निष्काळजीपणा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Mar 2019 - 10:45 am

निष्काळजीपणा

१) एक २३ वर्षाची मुलगी आली होती. पोटात दुखतंय म्हणून. हि माझी जुनीच रुग्ण आहे. तिला गेली काही वर्षे मुतखडा होण्याचा त्रास आहे. एकदा दुर्बिणीतून शल्यक्रिया करून झाली आहे. तिला अनेक वेळेस सांगून झाले आहे कि तुझे पाण्याचे प्रमाण कमी झाले तर लघवी जास्त संतृप्त (घट्ट) झाल्यामुळे त्यात मुतखडा होतो आहे तेंव्हा दिवसात किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कितीही कळकळीने सांगितले तरी हि मुलगी पाणी पीतच नाही.आई म्हणते कि कितीही सांगितले तरी मुलगी ऐकतच नाही.

२) एक ५० वर्षांच्या स्थूल बाई आहेत. मधुमेहामुळे त्यांची मूत्रपिंडे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.त्यांना तीन वर्षांपासून सांगतो आहे कि काहीही करा पण मधुमेह नियंत्रणात ठेवा अन्यथा मूत्रपिंडे खराब होतील. बहुधा एका कानाने ऐकून घेतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. मला आश्चर्य वाटते कि इतके परखड शब्दात सांगितले अगदी काही वेळेस कठोर शब्दात सांगितले तरी परत परत माझ्याकडे कसे काय येतात.

३) हीच स्थिती असलेले एक "अहं" असलेले गृहस्थ मोटर सायकलने आले होते. त्यांना पण सांगितले कि "काहीही करा पण आपला मधुमेह नियंत्रणात ठेवा". त्यावर ते मलाच म्हणाले कि डॉक्टर मी काही माझी साखर सहा आठ महिने वर्षभर सुद्धा तपासत नाही. मी शांत पणे त्यांना म्हणालो साहेब तुम्ही वर्षभर चाकात हवा न भरता मोटर सायकल चालवता का? का-ही होणार नाही फार तर एखादे वेळेस पंक्चर होईल. पहिल्यांदाच हे गृहस्थ विचारात पडलेले दिसले.

४) श्री जठार (नाव बदलले आहे) याना त्यांची बहीण घेऊन आली होती. पोट बिघडलंय म्हणून. यकृत पाहिल्यावर त्यांना विचारले, "साहेब दारू पिता का?" त्यावर बहीण म्हणाली ते रोजच दारू पितात. श्री जठार यांचे लग्न झालेले नाही. वडिलोपार्जित घरात एकटे राहतात. नोकरी आनो, ती झाल्यावर रोज संध्याकाळी गुत्त्याकडे जातात. मी त्यांना माझ्या दवाखान्यात असलेला श्री गणपतीचा २ फुटाचा फोटो दाखवून म्हणालो, साहेब "एवढा मोठा फोटो" काढून ठेवा. कारण तुम्ही असेच दारू पीत राहिलात तर तीन चार वर्षात फोटो घरी भिंतीवर टांगायला लागेल. यानंतर त्यांचे दारू या विषयावर प्रबोधन केले. आपला अहवाल घेऊन ते गेले.
दोन महिन्यांनी श्री जठार बहिणीबरोबर परत हजर. आल्या आल्या बहीण माझ्या पाया पडू लागली. मला अतिशय कानकोंडे झाले. मी फार ओशाळून म्हणालो आहि माझ्या पाया कसले पडताय? त्यावर ती बहीण साश्रू नयनांनी म्हणाली डॉक्टर तुम्ही सांगितल्यावर गेल्या दोन महिन्यात त्याने दारूला हातही लावलेला नाही. आजपर्यंत एवढे उपाय केले पण ते फोल ठरले. मला अर्थातच आनंद झाला. "कुणाच्या का कोंबड्याने पण उजाडल्याशी मतलब" या न्यायाने. नंतर सहा महिन्याने श्री जठार परत आले होते सध्या ते संपूर्ण व्यसनमुक्त आहेत आणि त्यांचे यकृत जवळ जवळ उत्तम स्थितीत आले आहे.

५) असेच एक "अहं" ६५ वर्षाचे खाऊन पिऊन सुखी असलेले गृहस्थ( श्री माने --नाव बदलले आहे) पोट बिघडल्यामुळे माझ्याकडे आले होते. वजन १०८ किलो. सोनोग्राफी करताना यकृतात भरपूर चरबी भरलेली दिसत होती. मी त्यांना सांगत होतो कि साहेब तुमचे वजन, रक्तदाब आणि यकृतात चरबी हे हृदय विकाराला आमंत्रण देणारे आहेत.तुम्हाला मधुमेह आहे का? ते माझ्याकडे तुच्छपणे पाहत म्हणाले "मी असलं काही तपासून पाहत नाही आणि माझं कसं छान चाललं आहे".
मी त्यांना कळकळीने म्हणालो साहेब तुमच्यासारखे लोक पटकन हृदय विकाराला बळी पडतात तेंव्हा काळजी घ्या.
ते म्हणाले, मला "सध्या काय आहे" ते सांगा. अर्थात त्यांना अन्न विषबाधा झाली होती. ते सांगितले, अहवाल दिला आणि ते गेले. त्याच वेळेस( ते बाहेर जाताना) त्यांच्या शेजारी असलेली एक मुलगी ( हि माझ्याकडे मूल होण्यासाठी सोनोग्राफीसाठी येत असे) तिचे आणि त्यांचे बोलणे झाले.

हीच मुलगी पुढच्या महिन्यात परत तपासणी साठी आली असताना म्हणाली डॉक्टर, ते माने काका आले होते ना? मागच्या महिन्यात ते १५ दिवसापूर्वी हृदय विकाराने वारले.

मला धक्काच बसला. मला "बत्तीशी वठली" म्हणतात तशी भावना आली.

आजही हा विचार मनात आला कि मला कसं तरी होतं. कितीही कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पड्ली म्हणावं तरी असं परखड बोलावं कि नाही या संभ्रमात मी आहे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2019 - 11:21 am | प्रकाश घाटपांडे

कधी कधी पेशंटच्या मनात डॉक्टर लोक जागरुकतेच्या नावाखाली भय दाखवून आपल्याला लूटत तर नाही ना? अशी शंका असते. ती शंका अनाठायी असते असे म्हणता येत नाही.. वर्तमान पत्राच्या आरोग्य पुरवण्या पाहिल्या तर तसे आरोग्यजागृती नावाने हे मार्केटिंग तर नाही ना असा डोक्यात शंकेचा किडा वळवळत राहणे स्वाभाविक आहे.
आपल्या लेखातील उदाहरणे कदाचित तशी असावीत किंवा खरोखरच निष्काळजी लोक असावेत जे होईल ते होईल असा विचार करणारे.

मुक्त विहारि's picture

13 Mar 2019 - 11:52 am | मुक्त विहारि

निदान आपले मन मोकळे होते....

महेश हतोळकर's picture

13 Mar 2019 - 11:53 am | महेश हतोळकर

असं परखड बोलावं कि नाही या संभ्रमात मी आहे.

असं करु नका. शंभरात एखादाच भेटेल पण "श्री जठार" असतात. त्यांच्यासाठी म्हणून असं करु नका.

बाकी श्री अहं बद्दल काय बोलावे!

तुम्हीसुद्धा परखड, स्पष्ट बोलला नाहीत तर कोण बोलणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2019 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं पाहिजे. डॉक्टरांचं काय, ते सांगतच राहतात, अशी आपली बेफिकीर वृत्ती असते.
स्पष्ट बोललंच पाहिजे.

डॉक्टर साहेब, लेखन अनुभव आवडले.

-दिलीप बिरुटे
(डॉक्टरचा सल्ला निमूट ऐकणारा)

विनोद सोडा, डॉक्टर परखड बोलणार नाही तर काय वकील बोलणार?

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2019 - 11:30 pm | पिवळा डांबिस

डॉक्टर हे परखडच हवेत. फक्त ते त्यांचं म्हणणं नीट समजावून सांगणारे असावेत.
पेशंटने तोंडावर मान्य केलं नाही तरी त्यांना आधार वाटतो...

मराठी कथालेखक's picture

14 Mar 2019 - 12:13 am | मराठी कथालेखक

६५ वर्षाच्या मनुष्याची जगण्याची आसक्ती फारशी तीव्र नसेल शिवाय हृदयविकाराच्या झटक्याने माणूस अगदी पटकन जातो खूप काळ वेदना घेवून जगावे लागत नाही त्यामुळे त्यांनी तुमचे बोलणे मनावर घेतले नसेल.
मला तर वाटते की मरण यावे ते हृदयविकाराच्या झटक्यानेच..उगाच त्रास नाही, कटकट नाही..महिनों महिने अंथरुणाला खिळणे नाही काही मिनटांत वा फारतर तासांत खेळ संपतो.

> ६५ वर्षाच्या मनुष्याची जगण्याची आसक्ती फारशी तीव्र नसेल शिवाय हृदयविकाराच्या झटक्याने माणूस अगदी पटकन जातो खूप काळ वेदना घेवून जगावे लागत नाही त्यामुळे त्यांनी तुमचे बोलणे मनावर घेतले नसेल. > +१

चौकटराजा's picture

17 Mar 2019 - 6:51 pm | चौकटराजा

वरील प्रमाणेच माझी स्थिती आहे. मी तसा आयुष्याचा मस्त आनंद घेणारा गडी आहे . पण...... माझी नातेसंबंधातली गुंतवणूक संपत चालली आहे हे वास्तव आहे. "आता नाही येणे जाणे अवघे खुंटले बोलणे " अशी मानसिकता येऊ घातली आहे. माझ्यावर डॉ जॉन डॉयर यांच्या " बॉडी at वॉर " पुस्तकाचा प्रभाव आहे . कोणत्यातरी कारणाने मृत्यो येणार हे त्या पुस्तकाचे सार आहे. इथे काही लोकांचा विरोध असेल पण साठी नंतर मॅसिव्ह हार्ट attac हा म्र्युत्यु चा उत्तम मार्ग आहे . असे माझे मत आहे. त्या पुस्तकातले एक वाक्य असे " इफ युवर ऑल सिस्टम्स आर ओके यु विल डाय अनादर विथ कँसर ऑ र न्यूमोनिया ...इट इज या गिफ्ट ऑफ युअर ओल्ड एज "

कपिलमुनी's picture

14 Mar 2019 - 12:34 am | कपिलमुनी

उत्तम लेख आणि अंतर्मुख करणारे अनुभव !
पुलेशु

सरळमार्गी's picture

14 Mar 2019 - 9:09 am | सरळमार्गी

सत्य घटना १ :

वर्ष २०१५. डॉक्टरांनी MRI नामक टेस्ट करायला सांगीतली, देखील अमुक एका लॅब मधूनच असे ही बजावले. आम्ही आमच्या एका लांबच्या नातेवाईक डॉक्टरांशी या संदर्भात बोललो , त्यांनी असे सुचवले की त्या लॅब मध्ये जा आणि माझे (नातेवाईक डॉक्टर) नाव सांगा . आम्ही पेशंट ला घेऊन त्या लॅब मध्ये गेलो , रु ६००० चार्जेस सांगीतले ! आम्ही आमच्या नातेवाईक डॉक्टरां बद्दल त्यांना सांगीतले त्याबरोबर जिभ चावत त्या रिसेप्शनिस्ट ने ६००० खोडून तिथे ४००० लिहले ! आमच्या त्या नातेवाईक डॉक्टरांनी नंतर सांगीतले की अशा टेस्ट मध्ये टेस्ट करायला सांगणार्‍या डॉक्टरांचे कमीशन असते, मी कमिशन घेत नाही पण त्याचा फायदा पेशंटला द्या असे लॅब ला सांगतो त्यामुळेच त्यांनी ‘माझे तथाकथित कमीशन’ कमी करुन टेस्ट स्वस्तात म्हणजेच तीच्या मूळ किंमतीत केली. कमैशन घेणारा डॉक्टर असता तर टेस्ट ६००० ला पडली असती. लॅबचे ४०००, डॉक्टरचे २०००!

सत्य घटना २ :
महाराष्टातले तालुका पातळीवरचे गाव , मी एका वेगळ्या कारणां साठी तिथल्या एका डॉक्टराकडे गेलो होतो, डॉक्टर केबीन मध्ये कोणाशी बोलत होते , ते छान ऐकायला येत होते !

“काय राव , इतके मोठे कर्ज घेऊन मशीन घेतली , स्टाफ हायर केला , पण तुम्ही काही पेशंट पाठवत नाही अजून , तुमच्या भरवशावर तर इतकी मोठी उडी घेतली आणि तुम्ही हात आखडता घेतला तर आम्ही कर्जात बूडूण मरायचे ना? पाठवा जरा पेशंट , वाटल्यास कट वाढवून देतो.. “

हे बोलणारी व्यक्ती नंतर केबीन बाहेर आली, मी ओळखले , ते होते त्या गावतले एक डायग्नोस्टीक सेंटर चालवणारे, MD Pathology डॉक्टर !
सत्य
या असल्या प्रकरामुळे डोक्टरांनी ह्या टेस्ट करा , त्या टेस्ट करा असे सांगीतले की पेशंट च्या मनात संशय येतो की या टेस्ट खरोखरच आवश्यक आहेत का कोणा लॅब चा फायदा आणि स्वत:ला कमीशनची कमाई व्हावी म्हणून सांगत आहेत ?

माझा आणि अनेक जणांचा अनुभव आहे की डॉक्टर पेशंट्शी अत्यंत तुटकपणे, तुसडेपणाने बोलतात, पेशंटला माहीती देत नाहीत, पेशंटला विश्वासात घेत नाहीत. खास करुन मधुमेह , हृदयविकार या सारख्या ‘लाईफ स्टाईल’ आजाराच्या बाबतीत ‘समुपदेशन – कौंसेलिंग’ हा भाग औषधा इतकाच महत्त्वाचा असतो पण बरेच डॉक्टर याला फाट्यावर मारतात, पाच मिनीटात पेशंट केबीन बाहेर काढायचा असतो ना मग इतके सारे बोलत बसायाचे कशाला ?

त्यामुळे पेशंट डॉक्टरांनी सुचवलेल्या टेस्ट करायला साशंक असतो हा मुद्दाही डॉक्टरांनी समजून घेणे आवश्यक आहे.

सुबोध खरे's picture

14 Mar 2019 - 12:15 pm | सुबोध खरे

१) मी कोणत्याही रुग्णाला उपचार देत नाही किंवा त्याला कुठेही चाचण्यांसाठी पाठवत नाही. माझ्याकडे रक्त, थुंक,, लघवी यापैकी कोणतीही चाचणी होत नाही आणि मी सोनोग्राफी सोडून दुसरे काहीच करत नाही त्यामुळे रुग्णाने आपल्या चाचण्या केल्यामुळे मला कोणताही फायदा होत नाही. सुदैवाने माझ्या गरजेपेक्षा मला नक्कीच जास्त पैसा मिळतो. त्यामुळे मला अशा वाकड्या मार्गाची गरज पडत नाही हि परमेश्वराची कृपा आहे.

२) कट प्रॅक्टिस हा दुर्दैवाने एक रूढ झालेला झालेला प्रकार आहे. त्याची कारणे चूक कि बरोबर या चर्चेत न शिरता मला जे दिसते आहे ते लिहितो आहे. कट प्रॅक्टिस मुळे खरोखरच रुग्णांचे नुकसान होताना मी पाहतो आहे. उदा एका रुग्णाची प्रोस्टेट ग्रंथी वाढली असल्यामुळे मी त्यांना PSA हि प्रोस्टेटच्या कर्करोगाची चाचणी करण्यासाठी लिहून दिले होते. त्यांना वाटले मी "उगाचच" लिहून दिली आहे म्हणून त्यांनी केली नाही. परंतु दोन महिन्यांनी त्यांचा त्रास वाढला असता ते हिंदुजा रुग्णालयात गेले तेथे हि चाचणी केल्यावर त्याना प्रोस्टेटचा कर्करोग झाला आहे हे समजून आले. असे अनुभव माझ्या सर्व डॉक्टर मित्रांना येतात.

३) एखाद्या रुग्णाला आपण आपला मधुमेह( किंवा रक्तदाब) नियंत्रणात ठेवला पाहिजे असे सांगणे यात काही गैर आहे असे मला वाटत नाही कारण मधुमेहामुळे मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो आहे हे सोनोग्राफीत लवकर समजून येऊ शकते त्यामुळे जर मधुमेह नियंत्रणात ठेवला तर भविष्यात मूत्रपिंडे निकामी होण्याचा धोका टाळू शकतो. दुर्दैवाने १४०, १८,, २४० हे केवळ आकडे आहेत आणि रुग्णाला त्याचा दृश्य परिणाम दिसत नाही. स्त्रिया एक हजार रुपये देऊन आपल्या भाची/पुतणीच्या लग्नासाठी फेशियल करून घेतात तेंव्हा त्यांचा चेहरा आठवडाभर उजळ दिसतो असा दृश्य परिणाम मधुमेह "नियंत्रणात ठेवला असता" काहीच दिसत नाही. त्यामुळे १०० रुपये खर्च करून चाचणी करण्याची तयारी बरीच रुग्णांची दिसत नाही.

मध्यम वर्गीय माणसे आपल्या कारचे/ मोटार सायकलचे नियमित सहा महिन्यांनी सर्व्हिसिंग करून घेतात कारण त्याचा महिन्याचा हप्ता भरावा लागतो. परंतु शरीर आपल्याला फुकट मिळालेले आहे म्हणून आपण त्याची किंमत करत नाही.

उपाशी बोका's picture

18 Mar 2019 - 10:51 am | उपाशी बोका

डॉक्टरसाहेब, तुमची तळमळ समजली. पेशंटला आवडो वा नको, पटो वा न पटो, तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे सांगितले ते बरेच केले. नंतर पेशंट काय करायचे ते बघून घेईल.

मुळात अपेक्षा अशी असते की डॉक्टरने जादूची कांडी फिरवून पेशंटला क्षणात बरे करावे. गंमत म्हणजे पेशंट आधी नीट लाइफस्टाइल ठेवत नाही, बकाबका खाणार, व्यायाम करणार नाही, चालणे करणार नाही, दर वर्षी चेकअप करणार नाही, अगदी गळ्याशी आल्यावरच डॉक्टरकडे जाणार, इंटरनेटवर काहीतरी वाचून स्वतःवरच प्रयोग करणार. असे असले की सगळा दोष डॉक्टरचा कसा? याउलट सगळेच डॉक्टरपण संत-महात्मा आहेत असे मी म्हणणार नाही. कट-प्रॅक्टिस, अनावश्यक ट्रीटमेंट वगैरे अनेक प्रकार चालतात, नाही असे नाही. टाळी दोन्ही हाताने वाजते.

मुळात स्वतःचा जीव व्यवस्थित सांभाळणे, जेवणावर ताबा ठेवणे, दरवर्षी वेळच्यावेळी चेकअप करणे आणि वेळ पडलीच तर डॉक्टरकडे एक प्रोफेशनल म्हणून बघणे (जर त्याचा सल्ला पटला नाही तर दुसर्‍या डॉक्टरकडे जाणे) हे जास्त सयुक्तिक आहे, असे मला वाटते आणि मी तसेच करतो. नशीबाने आत्तापर्यंत बहुतेक वेळा चांगलाच अनुभव आला आहे.

ता.क. माझ्या अख्ख्या खानदानात कुणीही डॉक्टर नाही.

शाम भागवत's picture

14 Mar 2019 - 9:39 am | शाम भागवत

डाॅक्टरांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा हवाच. त्यात चवीपुरता परखडपणा घालायला काहीच हरकत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Mar 2019 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

या बाबतीत मी नशिबवान होतो. आमचे पंडीत डॉक्टर त्यांचा सल्ला ऐकला नाही तर सरळ दवाखान्यातुन हकलून द्यायचे. मी एकदा त्यांच्याशी वाद घालायचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी मला "मी डॉक्टर आहे, तेव्हा तुला जर बरे व्हायचे असेल तर माझे ऐकलेच पाहिजे आणि जर ऐकायचे नसेल तर दुसरा डॉक्टर बघ" असे सुनावले होते. अर्थात या बोलण्यात उद्धट पणाचा लवलेशही नव्हता.

मी त्यावेळी अंगात ताप असताना माझे ऑफिसला जाणे कसे महत्वाचे आहे ते त्यांना सांगत होतो आणि ते मला दोन दिवस विश्रांती घ्यायचा सल्ला देत होते.

तुसडेपणाने, तुटक किंवा नको एवढे मध लावून अघळपघळ बोलणारे डॉक्टर आणि पेशंट च्या हिताचा विचार करत परखड पणे बोलणारे डॉक्टर यांच्यातला फरक सहज पणे लक्षात येउ शकतो.

परखड बोलणार्‍या डॉक्टर कडे पुन्हा पुन्हा जायला काहि वाटत नाही कारण अशा लोकांची तळमळ लगेचच लक्षात येते. आणि ज्या लोकांच्या एवढी साधी आणि स्वतःच्या हिताची गोष्ट लक्षात येत नसेल त्यांच्यासाठी इतर डॉक्टर आहेतच की.

पैजारबुवा,

उपेक्षित's picture

14 Mar 2019 - 3:16 pm | उपेक्षित

उत्तम लेख,

तुमचा लेख वाचून सदाशिव पेठेतील (भावे स्कूलजवळ)गोखले डॉक्टर आठवले (आत्ता हयात नाहीत) जाम तासायचे ऐकले नाही कि त्यांचे, पण जुन्या पिढीतील तळमळीचे डॉक होते.

शाम भागवत's picture

24 Mar 2019 - 12:36 am | शाम भागवत

सहमत

ज्योति अळवणी's picture

14 Mar 2019 - 4:49 pm | ज्योति अळवणी

तुम्ही स्पष्ट बोललंच पाहिजे डॉक्टर. ऐकायचं की नाही हे पेशंटवर सोडा. तुमचा सल्ला ऐकून स्वतःला सांबाळणारेच जास्त असतात

जयन्त बा शिम्पि's picture

14 Mar 2019 - 8:31 pm | जयन्त बा शिम्पि

उत्तम लेख.

परखडपणा ठेवलाच पाहिजे. पेशंट ऐकत नाहीत किंवा या डॅाक्टकडे ट्रीटमेंट सांगितली जात नाही तेव्हा आपण दुसरीकडे जाऊ हा विचार करणारेही बरेच आहेत.

नाखु's picture

14 Mar 2019 - 9:01 pm | नाखु

दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांनी दिलेल्या अत्यंत सुखद आणि कमालीची फसवणूक करुन दु:खद अनुभव पुन्हा एकदा जागे झाले.
कट प्रॅक्टिस मुळे केलेली जीवघेणी फसवणूक सिद्ध करु शकत नाही याचे शल्य कायमचं उरात राहील.

अक्षरक्षः प्रसंगी पदरमोड करून रुग्णांची तपासणी करणार्या दिवंगत होमिओपॅथी डॉक्टरांचा मुलगा नाखु पांढरपेशा

सस्नेह's picture

15 Mar 2019 - 5:05 pm | सस्नेह

लेखनातील कळकळ पोचली.
सरळमार्गी आणि नाखू यांच्याशी १०१ टक्के सहमत. कट प्रॅक्टिसवाला डॉक्टर कसा ओळखायचा ?
माझे दोन अनुभव सरळमार्गी यांच्यासारखेच आहेत.
१. गेल्या ऑगस्टमधली गोष्ट. स्टमक इन्फेक्शन मुळे दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हावे लागले होते. कट प्रॅक्टिसची महती माहिती असल्याने मोठ्या हॉस्पिटलऐवजी भावाच्या ओळखीचे डॉक्टर गाठले. दुपारी गेल्या गेल्या रक्त इ. टेस्ट्स बरोबर इसीजी घेतला गेला. पोटात इन्फेक्शन आणि जुलाब असताना इसीजी घेण्याचे कारण काही कळले नाही. पण असो म्हटले.
सलाईनमधून औषधे सुरु केल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता अटेंडंट आला आणि पुन्हा काही टेस्ट्स करायच्या आहेत चला म्हणू लागला. मी म्हटले दुपारी सगळ्या टेस्ट्स झाल्या आहेत, आता पुन्हा काय ? तर म्हणे इको टेस्ट. मी म्हटलं कुणी सांगितली करायला ? तर म्हणे मोठ्या डॉक्टरांनी. मी चिठ्ठी पाहिली. हृदयासाठी इको टेस्ट असे दिसले. मला कळेना माझा हार्टचा काहीच प्रॉब्लेम नसताना हे कशासाठी ? शिवाय अशा महत्वाच्या टेस्ट्स सहसा सकाळी करतात किंवा इमर्जन्सी असेल तरच लगेच. आता रात्री नऊ वाजता तातडीने ही टेस्ट घेण्याचे काय कारण ?
मी म्हटले डॉक्टरांशी मी याबाबत आधी बोलल्याशिवाय मी टेस्ट करणार नाही आणि इतक्या रात्री तर मुळीच नाही. मग तो गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर बिझी होते. संध्याकाळी सातला पुन्हा अटेंडंट हजर. मी पुन्हा तसेच सांगितले. मग रात्री आठ वाजता डॉक्टर राउंडला आले. मी विचारले तर म्हणाले अहो, तुमच्या हार्टचे ठोके जरा व्यवस्थित वाटत नाहीत तर तुमची इको टेस्ट करणे आवश्यक आहे. मी म्हटले आत्ता या घटकेला तर मला हार्टचा काहीच त्रास होत नाही आणि याआधी कधीच झालेला नाही. शिवाय माझे रुटीन चेक अप असते त्यातही कधी दिसले नाही. आणि मी इथे स्टमक इन्फेक्शनच्या उपचारासाठी आले आहे मला अन्न पोटात ठरत नाहीये, आत्ता जबरदस्त वीकनेस आहे, ते तर आधी कमी येऊ दे. त्यावर म्हणाले की अहो तुम्ही माझ्या इथे अ‍ॅडमिट आहात आणि रात्रीतून तुम्हाला अ‍ॅटॅक आला तर माझ्यावर जबाबदारी आहे. मी म्हटले की मला आत्ताच लगेचच काही तपासणी करणे आवश्यक वाटत नाही. मी नंतर करेन . तर ते माझ्यावर दबाव टाकू लागले की ही तपासणी आत्ता लगेचच करणे आवश्यक आहे. अखेर मी म्हटले की मी लिहून देते की असे काही झाले तर तुम्ही नाही तर मी स्वत: जबाबदार असेन. मग गप्प झाले आणि निघून गेले.
चार दिवसांनी मला डिस्चार्ज देताना त्यांनी मला पुन्हा आठवण केली . मी नंतर येईन म्हटले.
नंतर मला समजले की सदर डॉक्टरांचा मुलगा हृदयाचा स्पेशालीस्ट असून नुकतेच त्याने या टेस्टचे महागडे मशीन घेतले आहे. अपरात्री तपासणी करण्याचे कारण म्हणजे तो दिवसभर एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि संध्याकाळी सात वाजता पिताजींच्या हॉस्पिटलात पेशंट पाहतो.
२. एका जवळच्या मैत्रिणीला अचानक युरीनचा त्रास होऊ लागला. बहुधा स्टोन होता. अक्यूट पेन्स असल्यामुळे सोनोग्राफी केली. त्यात काही दिसत नव्हते. गायनॅक मॅडम नी मग युरोवाल्याकडे पाठवले. तोवर पेन्स कमी आल्या होत्या. पण शंका नको म्हणून जा म्हणाल्या. स्टोन पडून गेला असावा. तरीही युरोवाल्याने एमआर आय करायला सांगितले. (साडेचार हजार फक्त.) अर्थात तोही रिपोर्ट निलच आला. पण शंका नको म्हणून करणे आवश्यक होते, इति डॉक्टर. मैत्रीण वैतागली आहे.
'खरे' कळकळीचे डॉक्टर आणि कट प्रॅक्टिसवाले ओळखण्यासाठी आता आम्हाला धन्वंतरीने दिव्य दृष्टी द्यावी !!

सस्नेह's picture

15 Mar 2019 - 5:40 pm | सस्नेह

त्यानंतर आजवर मला हृदयाशी संबंधित कसलाही त्रास झालेला नाही.

नाखु's picture

16 Mar 2019 - 9:56 am | नाखु

इतके हृदयस्पर्शी अनुभव आल्यामुळेच ते ठणठणीत झाले असावे.

अंदाजपंचे मित्रमंडळाचा सभासद वाचकांची पत्रेवाला नाखु

उपाशी बोका's picture

18 Mar 2019 - 11:01 am | उपाशी बोका

माझ्या सासऱयांच्या बायपासला नीतू मांडके या प्रसिद्ध डॉक्टरने त्या काळी 1.5 लाख रुपये कॅशमध्ये लाच मागितले होते (मूळ बिलाव्यतीरिक्त) आणि जे द्यावे लागले होते.

मी असे लिहिले तेव्हा एका सदस्याने म्हटले:
<<< नीतू मांडके यांचा उल्लेख नको होता. त्यांनी घेतले असतील की नाही हा मुद्दा नाही पण काही सज्जड पुरावा नसताना उगाच बदनामी नको. बाकी मूळ बिलाव्यतिरिक्त कोणी जास्त पैसे घेईल असे वाटत नाही. बीलातलाच काही भाग तसा घेतला असण्याची शक्यता आहे. मेडीकल इन्सुरन्स असेल तर हे प्रकार टाळता येतात. >>>

यावर माझे उत्तरः
उगाच बदनामी नाही, स्वतःच्या हातानी पैसे दिले की अजून पुरावा लागत नाही. उलट लोकांना पण कळावे की त्यांचे पाय पण मातीचेच, म्हणून मुद्दाम नाव घेतले आहे. ते बिलाचे पैसे न्हवते, तर ऑपरेशनची तारीख मिळावी म्हणून मागितलेली लाच होती नाहीतर बिल द्यायची तयारी असूनही तारीख मिळणार नाही असे सांगितले.

काळाचा महिमा कसा असतो बघा? बायपास झाल्यावर इतक्या वर्षांनी पण माझे सासरे अजून हयात आहेत आणि कॅशमध्ये पैशाची लाच घेणारा नितू मांडके हा प्रसिद्ध डॉक्टर ५५ व्या वर्षीच हृदयविकारानेच गेला.

इंशुरन्स आहे म्हणून जास्त बिल लावणे वाईटच, पण हे असे कॅशमध्ये जास्त पैसे उकळणे हा अधिक भयंकर प्रकार आहे माझ्या मते.
(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

उपाशी बोका's picture

18 Mar 2019 - 11:04 am | उपाशी बोका

माझ्या सासऱयांच्या बायपासला नीतू मांडके या प्रसिद्ध डॉक्टरने त्या काळी 1.5 लाख रुपये कॅशमध्ये लाच मागितले होते (मूळ बिलाव्यतीरिक्त) आणि जे द्यावे लागले होते.

मी असे लिहिले तेव्हा एका सदस्याने म्हटले:
{{ नीतू मांडके यांचा उल्लेख नको होता. त्यांनी घेतले असतील की नाही हा मुद्दा नाही पण काही सज्जड पुरावा नसताना उगाच बदनामी नको. बाकी मूळ बिलाव्यतिरिक्त कोणी जास्त पैसे घेईल असे वाटत नाही. बीलातलाच काही भाग तसा घेतला असण्याची शक्यता आहे. मेडीकल इन्सुरन्स असेल तर हे प्रकार टाळता येतात. }}

यावर माझे उत्तरः
उगाच बदनामी नाही, स्वतःच्या हातानी पैसे दिले की अजून पुरावा लागत नाही. उलट लोकांना पण कळावे की त्यांचे पाय पण मातीचेच, म्हणून मुद्दाम नाव घेतले आहे. ते बिलाचे पैसे न्हवते, तर ऑपरेशनची तारीख मिळावी म्हणून मागितलेली लाच होती नाहीतर बिल द्यायची तयारी असूनही तारीख मिळणार नाही असे सांगितले.

काळाचा महिमा कसा असतो बघा? बायपास झाल्यावर इतक्या वर्षांनी पण माझे सासरे अजून हयात आहेत आणि कॅशमध्ये पैशाची लाच घेणारा नितू मांडके हा प्रसिद्ध डॉक्टर ५५ व्या वर्षीच हृदयविकारानेच गेला.

इंशुरन्स आहे म्हणून जास्त बिल लावणे वाईटच, पण हे असे कॅशमध्ये जास्त पैसे उकळणे हा अधिक भयंकर प्रकार आहे माझ्या मते.
(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

सुबोध खरे's picture

25 Mar 2019 - 9:19 pm | सुबोध खरे

बोका साहेब

नितु मांडकेच नव्हे तर बरेचसे हृदय शल्य क्रिया तज्ञ असे टेबलाखालून पैसे घेत असत. याचे कारण हृदय शल्य क्रिया तज्ञ छोट्या रुग्णलयात काम करू शकत नसत आणि मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात अनेक वेळेस त्यांची पिळवणूक होत असे/होते आहे.

रुग्णाला एकूण साडे तीन ते चार लाख बिल लावले असताना खूप अनुभव असलेल्या सर्जनलासुद्धा २० ते २५,००० रुपयेच मिळत असत आणि जबाबदारी १००%. त्यातूनही जर सर्जन ने रुग्णाला सवलत द्या म्हणून सांगितले तर ते पैसे त्याच्या सल्लागार शुल्कातूनच कमी केले जात असत.

यामुळे बरेच चांगले हृदय शल्य क्रिया तज्ञ हे स्वतःचे रुग्णालय काढण्याच्या प्रयत्नात होते. यात डॉ देवी शेट्टी. डॉ नरेश त्रेहान, डॉ रमाकांत पांडा आणि डॉ नितु मांडके होते. बाकी तिघांनी आपापली रुग्णालये काढली आणि ती आता उत्तम केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु या प्रयत्नात डॉ नितु मांडके उरी फुटून त्यांचा देहांत झाला.

डॉ सुधांशु भट्टाचार्य हे सुद्धा असे रोख पैसे घेत असत असे ऐकले होते.
परंतु काही काळानंतर त्यांनी रुग्णांना सरळ माझे शुल्क अमुक तमुक, रुग्णालयाचे बिल तुम्ही भरायचे असे स्वच्छ सांगायला सुरुवात केली होती. हिरानंदानी रुग्णालयात असताना (२००६) माझ्या समोर एका रुग्ण कडून त्यांनी ५ लाखाचा चेक घेतला आणि रुग्णाने हॉस्पिटल चे साडे तीन लाख बिल नंतर भरले.

आता प्रथितयश डॉक्टर स्वच्छ पणे असे चेकने पैसे घेतात असे ऐकिवात आहे आणि यात काही गैर नाही असे मला वाटते.

ब्रीच कॅण्डी या पंच तारांकित रुग्णालयात डॉक्टर आपले शुल्क कितीही घेऊ शकत असे( शकतात). त्यातील २५ % रुग्णालय कापून बाकी रकमेचा चेक डॉक्टरला मिळत असे.

रोहिंग्टन नरिमन हे प्रथितयश वकील जे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत ते केवळ केस पेपर वाचायला ८ लाख रुपये डिमांड ड्राफ्ट ने घेत. केस मध्ये दम असेल तर आपला मीटर चालू. अन्यथा ८ लक्ष रुपयांनी खिसा खाली करून घरी जायचे.

सुबोध खरे's picture

15 Mar 2019 - 7:31 pm | सुबोध खरे

अशी स्थिती झाली आहे हे दुर्दैव.
मुतखडा असलेल्या सर्वच्या सर्व रुग्णाना मी दिवसात ३ ते ४ लिटर पाणी पिण्यास सांगतो तेंव्हा बऱ्याच लोकांना आवर्जून सांगावे लागते कि मी तुम्हाला सांगतो आहे त्यात माझा पाच पैशाचा फायदा नाही. मी तुम्हाला माझ्याकडचं जडीबुटी चं औषध घ्या आणि मला पाच हजार रुपये द्या असे सांगता नाहीये. पाणी तुम्हाला फुकट मिळतं. ते भरपूर प्रमाणात पिऊन आपली लघवी पातळ ठेवली तर आपले मुतखडा होण्याचे प्रमाण ८० % ने कमी होईल.

वाईटात वाईट काय होईल? तुम्हाला काहीही फायदा होणार नाही.नुकसान काय? चार वेळेस लघवीला जायला लागेल सोडलं तर.

एखादा डॉक्टर चांगला सल्ला फुकट देत असेल तरी लोक आताशा संशयाने पाहायला लागले आहेत.

चौकटराजा's picture

17 Mar 2019 - 9:38 pm | चौकटराजा

येथील सुबोध खरे साहेब व आपल्याला समाजात इतरत्र दिसणारे डॉक्टर यात एक फरक मला असा दिसतो की खरे यान्ची जडण ही हव्यास हा विषय घेऊन झालेली नाही. त्यामुळे ते समाधानी आहेत . याचा फरक त्यान्च्या लेखनात ही दिसतो. मला कित्येक वेळ वाटत राहाते की चिन्चवड हून जाउन त्याच्याकडे सल्ला घ्यावा. कारण मला पेशन्ट आटपायचे आहेत हा त्याचा अप्रोच नसावा असे दिसते. एम डी लोकाकडून कशी घाई चाललेली आहे ते स्पश्ट आहे ! मला एक तरूण डोक्टर म्हणाला होता... एम डी ला डेली प्रक्टीस मधे रस कमी असतो ,त्याचे खरे लक्श्य असते होस्पिटलाय्सेशन !

शाम भागवत's picture

17 Mar 2019 - 11:59 pm | शाम भागवत

हव्यासाच माहित नाही.
पण ते अप्रामाणिकपणे पैसे मिळवणार नाहीत.
ते आपल्या कामाशी प्रामाणिक असतात व इतरांकडूनही प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात. (जो हल्ली दुर्मिळ झालाय. :) )
अशी माझीतरी समजूत आहे.

ट्रेड मार्क's picture

18 Mar 2019 - 7:32 am | ट्रेड मार्क

दुर्दैवाने विश्वास ठेवता यावा असे डॉक्टर आता दुर्मिळच आहेत.

पण याला अजून काही बाजू आहेत असं वाटतं. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे ते आता जवळजवळ नामशेष झाले आहेत. जे सध्या क्लीनिक उघडून बसले आहेत ते पण ते सुद्धा टेस्ट करवून घेतातच. कदाचित पेशंट म्हणून आपणच या बदलाला कारणीभूत झालो असू का? कुठलंही स्पेशलायझेशन नसलेल्या साध्या एमबीबीएस डॉक्टरकडे जाणं हे थोडं डाउनमार्केट वाटणं आणि त्यांनी ५-१० रुपये फी वाढवली की फारच महाग वाटणं या गोष्टीनी ट्रिगर म्हणून काम केलं असावं का?

रुग्णाला काही बरंवाईट झालं तर डॉक्टरला दोषी धरून जागीच मारहाण आणि नासधूस होते. अर्थात सरळमार्गी आणि स्नेहांकिता म्हणले तसं अगदीच संबंध नसलेल्या चाचण्या करायला सांगू नये. आपल्यालाही लवकर बरं व्हायची घाई असते. सर्दी ताप आला की एका दिवसात बरं वाटलं पाहिजे. मग डॉक्टरही प्रतिजैविके देतात, ज्याचे पुढे वाईट परिणाम होत जातात. नाही एक-दोन दिवसात बरं वाटलं की मग लगेच डॉक्टरच्या मागे लागणे किंवा स्पेशालिस्टकडे जाणे.

दुसरं म्हणजे कॉलेजची अवाढव्य फी आणि लागणारा वेळ बघता डॉक्टर होणे हीच एक खर्चिक बाब आहे. बरं सध्या नुसतं एमबीबीएस होऊन चालत नाही, त्यापुढे एखादं स्पेशलायझेशन लागतंच. ते झाल्यावर हॉस्पिटलमध्ये नोकरी केली तर कामाच्या तुलनेत पगार कमी मिळणे. तसेच स्वतःचे क्लीनिक व हॉस्पिटल उघडायचे म्हणजे अजून मोठी गुंतवणूक आणि परत पुरेसे पैसे मिळण्याची गॅरंटी नाही. अश्या दुष्टचक्रात ते सुद्धा अडकले असावेत. त्यामुळे जमेल तसे पैसे हापसायचे अशी वृत्ती झाली आहे. त्यातून काही लोकही आंतरजालावरून संशोधन करून डॉक्टरलाच सूचना करतात.

थोडक्यात सिस्टीम अशी तयार होत गेली आहे की आता त्यात सगळेच भरडले जात आहेत. यात डॉ. खऱ्यांसारख्या प्रामाणिक डॉक्टरकडे पण काही लोक संशयाने पहात असतीलच. असं कसं तुम्ही आम्हाला मुतखड्यावर उपाय म्हणून नुसतं पाणी प्यायला सांगता, काहीच औषध देत नाही अशी तक्रार करणारे पेशंटपण असतील. आम्ही फक्त स्पेशालिस्टकडेच जातो किंवा सगळ्या टेस्ट करून घेतल्या २५-५०००० खर्च आला पण आम्ही सहज करू शकतो म्हणून शेखी मिरवणारे पेशंट पण असतील.

सरळमार्गी's picture

18 Mar 2019 - 8:28 am | सरळमार्गी

या धाग्यावर विषयांतर झालेच आहे तेव्हा या संधीचा लाभ घेऊन याच विषयावरच्या आणखी एका पैलू वर लिहावेसे वाटले.
आजकाल बहुतेकांचे मेडीकल इन्शुरन्स असतात , जेव्हा असा इन्शुरन्स असलेल्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात दाखल केले जाते तेव्हा ‘इन्शुरन्स’ आहे का हा प्रश्न हमखास विचारला जातो, इन्शुरन्स आहे असे सांगीतले की त्या रुग्णाच्या केस पेपर वर एक विषीष्ठ खूण केली जाते आणि मग प्रत्येक उपचाराच्या (तपासण्या, औषधे , सलाईन्स, बँडेज, नर्सिंग , रुम सर्व्हिस , व्हिजीट फी इ) बाबतीत चढे दर लावले जातात, ज्या उपचाराची नेहमीचे चार्जेस ३०० असतील तर इथे आता ५०० लिहले जातात, इतकेच नव्हे तर दोन सलाईन च्या बाटल्या चढवल्या असताना चार चढवल्या असे खोटेचे नोंदवले जाते जाते , थोडक्यात जिथे त्या रुग्णाचे एकंदर बील ३५,००० व्हायला हवे ते आता ५०,००० होते. काही रुग्ण (किंवा रुग्णाचे नातेवाईक) शंका घेतात तेव्हा त्यांना ‘ तुम्ही कशाला काळजी करता, इन्शुरन्स आहे ना? ते देतील पैसे!” असे समजावले जाते. पण प्रत्यक्षात असे होते नाही. इन्शुरन्स कंपनी काही येडी नसते , त्यांच्या कडे डॉक्टरंची फौज दिमतीस असतेच , ते बीलातले प्रत्येक कलम डोळ्यात तेल घालून तपासतात, जादा / चढे दर, अनावश्यक उपचार अशी कलमेखड्या सारखी वगळली जातात आणि शेवटी जरी ५०,००० चा क्लेम असला तरी इन्शुरन्स कंपनी त्यातला रास्त म्हणजे ३०,००० ते ३५,००० इतकाच खर्च मान्य करते ! हॉस्पीटल (आणि डॉक्टर !) हात वर करुन मोकळे होतात , त्यांचे म्हणणे एकच “आमचे बील ५०,००० , ते आम्हाला मिळालेच पाहीजेत !” , इन्शुरन्स कंपनी म्हणते “ पॉलीसीच्या टर्मस आणि कंडीशन्स नुसार आम्ही केलेल्या दाव्याची संपूर्ण रक्कम अदा करण्यास बांधील नाही , आमच्या इंव्हेस्टीगेशन टीम ने जी रक्कम योग्य ठरवली आहे तितकेच पैसे आम्ही देणार !” शेवटी रोग्याला पदरचे १५,००० भरावे लागतात. खोटी बिले तयार केली हॉस्पीटल ने पण फटका बसला तो रुग्णाला !

‘इन्शुरन्स आहे ना मग वाढवा बील‘ ह्या वृत्तीने रोग्याचे दुहेरी नुकसान होते आहे , एकतर पदरचे पैसे घालून बील सेटल करावे लागते आणि डॉक्टरांच्या / हॉस्पीटल्स च्या असल्या घाणेरड्या कर्मा मुळे इन्शुरन्स चे प्रीमीयम दणकून वाढले जात आहेत.

सुबोध खरे's picture

18 Mar 2019 - 11:25 am | सुबोध खरे

आरोग्य विमा असेल तर मोठ्या रुग्णालयांचे दर जास्त लावले जातात हे अर्धसत्य आहे.
बऱ्याच वेळेस काय होते कि आपला आरोग्यविमा असेल तर रुग्णालयात त्यांना सांगितले जाते कि साहेब तुमच्या विम्यात स्पेशल रुम तुम्हाला मिळू शकते (ENTITLED) आहे. मग माणूस ट्वीन शेअरिंग ऐवजी सिंगल रुम मध्ये जातो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीवर जास्त दर लागतो. याचे आर्थिक गणित मांडताना चौफुट जागेप्रमाणे दर लावले जातात. दुप्पट जागा घेतली तर दुप्पट दर. ( हॉटेल मध्ये जसे इकॉनॉमी, स्पेशल, डिलक्स रूमचे दर वेगवेगळे असतात किंवा वातानुकूलित तिसरा दुसरं आणि पहिल्या दर्जाचे दर वेगवेगळे असतात)
विमा कंपन्यांचा यात चावटपणा असु शकतो. कारण विमा विकताना माणसाला सिंगल रूमची ENTITLEMENT/ लालूच दाखवली जाते. पण प्रत्यक्ष इतर दर मात्र ट्वीन शेअरिंगचे असतात. यात विमा घेताना ५ साईझ फॉण्टच्या ५ पानी "अटी आणि शर्ती " तुम्हाला वाचायला देतात, ज्यावर आपण( यात मीही आलोच) न वाचता सही करतो. मग जेंव्हा प्रत्यक्ष रुग्णालयाचे पैसे भरायला जातो तेंव्हा आपल्या खिशाला चाट बसते.
त्यातून रुग्णालयात विमा असलेला रुग्ण पैशाची जास्त फिकीर करीत नाही म्हणून अशा चाचण्याही केल्या जातात ज्या "केल्या तर उत्तम पण नाही केल्या तरी चालेल". रुग्णाच्या खिसातून काहीच जाणार नसते म्हणून ते अशाला विरोध करीत नाहीत.
डॉक्टर, रुग्णालय, विमा कंपन्या यांची "अर्थ" लालसा आणि ग्राहकाची पैसे न देण्याची किंवा फुकट ते पौष्टिक आणि मिळेल तितके पदरात पडून घेण्याची वृत्ती हा सर्व चक्रव्यूह आहे आणि यातून कुणाची सुटका होईल असे मला वाटत नाही.
अशीच स्थिती इतर "सर्वच क्षेत्रात" आहे.

चौकटराजा's picture

18 Mar 2019 - 4:43 pm | चौकटराजा

नुकताच मी अर्थात नेटवर एक लेख वाचला . त्यात अशी बाजू मांडली होती की....... एम आर आय चे यन्त्र ५ कोटी किमत. त्यात भर बदलाव्या लागणार्या उपकरणाची भर , ए सी , रूमचे भाडे,तज्ञाचा पगार, ई विचार करता २४ तासास २० तरी एम आर आय झाले तरच ते युनिट फायद्याचे ठरते. अशावेळी केस जर विमा धारित असेल तर शक्य आहे की अनावश्यक एम आर आय काढून था २० एम आर आय चा कोटा पूर्ण करणे. यात रुग्णालयाची मजबूरी असावी .आपल्या दुर्दैवाने सामान्यातला प्रधान मन्त्री व्हायला ७० वर्शे लागली. स्टेन्ट , अपघात विमा असे विषय आता घेऊन कुठे सुरूवात होते आहे. यात भर पडून पुढे सी टी मशीन , एम आर आय मशीन यात काही फरक होईल अशी आशा करू या.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 6:53 pm | सुबोध खरे

चौ रा साहेब

एम आर आय चे "ब्रेक इव्हन" हे भारतात साधारण १० स्कॅन ने होते. यानंतर नफा आणि ५ वर्षात यंत्र बदलण्याचा खर्च यामुळे शहराप्रमाणे १५ ते २० एम आर आय स्कॅन दिवसात करावे लागतात.

( अमेरिकेत १ स्कॅन रोज केल्यास ब्रेक इव्हन होते अशा सिमेन्स आणि फिलिप्स च्या जाहिराती अमेरिकन जर्नल्स मध्ये मी पाहिल्या आहेत कारण तेथे आपल्या तुलनेत एका एम आर आय स्कॅन चा खर्च किती तरी पट आहे

(२५०० ते ३००० डॉलर्स/ १ लाख ७५ हजार ते २ लाख रुपये)

the average cost of an MRI in the U.S. is $ 2,611--

http://money.com/money/2995166/why-does-mri-cost-so-much/

एम आर आय चे यंत्र २४ तास थंडच ठेवावे लागते कारण त्याचा मुख्य चुंबक - (उणे) २७० अंश सेल्सियस ( ३ अंश केल्व्हिन) या तापमानाला ठेवावा लागतो यामुळे एम आर आय च्या केंद्राचे विजेचे बिलच वातानुकूलन यंत्रणेमुळे ३-४ लाख पर्यंत जाते. सरकार अशा केंद्रांना उद्योगाला लावतात तसा व्यापारी दर लावतात ११ रुपये युनिट ला.
शिवाय हि यंत्रे संपूर्णपाने आयात करावी लागतात त्याला आयात शुल्क सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. पूर्वी हे २८ % असे आता ते २०. ४ % आहे.
त्यामुळे चार कोटीच्या यंत्रावर पूर्वी १.२ कोटी आयात शुल्क होते ते सध्या ८० लाख झाले आहे.

सरकार असे केंद्र चालवणाऱ्याला कोणतीही सवलत देत नाही

अशा केंद्राला जागा पण फार लागते आणि मुंबई पुण्यात जागांचे भाव तर आभाळाला भिडले आहेत.

शिवाय त्याचे चुंबक फार शक्तिशाली असते त्यामुळे त्या चुंबकाचा प्रभाव बाहेर होऊ नये यासाठी चुंबक विरोधी कवच/ कोष निर्माण करावा लागतो. आणि या कोशात चुकून प्रवेश केला तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/patients-relative-sucked...

त्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर सरकारी नियंत्रणे आणि नियम असतात.

त्यातून यंत्राचा घसारा आणि त्यात सतत होणारे बदल यामुळे यंत्र अद्ययावत ठेवण्यात किंवा ५ वर्षात यंत्र बदलण्यात येणारा खर्च हा सर्व प्रकार फार खर्चिक असतो. त्यातून "रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट" हे इतर उपकरणे/ प्रयोगशाळा पेक्षा एम आर आय मध्ये फार कमी आहे.

या सर्वातून सुटका होणे सध्या तरी दूरचे दिवे दिसत आहेत.

< असं परखड बोलावं कि नाही या संभ्रमात मी आहे.>

परखड बोलायला हुशारी लागत नाही. लागत असेल तर थोडेफार धैर्य असावे लागते.

रॅपोसाठी हुशारी लागते कारण तिथे समोरच्या व्यक्तीशी जोडले जाणे महत्त्वाचे असते. डॉ० असुन तुम्हाला हे समजु नये, याचे आश्चर्य वाटते.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 11:28 am | सुबोध खरे

माझ्या बद्दल फारशी माहिती नसताना उगाच स्कोअर सेटल करायला टिप्पणी करता आहात यावरून तुमची मनोवृत्ती दिसून येते आहे.
बाकी पास

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 5:29 pm | युयुत्सु

तुमची मनोवृत्ती दिसून येते आहे.

तुमची मनोवृत्ती माझ्या धाग्यावर दिसली आहेच

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 6:23 pm | सुबोध खरे

तेच सांगतोय
स्कोअर सेटलिंग साठी इथे आलात हे स्वच्छ दिसतंय.
अरेरे !! हुशार माणसाचं इतकं अध: पतन

उपेक्षित's picture

22 Mar 2019 - 6:33 pm | उपेक्षित

@ युयुत्सु अनावश्यक टिप्पणी, कृपया आवरा स्वतःला आणि मिसळपावचा दर्जा टिकवा.

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 7:00 pm | युयुत्सु

त्यांनी माझ्या मनोवृत्तीवर कोणत्या अधिकारात टिप्प्णी केली. माझ्या धाग्यावर जो मूर्खपणा चालला होता तेव्हा मिपाचा दर्जा कुठे जात होता. म्ह० यांनी पायावर पाय द्यायचा आणि मी ओय म्हणायचे नाही असेच ना?

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 7:06 pm | सुबोध खरे

डॉ० असुन तुम्हाला हे समजु नये, याचे आश्चर्य वाटते.
आपण मला किती ओळखता?

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 7:09 pm | युयुत्सु

जी काय ओळख झाली आहे, त्यातुन फारसे मत चांगले नाही. इतके परखड पणे नक्की सांगू शकतो.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 7:21 pm | सुबोध खरे

बढिया है !

आपल्या मताचा आदर आहे __/\__

उपेक्षित's picture

23 Mar 2019 - 1:14 pm | उपेक्षित

@ युयुत्सु मी फ़क़्त विनंती करू शकतो आणि तीच मी केलीये. मिसळपाववर वैचारिक मतभेद बरेच पहिले आहे पण ते त्या त्या धाग्यापुरते ठेवावे.
डॉक चे पण चुकते आहे मान्य आहे कारण ते तुमच्या मागे हात धुवून का लागले आहेत ते काळात नाहीये आणि ते पण इतक्या खालच्या थरावर.

असो, वैचारिक मतभेद वैचारिक पातळीवर सोडवण्याइतके आपण दोघे प्रगल्भ नक्कीच आहात सो तुमच्या दोघांच्या लेवलवर वाद मिटला तर आम्हाला बरेच आहे.

बाकी तुम्हा दोघांची मर्जी.

डॉक, तुम्ही जे योग्य तेच करताहात. फक्त जीवापाड प्रयत्न करूनही रुग्ण ऐकत नाही ही तुमची बोच आहे. त्यावर खरंच काही सांगावं एवढी माझी कुवत नाही. पण या अनुषंगानं एक श्रीमहाराजांची आठवण सांगाविशी वाटते. "हृद्य आठवणी" या पुस्तकात ही आठवण आहे. [सगळी वाक्यं जशीच्या तशी आठवत नाहीत त्याबद्दल क्षमस्व]

एका प्रथितयश डॉक्टरांनी श्रीमहाराजांना सांगितले की, "आजकाल लोक स्वतःच सांगायला लागतात की अमुक औषध हवे म्हणून. कधीकधी तर हट्टही करतात. एक डॉक्टर म्हणून मला जे योग्य वाटेल तेच औषध मी दिले पाहिजे. असे असतांना ह्या अशा मागण्यांमुळे फार त्रास होतो."
श्रीमहाराज म्हणतात, "रोग कुणा औषधानं बरा होतो हे मानणं मुळात तितकंसं बरोबर नाही. त्या-त्या माणसाचा प्रारब्धाचा भोग असतो.. तो भोगून संपला की रोग बरा होतो. असो. तुमच्या अडचणीवर साधारण उपाय म्हणजे -
१. जर रुग्णानं मागितलेलं औषध अपायकारक असेल तर सपशेल नाही म्हणून सांगावं.
२. जर अपायकारक नसेल तर प्रमाणात घेऊ द्यावं, श्रद्धेनं साधी सुंठ औषध म्हणून घेतली तरीही बरं वाटतं.
पण असे किती लोक तुमच्याकडे येतात?"

"दिवसाला एखादा तरी असतोच असा." - डॉक्टर.
श्रीमहाराज म्हणतात, "बास? एवढ्यातच तुम्ही वैतागलात? माझ्याकडे येणार्‍यात १०० पैकी ९९ असेच असतात जे त्यांना काय हवंय आणि तेच कसं बरोबर आहे ते सांगून, मी ते द्यावं अशी अपेक्षा करतात. मग मी काय करावं बरं?"
"..." - डॉक्टर
"असं झालं तर मी त्या व्यक्तीला प्रथम मला जे योग्य वाटतं ते सरळ सांगतो. त्यानंतरही जर हट्ट केला तर त्याचं प्रारब्ध त्याला खेचतं आहे हे मला स्पष्ट दिसतं. मग तसं करून पहावं असं मोघम उत्तर देणं मला भाग पडतं. त्यात ही रामाची लीला म्हणून मी मधे पडत नाही."

असो. सहज आठवल्यामुळे लिहिलं. विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व.

राघव

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 7:05 pm | सुबोध खरे

राघव साहेब
श्री महाराजांसारखे स्थितप्रज्ञ होणे आमच्या सारख्या अतिसामान्य माणसांना या जन्मात जमेल का हा एक विचार येतो.
असे सत्पुरुष हे एखाद्या दीपस्तंभासारखे असतात ज्याच्या प्रकाशात आमच्या सारखी जहाजे वाट शोधत असतात.
परवा एक उत्तर भारतीय माझ्याकडे बायकोची पाळी आली नाही म्हणून तपासायला आला होता. त्याच्या बायकोला गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग होऊन तो योनीमार्गातून बाहेर डोकावत होता. त्या माणसाला कर्करोग असण्याची शक्यता सांगितली तर त्याने मला "पाळी येण्याचे काय ते सांगा" सांगितले. मी त्याला सांगितले आणि लिहून दिले कि तुम्हाला ओटीपोटाचा CT SCAN करावा लागेल तेंव्हा तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवा सांगितले.

काल त्याच्या डॉक्टरांचा फोन आला ज्यात तो त्या डॉक्टरना आणि मला नीट उपचार न करता दुसरंच सांगतात म्हणून दोष देत होता. त्याच्या डॉक्टरनी त्यांना परवडत नसेल तर टाटा ला जाऊन उपचार करा असे कळकळीने सांगूनही काही उपयोग झाला नाही.
१४ आणि १० वर्षाची मुले असलेली या स्त्रीचे पुढे काय होणार हे परमेश्वराला ठाऊक.
हा तिचा आणि तिच्या नवऱ्याचा आणि अर्धवट वयाच्या दोन्ही मुलांचा प्रारब्ध योग हि वस्तुस्थिती आहे.
(कारण मुळात असा रोग ३७ वर्षाचा स्त्रीला झाला का याचे उत्तर प्रारब्ध योग म्हणूनच द्यावे लागेल).
परंतु अशा गोष्टींचा जीवाला त्रास होतोच. यातून सुटका नाही.
श्री महाराजांइतके स्थितप्रज्ञ राहणे फार कठीण आहे आणि आपण किती क्षुद्र आहोत याची पदोपदी जाणीव होत राहते.

विनिता००२'s picture

23 Mar 2019 - 10:12 am | विनिता००२

स्त्रियांचे आजार आणि इलाज हा एक वेगळाच विषय आहे.
माझ्या सासुबाईंना डायबेटीना झाला. कारणे बरीच होती. पण डायबेटीस झालाय हे कळल्यावर पण दिनक्रमात काही फरक पडला नाही.

गावाकडे घरात सासू सासरे दोघेच! सासरे जास्त जेवायचे नाहीत, पण स्वयंपाक मात्र भरपूर करायला लावायचे. मग शीळे उरायचे. ते बरेचदा सासूबाई संपवायला बघायच्या. सकाळी लवकर काही खाणे नाही. वर सासर्‍यांची कटकट...कधी स्वयंपाक उरला म्हणून, कधी डायबेटीसचा त्रास जाणवायला लागला म्हणून...
सासूबाई त्यातच गेल्या. :(

राघव's picture

23 Mar 2019 - 9:35 pm | राघव

खरंय डॉक. आपण सगळेच अतिसामान्य. त्यामुळे त्रास होतोच. पण डॉक्टर म्हणूनसुद्धा एखाद्यावर उपाय सुरु केल्यावर देखील फळ मिळायला वेळ लागतोच की.
तात्पर्य हे की उपायासाठीचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. उपरोक्त आठवणीचा सारांश हा सामान्य माणसासाठीच असल्यामुळे, श्रीमहाराज तेच सांगतील जे सामान्य माणसाला झेपेल.
स्थितप्रज्ञता हे संतांचे काम होय. ते विशेष काम होय. ते व्हायचे असते, ठरवून होता येत नाही.
माझ्यामते श्रीमहाराज, कर्तेपण आपले नाही हे आपल्या मनावर बिंबवताहेत. त्यातून आपण हळूहळू अंतर्मुख होत शिकत जातो. अर्थात् त्यासाठी आपल्याकडून थोडा प्रयत्न मात्र व्हायला हवा.

असो, हे सगळे सांगण्यासाठी मी पात्र नाही. त्यासाठी आधी स्वतः थोडी तरी प्रगती केली पाहिजे, ज्याची इथे सगळी वानवाच आहे. अहो पाणी घड्यात आहे आणि घडा घरात आहे हे फक्त माहित असून काय उपयोग हो.. शेवटी उठून पाणी घेऊन प्यायले आपणच पाहिजे ना. तद्वतच.

राघव