स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५
स्मृतीगंध-६
गोरेगावात नाना जेथे राहत होता त्याच्या शेजारीच अण्णा बिवलकर आणि विद्वांसदादा यांचा कोळशाचा कारखाना होता. सुटीच्या दिवशी मी बरेचदा नानाकडे जात असे. तेथे अण्णा व दादांशी ओळख झाली. पुढे नानाजवळ बिवलकरांनी "हा मुलगा कोण? काय करतो? शिक्षण किती ? " अशी चौकशी केली आणि एक दिवस नानाकरवी मला आपल्याकडे बोलावून घेतले. वरळीच्या वसंतविजय मिलमध्ये काम करशील काय? अशी विचारणा त्यांनी केली. रात्रपाळी, तसेच कोणतेही काम करावे लागेल हे सांगितले. मी दुसर्या चांगल्या नोकरीच्या शोधात होतोच. रोजंदारीवरच्या प्लास्टीक कं पेक्षा ही मिल बरी.. असे म्हणून बिवलकरांबरोबर मिलमध्ये गेलो. त्याच दिवशी ३ ते १२ अशा रात्रपाळीवर मला रुजू करून घेतले आणि माझी मिलमध्ये कामाला सुरुवात झाली. मोठमोठ्या चाकंवाल्या पेटार्यात कापडाची ठाणे भरुन ती एका डिपार्टमेंटमधून दुसर्या डिपार्टमेंटमध्ये नेण्याचे काम मी तेथे करू लागलो. मॅट्रिक होऊनही हे काम करीत राहिल्याबद्दल तेथील इतर लोक मला टोकत असत. पण दुसरी अजून चांगली नोकरी मिळेपर्यंत मला इथे राहणे क्रमप्राप्तच होते. महिना पूर्ण झाल्यावर एकही खाडा न केल्यामुळे १२२ रु. पगार मिळाला. आनंदाने उड्या मारीतच मी अण्णाकडे आलो आणि अण्णावैनीला पगार दाखवला.त्या दोघांनाही फार आनंद झाला.
१२०रु पगारातून मी घरी साधारण ४०रु पाठवित असे. खानावळ आणि पासाचा खर्च सोडला तर माझा खर्च फारसा नसेच.पण मधल्या बेकारीच्या काळात मी अण्णाचे ८००रु. देणे होते. तो मात्र म्हणे," तुला अजून चांगली नोकरी लागली की मग माझे पैसे दे,घाई नाही." मग मी दुसर्याच महिन्यात मोहन बिल्डींगमध्ये जी.सी.डी. म्हणजे गव्हर्नमेंट कमर्शिअल डिप्लोमा (इन कॉमर्स) साठी क्लास लावला. त्याची फी दरमहा १५रु आता ह्या पगारातून देणे शक्य होते. संध्याकाळी ६॥ ते ८॥ अशी त्याची वेळ होती. मिलमध्ये सांगून मी सकाळी ८ ते ४ ची ड्यूटी घेतली. एकीकडे बर्व्यांकडे टाइपिंग व शॉर्टहँड चालू होतेच. बर्वे मला वेळ ऍडजेस्ट करून देत असत. शॉर्टहँडची १०० शब्दांची आणि टाइपिंगची हायर प्रोफिशन्सीची परीक्षा मी एकीकडे पास झालो.बर्व्यांनी मग मला त्यांच्या क्लासमध्ये १५रु. पगारावर इनस्ट्र्क्टर म्हणून काम पाहण्यास सांगितले.
सकाळी तासभर क्लास करुन मी वरळीला मिलमध्ये जात असे. ४ वाजता मिल सुटली की परत बर्व्यांकडे क्लाससाठी येत असे. ६॥ च्या जीसीडीच्या क्लाससाठी तेथूनच जात असे. तेथून परत इनस्टिट्यूट मध्ये येऊन क्लास बंद करुन ९ च्या सुमारास जेवावायास मुगभाटात जात असे. मिल वरळीला आणि हे दोन्ही क्लास तसेच अण्णाचे घर, मुगाभाटातील खानावळ गिरगावात चालत ५,१० मिनिटाच्या अंतरावर असल्याने वेळेचे गणित बसवणे शक्य झाले. असे जवळजवळ २ वर्षे ,अगदी नेमकेच सांगायचे तर २३ महिने चालू होते.
अशातच एकदा बर्व्यांनी ग्रांटरोडच्या एका पारशी वकिलाकडे डिक्टेशन घेण्याकरता मला पाठवले. सकाळी सात वाजता त्याचेकडे जावयाचे. साधारण अर्धा तास डिक्टेशन घेऊन परत क्लासमध्ये यायचे आणि टाइप करुन साडेनऊच्या आत त्यास नेऊन द्यायचे असे १५,२० दिवस चालले. बरोब्बर टाइपिंग झाले की पारशीबावा ५रु देत असे. ह्या कामामुळे मिलमध्ये खाडे होऊ लागले आणि तासाभराच्या कामाला ५रु मिळून दिवस दुसरे काम करण्यास मोकळा मिळू लागला म्हणून मग मिलमध्ये जाणे मी बंद केले आणि सबंध दिवस बर्व्यांच्या क्लासमध्येच काम करू लागलो. बर्वे टाइपिंगची बाहेरची कामेही आणत असत. सिंगल लाइन एक पान बिनचूक टाइप केले की ते २ आणे देत . अशी १५,२० पाने दिवसाला मिळत असत. हे काम क्लासमध्ये बसूनच मी करीत असे. १००रु च्या आसपास पैसे मिळू लागले पण हे बाबूकाम मिळाल्यामुळे गाड्या ढकलण्याचे मिलचे काम बंद केले. असे ५,६ महिने गेले.
म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर जोशी नावाचे एक गृहस्थ होते.बर्वे आणि ते एकाच बिल्डिंगमध्ये राहत असत. त्यांच्या बँकेत जागा रिकाम्या होत्या. जोशांनी बर्व्यांना क्लासमध्ये कोणी होतकरु मुलगा आहे काय अशी विचारणा केली असता बर्व्यांनी त्यांना माझे नाव सुचवले. जोशांबरोबरच मी फोर्टातील बँकेत गेलो. तेथील एका खुर्चीवर त्यांनी मला बसावयास सांगितले. समोर काऊंटर होता. श्री.गोडबोले म्हणून तेथे अकाउंटट होते. त्यांना सांगितले, हा माणूस तुम्हाला दिला आहे. ह्याचे नाव मस्टरवर घाला आणि रुजू करून घ्या. परीक्षा नाही,इंटरव्ह्यू नाही, एवढेच काय अपॉईंटमेंट लेटर सुध्दा नाही. पगार दरमहा १२०रु. आणि मी टाइपिंग करत असे म्हणून टाइपिंग अलाउन्स १५रु असे १३५ रु मिळत. सकाळी लवकर आणि संध्याकाळी बँकेतून आल्यावर साधारण ९ पर्यंत इनस्टिट्यूट चालू होतीच. त्याचेही १५रु मिळत, असे १५०रु महिना आमदानी झाली. खूप काही मिळत आहे असे वाटू लागले. तिकडे कोकणात मुलांची शिक्षणे चालू होती. प्रभाकरही एव्हाना मॅट्रिक पास झाला.
प्रतिक्रिया
18 Mar 2009 - 12:34 pm | भिडू
सुंदर लेखन.... नेहमी पुढचा भाग कधी येतो याचीच वाट बघत असतो.
18 Mar 2009 - 12:47 pm | सुक्या
नेहमी पुढचा भाग कधी येतो याचीच वाट बघत असतो.
खुप छान जमलाय.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
18 Mar 2009 - 9:25 pm | chipatakhdumdum
सहमत..
18 Mar 2009 - 1:05 pm | सहज
मागच्या भागातील खडतर संघर्षानंतर ह्या संधी, यश वाचताना आनंद झाला.
वाचतो आहोत.
18 Mar 2009 - 1:18 pm | छोटा डॉन
सहजरावांशी सहमत आहे ...
आम्ही आपल्या पुढच्या भागाची नेहमीच वाट पहात असतो. लिखाणाची शैली ओघावती असल्याने कधी वाचुन संपते ते कळत नाही. त्यामुळे लगेच "पुढे काय" ह्याची उत्कंठा वाढत राहते ...
आम्ही वाचतो आहोत, अजुन येऊद्यात ...!
------
( वामनसुतांचा फॅन ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
18 Mar 2009 - 1:21 pm | अवलिया
अजुन येऊद्यात ...!
--अवलिया
18 Mar 2009 - 2:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या भागांची वाट पहात आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
18 Mar 2009 - 9:31 pm | प्राजु
+४
अजून येऊद्यात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Mar 2009 - 1:12 pm | विद्याधर३१
कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.
विद्याधर
18 Mar 2009 - 1:19 pm | घाशीराम कोतवाल १.२
एव्हड सगळ करुन देवाने तुम्हाला चांगली संधी दिलि
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
18 Mar 2009 - 6:59 pm | लवंगी
आता कळल तुम्ही इतके लवकर आणि सुंदर कसे टंकता. काका, तुम्ही एक छानसे पुस्तकच प्रकाशित करा. आजकाल इतके सुंदर लेखन अतिशय दुर्लभ आहे. एक मिपाकर म्हणून मिपावर इतके सुंदर लेखन वाचायला मिळते याचा अतिशय अभिमान वाटतो. पण हे लेखन पुढच्या पिढीपर्यन्त पोहोचायला हवे. म्हणून तुम्ही तुमच्या 'स्मृतीगंधाच्या आठवणी' नक्की प्रकाशित करा.
18 Mar 2009 - 7:09 pm | रेवती
सगळे भाग नियमितपणे येताहेत.
त्याबद्दल धन्यवाद!
मिपावर आल्याबरोबर आधी आपल्या लेखाचा पुढचा भाग आलाय का हे बघितले जाते आजकाल.
रेवती
18 Mar 2009 - 8:37 pm | मानस
मी सुद्धा असेच करतो. सगळेच भाग फारच सुरेख व सहज सोप्या भाषेत आहेत. हल्ली मॅचच्या स्कोरच्या ऐवजी "स्मृतीगंध" चा पुढच्या भाग आला आहे की नाही हे पहातो.
असेच रोज नविन भाग येऊ द्यात.
18 Mar 2009 - 7:14 pm | शितल
हा भाग ही मस्त :)
18 Mar 2009 - 8:47 pm | ललिता
आज एका दमात सर्व भाग वाचले. मनाला भिडले याहून जास्त काय सांगू? भाषा अगदी समोरासमोर बसून कहाणी ऐकावी अशी...
त्या काळात कष्ट करायला लोक तयार असत कारण अगदी कमी संधी मिळत असत. पडेल ते काम बरीच मंडळी करत असत. गावाकडील भावंडांना, आईवडिलांना गरिबीतून वर काढणे व त्यासाठी अमाप कष्ट करणे ही त्यावेळी कोकणी कनिष्ठ मध्यमवर्गातल्या कर्त्या पुरुषांची मानसिकता होती... माझ्या वडिलांची देखिल थोड्याफार फरकाने अशीच कहाणी आहे. स्वतःची योग्यता व शिक्षण वाढवण्यासाठी त्या पिढीला आटापिटा करावा लागत होता. त्यांच्या कष्टावरच आम्ही सुखी जीवन जगतो आहोत हे मी कधीच विसरू शकत नाही!
18 Mar 2009 - 8:51 pm | क्रान्ति
खूप छान वाटल वाचून. खरच पूर्ण स्मृतीगंध प्रकाशित व्हायला हवा आहे. नव्या पिढीला माहिती मिळेल.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
18 Mar 2009 - 9:09 pm | लिखाळ
फार छान लेखन.. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
-- लिखाळ.
18 Mar 2009 - 9:13 pm | चतुरंग
आता मला 'स्मृतिगंध' वाचायची चटक लागली आहे! :)
चतुरंग
19 Mar 2009 - 12:12 am | समिधा
मी पण रोज नविन भाग वाचत आहे. अजुन खुप येउद्यात.
19 Mar 2009 - 5:03 am | मदनबाण
पुढचा भागाच्या प्रतिक्षेत...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
19 Mar 2009 - 10:13 am | अप्पासाहेब
बरोब्बर टाइपिंग झाले की पारशीबावा ५रु देत असे ...
त्या काळात ५ रु ही 'य' अथवा 'ट' रक्कम असेल , तेव्हा पारशीबावा ५रु देत असे पटत नाही..
बर्वे देत असलेला २ आणे / बिनचूक टाइप पान हा रेट वास्तव वादी वाटतो.
ज्या काळी मॅट्रिक नापास हे सु द्धा एक मोठ्ठे क्वालीफिकेशन ठरत असे त्या काळात ए़खादा मॅट्रिक पास , तो सुद्धा ५१% मार्क्स वाला काही महिने बेकार राहावा हे पट्त नाही, किंबहुना ते अशक्य कोटितले वाट्ते .
19 Mar 2009 - 3:12 pm | वामनसुत
आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कोणास पटो वा न पटो ह्या आठवणींमध्ये कोणताही कल्पनाविस्तार नसून जसे घडले आहे तेच लिहिले आहे. जीवनात येणारे बरेवाईट अनुभव स्वीकारुन ,त्यातून शिकून पुढे जाणे महत्त्वाचे.
धन्यवाद.
21 Oct 2013 - 7:16 am | स्पंदना
स्मृतीगंध-८ " आम्ही मिळवते झालो.."