चेकमेट

Primary tabs

चाफा's picture
चाफा in जनातलं, मनातलं
1 May 2019 - 8:38 pm

" स्मित, आज पुन्हा दिसला मला तो" अनामिकेच्या आवाजात कंप होता, फोनवरही तिची मन:स्थिती कळत होती.
" डोन्ट वरी, तू गोळी घेतली नाही का आज? " सस्मितने काळजीनं विचारलं
" सारख्या कसल्या गोळ्या, तुम्हाला सगळ्यांना पटत का नाहीय, अरे खरंच आहे तो, आणि एक दिवस नक्की तो मला मारणार"
" शांत होते का राणी, मी डॉक्टर गोखल्यांना फोन करतो, तू गोळी घे पाहू, तोवर त्यांना घेऊन मी येतोयच"
" हो हो घेते गोळी, गोळ्या खायला घालून मारून टाक एकदाचा मला" तारस्वरात किंचाळत उत्तर आलं, पाठोपाठ काहीतरी जोरात आपटल्याचा आवाज,
" हॅलो, ए अने.. "
उत्तर नाही फक्त काहीतरी फुटण्याचे आपटण्याचे आवाज,
सस्मितने घाईघाईने फोन ठेवला.

"मला लवकर जायला हवंय आज, घरी थोडा प्रॉब्लेम आहे बॉस"
" पुन्हा वाईफची कंडिशन डाऊन का?, सस्मित गेल्या वर्षभरात तुझं फार वेळा झालंय हे, एखादा चांगला डॉक्टर का गाठत नाहीयेस? "
" ट्रीटमेंट सुरू आहे सर, येईल लवकर गुण डॉक्टर म्हणतायत"
" ओके, निघालास तरी चालेल"

" डॉक्टर, सेम प्रॉब्लेम पुन्हा झालाय, प्लीज येता का? " फोनवर हॅलो सुद्धा न करता म्हणाला तो
"....... "
" येस मी आलोच गाडी घेऊन, डॉक्टर साठेना कळवायचं का? "
".... "
" ओके मी निघालोच"

" सस्मित, जरा जपून पेशंट व्हायोलंट आहे, जरा सांभाळून"
" डोन्ट वरी डॉक्टर, कशीही असली तरी बायको आहे माझी, मला इजा करणारच नाही"
" नशीब दारच्या आतल्या कड्या काढून लॅच लावलंत, किमान आपल्याला जाता तरी येतं"
" डॉक्टर साठ्यांनी सजेस्ट केलेलं, अश्या अवस्थेत पेशंट स्वतःला इजा करून घेऊ शकतो म्हणे, "
" अगदी बरोबर "
" आई गं ss"
" सांभाळा सस्मित, तुम्हाला सावध केलेलं मी"
" आलास पुन्हा? आता मीच तुला सोडत नाही, ये फाडूनच काढते तुला" भेसूर आवाज आला आतून
" ए राणी, अग मी आहे, हे बघ डॉक्टर पण आलेत, आम्ही तुला वाचवायलाच आलो की नाही त्याच्यापासून, टाक ती सुरी बाजूला पाहू, आणि हे काय किती मोठी जखम झालीय मनगटावर"
"त्याने,... त्याने पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न केलाय, हाताची नस कापून" घोगऱ्या आवाजात बोलली ती
" आता मी आहे ना, आता नाही करणार तो काही"
" कोण तू? "
" मी सस्मित, अग तुझा स्मित"
" स्मित ss स्मित ss तो बघ ना येईन म्हणून सांगून आताच पळाला खिडकीतून"
" कस शक्य आहे राणी, खिडकीला ग्रिल आहेत की, आणि काही करून समजा काढलेच त्याचे स्क्रू त्याने तर आपण नवव्या मजल्यावर राहतो, एका क्षणात जीव जाईल की त्याचा, कुणी नाहीय तिथं, ठेव आधी ती सुरी पाहू"
" या डॉक्टर, मी धरलंय तिला, आता भीती नाही कसलीच"
" थँक गॉड सस्मित, आजचा अटॅक जोराचा होता, आपल्यालाही धोका होता की, आधी यांना इंजेक्शन देतो, मग। तुमच्या कपाळावरच्या जखमेला बँडेज करू"
" डोन्ट वरी डॉक्टर, फार मोठी नाहीय, आणि हा काय रुमाल दाबलाच आहे की"
" मोठी नाही कशी, फ्राइंग पॅनचा काठच लागला असावा, टाके पडायची शक्यता दिसतेय"
" आपण आधी हिला बेडवर ठेवूया, गाढ झोपू दे तिला"
" सस्मित, जरा काळजी घ्या, किंवा जसं डॉ. साठे म्हणतायत तसं ऍडमिट करा त्यांना "
" डॉक्टर, अनु वेडी नाहीय हो, थोडी डिस्टर्ब आहे इतकंच"
" तुमचं प्रेम बोलतंय हे, "

" डॉक्टर साठे, कशामुळे होतंय हे? "
" याला हॅलेस्युनेशन्स म्हणतात, सोप्या भाषेत भास, स्किझोफ्रेनिक केसेसमध्ये हे फारच कॉमन आहे, दुर्दैवाने तुमच्या मिसेसची स्टेज फार पुढे गेलीय, ऍडमिट केलंत तर कदाचित काही होऊ शकेल"
" पण हे का होत? "
" मनाचा कारभार मोठा गुंतागुंतीचा आहे, कधीतरी काहीतरी बिनसत, ज्या भागाने जे काम करायला हवं ते होत नाही आणि मग अस काहीतरी होतं"
" पण तिला होणारे भास? त्यात काहीच तथ्य नसेल?? "
" हे बघा सस्मित, कुणाला एखादा शिंग आणि शेपटीवाला सैतान दिसणे यात खरंच काही तथ्य असेल का हो? '
" पण वेळोवेळी तिच्यावर होणारे हल्ले? त्या जखमा तर तुम्ही पाहिल्या आहेत, डॉ. गोखल्यांनी कित्येकदा ड्रेसिंग केलंय"
" त्या त्यांनी स्वतःच करून घेतल्यात, त्यांना वाटणारी भीती त्यांच्या आतून येतेय, त्या सैतानाचा जन्मही त्यांच्या मनातून झालाय, आणि त्याच अस्तित्व जगाने मान्य करावं म्हणून चाललेला हा खटाटोप आहे"
" पण अस व्हायला काही कारण तर असेल ना, आणि तिला होणारे
" सततचा स्ट्रेस, आनुवंशिकता, किंवा काही वेळेस एखाद्या बाहेरच्या घटकाने सुद्धा होतं असं, जश्या झोपेच्या गोळ्या"
" पण यातलं काहीच नाही हो अनुच्या बाबतीत, किती छान आयुष्य होत आमचं, तुम्ही म्हणताय तसल्या कसल्याही औषधांची गरजही पडली नाही कधी तिला"
" म्हणूनच म्हणालो मी. सस्मित, मन फार गुंतागुंतीची गोष्ट आहे, तुमच्या केसमध्ये बाहेरच्या टॉक्सिकचा काहीच संबंध नाहीय, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, आपले प्रयत्न सुरूच आहेत, पण तरीही मी सल्ला देईन की लवकरात लवकर ऍडमिट करा"
" थोडे दिवस वाट पाहू, चालेल ना डॉक्टर? '
" तुमची मर्जी"

" हॅलो, मिस्टर सस्मित?, इन्स्पेक्टर रावराणे बोलतोय, एक बॅड न्यूज आहे, तुमच्या पत्नीने तुमच्या फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केलीय"
" नाही, तुमचा गैरसमज होत असेल इन्स्पेक्टर, एकतर माझी पत्नी उंचीला घाबरते, आणि त्यात आम्ही ग्रिल्स लावल्यात हे शक्य नाहीय"
" त्याच ग्रिल्स उघडून त्यांनी उडी मारलीय, मी जीप पाठवलीय ताबडतोब निघून या"

" सस्मित, मी अजूनही सांगतो पुन्हा एकदा विचार करा, तुमच्यावर आलेला प्रसंग खरंच खूप दुर्दैवी आहे पण तरीही तुम्ही नोकरी सोडायचा निर्णय घेऊ नये"
" सर, माझ्यासाठी अनु सर्वस्व होती माझं, आता तीच नाही तर माझ्या जगण्यालाही अर्थ नाहीय, मला हे सगळं सोडून खरंच दूर जायचंय"
" मी सजेस्ट करेन की काही दिवस सुटी घ्या, कुठंतरी हवापालट करा, सगळ्यातून बाहेर यायचा प्रयत्न करा आणि पुन्हा जॉईन व्हा, हवं तर सुटीची सोय करून देतो मी, "
' नको सर, मला खरंच नकोस झालंय हे सगळं'
" तुमच्यासारखा एम्प्लॉयी गमवायचा नाहीय कंपनीला म्हणून मी सल्ला देतो की पुन्हा एकदा विचार करा, हवं तर दोन दिवस घ्या, तोवर मी हा राजीनामा पुढं पाठवत नाही"
" ओके सर, पण दोन दिवसांनीही माझा निर्णय हाच राहील"

" सस्मित, ही निव्वळ फॉर्मालिटी म्हणून घेतलेली जबानी आहे, तुमचे आणि तुमच्या बायकोचे संबंध किती छान होते याबद्दल तुमच्या शेजाऱ्यांकडून माहिती मिळवलीय आम्ही, त्या आजारी पडल्यानंतरही तुम्ही घेतलेली काळजी, त्यांना दिलेले उपचार याचीही माहिती डॉक्टरांकडून मिळालेली आहे, थोडक्यात झालेला प्रकार दुर्दैवी अपघात होता असा निष्कर्ष निघतोय, "
" माझं सर्वस्व गेलं या दुर्दैवात"
" आय नो, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, फक्त दोनच प्रश्न तेही उत्सुकता म्हणून"
"विचारा, तुमचं कामच आहे ते"
" एक डॉक्टर साठे सतत सजेस्ट करत असताना तुमच्या मिसेसना ऍडमीट का नाही केलंत? "
" साहेब, आहो काय अवस्था करतात तिथं पेशंटची, त्या बंद खोल्या, त्या दोऱ्या, पट्टे, माझी हिंमत होत नव्हती अनुला त्यात स्वहस्ते लोटायची"
" हं, पटण्यासारखं आहे हे, म्हणजे तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम पाहता, आता शेवटचा प्रश्न, त्यांच्या मरणाआधीच्या शेवटच्या झटक्याच्यावेळी तुम्ही त्यांना खिडकीची ग्रिल आणि नवव्या मजल्याची जाणीव करून दिलीत अस डॉक्टर गोखल्यांच्या जबानीत आलंय"
" कदाचित बोललो असेनही, पण ते फक्त तिला दिलासा द्यायला होतं की आपण सुरक्षित आहोत, आणि अचानकपणे झालेल्या प्रकारात जसं सुचेल तसंच बोलणार की माणूस, "
" खरं आहे तुमचं, पण कसं माझी उत्सुकता मला गप्प बसू देत नव्हती हो, असो हे कायदेशीर काम संपलंय आता तुम्ही जाऊ शकता"
" थँक्स इंस्पेक्टर "

" हॅलो मकरंद, तू कसा फोन केलास? मीच करणार होतो तुला फोन "
"..... "
" हो, दुर्दैवानं खरं आहे ते, दोन महिने झाले मी ही सावरलो नाहीय त्यातून, सध्या मला सगळंच नकोस झालंय, पुढच्या आठवड्यात मी कायमचा यू एस ला शिफ्ट होतोय, या रविवारी भेटूया? "
".... '
" शुअर, त्याच जुन्या जागी, चल बाय"

"हाय मकरंद, सॉरी मला थोडा उशीर झाला, पण जाता जाता तुला काय गिफ्ट द्यावं हे ठरवण्यात वेळ गेला"
"इट्स ओके यार, गिफ्ट वगैरेची ही वेळ नाहीय"
"आय नो, पण आता मी खरंच इथले सगळे संपर्क तोडणार आहे, त्यामुळं ही आपली शेवटची भेट"
" मला त्या सगळ्या दुर्दैवी प्रकाराची माहिती उशिरा मिळाली यार, तुला तर माहीतच आहे मी इथून बंगलोरला गेलो आणि कुणाशी फार संपर्क नाही राहिला"
"मला तुझी खरंच गरज वाटत होती यार, शेवटी आपणच तिघे घट्ट मित्र होतो, आता अनु माझ्या प्रेमात पडून लग्न केलं हे नंतरच झालं"
" हो, त्याबद्दल कायम जेलसी राहिलेली माझ्या मनात"
" आता ती जेलसीही संपवून टाक"
" अरे यार, हे अस काळजाला घरं पडणार बोलू नको प्लीज"
" मकरंद, एका अर्थी आपली शेवटची भेट, म्हणून मी खास भेट आणलीय तुझ्यासाठी, मला माहीत आहे अनुबद्दल तुलाही सॉफ्ट कॉर्नर होताच, त्यामुळं खास निवडून मी देतोय तुला हे अगदी पर्सनल"
" थँक्स यार, पाहू का उघडून लगेच"
"प्लीज.. "
" थांबा, मिस्टर मकरंद" कडाडता आवाज आला
" ओहह तुम्ही?... "
" मी इन्स्पेक्टर रावराणे, आधी तो बॉक्स खाली ठेवा"
" ओके ओके सर, पण इतकं काय... "
" आधी तो बॉक्स खाली ठेवा, उघडलात तर जीवानिशी जाल"
" ओहह माय गॉड"
" हवालदार पकडा त्या सस्मितला"
" फॉर व्हॉट? "
" मी. सस्मित मी तुम्हाला तुमच्या पत्नीच्या खुनाच्या आणि मी. मकरंदच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याखाली अटक करत आहे"
" अशक्य, तुमचा काही घोळ होतोय इंस्पेक्टर, तो खून करणं शक्य नाही, अनुचा तर नाहीच नाही किती प्रेम होतं तिच्यावर त्याचं"
" होतं... हलकट, नीच माणसा खरंच होतं, पण जोवर तुमच्याबद्दल कळलं नव्हतं तोवर"
"... "
" हो खरंय हे, लग्नाच्या दोन वर्षांनी मला कळलं की तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात होतात, केवळ घरून परवानगी मिळणार नाही म्हणून अनुने माझ्याशी लग्न केलं, आणि ते ही केवळ धूळफेक म्हणून, वरवर माझ्यावर प्रेमाचा आव आणून आतून तुमचे प्रेमसंबंध सुरूच ठेवलेत तुम्ही"
" अरे पण... "
" मला कसं कळलं हेच ना? तुमची जुनी प्रेमपत्र, ज्यात सगळी रसभरीत वर्णन आहेत, माझ्याशी लग्न करायचा अनुला दिलेला सल्ला आहे, आणि हल्ली चाललेल्या चोरट्या चॅटस, जरी तुम्ही भलती अकाउंट उघडून भलत्या नावाने केल्या असल्यात तरी शेअर केलेले फोटोज मात्र तुमचेच होते, सुरुवातीला तुमची पत्र सापडली तेव्हाच मला शंका आली म्हणून मी अनुचा लॅपटॉप हॅक केला आणि तुमची सगळी कुलंगडी मला कळली"
" आणि त्यातूनच तुम्ही तिचा खून केलात, बरोबर ना मिस्टर सस्मित? "
" येस, पण मुळात तुम्हाला कळलं कसं? "
" कसं आहे मी. सस्मित, मला एखादा प्रश्न पडला तर उत्तर मिळेपर्यंत मी गप्प बसत नाही, तुमच्या दुदैवाने असे दोन प्रश्न पडले मला, आणि त्यांची उत्तरं मिळवताना तुमच्या शिक्षणाचा आणि छंदांचा पत्ता लागला, योगायोगाने तुमचा शोधनिबंधही हाती लागला, मग मकरंद आणि एकदा सगळ्या लिंक्स लागल्या मग आम्ही फक्त नजर ठेवली तुमच्यावर, मला वाटत आता तुम्ही नीट सांगालच सगळं"
" हो, बरोबर आहे तुमचं, मी जरी सेल्स डिपार्टमेंटला काम करत असलो तरी मी बायोलॉजीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि वनस्पती आणि त्याचे गुणधर्म यांचा माझा गाढ अभ्यास आहे, धोत्रा वनस्पतीच्या वेगवेगळ्या अवयवांच्या गुणधर्माबद्दल मी शोध निबंध लिहिलेला"
" आणि। त्याच संशोधनाचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या पत्नीवर विषप्रयोग केलात"
" ओहह माय गॉड, अनुवर विषप्रयोग झालेला? आणि तिचा आजार?? "
" येस मी. मकरंद, तिचा आजार हाच त्या विषप्रयोगाचा परिणाम होता, धोत्र्याच्या विशिष्ट भागाचा अर्क यांनी पत्नीच्या मेकअप किटमध्ये मिसळायला सुरुवात केली, यातली मेख अशी आहे की एकदा हे रसायन त्वचेतून आत शोषलं गेलं की मेंदूच्या रक्तपुरवठ्यात शिरून त्याच्या सिग्नल्स मध्ये गडबड करतं पण रक्तात त्याचा मागमूस राहतं नाही, हळूहळू त्या व्यक्तीला भास व्हायला लागतात, ती व्यक्ती तासंतास एक प्रकारच्या होप्नोटिक तंद्रीत जाते, आणि अश्याच कधीतरी यांनी तिच्या मनात त्या सैतानाला जन्म दिला, डोक्यावर शिंग असलेला, शेपटी असलेला टक्कल असलेला सैतान कुठं पाहिलाय? "
" ओनीडा..... "
" करेक्ट, मेकअपच्या साहित्यातून पॉयझनचा पत्ता लागल्यावर सगळं साफ होत गेलं, आणि तश्याच एका झटक्यात यांनी आत्महत्या करण्याचा मार्गही अलगद सांगून टाकला, आणि अंदाज अचूक ठरला, मिसेस अनामिकाने त्याच पद्धतीने आत्महत्या केली"
" ओहह शीट"
" अजून स्टोरी संपली नाहीये, आता तुमचा नंबर होता पण स्लो पॉयझनिंग तुमच्यावर शक्य नसल्याने तुमच्यासाठी जहाल उपाय ठरवला होता, या तुम्हाला दिलेल्या डबीत स्प्रिंगच्या साहाय्याने एक सुई बसवलीय, जी झाकण उघडताच तुम्हाला टोचली असती आणि एका मिनिटाच्या आताच हार्टअटॅक येऊन तुमचा मृत्यू झाला असता, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट म्हणाले असते हृदयाच्या रक्तपुरवठ्यात खंड पडल्याने मृत्यू "
" ओहह शीट, हे तुम्हाला कसं... "
" त्याच काय आहे मी. सस्मित, कायद्याचे हात जरा लांबच असतात आणि नव्या टेक्नॉलॉजीने नजरही तेज केलीय, तुमच्या घराचा प्रत्येक इंच छुप्या कॅमेऱ्यांच्या टप्प्यात आहे, तुम्ही ही भेटवस्तू तयार करत असताना आम्ही पाहिलंय, सो पुरावे तयार आहेत, साक्षीदार तयार आहेत, त्यामुळं तुम्ही गुन्हा मान्य करून टाकावा हे उत्तम"
' हो हो हो, मी मान्य करतो मीच केलं हे सगळं, मला नको झालेला हा ताण, कुठल्याही क्षणी अनु म्हणाली असती की जातेय मी तुला सोडून मकरंदकडे तर मान्य केलं असत मी पण वरून प्रेमाचा बुरखा पांघरून लपून छपून चाललेलं हे सगळं असह्य झालं मला, आणि म्हणून मी केलाय हा खून"
" हवालदार घेऊन चला याला"
" थँक्स इंस्पेक्टर, आज तुमच्यामुळे जीव वाचला माझा, या केसमध्ये गरज पडेल तेव्हा मी येईन साक्ष द्यायला"
" गरज नक्कीच पडेल कारण तुम्हीही थोडेफार कारणीभूत आहात या हत्येला, पण मुळात लग्न झालेल्या स्त्री सोबत प्रेमसंबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा होत नाही जोवर तक्रार होत नाही त्यामुळं सुटताय"
" सॉरी सर जुनी गोष्ट होती ती "

" मूर्ख लेकाचे.. आज खरंच दोन। पेग जास्त घ्यावे, एक आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि एक स्किल्स साठी, एक हस्ताक्षर कॉपी करणं आणि दुसरं हॅ़किंग किती सहज हॅक केला हवा तो लॅपटॉप.....
साली अनामिका, जीव टाकला तिच्यासाठी, वाईट वाटलं तिला फ्रेम करताना पण....
तिसराही एक पेग घ्यावा का? नशिबासाठी, आज ती डबी उघडली असती तर??? "
मनातल्या मनात बोलतानाही मकरंद शहारला

कथाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

1 May 2019 - 11:36 pm | ज्योति अळवणी

ओह.... अप्रतिम कथा...

मराठी कथालेखक's picture

1 May 2019 - 11:50 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली ..पण शेवटच्या परिच्छेदातले वळण (ट्विस्ट) तितकेसे पटले नाही... ते नसते तरी कथा छानच होती.

सोन्या बागलाणकर's picture

2 May 2019 - 3:38 am | सोन्या बागलाणकर

वाह! अप्रतिम थ्रिलर.
रत्नाकर मतकरींच्या धाटणीची वाटली, अर्थातच हे तुमचे यशच आहे.
अजून येउद्या!

उत्कृष्ट संवाद रहस्यकथा.

कथेचा प्लाॅट ,वेगआणि ट्विस्ट सगळं भन्नाट. अभिनंदन.
पण मला एक तक्रार आहे.
ती वेगाबद्दल आहे.
वाचकांना विचार करायला वेळच मिळत नाही.
मधे कसातरी पाॅज पाहिजे.
जिथे वाचक आपल्या अटकळी लावतील कि काय झालं असेल.
इथे काय होतय.
खून झाला म्हणे पर्यंत ,उलगडा पण होतो मग चघळण्याची व पुन्हा वाचण्याचे थ्रील रहात नाही.
काय म्हणता?

टर्मीनेटर's picture

2 May 2019 - 12:25 pm | टर्मीनेटर

+१
तरी पण कथा आवडली...

अनन्त अवधुत's picture

4 May 2019 - 5:40 am | अनन्त अवधुत

कथा आवडली. अजून फुलवता आली असती.

सुबक ठेंगणी's picture

2 May 2019 - 9:00 am | सुबक ठेंगणी

पण शेवटचा भाग नाही कळला. बाकी तो नसता तरीही कथा चांगलीच झाली असती.

विजुभाऊ's picture

2 May 2019 - 10:54 am | विजुभाऊ

मकरंद ला काय मिळाले यातून?

सोन्या बागलाणकर's picture

2 May 2019 - 12:15 pm | सोन्या बागलाणकर

अनूने मकरंदला सोडून सस्मितशी लग्न केलं याचा बदला घ्यायचा असावा बहुधा त्याला.

मला काय शेवट कळलाच नाही. कोनी इस्कटून सांगेल का?

श्वेता२४'s picture

2 May 2019 - 1:43 pm | श्वेता२४

मकरंद अनुचे हस्ताक्षर कॉपी करुन तसेच लॅपटॉप हॅक करुन बनावट प्रेमपत्रे व फोटो अपलोड करतो ज्यामुळे सस्मितच्या मनात अनु व मकरंदच्या अनैतिक संबंधांमुळे द्वेष तयार होतो. हे मकरंद करतो कारण त्याचे अनुवर एकतर्फी प्रेम असावे व त्याला सस्मित व अनुचा सुखाचा संसार बघवत नसेल. इकडे सस्मित देखिल मकरंदच्या बनावट प्रेमपत्रे व फोटोमुळे सुडाने पेटून अनुला आत्महत्या करायला भाग पाडतो त्याचबरोबर तो मकरंदलादेखिल संपवणार असतो. पण तेवढ्यात पोलिस हा प्लान उधळून लावतात. सर्वांना वाटते की मकरंद व अनुच्या अनैतिक संबंधांवरुन चिडून सस्मितने हे गुन्हेगारी कृत्य केले. पण वास्तविक अनु निरपराध असते कारण ती बनावट प्रेमपत्रे मकरंदने तयार केलेली असतात व मकरंदचा प्लान सक्सेस होतो.

क्या बात... मलाही हाच अर्थ उलगडला होता... तो तुम्ही शब्द स्वरूपात व्यवस्थीत मांडला आहे....

बाजीगर's picture

3 May 2019 - 6:10 am | बाजीगर

खूप छान वाचलतं between the lines....
मानलं ब्वाॅ.

श्वेता२४'s picture

3 May 2019 - 10:43 am | श्वेता२४

.

राजाभाउ's picture

2 May 2019 - 1:43 pm | राजाभाउ

एक नंबर !!!! बर्याच दिवसांनी तुमची कथा मजा आ गया !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2019 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कथा.

कथेचा भाग/प्रसंग/संदर्भ बदलतो तिथे जरा काहीतरी विभाजक, उदा...

***

असे काही टाकले असते तर, कथा वाचायला अजून सुलभ झाली असती.

नावातकायआहे's picture

2 May 2019 - 4:53 pm | नावातकायआहे

कथा आवडली!
पु ले शु

अभ्या..'s picture

2 May 2019 - 6:16 pm | अभ्या..

छान आहे कथा, आवडली.
थोडासा अंदाज येत गेला पण एकूणच चांगला प्लॉट.

खिलजि's picture

2 May 2019 - 7:11 pm | खिलजि

चेकमेट आवडण्यात आलेली आहे ... श्वेता तै तुमच्या प्रतिसादरूपी विवेचनानंतर कथा समजून घ्यायला काहीच अडचण आलेली नाही आहे .. धन्यवाद लेखकाला आणि तुम्हालासुद्धा

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 May 2019 - 7:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण उलगडुन सांगितली ते बरे झाले. शेरलॉक होम्सच्या कथेमधील डॉ. कल्व्हर्टन स्मिथची बॉक्समधील ईंजेक्शनची आयडिया ढापलेय ईथे.

रातराणी's picture

3 May 2019 - 10:05 am | रातराणी

भारी!

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2019 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार

कथा छान आहे पण घाईघाईने पुरेसा विचार न करता लिहिल्या सारखी वाटली.
दुसर्‍या शब्दात सांगायचे तर कथा चाफा स्टाईलने फुलवलेली नाही.
त्याच मुळे कदाचित शेवटचा धक्का म्हणावा तसा बसला नाही.
पैजारबुवा,

नाखु's picture

3 May 2019 - 4:08 pm | नाखु

उन्हाळ्यामुळे चाफा फुलला नाही.....

नितचाफावाचक नाखु