स्मृतीगंध-६ "चाकरीसाठी मुंबईत.."

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
17 Mar 2009 - 12:32 pm

स्मृतीगंध-१
स्मृतीगंध-२
स्मृतीगंध-३
स्मृतीगंध-४
स्मृतीगंध-५

टिपूर झाले तरी मी व्हेळातच होतो. हरिभाऊंशी बोलल्याप्रमाणे वारंगोळे करुन कुळिथ लावून झाले होते. बाकीच्या भावंडांची शिक्षणे राजापुरात चालू होती. वहिनी तिथे मुलांना घेऊन राहत होती तर मी आणि आई व्हेळातली शेती पाहत होतो. राजापुरातले बिर्‍हाड एका खोलीचे ,तेथे दूध विकत घ्यावे लागे तर घरात म्हैस होती. मग मी सोमवारी दूध,दही घेऊन व्हेळ-राजापूर १५ मैल अंतर चालून जात असे.गाडीभाड्यासाठी पैसे कुठे असत? आठवड्यातून एकदा तरी पोहे,तांदूळ असे जिन्नस तेथल्या बिर्‍हाडाकरता घेऊन जाई. वहिनी सोवळी होती. तिचा सारा स्वयंपाक सोवळ्यातला असे. सोवळ्याचे पोहे,तांदूळ, पापड असे जिन्नस तिस राजापूरात कोठून मिळणार? मग आई घरी सोवळ्याचे जिन्नस करे आणि सकाळी उठून ,आंघोळ करुन मी सोवळ्याने इतर कोठेही न शिवता,पायात चपला घातल्याशिवाय राजापूरास ते घेऊन जात असे. असे दिवस चालले होते.

एक दिवस आई म्हणाली ,"अरे,असे इथे किती दिवस काढणार आहेस? बाहेर कुठे नोकरी पाहणार आहेस की नाही?" माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. व्हेळात राहून जास्त काही करता येणार नाही तर आपण राजापूरास जावे. ते तालुक्याचे ठिकाण आहे, आपले बिर्‍हाडही तेथे आहे.काहीतरी हातपाय मारता येतील तर पहावे. हे आईला सांगणार तर एवढ्यात तिवर्‍याचे श्रीकृष्ण पाध्ये आमचेकडे आले आणि मज म्हणाले भांबेडातील शाळेत मास्तर हवा आहे. तू माझ्याबरोबर भांबेडास चल. व्हेळापासून भांबेड ५ ,७ मैल.दुपारची जेवणे झाल्यावर आम्ही भांबेडास जायला चालतच निघालो. संध्याकाळ झाल्यावर कुडूवाडीस फणसळकरांकडे मुक्काम केला. सकाळी उठून भांबेडास जायचे तर सकाळी ते म्हणाले आज आपण परत जाऊया, परत दोन दिवसांनी येऊ.मग काय? परत घरी येण्यास निघालो. वाटेत ते मला म्हणाले ," मास्तरची नोकरी करू नको." परत व्हेळास का जायचे? मास्तरची नोकरी का करायची नाही? हे विचारण्याचे धाडस मजकडे नव्हते. मी आपला निमूटपणे त्यांचेबरोबर घरी परत आलो. दुसर्‍या दिवशी ते तिवर्‍यास निघून गेले आणि मी राजापूरास गेलो. गाडीतळाजवळ शिरवलीचे तात्या ठाकूर भेटले. ते उद्याच मुंबईस निघाले होते. मला अण्णाकडे नेऊन सोडावयास ते तयार झाले होते.

दुसर्‍या दिवशी १२ च्या गाडीने मुसाकाजीला जाऊन बोटीने मुंबईला जाण्याचे ठरले. घरी वैनीस सांगितले पण आईला सांगावयास हवे होते. तिकिटासाठी पैसेही आणायला व्हेळात जाणे जरुरीचे होते. मी व्हेळात जाऊन आईला मुंबईस जाण्याचे सांगावयास जातो आहे हे तात्यांच्या कानावर आले. तात्यांनी मला आईसाठी चिठी लिहून देण्यास सांगितले. त्यांच्या गाडीवानाबरोबर चिठी आईकडे पोहोचती झाली असती. पण उताराचे (तिकिटाचे) पैसे कोठून आणणार? त्यावेळी बोटीचे तिकिट होते ८रु. तात्यांना हे कळल्यावर ते मजवर ओरडले,"पैशाचे काय घेऊन बसलास? चल मुकाटपणे." दुसर्‍या दिवशी ११ वाजताच जेवून एका पिशवीत शर्ट,चड्डी घेवून मी गाडीतळावर हजर झालो. तेथे तात्या,त्यांची मुलगी आणि अण्णा पाध्येंची मुलगी आलेले होतेच. त्या दोघीजणांना मुंबईस दाखवावयास नेत होते. मुंबैत पोहोचताच तात्यांनी मला अण्णाकडे पोहोचते केले.

अण्णाने आपल्या ओळखीच्या लोकांस सांगून माझ्या नोकरीची खटपट सुरू केली. घरात बसून तरी काय करणार आणि आयते तरी किती दिवस जेवणार? म्हणून मग मी अण्णाच्या दुकानात पडेल ते काम करीत असे. दिवसभर नोकरी शोधणे आणि अण्णाच्या दुकानात काम करणे चालू झाले. त्याचेही घर म्हणजे गिरगावातील दोन खोल्या. तो,वैनी आणि ३ मुलांसह तो राहत असे. मी ग्यालरीत किवा गच्चीवर झोपत असे. असे ४,६ महिने गेले तरी नोकरीचा पत्ता नाही. मे महिन्याच्या सुटीत अण्णा,वहिनीचे कोकणात जाण्याचे ठरले. मलाही बरोबर नेण्यास अण्णा तयार होता पण नोकरी मिळाली नसताना घरी जाण्यास माझे मन तयार होईना. हो ना करता अण्णाचा धाकटा भाऊ यशवंता उर्फ नानाकडे गोरेगावास राहण्याचे ठरले. मुगभाटातील गजानन भोजनगृहात अण्णांनी माझी जेवणाची सोय केली. सकाळी गिरगावातील दुकानात येत असे. दुपारी व रात्री मुगभाटात जेवून रात्री गोरेगावात नानाकडे रहावयास जात असे पण फुकटचे जेवायची लाज वाटत होती. दिवस नोकरीच्या शोधात जात होता,प्रत्येक ठिकाणी अर्ज करत होतो पण उत्तर नाही.. नाही म्हणायला अण्णाच्या दुकानात काम करीत होतो पण खाणावळीचे पैसे अण्णाच देणार होता. नोकरी लागली की त्यांचे पैसे मी परत करणार होतो पण आज तरी माझ्या हातात काहीच नव्हते.

मी मग एकदाच जेवावयास सुरुवात केली. रात्री नानाकडे झोपायला गेल्यावर वहिनी जेवावयास विचारायची. तिला मी जेवून आलो आहे असे खोटेच सांगत असे. अण्णावैनी कोकणातून परत आले आणि मी ही गोरेगावातून गिरगावास येण्यास निघालो. त्या दिवशी खिशात फक्त ७ आणेच होते तर गोरेगावपर्ञंतचे तिकिट ८ आणे होते. मी ग्रँटरोडपर्यंतचे तिकिट काढले आणि चर्नीरोडला उतरलो आणि नेमके टीसीने त्या दिवशी मला पकडले. ९ आणे दंड मागू लागला. खिशात पैसा नव्हता तर ९ आणे देणार कोठून? मांगलवाडीतच मी राहतो,घरी जाऊन पैसे घेऊन येतो असे मी त्यास सांगितल्यावर त्याने मला तेथे चपला काढून ठेवावयास सांगितल्या. दंड भरल्यावर चपला घेऊन जाण्यास सांगितले. मी तसाच अनवाणी घरी आलो तर वैनी पोळ्या करीत होती. काही घडलेच नाही अशा स्थितीत मी दोन दिवस वावरत होतो. दुसर्‍या दिवशी मालाडला राहणारा अण्णाचा धाकटा भाऊ श्रीराम आला. त्यास आम्ही काका म्हणत असू. आम्ही दोघेजण चौपाटीला गेलो असता माझ्या पायात चपला नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि ही गोष्ट त्याने अण्णाच्या कानावर घातली. सकाळी गणपतीच्या देवळात गेलो असता तेथे चपला गेल्या अशी थाप मी मारली तेव्हा काकाजवळ पैसे देऊन अण्णाने माझ्यासाठी चपला घेऊन येण्यास सांगितले.

पुढे काही दिवसांनी काकाने इंडियन प्लास्टीक कं त नोकरी असल्याचे सांगून केतकर नावाच्या गृहस्थांकडे नेले. त्या कंपनी त प्लास्टीकच्या बाहुल्या तयार करत असत. त्यांचे डोईवरील केस काळ्या रंगाने रंगवणे हेच काम होते. मला काहीतरी काम हवेच होते. मी तेथे नोकरीला सुरूवात केली. सकाळी ९ ते ६ ही कामाची वेळ,दुपारी तासभर जेवणाची सुटी असे. रोजचा १रु.१० आणे मिळत.रविवारी सुटी असे पण रविवारचा पगार मिळत नसे. २६ दिवसाचे ४२,४३ रु मिळत पण फुकटचे खातो आहे असे तरी वाटत नसे. खानावळीचा खर्च ३०रु. आणि पासाचे ६ रु. एवढाच खर्च.. बाकी ३,४ रु उरत असत. असे ६ महिने काढले. त्यावेळी कधी दुपारी तर कधी रात्री असे एकदाच जेवत असे आणि खाणावळीचे पैसे वाचवित असे. पैशासाठी शक्यतो अण्णा किवा इतरांकडे तोंड न वेंगाडता जगत होतो. रात्री घरी आल्यावर अण्णावैनी जेवावयास विचारीत पण मी तेथेही जेवून आलो आहे असे खोटेच सांगत असे.संध्याकाळ मोकळी होती त्यामुळे बर्वेंच्या मॅजेस्टिक शॉर्टहँड -टाइपरायटिंग इनस्टिट्युट मध्ये क्लास लावला. त्याची ४ महिन्याची फी १६ रु. होती. दिवसा इंडियन प्लास्टीक आणि संध्याकाळी टायपिंगचा क्लास असे दिवस जाऊ लागले.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 12:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

वामनराव खुप सोसलत मुंबईत येउन खरच तुमच्या लिखाणावरुन अस वाटत आहे
एक वेळ जेउन अस दुसर्‍याच्या घरी राहुन तुम्ही खुप खस्ता खाल्ल्या अस्तील राव
आजकाल कोनी नाहि करत ऍव्हड सख्या भावासाठी पण नाही करत
मानतो तुम्हाला आणी तुमच्या अण्णांना खरच

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2009 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण.

किती सोपं आयुष्य जगले/ते मी असं वाटलं.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

भिडू's picture

17 Mar 2009 - 12:56 pm | भिडू

मीही आयुष्य किती सोपं जगत आहे मी असं वाटलं.

शेखर's picture

17 Mar 2009 - 12:58 pm | शेखर

विशेष म्हणजे जगण्यासाठी इतकी प्रतिकुल परिस्तीथी होती तरी लेखनात कुठेही जीवनाविषयीचा सल जाणवला नाही.

सुंदर लिखाण..

शेखर

सहज's picture

17 Mar 2009 - 12:52 pm | सहज

जे काय वाचतो आहे, ते डोळ्याला दिसत आहे, समजत आहे पण कधीतरी संगणक नुस्ता घर्र आवाज काढत तापत असतो, स्क्रीन फ्रीज झाली असते, ना धड चालू असतो ना धड बंद होत असतो, तसे झाले आहे.

चार तास होत आले की आता काय खायचे हा विचार त्रस्त करत असतो.

मागे एकदा प्रवासात एका वयस्कर दांपत्याशी गप्पा मारताना, ते सांगत होते आमच्या लहानपणी (दुसरे महायुद्धाचा काळ) परिस्थीती इतकी बिकट होती, टंचाई होती, गरीबी होती की लहान मुलांना पुरेसे अन्न देउ शकु की नाही असे वाटायचे. आता नातवंडे सांभाळताना इतके जिन्नस त्यांच्या समोर आणून ठेवले असतात पण पुरेसे व योग्य खात नाहीत ही चिंता असते.

ही लेखमाला औरच!

नंदन's picture

17 Mar 2009 - 12:55 pm | नंदन

वरील प्रतिसादींशी पूर्ण सहमत आहे. 'भोगले जे दु:ख ज्याला'च्या पलीकडे जाऊन साध्यासरळ भाषेत, कुठल्याही उपदेशा/अभिनिवेशाशिवाय होतं ते असं होतं, हे मांडणारी तुमची लेखमाला - प्रत्येक भागागणिक अधिक आवडायला लागली आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रदीप's picture

18 Mar 2009 - 10:37 am | प्रदीप

म्हणतो. जे झाले त्याबद्दल कसलीही कटुता नाही, जे भोगले त्याबद्दल आक्रस्ताळीपणा न करता अत्यंत शांतपणे सांगणे, हे फारच भावले.

वाचतो आहे.

सुक्या's picture

17 Mar 2009 - 1:05 pm | सुक्या

हा भाग वाचुन अगदीच सुन्न झालो. तुमचा भुतकाळ पाहीला की आम्ही आता किती राजेशही जीवन जगतो आहोत हे वाटुन जातं.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

मदनबाण's picture

17 Mar 2009 - 1:07 pm | मदनबाण

अप्रतिम लेख मालिका.... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

दिपक's picture

17 Mar 2009 - 1:23 pm | दिपक

खरच अप्रतिम लेखमाला.

"लाईफ इज सफरींग" पेस्तनकाकांचे वाक्य आठवले. ही लेखमाला परत परत वाचायला आवडेल अशी.

शितल's picture

17 Mar 2009 - 7:10 pm | शितल

सहमत. :)

रेवती's picture

17 Mar 2009 - 6:42 pm | रेवती

प्रत्येक भाग वाचते आहे. दरवेळेस प्रतिक्रिया देतेच असे नाही.
साध्या भाषेत लिहिल्यानेच लेखन मनाला भिडते आहे.

रेवती

विसुनाना's picture

17 Mar 2009 - 7:16 pm | विसुनाना

"असे होते दिवस..." अशा नावाचे आत्मचरित्र वाचतो आहे असे जाणवत राहते.
अत्यंत प्रांजळ आणि वास्तव लेखन. खूप आवडले.
('हरून' अरुण वडुलेकरांची आठवण झाली. कुठे आहेत?)

कोणता काळ आहे हा? १९४०?५०?
या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा.

प्रदीप's picture

18 Mar 2009 - 10:58 am | प्रदीप

कोणता काळ आहे हा? १९४०?५०?

अगोदरच्या एका भागात ४४ साली सातवी (व्ह. फा.) झाल्याचा उल्लेख आहे. तेव्हा आता सुरू आहे तो चाळीशीच्या दशकाचा काळ असावा असे वाटते.

चतुरंग's picture

17 Mar 2009 - 8:11 pm | चतुरंग

हलाखी, गरिबी, कष्ट, शिक्षणाची हेळसांड, मुंबईची वाट धरणे, तिथल्या व्यवस्थेत स्वतःला बदलवून चिणून टाकणे हे सगळे प्रकार मला वाटते त्यावेळच्या कोकणवासियांसाठी थोड्याफार फरकाने अनुभवायला येत असावेत. असे जरी असले तरी प्रत्यक्ष अनुभवातून गेलेल्याकडून हे लिहिलेले वाचताना त्यातले बारकावे उमजतात. तुम्ही सांगितलेल्या कोकणातल्या जीवनमानाशी जुळणार्‍या घटना माझ्या आजोबांच्या तोंडून ऐकल्याचे आठवते.
तुलनेने अत्यंतिक सुखाच्या परमावधीत तर मी लहानपणापासून जगत नाहीये ना? असा प्रश्न मनात येतो आणि अस्वस्थता आणखीनच वाढते!

चतुरंग

लवंगी's picture

17 Mar 2009 - 8:16 pm | लवंगी

प्रत्येक भाग अधिकाधिक पकड घेतोय मनाची. पूर्विच्या पिढ्यांनी खूप सोसलय याची जाणिव होतेय.

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 8:29 pm | लिखाळ

वा.. हा भाग सुद्धा उत्तम. फार चांगली लेखमाला...

आम्ही दोघेजण चौपाटीला गेलो असता माझ्या पायात चपला नसल्याचे त्याच्या लक्षात आले आणि ही गोष्ट त्याने अण्णाच्या कानावर घातली. सकाळी गणपतीच्या देवळात गेलो असता तेथे चपला गेल्या अशी थाप मी मारली तेव्हा काकाजवळ पैसे देऊन अण्णाने माझ्यासाठी चपला घेऊन येण्यास सांगितले.

ह्म्म.. अश्यावेळी त्या चपला नकोत असेच वाटले असेल....पण स्वाभिमान जपण्यालासुद्धा पोषक परिस्थिती लागते असे अनेकदा वाटते.
-- लिखाळ.

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 9:00 pm | क्रान्ति

श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी वाचत असल्यासारख वाटत आहे. सहज, सोपी ओघवती भाषा आणि सुन्दर शैली यामुळे सगळ वर्णन अगदी प्रत्यक्ष एखाद्या चित्रपटाप्रमाणे समोर येतय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

प्राजु's picture

17 Mar 2009 - 9:24 pm | प्राजु

या रूपयांचं मूल्य तेव्हा किती होतं.. मी फारच सोपं आणि सहज जगले असं वाटतं आता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

18 Mar 2009 - 8:27 am | छोटा डॉन

>>.. मी फारच सोपं आणि सहज जगले असं वाटतं आता.
+१, असेच म्हणतो ...

आयला आमचे आयुष्य फारच सोपे आणि सुलभ होते असे वाटायला लागले आहे.
सुंदर लेखमाला, आंतरजालीय साहित्यातील एक वेगळ्याच धाटणीचा अनुभव म्हणुन जरुर ह्याची प्रशंसा केली जावी ...

जाता जाता :
आईनस्टाईनने गांधींबद्दल जसे उद्गार काढले त्याच धर्तीवर मी " कोणी एका काळी हाडामासाचा माणुस अशा प्रकारचे जीवन जगत होता ह्यावर कदाचित पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत" असे म्हणु इच्छितो ...
अर्थात माझा रोख त्या काळातल्या एकुणच कठिण असणार्‍या जीवनशैली व त्यासाठी कराव्या लागणार्‍या अत्यावश्यक तडजोडींवर आहे ...

अजुन येऊद्यात, आम्ही वाचतो आहोत ...

------
(वाचक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

उनाड's picture

18 Mar 2009 - 7:24 am | उनाड

या लेखनात स्वतःच्या जीवनविषयक अनुभवांसोबत समाजातील घडामोडींचे अथवा भौगोलिक परिस्थितीचे (जसे राजकीय घडामोडी, गोरेगावचा (मुंबईचा) त्यावेळचा विस्तार , बोट सर्विसची शिपिंग कंपनी इ.) वर्णन आले तर हे लेखन त्या काळातल्या समाजजीवनाचा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल. कृपया सूचनेचा विचार व्हावा.

वरील विसुनानान्च्या सूचनेचा जरून विचार व्हावा. खुपच सुन्दर लिहिताय तुम्ही. तुमचे लेखन एक अमुल्य ठेवा ठरेल पुढच्या पिढिसाठी.

सुनील's picture

18 Mar 2009 - 11:18 am | सुनील

कुठलाही अभिनिवेश न आणता केलेले सहज सुंदर कथन.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Mar 2009 - 11:49 am | बिपिन कार्यकर्ते

वाचायला खूपच मजा येत आहे.

अवांतर : त्या वेळच्या गोरेगावबद्दल अजून वाचायला खूपच मजा येईल.

(गोरेगावकर) बिपिन कार्यकर्ते

वामनसुत's picture

18 Mar 2009 - 6:06 pm | वामनसुत

आपणा सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

भांबेड, तिवरे या गावी मी जाउन आलो आहे. या भागाचे शहरीकरण न झाल्यामुळे अजून बकालपणा आला नाही आहे. अजूनही गावपण आहे. हे असेच राहावे असे वाटते.

गणपतीला कोकणात जातो तेव्हा एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.