण भासू लागली. सकाळी ७ला दुकान उघडत असे. दुपारी जेवून माल खरेदीसाठी मुंबईस जात असे. ४ पर्यंत परत येऊन दुकान उघडत असे ते ९ च्या सुमारापर्यंत चालू ठेवत असे. पुढे पुढे हे सारे करणे त्रासदायक होऊ लागले. एक दिवस वसंत कानेटकरने दुकान चालवायला मागितले व दरमहा २००रु स्वामित्व देईन असे सांगितले. दुकानातील असलेल्या मालाचे रोख पैसे देऊन त्याने दुकान चालवायला घेतले. त्या दुकानाचे भाडे रु. ८५ देऊन दरमहा ११५रु हातात राहू लागले.

गोरेगावात त्यावेळी गाईगुरांचा बाजार भरत असे. म्हैसाणा,दिल्ली आणि गुजराथेतून तेथे गाई,म्हशी येत असत. अण्णाचे दुकान गोरेगावातही असल्यामुळे अण्णा आणि मी गुरेबाजारात जाऊन म्हैसाणा जातीच्या आणखी ३ म्हशी घेतल्या, ट्रकात घालून डोंबिवलीस आणल्या आणि उकाडे सुरु केले. ५,६ म्हशी झाल्यामुळे जामूस पूर्ण वेळ कामावर ठेवले. जामू भैया गाई म्हशींना दाणावैरण घालणे, धारा काढणे, धू-चोळ करणे आणि रतिबाचे दूध घालणे ही कामे करीत असे. पुढे मुले शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना आणापोहोचवायचे कामही तोच करीत असे. त्याच्या अंगाला दुधाचा आणि म्हशीचा वास येतो असे म्हणून मुले त्याच्याबरोबर जायला कुरकुरत. येणारा पैसा गुरांची दाणावैरण आणि जामूचा पगार यात खर्च होई. दुधाचा रतिब, दह्याचा चक्का विकून थोडाफार फायदा होत असे. घरात मुबलक दूधदुभते हा मात्र मोठा फायदा होता.

याच दरम्यान ऑक्टोबर ७० मध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँक सुरु झाली. पूर्वानुभव असल्याने तेथे मला नोकरी सहज मिळाली पण बँक नवीन असल्याने पगार कमी होता. असे दिवस चालले होते. ७२ च्या मे महिन्यात मुलीचा जन्म झाला. सौ. बरीच आजारी होती, दवाखान्याचा बराच खर्च झाला. आमदानी वाढवण्याचे प्रयत्न मी करत होतो तशात एकदा वसंत सरपोतदारांनी वकिल & सन्स मध्ये नोकरी करण्यासाठी विचारले. तेथे चांगला पगार असल्याने डोंबिवली नागरी सोडून मी रुजू झालो. मूळचा शेतीत राबलेला मी, आता जरा बरे दिवस येऊ लागल्यावर जमिनीची ओढ लागली. शेतीसाठी जमिन घेण्याचे मनात होते आणि तसे प्रयत्नही चालू होते. १९७८ च्या जून महिन्यात सुकर्‍या पाटील कडून मानपाड्याजवळील घैसर या गावात एक एकर जागा शेतीसाठी विकत घेतली. पहिल्याच वर्षी २ खंडी भात मिळाले. घरच्या तांदळाची वर्षाची बेगमी झाली.

१९८०च्या ऑगस्ट महिन्यात मी व्होल्टासची जाहिरात वाचली आणि तेथे अर्ज केला. इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले. त्यावेळी माझे वय ४५ होते. घरची जबाबदारी होती,अशा परिस्थितीत नोकरी सोडून मी दुसरीकडे जाणार नाही,शिवाय माझा इतक्या वर्षांचा अनुभव विचारात घेऊन मी सिलेक्ट झालो. वकिल्समध्ये राजीनामा न देताच मी व्होल्टासमध्ये २५ नोव्हे. १९८० पासून रुजू झालो. वकिल्समध्ये दांड्या झाल्यामुळे तेथून एकसारखे निरोप येऊ लागले. आठदहा दिवसांनी एका शनिवारी मी वकिल्समध्ये जाऊन राहिलेले काम शनिवार रविवार १२/१२ तास बसून पूर्ण केले आणि निघताना तेथील चेअरमन श्री. गोपालकृष्णन यांना व्होल्टासमध्ये नोकरी मिळाल्याने वकिल्स सोडणार असल्याचे सांगितले. त्यांनी मला जाण्यापासून परावृत्त केले. तेथल्या पगाराची विचारणा केली. येथला पगार वाढवून देतो असे सांगितले. तेथील नेमणूकीचे पत्र बघितले . ८॥ ते ४ वेळ आणि शनिवार रविवार सुटी पाहून ते म्हणाले," तू संध्याकाळी ५ वाजता येत जा. आम्ही येथे १० पर्यंत असतोच. तू तुझे काम तेव्हा करत जा आणि उरलेले काम शनिवार,रविवार करत जा पण वकिल्स सोडू नको." आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन.. अशी माझी अवस्था झाली आणि मी अर्थातच त्यांचे म्हणणे मानले. मी वेळा ऍडजस्ट करून वकिल्समध्ये जायला सुरुवात केली. मला ते पूर्वीसारखाच पूर्ण पगार देत असत. वकिल्समध्ये कधी जास्त काम असले तर व्होल्टासमध्ये रजा घेऊन तिकडे जात असे.

ती. वहिनी आता थकत चालली होती तरीही घरातले सारे तीच उत्साहाने करत असे. आम्ही दोघेही नोकरीसाठी दिवसदिवस बाहेर असून सुध्दा घराची काळजी तिच्यामुळे अजिबात नसे. तिला आणि आईला काशीयात्रा करावयाची इच्छा होती. माझ्या दोन,दोन नोकर्‍या आणि हिची शाळा यातून वेळ काढायला होईना पण चि.बाळने त्या दोघींना काशीयात्रा करवण्याचे ठरवले व तो त्या दोघींना घेऊन यात्रेला गेला. त्यावेळी मुले लहान आणि आम्ही दोघे असे कामानिमित्त दिवसदिवस बाहेर असल्यामुळे मुलांची आबाळ होऊ नये म्हणून माझे सासरे ती. नाना पालवणकर आमचेकडे येऊन राहिले. ते मुलांना दुपारी जेवायला वाढण्यापासून सारे निगुतीने करत असत. तेव्हाच दादामुळेही आमच्याकडे रहावयास आले होते. दोघेही समवयस्क,त्यातून संस्कृतपंडित असल्यामुळे दोघांच्या गप्पा रंगत असत. ते दोघे आले की मुद्दामहून दशग्रंथी श्री.आबा जोशी सुध्दा संध्याकाळी त्यांचेबरोबर चर्चा करण्यास येत असत. तिघांच्या संस्कृत चर्चा,वादविवाद रंगात येत असत. मुलांनाही श्लोक, स्तोत्रे आबा जोशी शिकवित असत. आई,वहिनी वगैरे काशीहून येईपर्यंत ती. नाना अगदी आनंदाने आमच्याकडे राहिले होते. ते सर्वजण काशीयात्रा करुन आल्यावर घरी गंगापूजन केले, त्यांच्या व्रतांचे उद्यापन केले आणि दोघींनीही गोदान केले. चांदीची गाय वगैरे न देता आमच्या घरातील गाईं पैकी दोघींनीही सवत्स धेनु दान केल्या. इकडे मुलांची शिक्षणे चालू होती. मोठा मुलगा एसेसी झाला आणि त्याने कॉमर्सला ऍडमिशन घेतली. पुढे धाकटाही चांगल्या मार्कांनी एसेसी होऊन इंजिनिअरिंगला गेला.मुलगी अजून शाळेत शिकत होती.

घरातील गाई म्हशी,उकाडे सारे जामू सांभाळीत असे.गाईगुरांना तपासायला निळजाचे पाटील डॉक्टर येत असत. आमची पहिली गाय लक्ष्मीही थकली होती पण तिची कालवड गिरिजा आता दूध देऊ लागली. लक्ष्मी आणि गिरिजानंतर मध्यंतरी गायच नव्हती फक्त म्हशीच होत्या. अवजतन्याच्या म्हणजे आबाळ झालेल्या गाई,म्हशी आणून त्यांचे औषधपाणी करत असू, दाणावैरण घालून त्यांना धष्टपुष्ट करत असू आणि पुढे एक विलण झाली की त्यांचे दूध वाढत असे ,मग त्या विकूनही टाकत असू. असे केल्याने फार फायदा होत नसे मात्र घरात भरपूर खरवस वरचेवर होत असे. अशीच एक अवजतन झालेली गाय निळज्याच्या राजा भैयाकडून घेतली. त्यावेळी संकरीकरणाची कला भारतात नुकतीच चालू झाली होते. पाटील डॉक्टरांनी तिच्यावर होल्स्टीनफ्रेझीनचे संकरिकरण केले व झालेल्या कालवडीचे लक्ष्मी असेच बारसे केले. पुढे दिवसे दिवस ती चांगली वाढू लागली. दिवसात ८लिटर दूध ती देत असे. लक्ष्मी मोठी झाल्यावर तिच्यावरही संकरीकरण केले आणि गायत्रीचा जन्म झाला.

गायत्रीला कडक उन्हाळा सहन होत नसे म्हणून ऑक्टोबर आणि मे महिन्यात पाणी मारुन गोठा थंड करीत असू, तिला २,२ दा आंघोळ घालीत असू आणि गोठ्यात पंखाही लावत असू. १९८०च्या सुमारास निळज्याला एकदा गुरांचे प्रदर्शन व स्पर्धा भरवायचे झेडपीने ठरवले. पाटील डाक्टरांनी आम्हाला गायत्रीला त्यात भाग घेण्यासाठी पाठवा असे सुचवले एवढेच नव्हे तर तिला निळज्याला नेण्यासाठी स्पर्धेच्या दिवशी ट्रकही पाठवला. आमची दोन्ही मुले आणि पुतण्या तिला घेऊन तेथे गेली. आणि गायत्री स्पर्धेत ढाल मिळवून आली. तिला पुरणपोळी खायला घालून तिचे लाड कौतुक केले आणि तिच्यासाठी चांदीच्या माळा केल्या. ती दिवसातून तीनतीनदा ४ ते ५ लिटर दूध देत असे म्हणजे १५,१५ लिटर दूध दिवसाला देत असे. घरात दुधातूपाची रेलचेल होती. श्रीखंड,बासुंदी,खवा,पेढे असे दुग्धजन्य पदार्थ बरेचदा आणि भरपूर प्रमाणात होत असत पण त्यावेळी फ्रिज नव्हता त्यामुळे दूधाची उस्तवारी करणे हे मोठेच काम असे. वहिनी ते आनंदाने आणि निगुतीने करत असे. बबनचीही तिला ह्याकामी बरीच मदत होत असे. किराणा दुकान बंद केल्यापासून तेथे ठेवलेला बबन सप्रे हा तर घरचाच झाला होता. आमच्या घरीच राहून पडेल ते काम तो करत असे. पुढे ओळखीने त्याला शाळेमध्ये शिपायाची नेमणूक करवली. त्याचे लग्न करुन दिले आणि संसार थाटून दिला. आजही बबन आमच्या घरातलाच एक सदस्य आहे.

पुढे नोकरीच्या आणि घरातल्या वाढत्या व्यापामुळे ८१ साली गायत्रीला ठेवून बाकीची सारी गुरे पारपुंडचे श्रीपाध्यांना विकली. जामूचेही वय झाल्याने तो मुलखाला परत गेला. गायत्रीचे दाणावैरण, धारा काढणे अशी कामे नोकरी सांभाळून मी करीत असे. माझ्या गैरहजेरीत तिचे सर्व काही मोठा मुलगा करत असे (धाकटा मात्र फक्त दूध पिण्याचे काम करे.) त्याचे फायनल इयरला अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून ८६ साली मी शेवटी गायत्रीला दामल्यांना विकत दिली. आजही मला कधीतरी परत एकदा गाय आणावीशी वाटते.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

सुक्या's picture

22 Mar 2009 - 12:25 pm | सुक्या

धन्य तुमची वामनसुत . . . काय वेग आहे लिखानाचा. वाचकांची लिंक तुटु न देता तुमचे लिखाण चालु आहे.
तुम्ही आता व्यवस्थीत स्थिरस्थावर झाल्याचे पाहुन बरे वाटले.

येउदेत अजुन. वाचतोय.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

विसोबा खेचर's picture

22 Mar 2009 - 12:29 pm | विसोबा खेचर

लेखनाचा वेग पाहून खरंच आश्चर्य वाटते..

वामनसुतराव, जियो...!

तात्या.

सहज's picture

22 Mar 2009 - 1:42 pm | सहज

३० - ४०च्या दशकातील गाडी आता ८६ सालापर्यंत आली आहे. अचानक ही मालीका संपेल ही कल्पना सहन होत नाही आहे.

तुमच्या लेखनाचा रतीब चालू राहीला पाहीजे हा! :-)

प्राची's picture

22 Mar 2009 - 12:37 pm | प्राची

वाचते आहे. :)

योगी९००'s picture

22 Mar 2009 - 12:45 pm | योगी९००

फारच सुरेख ..परत परत वाचतोय.

खादाडमाऊ

आळश्यांचा राजा's picture

22 Mar 2009 - 1:47 pm | आळश्यांचा राजा

अतिशय सुरेख लिखाण आहे. शिवाय जुना काळ समोर येण्यासाठी, सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा दस्त ऐवज आहे. वाचत आहोत. भरपूर लिहा!

आळश्यांचा राजा

आनंद's picture

22 Mar 2009 - 3:12 pm | आनंद

मस्त लेखमाला.
मला वाटते की तुम्ही सगळे भाग आधीच टंकुन ठेवले असावेत, पुस्तक रुपाने प्रकाशन करण्याचा विचार असावा. पण मिपा व जाल बघुन आताच्या पिढी पर्यंत पोचण्याच हा चांगला मार्ग दिसतोय म्हणुन लेख इथे पाठ्वले असावेत.मला वाटत इथला प्रतिसाद बघुन तुमचा हेतु नक्कीच साध्य झाला असावा.
धन्यवाद.

-- आनंद

रामदास's picture

22 Mar 2009 - 3:24 pm | रामदास

तुमची लिखाणाची शैली आवडली.आत्मचरीत्रात्मक लिखाण फारच सुंदर आहे.पण राहून राहून असं वाटतं की हे चरीत्र ओळखीचं आहे.आपण केलेल्या लिखाणाला गालबोट लावतो आहे असं वाटून घेऊ नका .या अगोदर हे लिखाण प्रसिध्द केलं होतं का ?

प्राजु's picture

22 Mar 2009 - 7:41 pm | प्राजु

समोर बसून कथन करावं असं लिहिलं आहे तुम्ही.
हा या मालिकेचा शेवट नक्कीच नाही. आता तर ८६ साला पर्यंत आलो आहोत.
गोकुळ आता तर भरलं आहे. अजून गोकुळात बाळकृष्णाने जन्म घ्यायचा आहे. चालू ठेवावे लेखन ही विनंती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

22 Mar 2009 - 8:48 pm | शितल

हा भाग ही खुप सुंदर झाला आहे. :)
हल्ली सकाळी उठल्यावर पहिला तुमच्या लेखमालेचा पुढचा भाग आला आहे का ते पहाते आणि वाचते :)

मदनबाण's picture

22 Mar 2009 - 9:15 pm | मदनबाण

वामनराव लेखन अगदी जोरदार चाललय्...येउदे अजुन. :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

शब्द बापुडे's picture

22 Mar 2009 - 9:51 pm | शब्द बापुडे

मी आज प्रथमच सगळे भाग एकामागे एक असे वाचले. खूप आवडले. इतका जुना काळ आम्हा नव्या लोकांना माहिती करुन दिला त्याबद्दल आभार.
*चिरविजयी*

समिधा's picture

23 Mar 2009 - 12:48 am | समिधा

अजुन खुप येउदेत्, खुपच सुंदर. =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

24 Mar 2009 - 11:12 am | घाशीराम कोतवाल १.२

हा भाग पण मस्त जमला आहे
वामनसुत साहेब
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

वामनसुत's picture

24 Mar 2009 - 6:49 pm | वामनसुत

आपण सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद

खटपट्या's picture

21 Oct 2013 - 8:40 am | खटपट्या

मिपावर अचानक एक तेंडूलकर येवून सर्व रेकोर्ड तोडणार असे वाटते आहे. Strike रेट तर एवढा जबरदस्त आहे कि डॉन bradman काहीच नाही.