स्मृतीगंध-२ "व्रतबंध"

वामनसुत's picture
वामनसुत in जनातलं, मनातलं
13 Mar 2009 - 3:57 pm

आठव्या वर्षी माझी मुंज करायचे ठरले.अंगण चोपून दारात मांडव घातला गेला.मांडव घालायला गावातले कुळवाडी आपणहून येत. जेवणावारी काम करीत असत. त्यांना अंगणात पत्रावळीवर भात, उडदाचे वरण नाहीतर कुळथाचे पिठले, लोणचे मिरची,पापड असे जेवण वाढले जाई.
कुंकुमाची बोटे लावून शुभचिह्ने काढलेल्या पत्रिकेस 'कुंकुमपत्रिका' म्हणत.पत्रिका छापून आणायचा काळ अजून यायचा होता.
एका स्वच्छ कोर्‍या कागदावर कुंकुमतिलकाने सुशोभित करुन काळ्या शाईत वळणदार मोडीत पत्रिका लिहिली गेली.
श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत त्रिभुवनमंडित जगत् चालक श्रीआर्यादुर्गादेवी यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना." अशा मायन्याने सुरुवात करुन " तरी त्यास स्वामींनी आपले गणासह परिवारे येऊन कार्यसिध्दी निर्विघ्नपणे तडीस न्याल अशी दासाची नियुक्ती आहे. सेवेसी श्रुत व्हावे ही विज्ञापना." असा शेवट असे.
घरच्या देवांना आणि गावातल्या देवळात तासेवाजंत्र्यासह गावातील चार प्रतिष्ठित मंडळीसह वाजतगाजत निमंत्रण दिले. नंतर गावातील प्रतिष्ठित घरात निमंत्रणासाठी लवाजम्यासकट सारे तासे वाजंत्र्यांच्या गजरात सारे गेले. अक्षत देऊन तोंडीच आमंत्रणे केली. लिखित पत्रिका फक्त देवाला! आमंत्रणाला गेले की ज्यांच्याकडे आमंत्रण करु त्यांनी नारळ द्यायची पध्दत होती. एक कुळवाडी सवाष्ण बाई हारा घेऊन ते नारळ उचलायसाठी सोबत असे. गावच्या पाटलाला आमंत्रण दिले की तो मग बाकी सार्‍या कुळवाड्यांना खबर देत असे.
लग्नमुंजीसारखी कार्ये ३ /४ दिवस आरामात चालत असत. कार्याआधी साधारण आठ दिवस सोवळ्यातले पोहे कांडले जात. दळणकांडण सारे घरातच असे. भात(तांदूळ) गरम पाण्यात २४ तास भिजवून ठेवत आणि दुसर्‍या दिवशी हार्‍यामध्ये (बुरडाची टोपली)ओतत. त्यावर आधणपाणी घालत आणि निथळत ठेवत. एका खापरामध्ये हे भात ओतत, त्यास एक भोक असे आणि त्यात एका दांड्याच्या एका टोकाला चेंडूसारखे करुनफडके गुंडाळून ठेवलेले असे. त्यास ढवळणा म्हणत. हे खापर चुलीवर ठेवत आणि दांड्याने म्हणजेच ढवळण्याने ढवळत असत. काही वेळाने फोलपटे निघावयास लागत व लाह्या फुटू लागत, ह्या लाह्या वायनात(उखळीत) घालून मुसळाने कांडित आणि एकीकडे पुढचा घाणा खापरात ओतत असत. हे काम करायला गावातल्या ब्राह्मणाच्या बायाबापड्या उत्साहाने येत असत. सोवळ्यातले पोहे करताना बायका शुचिर्भूत होऊन सोवळे नेसून हे काम करत. हे पोहे मग नेवैद्य,भटजीं आणि सोवळ्याने जेवणार्‍यांसाठी वापरित असत. पोह्यांबरोबरच कार्या अगोदर उडदाचे पापड,सांडगे,चिकवड्या इ. गोष्टीही एकत्र जमून करीत. ह्या करता विशेष ओव्या म्हणून वातावरण मंगल करत असत.
कार्याआधी चार आठ दिवस अगोदरपासूनच माहेरवाशिणी आणि इतर नातलगांची लगबग सुरु होई. कार्याचे उपाध्येही सहकुटुंब २/३दिवस अगोदरच तळ ठोकित असत.घर पाहुण्यारावळ्यांनी गजबजून जात असे.४०/५० माणसांचा घरात सहज राबता असे.
घरातील बायका रात्रीच्या शांत वेळी बुंदी पाडून लाडू करीत असत. मुंजीच्या भिक्षावळीचे खास लाडू शहाळ्याएवढे मोठाले करत असत.
आदल्या दिवशी ग्रहमुख आणि केळवण असे. घाटले म्हणजे कण्या,गूळ, खोबरे घालून केलेली खीर आणि वडे घारग्यांचा बेत असे. घरातील ओटीवर पाहुण्यांची पंगत बसत असे. पाट, केळीची पाने,प्रत्येकाचे निराळे तांब्याभांडे, रांगोळ्या,उदबत्त्या असा सगळा थाट असे तर इतर मंडळीची पाने मांडवात पत्रावळी मांडून वाढत असत. वाढपी, आचारी असे काहीच नसे,तर घरातल्या आणि व्हराडी मंडळीतल्या बायकाच पंगती घेऊन उष्टी काढण्यापर्यंतची सर्व कामे करीत असत. कार्याच्या स्वयंपाकाची भांडी घासण्यासाठी मात्र गावातील कुळवाडी मुद्दामहून आपणहून येत असत.त्यांना मोबदला असा नसेच. फक्त जेवणखाण मात्र घरच्यासारखे वाढण्यात येई.
बटूचा घेरा करण्यासाठी अर्जुन न्हाव्याचा मान असे. मांडवात मुंज लागल्यावर सर्वाना पान सुपारी देण्यात येई. नारळ, साखरेची पुडी, विड्याची २ पाने आणि सुपारी उपस्थितांना दिली जात असे. नंतर जेवणाचा बेत असे. बुंदीचे लाडू, भात, वरण, चटणी, कोशिंबिर,पापडसांडगे आणि लालभोपळ्याची भाजी असा मेन्यु! जास्तीत जास्त लाडू खाण्यासाठी स्पर्धा लागे.काही मंडळी एकेका वेळी २०/२० लाडू सहज उठवित असत.
सोवळ्याची लंगोटी नेसून,दर्भाची दोरी करुन कमरेस मृगाजिन बांधून,हातात दंड घेऊन एका पाटावर बसून 'ॐ भवती भिक्षां देही ' म्हणत असल्याचे आठवते. घरातील बायकामाणसे भिक्षा वाढत. हीच भिक्षावळ! वरात, ब्यांड असे काही नव्हते.फोटोग्राफर,व्हिडीओ शूटींग हे शब्द सुध्दा आम्हाला माहित नव्हते.
मुंजीच्या दुसर्‍या दिवशी 'पळसुला' नावाचा एक विधी असे. कुंडीत पळसाची फांदी लावून तिची पूजा केली जाई. हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंजीचे विधी समाप्त होत असत. दुपारीही मोठी पंगत असे. गूळभात,वडे,घारगे हाच बेत असे.
पाहुणे मंडळींना नारळ देऊन संध्याकाळी पाठवणी करीत असत.
मुंजीनंतर दररोज सूर्याला अर्घ्य देऊन गायत्रीचा १००० जप करायला लागत असे.वडिल अगर विष्णु पाध्ये म्हणून एकजण होते ते संध्या शिकवत असत.मी नुसताच जानव्यास हात लावून बसत असे.
एकीकडे खामकर मास्तरांची शाळाही चालू होती. पुढे लगेचच आषाढात २ दिवस वडिलांना खोकला आणि तापाचे निमित्त होऊन अगदी अचानक आषाढ शु. १३ दिवशी देवाज्ञा झाली. स्मशानात नेऊन अर्जुन न्हाव्याकडून माझे क्षौर करण्यात आले आणि पुढचे विधी माझ्याकडून करवून घेण्यात आले असे पुसट आठवते. नक्की काय करवून घेतले ते आठवत नाही आणि अग्नि दिल्याचेही आठवत नाही. सर्वजण घरी आल्यावर मला पुन्हा आंघोळ घालण्यात आली आणि मग मी बेशुध्द झालो असे इतर घरची इतर माणसे सांगत असत.त्यावेळी मोठा मी ८ वर्षाचा, प्रभाकर ६,वत्सु ४ तर बाळ १.५ वर्षाचा होता.आम्ही पोरके झालो असे इतर सगळी माणसे म्हणत असत आणि त्यामुळे घरातून बाहेर येऊन लोकांना तोंड दाखवायची लाज वाटत असे. आम्ही सारी भावंडे जवळजवळ महिनाभर घरातून बाहेरच पडलो नाही.
एक दिवस खामकर मास्तर आणि २/३ मुले घरी आली आणि आम्हा दोघा भावांना शाळेत घेऊन गेले व शाळा सुटल्यावरही दोघेतिघे घरी पोहोचवायला आले.कितीतरी दिवस आम्ही दोघेही शाळेत एक अक्षर बोलत नसू,मान खाली घालून नुसते बसून राहत असू पण मास्तरांनी हळूहळू इतर मुलांशी बोलायला आम्हाला भाग पाडले आणि हळूहळू आम्ही अभ्यासात लक्ष घालू लागलो.
दुसर्‍या वर्षी मला ४थीत बसवण्यात आले तर प्रभाकरास २ रीत. तात्याचा बाळू,दत्तू आणि मी एवढेच जण ४थीत होतो. ३रीत ५/७मुले,२रीत प्रभाकरासहित ४ जण आणि पहिलीत ७/८ जण एवढ्या मुलांची शाळा एकाच ओसरीवर चाले. एका वर्गाचे शुध्दलेखन तर दुसर्‍या वर्गाचा हिशेव, तिसरीची पुस्ती आणि आणि एका वर्गाचे पाढे घेत एकच मास्तर शाळा हाकित असत.अशातच आमची वार्षिक परीक्षा झाली. आम्ही तिघेही पास झालो त्यात माझा नं पहिला आला.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

13 Mar 2009 - 4:07 pm | सहज

हाही भाग आवडला.

मुंजीचे वर्णन हा भाग वाचुन होतोय तोच....

स्मृतीगंध-१ "व्हेळातले दिवस"

कृपया मागील भागांचा दुवा दर लेखात देत जा.

शेखर's picture

13 Mar 2009 - 4:08 pm | शेखर

साधी सोपी भाषा मनाला भावली.

शेखर

विंजिनेर's picture

13 Mar 2009 - 4:10 pm | विंजिनेर

पुलेशु!!

मांडवात मुंज लागल्यावर सर्वाना पान सुपारी देण्यात येई.

कानात नाव सांगायचे नसे काय? :)
बाकी, 'मी कसा झालो'च्या शैलीसारखे तुमच्या लिहिणे आहे असे वाचताना कधी कधी वाटते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Mar 2009 - 4:10 pm | घाशीराम कोतवाल १.२

छान जमला हा लेख मुंज कशी करतात याच वर्णन अप्रतीम आहे .
आम्ही पडलो घाटावरचे त्यात जन्म मुंबईचा त्यामुळे मुंज वैगेरे प्रकार मला तरी
ठाऊक नाही आता वामनसुत साहेबांमुळे हे कळले कसे असते ते
पु ले शु असेच लिहित रहा

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

व्यंकु's picture

13 Mar 2009 - 4:41 pm | व्यंकु

दुसरा भागही छान आहे

शितल's picture

13 Mar 2009 - 5:57 pm | शितल

सहमत. :)

रेवती's picture

13 Mar 2009 - 4:47 pm | रेवती

पुढच्या भागाची वाट पहात आहे.
लेखनशैली मस्तच!

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2009 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे

वामनसुत साहेब
चित्र उभ होत आपल्या लेखनाने.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मन्जिरि's picture

13 Mar 2009 - 5:24 pm | मन्जिरि

व्वा व्वा फारच सुरेख उत्तम जमलाय

किट्टु's picture

13 Mar 2009 - 6:10 pm | किट्टु

लेखनशैली मस्तच! अगदी मुंजीच चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर....

पुढचा भाग येउद्या पटकन... 8>

प्राजु's picture

13 Mar 2009 - 7:45 pm | प्राजु

आजीकडून तुम्ही सांगितलेल्या बर्‍याच गोष्टी ऐकल्या आहेत.
कुळवाडी लोक, बायका.. ते पोहे करण्याची पद्धत .. पापड, कुरडया.. खूप खूप सांगायची आजी.
खूप आवडते आहे तुमचे लेखन.
पुढचे भागही लवकर लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पर्नल नेने मराठे's picture

15 Mar 2009 - 4:23 pm | पर्नल नेने मराठे

मी सुद्धा कुळवाडी शब्द मझ्या आइकदुन आइक्लाय, ति सुद्धा राजापुरात राहात असे.
चुचु

लिखाळ's picture

13 Mar 2009 - 7:50 pm | लिखाळ

दोन्ही भाग एकदम वाचले.. फार छान लेख आहेत. अजून लिहा .. वाचायला आवडेल.
-- लिखाळ.

मानस's picture

13 Mar 2009 - 8:10 pm | मानस

काका

फारच सुरेख, दोन्ही भाग आवडले. तुमची शैली छानच आहे व अतिशय ओघवती आहे.

माझ्या शाळा-कॉलेजच्या दिवसांत जवळ-जवळ संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आहे. त्या दिवसांत जे काही "गाव" ही संकल्पना पाहिली, अनुभवली त्याला तोड नाही. आजही ते दिवस अशा लेखामधुन आठवतात व त्या आठवणींनी मन हळवं होतं.

गेले ते दिन गेले!!!

"स्मृतीगंध" हे शिर्षक तर अप्रतिम....... असेच लिहित रहा .....

सस्नेह

मिलिंद

प्रमोद देव's picture

13 Mar 2009 - 8:23 pm | प्रमोद देव

वामनसुतराव, मस्तच लिहिता राव तुम्ही.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राची's picture

13 Mar 2009 - 9:40 pm | प्राची

वामनसुत साहेब,दोन्ही भाग एकदम वाचले.आपण ओघवत्या भाषेत आपल्या लहानपणापासूनच्या आठवणी सांगत आहात.हे लेखन वाचता वाचता बाबा त्यांच्या लहानपणीच्या ज्याज्या आठवणी सांगतात(आणि गावी गेल्यावर आज्जीकडून ऐकायला मिळतात),त्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. ;;)
असेच आणखी लिहा.त्यानिमित्ताने आम्हाला जुन्या(आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या) रीतिरिवाज,पद्धती इत्यादींचा परिचय होईल. :) :) :)

अवलिया's picture

13 Mar 2009 - 9:51 pm | अवलिया

हाही भाग मस्त जमलाय!!
येवु द्या अजुन.. :)

--अवलिया

चतुरंग's picture

13 Mar 2009 - 9:58 pm | चतुरंग

लेखनशैली आवडली! अजून लिहा वाचायला आवडेल.

श्रीमंत सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत त्रिभुवनमंडित जगत् चालक श्रीआर्यादुर्गादेवी यांचे सेवेसी चरणी नतपर दासानुदासाचे दोन्ही कर जोडून त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार ही विज्ञापना.

हा मायना भन्नाटच आहे! :)

उखळाला 'वायना' असाही शब्द आहे हे माहीत नव्हते. पोहे करायची पद्धत सुद्धा प्रथमच ऐकतोय.

चतुरंग

शाल्मली's picture

13 Mar 2009 - 10:27 pm | शाल्मली

हा भागही छान झाला आहे.
असेच लिहीत रहा.
अजून वाचायला आवडेल.

--शाल्मली.

नंदन's picture

14 Mar 2009 - 12:06 am | नंदन

साध्यासोप्या शब्दांत लिहिलेला चित्रदर्शी लेख. सगळे वातावरण डोळ्यांसमोर उभे राहिले. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लवंगी's picture

14 Mar 2009 - 6:09 am | लवंगी

हे वाचताना आजी-आजोबांच्या गप्पा आठवतात. ते पण असेच जुन्या आठवणीतुन भूतकाळ तंतोतंत ऊभे करत असत. आम्ही मुले त्यांच्या आठवणीत असेच गुंगुन जात असु. आज ना आजी आहे ना आजोबा. तुमच्या आठवणी परत भूतकाळात घेऊन जाताहेत.

समिधा's picture

14 Mar 2009 - 6:24 am | समिधा

तुमचे दोन्ही लेख खुपच सुंदर आहेत. =D>

मदनबाण's picture

14 Mar 2009 - 7:57 am | मदनबाण

सुंदर लेखन... :)

मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

वामनसुत's picture

14 Mar 2009 - 12:21 pm | वामनसुत

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांनी लिहायला हुरुप येत आहे,
धन्यवाद.

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 2:25 pm | शक्तिमान

लेख छान आहे.
परंतु मुंज या विषयी जास्त काही माहिती नसल्याने तो भाग कळाला नाही.
कुणीतरी मुंज म्हणजे काय, ती का करतात वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकल्यास उत्तम.

बाकी पुलेशु.