कालच 'नाळ' पाहण्याचा योग आला. सुरुवातीच्या दृष्या बद्दल आणि त्याची 'फॉरेस्ट गम्प'शी तुलना यावर बरीच चर्चा झालीय. पण हा सीन निश्चित आवडून जाईल.
'सुधाकर रेड्डी यंकट्टी' यांनी 'देऊळ', 'हायवे' आणि 'सैराट' नंतर या चित्रपटाच्या कॅमेरा सोबत दिग्दर्शनाची धुरा पण सांभाळली आहे.
पहिल्या फ्रेम पासून हा चित्रपट सिनेमॅटोग्राफी चा आहे हे लक्षात येत.
चित्रपट थेटरात बघण्यासारखाच आहे, त्यामुळे जरूर बघा आणि सुरुवात अजिबात चुकवू नका.
Spoiler alert!
चित्रपटातील गावाकडची दृश्य, अप्रतिम कॅमेरा(बऱ्याच वेळा ड्रोन चा वापर केलाय बहुधा) आणि जबरदस्त नैसर्गिक अभिनय ह्या जमेच्या बाजू आहेतच. त्याबरोबर 'जाऊ दे ना व' हे गाणं आणि बच्चे कंपनीचा दंगा हे धुमाकूळ घालतंय, जेणेकरून चित्रपटाचा इतर subtle आशय न आवडणाऱ्या प्रेक्षकांना पण खेचून घेता येईल.
मला वाटतंय सगळं शूटिंग गोंदिया-भंडारा भागातील कुठल्या तरी गावातील आहे आणि त्या गावाशेजारची विस्तीर्ण वाळवंट असणारी नदी, आसपासचा बैलगाडी रस्ता आणि त्यावरची धूळ या सगळ्यामुळे एक 'वॉर्म' टच येतो जो रखरखीतपणा दाखवतो पण अगदी अंगावर नाही येत असं वाटलं.
चैत्या ची भूमिका करणारा 'श्रीनिवास' याने खूप भारी काम केलंय. त्याला आपण दत्तक असण्याबद्दल माहिती झाल्यानंतर झालेली घालमेल, निरागसपणे त्या प्रश्नाच्या उकलीसाठी केलेल्या उचापती, खऱ्या आईने परिस्थितीमुळे ह्याच्याकडे जाणूनबुजून केलेलं दुर्लक्ष आणि मग त्याचा हिरमोड/अपेक्षाभंग आणि आताच्या आईकडे परत येताना त्याची उमज हे सर्व स्थित्यंतर खूप भावणारं आहे.
याशिवाय 'देविका दफ्तरदार' यांनी पण एकदम नॉन-ग्लॅमरस भूमिका असून तीच सोनं केलंय! अनेक प्रसंगात त्या फक्त डोळ्यातून खूप काही बोलून जातात.
'दीप्ती देवी' यांनी छोटेखानी भूमिकेत ज्यामध्ये एकसुद्धा स्पष्ट संवाद नाही त्यामध्ये जीव ओतलाय.
या तिघांच्या भाव-विश्वाचा परमोच्च बिंदू असणारा एक क्षण आहे जेव्हा खरी आई लांब जातेय मागे दत्तक गेलेली आई वाट बघतेय आणि मध्ये रिकाम्या रस्त्यावर चैत्या रडत उभा आहे. निव्वळ अप्रतिम! मला तर वाटलं ह्या पॉइंटवर चित्रपट संपावा!
थोड्या वेळाने थोडा सुखद शेवट करून चित्रपट संपतो खरा, पण रूढार्थाने गोष्ट संपत नाही किंबहुना सगळ्या गोष्टींची उकल करून संपत नाही. बरेचसे प्रश्न अनुत्तरीतच राहतात पण चटका लावून जातो चित्रपट.
बऱ्याच लोकांना चित्रपट अपूर्ण ठेवलाय असं वाटणं साहजिक आहे पण ही त्या दिग्दर्शकाची मांडणी आहे हे लक्षात घ्यायला हवं माझ्यामते. मी कुठं तरी वाचलं होत की दिग्दर्शक किंवा कुठलीही गोष्ट हे फक्त एक तुकडाच दाखवत. कुठे थांबायच हे तो गोष्ट सांगणारा(इथे दिग्दर्शक) ठरवेल, त्याच्या आधी आणि नंतर बरंच काही असेल जे कधी आपण शोधावं लागत किंवा तसंच सोडून द्यावं, कारण बऱ्याच गोष्टींच्या अपूर्णतेतच आनंद असतो!
खूप नाट्य नाही, किंवा काहीच ग्लॅमरस नाही तरी पण चित्रपट भावतो. नागराज मंजुळे यात अभिनय करताहेत पण एखादा प्रसंग सोडला तर त्यांचा 'अभिनेता' म्हणून कस लागेल असा प्रसंग माझ्यामते यात नाही.
निश्चित बघा आणि आपली प्रतिक्रिया सांगा.
प्रतिक्रिया
20 Nov 2018 - 3:52 pm | कुमार१
चांगला परिचय .
देवीकाचे काम नेहमी छान असते.
20 Nov 2018 - 7:24 pm | उगा काहितरीच
ठीक आहे चित्रपट .
20 Nov 2018 - 7:32 pm | कंजूस
हे जे प्रसंग सांगितले आहेत ते काहींना भूतकाळात नेतील. चित्रपटाशी जोडले जातील. लोक अगदी डोक्यावर घेणार नसले तरी बरीच वर्ष सिनेमा चालेल.
20 Nov 2018 - 8:51 pm | समाधान राऊत
इमोशनल टच कमी वाटला , बहुदा आपण दत्तक घेतलेले मूल नाही आहोत म्हणून त्या बाजूने इतका भावनिक मी / दर्शक होऊ शकत नाही
20 Nov 2018 - 10:06 pm | ट्रम्प
दिग्दर्शक सिनेमा मध्ये शेवटच्या अर्ध्या तासात प्रेक्षकांना इमोशनली गुंतवून ठेवण्यात जास्त यशस्वी झाला आहे , मला सुद्धा चैतन्य ची खरी आई त्याच्या कडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष करते तो प्रसंग जास्त भावला .
21 Nov 2018 - 7:26 pm | खिलजि
आज जायचा बेत आहे . बघितल्यावर सांगतो प्रतिक्रिया ... तोपर्यंत कुठेही जाऊ नका , बघत राहा मिसळ पाव , शुभरात्री , शब्बाखैर आणि धन्यवाद ...
22 Nov 2018 - 10:55 am | महासंग्राम
चैत्या जे वय दाखवलंय त्या वयात मुलांना दत्तक वगैरे कितपत समजत असावं हि शंका वाटते.
चैतन्यचं जे वय दाखवलंय त्यात मुलांची आईशी असलेली अटॅचमेंट आणि चौकस बुद्धी जास्त असते. त्यामुळे बाहेरचा आलेला माणूस एकदम हि तुझी खरी आई नाही हे सांगतो आणि तो त्यावर कोणालाही न विचारता लगेच विश्वास ठेवतो हे हि जरा खटकते.
26 Nov 2018 - 4:47 pm | विनिता००२
मुलांची मनं नाजुक असतात.
माझ्या मुलाच्या बाबत त्त तील एक प्रसंग सांगते.
पावसाळ्यात गावाला गेलेलो. मी निळ्या रंगाची साडी नेसलेले. बसमधून उतरुन घरी जाईपर्यंत भिजलो. साडीचा रंग हातापायावर उतरला. मी कोरडे कपडे घालून बाहेर आल्यावर मुलाचे तिकडे लक्ष गेले. त्याने मला तू निळी कशी झालीस म्हणून विचारले. त्या वर्षी 'कोई मिल गया' नुकताच आलेला! मजा करावी म्हणून मी त्याला म्हटले की 'मी एलियन आहे. माझे यान मला घ्यायला येत आहे. आता मी हळू हळू निळी होत जाईन.'
त्याचा चेहरा क्षणात बावरला. तो एकटक माझ्याकडे पहातच राहिला. पुढे काही विचारायचे ही त्याला सुचेना. शेवटी मीच त्याला जवळ घेवून 'मजा केली रे!' म्हणून आश्वस्त करायचा प्रयत्न केला. पण त्या नंतर पण बरेचदा तो माझे हात, पाय निळे नाहीत ना? हे तपासत रहायचा.
22 Nov 2018 - 1:27 pm | खिलजि
नाळ ठीक वाटला ... पात्रे आणि त्यांची कामही चांगली होती पण चित्रपट असं विशेष काही सांगत नाही .. त्यातल्यातात देविकाने खूप सुरेख काम केलंय . फार फार आवडली मला ती त्यात .. १०० गुण माझ्यातर्फे ...
22 Nov 2018 - 2:54 pm | लई भारी
सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!
22 Nov 2018 - 9:28 pm | बाजीप्रभू
शॉर्टफिल्म ला शोभेल अशी कथा 2 तास ताणली की जो कंटाळा येतो तो हा सिनेमा पहातांना येतो..
शेवटच्या भागात... 'एकदाची ती आई दाखवा आणि संपवा एकदाचं' असं वाटायला लागतं इतका तो सीन ताणला आहे...
सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम....ऍनिमेशन टुकार, मुलाचं काम खूप छान.. देवकिताईंबद्दल प्रश्नच नाही...
29 Nov 2018 - 12:36 pm | वन
देविकाने खूप सुरेख काम केलंय . फार फार आवडली मला ती त्यात .. १०० गुण माझ्यातर्फे .>>> +११