राम राम मंडळी,
आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!
फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.
आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..
आज़ जा़ने की जि़द ना करो.. !
क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!
मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! 'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!
आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..
'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात! :)
'बैठे रहो' हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!
हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,
हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!
ओहोहो! खल्लास...
'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!
'हम तो लुट जाएंगे..' मधल्या 'हम' वरची जागा पहा!
'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे 'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!
'हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे' ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!
'ऐसी बाते किया ना करो..'!
वा वा! 'किया' या शब्दावरची जागा पाहा. 'करो' हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!
खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है...!
असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा 'फ़रिदाबाईची गायकी' हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो...!
साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!
आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,
'आज़ जाने की जि़द ना करो..' असं म्हणते आहे!
क्या बात है...!
--तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
12 Feb 2008 - 8:24 pm | संजय अभ्यंकर
वा तात्या! बहुत खुब!
शांत आणी सुंदर गाणे.
फरिदा खानुम इतकी सुंदर गाते हे माहीत नव्हते.
फरिदाच्या आणखी काही लिंक असतील तर कृपया येथे संलग्न कराव्यात ही विनंती.
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
12 Feb 2008 - 8:33 pm | वरदा
किती छान सांगितलंत तात्या...एवढं सगळं शास्त्रीय कळत नसलं तरी तुम्ही त्यातली खरी जान समजावलीत्...मी एकदाच हे गाणं फरीदांच्या आवाजात ऐकलं होतं तेही अर्धवट आणि नंतर आशा भोसलेंच्या आवाजात...खूपच छान गाणं आहे...इथे दिल्याबद्दल धन्यवाद...
12 Feb 2008 - 8:34 pm | प्राजु
अप्रतिम... आहे हे गाणं आणि तात्या, त्याचं रसग्रहणही उत्तम केले आहे. अगदी हर एक सूर इथे दिला आहे त्यातला अस वाटलं.
खूपच छान. इतके दिवस ऐकताना केवळ यमन आणि शब्दांसाठीच ऐकत होते पण आत एक वेगळी दृष्टी दिली आहेत तुम्ही...
- प्राजु
12 Feb 2008 - 8:41 pm | मानस
केवळ अप्रतिम, शब्दच नाहीत.
खास गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
12 Feb 2008 - 8:43 pm | मुक्तसुनीत
हे गाणे आम्ही सुद्धा ऐकत आलो. आणि त्यावर प्रेम केले. पण त्याचे सौंदर्य इतक्या हळुवारपणे , आणि इतक्या मर्मज्ञतेने उलगडवून दाखवणारे तुम्हीच ! शास्त्राला रसिकतेची जोड नसती तर ते रुक्ष झाले असते आणि मूळच्या सौंदर्यासक्त वृतीला मर्म जाणण्याची जोड मिळाल्यावर ..... सोन्याला सुगंध ! आज हे गाणे पुन्हा नव्याने भेटले. त्याला तुम्ही चढविलेल्या साजामुळे ते आणखी सुंदर बनले आहे.
तुमच्या रसिकतेला आमचा सलाम. असेच लिहा. अजून खूप खूप.
12 Feb 2008 - 8:49 pm | ऋषिकेश
मला गायकीतील काहि कळत नाहि पण हे गाण मात्र फार फार आवडतं
हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!
मधला हाय हा पंचम आहे की काय हे कळत नसलं तरी हाय बेचैन करतो हे नक्कीच. इतकं आवडतं गाणं सुंदरपणे इथे उलगडल्याबद्दल अनेक आभार. फार छान लिहिलं आहे
-ऋषिकेश
13 Feb 2008 - 12:22 am | मनिष
जीवघेणा आवाज आणि तसेच गाणे. काय बोलावे?
असेच येशुदासचे "ज़िद न करो" आठ्वले, ते येथे ऐकता येईल.
13 Feb 2008 - 12:25 am | स्वाती राजेश
धन्यवाद तात्या.
सुंदर गाण्याची आठवण दिल्याबद्द्ल.
गाणे खुपच श्रवणीय आहे.
13 Feb 2008 - 1:12 am | नंदन
मूळ गाण्याइतकेच त्याचे रसग्रहणही सुरेख झाले आहे. वर मुक्तसुनीतांनी आणि ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे, हे गाणे आधी आवडत होतेच पण आता पुन्हा गाणं ऐकताना या जागा अधिक ओळखीच्या वाटू लागतील. 'ज्ञात्याचे पाहणे' म्हणतात तसे 'ज्ञात्याचे ऐकणे' म्हणजे काय, ते हा लेख वाचून समजतं, आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
13 Feb 2008 - 1:30 am | विसोबा खेचर
आणि 'वक्त की कैद' मधून अशाच 'चंद आजाद घडियाँ' मिळतात :)
क्या बात है नंदनसायबा,
गाण्यातल्या शब्दांचा फार सुंदर वापर केलास..! :)
13 Feb 2008 - 1:13 am | चतुरंग
आप तो छा गये!
हे गाणं ऐकून किती दिवस झाले होते आज तुम्ही ते इथं दिलंत आणि नुसतं नाही तर तुमच्या सुंदर, मर्मग्राही शब्दात लपेटून.
काळजाला हात घातलात. खल्लास! बसल्या बैठकीला तीनदा ऐकलं.
मला शास्त्रीय संगीतातलं ज्ञान नाही पण आपण सांगितलेल्या जागा 'ऐकण्याचा' प्रयत्न केला तेव्हा काहीतरी वेगळं जाणवलं.
मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते(चूभूदेघे).
हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका.
चतुरंग
13 Feb 2008 - 1:27 am | विसोबा खेचर
मला वाटतं 'चितचोर' मधलं 'जब दीप जले आना' हे येसुदासचं सुध्दा यमन मधेच असावं - कारण सुरावट कानांना सारखी वाटते
यू गॉट इट करेक्टली!
रंगराव, असा कुणी प्रतिसाद दिला की हिंदुस्थानी अभिजात संगीताच्या प्रचाराच्या आणि प्रसाराच्या ज्या महान कार्यातला खारीचा वाटा आम्ही उचलला आहे त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं! जियो..
आपला,
तात्या,
प्रचारक आणि प्रसारक,
हिंदुस्थानी अभिजात संगीत.
हे माझं फार आवडतं गाणं दुव्यात ऐका.
नक्की ऐकतो..! माझंही हे फार आवडतं गाणं आहे. येशुदास खूपच सुरेल आहे. क्या बात है..!
अवांतर - चितचोर हा शिणेमाही मला फार आवडला होता. त्यातली अल्लड, लग्नाळू वयातली झरिना वहाब ही कुणीही प्रेमात पडावं अशीच! आपण पण साला तेव्हा तिच्या पिरेमात पडलो होतो! :)
असो,
छ्या साला! गेले ते दिवस तिच्यायला. तात्या, आता तरी सुधारा! नाही म्हटलं, चाळीशी आली हो! (स्वगत!)
:)
तात्या.
13 Feb 2008 - 3:30 am | केशवसुमार
तात्याशेठ..
गाण्याच्या दुवा बद्दल धन्यवाद.. लेख वाचून पिरंगुटच्या कट्ट्याच्या आठवण झाली..
आम्ही मायदेशी परत आल्यावर लगेच मैफिल भरवा म्हणजे झाले..
(कानसेन)केशवसुमार
13 Feb 2008 - 8:28 am | धोंडोपंत
तात्या................
अप्रतिम लेख. केवळ अप्रतिम. आजपर्यंत मराठी संकेतस्थळांवर वाचलेल्या संगीतविषयक लेखातील हा सर्वात उत्तम लेख.
हार्दिक अभिनंदन......
यमनचं विश्व तू या लेखातून उघड केलंसं. त्याचे विविध कंगोरे दाखवलेस. आम्ही भरून पावलो. आम्ही तुझ्या संगीतव्यासंगाची दाद देतोच पण ते इतक्या सुंदर रीतीने शब्दबद्ध केल्याबद्दल तुझ्या लेखनकौशल्याची सुद्धा दाद देतो.
हा लेख एका वेगळ्या कप्प्यात कायमस्वरूपी सेव्ह करण्यात यावा असे आम्हाला वाटते.
उत्तरोत्तर असेच लेखन तुझ्या हातून होवो या शुभेच्छा.
आपला,
(तृप्त) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
13 Feb 2008 - 8:47 am | धनंजय
आणि तुम्ही जागा दाखवल्यामुळे अधिकच गहरी मजा आली.
13 Feb 2008 - 9:10 am | प्रमोद देव
तात्या तुझे संगीतविषयक विचार खूपच प्रगल्भ आहेत आणि ते तू तितक्याच समर्थपणे लेखनातही मांडू शकतो. पण माझे दुर्दैव हे की ते 'मध्यम,गांधार' वगैरे शब्दशः मला कळत असले तरी ते तू दाखवल्यावरही डोक्यावरून गेले(तो तुझा दोष नव्हे; माझ्या समज शक्तीचा आहे). पण एक मात्र आहे की गाण्यातले काहीही न कळता ही मी ते गाणं अनुभवू शकलो. मस्त गायलेय.
अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले.
13 Feb 2008 - 9:21 am | सर्किट (not verified)
हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे..
स्वतःशी प्रामाणिक राहून, उगाच ऐर्आगैर्यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता, ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा..
पदर दूर करून, यमनचा पोर्नोग्राफिक प्रयत्न तू ह्या रसग्रहणाने वर आणतो आहेस, असे वाटते.
(तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्यांना कदाचित तो आवडेलही..)
- सर्किट
13 Feb 2008 - 10:37 am | विसोबा खेचर
मिलिंद,
हा यमन म्हणजे "पदर सोडून" गायलेला यमन आहे..
प्रत्येकाचं मत! तुझ्या मताचा मी आदर करतो..! इथे इतक्या लोकांना यातला यमन आवडला आणि भावला! तुला नाही आवडला! किंबहुना 'पोर्नोग्राफिक' वाटला! चलता है...!
अवांतर - बाय द वे, यमनसारख्या रागातही काही पोर्नोग्राफिक असू शकतं हे वाचून गंमत वाटली. माझी सांगितिक समज तुझ्याइतकी प्रगल्भ(?) नाही, त्यामुळे यमन हा मला नेहमी हळवा आणि प्रसन्नच वाटत आलेला आहे!
उगाच ऐर्आगैर्यांना शास्त्रीय संगितकडे ओढून आणण्याचा प्रयत्न न करता,
हे तू नक्की कुणाबद्दल बोलतो आहेस? मिपावरील रसिक श्रोत्यांबद्दल आणि वाचकांबद्दल हे तू बोलतो आहेस का? तसं असेल तर तुझं वरील विधान हे अत्यंत हलकटपणाचं आहे असंच मी म्हणेन. तुला माझा लेख आवडला किंवा नाही, याबद्दल तू अवश्य लिहू शकतोस परंतु मिपावरील रसिकांचा 'ऐर्यागैर्या' असा उल्लेख करण्याचा तुला काहीही अधिकार नाही!
आणि अरे तुझ्यासारख्या यमनसारख्या रागातदेखील अश्लीलता दिसणार्यांपेक्षा, अभिजात संगीताची विशेष काही तोंडओळख नसलेले मिपावरचे ऐरेगैरे वाचक-श्रोते कितीतरी अधिक रसिक आणि दिलखुलास म्हटले पाहिजेत!
ह्या गाण्यतील यमनाची "ज्योति कलश झलके" शी तुलना कर रे जरा..
काय संबंध? दोन्ही गाणी पूर्णत: वेगळी आहेत, त्यातले भाव वेगळे आहेत, राग वेगळा आहे! अर्थात, ज्याला यमन मध्ये पोर्नोग्राफी दिसते त्याला 'ज्योती कलश' मधला भूप कसा दिसत असेल हा एक प्रश्नच आहे! आणि मुळात आज़ 'जा़नेकी.. ' हे यमन मध्ये आहे आ़णि ज्योती कलश हे भूपात आहे हा मूलभूत फरक तुझ्यासारख्या प्रगल्भ (?) सांगितिक समज असलेल्याला कळू नये हेदेखील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे!
अवांतर - 'ज्योती कलश हे गाणं काय आहे, कसं आहे, त्याची तुलना कुणाशी करायची आणि कुणाशी नाही हे मला तू नाही सांगितलंस तर बरं होईल. कारण तुझ्या दुर्दैवाने म्हणा, किंवा माझ्या सुदैवाने म्हणा, हे गाणं मला एकट्याला खुद्द बाबुजींनी त्यांच्या घरी पेटी घेऊन प्रेमाने ऐकवलं आहे, शिकवलं आहे! आमच्या ललितामावशी त्या घटनेच्या आजही साक्षिदार आहेत! बाबुजींनी स्वत: म्हटलेलं याच गाण्याचं एक ध्वनिमुद्रणही मला स्वत:च्या हाताने भेट म्हणून दिलं आहे आणि माझ्या आठवणीप्रमाणे ते मी तुलाही याहू निरोपकावर पाठवलेलं आहे! असो..
(तू तारीफ केलेला शुद्ध मध्यम हा "ब्लेटंट" अहे.. हसलर किंवा पेंटहाऊस मधल्या छायाचित्रांत सौंदर्य दिसतं असं वाटणार्यांना कदाचित तो आवडेलही..)
प्रत्येकाची मतं!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
तात्या.
13 Feb 2008 - 10:55 am | मुक्तसुनीत
खरे म्हणजे कुणाच्या इंटरप्रीटेशनबद्दल आणखी वर मल्लिनाथी करू नये इतपत शहाणपण मला(ही) आहे. पण सर्कीटरावांच्या प्रतिसादातून मी जो बोध घेतला तो असा :
विंदा करंदीकरानी एका निबंधात म्हण्टले आहे : "कविता कशी भोगावी ? कपडे काढून भोगावी !" आता प्रथमदर्शनी पाहता , या विधानात अश्लीलता आहेच. पण त्यामागचा करंदीकरांचा एक अतिशय आदिम , निखळ असा दृष्टीकोन आहे. एखाद्या कवितेला आपण "कपडे काढून" भोगावे याचा अर्थच रूढ संकल्पनाना , प्रसंगी दुसर्यांच्या प्रस्थापित अशा दृष्टिकोनाना बाजूला ठेवून सामोरे जावे; स्वतःचे , स्वायत्त असे आकलन करावे.
सर्कीट यानी यमन रागाच्या वेगवेगळ्या रूपांचे इंटरप्रीटेशन करताना रूढ पावित्र्य वगैरे संकल्पनाना बाजूला ठेवून, सरळ त्याना कळले त्या भाषेत आडपडदा न ठेवता आपले मत मांडले असे मला तरी वाटले. ("ज्योती कलश झलके" च्याबाबतीत त्यांची सरळसरळ तांत्रिक चूक झाली आहे. "फॉ पा " का काय म्हणतात ते :-) )
13 Feb 2008 - 11:10 am | सर्किट (not verified)
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको..
मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस, त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते..
(आणि हे फक्त माझे -प्रगल्भ- मत नही. नव्हे फक्त काधी शतके वर्षांपासून चालत आलेल्या एखद्या कलेविषयी आपले मत प्रगल्भ आहे, असे म्हणणार्या लोकांना वेड्यंच्या इस्पितळात घालवे, असे माझे मत आहे.. हेच मोनालिसाविषयी बोलणार्यंसाठी, हेच शेक्सपियरविषयी..)
ऐर्यागैर्यांना म्हणण्याचा उद्देश एवढच, की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्यांसाठी.
तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल. म्हणून तुझी ही लेखणीरूपी तलवार जरा आवरती घे. एवढेच सांगणे.
बाकी तुझे तू बघण्यास समर्थ आहेस.
- सर्किट खानुम
13 Feb 2008 - 7:31 pm | विसोबा खेचर
ज्योतिकलश मधे "बादलके.." च्या शेवटी जो मद्ध्यम येतो, त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे. तुला ते सांगायला नको..
???
माझ्या माहितीप्रमाणे 'बादलके...' च्या शेवटी कुठलाही मध्यम येत नाही! तुला तसं ऐकू येत असेल तर त्यावर मला काहीच बोलायचं नाही!
त्यातून त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे.
????
मिलिंद, आता मला असं वाटू लागलं आहे की तू खरंच वाट्टेल ते बरळतो आहेस!
'ज्योती कलश छलके...' हे गाणं यमनात नसून भूपात आहे आणि यापूर्वीच्या प्रतिसादात केलेली तांत्रिक चूक तू आता काहीही करून, येनकेन प्रकारे या गाण्याचा यमनशी संबंध जोडून पुढे रेटायचा प्रयत्न करतो आहेस हे खरोखरंच हास्यास्पद आणि पोरकटपणाचं वाटतं आहे! असो..
बरं एक वेळ त्या गाण्यात मध्यम आहे असं मान्य करून मी तात्पुरता तुझा बालहट्ट पुरवतो, परंतु...
१) त्या गाण्यात (ज्योती कलश..) शुद्ध निषाद कुठे आलाय हे जरा सांगशील का?
२) थेट मध्यम, निषादाची नातं सांगणारी अशी यमन रागातली कोणती स्वरसंगती तुला दिसली हे सांगशील का?
म्हणजे मग आपण,
त्या भूपाला बाबूजींनी आपल्या फेवरीट यमनात घातला आहे, हे स्पष्ट आहे.
हे तुझं बेधडक परंतु धादांत चुकीचं विधान अवश्य मान्य करू!
असो, माझ्या मते तरी 'ज्योती कलश..' या सर्वांगसुंदर गाण्यात भूपाचं आणि फक्त भूपाचंच दर्शन होतं! किंबहुना, या गाण्यामुळे भूपाचा मान वाढला आहे असंही मी रसिकतेने म्हणेन!
आपली चूक किंवा अज्ञान जर मोकळेपणाने मान्यच करायचं नसेल आणि केवळ फक्त विरोधाकरताच जर विरोध करायचा असेल तर मग या गाण्यात (ज्योती कलश..) यमनच काय, परंतु मारवाही दिसतो असं म्हटलं म्हणून तरी बिघडलं कुठे?
मला म्हणायचे आहे ते एवढेच, की ज्या गाण्याची तू एवढी मनसोक्त तारीफ केली आहेस,
खरं आहे. माझ्या मते ते गाणं मनमुराद तारीफ करावी, दाद द्यावी असंच आहे!
त्या गाण्याच्या मांडणीत, "हल्ली लोकांना शास्रीय म्हटलेले गाणे आवडते.. म्हणून आपण त्यातील शास्त्रीय पदर उघडवून दाखवूयात." असे स्पष्ट दिसते. ह्या गाण्यातही तेच दिसते..
बरं मग? मी माझ्या परिने मिपावरील रसिक वाचकांना त्यातले थोडेफार सांगितिक स्वरांचे पदर उलगडून दाखवले, त्यातलं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न केला तर बिघडलं कुठे??
की "जिद न करो" हे गाणे, फक्त तात्याने लिहिलेले रसग्रहण आवडले, म्हणून आपण आता जबरा संगीतविशारद झालो, असे म्हणणार्यांसाठी.
तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते. तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल.
???
मिलिंदा, तू नक्की कुठल्या गैरसमजात वावरतो आहेस हे आता मला खरंच कळेनासे झाले आहे!
तुझ्या लिहिण्याने मोठेमोठे लोक वाहावत जातात, हे मला क्ळते.
इज इट? माझ्याकरता तर ही न्यूजच आहे!... :)
तुझा फ्यान क्लब अनुष्काला जगातील सर्वत सुंदर स्त्री म्हणून तुझ्या सांगण्याने व्होट करेल.
इज इट? असं झालं तर फारच उत्तम होईल...! :)
बाय द वे, मराठी आंतरजालीय जगतात माझा फ्यॅन क्लब आहे हे वाचून बरे वाटले! :)
तात्या.
14 Feb 2008 - 12:01 am | सर्किट (not verified)
इंटरेस्टिंग..
मूळ गाण्यात तो मध्यम कुठेच दिसत नाही.
तू मला बाबुजींनी गायलेल्या ज्योति कलश ची एम पी ३ दिली आहे त्यात त्यांच्या गळ्यातून आणि पेटीवर दोन्हींत मध्यमाचा शिरकाव आहे.
निषाद नाही हे नक्की. त्यामुळे तो यमन होत नाही हेही नक्की. माझ्या आधीच्या विधानाबद्दल माफी मागतो.
आता मूळ मुद्द्यावर.
"क्लासिकल-बेस्ड" गाण्यांतली स्थित्यंतरे मी सांगितली आहेत. ("जागा" ह्या जागा वाटू नयेत, असं तलम मृदु "ज्योति कलश", आणि, "ही बघा जागा दाखवतो/ते", म्हणून किमोनो उघडणारे "जिद ना करो", हा मूळ मुद्दा आहे.) त्याबद्दल तुझे काय मत आहे ?
- सर्किट
13 Feb 2008 - 9:36 am | प्राजु
अवांतरः फ़रिदा खा़नुम सारखेच हे गाणे आशा भोसले ह्यांनीही गायलेले आहे आणि दोघींच्या गाण्याची तुलना करता मला आशाताईंचे गायन जास्त आवडले.
मला फरिदा खानुम यांचेच जास्ती आवडले.
(प्रामाणिक मत)
- प्राजु
13 Feb 2008 - 11:01 am | umavaidya
आवड्ला बर्र का,
13 Feb 2008 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
'जिया ले गयो जी मोरा सावरीया', 'जा रे बदरा बैरी जा' मधला अवखळ यमन, 'समाधी साधन' मधला सात्विक यमन, 'जेथे सागरा धरणी मिळते' मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, 'दैवजात दु:खे भरता' मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि 'रंजिश ही सही' किंवा 'आज़ जा़ने की जि़द ना करो' सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन!
'यू ही पेहेलू मे बैठे रहो..' मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! 'पेहेलू' या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! 'कानडाउ विठ्ठलू..' आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल!
'हाये' मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा 'हाये' हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने!
'मर जाएंगे', 'लुट जाएंगे' मधील 'जाएंगे' या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा!
खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज!
ह्यातलं काहीही कळलं नाही तात्या, पण फरिदा खानुम ह्यांच्या आवाजाचा पोत (ही माझी भाषा आहे हं!) आणि त्यातील आर्जव ह्याला तुलना नाही. जी अस्वस्थ करण्याची ताकद गाण्याच्या शब्दांमध्ये, गायिकेच्या आवाजात आणि सुरावटीत आहे हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही.
आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे
हे बाकी लै झालं. तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक.
13 Feb 2008 - 1:57 pm | विसोबा खेचर
हे अनुभवायला गाण्याचे व्याकरण समजण्याची आवश्यकता, निदान मला तरी भासत नाही.
नक्कीच नाही! कुठलेही गाणे हे कानाला चांगले लागल्याशी कारण!
मी फक्त ज्यांना स्वरांचीही थोडीफार ओळख/तोंडओळख आहे त्यांच्याकरताच केवळ स्वरांविषयीही थोडेसे लिहिले आहे इतकेच. बाकी, गाण्याचा आनंद कुणीही घेऊ शकतो, त्याकरता त्यातल्या व्याकरणाची/स्वरांची जाण असणे मुळीच आवश्यक नाही, असेच माझेही म्हणणे आहे...
तबियतदार रसिकांसाठी, ते अत्यवस्थ होऊ नयेत म्हणून, आवश्यक.
पेठकरशेठ, या वाक्याचा मतलब ध्यानी नाही आला. जरा उलगडून सांगता का? लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का?
असो...
आपला,
(सिंगल-माल्ट मित्र!) तात्या.
13 Feb 2008 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर
लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात माझं काही चुकलं आहे का?
अजिबात नाही तात्या. उलट मला असे म्हणायचे आहे की, जे रसिक एखाद्या कलेचा आस्वाद अगदी 'तब्येतीत' घेतात (मनस्वितेने घेतात) अशांच्या हाती (आणि ज्यांना 'ते' निषिद्ध नाही), सोनेरी रंगाचे द्रव्य नसेल तर ते अत्यवस्थच होतील म्हणून त्यांनी गाण्याचा आस्वाद घेताना चषक भरून फरीदा खानुमच्या ह्या गाण्याच्या सुरांवर तरंगण्याचा अनुभव घ्यावा.
13 Feb 2008 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
शास्त्रीय संगितातले आम्ही "ढ" विद्यार्थी. पण गाण्यातील सौंदर्यस्थळे, समजावण्याची कुशलता, रागांची ओळख आणि सांगण्याची तळमळ ''आज़ जा़ने की जि़द ना करो " च्या निमित्ताने एका उत्तम जाणकाराने आमच्यापर्यंत पोहचवली. त्याचबरोबर आमच्या सारख्यां ( ऐरे-गैरे ) च्या मनात शास्त्रीय संगिताबद्दल जिज्ञासा निर्माण करणे , हेच आपल्या लेखाचे / लेखनाचे यश आहे असे आम्हाला वाटते, पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
15 Feb 2008 - 12:06 pm | स्वाती दिनेश
उशिरा लक्ष गेलं ह्या लेखाकडे,पण आजच्या दिवसाची सुरुवात सुरिली झाली,:-)
तात्या,मस्त!
स्वाती
15 Feb 2008 - 12:39 pm | विसोबा खेचर
प्रतिसाददात्या सर्व रसिक वाचकवरांपाशी मी कृतज्ञता व्यक्त करतो..
केशवसुमाराच्या ष्टाईल मध्ये - प्रतिसाद न देणार्यांचेही आभार.. :)
आपला,
(गाण्यातला) तात्या.